मी सध्या सत्तर वर्षांची झालेली असल्याने, म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली आहे. सभ्य भाषेत ज्येष्ठ नागरिक. वयपरत्वे माझे सर्व अवयव दुखत असतात. मी तिकडं लक्ष देत नाही.
म्हातारपणी दुखायचंच म्हणून समाधान मानून घेते. माझे गुढगे दुखतात इथंपर्यंत ठीक आहे. पण माझी बोटं दुखतात, विशेषतः दोन्ही हातांचे अंगठे दुखतात, हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल.
अंगठे हा काय दुखावा असा अवयव आहे का? उद्या भुवई दुखेल, नखं दुखतील, कानाची पाळी दुखेल!
तर अशी ही माझ्या अवयवदुखीची तऱ्हा. हाताचे अंगठे दुखायला लागले की मला लिहिताना, टाईप करताना त्रास होतो.
म्हणजे लिहिणं खुंटलंच. चेकप सगळा करूनही उत्तर एकच. वयानुसार हे होणारच. सवय करुन घ्या. प्रत्येक सांध्याचे व्यायाम करा. तर असो.
एकदा माझी सर्वसाधारण मनुष्यप्राण्याप्रमाणे कंबर दुखायला लागली. म्हटलं, बँकबेडिंगचे माफक व्यायाम करताना दुखावली असेल. मग ते व्यायाम थांबवले. त्यानंतरही थांबेना.
मग सगळेच व्यायाम थांबवले. (किती छान!)
चोळलं, शेकलं, वेदनाशामकं घेतली. पडून राहिले. थांबायचं नाव नाही. म्हातारपणी होणारच या नेहमीच्या विचाराने सहन करत करत बरेच महिने दुखत राहिली. मग ठरविलं आता डॉक्टरांकडे जायचं. घरचे म्हणाले, "साध्या डॉक्टरांकडे नको. स्पेशालिस्टकडे जा."
माझ्या समवयस्क पण टुकटुकीत तब्येतीच्या मैत्रीणीच्या ओळखीच्या एका डॉक्टरांकडे अपॉंईंटमेंट घेण्यासाठी तिने स्वतः फोन केला. पण त्यांच्या सेक्रेटरीनं सांगितलं, 'एक महिन्यानंतरची मिळेल.' म्हणजे आता त्या डॉक्टरांचं मुखदर्शन घ्यायचं तर एक महिना थांबावं लागणार. त्यापेक्षा दुसरा बघावा.
तरी माझी मैत्रीण म्हणाली,"ते माझ्या पर्सनल ओळखीचे आहेत. मी त्यांना मोबाईलवर फोन करून याच आठवड्यातली अपॉईंटमेंट घेते. "मी कमरेवर हलकेच हात ठेवत आनंदानं म्हटलं,"बरं".
तिनं फोन केला. डॉक्टर म्हणाले,"तुम्ही परवा या. माझे अपॉईंटमेंटवाले पेशंटस् संपले की मी तुम्हांला आत बोलवेन".
माझी माझ्याच वयाची मैत्रीण आणि मी आनंदित झालो. त्या डॉक्टरांची ओपीडी मोठ्या हॉस्पिटलमध्ये होती.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. हॉस्पिटलच्या दारात वॉचमननं आमचं सामान तपासलं. बरोबर नेलेला बिस्किटाचा पुडा काढून घेतला आणि म्हणाला,"खाण्याचे, बाहेरुन आणलेले पदार्थ अलाऊड नाहीत. पाण्याची बाटली घेऊन जा."
आम्हांला हवे असलेले ऑर्थोपेडिक सर्जन कोणत्या विंगमधे,कोणत्या मजल्यावर आहेत ते त्यानं समजावून सांगितलं. हॉस्पिटलमधे इतक्या लिफ्टस् आणि इतक्या पाट्या होत्या की वॉचमननं समजावलेलं असूनही आम्ही गोंधळून गेलो.
तिथली कॅन्सर विभागाची पाटी पाहून तर मला 'आपल्याला कमरेचा कँन्सर तर झाला नसेल ना 'अशी शंका आली. मनावर दडपण आलं. आम्ही पुन्हा एकदा लिफ्टमनला विचारलं. त्यानं दूरवर बोट करत एक कोपऱ्यातली लिफ्ट दाखवली आणि पुन्हा एकदा ऑर्थोपेडिक चा पत्ता समजावून सांगितला.
आम्ही कोपऱ्यातल्या लिफ्टकडे गेलो. ऑर्थोपेडिक सेक्शनची पाटी आणि दिशादर्शक बाण पाहिला. त्या सेक्शनकडे गेलो.
तिथं प्रचंड गर्दी होती. इथं माझा नंबर कधी लागणार तोही अपॉईंटमेंटविना?! .. एक चिंतेची आणि एक शंकेची अशा दोन पाली माझ्या मनात खूपच मोठ्या आवाजात चुकचुकल्या.
आता दुपारचे दोन वाजले होते. डॉक्टरांनी आम्हांला दोन वाजताच बोलावलं होतं. म्हटलं,"चला,वेळेवर पोहोचलो आपण. आपण नेहमी कशा वेळेत बरोबर प्लॅन करुन पोचतो".. मैत्रीण आणि मी काऊंटरवर जावून नाव नोंदवून आलो आणि 'डॉक्टर ओळखीचे आहेत अपॉईंटमेंटशिवाय बोलावलंय वेळ मिळाला की मधेच बोलावणार आहेत.लहानसंच काम आहे,वेळ लागणार नाही' असं सगळं सांगितलं. ती 'बसा' म्हणाली. पण बसायला जागाच नव्हती. तोबा गर्दी होती.
आम्ही उभ्याच राहिलो. माझी कंबर दुखत होती. एकदा एका पायावर एकदा दुसऱ्या पायावर अशी मी उभीच राहिले. बराच वेळ गेला. कोणीच तरुण पेशन्ट दिसत नव्हते आणि सर्वांचीच अवस्था वाकलेली. तेव्हा आपली बसण्याची जागा सोडून अनिश्चित काळासाठी मला जागा ऑफर करण्याची रिस्क कोणीच घेईना.
तीन वाजले. मी आणि मैत्रीण पुन्हा काऊंटरपाशी गेलो.
विचारलं,"केव्हा लागेल नंबर? आमचा केसपेपर तरी करा."
ती म्हणाली, "केसपेपर करता येईल. पण डॉक्टर अजून आले नाहीत. ते चार वाजता येतील. त्यांच्याशी तुमच्याबाबत बोलून फाईल तयार करेन.
"माझी कंबर खचली.मी म्हटलं,"अजून आलेच नाहीत? पण त्यांनी तर आम्हांला दोन वाजता बोलावलं होतं. तोपर्यंत सर्व पेशन्ट संपलेले असतील असं म्हणाले. आणि तुम्ही म्हणता की अजून ते आलेच नाहीत?
"हो मॅडम पण ते आणखी चार हॉस्पिटल्समधे व्हिजिटिंगला जातात. तिथं त्यांचा वेळ जातो. येतीलच. बसा."
इतक्यात तिचा इंटरकॉम वाजला. तिनं तो उचलला.ही आम्हांला 'तुम्ही कटा'अशी सूचना होती बहुधा. आम्ही चुळबुळत पुन्हा भिंतीला टेकून उभ्या राहिलो.
चार वाजता डॉक्टर येणार हे कळल्यावर माझं कंबरडंच मोडलं होतं. मी मैत्रीणीला म्हटलं," आपण घरी जाऊया. दुखू दे माझी कंबर. नको इथं थांबायला."
तेवढ्यात एक माणूस बाकावरुन उठला. तिथं जागा रिकामी झाली. आम्ही दोघी वयाला न शोभेलशा चपळाईनं ती जागा लपकावली. तरुणपणी म्हणजे रिटायरमेंट वयापर्यंत लोकलमधे चढण्याचा आणि चवथी सीट पकडण्याचा अनुभव गाठी असल्यानेच आम्ही हे करु शकलो. बसायला जागा मिळाल्यावर डॉक्टरांची वाट पाहायला हुरुप आला.
चार वाजता मात्र डॉक्टर खरंच आले. माझ्या मैत्रीणीकडे त्यांनी पाहिलं. कोणालाच अजिबात ओळख न दाखवता कोऱ्या चेहऱ्याने ते त्यांच्या कन्सल्टिंग रुममधे गेले.
आम्ही दोघी पुन्हा काउंटरपाशी गेलो. "आता डॉक्टरांशी बोलून माझी फाईल तयार करता का प्लिज?", मी विचारले.
ती 'बरं' म्हणाली. इंटरकॉमवर डॉक्टरांशी बोलली. माझा केसपेपर तयार करुन, तो फाईलमधे घालून ती फाईल तिनं आम्हांला दिली.
"बोलावतील. बसा", तिने आश्वासन दिले. कन्सल्टिंग फी एक हजार रुपये. मुकाट्यानं दिली.
आम्ही बसलो. एक एक पेशंट आत जात होता. वीस मिनिटं आत थांबत होता. सगळं काम कूर्मगतीनं चाललं होतं.
आम्हांला वाटायचं की डॉक्टर मधेच आपल्याला बोलावतील. एकदोन पेशंटस् तर दहा मिनिटांतच बाहेर आले. वाटलं, आपला नंबर लवकर लागेल. आमच्या आशा पल्लवित झाल्या.
आम्हांला आता भूक लागली होती. त्या हॉस्पिटलमधे मस्त कँटीन बिंटीन होतं. तिथं जाऊन मस्त काहीतरी खावं आणि कॉफी प्यावी असं वाटत होतं. पण मैत्रिणीला वाटलं, "तेवढ्यात आपल्यालाच नेमकं डॉक्टरांनी आत बोलावलं तर?"
मी गप बसले. मलाही ते पटलं.
आता सहा वाजले होते. वॉचमननं जप्त केलेली बिस्किटं आठवली. खाण्याचं राहू दे. मोबाईलवरची गाणी ऐकायला इअरप्लग्जस्, वाचायला पुस्तक, झोपायला एखादी सतरंजी, उशी आणली असती तर किती बरं झालं असतं, असं वाटून गेलं.
मोबाईलवरचे व्हिडिओज्, कोणी कोणी पाठवलेले यू ट्यूब, गेम्स, गप्पा सगळ्याचा कंटाळा आला.
शेवटी पावणेसातला डॉक्टरांनी आम्हांला आत बोलावलं. आमचा कानांवर विश्वास बसेना. झपाट्याने आम्ही आत शिरलो. आत गेल्यावर डॉक्टरांना मी ताबडतोब म्हटलं, माझी कंबर दुखतेय, (नाहीतर पुन्हा त्यांना काहीतरी इमर्जन्सी फोन यायचा).. तीन चार महिने झाले. डॉक्टरांनी मला पडद्याआड नेलं. टेबलावर झोपवून मणके दाबून पाहिले. कसल्याशा रबरी हातोड्याने ठोकून पाहिले. गुढग्यात पाय वाकवून बघितले.
काही प्रश्न विचारले. नंतर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या असिस्टंटला बोलावले. ते बोलत होते, ती केसपेपरवर लिहित होती. पाच मिनिटांनी ते मला म्हणाले,"एक्सरे काढायला लागतील. खाली जाऊन तो काढा, मला दाखवा. ट्रॅक्शन लावावं लागेल. फिजिओथेरपी लागेल. त्याने नाही झालं तर अँडमिट व्हावं लागेल. सर्जरी हाच ऑप्शन फायनली"
मी हादरलेच.भर एसीत मला घाम फुटला.
"सध्या एक्सरे करून या, मग बघू", डॉक्टरांनी आम्हाला कटवलं.
दोघी केबीनमधून बाहेर पडलो. भुकेनं खाली पडायची पाळी आली होती. पण एक्सरे विभाग बंद होईल ह्या भीतीनं आधी तिकडे गेलो. तिथंही गर्दी होतीच. पुन्हा रांगेत बसलो. एक्सरे काढण्यासाठी पेशंटस् तयार होत होते आणि आत जात होते.
मी वाट बघत होते. आता भूक मेली होती. बरोबर आणलेलं आणि वॉचमननं अलाऊ केलेलं पाणी दोघी घोटघोट पीत होतो.
शेवटी तीन चार कोनांतून मणक्याचे एक्सरे काढून झाले. त्यांचे काही हजारांत बिल झालं. डॉक्टरांना एक्सरे दाखवला. नंतर एकदाचे घरी गेलो.
मग क्रमाक्रमानं औषधं, गोळ्या, ट्रॅक्शन, फिजिओथेरपी (दररोज सातशे रुपये), कमरेचा पट्टा हे सोपस्कार झाले. पट्टा अतिशय अनकंफर्टेबल असतो. बसलं, चाललं की तो वर सरकतो. तो लावून कुठल्याही समारंभाला जाता येत नाही. माझी कंबर पूर्णपणे दुखायची थांबलेली नाही. मी आता एक तात्पर्य काढलंय. "एकदा जडलेलं दुखणं पूर्णपणे बरं कधीच होत नाही. माणूस त्या दुखण्यासकट जगायला शिकतो. कशाला अंगदुखीसाठी डॉक्टरकडे जाऊन कष्टाचे, घामाचे साठवलेले पैसे वाया घालवायचे?
तेव्हा 'कीप डॉक्टर अवे'..
प्रतिक्रिया
18 Nov 2019 - 1:14 pm | गवि
सर्व स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे प्रचंड वेटिंग, डॉक्टर उशिरा येणं आणि संध्याकाळी सहा ते अगदी रात्री अकरापर्यंत सगळा वेळ एका अपॉइंटमेंटमध्ये तिष्ठत बसून जाणं ही नॉर्मल परिस्थिती झालेली आहे.
त्यात आणि अमुक तमुक टेस्ट करुन या, असं म्हटलं की झाली आणखी कित्येक तास किंवा दिवस तिष्ठण्याची तयारी.
18 Nov 2019 - 1:28 pm | प्रकाश घाटपांडे
'कीप डॉक्टर अवे'..>>>> तुमच्या हातात असत का ते? विशिष्ट मर्यादेपर्यंत तसे म्हणता येईल पण डॊकटर लागतोच
18 Nov 2019 - 1:34 pm | यशोधरा
बाकी सगळं ठीक आज्जे, एका माणसाच्या सीटमध्ये दोघी कशा बसलात, ते सांगा आधी! ;)
19 Nov 2019 - 12:07 am | जॉनविक्क
टेल टेल आज्जी, टेल टेल.
18 Nov 2019 - 4:09 pm | प्रियाभि..
खूप छान लिहिता हो. साध्या सोप्या घटनांवर लिहलेले ओघवत्या शैलीत लेखन खूप भावतं .
एक शंका: तुम्ही खरंच आजी आहात काय? की अशीच कल्पनाशक्ती?
18 Nov 2019 - 4:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
सध्या मीही अशाच अनुभवातुन जात असल्याने मनाला तंतोतंत पटले.
दोनतीन वीकेंड सतत गाडी चालवल्याने सुरु झालेली कंबरदुखी पहीले साधी असेल म्हणुन दुर्लक्ष केले. मग बाम, तेल, वेदनाशामके वगैरे झाली. मग फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी चालु केली. महिना झाला तरी गुण येईना म्हणुन एका मोठया हॉस्पिटलमध्ये ऑर्थो वाल्या डॉक्टरला दाखवले.
बी.पी. नाही, शुगर नाही, व्यसने नाहित, दहा तास बसुन काम हाच लोचा आहे म्हणतो. भरमसाठ रक्त तपासण्या आणि एम. आर. आय करायला सांगितला आहे. एक्स रे बघुन "बहुतेक काही निघणार नाहीच, पण खात्री करुन घेउ" म्हणतो. अशा चक्रात अडकलोय. पण दिवसरात्र कंबर दुखतेय, त्यामुळे निमुटपणे सांगतील ते करणे भाग आहे.
19 Nov 2019 - 3:31 pm | मोहन
न्युरो फिजीशियनचा सल्ला घेऊन बघा. माझ्या पत्नीची कंबर दुखी ब जिवनसत्वाच्या कमतरते मुळे होती.
18 Nov 2019 - 6:47 pm | पाषाणभेद
आज्ज्ये, या वयात कुठे डॉक्टरकडे जाते? पैसे कमवायचे असतात त्यांना. मस्त हरिपाठ म्हणत टाळ कुटायचे.
18 Nov 2019 - 7:11 pm | सुबोध खरे
माझी सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती तेंव्हा एका प्रथितयश वकिलाला भेटायला आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो होतो तेंव्हा आमच्या शेजारी राहणारे एक वकील यांनी आम्हाला त्या वकिलाला न्यायालयात जाताना रस्त्यात एक मिनिट भेटण्याची "सोय" करून दिली आणि म्हणाले चांगला वकील असेल तर तुम्हाला वाट पाहायला लागतेच अन्यथा स्वस्त वकील भरपूर भेटतील.
सी एस टी स्थानकाच्या जवळ असलेल्या न्यायालयाच्या बाहेर काळा कोट घातलेले असे वकीलच तुमच्या मागे मागे येतात.
मी स्वतः डॉक्टर असून आणि माझा मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख असूनही मी ७ तासाच्या वर डॉक्टरांच्या भेटीसाठी थांबलो होतो
http://www.misalpav.com/node/44942
19 Nov 2019 - 11:43 pm | जॉनविक्क
भारतीय संघराज्य विरोधी सुबोध खरे लेखमाला अवश्य येऊदे.
18 Nov 2019 - 10:42 pm | सुचिता१
हा अनुभव सगळ्यांना च कधीतरी आलाच असेल, पण आजींनी छान , ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे. लवकर बर्या व्हा. आणि हो, पुलेशु! !
तुमचं सगळंच लेखन खुसखुशीत आहे.
19 Nov 2019 - 2:35 pm | नूतन
अगदी!
19 Nov 2019 - 5:42 am | कंजूस
विनोदी लेखन असलं तरी तुमचा त्रास समजू शकतो.
--------
डॉक्टरास दूर ठेवणे ठीक पण दुसरे काही उपाय हवेत ना?
१) तिळाचं तेल एक चमचा जेवताना घेणे. पंधरा दिवसांत गुण येईल.
२) म्हातारे नसणाऱ्यांसाठी -
गादीवर झोपून कमरेखाली मोठा तक्क्या ठेवणे. पाय आणि डोके खाली असते आणि कमरेचा भाग तक्क्यामुळे उचललेला राहतो. एक मिनिटभर राहून पाचदहा मिनिटांनी पुन्हा करणे. दोन दिवसांत कमरदुखी थांबेल.
३) तिसरा एक उपाय आहे पण त्यास दुसऱ्या शक्तीमान एकदोघांची गरज लागते.
19 Nov 2019 - 2:32 pm | नूतन
लेख आवडला
19 Nov 2019 - 4:23 pm | जालिम लोशन
lol
19 Nov 2019 - 8:20 pm | दुर्गविहारी
तपासण्यांचे अनुभव नुकतेच वडिलांसाठी घेतल्याने लिखाण जास्त भावले. खुप छान लिहिता तुम्ही.
20 Nov 2019 - 12:14 pm | आजी
गवि-खरंय.
प्रकाश घाटपांडे-हो ना!
यशोधरा, - अडीच वर्षे-अडीच वर्षे फॉर्म्युला वापरुन. हाहा.
नाही, मी पेशन्ट असल्याने मी जास्तवेळ बसून आणि अधेमध्ये ती तब्येतीने टुकटुकीत असल्याने तिला थोडाचवेळ जागा देऊन अशा रीतीने.
जॉनविकक-टोल्ड टोल्ड अबोव्ह
प्रियाभि-थँक्यू,लेखन आवडलं त्याबद्दल. मी खरेच आजी आहे. अनेकदा हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण कदाचित माझं इथे इंटरनेटवर लिहिणं यामुळे मी खरेच टेक्नो सॅव्ही आहे असं वाटू शकत असेल. पण हे स्पष्ट केलं पाहिजे की मी कुटुंबियांच्या मदतीने यातला तांत्रिक भाग करुन घेते. शिवाय हलकेफुलके विषयच लिहायचे असा विचार आहे.
राजेंद्र मेहेंदळे-आपले अनुभव समान.
पाषाणभेद-नाहीच जाणार यापुढे.
सुबोध खरे-डॉक्टर, धन्यवाद तपशीलवार प्रतिसादाबद्दल.
तुम्हांला सुद्धा असं वेटिंग करावं लागू शकत असेल हा विचारच केला नव्हता!
सुचिता, कंजूस, दुर्गाविहारी, नूतन, मोहन- सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
20 Nov 2019 - 1:47 pm | यशोधरा
भारीच हो आज्जी! आज्जी रॉक्स!
20 Nov 2019 - 8:07 pm | सुबोध खरे
आजी साहेब
एकदा जडलेलं दुखणं पूर्णपणे बरं कधीच होत नाही. माणूस त्या दुखण्यासकट जगायला शिकतो.
हे बरोबर
माझ्या आईची एक मैत्रीण माझ्याकडे रुग्ण म्हणून आली होती.वय वर्षे ७५ पूर्ण.
पोटाची सोनोग्राफी झाल्यावर "जाता जाता" त्या मला म्हणाल्या डॉक्टर माझी कंबर आणि गुढघे दुखतात सगळी औषधे घेऊन झाली. औषध घेईपर्यंत बरं वाटतं. आता काय करायचे?
मी त्यांना म्हणालो तुम्ही घरभर फिरून पहा घरात ७५ वर्षे जुनी एक तरी गोष्ट चालू आहे का?
दोन मिनिटं विचार करून त्या म्हणाल्या हो डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अशी एकही वस्तू चालू नाही.
मी त्याना म्हणालो कि देवाने हे दिलेले यंत्र ७५ वर्षे बऱ्यापैकी विनातक्रार चालवलंत.त्याची झीज होणारच हे गृहीत धरणे आवश्यक आहे.
त्यातून तरुणपणी तुम्ही "काढ्लेले कष्ट" हे कुठेतरी शरीरावर परिणाम करणारच. त्या कष्टांमुळे शरीर झिजलं ते गृहीत धरा.
आपले गुढघे मधून मधून दुखतात पण आपण काठीशिवाय मैलो गणती चालतो आहोत चार जिने चढतो आहोत याचं समाधान मानणं आवश्यक आहे.
वार्धक्याबद्दल केवळ तक्रारच करू नका. कारण तुमचे अनेक मित्र मैत्रिणी एवढे नशीबवान नाहीत.(एवढे जगलेले नाहीत)
20 Nov 2019 - 8:49 pm | Rajesh188
मी जे वयस्कर डॉक्टर असतात त्यांनाच चांगले आणि खरे डॉक्टर समजतो
.
एक तर त्यांचे शिक्षण
Donation देवून नाही तर गुणवत्तेवर झालेलं असते.
त्यांचे सर्व खर्च वसूल झालेले असतात.
स्वप्न पूर्ण झालेली असतात.
आणि सर्वात महत्वाचे त्यांना असंख्य रुग्णांचा अनुभव असतो.
अनेक आजरांच निदान करण्याचा अनुभव असतो.
फक्त पुस्तकी शिक्षण तुम्हाला तरबेज बनवत नाही अनुभव हाच तरबेज बनवतो.
म्हणून शक्यतो मी तरी डॉक्टर कडे जात नाही .
आमचा फॅमिली डॉक्टर सुद्धा वयस्कर,अनुभवी च आहे
20 Nov 2019 - 9:07 pm | जॉनविक्क
खरे डॉक्टर कोण वादाचा मुद्दा आहे पण वयस्कर डॉक्टर अतिशय अनुभवी असल्याने बरेचदा माझ्याकडे बघून अंगाला हात अथवा कसलेही तपासणी यंत्र न लावता मला नेमके उपचार दिल्याचा अनुभव आहे, त्यांना मी चेष्टेने डॉ व्हॉट्सन म्हणतो जे माझे आजारपण फक्त डीडक्शन करून हुडकत असत :) ते माझ्या आधी गेले तर कधी काळी मला वाटणारी भीती हा एक भाग सोडला तर अनुभवी डॉक एकदम भारी प्रकरण असते... अगदी गप्पा मारायलाही.
23 Nov 2019 - 9:20 pm | मुक्त विहारि
स्वानुभव आहे.
23 Nov 2019 - 9:32 pm | मुक्त विहारि
कोनगाव येथे एक हाडवैद्य आहे. आडनाव विसरलो. पण त्या गावात तो एकच हाडवैद्य आहे.
मी पण ऐकीव माहिती घेऊन त्याच्या कडे गेलो होतो.
माझी पाठदुखी खूपच कमी झाली. फक्त 500 रूपये लागले.
बायकोची कंबरदुखी पण कमी झाली. आधी त्याच गोष्टी साठी 20000 लागले होते. पण उतार मिळाला नाही. त्या हाडवैद्याने 1500 रुपयात ते काम केले. 3 वेळा गेलो होतो. प्रत्येक वेळी 500 रुपये.
मंगळवारी तो नसतो. सकाळी 6 पर्यंत गेलात तर हमखास काम होते. 7 नंतर गर्दी सुरू होते आणि मग औषध संपले की काम होत नाही.
तो रोजचे औषध रोज बनवतो.
स्वानुभव आहे. म्हणून लिहिले.
24 Nov 2019 - 6:14 am | कंजूस
सारख्यासारख्या गोळ्या खाऊन कंटाळा येतो आणि असेडिटी वाढत जाते.
25 Nov 2019 - 3:35 pm | विनिता००२
म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली आहे. >> हे वाक्य वाचून आधी 'खुदू खुदू' ...मग 'खदा खदा' हसले
दुखणे सुरु झाले की कधी थांबेल असे होते. तपासण्यांना पर्याय नाही.
26 Nov 2019 - 3:40 pm | सस्नेह
मस्त खुसखुशीत लेखन. डॉक्टर च्या अनुभवाशी सहमत !