चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्याशी वैर ||
पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||
कधीची दारातली तुळस .. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली...
पांढर्या रानागत गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, जेंव्हा होता आवळला फास...
नाही गोठ्यामधी माय
ना टोपल्यात भाकर
गुलछडी उभी पेटली
काऴळ ठिक्कुर घर ||
शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली, अन्नाचा कुठ हाय तपास...
शासनाची पांढरी बुजगावनी.. फिरतात कधी शेतात, धा रुपडं हातात टेकवून टिव्हीत मिरवतात..
कणसात नाय दाणं
रीती कापसाची बोंड
जगण्याच्या अट्टासाची
गळी अडकली धोंड
गळी अडकली धोंड ||
त्याच मरण कोणत्या फांदिवर लटकलय , माहीत नाय.. पण एव्हड कळुन चुकलय..
मोठ्ठा मोठ्ठा असा कोण नसतो .. दुष्काळाच्या ह्या वनव्यात फक्त शेतकरी पेटतो.. फक्त शेतकरी पेटतो...
--- शब्दमेघ (गणेशा) _'रानातली वाट.. एक न संपणारा परिघ' ..पुन:प्रकाशित
प्रतिक्रिया
3 Dec 2019 - 7:10 am | राघव
चांगली रचना. सल बोचरी आहे.
4 Dec 2019 - 4:20 am | पाषाणभेद
कविता काळजापर्यंत पोहोचली.
11 Dec 2019 - 1:31 pm | श्वेता२४
अस्वस्थ करुन सोडणारी कविता
11 Dec 2019 - 5:03 pm | जॉनविक्क
गणेशा , माझा मित्र आहे , शेतकरी. फक्त तांदूळ पिकवतो 6 महिने जमीन तशीच. पडून.
इस्त्रायल नामक देश आहे, परिस्थिती अनुकूल नसूनही उत्कृष्ट शेती करतो. झक मारत ही हरितक्रांती करणे भाग आहे म्हणून हे घडते अन्यथा देश म्हणून तो केंव्हाच नश्ट होईल. आता तिथे जमीन कमी म्हणून मजले तयार करून शेती केली जाते उत्पन्न वाढवले जाते, भारतात याची सुरुवातही नाही... म्हणे शेतीप्रधान देश.
जर्मन तंत्रज्ञान इन्जीनियारिंग मधे सर्वोत्कृष्ट मानतात सर्वाणा माहित आहे मेकानिकल इंजिनिरिंग खरी प्रगती यांनीच ते ही प्रथम व द्वितीय महा युद्ध कालखंडात केली, शस्त्रास्त्रे निर्माण करायला झक मारत ते करणे भागच होते कारण देशाचे भवितव्य त्यावर अवलंबून होते
मुळात अस्तित्व टिकवायला ईश्वर अनुकूलता हवी , राज्यकर्ते अनुकूल हवेत हे भारतीय शेतकरी मनावर किमान 2000 वर्षे बिंबले गेले आहे, तो एक अप्रत्यक्ष धर्म बनला आहे याविरोधात त्क्रांती करायला फुले शिवराय आंबेडकर , आर्यभट्ट न्हवे तर झक मारत कष्ट, तंत्रज्ञान आणी प्रचंड व्हिजिगिशु वृत्ती हवी आणि ती ज्याची त्यानेच निर्माण करावी लागेल.शेतकऱ्यांना बदलेल्या काळासोबत जुळवुन न्हवे तर प्रभुत्व गाजवून पुढे यायची मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे.
मला माहीत आहे मी कोरे तत्वज्ञान बोलत आहे, पण मनाशी खूणगाठ बांधली जाणे हे सर्वप्रथम येते मग त्यादृष्टीने प्रयत्न, अंमलबजावणी वगैरे वगैरे चक्र सुरू होते आणी त्याची सुरुवात यातूनच आहे.
11 Dec 2019 - 11:54 pm | गणेशा
तुम्ही म्हणता ते बरोबर आहेच , आपोआप सगळे बदलणार नाही...
भारतातील अन्नधान्यांच्या उत्पादनाच्या अनुमानासाठी आजही अमेरिकेच्या कृषी खात्याच्या World Agricultural Supply and Demand Estimates आधार घ्यावा लागतो.कोणत्या राज्यात किती कांदा लागण झालाय, याची माहिती दुसऱ्या राज्याला त्यांच्या शेतकऱ्याला मिळत नाही... आणि मग सुरु होतो तेजी आणि मंदी चा खेळ..
इस्राईल तर सोडा, चीन चा शेतीतील जिडीपी हा 1 ट्रिलियन आहे, आणि आपण अजूनही वर्षोनुवर्षे त्याच मंदी तेजीत अडकलोय..
असो याबाबत खूप लिहिण्या सारखे आहे, पण सध्या जरा जास्तच बिझी झालोय... निवांत बोलेन..
वरचे पण तुटक झोपता झोपता लिहिले आहे चूकभूल देणे घेणे.
ते india deserves better चा पण पुढचा भाग राहिलाय.. लिहितो लवकर..
भेटूच निवांत पुन्हा..
12 Dec 2019 - 12:10 am | जॉनविक्क
करायची का एखादी अशी सुविधा सुरू जो शेती उद्योग सिंक्रोनाईज करेल ?
लष्कराच्या भाकऱ्या भाजणेही आवश्यक असते.
14 Dec 2019 - 1:37 am | जॉनविक्क
:)
अंदाज होताच. बोलणे सोपे असते करणे अशक्य!
मी असे म्हणत नाही आपल्या जबाबदाऱ्या सोडून आपण यात उडी मारावी पण बदल का घडत नाहीत याचा शोध आपल्यामध्ये लपलेला असतो.
बाकी मला अजूनही वाटते विकिपीडिया च्या धरतीवर असे अँप व वेबसाईट सुरू करता येईल जी कुठे कशाची व किती लागवड झाली आहे हे युजरची प्रायव्हसी राखून उपलब्ध करता येईल. ज्याचा फायदा शेती उद्योग जास्त दिशादर्शक व्हायला होऊ शकतो.
14 Dec 2019 - 12:29 pm | गणेशा
वरच्या रिप्लायला निवांत विचार करून उत्तर द्यावे असे मनात होते.. आणि त्यानंतर काही गडबडीत हा रिप्लाय मी विसरलो. तुमचा रिप्लाय आल्याने पुन्हा लक्षात आले.
खरे तर असे शेती उद्योग sync झाले पाहिजे... पण त्या साठी व्यापक असे काही केले पाहिजे आणि ते एक दोघांचे काम नक्कीच नसेल.. निदान महाराष्ट्रापुरते जरी मर्यादित केले तरी ऍग्रोवन किंवा इतर.. किंवा टीव्ही वरील जशी आमची माती आमची माणसं अश्या पद्धतीने ती बऱ्याच जना पर्यंत कशी पोहचता येईल हे पाहिले पाहिजे...
सध्या माझ्या मते, निर्यातदार आणि शेतकरी यांची डायरेक्त्त लिंक जरी प्रस्थापित झाली तरी बरेच प्रॉब्लेम कमी होतील असे वाटते...
त्यांनी 2 फायदे होतील.. शेतकऱ्याला कोठे काय निर्यात करायचे आहे हे माहीत असेल आणि निर्यात दाराला कोण आपल्याला चांगल्या उत्तम प्रतीचे उत्पादन देऊ शकेल हे.
बाकी आपण सुरवात करायला हरकत नाही, पण माझे शेतीतील ज्ञान खूप कमी आहे,..आणि गरजू शेतकरी इंटरनेट मधून काही शिकणार नाही, त्यासाठी गावागावात, स्थानिक पातळी वर जागृती ची गरज आणि संस्था लागेल.
बाकी हा विषय वयक्तिक हाताळणे अवघड आहे, आणि तुम्ही म्हणता तसें बोलणे सोप्पे असते कृती करणे अवघड हे मला मान्य आहे..
पण काहीतरी सुरुवात मग ती फेल झाली तरी चालेल या पार्श्वभूमी वर करायला काही हरकत नाही.
पण फक्त, एखादी वेब साईट काढून काही बदलणार नाही हे नक्की.. संपर्क.. खोल पर्यन्त पोहचण्याचे माध्यम, विश्वास आणि सर्वंकष ज्ञानाची गरज लागेलच लागेल.
14 Dec 2019 - 12:39 pm | गणेशा
अवांतर : माझ्या मेळघाट ह्या कविता आणि मेळघाट या india deservse better या भागावर मात्र मी एक मित्राच्या पुढाकाराने आणि त्याच्या पत्रकार मित्रा बरोबर मेळघाट कुपोषण, परिस्थिती आणि बदल यावर डॉक्युमेंटरी करायची सुरुवात करत आहे.. माझ्या साठी ते हि नसे थोडके.. पण वेळ लागेल.
सामान्य माणूस म्हणून, आणि पैसे वेळ आणि योग्य ज्ञान या विवंचनेत बऱ्याच गोष्टी नाही करता येत हे मी जाहीर पणे बोलतो..
कदाचित यामुळेच माझे कविता आणि इतर लिखाण मध्ये बंद झाले असेल असे हि वाटते..
14 Dec 2019 - 8:02 pm | जॉनविक्क
फुल ना फुलांची पाकळी :)
माझीही थोडी फार समाजसेवा चालू आहे अधून मधून, स्वतःचे समाधान म्हणून, प्रत्यक्ष बदल अत्यन्त कमी पण ज्याच्यापर्यंत तो पोचतोय त्याचे तरी भलेच होतं असल्याचे समाधानच वेगळे आहे.
14 Dec 2019 - 8:56 pm | गणेशा
समाधान होणे महत्वाचे, पण खरे सांगू का, मिडलक्लास लोकांना ना समाधान पूर्ण मिळते ना सुख पूर्ण मिळते... आणि या सुखापासून ते समाधाना पर्यंत पोहोचण्याच्या मार्गात त्याचे मन अनेकदा अनेक वेगवेगळ्या गोष्टींकडे हेलकावे खाते.. पण त्या मनाप्रमाणे त्याला काही करता येत नाही..
त्यात त्या व्यक्तीची चूक नसते.. पण असो.. असले फिलॉसॉफिकल मी कसे बोलू लागलो हे पण कळेना म्हणून थांबतो..
14 Dec 2019 - 12:55 pm | पियुशा
व्यथित करणारी रचना ! :(