चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ५ : ऋषिकेश रिव्हर राफ्टिंग

Primary tabs

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
28 Nov 2019 - 9:10 am

या सहलीतील अनुभवावर या आधीच्या पोस्ट्स पुढीलप्रमाणे

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

---

ऋषिकेशला सकाळी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे फार मोठी समस्या झाली. खरंतर ते हॉटेल म्हणजे एक हॉस्टेल होतं. ऋषिकेशमध्ये हॉटेलइतकेच होस्टेल आहेत.

या हॉस्टेलमध्ये सिंगल बेड, डबल बेड, बंक बेड, हॉल आणि किचन सामाईक वापरासाठी आणि बेडरूम स्वतंत्र भाड्याने अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था आहेत. स्वस्त भाड्यामुळे भटकंती करणाऱ्या तरुणांमध्ये हे युथ होस्टेल बरेच लोकप्रिय आहेत.

आम्ही जिथे थांबलो होतो (दि अननोन प्लेस) तिथे सेवा खूपच वाईट होती. इतक्या मोठ्या होस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी फक्त एकच माणूस थांबला होता.

पहाटे जेव्हा आम्ही आवरायला उठलो तेव्हा आमच्या रूममध्ये पाणीच बंद झालं. आम्ही खाली गेलो तेव्हा ऑफिससमोर आणखी लोक जमले होते. आणि तो मुलगा ऑफिसचं दार बंद करून आत ढाराढूर झोपला होता.

आम्ही सकाळी लवकरच राफ्टींग बुक करून ठेवली होती. जेणेकरून राफ्टिंग लवकर संपून आम्हाला उरलेला दिवस फिरायला मिळेल. पण पाणी नसल्यामुळे आम्हाला आवरायला मोठा अडथळा निर्माण झाला.

खूपदा दार वाजवल्यावर शेवटी तो मुलगा उठला. आणि उद्धटपणे उत्तरे द्यायला. पाणी कधी येईल, मागवलं आहे का, हे काहीच नीट सांगत नव्हता. "त्याने पाणी येईल तेव्हा येईल" असं उर्मट उत्तर दिलं.

"मला काहीच माहिती नाही मालकाशी बोला" असं म्हणून मालकाचा नंबर दिला आणि पुन्हा दार बंद करून आत निघून गेला.

मालक काही फोन उचलत नव्हता. आणि लोक ऑफिसच्या दारावर धाडधाड वाजवत होते.

आम्ही शेवटी राफ्टिंगवाल्याला फोन करून थोडा उशिरा येऊ असं सांगितलं. आम्हाला त्यादिवशी राफ्टिंग आणि जमलं तर बंजी जम्पिंग एवढंच करायचं होतं.

पण बाकी काही बिचार्यांचे मात्र प्रवासाचे बेत होते. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. त्यांची फारच गैरसोय झाली. एक आजी तर त्या मुलाच्या नावाने खुप ओरडत होत्या. त्यांच्या मुलाचं का नातवाचं पोट बिघडलं होतं. आणि तो आत असताना पाणी गेलं होतं. आता हे वाचुन ऐकून गंमतशीर वाटेल पण जो त्या परिस्थितीत असतो त्याची मात्र फार फजिती होते.

अर्ध्या एक तासाने थोडं थोडं पाणी नळाला यायला लागलं आणि पुन्हा संपायच्या आत आम्ही फटाफट आवरून निघालो. बाहेर एका ठेल्यावर पराठ्यांचा भरपेट नाश्ता केला.

मग राफ्टिंग एजंटच्या ऑफिससमोर येऊन थांबलो. ऋषिकेशमध्ये ढिगाने राफ्टिंगचे एजंट्स आहेत. खास करून तपोवनमध्ये. ऋषिकेशच्या मुख्य गावाजवळ तपोवन हा एरिया आहे इथे होस्टेल्स, राफ्टिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी खूप आहेत.

राफ्टिंगची फीस अंतरानुसार असते. ९, १५, २३ असे वेगवेगळे पॅकेज असतात. जेवढं अंतर निवडाल तेवढं अंतर एका ट्रकमध्ये बसून रस्त्यावरून तपोवन पासून दूर जायचं. ह्या ट्रक/टेम्पो मधेच राफ्ट, वल्हे, कयाक, जॅकेट्स, प्रवासी आणि गाईड असे सर्व जातात. मग हि राफ्ट हाताने उतरवून नदीपर्यंत घेऊन जावी लागते.

i1

सर्व प्रवासी (जास्तीत जास्त ८) आणि एक गाईड राफ्टमध्ये बसतात. गाईड राफ्टच्या मधोमध बसून सर्वांना मार्गदर्शन करतो. दुसरा एक गाईड छोट्याशा एका माणसाच्या कयाकमध्ये बसून आपल्या राफ्टच्या आसपास राहतो. जर चुकून कोणी खाली पडलं किंवा काही झालं तर राफ्टवाला गाईड बाकी लोकांसोबत राफ्टमधेच राहतो. आणि कयाकवाला गाईड मदतीला जातो.

राफ्टिंग सुरु करण्याआधी गाईड सुरक्षेसंबंधी सर्व सूचना अगदी सविस्तर पद्धतीने देतो. ह्या सविस्तर सूचना ऐकून आमच्या ग्रुपमधल्या एक दोन जणांना भीती वाटली. त्यांनी आधी एवढा विचार केलेलाच नव्हता. पण गाईडचं बोलणं ऐकून हे पण होऊ शकतं ते पण होऊ शकतं असं सर्व ऐकून त्यांना भीती वाटली. पण आम्ही थोडा धीर दिला कि हे सांगणं तर त्यांचं कामच आहे. असं होईलच असं नाही. पण काही झालं तर आपल्याला माहित तर हवं काय करायचं. त्यांनी हिम्मत करून ते आलेच.

गंगेचा प्रवाह एकदम जोरदार असतो आणि पाणी महाथंड. तरी त्यामानाने राफ्टिंग सुरु केल्या केल्या प्रवाहाचा वेग थोडा कमी असतो. पण नंतर अतिजास्त वेगाच्या प्रवाहाचे काही क्षेत्र येतात, त्यांना रॅपिड म्हणतात. इथे प्रत्येक रॅपिडला एक नाव दिलेलं आहे. आमच्या गाईडच्या मते सर्वात जास्त डेंजर रॅपिड म्हणजे गोल्फ कोर्स.

i2

सर्वच रॅपिड्समध्ये खूपच मजा आली. बोट प्रचंड हेलकावे खात वर खाली आपटत राहते, इकडून तिकडून थंड पाणी अंगावर येत राहतं. गाईड सतत ओरडत राहतो, फॉरवर्ड, बॅकवॉर्ड, स्टॉप, स्लो. त्याच्या सूचना पाळत पाळत वल्हे मारताना आपली त्रेधा तिरपीट होते.

थोड्या थोड्या अंतराने जिथे प्रवाह संथ आहे तिथे गाईड आपल्याला होडीला पकडून पाण्यात उडी मारायची आणि होडी जवळच तरंगण्याची परवानगी देतो. हे गंगेच्या पाण्यात डुंबणं मला सर्वात जास्त आवडलं. इतक्या थंड वाहत्या पाण्यात डुंबण्याची मजा शब्दात सांगण्यासारखी नाही. इतकं ताजं तवानं वाटतं आणि तिथून निघण्याची इच्छाच होत नाही.

i3

i4

मजा तर मजा आणि गंगेत नाहण्याचं पुण्य मिळतं ते वेगळंच. हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्रात इतकी गर्दी अंघोळ करत असते, अंग कपडे धूत असते कि तिथे पाण्यात शिरावं सुद्धा वाटत नाही. (तरी या वेळी खरंच फरक पडलेला दिसला हरिद्वार ला). इथे स्वच्छ पाण्यात कळतं नदीमध्ये स्नान इतकं पवित्र का मानलं गेलं असेल.

गोल्फ कोर्स रॅपिडजवळ एक छोटा अपघात घडला. तिथे लाटा इतक्या उंच उसळत होत्या कि एका क्षणी आमची बोट समोरून मागे पलटते कि काय असं वाटत होतं इतकी वर गेली. पण सुदैवाने आमची बोट वाचली. पण जवळच फिरणारी एक बोट उलटली आणि त्यातले २-३ लोक पाण्यात पडले. अचानक इतका कल्लोळ झाला कि काही काहीच कळेना. लाटांचा आवाज तर होताच.

त्यातलीच एक मुलगी क्षणात वाहत आमच्या बोटीला येऊन धडकली आणि तिने लगेच घट्ट आमच्या बोटीचा दोरखंड आणि मध्ये बसलेल्या समीरचा पाय धरून ठेवला. सगळे ओरडायला लागले. काही सेकंद नुसते ओरडण्यात गेले. कोणाला काही समजत नव्हतं. शेवटी समीरला गाईडने सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीने तिला ओढून आत आणता आलं. (ती सुरुवातीची माहिती कामी आलीच म्हणायची)

थोडा वेळ ती आमच्या बोटाच्या मध्यभागी बसून राहिली. ती इतकी घाबरली होती कि तिला काही बोलायला पण सुचत नव्हतं. गाईडने आणि आम्ही तिच्याशी बोलून वातावरण जरा हलकं केलं. मग ती जरा शांत झाली. पुढे एका सुरक्षित ठिकाणी ती तिच्या बोटमध्ये पुन्हा गेली.

राफ्टिंगला जी गर्दी असते त्याचा असा एक फायदा आहे. एका वेळी २-४ राफ्ट आणि कयाकवाले गाईड पाण्यात जवळपास फिरत असतात. त्यामुळे असं काही झालं तर मदतीला सर्वजण धावून येऊ शकतात.

राफ्टिंगच्या शेवटच्या स्टॉपआधी मॅगी पॉईंट आहे. का ते सांगायला नको. गरम मॅगी, चहा, पकोडे याचे बरेच ठेले तिथे लावलेले आहेत. तिथेच एका उंच खडकावरून लोक पाण्यात उद्या मारून क्लिफ जम्पिंगचा आनंद घेतात. आम्हाला आमच्या गाईडने पाण्याचा वेग खूपच वाढलेला असल्यामुळे ते न करण्याचा सल्ला दिला.

आयुष्यातला पहिला राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन आम्ही परत निघालो. राफ्टिंगलाच बराच उशीर झालेला होता. त्यामुळे दिवस फारसा उरला नव्हताच. ऋषिकेशला येऊन उरलेला दिवस टाईमपास केला. लक्ष्मण झुला पाहिला. ह्यावर इतकी गर्दी का असते मला समजत नाही. हँगिंग ब्रिज इतर ठिकाणी सुद्धा खूप आहेत. हा पहिला वहिला असेल म्हणून कदाचित.

बंजी जम्पिंग आम्हाला करता आलं नाही. त्यासाठी पूर्व बुकिंग आवश्यक आहे. ऐन वेळेवर मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

रात्री जेवणानंतर दिल्लीची बस पकडली, आणि सकाळी दिल्लीहून विमानाने आम्ही पुण्याला परत आलो.

हरिद्वारला खादाड भटकंती, चोपता चंद्रशिला ट्रेक आणि परतीच्या वाटेवर ऋषीकेशला रिव्हर राफ्टिंग अशी अविस्मरणीय सहल संपन्न झाली.

i5

i6

ह्या दिवशीचा थरार आणि हि संपूर्ण सहल तुम्ही माझ्या युट्युब चॅनलवर बघु शकता. लिंक खालील प्रमाणे.

Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal
Chopta Chandrashila Trek | Part 3 | Deoria Tal to Baniya Kund
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Tunganath Temple Chandrashila Summit
Chopta Chandrashila Trek | Part 5 | Rishikesh River Rafting | Thats My Take

आणखी व्हिडीओज बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Nov 2019 - 8:36 pm | मुक्त विहारि

बघू कधी जमतंय का?

जमवाच. खुप मस्त ते ऋषिकेश. मी तिथे फक्त adventure activities साठी खास काही दिवस जायचा विचार करतोय.