कठीण कठीण...किती (उत्तरार्ध)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
25 Nov 2019 - 8:49 am

यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : उत्तरार्ध

पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45731#new
...................

मागील भागात आपण या आजाराची कारणमीमांसा पाहिली. बऱ्याच रुग्णांत हा आजार दीर्घकालीन होतो. आता एक मुद्दा ध्यानात घ्यावा. शरीरातील बरीच महत्वाची प्रथिने यकृतात तयार होतात. त्यामुळे या आजारात त्या प्रथिनांचे उत्पादन खूप कमी होते. यापैकी दोन महत्वाची प्रथिने ही आहेत:

१. अल्बुमिन : हे आपल्या रक्तात संचार करत असते आणि त्यातल्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते.
२. रक्त गोठण्यासाठीची प्रथिने : जेव्हा आपल्याला जखम होऊन रक्तस्त्राव होतो तेव्हा ही प्रथिने रक्त गोठवून रक्तस्त्राव थांबवतात.

या दीर्घकालीन आजारात प्रथिनांचे घटलेले उत्पादन, चयापचयातील बिघाड अशांमुळे शरीरात व्यापक बिघाड सुरु होतात. रक्तात सोडियमचे प्रमाण वाढते, पाण्याचे उत्सर्जन कमी होते आणि रक्तात ते प्रमाणाबाहेर वाढते. त्यातून आजाराची गुंतागुंत होते. आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील घटना घडू शकतात:

१. जलोदर : आपल्या पोटातील सर्व इंद्रियांच्या बाजूने एक उदरवेष्टण (peritoneum) असते. त्याच्या दोन थरांमध्ये जेव्हा खूप पाणी जमा होते त्याला जलोदर असे म्हणतात. काही रुग्णांत या साठलेल्या द्रवात जंतूसंसर्ग होतो. जलोदर मोठ्या प्रमाणात झाल्यास रुग्णास हर्नियाची व्याधी होऊ शकते.

ok

२. मूत्रपिंडावर परिणाम : यकृताचे ढासळते कार्य, जलोदर आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड झाल्याने आता त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होतो. आता उत्सर्जन प्रक्रिया अजून मंदावते.

३. मेंदूकार्यातील बिघाड : हा परिणाम गंभीर असतो. त्याची पूर्वपिठिका समजून घेऊ.
आपल्या शरीरात चयापचयातून अनेक घातक रसायने तयार होतात. प्रथिनांपासून तयर होणारा अमोनिया हे त्यातले एक ठळक उदाहरण. निरोगी यकृतात या अमोनियाचे रुपांतर युरिआत केले जाते. त्यामुळे रक्तात अमोनियाचे प्रमाण अत्यल्प राहते. दीर्घकालीन यकृत आजारात ही महत्वाची प्रक्रिया खूप मंदावते. त्यामुळे रक्तात अमोनियादि बऱ्याच रसायनांचे प्रमाण खूप वाढते. मग ही रसायने रक्तातून मेंदूत सहज पोचतात. तिथे ती चेतातन्तूंच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. सोप्या शदांत सांगायचे तर ती मेंदूतील ‘सिग्नल’ यंत्रणा पार बिघडवून टाकतात. परिणामी रुग्णाची बौद्धिक आणि आकलनक्षमता कमी होते. तो असंबद्ध बोलू लागतो. नंतर झापड आणि गुंगी येते. बिघाड तीव्र झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो.

४. रक्तवाहिन्यांवरील परिणाम : यकृतातील अंतर्गत बिघाडामुळे पचनसंस्थेशी संबंधित रक्तवाहिन्यांतील (portal) दाब वाढतो. त्यातून बऱ्याच रक्तवाहिन्या फुगतात. अन्ननलीकेच्या, हिरड्यांतील तसेच नाकातील वाहिन्या ही काही उदाहरणे. कालांतराने त्या वाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.

५. हॉर्मोन्सचे बिघाड : चयापचयातील बिघाडाने लैंगिक हॉर्मोन्सचे असंतुलन होते. पुरुषांतील हॉर्मोनचे वाढत्या प्रमाणात स्त्री-हॉर्मोनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे अशा पुरुषात स्तनवृद्धी, नपुसकत्व ही लक्षणे दिसू शकतात.

६.अन्य परिणाम : काही रुग्णांना कावीळ होते. याव्यतिरिक्त त्वचेखाली लाल पुटकुळ्या किंवा चट्टे, त्वचा खाजणे, स्नायूंची झीज, वजन कमी होणे, रक्तन्यूनता इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

ok

७. दीर्घकालीन धोके: हा आजार दीर्घकाळ राहिल्यास काही रुग्णांना यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तर अन्य काहींत जठरातील व्रण (ulcer), मधुमेह आणि पित्तखडे हे आजार उद्भवू शकतात.

प्रयोगशाळा चाचण्या :
या आजारात यकृताची कार्ये एकामागून एक ढासळत जातात. त्यांचे मूल्यमापन रुग्णाच्या काही रक्तचाचण्यांवरून करता येते. त्यातील काही प्रमुख चाचण्या अशा आहेत:

१. बिलीरुबीन पातळी : ही बराच काळ नॉर्मल असते पण आजार जास्ती वाढला की तिच्यात वाढ होते. ( बिलीरुबीनवरील स्वतंत्र लेख इथे आहे : https://misalpav.com/node/41676)
२. विशिष्ट एन्झाइम्स ( AST, ALT) ची पातळी काही प्रमाणात वाढते.

३. अल्बुमिनची पातळी बरीच कमी होते.
४. रक्त गोठण्याशी संबंधित चाचण्या (PT, PTT) : या आजारात संबंधित प्रथिनांचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे या चाचण्यांत बिघाड दिसून येतो.
अतिविशिष्ट चाचण्या : प्रत्येक रुग्णाचे मूल्यमापन करून गरज भासल्यास त्या करता येतात. त्यापैकी एक महत्वाची म्हणजे यकृताची ‘बायोप्सी’ ही होय. यात सुईद्वारा यकृताचा छोटासा तुकडा काढून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी होते. त्यात पेशींची सखोल माहिती मिळते.

उपचारांची रूपरेषा

यकृत-कठीणता ही दीर्घकालीन अवस्था आहे. तिची कारणे अनेक आहेत. यकृताचा विशिष्ट आजार झाला असता योग्य ते उपचार वेळेत घेतल्यास या अवस्थेचा प्रतिबंध करता येतो. मद्यपिंनी मद्य वर्ज्य करणे, विषाणू संसर्गात त्याविरोधी औषधे घेणे इत्यादी उपचार करावेत. मात्र एकदा का कठीणता झाली की संबंधित उपचारांचा विशेष उपयोग होत नाही.

आता आजारातून कुठली गुंतागुंत निर्माण होते, त्या दिशेने उपचार करावे लागतात. तसेच रुग्णाच्या लक्षणांनुसार संबंधित उपचार करतात. अशा सर्व प्रकारच्या उपचारांबद्दल लिहिणे हे या लेखाच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्याची गरजही नाही.
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).

आहार आणि आहारपूरके
या रुग्णांची भूक खूप मंदावलेली असते आणि अन्नपचनही नीट होत नसते. त्यांना दिवसातून अनेक वेळा थोडेथोडे अन्न देतात. त्यातून मिळणारे एकूण उष्मांक, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण हे काळजीपूर्वक पहिले जाते. बऱ्याच रुग्णांत जस्ताची (zinc) कमतरता होते. त्यांना जस्ताच्या गोळ्या देतात. ज्या रुग्णांना प्रत्यक्ष आहार मानवत नाही त्यांना पौष्टिक कृत्रिम पावडरी देतात.

अशा प्रकारे विविध उपचार चालू असताना रुग्णांची नियमित तपासणी आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या निष्कर्षानुसार रुग्णाचे गुणांकन (score) केले जाते. त्यानुसार त्याच्या भवितव्याचा अंदाज करतात. काही रुग्णांत यकृताच्या काही पेशी चांगल्या असतात आणि त्यांपासून निरोगी पेशींची निर्मिती होत राहते. असे रुग्ण रोगलक्षणांपासून मुक्त राहतात. मात्र काही रुग्णांत परिस्थिती बिघडत जाते. त्यांना सतत कावीळ असते आणि त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. याला आजाराची भरपाईरहित (decompensated) अवस्था म्हणतात. अशांना आता औषधांचा उपयोग होत नाही. त्यांचा यकृत प्रत्यारोपणासाठी विचार केला जातो.

यकृत प्रत्यारोपण

जेव्हा रुग्ण वरील उपचारांना दाद देत नाही आणि त्याचे यकृतकार्य खूप खालावू लागते तेव्हा याचा विचार केला जातो. अर्थात त्यासाठी रुग्णाची हृदय व फुफ्फुसकार्ये व्यवस्थित आहेत ना, हे पहिले जाते. या उपचारासाठी दात्याची निवड २ प्रकारे होऊ शकते:

१. जिवंत निरोगी व्यक्ती : तिच्या शरीरातून यकृताचा काही भाग शस्त्रक्रियेने काढला जातो. हा पर्याय तसा उत्तम आहे पण यात काही कटकटीही होऊ शकतात. दात्यावर शस्त्रक्रिया करताना काही गंभीर गुंतागुंती होण्याची शक्यता असते. असे काही दाते नंतर मृत्यू पावले आहेत.
२. मृत्यूच्या उंबरठ्यावरील व्यक्ती : ही व्यक्ती अशी असावी लागते- तिच्या हृदयाचे स्पंदन थांबलेले आहे पण अद्याप ती ‘मेंदूमृत’ या व्याखेत बसणारी नाही.

अवयवदान या विषयाला अनेक पैलू आहेत. रुग्णाच्या दृष्टीने तो सर्वोत्तम उपाय असतो. पण, दात्यांची पुरेशी उपलब्धता, सुयोग्य जुळणी, दाता व रुग्ण या दोघांना असलेले शस्त्रक्रियेचे धोके हे सर्व वाटते तितके सोपे नसते. प्रचंड तणावाखाली ही जोखमीची कामे करावी लागतात. त्यादृष्टीने अन्य काही पर्यायांचा विचार वैद्यकविश्वात होत आहे. सध्या हे विषय प्रायोगिक अवस्थेत आहेत. त्याचा हा आढावा :

निव्वळ पेशी प्रत्यारोपण : यात निरोगी व्यक्तीतील यकृताच्या फक्त पेशी प्रयोगशाळेत अतिथंड तापमानात साठवून ठेवतात. योग्य रुग्णाची निवड झाल्यावर अशा कोट्यावधी पेशी रुग्णाच्या प्लिहेत (spleen) सोडल्या जातात. कालांतराने ती प्लिहा यकृताचे काम करू लागते !

• जैवतंत्रज्ञानाने जैविक-कृत्रिम यकृत तयार करणे.

प्राण्यांच्या यकृताचे मानवात प्रत्यारोपण : यासाठी डुक्कर हा प्राणी सुयोग्य आहे. त्याचे यकृत आपल्यात सामावून घेण्याची शक्यता बरीच आहे.
समारोप
आपल्या पोटातील यकृत चयापचय आणि इतर अनेक कामांत महत्वाची मध्यवर्ती भूमिका निभावते. त्याचे काही आजार दीर्घकालीन होतात आणि त्यातून कठीणतेची अवस्था येते. तिच्या तीव्रतेनुसार तिचे परिणाम मेंदूसह अन्य महत्वाच्या इंद्रियांवर होतात. एका मर्यादेपर्यंत यकृत त्याचे कार्य याही परिस्थितीत काही प्रमाणात निभावते. पण ती मर्यादा संपल्यास ते पूर्णपणे निकामी होते. तेव्हा प्रत्यारोपण हाच उपाय उरतो. समाजात या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व पाहता कठीणतेच्या अवस्थेला अटकाव करणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. म्हणून यकृताच्या आजारांत हयगय न करता तज्ञांकडून वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत.
**********************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

MipaPremiYogesh's picture

25 Nov 2019 - 12:56 pm | MipaPremiYogesh

Thanm you doctor for useful information.

MipaPremiYogesh's picture

25 Nov 2019 - 12:59 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद डॉक, खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. देवनागरी मध्ये प्रयत्न केलाय ☺️

कुमार१'s picture

25 Nov 2019 - 1:46 pm | कुमार१

जमलंय की !

जालिम लोशन's picture

25 Nov 2019 - 2:46 pm | जालिम लोशन

तात्पर्यः एकदा भगवंतानी ठरवले की त्याच्या ईच्छे प्रमाणे होऊ द्यायचे. फक्त अनायासेन मरणं आले म्हणजे ठिक.

जॉनविक्क's picture

25 Nov 2019 - 2:55 pm | जॉनविक्क

कठीण कठीण कठीण किती, यकृताचे रोग भाई..!

सुबोध खरे's picture

25 Nov 2019 - 8:00 pm | सुबोध खरे

लिव्हर सिर्र्होसीस किंवा कठिणता एकदा आली कि ती परत जात नाही हे जरी सत्य असले तरी जर आपण मूळ "काठिण्य येण्याचे कारण" जर दूर केले तर हि प्रक्रिया बराच काळ लांबवू शकतो.
माझ्याकडे फुकट दारू मिळत असल्यामुळे भरपूर दारू पिऊन सिऱ्होसिस झाला आहे असा अबकारी "खात्या"तील एक अधिकारीरुग्ण म्हणून आला होता. त्याला मी खडसून सांगितले कि तुम्ही दारू सोडली नाहीत तरदोन वर्षात तुमचा फोटो भिंतीवर टांगायला लागेल.
हा रुग्ण आता संपुर्णपणे दारू सोडून पथ्यपाणी करत आहे आणि गेली सात वर्षे माझ्याकडे इमाने इतबारे वर्षात एकदा सोनोग्राफी करण्यासाठी कोकणातील आपल्या गावाहून येत आहे.
अशीच स्थिती एका ७५ वर्षांच्या बाईंची आहे. हिपॅटायटीस सी मुळे त्यांना सिऱ्होसिस झालेले आहे. गेली सहा वर्षे त्या दार सहा महिन्यांनी मला दाखवायला येत असतात.
तेंव्हा मिताहार, नियमित जीवनशैली यांनी आपल्याला हा आजार "आटोक्यात" ठेवता येतो.( बरा होत नसेल तरीही)

कुमार१'s picture

25 Nov 2019 - 8:38 pm | कुमार१

जा लो, जॉन : नियमित प्रतिसादाबद्दल आभार !

सुबोध,
+ १. समर्पक उदाहरणे.
धन्यवाद !

गामा पैलवान's picture

25 Nov 2019 - 10:06 pm | गामा पैलवान

कुमारेक,

यकृताविषयी रंजक व माहितीपूर्ण लेखमाला आहे. धन्यवाद! :-)

यकृतकाठिन्यावरून जॉर्ज बेस्ट या इंग्लिश फुटबॉलपटूची आठवण झाली. हे साहेब वर्षानुवर्षं ढोस ढोस ढोसून यकृतपाषाणधारी झाले व मरायला टेकले. म्हणून त्यांना नवीन यकृत बसवण्यात आले. तरीपण बेवडेगिरी चालूच राहिली. शेवटी काहीतरी गुंतागुंत होऊन गचकले. मरतेवेळी Don't die like me असा बोर्ड इस्पितळात बिछान्यापाशी रंगवून घेतला.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

26 Nov 2019 - 7:54 am | कुमार१

गा पै, धन्यवाद.

नवीन यकृत बसवण्यात आले. तरीपण बेवडेगिरी चालूच राहिली.

>>

हे खरे हाडाचे व्यसनी ! असो.

सुबोध खरे's picture

26 Nov 2019 - 10:05 am | सुबोध खरे

वाईट गोष्ट म्हणजे त्याच्या दारू पिण्यामुळे यकृत खराब झाले म्हणून यकृताच्या आरोपणाचा येणारा खर्च इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने ( इंग्लिश जनतेच्या घामाचा पैसा) केला होता. आणि दुसऱ्याचे यकृत आणि जनतेचा पैसे असूनही हे महाशय परत दारू पिते झाले.

इतका बेजबाबदार गर्विष्ठपणा आपल्या बॉलिवूड अभिनेत्यांसारखाच जागतिक फुटबॉलच्या खेळाडूंकडून दिसून येतो.

(लायकीपेक्षा कितीतरी जास्त पैसा आयुष्यात फार लवकर मिळाला कि असे होते असे बर्याचवेळेस दिसून येते)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2019 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

यावरुन एक आठवले. मुक्तपीठ मधे पुण्याच्या जवळच्या गावातल्या ढोलपथक वाल्या एका नादखुळ्याचा लेख आला होता. तरुणपणात ढोल बडवून शेवटी कानाला बधिरत्व आले पण लेखात शेवटी महायश म्हणतात की पन द्यवाची शेवा केल्याचे समाधान मिळाले.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2019 - 2:45 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. .

सुधीर कांदळकर's picture

27 Nov 2019 - 7:55 pm | सुधीर कांदळकर

मला जॉर्ज बेस्टची आठवण आली होती. त्याच्यावरच्या माहितीपटात त्याने केलेले अफलातून गोल पण दाखवले होते. एक असामान्य प्रतिभावंत व्यसनापायी कसा वाया गेला ते पाहून फार वाईट वाटले होते. माझा पैलवान, बॉक्सर असलेला रुबाबदार असा सख्खा मामा दारूपायी वयाच्या ५२व्या वर्षी गेला. केवळ जवळ दारू आहे म्हणून पिणारे पाहून कसेसेच होते. माझ्याकडे माझी आवडती बकार्डी बारा महिने असते. पण महिनेमहिने पडून असते.

असो. एक किचकट माहिती सोपी करून सांगणारा, नीटनेटका, छान लेख. माहितीत मोलाची भर टाकणारा. आवडला. अनेक अनेक धन्यवाद.

गामा पैलवान's picture

28 Nov 2019 - 3:16 am | गामा पैलवान

सुधीर कांदळकर,

जॉर्ज बेस्ट बद्दल अगदी मनातलं बोललात पहा. मी काही त्याचा चाहता वगैरे नव्हतो. तो आजारी पडल्यावरच त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. तो एक उत्कृष्ट रंजनकार ( = entertainer ) होता. फारसा शैक्षणिक ठाव नसूनही त्याचं इंग्रजीवरील प्रभुत्व वाखाणणीय होतं. वयाच्या मानाने दिसायला बराच तरुण होता. त्याने वयाच्या ४९ व्या वर्षी एका २३ वर्षीय युवतीशी लग्न केलं होतं. एव्हढी उमदी व्यक्ती केवळ दारूमुळे मरण पावल्याने सगळेच हळहळले होते. त्याची अंत्ययात्रा (म्हणे) युवराज्ञी डायाना नंतरची सर्वात भव्य अंत्ययात्रा होती.

त्याचा शेवटल्या तासातला फोटो इथे आहे : https://www.mirror.co.uk/3am/celebrity-news/calum-best-recalls-dad-georg...

https://i2-prod.mirror.co.uk/incoming/article5349354.ece/ALTERNATES/s810/PAY-George-Best-in-hospital.jpg

या फोटोत कावीळ स्पष्ट दिसते आहे. मात्र ती वगळता चेहऱ्यावर मरणकळा अजिबात नाही. यावरून त्याच्या आरोग्यसंपदेची कल्पना येते. अशा आरोग्यसंपन्न, सुदृढ, सशक्त माणसाचा काय खोकडा करून टाकला नको तेव्हढी दारू प्यायल्याने! वाचकांनी सावध व्हावं म्हणून हा संदेशप्रपंच.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

28 Nov 2019 - 4:26 am | जॉनविक्क

की 48 वर्षे फुल्ल धमाल आयुष्य हवे ?

मला तरी 94 चे प्रयोजन समजत नाही जर ते निरसपणे व्यतीत करायचे असेल तर

जे 75+ जगले आणि इतक्या भव्य यात्रा निघाल्या ?

सुबोध खरे's picture

28 Nov 2019 - 9:26 am | सुबोध खरे

आर आर पाटील, विलासराव देशमुख, पी आर कुमारमंगलम यांच्यासारखे नेते जे अकाली मरण पावले ते जर जिवंत असते तर त्यांचे आयुष्य अजूनच सकारात्मक आणि फलदायी झाले असते. माझ्या माहितीतील कितीतरी उत्तम डॉक्टर अकाली गेल्यामुळे समाजाचे अपरिमित नुकसान झालेले आहे. यात डॉ नितु मांडके यांचेही उदाहरण घेता येईल.
खेळ हा तारुण्यातील अविष्कार असतो पण म्हणून विशिष्ट वयानंतर त्यांचे आयुष्य निरुपयोगी म्हणणे हि गोष्ट चूक आहे.
पुलेला गोपीचंद यांनी निवृत्त झल्यावर स्वतःचे घर गहाण ठेवून गोपीचंद अकादमी काढली आणि त्यातून सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, साई प्रणित, पी कश्यप , श्रीकांत किदाम्बी, अरुंधती पानतावणे , गुरुसाई दत्त आणि अरुण विष्णू सारख्या दिग्गज आणि देशाला ऑलिम्पिक मध्ये पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले.
राहुल द्रविड यांनी निवृत्तीनंतर गो स्पोर्टस फाउंडेशन मध्ये भाग घेतला आहे ज्यातून नेहमीच्या आणि दिव्यांग लोकांच्या ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू तयार केले जातात.
तेंव्हा अकाली मरणामुळे होणारे नुकसान हे "मोजता येणार नाही" असे असते. कारण जर ते जिवंत असते तर अशा "जर तर" मध्ये अडकून राहते

आपण त्याची सामाजिक बाजू वर आणलीत, तुमच्या मताशी सहमत आहे.

कुमार१'s picture

27 Nov 2019 - 8:40 pm | कुमार१

मु वि, सुधीर, धन्यवाद .
सुधीर,
तुमच्या संयमाला दाद देतो ! असाच कायम राहू दे .

कुमार१'s picture

27 Nov 2019 - 8:40 pm | कुमार१

मु वि, सुधीर, धन्यवाद .
सुधीर,
तुमच्या संयमाला दाद देतो ! असाच कायम राहू दे .

चौकटराजा's picture

27 Nov 2019 - 9:38 pm | चौकटराजा

माझया वडिलांचे निधन लिव्हर सिऱ्होसिस - पोर्टल हपरटेंशन - इसोफेगल व्हरायसीसीस,- रक्ताची उलटी -जलोदर - रक्तमिश्रित पातळ शौचा कावीळ - किडनी फेल अशा टिपिकल मार्गाने झाले - मृत्यूचे कारण हेपॅटिक फेलुयुअर असे नोंदित झाले. वडिलांना अजिबात दारू बिरू चा नाद नव्हता पण सिगारेट चा होता व मधुमेह ही होता .आज शंट ऑपरेशन करून यावर काही आणखी काळ जीवन वाढवून मिळते की नाही माहीत नाही पण १९८८ चे दरम्यान हे धोकादायक ऑपरेशन फक्त अमेरिकेत होत असे . यकृत या विषय निघाला म्हणून हे सारे आठवले !

कुमार१'s picture

28 Nov 2019 - 7:49 am | कुमार१

गा पै, चांगला संदेश. +११

चौरा,
बरोबर, त्या आठवणी नकोशा असतात.

जॉन,

९४ वर्षे निरस की 48 वर्षे फुल्ल धमाल आयुष्य हवे ?

>>>

मला असे आयुष्य आवडेल:
१. ९४ आणि ४८ चा साधारण मध्य असलेले वय
२. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णालयाचे तोंडही न पहावे लागणे
३. घरीच शांत झोपेत मृत्यू येणे !

जॉनविक्क's picture

28 Nov 2019 - 7:21 pm | जॉनविक्क

It's personal choice!

अनिंद्य's picture

28 Nov 2019 - 10:58 am | अनिंद्य

@ कुमार१,

अमिताभ बच्चनच्या तोंडी 'दारू पीने से लिव्हर खराब हो जाता है' हा डायलॉग ऐकून होतो. :-)
त्यात इतकी गुंतागंत असते हे तुमच्यामुळे समजले !

लिव्हरला मराठी 'यकृत' हे नाव कसे आले असावे याचे कुतूहल आहे.

कुमार१'s picture

28 Nov 2019 - 11:33 am | कुमार१

अनिंद्य,

१. यकृत खराब होण्याचे मद्यपान हे सर्वपरिचित कारण आहे. बिगर-मद्य कारणांमुळे देखील ते कसे बिघडते, हेही या लेखातून सांगायचा
हेतू आहे. या प्रकारचे रुग्णही आता वाढत आहेत.

२. 'यकृत ' हे संस्कृत आहे इतपत माहिती आहे.
यानिमित्ताने एक विनंती.
या लेखात मी 'decompensated' साठी 'भरपाईरहित' असा शब्द तयार केला आहे. याहून सुयोग्य शब्द जाणकारांनी सुचवावा.

गामा पैलवान's picture

28 Nov 2019 - 6:37 pm | गामा पैलवान

कुमारेक,

भरपाईरहित बरोबर वाटतो. त्रोटकोत्पादित पण चालून जावा.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

28 Nov 2019 - 7:52 pm | कुमार१

तसेही या दोघांत 'भरपाईरहित ' उच्चारायलाही सोपा आहे !

गामा पैलवान's picture

28 Nov 2019 - 11:03 pm | गामा पैलवान

कुमारेक,

दोहोंत किंचित फरक आहे. भरपाईरहित म्हणजे आजिबात भरपाई न होण्याची परिस्थिती. उलट त्रोटकोत्पादित म्हणजे भरपाई होतेय, पण तिचं उत्पादन संथ व अनुशेषवर्धक आहे.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

29 Nov 2019 - 1:58 pm | कुमार१

शरीरातील चयापचयात यकृत मध्यवर्ती भूमिका करते. त्याचे आजार समाजात बऱ्यापैकी आढळतात. त्यापैकी एका महत्वाच्या आजारावर दोन भागांत हे लेखन केले. तुम्हा सर्वांच्या सहभागाने चर्चा उत्तम झाली. पूरक माहिती, व्यक्तिगत दुखद अनुभव आणि वलयांकित व्यक्तीची शोकांतिका हे मुद्दे दखलपात्र होते.

आपल्या सर्वांना यकृताचे उत्तम आरोग्य कायम लाभो या सदिच्छेसह समारोप करतो.
धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

16 Dec 2019 - 2:50 pm | टर्मीनेटर

दोन्ही भाग उत्तम माहितीपूर्ण!
धन्यवाद .