चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
21 Sep 2019 - 10:36 pm

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा :
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Chandrashila Summit 13100 ft | Tungnath Mandir
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा.

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी :
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड

बनियाकुंडला दिवसाची सुरुवात सुंदर झाली. आम्हाला सकाळी एकदम लवकर जाग आली. या भागात खुप लवकर उजाडतं. सूर्य उगवण्याही आधी इतका प्रकाश असतो कि सकाळचे ८-९ वाजलेत असं वाटतं.

आमच्या रूम्स समोरच छोट्या टेकाडावर एक हनुमान मंदिर होत.

i1

तिथून समोर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. हळु हळू सूर्य आमच्या उजवीकडच्या डोंगरामागून वर येत होता आणि प्रकाशाची तिरीप आपला कोन बदलत खाली खाली येत होती. ह्या दृश्यांनी आम्हाला किती तरी वेळ तिथेच खिळवून ठेवलं होतं.

i2

i3

थोड्या वेळाने आम्ही आवरून नाश्ता करून निघालो. बनियाकुंड ते चोपताच्या पायथ्यापर्यंत आम्ही जीपने गेलो. एकच जीप तिथे पोहोचली होती त्यामुळे दोन चकरा करून जावं लागलं.

चोपता चंद्रशिला तुंगनाथ असं या ट्रेकचं नाव आहे, आणि हे सगळं ह्या आजच्या दिवसातच आहे. चोपता गावातुन चढायला सुरुवात करावी लागते. आणि वर आधी तुंगनाथचं मंदिर लागतं.

हे मंदिर महादेवाच्या पंचकेदारांपैकी एक आहे. (म्हणजे काय ते विचारू नका. १२ ज्योतिर्लिंगांसारखी ५ महत्वाच्या मंदिरांची दुसरी यादी समजूया. कोणाला समजत असल्यास खाली कमेंटमध्ये आपलं ज्ञान पाजळण्यास हरकत नाही. तेवढीच सगळ्यांना मदत होईल. :-) ) केदारनाथ पण ह्याच पंचकेदारांपैकी एक आहे.

तर, पंचकेदारांपैकी एक असल्यामुळे ह्याला विशेष महत्व आहे. हे मंदिर केदारनाथपेक्षाहि उंच आणि जगातलं सर्वात उंचावरचं महादेव मंदिर आहे. इथे यात्रेकरूंची संख्या बरीच असते. त्यांच्यासाठी भरपूर घोडे, खेचरं, पिठू इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे खालुन वरपर्यंत चांगली दगडी पायवाट बनवलेली आहे.

i4

तुंगनाथ मंदिरापर्यंत तर ट्रेकला आल्यासारखं वाटतच नाही. यात्रेकरू मध्ये पुष्कळ लोक घरातल्या लहान मोठ्यांसकट सर्व कुटुंबाला घेऊन येतात. त्यामुळे यात्रेला आल्यासारखंच वाटतं. तसे सर्व वयाचे लोक कुटुंबासकट ट्रेकवरसुद्धा भेटतात, पण तिथे संख्या कमी असते.

तुंगनाथ मंदिराच्या आणखी पुढे चढत गेलं तर चंद्रशिला शिखर लागतं. हे १३१०० फुटावरचं शिखर आहे. आणि चहूबाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या दिसतात. उत्तराखंडात कुठल्याही जागेचं वर्णन असंच करता येईल. पण प्रत्येक जागेहून दिसणारं दृश्य वेगळं, प्रत्येक ठिकाणचं सौन्दर्य वेगळं. कमी जास्त अशी तुलना करण्यासारखं नाही.

ह्या भागाला परमेश्वराने उदारहस्ते सौन्दर्य बहाल केलं आहे. कितीही बघितलं तरी डोळ्यांचं पारणं फिटत नाही.

आणि हे दृश्य अगदी वर गेल्यावरच दिसतं असं नाही. आजच्या ह्या पूर्ण ट्रेकमध्ये जागोजागी वेगवेगळ्या उंचीवरून हीच सुंदर दृश्य आपल्याला खुणावत राहतात.

i5

i6

आम्ही प्रत्येक ठिकाणी फोटो काढत, थांबत चाललो होतो. एक दोन जणांची तब्येतसुद्धा बिघडली होती. त्यामुळे आमची गाडी आज जरा मंदावली होती. गाईड आम्हाला घाई करत होते. हळू हळू चालत आम्ही तुंगनाथला न थांबता आधी चंद्रशिलाला गेलो.

i7

i8

तुंगनाथच्या पुढेसुद्धा चंद्रशिलाला पोहचायला आपल्याला आपल्या वेगानुसार तास दीड तास लागू शकतो. हा पूर्ण ट्रेक १२-१३ किलोमीटर चा आहे.

इथे शिखरावर आपल्याकडे कळसुबाईला जसं छोटं मंदिर आहे तसंच एक छोटेखानी गंगेचं मंदिर आहे.

i9

वर पोहोचलो तेव्हा ढग यायला लागले होते . गाईड आम्हाला थोडं लवकर आला असता तर पूर्ण मोकळं आकाश आणि दृश्य बघायला मिळालं असतं अशी टोचणी लावत होता. पण येता येतासुद्धा आम्ही ह्या सौन्दर्याचा मनमुराद आनंद घेतला होता.

शेवटी हिमालय माणसाच्या मनात मावणं अशक्य आहे. त्याची वेगवेगळी रूपं बघायला पुन्हा पुन्हा जाणं आपल्याला भाग आहे.

आणि कुठलंही शिखर गाठल्यावर एक वेगळाच आनंद होतो. काही मिळवल्याचं समाधान मिळतं.

i10

शिखरावर आम्ही बराच वेळ फोटो काढण्यात घालवला. सर्वांनाच त्या जागेवर ग्रुपचे, एकट्याचे, जोडीचे, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे फोटो काढायचे होते. कोणाला एखादी पोज सुचली आणि दुसऱ्याला आवडली तर पुन्हा सगळ्यांचे त्या पोजमध्ये फोटो असं बराच वेळ चाललं होतं.

i12

परत येताना आम्ही तुंगनाथला आलो तेव्हा दुपारच्या पूजा आरतीसाठी मंदिर काही होतं. मग आम्ही जवळ जेवण केलं. मंदिर अजून काही वेळ बंदच राहणार होतं. आम्ही निघायचा निर्णय घेतला. महादेवाला मनोमन नमस्कार केला. त्याच्या अगदी दारात पोहोचून फक्त आत दर्शन न झाल्याने तो आणि आम्ही नाराज व्हायचं काही कारण नव्हतं. आषाढी एकादशीला लाखो लोक पंढरपुरात जसं कळसाचं दर्शन घेतात तसंच आमचं झालं.

i13

आमच्यातल्या एक दोघांना त्रास व्हायला लागला होता. त्यांना घोडी करून देऊन आम्ही निघालो. उतरताना पुन्हा निवांत रमत गमत खाली आलो. जीपने बनियाकुंडला पोहोचलो आणि आराम केला.

संध्याकाळी जेवणाआधी आम्हाला "ट्रेक दि हिमालया" कडून हा ट्रेक केल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात आलं. आमच्यापैकी काहीजणांचा हा पहिलाच मोठा ट्रेक होता. सगळ्यांना हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल अभिमान वाटत होता.

यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दिवस भर प्रवास करून ऋषिकेशला गेलो. तिथे रिव्हर राफ्टिंग करायचा आमचा बेत होता. त्याबद्दल पुढील वृत्तांतात.

(क्रमशः)

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा :
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Chandrashila Summit 13100 ft | Tungnath Mandir
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा.

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

24 Sep 2019 - 7:36 am | सुधीर कांदळकर

चारही भाग वाचले. वर्णन, प्रचि सारे छान जमले आहे. धन्यवाद. पुलेशु.

आकाश खोत's picture

9 Oct 2019 - 1:55 pm | आकाश खोत

धन्यवाद :-)

जगप्रवासी's picture

25 Sep 2019 - 12:17 pm | जगप्रवासी

कोणत्या दिवसांत जाणे चांगले

तिथे मंदिर असल्यामुळे नेहमीच जातात लोक. पण उत्तम व्ह्यूज साठी हिवाळा किंवा उन्हाळ्यात जाणे चांगले. हिवाळ्यात बर्फ जास्त असतो त्याची मजा घेता येते.