यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : भाग १
यकृत हे आपल्या उदरात उजव्या बाजूस श्वासपटलाच्या खाली वसलेले एक महत्वाचे इंद्रिय आहे. शरीरातील इंद्रियांपैकी ते सर्वात मोठे असून ते प्रौढ व्यक्तीत सुमारे दीड किलो वजनाचे असते. ते अन्नपचनात महत्वाची मदत करते. यकृतातून तयार होणारा पित्तरस हा मेदांचे पचनास आवश्यक असतो. शरीरातील एकंदरीत चयापचयात यकृत एखाद्या गृहमंत्र्याप्रमाणे महत्वाची भूमिका बजावते. शरीरात बाहेरून शिरणाऱ्या आणि चयापचयात निर्माण होणाऱ्या अनेक विषांचा ते नायनाट करते. त्याची एकूण कार्ये ५००च्या घरात आहेत ! म्हणूनच ते जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीरात मोक्याचे ठिकाणी वसलेले आणि अनेकविध कार्ये करणारे हे इंद्रिय विविध रोगांनाही बऱ्यापैकी बळी पडते.
यकृताचे प्रमुख आजार हे साधारणपणे खालील प्रकारचे असतात:
१. विषाणूंचा संसर्ग
२. मद्यपानादींमुळे होणारी कठीणता
३. औषधांचे दुष्परिणाम
४. पित्तनलिकांचे आजार
या लेखात आपण यकृत-कठीणतेचा विचार करूया.
यकृताच्या काही आजारांत त्याच्या संपूर्ण अंतर्गत रचनेत बिघाड होतो. त्यातून त्याच्या निरोगी पेशी नष्ट होतात. आता त्यांची जागा तंतुमय (fibrous) पेशी घेतात आणि त्यामुळेच हे इंद्रिय कठीण बनते. यकृतास एखादी इजा झाल्यापासून अशी दुरवस्था होण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. मात्र एकदा का अशी स्थिती झाली की ती सहसा पूर्ववत होत नाही.
कारणमीमांसा
या आजाराची प्रमुख कारणे अशी आहेत:
१. बेसुमार मद्यपान
२. हिपटायटीस C/ B विषाणूंचा संसर्ग
३. यकृतातील अतिरिक्त मेदसाठे : असे साठे होण्याचा धोका लठ्ठपणा, मधुमेह आणि काही मेदविकारांत वाढतो.
४. औषधांचे दुष्परिणाम : यात काही कर्करोगविरोधी, रक्तदाबनियंत्रक आणि हृदयविकारविरोधी औषधे येतात.
आता काही मुद्दे विस्ताराने पाहू.
१. बेसुमार मद्यपान : हा मुद्दा सर्वात कुतूहलाचा आणि बहुचर्चित आहे. तो व्यवस्थित समजून घेऊ. कुठल्याही मद्यातील महत्वाचा रासायनिक घटक म्हणजे Ethanol. प्रथम ते रक्तात शोषले जाते आणि मग शरीरात सर्व पेशींत पोचते. त्याचा चयापचय सगळीकडेच होतो पण मुख्यतः तो यकृतात होतो. त्यासाठी विविध एन्झाइम्सच्या यंत्रणा कार्यरत होतात. त्यांच्या क्रियांमुळे Ethanol पासून प्रथम Acetaldehyde तयार होते. त्यापुढील क्रियांनी अखेर पाणी आणि कार्बनडायऑक्साईड तयार होऊन हा चयापचय संपतो. अगदी माफक मद्यपान केल्यास Ethanolचा सहज निचरा होऊन जातो. जसजसे मद्यपानाचे प्रमाण वाढत जाते तशा या यंत्रणा अधिकाधिक कार्य करतात. या वाढलेल्या चयापचया दरम्यान Acetaldehyde अधिकाधिक प्रमाणात पेशींत जमू लागते आणि त्यामुळे पेशींना इजा होते. तसेच चयापचयातील बिघाडाने यकृतात मेदपदार्थ मोठ्या प्रमाणात साठू लागतात. मद्यपान जेव्हा बेसुमार होते आणि अनेक वर्षे चालू राहते तेव्हा या गोष्टींमुळे यकृताला मोठी इजा होते. सुरवातीस यकृतदाह (Hepatitis) होतो. हळूहळू त्याचे रुपांतर यकृत-कठीणतेत होउ लागते. जर का या परिवर्तनाच्या स्थितीत संबंधिताने मद्यपान थांबवले तर यकृतदाह काही महिन्यांत बऱ्याच अंशी बरा होतो. पण, याउलट जर बेसुमार मद्यपान चालूच राहिले तर मात्र कायमची यकृत-कठीणता होते.
मद्यपान हे समाजातील सर्व स्तरांत केले जाते. माफक, मध्यम आणि बेसुमार अशी त्याची प्रमाणे असतात. दीर्घकाळ खूप मद्यपान करणाऱ्या सर्वांनाच गंभीर यकृतदाह होत नाही. त्यामुळे “नक्की किती पिणे सुरक्षित?” हा मद्यपींच्या दृष्टीने कळीचा प्रश्न असतो. यासंदर्भात जगभरात अनेक अभ्यास झालेले आहेत. विविध वंशांतील लोकांत मद्याची घातकता कमीअधिक असू शकते. तसेच स्त्री व पुरुषांतील त्याची संवेदनशीलता बऱ्याच फरकाची आहे. इथेनॉलचे दररोजचे प्रमाण आणि घातकता याबाबत सर्वसाधारण असे म्हणता येईल:
पुरुषांत ६० ग्रॅम आणि स्त्रियांत २० ग्रॅम प्रतिदिन असे सेवन १० वर्षांहून अधिक काळ केल्यास यकृत-कठीणतेचा धोका बराच असतो.
मद्याची घातकता नक्की का आणि काही ठराविक लोकांनाच का होते हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. यावर खूप संशोधन झालेले असले तरी त्याचे सर्वसंमत असे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात एखाद्या व्यक्तीतील खालील घटकांचा वाटा असू शकतो:
• लिंग आणि जनुकीय घटक
• पर्यावरण
• आहार
• चयापचयातील भेद
• विषाणू संसर्ग, आणि
• प्रतिकारशक्ती
मद्य-घातकता आणि लिंगभेद
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांत ही घातकता अधिक आहे. याची २ संभाव्य कारणे आहेत:
१. स्त्रियांच्या जठरात एका विशिष्ट एन्झाइमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या पहिल्या ‘प्रवेशद्वारातून’ मद्याचे पुढे सरकणे (clearance) कमी गतीने होते.
२. स्त्री-हॉर्मोन्स ethanol चा चयापचय मंदावतात.
आहार
नित्य मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा समतोल आहार घेणे महत्वाचे आहे. जर आहारात दीर्घकाळ प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि काही मेदाम्लांचा तुटवडा राहिला तर यकृतास इजा होण्याची शक्यता वाढते.
विषाणू संसर्ग
दीर्घ मद्यपानाच्या जोडीला अशा व्यक्तीस जर hepatitis C चा संसर्ग झाला असेल तर यकृत-कठीणता होण्याचा धोका बराच वाढतो. मद्य आणि हा विषाणू यांचा संयोग त्या व्यक्तीसाठी अधिकच घातक ठरतो.
२. विषाणूंचा संसर्ग : दोन महत्वाचे विषाणू असे आहेत:
अ) हिपटायटीस C विषाणू
हा घातक विषाणू शरीरात खालील प्रकारे शिरू शकतो:
• इंजेक्शनद्वारा व्यसनी पदार्थ (ड्रग्ज) घेणे
• समलिंगी संबंधाचे पुरुष
• अंगावर सुईने गोंदण्याची प्रक्रिया
• असुरक्षित acupuncture आणि तत्सम प्रक्रिया
ब) हिपटायटीस B विषाणू
B आणि C चे काही संसर्ग मार्ग समान आहेत. याचे काही अजून मार्ग असे आहेत:
• स्त्री-पुरुषांतील असुरक्षित संबंध, अनेक जोडीदारांशी संबंध
• बाळंत होतानाची प्रक्रिया
• दूषित रक्त आणि अवयव प्रत्यारोपण
या दोन्हीही विषाणूंच्या आजारात यकृतदाह होऊन तो दीर्घकालीन होतो.
यकृतातील अतिरिक्त मेदसाठे :
निरोगी यकृताच्या पेशींत मेदाचे प्रमाण अल्प असते. पण काही चयापचय-बिघाडाच्या आजारांत .( उदा. आटोक्यात नसलेला मधुमेह)
ते प्रमाणाबाहेर वाढते. अशा मेदाने गच्च भरलेल्या पेशी फुटू शकतात आणि त्यामुळे दाह होतो. हळूहळू त्याची वाटचाल कठीणतेकडे होते.
या दीर्घकालीन आजाराची वाटचाल, गुंतागुंत, उपचार आणि रुग्णाचे भवितव्य याचे विवेचन पुढील भागात .......
............................................................................................
(क्रमशः)
• या लेखाचा विषय ‘मिपाप्रेमी योगेश’ यांनी सुचविल्याबद्दल त्यांचे आभार !
वाचने
23083
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त माहिती
उत्तम पण लवकर संपवलात ,पुढचा
Dhanywad
मुवि, तेजस व योगेश,
.
अॅलोपॅथी मधे यकृत विकारावर औषधोपचार नाही आहे.
विषाणूजन्य काविळीवर आधुनिक
In reply to अॅलोपॅथी मधे यकृत विकारावर औषधोपचार नाही आहे. by जालिम लोशन
अतीशय उपयुक्त माहिती
अर्धसत्य ....
अर्धसत्य ....
त्रोटक होता त्याचे कारणही स्पष्ट केलेत
आनंददायी ....
In reply to त्रोटक होता त्याचे कारणही स्पष्ट केलेत by जॉनविक्क
एका कठीण पण महत्त्वाच्या
खूप सोप्या भाषेत असल्यामुळे
सुबोध,
मद्यपानाचे समर्थन बिलकूल करणार नाही !बाप्पू, धन्यवाद. पुढील भागात तुमच्या मुद्द्यांचा जरूर उल्लेख होईल. या भागात या आजाराच्या कारणमीमांसेवरील चर्चा नीट व्हावी हा हेतू आहे.नेहमीप्रमाणे .....
सुधीर, धन्यवाद.
In reply to नेहमीप्रमाणे ..... by सुधीर कांदळकर
खूप जिव्हाळ्याचा विषय
+१
हे खरे आहे का
ताकत हाच कमकुवतपणा
In reply to हे खरे आहे का by Rajesh188
+१
कठीण कठीण कठीण किती
;) +१
आतडी बांधणे किंवा कापून साइज कमी करणे
असा छातीठोक पने दावा विज्ञान
In reply to आतडी बांधणे किंवा कापून साइज कमी करणे by Rajesh188
meta-analysis conducted to
In reply to असा छातीठोक पने दावा विज्ञान by सुबोध खरे
meta-analysis conducted to
In reply to meta-analysis conducted to by सुबोध खरे
meta-analysis conducted to
In reply to meta-analysis conducted to by सुबोध खरे
(No subject)
In reply to meta-analysis conducted to by सुबोध खरे
थोडे अवांतर होतेय
In reply to असा छातीठोक पने दावा विज्ञान by सुबोध खरे
लेखाचा उत्तरार्ध ..
कावीळ व विश्रान्ति
वाढलेली लॅब >
लॅब ...
In reply to वाढलेली लॅब > by हेमंतकुमार
चौरा,