लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदला कडे अत्याधुनिक युद्धनौका, विमान वाहक (Aircraft Carrier), विनाशिका (destroyer), फ्रिगेट (Frigates), कार्वेटेस (Corvettes), विविध श्रेणीतील पाणबुड्या, आणि अणुइंधनावरच्या पाणबुड्या आणि इतर अति विशिष्ट नौका आहेत.
४ डिसेंबर २०१९ ला भारतीय नौदल दिवस साजरा झाला. त्यावर मला काही तरी लिहिण्याची खूप इच्छा होती. चला तर आज आपण विनाशिका नौका विषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यामध्ये (INS - Indian Navy Ship) INS रणवीर बद्दल विशेष जाणून घेणार आहोत. विनाशिका म्हणजे चपळ, जलद गतीच्या लढाऊ नौकांचा प्रकार आहे. सहसा या विनाशिका मोठ्या लढाऊ नौका, किंवा आरमारी तांड्यांच्या जवळपास राहून त्यांचे युद्ध प्रसंगी शत्रूच्या हल्ल्या पासून रक्षण करतात. या विनाशिका रसद न घेता बराच वेळ लढाईत कार्यरत राहू शकतात. INS विक्रांत डिसेंबर १९६१च्या गोव्यावर ऑपरेशन विजय दरम्यान तिरंगा फडकण्यासाठी तैनात होती त्यावेळेस विक्रांत सोबत दोन विनाशिका होत्या.
INS रणवीर ही राजपूत श्रेणीतील विनाशिका आहे. राजपूत वर्गातील विनाशिका ही रशियाच्या सोव्हिएत काशीन- श्रेणीतील विनाशिका (Soviet Kashin-class destroyers) यांची सुधारित आवृत्ती आहे. या विनाशिका काशीन -२ श्रेणीतील सुद्धा समजल्या जातात. खास भारती नौदलाच्या गरजांचा विचार करून या प्रकारच्या विनाशिका बनवण्यात आल्या आहेत. १९८० साली फक्त अश्या ५ विनाशिका रशिया कडून भारतात खरेदी करण्यात आल्या आहेत. या विनाशिका ईस्टर्न नेवल कमांड मुख्यालय विशाखापट्टण यांच्या अख्यारीत आहेत.
सध्याच्या घडीला भारतात फक्त ३ श्रेणीतील विनाशिका कार्यरत आहेत. १. कोलकत्ता २. दिल्ली ३. राजपूत श्रेणी. उपलब्ध माहितीनुसार ३ श्रेणीतील मिळून सध्या १० विनाशिका कार्यरत आहेत. तीन पैकी २ वर्गातील दिल्ली, राजपूत या विनाशिका या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक(Guided missile destroyer) प्रकारातील आहेत. नावा प्रमाणे या विनाशिका क्षेपणास्त्र मार्गदर्शित करून शत्रूवर डागू शकतात. कोलकत्ता श्रेणी ही स्टील्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक प्रणाली(Stealth guided missile destroyer) आधारित आहे. स्टील्थ प्रणाली शत्रू सेनेतील रडार, सोनारला शोधण्यासाठी खूप अवघड असते. या विनाशिका वर पाणबुडी, विमान आणि नौका विरोधी क्षेपणास्त्र बसवलेले असतात.
विनाशिकांच्या नंबर मध्ये DDG हा नाटो मानक वापरतात. पण भारतात विनाशिकाचे नंबर मध्ये D वापरून पुढे संख्या वापरली जाते. उदाहरणात INS रणवीरचा नंबर D54 आहे. INS रणवीर ही विनाशिका रशिया मध्ये Mykolayiv शिपयार्ड मध्ये बनली आहे. INS रणवीरचे रशियन नाव Tverdyy आहे. या विनाशिकेची Mykolayiv शिपयार्ड मध्ये २४ ऑक्टोबर १९८१ ला बांधणीला सुरुवात झाली. आणि भारतीय नौदलात मध्ये INS रणवीर २१ एप्रिल १९८६ या तारखेला कार्यान्वित झाली. मागील ३३ वर्षा पासून भारतीय नौदला मध्ये कार्यरत आहे. पाण्यात INS रणवीरचे मानक विस्थापन (Displacement) ३९५० टन आहे आणि ज्यावेळेस विनाशिका पूर्ण भारा सोबत असते तिचे विस्थापन ४९७४ टन आहे. हिची लांबी १४७ मीटर असून वेग तासी ६५ किलोमीटर आहे. यावर ३२० लोक कार्यरत असून त्यापैकी ३५ ऑफिसर आहेत. विनाशिके वर KA-28 हेलिकॉप्टर असून तैनात आहे. त्यासोबत INS रणवीर वर (BrahMos supersonic cruise missile systems) ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली सुद्धा तैनात आहे.
यावर अत्याधुनिक सेन्सर लावलेले असून, अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि पाणबुडी विरोधी, विमान विरोधी, पृष्ठभाग वरील नौका विरोधी क्षेपणास्त्र, रडार आणि सोनार प्रणाली सुद्धा तैनात आहे. या विनाशिकेचे जानेवारी २००८ साली गरजे नुसार सुधारणा करून नूतनीकरण करण्यात आले. जेणेकरून तिचा पूर्ण क्षमतेने सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात उपयोग करता येईल. INS रणवीरचे चिन्ह (seal) सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण असून त्यात २ कुऱ्हाडी क्रॉस आहेत आणि बरोबर मध्ये एक विशिष्ट प्रकारचा टोकदार चाकू आहे. आणि त्याखाली पाण्याच्या लाटा दर्शवलेल्या आहेत. त्यावर रणवीर असे नाव लिहिलेले आहे.
२००८ साली भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग श्रीलंके मध्ये सार्क परिषदे निमित्त गेले होते त्यावेळेस INS रणवीर आणि INS म्हैसूर या दोन्ही विनाशिका पंतप्रधानाच्या आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात होत्या. INS रणवीर ने आत्ता पर्यंत बऱ्याच नौदलाच्या सरावात भाग घेतला आहे. जसे की १५व्या भारतीय आणि अमेरिकेच्या १० दिवशीय एकत्र सरावात बंगालच्या उपसागरात एप्रिल २०१२ मध्ये भाग घेतला आहे. १८ मे २०१५ या वर्षी INS रणवीर सिंगापुर इथे एकत्र सरावात भाग घेतला होता. २०१५ मध्ये INS रणवीर सोबत INS शक्ती सिंगापुर आणि इंडोनेशिया मध्ये बंदरा वर प्रवासात दरम्यान थांबल्या होत्या. २०१६ ला भारत आणि रशिया मधील एकत्र सराव सुद्धा भाग घेतला होता. ०९ जानेवारी २०१६ या वर्षी झालेले The Eastern Fleet Pulling Regatta स्पर्धेत INS रणवीरच्या नौसैनिकांनी भाग घेऊन ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती. INS रणवीर ने जुलै २०१७ दरम्यान बांग्लादेश च्या चित्तगाव या बंदराला सदिच्छा भेट दिली होती. २७ जून २०१७ ला धर्मा इथे INS रणवीर ने मेडिकल कॅम्प लावून गरजूंना औषध आणि तपासणी केली आहे. १९ जुन २०१९ ला INS रणवीर ने श्रीलंका इथे सदिच्छा भेट दिली होती. मागील आंतरराष्ट्रीय योगं दिवशी INS रणवीर नौके वर तेथील कर्मचारी वर्गानी योग करून साजरा केला. त्यावेळेस सद्गुरू सुद्धा नौके वर उपस्थित होते. पहिल्या भारतीय, सिंगापुर, थायलंड त्रिदेशीय एकत्र सरावात सुद्धा भाग घेतला होता. हा सराव १६ ते २० सप्टेंबर २०१९ या दरम्यान पार पडला होता. हा सराव अंदमान आणि निकोबार या बेटावर झाला होता. ओरिसात आलेल्या “फनी” वादळात बचाव कार्यात INS रणवीरने योगदान दिले आहे. भारतीय नौदलात ३३ वर्षा पासून योगदान देऊन ठसा उमटविणाऱ्या INS रणवीरच्या २१ एप्रिल १९८६ ते आत्ता पर्यंतच्या सर्व कॅप्टन (Captains)/ कमांडिंग ऑफिसर (Commanding Officer) ना कडकडीत सलाम. जय हिंद!!!
संदर्भ स्त्रोत्र - विकिपीडिया, www.indiannavy.nic.in, google.com आणि इतर news website
प्रतिक्रिया
9 Dec 2019 - 7:07 pm | जॉनविक्क
भारतीय नौदल प्रचंड मोठे आहे आता ते मला सर्वात अत्याधुनिक झालेलेही बघायचे आहे.
9 Dec 2019 - 7:18 pm | धर्मराजमुटके
हे वाक्य 'भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे, ते मला सर्वात अत्याधुनिक (बुलेट ट्रेनसह)झालेलेही बघायचे आहे" या चालीवर वाचायचे काय ?
:)
9 Dec 2019 - 7:20 pm | जॉनविक्क
प्रवास आणि देशाची सुरक्षा या दोन वेगळ्या बाबी आहेत, माझ्या नजरेत फ्रान्स व ब्रिटन चे नौदल अत्याधुनिक आहेत. भारत हळू हळू प्रगती करत आहे
9 Dec 2019 - 11:31 pm | bhagwatblog
भारत जरी मागे असला नूतनीकरण करत भारत दुसऱ्या वर अवलंबून न राहता स्वबळावर हळू हळू प्रगती करत आहे. २०२१ मध्ये स्वनिर्मित विशाखापट्टण श्रेणीची विनाशिका भारतीय नौदलात रुजू होणार आहे.
14 Dec 2019 - 3:43 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
16 Dec 2019 - 9:49 am | सुबोध खरे
रणवीर या युद्धनौकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून एक आठवडयासाठी (तात्पुरत्या कामासाठी) temporary duty जाण्याची संधी मला मिळाली होती (१९८९). तेथे तैनात असलेला माझा मित्र रणधीर सिंह हा सुटीवर गेला असता युद्ध नौका सरावासाठी जाणार होती तेथे मला पाठवण्यात आले.
त्यावेळेस हे जहाज नवीन होते आणि त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि अस्त्रे भरलेली होती कि इंग्रजीत त्याला armed to teeth म्हणतात.
आतमध्ये गेल्यावर असे लक्षात येत असे कि जिथे जमेल तिथे जास्तीत जास्त शस्त्रास्त्रे बसवलेली आहेत आणि त्यात "उरल्या सुरल्या" जागेत सैनिकांना/ अधिकाऱ्याना राहायला जागा दिली आहे.
या शिवाय या नौकेच बांधणी इतकी उत्कृष्ट होती कि तिचे रडारवर दिसणारे चित्र( radar cross section) फारच लहान होते.
शिवाय याची इंजिने गॅस टर्बाईन वर चालत असल्याने त्याचा वेग इतर सर्व नौकांपेक्षा बराच जास्त असे शिवाय त्यावरील रडार आणि अस्त्रे इतकी उत्तम होती कि युद्ध सराव स्पर्धामध्ये या नौका( राजपूत वर्ग विनाशिका) नेहमी पहिल्या येत.
या नौकेवर कामोव्ह २८ या एक उलट एक सुलट असे दोन पंखे असलेली हेलिकॉप्टर (contra rotating) च्या वैमानिकांना रात्री जहाजावर उतरण्याचे प्रशिक्षण आणि सराव यासाठी आम्हाला गोव्याच्या आसपास समुद्रात सात दिवस फिरायचे होते.
https://www.indiannavy.nic.in/content/kamov-28-kamov-31
दिवस इतर जहाजांबरोबर युद्धसराव आणि संध्याकाळी आणि रात्री (DLP DECK LANDING PRACTICE)
सुरुवातीला या वैमानिकांना दिवसा जहाजावर उतरण्याचे आणि उडण्याचे प्रशिक्षण आणि सराव दिला जातो. नंतर पौर्णिमेच्या संध्याकाळी आणि रात्री आणि सर्वात शेवटी अमावास्येच्या उत्तर रात्री उतरण्याचे आणि उडण्याचे प्रशिक्षण आणि सराव दिला जातो एवढे सगळे पार पडल्यावरच तो वैमानिक पूर्ण प्रशिक्षित म्हणून काम करू लागतो.
या सर्व लफड्यात पौर्णिमेच्या अगोदर तीन आणि नंतर तीन असे सात दिवस मी केवळ गोव्यावर उगवणारा, वाढत जाणारा आणि नंतर कमी होत गेलेला चंद्र समुद्रातून पाहून गोव्याच्या भुमीवर पाय सुद्धा न ठेवता परत मुंबईत आलो.
अर्थात पणजीच्या पश्चिमेला समुद्रात फिरत असताना गोव्यावर उगवणारा पौर्णिमेचा चन्द्र पाहणे हि एक पर्वणीच होती यात काही शंका नाही.
16 Dec 2019 - 3:07 pm | bhagwatblog
रणवीर या युद्धनौकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून एक आठवडयासाठी (तात्पुरत्या कामासाठी) temporary duty जाण्याची संधी मला मिळाली होती (१९८९). >> +१ खूपच छान अनुभव तुम्ही सांगितला. खुप खुप धन्यवाद!!! मला कधी भविष्यात संधी उपलब्ध झाल्यास नक्की बघेन.