हिमालयात एकदा जाऊन आलं कि पुनःपुन्हा जाण्याची ओढ लागते. ते पर्वत आपल्याला साद घालत राहतात. हिमालय मी पहिल्यांदा अगदी जवळून पाहिला तो "व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या" ट्रेकमध्ये. (त्याबद्दल वाचा या लेखमालिकेत) त्यानंतर एक दोन वर्षात "एव्हरेस्ट बेस कॅम्प" ट्रेक करण्याचा योग्य जुळुन आला. (त्याबद्दल लिहिण्याचा योग अजून जुळून यायचा आहे.) त्या अविस्मरणीय ट्रेकनंतर मी पुन्हा हिमालयात जाण्याची वाटच बघत होतो.
ती संधी पुन्हा या वर्षी मिळाली. आत्ता गेल्या आठवड्यात मी आणि आमचा ८ जणांचा ग्रुप, आम्ही ट्रेक दि हिमालयाज सोबत "चोपता चंद्रशिला तुंगनाथ" हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेक दि हिमालयाज हि नावाप्रमाणेच हिमालयात ट्रेक आयोजित करणारी कंपनी आहे. ऋषिकेशला त्यांचं मुख्यालय आहे.
यावर्षीचा चंद्रशिला साथीचा हा त्यांचा अखेरचा ट्रेक होता. एका ट्रेकमध्ये ते २४ पर्यंत बुकिंग घेतात. आणखी ६ जण आणि ट्रेक लीडर असे एकूण १५ जण या ट्रेकमध्ये होते.
भारतातले बरेच हिमालयातले ट्रेक हे उत्तराखंडमध्ये आहेत, आणि त्यांची सुरुवात होते हरिद्वार/देहरादून किंवा ऋषिकेशमधुन. आमच्या ट्रेकची सुरुवात होती हरिद्वारमधून. हरिद्वारमध्ये सगळ्यांना एकत्र करून गाडीने सारी या गावाला नेऊन तिथून खरा ट्रेक सुरु होतो.
त्यामुळे आम्ही पुणे-मुंबई कॅबने, मुंबई-देहरादून थेट विमान आणि मग देहरादून-हरिद्वार पुन्हा कॅब असे टप्पे खात हरिद्वारला दुपारी येऊन पोचलो. जॉली ग्रॅण्ट विमानतळ हे देहरादूनचं विमानतळ म्हणून ओळखलं जात असलं तरी ते देहरादूनमध्ये नाही. तेथून बऱ्याच अंतरावर आहे. देहरादून, ऋषिकेश आणि हरिद्वार अशा ३ मुख्य शहरांमध्ये आहे.
तेथून हरिद्वारचा रस्ता तासाभराचाच असला तरी आम्हाला ट्राफिक खूप लागली. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला. हा पर्यटनाचा मोसम असल्यामुळे सध्या रोज खूपच ट्राफिक आहे असं ड्रायव्हरकडून समजलं.
हरिद्वारला हॉटेलवर पोचलो तेव्हा सगळ्यांना भूक लागली होती. सामान रूममध्ये काढून ठेवलं आणि लगेच खाली येऊन खाण्यापिण्याची चौकशी केली. मॅनेजरने होशियारपूरी नावाचं एक हॉटेल चांगलं आहे असं सुचवलं. त्यावेळी त्या छोट्याशा गल्लीत जास्त रहदारी नव्हती.
सायकल रिक्षा असल्या तरी आम्ही त्या करायला जरा बिचकत होतो. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही शेवटी दोन रिक्षा ठरवून निघालो. एका माणसाने आपल्यासारख्या ४ धडधाकट व्यक्तींना ओढून न्यावं हा थोडा विचित्र विचार मनात येत होता.
पण त्यांच्याकडे पाहून सगळ्यांनी असा विचार केला तर हा रोजगार म्हणून निवडलेल्या माणसांनी काय करावं हा हि विचार येत होता.
१५ मिनिटात आम्ही होशियारपूरी हॉटेलला पोचलो. १९३७ पासून असा त्याचा फलक ते किती जुनं हॉटेल आहे हे दर्शवत होता. फार मोठं टापटीप हॉटेल नसलं तरी तिथल्या गर्दीवरून ते लोकप्रिय आहे याचा अंदाज येत होता. आम्हाला ४-५ मिनटात ८ जणांना पुरेसं एक टेबल मिळालं.
टेबल मिळण्याआधीच तिथल्या वेटरने अगत्याने दुसरी बसायला जागा दिली होती, पाणी आणून दिलं होतं, आणि ऑर्डर ठरवायला मेन्यूकार्डसुद्धा आणलं होतं. त्यामुळे इतक्या उन्हातून आलो असलो तरी टेबल मिळेपर्यंत आम्ही आत स्थिरावलो होतो, आमची ऑर्डर देऊन झाली होती.
तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव उत्तम होती. आम्ही मनसोक्त जेवलो. आम्हाला विशेष आवडली ती म्हणजे फणसाची भाजी. हा पदार्थ आपल्याकडे सहजासहजी हॉटेल मध्ये मिळत नाही. आणि लस्सी. आपल्याकडे लस्सी फारच घट्ट आणि अति गोड असते. उत्तरेकडे ताजी, पातळ आणि फेसाळती लस्सी पिण्याची मजा वेगळीच आहे.
जेवुन निघाल्यावर पुन्हा ५-१० मिनिटे आम्ही सायकलरिक्षा ला काही पर्याय मिळतो का बघत होतो. पण तो काही मिळाला नाही. सायकलरिक्षा मधेच पुन्हा आमची स्वारी निघाली रूमकडे.
अगदी तासभर पहुडलो आणि लगेच बाहेर निघण्याची वेळ झाली. तयार होऊन आम्ही हर कि पौडीला जायला निघालो. तिथे आम्हाला संध्याकाळची गंगा आरती बघायची होती आणि मग आजूबाजूच्या भागात खादाडगिरी करायची होती. त्याव्यतिरिक्त गर्दी मध्ये मंदिरांमध्ये फिरण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. विचार जुळायला लागले कि ट्रिपची मजा जास्त असते.
जाताना मात्र आम्हाला बॅटरीवाली रिक्षा मिळाली. आम्ही पण निवांत होतो, आणि तो रिक्षावाला पोरगा पण, त्यामुळे काही सेकंद ती रिक्षा चालवायची माझी हौस पूर्ण झाली.
या वेळेस गंगेचं पाणी फार स्वच्छ वाटलं. मागच्या वेळेस इतकं काळं गढूळ पाणी होतं कि त्याला हात लावायची पण इच्छा होत नव्हती. पण यावेळी मात्र आम्ही बिनधास्त पाण्यात उतरलो, टाईमपास केला, फोटो काढले. आता हि कमाल आपोआप झाली का नमामि गंगे, स्वच्छ भारत योजनेमुळे ते ती गंगामैय्याच जाणे.
गंगा घाटावर गर्दी सतत असते आणि आरतीची वेळ जवळ येते तशी ती वाढत जाते. लोक एकेक दोन दोन तास जागा पकडून बसून राहतात. त्यामुळे आम्हाला फार चांगली जागा मिळाली नाही. आणि मागे लोक उभेच होते. तिथले चौकीदार बसून घ्या बसून घ्या अशी विनंती करत होते पण आमच्या पुढचे लोक काही जुमानत नव्हते, त्यामुळे आम्हालासुद्धा उभं राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
तिथे बराच वेळ मंत्रघोष आणि आरती चालु असत. लोकांचे पूजापाठ चालु असतात. तुम्ही सुद्धा पूजा करा आरती करा दान करा म्हणत दलाल मागे लागत असतात. गंगेत स्नान केलं कि पाप मिटतात, अस्थी वाहिल्या कि मोक्ष मिळतो असे समज आहेत. त्यामुळे लोकांच्या अंघोळी, अस्थी/निर्माल्य विसर्जन हेही चालु असतं. लोकांची फोटोग्राफी चालु असतं. आणि हे सगळं सोबत चालु असतं.
गुरुजींच्या मंत्रघोषानंतर गंगेची आरती (रेकॉर्डेड) सुरु होते. ती आठ दहा गुरुजी मिळून करतात. छान सोहळा आहे. त्यानंतर बरेच लोक आरतीचं ताट घेऊन फिरतात. कुठली ऑथेंटिक थाळी ते कळत नाही. पण दानाच्या अपेक्षेमुळे बरेच लोक फिरतात. आणि आलेले लोक दान टाकतात सुद्धा.
आरती झाल्यावर आमची खादाड भटकंती सुरु झाली. आमच्यातल्या समीरने इंटरनेट वरून तिथे खायला चांगलं मिळतं अशी माहिती काढली होती.
सर्वात पहिले खाल्लं ते म्हणजे सामोसे, खस्ता कचोरी, पुरी भाजी आणि चंद्रकला मिठाई. सगळ्यात तेल तूप अगदी भरपूर. चव अगदी विशेष नाही. नशीब चांगलं म्हणून आमचा ८ जणांचा ग्रुप होता. नाहीतर अशा भरपूर गोष्टी ट्राय करणे हे काही सोपे काम नाही.
मग तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यातुन फिरत फिरत, थोडी किरकोळ शॉपिंग करत आम्ही पुढे निघालो. मोठे पान दि गिलोरी, बेलफळाचा ज्यूस असा आस्वाद घेत घेत आम्ही पोचलो जैन चाट भांडारला. हे आपल्याला गुगल मॅप्स शिवाय सापडणे मुश्किल आहे. किंवा पुन्हापुन्हा विचारत जावे लागेल.
जैन चाट भांडार अगदी पैसे वसूल होतं.तिथले काका अगदी गप्पिष्ट होते आणि आमच्या नशिबाने रात्र होत आली असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. त्यांनी अगदी निवांत त्यांच्या पदार्थांबद्दल माहिती देत प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं.
त्यांच्या गोडगोड बोलण्याइतकंच त्यांचे पदार्थ अप्रतिम होते. कांजिवडा (त्यांची खासियत), गोलगप्पे (पाणी पुरी), आलू चाट हे सगळं आम्ही मनापासुन एन्जॉय केलं. मला आधी इथे न आल्याचा आणि बाकी ठीकठाक गोष्टी खाऊन पोट थोडं भरल्याचा पश्चाताप झाला. पण तरी ह्या जागेची माहिती मिळाल्या बद्दल इंटरनेटचे आणि माहिती काढणाऱ्या समीरचे मी मनोमन आभार मानले.
तिथून निघाल्यावर मग एका गाडीवर कुल्फी आणि बदाम मिल्क (दोन्हीही सुरेख) याने आम्ही आमच्या चरण्याची सांगता केली.
रात्री साधी इकडच्या टमटम सारखी रिक्षा मिळाली. तुडुंब पोट घेऊन रात्री कसेबसे झोपलो. सकाळी लवकर उठून निघायचं होतं दिवसभराच्या प्रवासासाठी. सारी या आमच्या ट्रेकच्या आरंभ स्थानासाठी.
क्रमशः
ता. क. हरिद्वारचा हा दिवस दृक्श्राव्य माध्यमातून अनुभवण्यासाठी हा युट्युब व्हिडीओ बघा.
प्रतिक्रिया
14 Jun 2019 - 12:08 pm | कंजूस
विडिओ पाहिला. "ये पत्ता कौनसा?" याचे उतर काय? आलू ऐकू आलं.
दोनचार फोटो लेखात असावेत.
स्वतंत्र जाणाऱ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात?
14 Jun 2019 - 4:22 pm | आकाश खोत
धन्यवाद :) मालू म्हणाले ते. मालुका पत्ता
14 Jun 2019 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं सुरु झाला ट्रेक आणि खाद्ययात्राही ! :)
14 Jun 2019 - 4:22 pm | आकाश खोत
धन्यवाद :)
16 Jun 2019 - 6:26 pm | दुर्गविहारी
उत्तम लिखाण. शक्यतो नकाशा टाका. पु.भा.प्र.
16 Jun 2019 - 8:30 pm | कंजूस
मी उत्तराखंडच्या नकाशात शोधलं. जवळपास केदारनाथपर्यंत गेले आहेत.
18 Jun 2019 - 12:28 pm | आकाश खोत
धन्यवाद. पुढच्या पोस्ट मध्ये नकाशा टाकतो.
18 Jun 2019 - 1:28 pm | जालिम लोशन
+1
18 Jun 2019 - 3:35 pm | पद्मावति
छान आहे लेख. व्हिडीओ पण मस्तं.
19 Jun 2019 - 10:51 am | कंजूस
उखिमठ - चामोली रस्त्यावर आहे चोपता.