या आधीचे भाग
सायकल दौरा पूर्वेचा घाट - का कसा कुठे?
सायकल दौरा - पूर्वेचा घाट असा घातला घाट १,
२, आणि ३
अराकु
डोंगरांच्या मधे वसलेले छोटेस शहर, आंध्र प्रदेशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, आंध्र आणि तेलंगाणा भागातले महत्वाचे हिल स्टेशन अराकुची अशी कितीतरी ओळख देता येईल. माझ्या काही मित्रांच्या मते अराकुमधे गर्दी वाढली आहे पण मला तरी अराकु म्हणजे दहा वर्षापूर्वीचे कुर्ग वाटले. विशाखापट्टणमपासून अराकु साधारण १२० किमी अंतरावर आहे. आता एक काचेचे छत असणारी रेल्वे सुद्धा अराकुला जाण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. कुठल्याही हिल स्टेशनला सापडतात तशा जागा अराकुला सुद्धा आहेत म्हणजे वेगवेगळे धबधबे, बोरा लेणी, व्ह्यू पॉइंट. कॉफिचे मळे सुद्धा खूप आहेत. अराकु कॉफिचे मार्केटींग करण्याचा प्रयत्न होत आहे तसे एक कॉफि म्युझियम इथे आहे. या भागातील आदिवासीं. त्यांची संस्कृती याविषयी माहिती देणारे म्युझियम सुद्धा आहे. अशा जागांना मराठीतील वस्तु संग्रहालय हा शब्द योग्य वाटत नाही त्याला आदिवासी संस्कृती दर्शन म्हणता येईल. इथले पुतळे फार जिवंत वाटत होते. आत फोटो काढायला परवानगी नव्हती. बाहेरच्या पुतळ्यांचे फोटो घेता येत होते. अराकुला काही लोक ट्रेकींगसाठी सुद्धा येतात. अर्माकोंडा (१६८०मी) आणि जिंदागड (१६९०मी) हि पूर्वेच्या घाटातले उंच शिखरे अराकुपासून जवळच आहे. आम्ही अराकुला राज्य सरकारच्या हरिता रिसोर्ट मधे थांबले होतो. सरकारी रिसोर्ट असल्याने जागा अगदी मोक्याची होती. सरकारी असूनही रिसोर्टची व्यवस्था फार छान ठेवण्यात आली होती. तिथले कर्मचारी मदतीसाठी तत्पर होते.
ओरीसा सीमा
अराकुला दोन रात्र मुक्काम होता त्यामुळे सारेच आरामात होते. तसाही आदल्या दिवशीचा हँगओव्हर होता. आदल्या दिवशी खूप चर्चा झाली. अशा चर्चात कालहत्ती घाट हा येतोच. विषयाला सीमा नव्हती. सायकलींग संबधित दोन महत्वाच्या चर्चा म्हणजे मागच्या गियरचे किती दात असावेत ११-२८ कि ११-३२. मला तरी वाटते ११-३२ अधिक योग्य आहेत. माझ्या सायकलला ११-२५ आहेत. त्यामुळे चढ चढताना जास्त जोर लावावा लागतो. शहरात मी २५ दाताचा गियर फार वापरत नाही. दुसरी गोष्ट मला नेहमी संभ्रमात टाकते ती म्हणजे क्लिट वापरव्या कि नाही. मी गेल्या चार वर्षात कधीही क्लिट वापरल्या नाहीत. काहींच्या क्लिट फसल्या तरी मंडळींचे हेच म्हणणे होते कि क्लिटमुळे फायदा होतो. अजूनही क्लिटच्या वापराबाबत माझा संभ्रम कायम आहे.
नाष्टा वगैरे करुन सारे तयार होत पर्यंत साडेनऊ वाजले होते. जोरात पावसाला सुरवात झाली. राइड करताना पाऊस येणे वेगळे आणि पावसात राइड सुरु करणे वेगळे. पावसात राईड सुरु करण्याची हिंमत होत नाही. पाऊस थांबल्यावर राइ़डला सुरवात करेपर्यंत साडेदहा वाजले होते. हॉटेलच्या बाहेर निघताच पावसाला सुरवात झाली. काहींनी आराम करायचे ठरविले. रिसोर्टपासून बारा किमी अंतरावर आंध्रप्रदेशाची सीमा संपली आणि ओरीसा सुरु झाले. चटुआ हे सीमेवरील पहिले गाव. आता कोरापुट, जापोर (Jaypore) अशा पाट्या दिसायला लागल्या. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या, १९९८ मधे मी कोरापुटला नागपूर-रायपूर-जगदलपूर-जोपोर असा प्रवास करुन आलो होतो. मध्य प्रदेशातील निवडणुकांमुळे फार मजेदार आणि रोमहर्षक प्रवास झाला होता. आता हळूहळू संस्कृती बदलायला लागली होती. तेलगु मागे पडून उडीया भाषा कानावर पडायला लागली होती. काही अंतरानंतर जोलापुट रिझर्व्हायर पासून येणाऱ्या बॅकवाटरचा प्रवाह दिसायला लागला. तो प्रवाह त्यादिवशी संपूर्ण प्रवासात सोबत होता. हल्ली डोळ्यांपेक्षा माबाईलचा कॅमेराच जास्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असतो. माझ्या कॅमेऱ्याने सुद्धा आपला हक्क सोडला नाही. त्या दिवशी ओरीसात लंच घेतले. काही मित्रांना ओरीसात आलो आहोत तर रोशोगुल्ला खायची इच्छा झाला होती म्हणून मग लंच केल्यानंतर मिठाईचे दुकान शोधले. सर्वांनीच मिठाईवर ताव मारला. आंध्रमधला खाजा, ओरीसातला रसगुल्ला दोन्ही खाल्ले आणि नेहमीचा सोबती चहा झाला. अगदी शांत, सुंदर आणि निवांत अशी ६६ किमीची राइड कशी संपली ते कळलेच नाही. संध्याकाळी म्युझियम मधे भटकंती केली, वेगवेगळ्या अराकु कॉफीचा आस्वाद घेतला. चौथा दिवस संपला.
गालीकोंडा अनंतगिरी
गाली म्हणजे हवा किंवा वारा आणि कोंडा म्हणजे किल्ला किंवा दुर्ग, जोऱ्याचे वारे येणारा किल्ला म्हणून गालीकोंडा. अनंतगिरीच्या डोंगरातील पूर्वेच्या घाटातले दुसरे उंच शिखर म्हणजे गालीकोंडा. सायकल दौऱ्याचा शेवटला दिवस उजाडला. आता हे संपणार म्हणून सारेच थोडेसे भावुक झाले होते. अराकु ते विशाखपटणम हा १२४ किमीचा सायकल दौऱ्याचा अंतीम टप्पा होता. सुरवातीला एक सहा किमी साडेचार ते पाच टक्के ग्रेडीयंटचा चढ होता. हा चढ चढले कि अनंतगिरीला पोहचणार होतो. काही मंडळी अनंतगिरीला उतरुन परत दुसऱ्या बाजूने अनंतगिरी चढणार होती. चढ असल्या कारणाने सकाळी नाष्टा करुन निघायचे ठरले त्याप्रमाणे रिसोर्टवाल्यांना विनंती केली. त्यांनी सकाळी साडेसहा वाजता उपमा आणि ब्रेड जॅम असा नाष्टा दिला. नाष्टा करुन साडेसात वाजता आम्ही निघालो. रिसोर्टपासून पाच किमी जात नाही तर चढ सुरु झाला. आता अनुभव गाठीशी होता. तेंव्हा न थांबता शांतपणे मी चढ चढून गेलो. वेग साधारण दहाच्या आसपास होता तेंव्हा सायकल चालवतानाच पाणी पिलो. अंगाला आलेला घाम हा त्रास सोडला तर त्यादिवशी फार काही त्रास झाला नाही. अनंतगिरी असे बोर्ड दिसले, हरिताचे अनंतगिरी रिसोर्ट दिसले थोड्यावेळात गालीकोंडीची पाटी दिसली. मी काही वेळ थांबलो फोटो घेतले.
इथे मी लांब श्वास घेउन स्वतःला शांत केले कारण इथून पुढे सुरु होणार होता पंचवीस किमीचा जीवघेणा उतार. दर शंभर मीटरनंतर हेअर पिन बेंड, एकामागे एक असे हेअर पिन बेंड येत होते. काही वेळेस शंभर मीटरच्या आतच हेअर पिन बेंड येत होते. अशा वळणावर डाव्या बाजूला वळण घेताना मी डावा पाय वर करुन उजव्या पायावर भार देत वळण घेत होतो. सारे माहित होते तरी खूप भिती वाटत होती. ब्रेकवर नियंत्रण राखता यावे म्हणून मी ड्रॉपवर होतो पण ड्रॉपची फार सवय नसल्याने मान दुखायला लागली, पंपिंगसारखे जरी ब्रेक मारायचे असले तरी बोटे दुखुन आली होती. माकडांचा खूप त्रास होता, मी दुसरे वाहन माकडांच्या मधून जायची वाट बघायचो आणि नंतर मी जात होतो. रहदारी पण खूप वाढली होती. कधी एकदाचा खाली उतरतो असे झाले होते. उतार होता, पाउस सुरु होता, गॉगलमुळे फारच कमी दिसत होते म्हणून मग मी गॉगल काढून ठेवला. पंचवीस किमीच्या उतारात मी चार ब्रेक घेतले. रहदारी पण खूप वाढली होती. कधी एकदाचा हा उतार संपतो असे झाले होते. घाट संपायची वाट बघत होतो. मी सर्वात मागे होतो त्यामुळे रस्त्यात कुठेतरी खाली उतरुन घाट चढणारी मंडळी दिसेल असे वाटत होते पण कोणी दिसले नाही. शेवटी एकदाचा घाट संपला त्यानंतर सपाट मार्गावरचा प्रवास सुरु झाला .
ताडीपुडी रिझर्व्हायर, विजयनगरम, भिमली बीच, विशाखापटणम असा मार्ग ठरला होता. काही अंतराने ताडीपुडी रिझर्व्हायर असा बोर्ड दिसला तिथे वळायचे होते. मी त्या चौकात वळणार तर तिथे टपरीवर बसलेल्या रायडर्सनी आवाज दिला. तिथे चहा घेताना कळले आमच्यातल्या एका रायडरला उतारावर अपघात झाला. मला वाटणारी उताराची भिती खरी ठरली. त्याला अॅम्बुलंस बोलावुन दवाखान्यात नेण्यात आले होते. सर्वच चिंतेत होते. फक्त साठ किमी अंतर उरले होते. मला आठवले रस्त्यात रिक्षावाले मला काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते पण तेलगु न समजल्यामुळे मला कळले नाही. तसेच मंडळी उलट्या बाजूने घाट का चढली नाही तेही लक्षात आले. कार आता अॅम्बुलंसच्या मागे गेल्याने सपोर्ट कमी झाला होता. तेंव्हा रस्ता बदलायचे ठरले. भिमली बिचवरुन न जाता सरळ हायवेनी विशाखापट्टणमला जायचा निर्णय झाला. हायवे, पाऊस आणि मधे मधे गावे असा काहीसा कंटाळवाणा प्रवास सुरु झाला. रस्त्यात आमची कार दिसली अपघात झालेला रायडर आता सुखरुप होता. त्याला झालेल्या जखमा किरकोळ नसल्या तरी जिवघेण्या नव्हत्या. साधारण महिनाभर तो राइड करु शकनार नव्हता. जीव भांड्यात पडला, खूप हायसे वाटले. विशाखपटणमपासून पंचवीस किमी आधी एका हॉटेलमधे जेवण केले. त्याला मेनु विचारला तर त्याने सांगितले पराटा किंना रोटी. भाजी? मग समजले की तिथे दोन रोटी किंवा दोन पराट्यासोबत आलुची भाजी मिळत होती. नेहमीची दोशाची भाजी आहे की काय अशी मला शंका आली. काय जेवण होते. आंध्रा पद्धतीची अंडाकरी, आलुची रस्सा भाजी आणि तो केरला पराटा. वाह. हा पराटा कायम लक्षात राहिल.
विशाखापट्टणम
जेवण झाल्यावर राइड करायला सुरवात केली तसे विशाखापट्टणम २५ किमी असे बोर्ड दिसायला लागले. आमच्या मुक्कामाचे ठिकाण पस्तीस किमी दूर होते. शहराची सुरवात झाली होती, दुकानं, गर्दी दिसायला लागली होती. विशाखापट्टणम बंगालच्या उपसागराच्या किनारी उंच टेकड्यांच्या मधे वसलेले एक सुंदर शहर. आंध्र प्रदेशच्या आर्थिक राजधानीत तुमचे स्वागत आहे असे बोर्ड जागोजागी लावले होते. विशाखापट्टणम हे भारतीय नौदलाचे अतिशय महत्वाचे केंद्र आहे. तसेच भारतातील फार माठे बंदर सुद्धा आहे. त्याचमुळे भारताच्या आंतराष्ट्रीय व्यापाराचे फार मोठे केंद्र आहे. दक्षिणेतील इतर शहरांप्रमाणे इथे सुद्धा सुंदर प्राचीन मंदिरे आहेत. सिंहाचलम हे असेच प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही सिंहाचलम रोडनी सायकलींग करीत आरके बीच कडे चाललो होतो. सपाट आणि सुंदर रस्ता, माझ्या सोबतचे सायकल स्वार सुटले होते. तीस ते पस्तीसच्या सरासरी वेगाने सायकलींग करीत होते. पावसामुळे माझ्या सायकलचा टॉप गियर पडत नव्हता त्यामुळे वेग वाढत नव्हता. काही दुःख नव्हते कसलाही त्रास नव्हता सायकलींग करायला खूप मजा येत होती. समुद्रकिनारी बसलेले शहर असल्याने साधारणतः घाम येतो. नुकताच पाऊस झाल्याने अजिबात घाम नव्हता. आर के बीच दिसला, सारे एका ठिकाणी जमलो. भद्राचलमला गोदावरीच्या तीरावर सुरु झालेली हि सायकल यात्रा विशाखापट्टणमला समुद्रकिनारी संपली.
सहा दिवस ( पाच दिवस सायकलींगचे आणि एक दिवस भद्राचलमचा) कसे गेले ते कळले नाही. त्रास, वेदना, निसर्गसौदर्य, मजा, मौज आणि मस्ती सार काही या पाच दिवसात टॉप गियरला होत. या प्रवासाने काय दिले, किंवा यातून काय शिकलो वगैरे विचार करायला वेळ नव्हता. मला घाटात संघर्ष करावा लागला. मी घाट चढलो हे समाधान असले तरी फार मोठे तीर वगैरे मारले असे काही नाही. माझ्यापुरता मी मस्तीत होतो. आयुष्यभर लक्षात राहिल असा अनुभव मात्र जमा केला. अनुभवातून लगेच शिकता येत नाही तसे असते तर अनुभवाचेही वर्ग निघाले असते. अनुभव गाठीशी जमा करायचा असतो. तो कधी, कुठे आणि कसा कामात येइल सांगता येत नाही. मीही असाच संस्मरणीय अनुभव गाठीशी बांधला होता. कायमचा!!
प्रतिक्रिया
19 Oct 2019 - 11:02 am | यशोधरा
एकदम भारी प्रवास झाला की!
शब्दांकन आवडले.
19 Oct 2019 - 11:41 am | जेम्स वांड
तुमच्या फोटोंनी बहार आणली राव! शब्दातीत प्रवासात आम्हाला सामील करून घेतल्यामुळे तुमचे आभार मानावे तितके कमीच म्हणतो. पुढील राईड्स करता खूप खूप शुभेच्छा.

19 Oct 2019 - 5:12 pm | सुधीर कांदळकर
अंतिम हा शब्द वगळता सारे आवडले. ओडिसी लिपी पाहून आमच्या ओरिसाच्या आठवणी जाग्या झाल्या.
आंध्र-तेलंगण बद्दल काहीच ठाऊक नव्हते. लामणसिंगी आणि गालीकोंडा खास आवडली.
हौशी असून मस्त सफर झाली.
ओरिसातली छेना की मिठाई चुकली वाटते.
असेच प्रवास करा आणि इथे लिहा.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
19 Oct 2019 - 9:57 pm | जेम्स वांड
ओडिसी लिपी का उडिया लिपी म्हणायचे हो?
19 Oct 2019 - 10:55 pm | गोंधळी
सायकल दौर्यांचे अनुभव वाचुन आपणही एकदा सायकलवरुन दौरा करावा असे वाटत आहे.
20 Oct 2019 - 11:18 am | मित्रहो
धन्यवाद यशोधरा, जेम्स बांड, सुधीर कांदळकर आणि गोंधळी.
अंतिम असे हवे. संपादक मंडळ दुरुस्ती करु शकत असेल तर करावी.
गोंधळी कराच दौरा
21 Oct 2019 - 5:16 pm | जेम्स वांड
मी मूलखाचा वांड
22 Oct 2019 - 9:56 am | मित्रहो
माफ करा
20 Oct 2019 - 2:07 pm | भ ट क्या खे ड वा ला
वर्णन,फोटो,निवडलेला मार्ग सर्वच भन्नाट.
21 Oct 2019 - 11:17 am | मित्रहो
धन्यवाद भटक्या खेडवाला