शेवटचा पुरावा!

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
31 Oct 2019 - 9:19 pm

"आपूनने बोला ना एक बार..... आपूनको नै पता."
"तेच तर विचारतोय मी. क्या नही पता?"
"यही की खून कैसे हुआ!"
"कैसे हुआ?"
"अब्बे घोंचू, जो नही पता वो कैसे बताएगा आपून?" एकदम टपोरी स्टाईल मध्ये उत्तर आले आणि केदारनी कमरेचा बेल्टच काढला.
सटाकंsss! सटाकंsss!
"अबे तेरी.....कितना जोरसे मारता है बे!"
"बोल.... का केलास खून? कसा केलास?"
"आपून बोला ना..... आपूनने नै कियेलाए मर्डर! नै कियेलाए!" शेकाटलेलं बूड चोळत तो भिंतीला चिकटून उभा राहिला.
"अच्छा? मग काय करत होतास तू तिकडे?"
"आपून अपने पेट का वास्ते गएला था साब!"
"काय खानावळ होती तिकडे?"
"नै!"
"मग?"
त्याने नुसतीच मान खाली घातली.
"चोरी?"
त्याने खिशातून पंन्नास रुपयांची नोट बाहेर काढून केदारच्या हातावर दाबली.
"ये ले| लौटा दिया आपूनने! पर ये आपून ने कुछ गलत इरादेसे नै कियेला| छोड अभी मेरेको!"
केदारने त्या नोटेकडे पाहिले. रक्ताने माखलेली ती नोट अर्धवट दुमडलेल्या आणि मधे एकच नेटकी घडी घातलेल्या स्थितीत होती.
"काय-काय पाहिलेस तिथे?"
"क्या देखेगा? कैसे देखेगा? अंधेरा था वहॉ पे| आपूनको तो चांदकी लाईट मे बॅग दिखी बस|"
"बाकी कोणी नव्हतं रस्त्यावर?"
"रात के ९ बजेले थे! और उस रस्तेपे ७ के बाद कोई नई जाता|"
"मग तू कसा गेलास?"
"देखने की कोई भूत-वूत है क्या|" उपरोधिक वाक्य कानाला खटकले. पण राग आवरत केदारने प्रश्न केला, "मग दिसलं कोणी भूत?"
"हॉ! और सिर्फ एकही नही, पॉंच दिखे! जिप से आयेले थे! एक राज की बात बताऊ? उसमेसे एक मेरे सामने बेठेलाए| बाकी के भूत डराकर मारते हैं, तू सवाल पुछ-पुछ के मार्रेलाए|"
"खरं नाव काय आहे तुझं?"
"तडका."
"काय?"
"त ड का"
"मी तुला तुझं नाव विचारलं."
"वईच तो बतारेलाए आपून..... तडका. यैच नाम से पैचानते है लोग मेरेको."
"बरं. मग तडका, तुला बॅग दिसली.... पुढे?"
"फिर आपूनने वैच किया जो करनेके वास्ते तूने मेरेपे डिरेक्टली मर्डर का चार्ज लगाने का कोशीश किया|"
"जे विचारेन त्याचं नीट उत्तर दे. काय केलेस पुढे?'
"आपूनने पर्स खोला, देखा तो बहुत माल पडा था अंदर| उसमेसे पचास का नोट निकाल रेला था और आप सब उधर टपक पडे.... और मेरे को उठालिया खाली फोकट|"
"म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुझं लक्षही गेलं नव्हतं प्रेताकडे तोवर?"
"अबे यार| कितना थकेला आदमी है रे तू? एक ही सवाल कब से पूछे जा रेलाए घूमाफिराके|"
'सोचा था, रात को तो खाना खाने को मिलेगा| और देख क्या खारेलाए अभी|' तडका स्वतःशीच पुटपुटला.
"माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहेस की....?" केदारने बेल्ट हालवून दाखवला.
"अरे नै देखा रे मेरे बाप| तू आनेसे पेहेले नै देखा उस लाश को आपूनने| आपून तो उधर सोने गएला था! पर्स दिखा तो सोचा खाना भी खालेगा पैसा मिला तो| " त्याने रागाने काटकुळे हात एकमेकांवर आपटून जोडून दाखवले.
"मग पळण्याचा प्रयत्न का केलास खून केला नव्हतास तर?"
'ये पागल है, या तो तडका को पागल बनाने मे लगा पडा है।'
"बोल.... का प्रयत्न केलास पळण्याचा?"
"तू क्या नया आया है क्या रे ? थोडा तो खूद का ब्रेन लगा.... आपून को लगा तू चोरी पकडने आया होगा| और तेरी जानकारी के लिये बताता है, चोरी करनाभी क्राईम ईच है| और चोरी करने के बादभी क्रायमर भागताईच है| अब 'क्यु' मत पुछना..... "
केदारने त्याच्याकडे डोळे बारीक करून तीव्र नजरेने पाहिले.
"अबे, तेरे जैसे आफसर अंदर डालके बंदर जैसे सवाल पुछेंगे तो भागना इच पडेंना ना?"
"तुझी जीभ जरा जास्तच चालते नै का?"
"और दिमाग भी! तेरेसे तो अच्छाही चलता है।"
"काही जेवलायंस?"
"मुझे लगाही, तेरे सवाल खतम नही होनेवाले!" तो मघाच्याच प्रश्नोत्तरांच्या धुंदीत म्हणाला. "एक मिनट ...... माने ? माने क्या पुछा तुने?"
"काही खाल्लं नसशीलच ना?"
त्याने आश्चर्यचकित होत मानेनेच नकार दिला.
तडकाला ताळेबंद करून केदार टेबलाजवळच्या खुर्चीत येऊन बसला. हातातल्या नोटेला टेबलावर ठेवले. क्षणभर निरीक्षण करून त्याने पाटीलला हाक दिली.
"पाटील, या नोटेवर जे रक्त आहे ते मृत देहाचेच आहे ना याची खात्री करून घ्या. लगेच लॅब मध्ये पाठवा. मला परवा दुपारपर्यंत रिपोर्ट हवेत म्हणावं."
पाटील नोटेला प्लास्टिक कव्हर मध्ये टाकून घेऊन गेला तसा फोनचा रिसीव्हर उचलून केदारनी २ डोश्यांची ऑर्डर टाकली.
दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसा तडका भिंतीला पाठ ठेकवून उभा राहिला.
"अभी हो गया ना भिडू.... मेरेको इतना मार खाने की आदत नै है, आपून बतारैलाए| गलतीसे आपून मार खाते खाते मर-वर गया तो तेरेको भी डिसमैस करवा देंगे| आपून क्या बोलता है, क्यू खामखॉ तकलीफ लेनेका और देनेका?"
केदारने त्याच्या तुरुंगाचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला तसा तडका बिथरला...."सून ना.... कल आ ना.... अभी आज का कोटा हो गया ना पुरा!" केदार पुढे आला. तडका काकुळतीला येऊन म्हणाला, "अबे, सच मे बहुत दुखरेलाए अभी|"
केदारने त्याच्या हातात पुडकं दिलं आणि तडका ते उघडून बघणार तोवर केदार पुन्हा बाहेर आला सुद्धा.
तडकाने आश्चर्याने हातातलं पुडकं उघडून पाहिलं आणि चटणी पसरवलेले दोन ताजे घमघमीत डोसे पाहून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं.
केदार केसचे डिटेल्स लिहिण्यात व्यस्त झाला. मिळालेली माहिती अपूर्ण होती आणि त्यामुळे रकाने भरणे तितकेच अवघड होऊन बसले होते. पण साहेबांना रिपोर्ट हवा असतो दर महिन्याला! आणि ही केस सुद्धा महिन्याच्या शेवटीच यायची होती? काय लिहिणार? निनावी कॉल, खूनाची मिळालेली अर्धवट माहिती, अद्याप ओळख न पटलेले प्रेत...... त्यात भूरट्या चोराच्या कुठल्याच छबीत न बसणारा थकेलेला कम भूकेलेला चोर - तडका. ज्याला पंन्नासच्या दोन आणि शंभर च्या चार नोटा म्हणजे 'बहुत सारा माल' वाटतो. यापैकी रिपोर्ट मध्ये लिहिण्यायोग्य काहीही नव्हतं. लहानपणी 'गाळलेल्या जागा भरा' हा आवडता स्वस्तात मार्क देणारा प्रश्न मोठेपणी डोक्याचे दही करून सोडतो. शेवटी तो प्रश्न सोडून पर्यायी मार्ग निवडायचा. ही केस पुढच्या महिन्यात रिपोर्टला जोडायची म्हणून त्याने पेपर बाजूला काढून फाइल बंद केली. आणि घड्याळ बघितले. उशिरच झालेलाच होता नेहमी प्रमाणे. त्याने मोबाईल खिशात टाकला आणि कारची चावी घेऊन निघाला.
___________
"काय रे.... किती उशिरा आलास!" मिनाक्षी डोळे चोळत हॉल मध्ये आली.
"अगं झोप, झोप!"
"अरे झोप काय? जेवायला देते चलं."
"अगं मी घेईन ना माझ्या हातांनी! तू झोप जा."
"नको.... राहू दे. सकाळी दुप्पट पसारा आवरावा लागेल मला. तू जा हात धू."
"पण मी कुठे पसारा....."
"केदार, पटकन फ्रेश होऊन ये." एक भुवई चढवून ती म्हणाली आणि केदारने बॅग जागेवर ठेवून मोबाईल चार्जिंगला लावला.
हात पाय धून बाहेर आला आणि मोबाईलकडे बघतो तर म्हात्रेचे दहा मिसकॉल येऊन गेलेले होते. मोबाईल अनलॉक करून कॉल करणार तोवर त्याच्याच कॉल पुन्हा आला.
"हॅलो."
"सर, म्हात्रे बोलतोय."
"हं, बोला!"
"सर, पोलिस निरीक्षक स्मिताबद्दल ज्याने तुम्हाला सांगितले होते ना..... तोच मी.! म्हात्रे बोलतोय, सर. "
"ह, हो. लक्षात आहे मला. मी बघतो आहे त्यांच्या प्रमोशनच. त्यांचा रिपोर्ट भारावून टाकणारा आहे. मी त्यांचे नावं सुचवले आहे मिटींग मध्ये. बघू कोणाचे रॅंकिंग कसे येते आहे ते!"
"नाही सर.... त्याकरता कॉल नाही केला." म्हात्रेच्या आवाजातला कंप केदारला जाणवला.
"मग?"
"सर.... तो जो फोटो..... तो...."
"हं.... ओळख पटलेली नाही अजून प्रेताची. म्हणून पाठवलायं. आजकाल सोशल मीडिया जास्त लवकर पोचवतो माहिती. तुम्हीही सगळीकडे पाठवा."
"सर..... त्याची गरज नाही."
"का म्हात्रे?"
"सर, तुम्ही जो फोटो व्हॉटस अप केलात तो शुभांगीचा आहे."
"शुभांगी?"
"हो सर! माझी मैत्रीण शुभांगी आहे ती."
"ओह, आय सी! कोण होत्या त्या? काय करायच्या?"
"वकिल होती..... LLB केलं होतं तिने. सर, हे असं अचानक कसं झालं?"
"अजून तरी काही कळलेलं नाहीये, म्हात्रे. पण उद्या तुम्ही या. ओळख पटवून स्टेटमेंट घ्यावे लागेल. आणि हो, तिच्या घरच्यांनाही कळवा."
"कोणाच्या?"
"शुभांगीच्या, म्हात्रे!"
"हो.... हो....किती वाजता?"
"अकरा वाजता."
"सकाळी?"
'नाही.... रात्री! कोजागिरी आहे ना! सगळे मिळून मसाल्याच्या दुधाचे घोट घेत जागरणं करू! काय मुर्खासारखे प्रश्न आहेत, म्हात्रे?' अगदी केदारच्या जिभेपर्यंत आलेले शब्द! पण त्याला तडकाची आठवण झाली. आपल्या प्रश्नांनी कंटाळून गेले होता पुरता. पण स्टेटमेंट असे अर्धवट, काही गृहीत धरून, बहुरुपी, बहुअर्थी किंवा समोरच्याला वाचताना अक्कल वापरावी लागेल असे चालेल का? शब्द न् शब्द स्पष्ट वदवून घ्यावे लागतात. म्हात्रेला काय झालंय पण? भलतेच प्रश्न सुरुयेत... मैत्रिण गेल्याचा धक्का बसला असणार, दुसरं काय?
"सर?" काहीच उत्तर न आल्याने म्हात्रे ने हाक दिली.
"म्हात्रे...."
"हा सर, बोला ना.....काय झालं? " म्हात्रेने गडबडून विचारले.
"म्हात्रे, उद्या सकाळी क्राईम ब्रांच मध्ये भेटू, सकाळी अकरा वाजता, शुभांगीच्या संपूर्ण परिवारासोबत. ठिकेय?"
"हो...."
केदारने फोन ठेवला.
"केदार....." मिनाक्षीने हाक मारली.
"हो, आलो."
__________
"गोळी मिळाली नाही? कसं शक्य आहे हे सानिका मॅम?"
"सर, पॉइंट ब्लॅंकने शूट केलयं. गोळी आरपार गेलीये."
"पण त्या परिसरात तर एकही गोळी सापडलेली नाही...... आणि बंदूकीतून निघाली तर कुठेतरी जाऊन गोळी पडली असेलच ना?" केदार हातात फोटो घेऊन शुभांगीच्या शरीराला पडलेल्या भगदाडाकडे पाहत म्हणाला.
"सर, ही सर्व बाजूंनी विचार करून घटनाक्रम आखून केलेली हत्या वाटते आहे." म्हात्रे म्हणाला.
"कश्यावरून?"
"सर, याला अनेक कारणे आहेत. ज्या रस्त्यावर हत्या झाली तो सुमसान होता. तिथे शुभांगी का गेली होती, यालाही काही ठोस कारण नाही. तिच्या जाण्या येण्याच्या मार्गावर हे ठिकाण येतच नाही. म्हणजे तिला तिथे बोलावले गेले असणार. शिवाय तिच्या पर्स मध्ये काही पैसेही होते. म्हणजे खूनाचे कारण चोरी नसणार. आणि जर बंदूक चालवल्यावर खुनी घाबरून पळून गेला असता, तर गोळी सापडली असती."
"तुम्हाला असं म्हणायचंय की....."
"हो सर, खूनी काही वेळ तिथेच होता. त्याने शुभांगीच्या मृत्यूनंतर रक्ताने माखलेली गोळी उचलली, सर्व पुरावे नष्ट केले आणि काही उरलेले नाही याची खात्री करून घेत त्याने ती जागा सोडली."
"हम्म. पण मग फोन कुणाचा आला होता पाटीलला?"
"कदाचित ज्याने हत्या होताना पाहिली त्याचा.... आणि खून होताना पाहून त्यावेळी घाबरून लपून बसला असेल. खूनी गेल्यानंतर त्याने पोलिसांना फोन केला असेल." स्वतःशीच बोलल्यासारखं शेवटचं वाक्य म्हात्रे हळू आवाजत म्हणाला.
"पण मग त्याने खुन्याचे आणि खून कसा झाला त्या प्रसंगाचे वर्णन न सांगताच का ठेवला फोन? स्वतःचे नावही नाही सांगितले त्याने."
"तो घाबरला असेल."
"कोणाला?"
"बहुतेक ज्याने खून केला त्याला किंवा....." म्हात्रे बोलताना थांबला आणि त्याने बिचकून सानिका आणि केदारकडे पाहिले.
"किंवा कोणाला?" सानिकाने विचारले.
"दुर्दैवाने पोलिस चौकशीला गुंडांपेक्षा सामान्य नागरिक जास्त घाबरतात, सर."
केदारने म्हात्रेकडे एक कटाक्ष टाकला. पण वादात पडायला नको म्हणून त्याने पुन्हा केसकडे विषय वळवला.
"म्हात्रे, तिच्या घरच्यांनी दिलेले स्टेटमेंट..... त्यांना तर हे माहितीच नव्हतं, की ती ऑफिस मधून लवकर निघाली आहे."
"एका वकिलालाही असा शत्रू असू शकतो? इतकं वैर? सरळ जीवच घ्यावा?"
"म्हात्रे....."
"तिच्या घरच्यांना किती कष्टाने सावरले सर.... पाहिलेत ना?"
"हो, म्हात्रे. पण आता ती आपल्याकरता केवळ एक बळी आहे.... एक व्हिक्टम."
"सर, माझी मैत्रीण होती ती." म्हात्रेचा आवाज थरथरू लागला.
"म्हात्रे, भावनिक होऊ नका."
"सर...."
"तुम्ही तिच्या घरच्यांसमोर ज्या विश्वासाने म्हणाला होतात ना की तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा द्याल, त्याच विश्वासाला गृहीत धरून तुम्हाला या केस मध्ये घेतलंय मी." केदारने म्हात्रेच्या पाठीवर हात ठेवला.
"सर, मी बाकीचे डिटेल्स पाठवून दिलेत रिपोर्ट मध्ये. पण एक मान्य करावे लागेल की जो कुणी आहे त्याने खरचं एकही पुरावा सोडलेला नाहीये मागे. आणि ज्याने फोन केला त्याने इंटरनेट कॉल केला होता. त्यामुळे ना नंबर कळू शकलाय आणि ना IP ट्रेस होतो आहे. प्रॉझी वापरला असेल." सानिकाने म्हणाली आणि कॉफीचा मग घेऊन ती पुढच्या कामाला लागली.
__________

"हॅलो, पो.... पोलिस?"
"हो, बोला?"
"एक खून झाला आहे."
"कुठे?"
"बनगार्डन."
"तुमचे नाव काय?"
"सोहम..... सोहम सुरवसे."
"तुम्ही खून होताना पाहिलाय?"
"नाही. प्रेत पाहिले फक्त."
"ठिक आहे, आम्ही येतोय.... प्रेताला हात लावू नका आणि सगळ्यांना बाजूला थांबायला सांगा."
"हो सर."
___________
बनगार्डनला म्हात्रे पोचला आणि चौकातच घोळका पाहून त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. जिओ फ्री सिम करता दुकानापुढे गर्दी करावी तशी गर्दी लोकं प्रेत बघायला का करत असावीत हा प्रश्न त्याला कैकदा पडायचा.
"सरका.... सरका.... बाजूला सरका!" वाट काढत धक्काबुक्की करत म्हात्रे घोळक्याच्या मध्यस्थानी पोचला तेव्हा त्याचा शर्ट अर्धवट इस्त्री करून बुजगावण्याला घातल्यासारखा दिसत होता. डाव्या हाताची दोन आणि उजव्या हाताचे एक बटण तुटले होते. पहिल्यांदाच मुंबई लोकल मधून प्रवास करून उतरलेल्या (स्वतःच्याही नकळत वेगळ्याच स्टेशनवर उतरवला गेलेल्या) प्रवाशासारखा तो दिसत होता. तो काही ओरडणार तोवर त्यालाच त्याची चूक लक्षात आली. माहिती मिळाली, की आहे तसे उठून क्राईम सीनला धावत जाणे ही त्याची सवय! घरातून हातात मिळेल तो शर्ट चढवून त्याने चप्पल पायात सरकवली होती. आज अंगावर वर्दी असती तर सगळ्यांनी स्वतःहून बाजूला होत त्याला मार्ग दिला असता. त्याला? की वर्दीला? काहीही असो.... हे वर्दी न घालता गर्दीत घुसणे जोखमीचेच!
"ए.... सगळे बाजूला व्हा. मी पोलिस आहे."
तो ओरडला तेव्हा आधी सगळे त्याच्या आवाजाला घाबरून त्याच्याकडे बघू लागले. धगळपगळ शर्ट आणि पायातली फॅंसी चप्पल पाहून त्या भयंकर प्रसंगातही एकच हशा पिकला. तेव्हड्यात जिप सकट केदार घटनास्थळी पोचला.
"म्हात्रे?"
सगळ्यांची नजर केदारकडे गेली. आणि पोलिसांची व्हॅन पाहून तिथून अनेकांनी पाय काढता घेतला.
म्हात्रेने सुटकेचा श्वास सोडला.
"म्हात्रे, तुम्ही अश्या अवस्थेत इथे?"
"सर या खुनाची टिप मिळाली फोनवर." म्हात्रेने मागच्या बाजूला पडलेल्या प्रेताकडे बोट दाखवले.
केदारने नजरेने म्हात्रेला जवळ बोलावले. हवालदाराला ऐकू जाणार नाही अश्या आवाजात कुजबुजला, "तुम्ही बहुतेक तुमच्या पत्नींची चप्पल आणि मेहुण्यांचा शर्ट घालून आला आहात म्हात्रे!"
म्हात्रेने चपलेकडे बघितले आणि ओशाळला.
केदारने प्रेताकडे नजर टाकली. गुढघ्यावर बसून त्याने प्रेताच्या कपाळाला मधोमध रक्ताळलेली जखम वजा पोकळी न्याहाळली.
"कोणी पाहिले होते का खून होता ना?" केदारने आवाज दिला.
कोणी काहीच बोलले नाही.
"फोन कोणी केला होता पोलिसांना?"
गर्दीतून एक माणूस पुढे आला.
"सर, मी! मी सोहम."
"सोहम सुरवसे ना?" म्हात्रेने विचारले.
"हो सर. पण खून होताना नव्हता पाहिला मी. आरडाओरडा ऐकला आणि बघितले तर हे असे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. म्हणून कॉल केला."
"ठिक आहे. पांडे यांचे डिटेल्स लिहून घ्या. आणि सोहम, तुम्ही स्टेटमेंट द्यायला पोलिस स्टेशनला या."
पोलिस स्टेशनला या ऐकल्यावर सोहमचा चेहरा खाडकन पडला. होकारार्थी मान हालवत पांडेला नाव नंबर लिहून देण्यात व्यस्त झाला.
"सर, मी पाहिले आहे याला." प्रेताचा चेहरा निरखून पाहत म्हात्रे म्हणाला.
"हो? कुठे पाहिले म्हात्रे?" केदारने फोन हातात घेऊन प्रेताचे फोटो घेतले.
"शुभांगी सोबत!"
"काय?"
"हो सर!"
"कधी?"
"याच्या कोर्ट हिअरिंगच्या वेळी!"
"नीट सविस्तर सांगा."
"सविस्तर आठवत नाही. मी द्युटीला होतो कोर्टाबाहेर आणि तेव्हा शुभांगीशी भेट झाली. हा पण होता सोबत."
"काही बोलणं झालं?" केदारने पाटीलला मेसेज टाईप करत विचारलं.
"फार काही नाही. म्हणजे निदान माझ्यासमोर तरी नाही. आम्ही ओळखीचे हसलो. 'कशी आहेस', 'खूप दिवसांनी....' वगैरे बोललो.... आणि हिअरिंग होती म्हणून ती निघून गेली."
"ओह्ह..... नेमका किती वेळ झाला असेल या भेटीला?"
"३-४ महिने साधारण!"
पाटील रुग्णवाहिका घेऊन पोचला. आणि त्याने प्रेताला उचलण्याकरता सोबत आणलेल्या माणसांना सुचना द्यायला सुरवात केली.
______________
"म्हात्रे, तुमचं निरीक्षण उत्तम आहे. केस डिटेल्स मिळाल्या सानिकाला. प्रेत अहमदचेच होते. वकिल बाईंचा.... म्हणजे शुभांगीचा अशील...."
"मला वाटतं सरं, मी केसचा अभ्यास करतो डिटेल मध्ये. मग अनेक गोष्टीहाताला लागतील."
"सानिकाने आधीच पुर्ण माहिती काढून ठेवलेली आहे. हॅव अ लूक!"
म्हात्रेने फाईल हातात घेतली आणि पाने चाळली.
"सर, दोघांच्या खूनामागे काहीतरी कनेक्शन आहे असा संशय होताच मला. पण आता खुनीही मिळाला." म्हात्रे आत्मविश्वासाने म्हणाला.
"कोण? निशा अगरवाल? रेप व्हिक्टम?"
"हो सर. त्याच रेप केसमुळे घडलंय हे सगळं."

"पण ती तर हॉस्पिटलमधून गायब झाली होती ना?" केदारने चहाचे गरम गरम घोट पोटात ढकलत विचारले.
"आणि सर तिचा फोटो मिसिंग आहे रेकॉर्ड्स मधून." सानिकाने NA लिहून रिपोर्ट फाईल बंद केली.
"सगळा शोध इथे येऊन संपतो थोडक्यात."
"असं का म्हणताय सर?"
"म्हात्रे, ना आपल्याला वेपन सापडलंय, ना मोटीव असलेली व्यक्ती! एव्हढ्या गर्दीत असताना खून झाला.... ते ही गनला सायलेंसर लाऊन. म्हणजे जबरदस्त प्रिप्लॅनिंग आहे. याही वेळी आपल्याला गोळी सापडलेली नाही. आता प्रेताजवळ आधीच अनेकजण उभी होती. किती जणांची चौकशी करणार तुम्ही?"
"सर, एक गोष्ट मला खटकते आहे."
"कोणती सानिका?"
"हॅव अ लूक ॲट हर बॅंक अकाउंट ट्रांझ्याक्षनस!"
केदारने हातात दिलेल्या प्रिंटवर नजर टाकली. म्हात्रेनेही केदार जवळ सरकून त्या पेपरवर डोळे स्थिरावले.
"शुभांगीच्या रेग्युलर फीजपेक्षा कैक पटीने जास्त आहे ही रक्कम." म्हात्रे उद्गारला.
"ह्या व्यतिरिक्त फी म्हणून तिच्या अकाउंटला काहीही जमा झालेले नाही. म्हणजे....."
"म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला सानिका मॅम? शुभांगीने या केसकरता जास्त पैसे चार्ज केले? ते पण दहापट?"
"इतकंच नाही म्हात्रे, ही रक्कम ज्या व्यक्तीने बॅंकेत जाऊन भरली तिने बुरखा घातला होता."
"पण ती व्यक्ती एक पुरुष होता..... हेच ना?" सानिकाचे वाक्य पुर्ण करत केदार म्हणाला.
"कसे ओळखलेत सर?" सानिकाने अचंबित होऊन विचारले.
"त्या cctv च्या फुटेज वरून! चाल पाहून कुणीही सहज सांगेल.... ओळख लपवायला पायघोळ पोषाख घातला पण बाकी चाल बदलायला विसरला तो...... अहमदला वाटलं त्याला कोणीच ओळखणार नाही."
"म्हणजे.....शुभांगीचा अशिल?"
"हो, म्हात्रे! रेप केस जिंकण्याकरता त्याने फी पेक्षा खूप जास्त रक्कम भरली..... तेही वेश बदलून!"
"इतकंच नाही सर, ही केस रेप व्हिक्टमच्या बाजूने स्ट्रॉंग होती. तरीही केस मात्र अहमद जिंकला..... शुभांगीमुळे. तिने सर्व पुरावे फिरवून दिले." सानिका म्हणाली तसा म्हात्रे गपकन खुर्चीवर बसला. चेहऱ्यावर धक्का लागल्याचे भाव स्पष्टपणे झळकत होते.
"म्हणूनच म्हणालो, म्हात्रे. इथे येऊन आपला शोध संपतो. त्या केस नंतर शुभांगीने एकही महत्त्वाची केस घेतलेली नव्हती. केवळ नोटरीची कामे केली असावीत. त्या दोघांचा लगोलग झालेला खूनही हेच सूचित करतो. म्हणून संशय केवळ अनुराधावर जातो, जी missing आहे. ना तिचा फोटो आहे आपल्याकडे, ना वर्णन करायला कोणी! तिचे नाव सोडले तर बाकी काही हाती नाही. आता आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. फक्त लॉजिक आहे. ज्यावर आपले सिनिअरस विश्वास ठेवणार नाहीत."
"सर, अनुराधा हॉस्पिटल मधून पळून गेली त्या नंतर तिची काहीच माहिती नाही. चौकशी करायला तिच्या घरच्यांचाही पत्ता नाही. अगदी मिसिंग म्हणूनही रिपोर्ट करायलाही कोणी आलं नाही." सानिकाने ३ महिन्यांआधीची जुनी फाईल काढली आणि एकदा चाळून जागेवर लावली.
"पाटील.... पाटिल...." केदारने हाक दिली तसा पाटील धावत आला.
"हा सर?"
"त्या तडकाला सोडून द्या."
"कुनाला सर?"
"अरे तो..... चोर! वकिलबाईंच्या पर्स मधून पैसे चोरताना ज्याला पकडला तो!"
"हा सर!"
____________
केदार खुर्चीवर येऊन टेबलावर डोकं टेकणार तोवर आतून तडकाचा आरडाओरडा ऐकू आला.
"पाटील, मारू नको त्याला. जाऊ देत." बसल्या जागेवरूनच केदारने जेलच्या खोलीपर्यंत आवाज जाईल अश्याप्रकारे ओरडून सांगितले.
"ओ सर, म्या न्हाय मारत त्याला. पन त्यो भाईर निघत न्हाईये."
'काय?' दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या केदारला खुर्चीतून उठणे म्हणजे मोठे जड काम वाटू लागले होते. पण वाढत्या आरडाओरड्याने डोकेदुखी नक्की होईल म्हणून केदार एकदाचा चिडून जागेवरून उठला.
"काय झालंय पाटिल?" त्याने तडकाच्या जेलच्या समोरील भिंतीला पाठ लावून उभे राहत असं म्हणायला आणि समोरचे चित्र पाहून हसू फुटायला एकच गाठ पडली.
पाटील तडकाला धरून बाहेर खेचत होता आणि तडका रेटा देत त्याच्यासकट पुन्हा मागे जात होता.
"हे काय चालू आहे?" हसू आवरत उसना राग आणून केदारने विचारले तेव्हा कुठे दोघांची कबड्डी थांबली.
"बघा ना साएब.... ह्ये बेन येतच न्हाय भाईर." पाटिलने तक्रारीचा सूर धरला.
केदारने आश्चर्याने विचारले, "काय रे तडका? मार आवडायला लागला की काय?"
"साब, चाहे तो मार बी खायेगा आपून.... लेकिन यहाँसे नई जाएगा!"
"तुला काय वेड बिड लागलंय का? जेल मधे का राहायचेय तुला?"
"साब, आपून नई जाएगा! बतारेलाए आपून!"
"पर मी तर म्हनतो याला घालवाच. जेलच खान हा असं हादडत्यो, जसा का 'बा'चाच माल हाय याच्या!"
"साब, आपून नई जाने वाला! इस बटाटेवडे को जितना बोलने का हैं, मारने का हैं, आपून सेएने के लिये रेडी हैं....." केदारने तडकाच्या काटकुळ्या, अगदीच हाडंकाडं उरलेल्या शरीरावर नजर टाकली.
"ये भूसनळ्या.... कुनाला बटाटेवडा बोलतो रे!" पाटिल चिडून त्याला फटकवणार त्याआधी केदारने विचारलेला प्रश्न पाटीलच्या कानाला टोचला.

"जर मी तुला माझ्या घरी काम दिलं तर? तरी इथेच राहायचंय तुला?"
तडकाने आश्चर्याने केदारकडे पाहिले.
"बघ! ऑफर काही वाईट नाहीये." केदारने हसून म्हटले.
"खाना मिलेगा?" तडकाने आशादायी डोळ्यांनी केदारकडे पाहत विचारलं.
"इथे मिळते त्याहून जास्त छान आणि अगदी पोटभर!"
"सच में?"
"हो. आणि तुला मारही खावा लागणार नाही."
"अच्छा?.... और सवाल भी नई पुछेगा आढेतेढे - बिना सिरपैरवाले?" उत्साहाने त्याने विचारले.
"नाही."
तडकाने पाटिलकडे बघून गाल वाकडा करून हसून दाखवले आणि स्वतःहूनच आनंदाने जेलमधून बाहेर आला.
"साहेब, ह्यो डोकेदुखी हायं बरं का!" पाटीलने जबाबदारी म्हणून त्याच्या मते, धोक्याची सूचना देऊन टाकली.
केदार नुसताच हसला आणि एकदाचा टेबलाजवळच्या खुर्चीवर येऊन बसला. काही क्षण त्याने टेबलावर डोके टेकवले. क्षणभर डुलकी लागली असेल त्याला. उठला तेव्हा समोर चहा घेऊन तडका उभा!
"चहा?"
"हा साब| इस टपरी का चाय वाला पैचानवाला निकला आपून का|"
केदारने तडकाला नजरेनेच चहा घेणार का विचारले.
"नै साब| आपून घर पे जाके पिएगा|" चहाचा पहिला घोट घेऊनच केदारला पुन्हा रिफ्रेश झाल्यासारखं झालं.
"साब, घर कब चलेगा आपून दोनो?" तडकाने उत्साही आवाजात डोळे किलकिले करत विचारले. तडका लहान मुलासारखा 'बाबा आपण घरी कधी जाणार?'असे विचारत आहे आणि आता काही वेळात आपण त्याला घेऊन घरी गेलो नाही तर तोच आपल्याला खांद्यावर घेऊन घरी नेईल, असा विरोधाभास केदारला झाला. आणि त्याला हसू आले.
"जाऊयात, जाऊयात. हा रिपोर्ट लिहितो आणि मग निघूच."
"साब, वो तो पुरा कर दियेलाए!"
केदारने आश्चर्याने पाने उलटून पाहिली. सही सोडून बाकी सगळे डिटेल्स भरून 'अनसोल्वड' चा शिक्काही मारून ठेवला होता.
"हे कोणी पुर्ण केलं?"
"बटाटावडे का काम है साब." तडकाने पाटिलच्या बाजूने इशारा केला.
"अरे, तो स्वतःच काम वेळेत पूर्ण करत नाही. आणि आज माझंही पूर्ण करून ठेवलं त्याने? कसंकाय?"
"वो क्या ए ना, आपूनने उसको एक सच बोल डाला|"
"काय सांगितलेस?"
"यईच की अगर उसको प्रोमोशन मंगता है, तो साब का काम भी करके रखने का होता है|"
केदारला काय बोलावे कळेना. मिश्किलपणे हसून त्याने सही केली आणि बॅग खांद्याला लावली.
___________
"अरे वाह, आज लवकर आलास!" मिनाक्षी हसून म्हणाली.
"हो. हे बघ सोबत कुणाला घेऊन आलोय!" त्याने तडकाकडे खूण केली आणि स्वतःचे बुट काढायला लेसची गाठ सोडवायला सुरवात केली.
"हे कोण आहेत?" तिने त्याच्या मळक्या अर्धवट फाटक्या कपड्यांकडे पाहत विचारले.
"तडका. आता आपल्याकडेच राहील. तुला मदत करायला घेऊन आलोय." तडका नाव ऐकून तिला हसू आलं.
"तडका? अर्थात तु आणलेस म्हणल्यावर पोलिस व्हेरिफिकेशन झालेच आहे." तिने तडकाकडे पाहिले. केदार बुट आणि सॉक्स काढून शू रॅक मध्ये ठेवून पाय धूवून आत गेला. तडका मात्र तसाच उभा होता. "ये, ये.... तू पण ये! चप्पल काढ आणि पाय धून ये. तिथे बादली आहे बघ."
"हा मेम!"
तडकाने चप्पल काढून रॅकच्या खाली ठेवली आणि बादलीतले पाणी मगाने पायावर ओतून घेतले. थंड पाण्याच्या स्पर्शाने तो क्षणभर शहारला.
"ये रे आत.... हे बघ घर मी रोज सकाळी झाडते, आता तू झाडत जा! चालेल ना? फर्निचर ओल्या कापड्याने फुसून घ्यायचे असते एकाडएक दिवसांनी. आणि किचन मध्ये आठवड्यातून एकदा डबे आतून बाहेरून साफ करून घेत जाऊयात. ठिक आहे?" मिनाक्षी तडकाला आनंदाने घर दाखवत आणि कसं साफ करायचं याची गाथा ऐकवत होती. तडकाही घर उत्साहाने पाहत होता. तिच्या प्रत्येक प्रश्नावर नंदी बैलासारखी मान डोलवत होता.
"बाहेर सोसायटी वॉचमनसाठी ठेवलेली खोली रिकामी आहे ना? काही दिवसांत याची तिकडे व्यवस्था लावतो."
"हो, पण आत्ता दोघे जेवून घ्या."
"तडका, तिला स्वयंपाक स्वतःला करायला आवडतो हा. त्यात तिला मदत केलेली चालते, पण दुसऱ्या कोणी स्वयंपाक केलेला आणि वाढलेला खपवून घेत नाही हं ती."
तडकाने हसत मुखाने सगळं काही समजल्यासारखी होकारार्थी मान हलवली.
मिनाक्षीने ताटं वाढली. त्या खमंग वासाने आणि पूर्णांन्नाने भरलेल्या थाळीकडे पाहून तडकाच्या चेहऱ्यावर स्वर्गसुख मिळाल्यासारखा आनंद पसरला होता.
__________
"म्हात्रे, तुम्हाला सांगितले ना मी..... ती केस संपली आहे आता. सतत मला कॉल करून ती रिओपन करायला सांगून काय फायदा आहे? एक काम करू. तुमच्याच हातात देतो ही केस रिपोर्टओपन करून.... घ्या काय शोध घ्यायचाय तो! पण मी पुन्हा माझ्या टीमला अश्या डेडएंड केस मध्ये इंवॉल्व करणार नाहीये." केदारने कॉल डिस्कनेक्ट केला.
"साब.... साब.... ये देखो आपून को क्या मिला|"
एका हातात मळकट फडक आणि दुसऱ्या हातात काही कागदपत्र घेऊन तडका उभा होता.
"ये कचरा है की कामकाज का है समझ नै आरेलाए आपून को| क्या करनेका इसका? फेकने का के रखने का?"
केदारने त्यावर नजर टाकली. रिपोर्ट पेपर्सवर अनुराधाचे नाव वाचून त्याला क्षणभर कसंतरीच वाटलं. त्या जखमा..... तो त्रागा..... तो त्रास.... ती आर्त किंकाळी..... ते हृदयद्रावक रडणं..... त्याच्या डोळ्यांपुढे तो ४ महिन्यांआधीचा काळ उभा राहिला. अनुराधाचे जखमी शरीर, किंबहुना केवळ लक्तरे वाटावीत, अश्या स्थितीतला तो देह! आणि तो पाहून बघणाऱ्याच्या मनात धगधगणारा ज्वालामुखी! डॉक्टरांनी प्रयत्न करून तिला जीवन दिलं; पण बघणाऱ्याला ती मृतच भासत होती..... तिला काय माहित होते, दुर्दैव तिथेच संपणार नव्हते! कोर्टातही पुन्हा पुन्हा तिच्यावर शाब्दिक बलात्कार होत राहिले. लक्तरे होत राहिली.... बातमी ऐकून घरच्यांनी नाते तोडले..... 'चारित्र्य भंग केलेस ते केलेस, वर कोर्टात जायची काय गरज होती? अब्रू वेशीवर तांत्रिकगलीस घराण्याची...' असे शब्द साक्षात घरच्यांकडून आले आणि एकही आसरा उरला नाही. जखमांनी ग्रासलेली ती..... हॉस्पिटलच्या टेरेसवर उभी होती! दोलायमान! तिला अंग झोकून द्यायचं होतं..... एक पाय तिने टाकलाच होता पुढे. तिला अडवले नसते तर लोकांनी 'खोटी केस केल्याचे सिद्ध झाल्याने आत्महत्या' म्हणून त्याची ब्रेकिंग न्यूज करायला मागे पुढे पाहिले नसते. तिच्याबद्दल कळले नसते आणि धावत तिला बघायला गेलो नसतो तर अगदी तेच होणार होते.
तिच्या तोंडून तिचा भूतकाळ ऐकताना अक्षरश: पाणी भरलं होतं डोळ्यांत. सगळ्यांचाच राग आला होता. त्या अहमदचा, त्या वकिलबाईचा, तिच्या घरच्यांचा......! शाळेत असताना कायम मॉडर्न फॅमिलीतली म्हणून जिला सगळे चिडवायचे, तिचे घरच्यांचे मुखवटे टराटरा फाडले होते तिने माझ्यासमोर!
पण या सगळ्यात एक वाक्य पटलं होतं. खरतरं मलाही पडलेला प्रश्न होता तो! 'कोर्टात जायची काय गरज?' तसही, 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' म्हणतात.
आणि जर वकिलिणबाई पुरावे मिटवू-फिरवू शकतात, तर एक क्राईमब्रांचवाल्याला काय अवघड होते? पोलिस रेकॉर्ड मधून अनुराधाचा फोटो ते घटनास्थळावरून पिस्तूलातून सुटलेली गोळी गायब करणे तसे फार अवघड नव्हते.
पण बलात्कारी केवळ अहमद कुठे होता? शुभांगी नव्हती? त्या विकृतीला मदत करणारी, बलात्कारी व्यक्तीला कायद्याच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन वाचवणारी. ते दोघेही नष्ट झाले तर ना देशाचे नुकसान होते, ना मानवतेचे! हं.... कायद्याचे झाले असेलही, पण अपवाद प्रत्येक नियमाला असतो की! आणि न्यायाच्या आड येणाऱ्या प्रत्येक नियमाला अपवाद आहे मी.
तशी ही जास्त मोठी रिस्क नव्हती. शेवटी गोळी गायब करायला का होईना, सर्वात आधी मीच पोचणार होते तिथे! अहमदच्या वेळी म्हात्रे आधी पोचला तेव्हा क्षणभर बंदूकीची गोळी त्याला मिळाली असेल की काय अशी भिती वाटली. पण त्याच्याच समोर मी गोळी उचलून खिशात घातली, ते म्हात्रेला समजलेही नाही!!
मी अनुराधाकरता पहिल्यांदा कायदा मोडला होता..... मोडावा लागला! हॉस्पिटल तिच्याकरता सुरक्षित वाटतं नव्हतं. पण तिला तिथून न्यायचे कुठे? मग विचार आला, माझ्या घरापेक्षा दुसरं काय सुरक्षित आहे तिच्याकरता? ओळख आणि सगळ्या आठवणी घेऊन जगणं कठीण होतं. शेवटी....'
"टिचिक..... टिचिक" तडकाने चुटकी वाजवली.
"साब, क्या करने काए इसका?"
केदार भूतकाळातून बाहेर आला. त्याने पुन्हा कागदपत्रांकडे पाहिले.
"जाळून टाक."
"शेकोटी बनानेका है? पर साब, अभी तो उन्हाला चलरेलाए ना?"
"तरीही.... जाळून टाक."
"आपून ले जाएगा तो चलेगा क्या साब? हिवाला मे इसको शेकोटीमें जलाएगा|"
"त्याकरता मी दुसरे कागद देईन.... पण हे आत्ताच जाळ. नाहीतर दे मला, मी जाळतो....." केदार उठू लागला.
"अरे बेठो साब. जलाताए ना आपून. तूम बैठो!"
तडकाने बाहेर नेऊन कागदांचा तो गठ्ठा जमिनीवर ठेवून त्यावर माचिसबॉक्सच्या कडेच्या भागावर खर्रकन घासून जळकी काडी टाकून दिली.
मिनाक्षीच्या नजरेला हे पडायला नको होते. पुन्हा जुन्या आठवणी नकोत म्हणून बदललेले नाव आणि ओळख शाबूत राहण्याकरता हे गरजेचे नाही का?
केदारने टिव्ही वर बातम्या लावल्या. मिनाक्षीसुद्धा समोर येऊन बसली.
'बनगार्डनजवळ भर गर्दीच्या रस्त्यावर एका मुस्लिम होतकरू तरुणाचा झालेला खून हे हिंदू पुरोगामी लोकांचे कृत्य असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या व्यक्तीचे नाव अहमद असून त्याच्या बरोबर कपाळावर निशाणा साधला गेला होता. on the spot त्याचा मृत्यू झालेला आहे.'
मिनाक्षीने 'आ' वासला होता. केदारने मिनाक्षीकडे डोळ्यांच्या कडांनी पाहिले. मिनाक्षीच्या डोळ्यांत सारे भाव दाटून आले होते. एक वेगळंच समाधान पसरलं होतं. डोळ्यांतून काही थेंब घरंगळले.
"केदार..... हाच..... तो....तोच हा...."
केदारने तिच्याकडे नुसतेच पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो टिपून घेत होता.
"काय गं? काय झालं?" सगळ्यापासून अनभिज्ञ असल्यासारखं केदारने विचारलं.
"काही नाही." तिने डोळ्यांतले पाणी पुसले.
'मला माहितीये, केदार, तुला मला जुन्या आठवणी आणि अगदी जुन्या नावापासूनही दूर ठेवायचे आहे. म्हणून मी दुर्लक्ष करत होते स्वतःच्या जखमांकडे. पण खऱ्या अर्थाने आत्ता त्यावर खपली चढलीये, केदार!' केदारकडे बघताना तिच्या मनात सारं उमटून गेलं. जखडून ठेवलेल्या व्यक्तीचे साखळदंड तुटावेत तसे तिला आता भूतकाळाच्या पाशातून सुटल्यासारखे मोकळे वाटू लागले होते. ती किचनकडे निघाली.
"काय गं, कुठे चाललीस?"
"बासुंदी बनवायला." तिने आनंदाने ओरडून सांगितले.
"अगं पण आत्ताच जेवण झालं ना?"
"म्हणूनच स्विट डिश करतेय!" तिने किचन मधूनच ओरडून सांगितलं.

केदार सोफ्यावर आरामात बातम्या बघत बसला होता. पत्रकारांचे अनाकलनिय तर्क-वितर्क ऐकून त्याला हसू येत होतं.
तडका कागद जाळून घरात आला आणि उरलेली साफसफाई करू लागला. त्याला जराही कल्पना नव्हती की त्याच्याही नकळत त्याने शेवटचा पुरावासुद्धा साफ करून टाकला होता.
______________

©मधुरा

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

31 Oct 2019 - 11:42 pm | कानडाऊ योगेशु

सुरवातीला कथेने खिळवुन ठेवले पण नंतर निराशा केली. अर्थात तुमची लेखनशैली छान आहे त्यामुळे कथा वाचनीय झाली आहे. कथेतील तडका ह्या पात्राचे प्रयोजन समजले नाही. म्हणजे शेवटपर्यंत असे वाटत होते कि तडका मुळे कथेला काही कलाटणी मिळेल असे.

मृणालिनी's picture

1 Nov 2019 - 7:15 am | मृणालिनी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :)

तडकाबद्दल तुम्ही लिहिलात तो मुद्दा अजून एका वाचकाने माझ्या पर्यंत पोचवला होता. त्यामुळे त्याबद्दल नक्की विचार करेन पुढची कथा/याचे पुढचे भाग लिहिताना. :)

अर्धवटराव's picture

1 Nov 2019 - 9:03 am | अर्धवटराव

सस्पेन्स चांगलं होतं. तडकाचा तडका सुद्धा पर्फेक्ट... इंडायरेक्टली केदारचं माणुसपण अधोरेखीत करणारं.

मृणालिनी's picture

1 Nov 2019 - 9:36 am | मृणालिनी

मनापासून धन्यवाद! :) :) :)

कथा छान. पात्रांच्या तोंडची भाषा विशेष भावली.

फक्त रेप व्हिक्टीम निशा की अनुराधा ते थोडे बघा.

मृणालिनी's picture

1 Nov 2019 - 11:15 am | मृणालिनी

धन्यवाद! :)

नाव अनुराधाच हवे होते. पण कथा वेगवेगळ्या वेळी लिहून पुर्ण केल्याने नाव वेगळे लिहिले गेले. Sry 4 that!

शित्रेउमेश's picture

8 Nov 2019 - 2:15 pm | शित्रेउमेश

अप्रतिम....

मृणालिनी's picture

13 Nov 2019 - 10:49 am | मृणालिनी

धन्यवाद ! :)

नाखु's picture

8 Nov 2019 - 2:43 pm | नाखु

आणि एखादी लघु चित्रपट बनू शकेल इतकी सशक्त कथानक आहे।

पु ले शु

मृणालिनी's picture

13 Nov 2019 - 10:49 am | मृणालिनी

मनापासून धन्यवाद! :)

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 2:43 pm | श्वेता२४

छान लिहीली आहे.

मृणालिनी's picture

13 Nov 2019 - 10:50 am | मृणालिनी

धन्यवाद श्वेता!

कविता१९७८'s picture

10 Nov 2019 - 11:56 pm | कविता१९७८

छानच, मला संशय तडकावर होता पण ट्वीस्ट मस्तच

मृणालिनी's picture

13 Nov 2019 - 10:50 am | मृणालिनी

धन्यवाद कविता :)