यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis)
: भाग १
यकृत हे आपल्या उदरात उजव्या बाजूस श्वासपटलाच्या खाली वसलेले एक महत्वाचे इंद्रिय आहे. शरीरातील इंद्रियांपैकी ते सर्वात मोठे असून ते प्रौढ व्यक्तीत सुमारे दीड किलो वजनाचे असते. ते अन्नपचनात महत्वाची मदत करते. यकृतातून तयार होणारा पित्तरस हा मेदांचे पचनास आवश्यक असतो. शरीरातील एकंदरीत चयापचयात यकृत एखाद्या गृहमंत्र्याप्रमाणे महत्वाची भूमिका बजावते. शरीरात बाहेरून शिरणाऱ्या आणि चयापचयात निर्माण होणाऱ्या अनेक विषांचा ते नायनाट करते. त्याची एकूण कार्ये ५००च्या घरात आहेत ! म्हणूनच ते जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीरात मोक्याचे ठिकाणी वसलेले आणि अनेकविध कार्ये करणारे हे इंद्रिय विविध रोगांनाही बऱ्यापैकी बळी पडते.
यकृताचे प्रमुख आजार हे साधारणपणे खालील प्रकारचे असतात:
१. विषाणूंचा संसर्ग
२. मद्यपानादींमुळे होणारी कठीणता
३. औषधांचे दुष्परिणाम
४. पित्तनलिकांचे आजार
या लेखात आपण यकृत-कठीणतेचा विचार करूया.
यकृताच्या काही आजारांत त्याच्या संपूर्ण अंतर्गत रचनेत बिघाड होतो. त्यातून त्याच्या निरोगी पेशी नष्ट होतात. आता त्यांची जागा तंतुमय (fibrous) पेशी घेतात आणि त्यामुळेच हे इंद्रिय कठीण बनते. यकृतास एखादी इजा झाल्यापासून अशी दुरवस्था होण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. मात्र एकदा का अशी स्थिती झाली की ती सहसा पूर्ववत होत नाही.
कारणमीमांसा
या आजाराची प्रमुख कारणे अशी आहेत:
१. बेसुमार मद्यपान
२. हिपटायटीस C/ B विषाणूंचा संसर्ग
३. यकृतातील अतिरिक्त मेदसाठे : असे साठे होण्याचा धोका लठ्ठपणा, मधुमेह आणि काही मेदविकारांत वाढतो.
४. औषधांचे दुष्परिणाम : यात काही कर्करोगविरोधी, रक्तदाबनियंत्रक आणि हृदयविकारविरोधी औषधे येतात.
आता काही मुद्दे विस्ताराने पाहू.
१. बेसुमार मद्यपान : हा मुद्दा सर्वात कुतूहलाचा आणि बहुचर्चित आहे. तो व्यवस्थित समजून घेऊ. कुठल्याही मद्यातील महत्वाचा रासायनिक घटक म्हणजे Ethanol. प्रथम ते रक्तात शोषले जाते आणि मग शरीरात सर्व पेशींत पोचते. त्याचा चयापचय सगळीकडेच होतो पण मुख्यतः तो यकृतात होतो. त्यासाठी विविध एन्झाइम्सच्या यंत्रणा कार्यरत होतात. त्यांच्या क्रियांमुळे Ethanol पासून प्रथम Acetaldehyde तयार होते. त्यापुढील क्रियांनी अखेर पाणी आणि कार्बनडायऑक्साईड तयार होऊन हा चयापचय संपतो. अगदी माफक मद्यपान केल्यास Ethanolचा सहज निचरा होऊन जातो. जसजसे मद्यपानाचे प्रमाण वाढत जाते तशा या यंत्रणा अधिकाधिक कार्य करतात. या वाढलेल्या चयापचया दरम्यान Acetaldehyde अधिकाधिक प्रमाणात पेशींत जमू लागते आणि त्यामुळे पेशींना इजा होते. तसेच चयापचयातील बिघाडाने यकृतात मेदपदार्थ मोठ्या प्रमाणात साठू लागतात. मद्यपान जेव्हा बेसुमार होते आणि अनेक वर्षे चालू राहते तेव्हा या गोष्टींमुळे यकृताला मोठी इजा होते. सुरवातीस यकृतदाह (Hepatitis) होतो. हळूहळू त्याचे रुपांतर यकृत-कठीणतेत होउ लागते. जर का या परिवर्तनाच्या स्थितीत संबंधिताने मद्यपान थांबवले तर यकृतदाह काही महिन्यांत बऱ्याच अंशी बरा होतो. पण, याउलट जर बेसुमार मद्यपान चालूच राहिले तर मात्र कायमची यकृत-कठीणता होते.
मद्यपान हे समाजातील सर्व स्तरांत केले जाते. माफक, मध्यम आणि बेसुमार अशी त्याची प्रमाणे असतात. दीर्घकाळ खूप मद्यपान करणाऱ्या सर्वांनाच गंभीर यकृतदाह होत नाही. त्यामुळे “नक्की किती पिणे सुरक्षित?” हा मद्यपींच्या दृष्टीने कळीचा प्रश्न असतो. यासंदर्भात जगभरात अनेक अभ्यास झालेले आहेत. विविध वंशांतील लोकांत मद्याची घातकता कमीअधिक असू शकते. तसेच स्त्री व पुरुषांतील त्याची संवेदनशीलता बऱ्याच फरकाची आहे. इथेनॉलचे दररोजचे प्रमाण आणि घातकता याबाबत सर्वसाधारण असे म्हणता येईल:
पुरुषांत ६० ग्रॅम आणि स्त्रियांत २० ग्रॅम प्रतिदिन असे सेवन १० वर्षांहून अधिक काळ केल्यास यकृत-कठीणतेचा धोका बराच असतो.
मद्याची घातकता नक्की का आणि काही ठराविक लोकांनाच का होते हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. यावर खूप संशोधन झालेले असले तरी त्याचे सर्वसंमत असे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात एखाद्या व्यक्तीतील खालील घटकांचा वाटा असू शकतो:
• लिंग आणि जनुकीय घटक
• पर्यावरण
• आहार
• चयापचयातील भेद
• विषाणू संसर्ग, आणि
• प्रतिकारशक्ती
मद्य-घातकता आणि लिंगभेद
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांत ही घातकता अधिक आहे. याची २ संभाव्य कारणे आहेत:
१. स्त्रियांच्या जठरात एका विशिष्ट एन्झाइमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या पहिल्या ‘प्रवेशद्वारातून’ मद्याचे पुढे सरकणे (clearance) कमी गतीने होते.
२. स्त्री-हॉर्मोन्स ethanol चा चयापचय मंदावतात.
आहार
नित्य मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा समतोल आहार घेणे महत्वाचे आहे. जर आहारात दीर्घकाळ प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि काही मेदाम्लांचा तुटवडा राहिला तर यकृतास इजा होण्याची शक्यता वाढते.
विषाणू संसर्ग
दीर्घ मद्यपानाच्या जोडीला अशा व्यक्तीस जर hepatitis C चा संसर्ग झाला असेल तर यकृत-कठीणता होण्याचा धोका बराच वाढतो. मद्य आणि हा विषाणू यांचा संयोग त्या व्यक्तीसाठी अधिकच घातक ठरतो.
२. विषाणूंचा संसर्ग : दोन महत्वाचे विषाणू असे आहेत:
अ) हिपटायटीस C विषाणू
हा घातक विषाणू शरीरात खालील प्रकारे शिरू शकतो:
• इंजेक्शनद्वारा व्यसनी पदार्थ (ड्रग्ज) घेणे
• समलिंगी संबंधाचे पुरुष
• अंगावर सुईने गोंदण्याची प्रक्रिया
• असुरक्षित acupuncture आणि तत्सम प्रक्रिया
ब) हिपटायटीस B विषाणू
B आणि C चे काही संसर्ग मार्ग समान आहेत. याचे काही अजून मार्ग असे आहेत:
• स्त्री-पुरुषांतील असुरक्षित संबंध, अनेक जोडीदारांशी संबंध
• बाळंत होतानाची प्रक्रिया
• दूषित रक्त आणि अवयव प्रत्यारोपण
या दोन्हीही विषाणूंच्या आजारात यकृतदाह होऊन तो दीर्घकालीन होतो.
यकृतातील अतिरिक्त मेदसाठे :
निरोगी यकृताच्या पेशींत मेदाचे प्रमाण अल्प असते. पण काही चयापचय-बिघाडाच्या आजारांत .( उदा. आटोक्यात नसलेला मधुमेह)
ते प्रमाणाबाहेर वाढते. अशा मेदाने गच्च भरलेल्या पेशी फुटू शकतात आणि त्यामुळे दाह होतो. हळूहळू त्याची वाटचाल कठीणतेकडे होते.
या दीर्घकालीन आजाराची वाटचाल, गुंतागुंत, उपचार आणि रुग्णाचे भवितव्य याचे विवेचन पुढील भागात .......
............................................................................................
(क्रमशः)
• या लेखाचा विषय ‘मिपाप्रेमी योगेश’ यांनी सुचविल्याबद्दल त्यांचे आभार !
प्रतिक्रिया
21 Nov 2019 - 7:00 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
21 Nov 2019 - 7:19 pm | तेजस आठवले
उत्तम पण लवकर संपवलात ,पुढचा भाग लवकर येउद्या.
ऍसिडिटी (आम्लपित्त ) हा विषयावरील तुमच्या लेखाची वाट पाहत आहे.
21 Nov 2019 - 11:44 pm | MipaPremiYogesh
Thank you doc. Far upyukt mahiti dili tumhi..pudhachya bhagachya pratikshet
22 Nov 2019 - 7:39 am | कुमार१
मुवि, तेजस व योगेश,
धन्यवाद.
तेजस, तो विषय प्रतीक्षा यादीत आहे.
हा लेख मुद्दामच २ भागांत विभागाला आहे. त्यामुळे एक भाग लहान वाटेल याची कल्पना आहे. विभागण्याचे कारण सांगतो.
या आजाराची कारणे महत्वाची आहेत. त्यांबद्दल समाजात काही गैरसमज आढळतात. हे सामान्यांशी बोलताना जाणवते. ‘य. कठीणता’ म्हटले की अंगठा उंचावून “ते घेत असणार दाबून”, अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया असते. त्याबद्दल नीट माहिती व्हावी, तसेच इतरही कारणे समजावीत हा हेतू आहे.
22 Nov 2019 - 1:55 pm | वकील साहेब
माहितीपूर्ण लेख, पु भा प्र
22 Nov 2019 - 5:25 pm | जालिम लोशन
असे ऐकुन आहे. आणी अमिबासारख्या परोपजीवींचा संसर्ग पण काॅमन आहे ना?
22 Nov 2019 - 8:23 pm | सुबोध खरे
विषाणूजन्य काविळीवर आधुनिक शास्त्रात औषध नाही हे सत्य नसून बहुसंख्य लोकांना त्याची गरज नाही हे सत्य आहे.
सर्वात जास्त होणार रोग हा HEPATITIS A या विषाणू मुळे होतो. यात दहा लाख पैकी नऊ लाख ९९ हजार ९८५ रोगी स्वतःहून बरे होतात (दहा लाखापैकी १५ रुग्ण दगावतात आणि हे बहुसंख्य रुग्ण अतिशय लहान बालके किंवा वृद्ध असतात).
इतर शास्त्रांमध्ये छातीठोक पणे आमच्याकडे उत्तम औषध आहे असे सांगितले जाते त्याचा सज्जड असा शास्त्रीय पुरावा आजतागायत मला आढळलेला नाही किंवा माझ्या मित्रांकडे मागितला असतात त्यांना तो देता आलेला नाही.
काविळीवर लिव्ह ५२ हे औषध बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. हे औषध लष्कराच्या केंद्रीय पुरवठ्यात खरेदी केले जात असे. १९८९ साली आमच्या सरानी लष्करातील एकंदर १००० रुग्णांवर त्याचा वापर करून औषध घेणाऱ्या आणि ना घेणाऱ्या रुग्णांमध्ये सांख्यिकीय दृष्टीकोनातून (STATISTICAL) काहीही फरक नाही असे दाखवले होते. त्यानंतर त्या औषध निर्मिती कंपनीने आपले लागे बांधे वापरून हा निष्कर्ष वर येऊ दिला नव्हता. परंतु सत्य फार काळ लपून राहत नाही त्याप्रमाणे शेवटी ५ वर्षानंतर हे औषध लष्करी पुरवठ्यात विकत घेणे बंद झालेच.
22 Nov 2019 - 5:46 pm | श्वेता२४
याबद्दल उत्सुकता होतीच. तुमच्या साध्या सोप्या पद्धतीने समजावून सागंण्याच्या लेखनशैलीमुळे माझ्यासारख्यांना असे किचकट विषयही सहज समजून जातात. खूप खूप धन्यवाद.
22 Nov 2019 - 5:49 pm | कुमार१
वकील, जा लो, श्वेता
धन्यवाद.
जालो,
तुम्ही म्हणता ते अर्धसत्य आहे. यकृताच्या काही विषाणूजाण्य आजारांना प्रभावी औषधे नाहीत हे खरे. पण काहींना जरूर आहेत. अमिबा- यकृतदाहासाठी औषधे आहेत.
22 Nov 2019 - 5:49 pm | कुमार१
वकील, जा लो, श्वेता
धन्यवाद.
जालो,
तुम्ही म्हणता ते अर्धसत्य आहे. यकृताच्या काही विषाणूजाण्य आजारांना प्रभावी औषधे नाहीत हे खरे. पण काहींना जरूर आहेत. अमिबा- यकृतदाहासाठी औषधे आहेत.
22 Nov 2019 - 6:29 pm | जॉनविक्क
एखादा न्युजपेपर, मासीक हाताशी का नाही धरत ? सुरेख लेखमाला होईल.
22 Nov 2019 - 6:54 pm | कुमार१
जॉन,
तुम्ही आस्थेने लिहीलेत त्याबद्दल मनापासून आभार !
पूर्वी मी काही लेखमाला वृत्तपत्रांत लिहिल्या आहेत. त्यातून ते मोठ्या वाचकसमूहापर्यंत जाते हे बरोबर. पण, हल्ली तिकडे वाचक-संवाद जवळपास नसतो.
त्या उलट इथे जे वाचकांचे प्रेम मिळते त्याला तोड नाही. पुन्हा प्रकाशनाचे वेळापत्रक पूर्ण आपल्या हातात असते. आपणच आपले राजे हा आनंद इथे नक्की आहे.
22 Nov 2019 - 6:43 pm | सुबोध खरे
एका कठीण पण महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल आपले अभिनंदन.
किती मद्यपान हे सुरक्षित आहे? यावर फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.
परंतु आतापर्यंतच्या बहुसंख्य संशोधनाचा निष्कर्ष हा किमान मद्यपान सुद्धा अल्पसा अपायच करते असाच आलेला आहे.
https://www.bbc.com/news/health-45283401
22 Nov 2019 - 6:46 pm | बाप्पू
खूप सोप्या भाषेत असल्यामुळे तुमचे लेख आवडीने वाचतो.
एक प्रश्न/सजेशन आहे -
पुढच्या भागात यावरदेखील प्रकाश टाका
1) यकृताचे कार्य व्यवस्थित चालले आहे हे कोणत्या तपासण्यांमधून समजते.
2) यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय काय काळज्या घ्याव्यात.
22 Nov 2019 - 7:07 pm | कुमार१
सुबोध,
मनापासून आभार.
>>>>>>
अगदी बरोबर. माझ्या कर्करोगाच्या लेखात मी त्याचा पूर्वी परामर्श घेतलाच आहे. या लेखात मद्याचे प्रमाण, दीर्घ कालावधी आणि यकृत- कठीणतेचा संबंध यावर प्रकाश टाकत आहे. सर्व मद्यपिंना हा आजार होता नाही, हा सामन्यांच्या दृष्टीने कळीचा प्रश्न असतो.
मद्यपानाचे समर्थन बिलकूल करणार नाही !
बाप्पू, धन्यवाद.
पुढील भागात तुमच्या मुद्द्यांचा जरूर उल्लेख होईल. या भागात या आजाराच्या कारणमीमांसेवरील चर्चा नीट व्हावी हा हेतू आहे.
22 Nov 2019 - 7:58 pm | सुधीर कांदळकर
कठीण विषय रंजकतेने आणि टापटिपीने मांडलात. दुसर्या भागाची वाट पाहातो आहे.
रच्याकने बहुसंख्य भारतीयांचा सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांवर जास्त इश्वास असतो. खेडो़खेडी आणि शहरात गल्लोगल्ली स्वतःजवळ कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसतांना काविळीचे औषध देणारे वैदू आढळतात. काही पैसे घेऊन तर काही फुक्कटच्या मोठेपणासाठी. अगोदर कावीळच आहे याचे डॉक्टरकडून निदान करून घ्या म्हणून सांगतात. तरी लोकांचा अर्हताप्राप्त डॉक्टरपेक्षा त्यांच्यावर विश्वास असतो. वर दहा जणांकडे औषध देणाराचे गोडवे गातात. असे कोणी सांगू लागले की मला हसू आवरता येत नाही मग मी पळ काढतो.
मुंबईच्या रेलवे लोकलमध्ये अशा वैदूंच्या फोन नं. सह जाहिराती चिकटवलेल्या असतात. पहिल्या दुसर्या दोन्ही वर्गाच्या डब्यात.
24 Nov 2019 - 7:56 am | कुमार१
>>>>
+ १११
23 Nov 2019 - 10:51 am | वाघमारेरोहिनी
यकृत इतके महत्वाचे असूनही कायम दुर्लक्षित.
मी कॉलेजला असताना लिव्हर function tests seminar sathi निवडले. तेव्हा detail अभ्यास केला. आणि मग मास्टर्स ला non alcoholic statohepatitis var research केला. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही. डॉक फार सोपे करून सांगत आहात. आता मी picrorhiza वर research kartey. काही phyto chemicals hepato protectective ahet. Research papers Cha अगदी पाऊस आहे journals madhye. तुम्हाला पुढच्या भागासाठी शुभेच्छा
23 Nov 2019 - 11:03 am | कुमार१
रोहीनी , धन्यवाद.
तुमच्या संशोधनातील उपयुक्त माहिती जरूर लिहा. आरोग्य धाग्यांवर विविध प्रकारच्या तज्ञांनी लिहिल्यास सर्वांनाच फायदा होईल.
23 Nov 2019 - 5:00 pm | Rajesh188
यकृत हा मानवी शरीर मधील एकमेव अवयव आहे.
जिथे खराब झालेल्या पेशी किंवा रोग ग्रस्त झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात आणि यकृत चे काम चालू ठेवतात
23 Nov 2019 - 6:10 pm | जॉनविक्क
म्हणूनच ते आजारी असल्याचे तपासणी शिवाय सहजी समजत नाही, आणी समजले तर वेळ उरलेला नसतो
23 Nov 2019 - 5:54 pm | कुमार१
राजेश,
होय, बरोबर. या इंद्रियाला मिळालेली ही अनोखी देणगी आहे. एखाद्या यकृतात मूळच्या जेमतेम चांगल्या २५% पेशी उरल्या असतील तरीही त्यापासून पूर्ण नवी निर्मिती (regeneration) होऊ शकते.
23 Nov 2019 - 6:13 pm | जॉनविक्क
हे टायटल वाचून हृदयाविषयी धडा आहे असे वाटते ;)
23 Nov 2019 - 6:28 pm | कुमार१
जॉन,
खरंय ! शीर्षक गीतमय केलंय आणि त्यातून उत्सुकता वाढवली आहे.
23 Nov 2019 - 8:51 pm | Rajesh188
उदा. आटोक्यात नसलेला मधुमेह)
ते प्रमाणाबाहेर वाढते
.
फक्त आतडी बांधली किंवा कापली ( त्या सर्जरी ला विशिष्ट नाव आहे)की मधुमेह बरा होतो असा छातीठोक पने दावा विज्ञान चा हवाला देवून केला जातो त्याचे काय
26 Nov 2019 - 12:46 pm | सुबोध खरे
असा छातीठोक पने दावा विज्ञान चा हवाला देवून केला जातो त्याचे काय
आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणतीही गोष्ट बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशीच असली पाहिजे असाच संकेत आहे.
Bariatric surgery has been seen to associate with substantial and sustained weight loss in morbidly obese patients. Interestingly, bariatric surgeries also induce higher rates of short and long-term diabetes remission
meta-analysis conducted to assess the metabolic effect of bariatric surgery in T2DM patient with BMI <35 kg/m2 found, 55–85% patients could achieve HbA1c <6–7% without anti-diabetic medications during mean follow-up ranging up to 18 years
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4566335/
26 Nov 2019 - 12:48 pm | सुबोध खरे
meta-analysis conducted to assess the metabolic effect of bariatric surgery in T2DM patient with BMI <35 kg/m2 found, 55–85% patients could achieve HbA1c <6–7% without anti-diabetic medications during mean follow-up ranging from 6 to 18 years
कॉपी पेस्ट मध्ये काही भाग आला नाही
26 Nov 2019 - 12:49 pm | सुबोध खरे
meta-analysis conducted to assess the metabolic effect of bariatric surgery in T2DM patient with BMI <35 kg/m2 found, 55–85% patients could achieve HbA1c <6–7% without anti-diabetic medications during mean follow-up ranging from 6 to 18 years
26 Nov 2019 - 12:49 pm | सुबोध खरे
meta-analysis conducted to assess the metabolic effect of bariatric surgery in T2DM patient with BMI <35 kg/m2 found, 55–85% patients could achieve HbA1c <6–7% without anti-diabetic medications during mean follow-up ranging from 6 to 18 years
26 Nov 2019 - 12:50 pm | सुबोध खरे
<35 kg/m2 found, 55–85% patients could achieve HbA1c <6–7% without anti-diabetic medications during mean follow-up ranging from 6 to 18 years
27 Nov 2019 - 1:05 pm | Rajesh188
पण कोणत्याही नवीन शोध,tach,उपचार ह्या वर छातीठोक पने दावा करू नये असे मला वाटत.
साइड इफेक्ट,एकदा रोग बरा करणाऱ्या उपचारचार मुळे नवीन
समस्या निर्माण होणे.
उपचार ल विविध व्यक्ती च्या शरीर कडून मिळणारा प्रतिसाद ह्या मध्ये असलेला फरक.
शारीरिक क्षमतेत होणारा फरक .
खूप सांगता येईल.
त्या मुळे नवीन उपचार किंवा शोध ह्याचे दोन भागात विभाजन करणे गरजेचे आहे
पहिला भाग हा फायदे सांगणारा आणि दुसरा भाग त्या मधून होणारे तोटे किंवा विपरीत परिणाम ह्या वर असावा .
25 Nov 2019 - 1:57 pm | कुमार१
इथे:
https://misalpav.com/node/45738
27 Nov 2019 - 9:24 pm | चौकटराजा
काविळीत खास करून खूप विश्रांती घ्या असे सुचविले जाते म्हणजे शक्यतो आडवे पडा . शरीर आडवे असताना काही एन्झाइम्स वेगळे वर्तन करतात असे वाचनात आले आहे हे खरे आहे का ? दुसरे असे की लिव्हर असा शरीरातील एकमेव अवयव आहे की जो कापला तरी परत वर्धित होऊन वाढलेली लॅब कार्यरत होते हे खरंय का ?
27 Nov 2019 - 9:42 pm | कुमार१
>>
हे समजले नाही. ??
28 Nov 2019 - 3:00 pm | चौकटराजा
यकृताला एक अजब अशी सेंद्रिय रसायनाच्या प्रक्रियांची लॅब असे म्हटले जाते !
28 Nov 2019 - 10:35 am | कुमार१
यकृताचा कही भाग कापला तरी उरलेल्या पेशींपसून पूर्वीइतक्या आकाराचे इंद्रिय निर्माण होते. बरोबर.
उरलेल्या पेशी आकाराने तसेच संख्येने वाढतात म्हणून हे शक्य होते.
अशा पुनर्निर्माणाची त्यांची ताकद जवळजवळ अमर्याद असते.