का घातला घाट?
या प्रश्नाला एकच उत्तर आहे शौक (हाच शब्द अधिक सोज्वळ आहे). खरे सांगायचे तर सायकलिंग हा शौक आहे, छंद आहे. निव्वळ फिट आणि तंदुरुस्त राहायला बरेच स्वस्तातले उपाय उपलब्ध आहे. शौक असल्याशिवाय कुणीही सायकलिंगवर पैसे उधळायला तयार होणार नाही. हा असा एकमेव शौक आहे ज्यावर पैसे उधळले तरी बायको विरोध करीत नाही.
सायकलिंग दौरा का करायचा याची माझ्यासाठी मुख्यत्वे तीन कारणे होती.
१. पुढे काय: रात्रीची सायकलिंग करायची नाही असा स्वतःच स्वतःला नियम घालून घेतला त्यामुळे २०० किमीच्या पुढच्या BRM बंद होत्या. आपल्या देशातल्या खड्ड्यांमधून धावणारा रस्ता, सायकलस्वारांविषयी इतर वाहन चालकांना असणारा आदर, स्वतःच्या झोपेवर असनारा माझा गाढ विश्वास ही त्याची काही कारणे होती. २०० किमी BRM चार पाच वेळा करुन झाल्या होत्या तेंव्हा पुढे काय तर सायकल दौरा हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. सायकल दौरा याविषयी बरच काही मिपावर आणि इतरत्र वाचनात आलं होत त्यामुळे सायकल दौरा करण्याची खुमखुमी बऱ्याच दिवसापासून होती. संधीची वाटत बघत होतो.
२. न बघितलेला परिसर: पूर्वेचा घाट आणि त्याच्या आसपासचा परिसर बघायचे जाउ द्या नावं सुद्धा ऐकली नव्हती. ओळखीचे वाटावे अशी दोनच नावे होती अराकु व्हॅली आणि विशाखापट्टणम. बाकी नावाचे उच्चारण कसे करायचे इथून शिकायला सुरवात करायची होती. नवीन परिसर बघायची उत्सुकता होती.
३. ब्रेक : एक ब्रेक हवा होता. नेहमीच्या रुटीनमधून ब्रेक हवा होताच पण त्याहीपेक्षा नेहमीसारखे फिरण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारे फिरायचे होते. मला कसलही प्लॅनिंग न करता किंवा कुठलाही विचार न करता फक्त पेडल मारायचे होते. यासारखी डोक्याला आरामाची ट्रिप दुसरी कोणती नव्हती. नाहीतर फिरायला जायचे म्हटले राहण्याचे बघा, खाण्याचे बघा, गाडीचे बघा, पोरांचे बघा. रस्त्यात वेळ मिळेल तिथे नाष्टा करा, जागा मिळेल तिथे दुपारचे जेवण करा. पाच दिवस भरपूर भात खायचा आहे कदाचित पोळी दिसनार सुद्धा नाही अशी मानसिक तयारी करुन गेलो होतो.
हैद्राबादला TheBikeAffair दरवर्षी भारतात आणि भारताबाहेर सायकल दौरे आयोजित करीत असते तेंव्हा त्यांच्या आयोजन उत्तम असणारा आहे याची १०० टक्के खात्री होती. जेव्हा त्यांनी पूर्वेच्या घाटाच्या सायकल दौऱ्याची घोषणा केली तेंव्हाच यावर्षी हे करायचेच असे ठरविले. दहा ते पंधराचा ग्रुप असणारा होता, त्यामुळे मस्त गट्टी जमनार आणि मस्ती होणार याची खात्री होती. साधारण प्लॅन असा होता ३० ऑगस्टला भद्राचलमला पोहचायचे आणि ३१ तारखेला भद्राचलमवरुन सायकल टूरला सुरवात होणार होती. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर असा हा सायकल दौरा होता. भद्राचलम – मारडमल्ली – नरसीपट्टण – अराकु – विशाखापट्टणम असा प्रवास होता. साधारण पाचशे अंशी किलोमीटरचे अंतर पाच दिवसात कापायचे होते. दरदिवशी शंभरी गाठायची होती अपवाद होता अराकुचा मुक्कामाचा दिवस. तिथे दोन रात्र मुक्काम होता.
पूर्वतयारी
या दोऱ्यासाठी मी केलेल्या संपूर्ण सरावाचे वर्णन एका शब्दात करता येइल ते असे ‘बोंबला’. जुलै महिन्यात साहित्य कट्ट्याच्या कार्यक्रमात व्यस्त होतो त्यामुळे शनिवार रविवारी सुद्धा वेळ नव्हता. जुलैच्या शेवटी तापाने आजारी पडलो आणि ऑगस्टमधले पंधरा दिवस पण बोंबलले. संपूर्ण महिना भरात फक्त एकदा पन्नास किलोमीटरच्या वर सायकल चालवू शकलो असेल. कॉलेजमधे असताना ऐन प्रिपरेशन लिव्हमधे जर क्रिकेटचा वर्ल्डकप आला तर परिक्षेची जशी तयारी होते ना तेवढीच तयारी करु शकलो होतो.
भ्रम आणि धक्के
अरे पूर्वेच्या पर्वतरांगा तिथे काय घाट असनार आहे सारा सपाट प्रदेश तर आहे असे पूर्वेच्या घाटाविषयी माझे भौगोलिक (अ)ज्ञान होते. तो काही पश्चिम घाट नाही किंवा निलगिरी नाही. माझा हा भ्रमाचा भोपळा फुटला जेंव्हा टूर संयोजक क्रिश बासु रस्त्याची पूर्वपाहणी किंवा टेहळणी करुन आला. अरे हे चढ आहे कि काय नुसते वरच जाताय. गुगलकाकांना विचारले तर गुगल काकांनी सांगितले पूर्वेच्या घाटातले सर्वात उचं शिखर जिंदागड पिक हे समुद्रसपाटीपासून १६९० मीटर उंच आहे. सरकार नुसार अर्माकोंडा हे उंच शिखर आहे जे समुद्रमसपाटीपासून १६८०मीटर उंचीवर आहे. आम्ही गलिकोंडाला जाणार होतो जे १६४३ मीटर उंचीवर आहे. थोडक्यात काय पूर्वेचा घाटात सुद्धा बरीच उंच शिखरे आहेत.
हैद्राबादसारख्या पठारावर सायकल चालवनारे आम्ही इथे दहा किमी मधे शंभर मीटर जरी चढलो तर आम्हाला दम लागतो तिथे बारा ते पंधरा किमीच्या अंतरात सातशे ते आठशे मीटर वर चढायचे म्हणजे शिवसुंदर दासला पाटा खेळपट्टीवर सराव करवून ऑस्ट्रेलियात पर्थमधे मॅकग्रासमोर उभे करण्यासारखे होते बिचाऱ्याची दमछाक होणार नाही तर काय किंवा चिमणी लावून इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक करणारीला हातात फुकणी देउन सरळ चुलीवरचा स्वयंपाक करायला सांगण्यासारखे होते बिचारीला ठसका लागनार नाही तर काय? आता पर्याय नव्हता तसेही दुसऱ्या बाजूला सुंदर डोंगर, घनदाट जंगल खुणावत होतं.
जसजसा दिवस जवळ येत होता मनातली घालमेल वाढत होती.
प्रतिक्रिया
19 Sep 2019 - 2:05 pm | जॉनविक्क
तुमच्यामुळे बाईक रायडींगसाठी जायलाही छान छान ठिकाणे समजत आहेत. मस्त.
24 Sep 2019 - 4:03 pm | प्रशांत
पुर्वतयारी मस्त झाली
रच्याकन सायकल पण भारी दिसते तुमची. कोणती आहे?
25 Sep 2019 - 11:30 am | मित्रहो
मेरीडा स्कलचरा ४००
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
28 Sep 2019 - 8:16 am | Nitin Palkar
उत्कंठावर्धक लेखन.
28 Sep 2019 - 12:26 pm | मित्रहो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढील भाग वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळू द्य