बनाबाई..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
31 Oct 2019 - 5:57 pm

बनाबाई आमच्याकडे कधीपासून काम करते ते कोणीच नक्की सांगू शकणार नाही. मी तान्हा असताना माझे तेलपाणी तिनेच केले आहे. आणि त्याही आधीपासून ती आमच्याकडे आहे. म्हणजे साधारण पस्तीस-छत्तीस वर्ष झाले असतील. बनाबाई आज ऐंशीच्या पुढेमागे असेल. पाठीच्या कण्याला नैसर्गिक बाक आला आहे. हालचाली मंदावल्या आहे. पण अजूनही आमच्यासकट गल्लीतल्या ८-१० घरात काम करते. तिला कुठे-कुठे काम करते हे विचारल्यावर ती सांगेल, "दोन गुजरात्याचे घर हायेत, एक मारवाड्याचं हाय..मंग डॉक्टरींन बाईच्या घरी जातो. अन समोर जोशी बाईचं घर हाय तिथं पन जातो.."

इतक्या वर्षात ह्या प्रत्येक घरात कितीतरी बदल घडलेत. बहुतांश घरातली पहिली पिढी देवाघरी गेली, दुसरी पिढी निवृत्त झाली, अन तिसरी पिढी पंख फुटल्यावर घरट्याबाहेर उडाली. पण बनाबाई अजूनही होती तिथेच आहे. अर्थात तिच्याही आयुष्यात बदल घडलेच पण परिस्थिती बदलली नाही. मला फारसे तपशील माहिती नाही पण तिच्या मुलाबाळांच काही फार बरं चालल्याचे ऐकण्यात नाही. आजही बनाबाई घरातली कर्ती स्त्री आहे. आमच्या उण्यापुऱ्या तीस-बत्तीस वर्षांच्या आयुष्यात खूप उन्हाळे-पावसाळे बघितल्याचा आव आम्ही आणतो. पण आम्ही सगळे उन्हाळे-पावसाळे घराच्या खिडकीतूनच पाहिलेत हे बनाबाईकडे बघून लक्षात येते.
तिच्याकडच्या उन्हाळा पायाला चटके देऊन जातो. अन पावसाळा घरातली चूल बुडवून जातो. मला समजायला लागल्यापासून बनाबाईचा नवरा हे संस्थान अंथरुणाला खिळलेले होते. त्यातच कधीतरी ते संस्थान खालसा झाले. आधी नवरा अन मग मुलींचे संसारही बनाबाईनेच सांभाळले.

लहानपणी बनाबाई आमच्यासाठी चेष्टेचा विषय होता. तिचे गावरान बोलणे, वागणे बघून आम्हाला खूप हसू यायचं. तिचे वेळेवर न येणे, दांडी मारणे मग आईचे तिच्यावर चिडणे हे सगळं मी जवळून बघितलं आहे. याहीपेक्षा जास्त हास्यास्पद होती ती म्हणजे बनाबाईची एक विशिष्ट सवय, बनाबाईला काम करत असताना स्वत:शी बडबडायची सवय आहे.तेंव्हा आसपास कोणी आहे की नाही ह्याचे तिला भान नसते. आणि असले तरी तिचे बोलणे ऐकले तरी तिला काही फरक पडत नाही. लहानपणी मजा वाटत असली तरी आज कळतंय की तो बडबडीचा वेळ म्हणजे तिचा me time असतो. तेवढ्या वेळात तिचे सुख-दु:ख ती कोणाशीतरी वाटून घेत असावी. आणि ते करताना तिला फीलिंग लोनली किंवा फीलिंग हॅपी म्हणून कोणाला टॅग करावे लागत नाही. आताशा तिची बडबड सुरु असताना मी तिथून निघून जातो. ते तिच्या लक्षातही येत नसावे. पण आपल्या उगीचच "लेट अस गिव्ह हर सम स्पेस" वाल्या कल्पना मी तिथे राबवतो. आणि का कोण जाणे पण बनाबाईला सामोरे जाताना मला आजकाल खूप अपराधी वाटते. आपण शिकलो, कमावते झालो, संसारी झालो पण बनाबाई तिथेच आहे ह्यात कुठेतरी मला स्वतःचा दोष दिसतो. आणि हे जाणवत असूनही तिच्यासाठी काहीही करायला मी धजावत नाही ह्याचेही वाईट वाटते. बनाबाई खूप प्रामाणिक आहे असेही नाही. काम टाळणे, जास्तीच्या सुट्ट्या घेणे, जास्तीच्या पैशे मागणे ह्या सवयी तिलाही आहेतच. पण ज्या पराकोटीची गरिबी तिने अनुभवली आहे त्यासाठीचा हा बॅलंसींग ऍक्ट असावा.

आज बनाबाईविषयी लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच तिचा आईशी झालेला एक संवाद..
२१ ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान होते. त्यादिवशी बनाबाई कामावर जरा उशीरा आली.
आईने विचारले,
"काय बनाबाई, उशीर झाला आज.."
"हाव ना"
"काय झालं?"
"मतदानाले गेल्ती ना बाई..तिकून इकडं आली"
"असं का ! कोणाला दिलं मत?"
"XXXXXX ले देल्लं.. बाई उभी हाये ना त्याईच्याकडून.. नवरा गेला बिचारीचा.. एकली हाय..तिलेच देल्लं मग"

बनाबाईला लोकसभा,विधानसभा, महानगरपालिका ह्यातला फरक कळतो का हे मला माहिती नाही. तिला हा फरक कळून काही फरक पडला असता का हे ही मला माहिती नाही. विकास वगैरे शब्द तिच्या वाटेला कधी जात नाहीत. आजपर्यंत तिने सगळ्या पक्षांचे सरकार बघितले. कोणत्याही सरकारने तिचं भलं केलं नाही. आता ज्या स्त्रीला तिने मत दिलंय तीसुद्धा निवडून आल्यावर तिच्याकडे ढुंकून पाहिलंच ह्याची शाश्वती नाही. पण दोघींमधला असलेला एकमेव सामान धागा म्हणजे दोघींच्याही वाट्याला असलेलं वैधव्य ! केवळ या एका मुद्द्यावर बनाबाईने त्या स्त्रीशी स्वतः ला रिलेट केले. कदाचित आपलं नाही पण त्या स्त्रीचे तरी भलं होईल असा त्यामागचा विचार असावा.सर्वसामान्य जनता किती निरपेक्ष वृत्तीने पण तरी एका वेड्या आशेने मतदान करत असते ह्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

बाकी राम मंदिर,३७०,विकास, लोकशाही,इव्हीएम वगैरे मुद्दे तुमच्याआमच्यासारख्या शहाण्यांसाठी आहेत!

-- चिनार

व्यक्तिचित्रअनुभव

प्रतिक्रिया

खरय.
जगन्नाथाच्या गाड्याला लागणारे जितके हात त्यापेक्षा जास्त त्यांच्या हस्तरेषा...
व्यक्तीचित्रण अवडलं.