चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

Primary tabs

bhagwatblog's picture
bhagwatblog in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 4:58 pm

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

हॉलीवूडचे ३००, ट्राय चित्रपट बघितल्या नंतर मला असे वाटायचे की ऐतिहासिक गोष्टी वर आपल्या कडे चित्रपट का निघत नाही कारण आपला इतिहास इतका समृद्ध आहे की इथल्या सह्याद्रीच्या प्रत्येक कडे-कपारीत कथा आणि पटकथा दडलेल्या आहेत किंवा शोधल्यास पटकन सापडतील. आता आपल्या कडे चित्रपट दिग्दर्शकानी इकडे लक्ष वळवले आहे. आणि यावर चित्रपट यायला आधीच सुरुवात झाली आहे. “फत्ते शिकस्त” चित्रपटात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या पात्याने गाजवलेल्या लढाई आणि इतिहासातील अजरामर करून दंतकथा बनलेल्या एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चातुर्य, कुशल युद्धनीती, कुटनीती, चपळ गुप्तहेर खाते, गनीमी कावा, लढवय्या नेतृत्व, जाणता राजा, रयते साठी झुंजणारा नेता आणि शत्रूला अचानक खिंडीत गाठून विजेच्या चपळाईने वार करून चाणक्यनीतीने पाणी पाजणारा योद्धा, सरदाराचा सखा, असे अनेक गुण दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न केला आहे. त्यासाठी दिग्दर्शकाची स्तुति करायला हवी.

प्रत्येक पात्राची उत्तम रित्या करून दिलेली ओळख, प्रत्येक पात्रा साठी कथा उत्तम रित्या फूलत जाते. चित्रपट खऱ्या खुऱ्या गडकोट, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळावर चित्रित केल्यामुळे चित्रपटात वास्तविक वाटतो. चित्रपट छायांकन करकरीत झाले आहे. सह्याद्रीचे कॅमेरा झूम-इन आणि झूम-आउट करून छान चित्रण केले आहे. त्यासाठी सह्याद्रीचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे. पार्श्व संगीताचा अतिशय योग्यपणे आणि चपखल वापर केला आहे. ज्या वेळेस प्रेक्षकांना कथा माहिती असते त्या वेळेस सुद्धा प्रेक्षकांचा चित्रपटात श्वास रोखून धरणे हे दिग्दर्शकाचे यश आहे. चित्रपट एका गोष्टी भोवती जरी फिरत असला तरी त्यातील तपशीलवार माहिती देऊन तो प्रत्येक क्षण दिग्दर्शकाने व्यवस्थित चित्रित केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा उत्तम आहे. संवाद आणि संवाद शैली यावर सुद्धा दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली आहे.

‘मृणाल कुलकर्णी’ आणि “जिजाबाई” मातोश्री यांची भूमिका हे एक अति उत्तम समीकरण झाले आहे. त्यांनी संवाद आणि अभिनय अतिशय संयतपणे आणि परिणामकारक साकारला आहे. त्यांचा चित्रपटातील राज गडावरील प्रवेश तर चांगला साकारला आहे. “चिन्मय मांडलेकर” यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे पात्र अतिशय उत्तम रित्या रंगवले आहे. सगळ्यात भाव खाऊन जाते ती “अंकित मोहन” यांनी साकारलेली “येसाजी कंक” यांची भूमिका. अंकित यांनी तोफ उचलण्याचे दृश्य ३ वर्षा पूर्वी येऊन गेलेल्या चित्रपटाची आठवण करून देतो. अंकितने कमावलेली पीळदार शरीरयष्टी, चपळाई पडद्यावर दिसते. “अजय पूरकर” यांनी निसर्ग प्रेमी “तानाजी मालुसरे”, “समीर धर्माधिकारी” यांनी “नामदार खान”, “मृण्मयी देशपांडे” यांनी “केसर बाई”, “तृप्ती तोडलमल” यांनी “राय बाघन साहेबा”, “अस्ताद काळे” यांनी “कारतलब खान” आणि “ऋषि सक्सेना” यांनी फत्ते खान ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. “अनुप सोनी” यांनी “शायिस्तेखान” आपल्या चांगल्या अभिनयातून दर्शवलेला आहे. “सर्जेराव जेधे”(स्वतः दिग्दर्शक), “कोयाजी बांदल” यांच्या भूमिका सुद्धा जमून आल्या आहेत.

उलट्या काळजाचा, धूर्त आणि घातकी नामदार खान समीर ने उत्तम वठवलेला आहे. नामदार खान प्रत्येकावर संशयी आणि बारीक नजर ठेवून फिरत असतो. “ऋषि” ने लहान पण फत्तेखान या व्यक्तीरेखेला न्याय दिला आहे. सगळ्या मोहिमांवर पराजित होऊन आलेले सरदार बघून शाहेस्तीखान नाराज होतो. वरून “राय बाघान साहेबा” यांचे कटू शब्द शायिस्तेखानाला झोंबतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काळी शत्रू पक्षात किती दहशत होती ते फक्त एका संवादात अधोरेखित होते. चित्रपटाच्या पूर्वार्धात पूर्व तयारी आणि उंबरखिंडीत घाटातील लढाईचे क्षण चित्रित केले आहेत. चित्रपटाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात कशी मोहीम केली आणि त्यात शायिस्तेखानाची बोट कापली जातात यावर आधारित आहे. “मृण्मयीने” छोटाश्या भूमिकेत प्रभाव पडून जातात. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल “बहिर्जी नाईक’ याचं पात्र साकारणारे “हरीश दुधाडे”. “हरीश” या पात्रात जीव ओतला आहे. बहुरूपी, प्रसंगा अनुरूप रूपे बदलणारा, सह्याद्रीच्या वाटा ओळखणारा, आणि रूप, आवाज बदलून फिरणारा बहिर्जी मस्त वटवून पूर्ण न्याय दिला आहे. “हरीश” चित्रपटात क़व्वाली गातात हे थोडे खटकते. एका क्षणी एक पात्र गायनाची जाण नसलेले दाखवले आहे आणि दुसऱ्या क्षणी तेच पात्र क़व्वाली गातो हे सुद्धा पटत नाही.

तगडी स्टार कास्ट, प्रत्येक भूमिकेला दिलेला न्याय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला यशस्वी सर्जीकॅल स्ट्राईक ची कहाणी उलगडणारा, कलाकाराची मोलाची साथ, चांगला पूर्वार्ध आणि उत्तम उत्तरार्ध, छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम युद्ध नीती सांगण्याचा उत्तम प्रयत्न, उत्तम संगीत आणि चांगले पार्श्वसंगीत, अतिशय थरारक मांडणी, तांत्रिकदृष्ट्या उत्तम, आणि कथा, पटकथेला दिलेला न्याय, कथेची प्रवाही मांडणी त्यामुळे मी चित्रपटाला देतो ४ स्टार. चित्रपट चुकवूच नये असाच आहे.


नोट:- चित्रपट सुरू होताना साधारण साठ वय असलेल्या आज्जी चित्रपट गृहात एक-एक पायरी काठी घेऊन चढत होत्या. बहुतेक हेच चित्रपटाचे यश आहे.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2019 - 5:25 pm | चौथा कोनाडा

सुरेख रसग्रहण ! सुंदर संदर्भ दिलेत.

याला अपवाद अर्थात चिन्मयचा परंतु शिवाजी महाराजांचा ऑराच इतका प्रभावी आहे की तुम्ही - मी जरी तो रोल केला तरी त्याचा प्रभाव तर पडणारच, चिन्मय मात्र पदोपदी शिवधनुष्य पेलताना चाचपडताना जाणवत राहतोच. ज्यांना तो जबरा वाटला त्यांनी चित्रपट पूर्णवेळ डोळे उघडे ठेवून बघितला नसणार अशी वैयक्तिक खात्री आहे.

बाकी एक तोफ नष्ट व्हायचा सीन दोन वेगळ्या angle ने शूट करून तो दोन तोफा नाहीसा झाल्याचा दाखवणे यातच निर्मितीमूल्ये वा VFX स्पष्ट होतात त्यामुळे ज्या भव्यतेची अपेक्षा दाक्षिणात्य अथवा हिंदी चित्रपटाकडून करतो तेथे हा चित्रपट उजवा ठरवायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्याबाबतीत अवास्तव अपेक्षा नकोत, पण उत्कृष्ट नाट्यमयतेमधे कथा बांधली असल्याने, भावनिक पातळीवर चित्रपट कुठेही रखडत वा अजिबात भडक होत नसल्याने अतिशय चांगला ठरतो.

जिजाऊ अतिशय व्यवस्थीत. मृणालने लवकरच एखादा जिजाऊंची मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट केला तर महाराष्ट्र तो डोक्यावर घेईल. फर्जंदमधील पटकथा बांधणीच्या चुका टाळलेल्या असल्याने तो फॉर्म्युला रिपीट न करण्याचे धारिष्ट्य अतिशय स्वागतार्ह.

बिबट्याची शिकार रोखणे किती महत्वाची असे तानाजी समजावत असताना बाल संभाजी मी मोठेपाणी वाघाची शिकार करेन हे वाक्यही संभाळून घ्यावे लागते, हे संवाद लेखनाचे अपयश आहे पण, तसेच ऐतिहासिक थरारपट म्हणूनही पुरेशी शिदोरी वापरलेली नसूनही सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाची पकड अजिबात ढिल्ली होत नाही. परिणामी मला हा चित्रपट आवडला.

अजयच्या तानाजी बद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.

चिगो's picture

20 Nov 2019 - 1:53 pm | चिगो

फर्जंदमधील पटकथा बांधणीच्या चुका टाळलेल्या असल्याने तो फॉर्म्युला रिपीट न करण्याचे धारिष्ट्य अतिशय स्वागतार्ह.

ओक्के.. मग कदाचित बघेन. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, आपल्या कथा-कादंबर्‍यांमध्ये आणि त्यावर बेतलेल्या मालीका/चित्रपटांमध्ये शिवरायांच्या, किंबहुना, मराठ्यांच्याच एकंदरच शत्रूंना फारच उद्दाम, मुर्ख किंवा आक्रस्तळे दाखवण्यात/ रंगवण्यात येतं. फर्जंदमधला 'बेशकखान'ही तसाच. ज्यांनी पन्हाळा इतके दिवस लढवला/ झुलवला, त्यासाठी शेकडो मराठा सैनिक-सरदारांना रक्ताहुती/प्राणाहुती द्यावी लागली, ते शत्रू एवढे मुर्ख होते? त्यांना मुर्ख असल्याचं दाखवून त्यांच्यावर आपल्या युक्ती, चातुर्य, जाणकारी, हेरगिरी, संयम, त्वेष, शौर्य इत्यांदींचा यथायोग्य वापर करुन विजय संपादन करणार्‍या ऐतिहासिक वीरांना आणि स्वतः शिवाजीराजांना आम्ही कमीपणा आणत नाही का?

असो.. कधीतरी शिवाजीराजांचा 'जाणतेपणा', त्यांचा साक्षेप दाखवणारा चित्रपट निघेल, ही अपेक्षा करतो.

तितकी सफाई, भव्यता व स्ट्राईकचे डिटेलिंग अपेक्षित नसेल तर उत्तम अभिनय बांधेसूद पटकथा व आवश्यक वेगवान कथानक यावर चित्रपट सुरुवातीपासूनच पकड घेतो ती कुठेही सुटत नाही.

मला स्वतःला शाहीस्थेखानाच्या देहबोलीत पुरेसे क्रौर्य वाटले नाही ती कसर समीर धर्माधिकारी नामदार खानाच्या भूमिकेत भरून काढतो पण इतका ताकतवान अभिनय करूनही त्याला फुटेज दिलेले नाही हे चित्रपट रसिकांचे दुर्दैव. त्याचा सुरुवातीचा प्रसंग इंग्लओरिअस बास्टर्ड मधील ख्रिस्तोफ वोल्टझ ची आठवण करून देतो जो हिटलरसाठी नाझी विरोधक व ज्यूंना हुडकून टिपायचे काम करत असतो, समीरला वाया घालवला आहे.

आशा अनेक जागा आहेत जिथे आपण नकळत चित्रपटातल्या प्रसंगांची तुलना इतरत्र करतो पण हे टाळून एक स्वतंत्र कलाकृती म्हणून चित्रपट बघितल्यास पैसा वसूल हे नक्की

दुर्गविहारी's picture

19 Nov 2019 - 6:53 pm | दुर्गविहारी

उत्तम चित्रपट परिक्षण ! बघण्याची उत्सुकता वाढली आहे.

bhagwatblog's picture

19 Nov 2019 - 7:15 pm | bhagwatblog

चौथा कोनाडा, जॉनविक्क, दुर्गविहारी प्रतिसादा साठी धन्यवाद!!!
जिजाऊ अतिशय व्यवस्थीत. मृणालने लवकरच एखादा जिजाऊंची मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट केला तर महाराष्ट्र तो डोक्यावर घेईल. >> +१
बिबट्याची शिकार रोखणे किती महत्वाची असे तानाजी समजावत असताना बाल संभाजी मी मोठेपाणी वाघाची शिकार करेन हे वाक्यही संभाळून घ्यावे लागते, हे संवाद लेखनाचे अपयश आहे >> +१
चित्रपटात बऱ्याच चुका आहेत पण तुम्ही म्हंटल्या प्रमाणे "शेवटपर्यंत चित्रपटाची पकड अजिबात ढिल्ली होत नाही. परिणामी मला हा चित्रपट आवडला."

चौथा कोनाडा's picture

20 Nov 2019 - 1:11 pm | चौथा कोनाडा

+१

इंग्रजपूर्व पुरुषप्रधान काळात एक स्त्री योद्धा मुघलांच्यामधे पुरुषांच्या बरोबरीने स्वकर्तुत्वावर असे स्थान राखु शकते ही बाब प्रचंड उत्सुकता, कौतुक आणी विरतेची बाब आहे. तिचीही व्यक्तिरेखा सध्या स्त्री सशक्तीकरण हा मनोरंजन क्षेत्रातील यशाचा मूलभूत अप्रत्यक्ष फॉर्म्युला असूनही कमालीची छोटी होती.

मी सुद्धा परीक्षण लिहिले आहे आणि हे परीक्षण खूप छान!

bhagwatblog's picture

21 Nov 2019 - 5:38 pm | bhagwatblog

प्रतिसादा साठी निमिष सोनार धन्यवाद!!!
तुम्ही लिहिलेले परीक्षण तपशीलवार आणि अतिशय उत्तम आहे.

वकील साहेब's picture

22 Nov 2019 - 4:00 pm | वकील साहेब

अजय देवगण च्या तानाजी या चित्रपटाची जेव्हा चर्चा होत होती तेव्हा एक बातमी अशीही होती कि या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका सलमान खान करणार आहे. सलमानला आपण अनेक चित्रपटात अनेक रुपात बघितले आहे परंतु तो शिवाजी महाराज म्हणून शोभेल कि नाही याची शंका वाटली. परंतु चिन्मय मांडलेकर, किवा तानाजी मधील शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा शरद केळकर बघितला तर जाणवते की सलमान खानची उंची, देहयष्टी, चेहरा, नाक आणि दमदार भूमिका करण्याचा अनुभव यावरून तो या भूमिकेला जास्त न्याय देऊ शकला असता. खासदार अमोल कोल्हे आणि महाराजांची भूमिका हे एक समीकरण होऊन बसलं आहे ते त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने.

तानाजी चित्रपटातील शरद केळकर बद्दल अस वाटत की, अजय देवगण तानाजीच्या मध्यवर्ती भूमिकेत असल्याने शिवाजी महाराजांचे पात्र तितकेसे उजवे निवडले नसेल.

लाल महालाचा भेद काढण्यासाठी तिथे पूर्वीपासून माळीकाम करणाऱ्याची मदत घेतली गेली होती ते चित्रपटात दाखवलेले नाही.
बाकी एकंदरीत चित्रपट छान जमलाय.

bhagwatblog's picture

22 Nov 2019 - 5:18 pm | bhagwatblog

तानाजी चित्रपटातील शरद केळकर करून अपेक्षा वाढल्या आहेत. तानाजी चित्रपटाच्या ट्रेलर लौन्च तो म्हणाला होता की त्याच्यावर पात्र साकारताना प्रचंड दडपण होत आणि त्यांनी विशेष काळजी घेतली आहे.
लाल महालाचा भेद काढण्यासाठी तिथे पूर्वीपासून माळीकाम करणाऱ्याची मदत घेतली गेली होती ते चित्रपटात दाखवलेले नाही.>> या बद्दल चित्रपटात cinematic liberty घेतली आहे बहुतेक फुलवंती आणि इतर व्यक्तिरेखा दाखवुन...

बाजीराव मस्तानी साठी पहिला चॉईस सलमान होता

अजून छान झाला असता हा चित्रपट जर शिवाजी महाराजांची भूमिका दुसऱ्या कलाकाराने केली असती तर .. श्री चिन्मय तिथे मुख्य भूमिकेतच कमी पडले आहेत .. अजून एक अपवाद आहे .. तो म्हणजे स्त्री कलाकार , रायबाघन .. तिची भूमिका जरा ओढूनताणून झाल्यासारखी वाटते .. बाकी तानाजी , येसाजी , आऊसाहेब , नाईक आणि त्याचे साथीदार , खासकरून केशर आणि सर्वात उठावदार नामदार खान ( समीर धर्माधिकारी ) , सर्वांचे अभिनय अफलातून .. एकंदरीत चित्रपट पाहण्यासारखा झालाय .. माझ्या छोट्याला फार फार आवडलाय .. इतक्या लहान वयात ( ४ वर्षे ) माझ्या मुलाकडून मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कन्टेन्ट असेल तर शांतपणे पाहायचा नाहीतर पूर्ण थेटरात दंगा करायचा .. इतका कि बापाने कडेवर घेऊन सरळ घर गाठलं पाहिजे .. त्याला सर्वात जास्त आवडलेले चित्रपट :: उरी (३ वेळा ), जम्बो ( २ वेळा ) , मंगल ( ३ वेळा ) , नाळ ( ४ वेळा ) , आणि आता फत्तेशिकस्त ( १ वेळा )..
गोंधळ घालून बाहेर पडलेले ;; सर्वप्रथम जंगली ( इंटर्वल आधीच बाहेर ) , वॉर , स्पायडरमॅन फार अवे , छोटा भीम आणि अजून दोन तीन आहेत , त्यांची नावही आठवत नाहीत मला ...
सध्या हाऊ इस द जोश हे ब्रीद वाक्य मागे पडलंय आता घरात काळ पासून हर हर महादेव गुंजतंय.. बघावा असा झालाय .. पण ज्यांच्यावर हा शिजणेमा बेतलाय त्या मुख्य पात्राचीच निवड चुकलीय , असे मी म्हणेन .