तिसरा दिवस सर्वात कठीण आहे याची पूर्ण कल्पना होती. तशी मानसिक तयारी दौऱ्याच्या आधीपासूनच झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेला परत विचारण्यात आले.
“उद्या सर्वजण चढ चढणार आहेत का? चढ मारेडमल्लीपेक्षाही कठीण आहे.”
“प्रयत्न करु या” सर्वांचे हेच उत्तर होते.
तिसरा दिवस कठीण असण्याची दोन कारणे होती
१. साधारण १४४ किमी अंतर कापायचे होते. यात सपाट असा रस्ता नव्हताच. शेवटले ११४ किमी रस्ता हा चढउताराचा होता. तो ही शहरातल्या चढउतारासारखा नाही. एक किमी चा चढ असेल तर ३.५ ते ४ % ग्रेडींयंट होता आणि २ किमी चा चढ असेल तर ३% ग्रेडीयंट होता. काही शहरातल्या सारखे चढ होते. आम्ही डोंगरांवर असनार होतो.
२. संपूर्ण प्रवासातला सर्वात कठीण भाग म्हणजे जवळ जवळ १५ किमीचा लामणसिंगाचा घाट. फक्त आणि फक्त वर चढत जाणारा पंधरा किमीचा पाच ते साडे पाच टक्के ग्रेडीयंटचा घाट. यात कुठेही चढउतार, सपाट रस्ता असल काही नव्हत फक्त वर चढतच जायचे होते. आमच्यातल्या अर्ध्या लोकांनी याआधी असे घाट चढले नव्हते.
दिवस असा कठीण आणि त्यात गणेश चतुर्थीचा दिवस, हॉटेलं बंद, खाण्याची बोंब. लामणसिंगीचा घाट चढायचा म्हणजे पोटात काहीतरी हवे, राइडची सुरवात ही सकाळी सकाळी नाष्ट्यासाठी हॉटेल शोधण्याने झाली. नारसीपटणम तसे मोठे गाव पण गणरायाच्या सेवेपुढे हॉटेलमालकांचा नाइलाज होता. एक हॉटेल सुरु दिसले सकाळी धंदा करुन त्यालाही जायचे होते. तिथे फक्त इडली आणि चटणी उपलब्ध होती. त्याच्याकडल्या चटणीला माझ्यासारख्या मिळमिळित खाणाऱ्याने तिखट म्हणणे म्हणजे त्या चटणीच्या जहालपणाचा अपमान केल्यासारखे होइल. भल्या भल्या बहादरांच्या डोळ्यातून पाणी आले होते. जेवढे तिखट मी महिन्याभरात खात असेल तेवढे तिखट त्या वाटीभर चटणीत ओतले असेल. आम्ही आंध्रामधे होतो. साखर मागितली. सर्वानींच चटणीत साखर ओतून इडली चटणी खाल्ली. पोटाची सोय करुन सायकली लामणसिंगीच्या दिशेने निघाल्या.
लामणसिंगी
लामणसिंगी (याचे स्पेलींग लाम्बणसिंगी असे करताना सुद्धा बघितले. पण गावात जी पाटी होती मी तेच स्पेलींग वापरतो) हे आंध्रप्रदेशातील सर्वात थंड ठिकाण आहे. याला आंध्रचे काश्मिर सुद्धा म्हणतात. इथे हिवाळ्यात कधी कधी हिमवृष्टी होते. हिवाळ्यात साधारणतः इथले तापमान पाच अंशाच्या खाली असते. कधी कधी शून्याच्या खाली जाते. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर हे गाव वसलेले आहे. आजूबाजूला सर्वत्र उंच डोंगरांच्या रांगा आहेत. मधे एका डोंगरावर हे गाव. आपण सतत ढगांच्या आत आहोत असेच वाटत असते. इथे पाऊस पण भरपूर होतो. इथे सफरचंदाचे पिक घेता येइल असेही आता म्हटल्या जात आहे. इथे पोहचायचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे विशाखापट्टणम- नारसीपटणम- लामणसिंगी साधारण शंभर किमी आहे. रेल्वेनी आले तर तुनी हे स्टेशन जवळचे आहे. विशाखपटणम अराकुसोबत लामणसिंगीला भेट दायवीच. इथे राहायला फार जागा नाहीत. आंध्रच्या पर्यटन विभागाचे (APTDC) एक टेंटचे हॉटेल आहे.
नारसीपटणमवरुन घाटाच्या पायथ्यापर्यंत साधारण पंधरा किमीच्या अंतरात १% चा चढ होता. त्यानंतर पंधरा किमी मधे आठशे ते साडेआठशे मीटर वर चढायचे होते म्हणजे जवळ जवळ पाच ते साडेपाच टक्केचा ग्रेडीयंट. घाट सुरु व्हायच्या आधी समोर दिसनारे उंच डोंगर आणि त्यामधे तयार होणारे ढग असे नयनरम्य दृष्य दिसत होते. अर्थात हे सार कॅमेरात कैद करणे गरजेचे होतेच. मला कुणीतरी सांगितले वॉर्मअप म्हणून हलक्या गियरमधे जास्त कॅडंसनी सायकल चालव. मी सर्वात सोप्या गियरमधे सायकल चालवायला लागलो. त्याचा परिणाम म्हणून माझा वेग खूप कमी झाला. मला घाटाच्या पायथ्याशी पोहचायला इतरांपेक्षा दहा मिनिटे जास्त वेळ लागला. मनात भिती होती. आपण घाट चढायचा कि सोडून द्यायचे असे विचार मनात येत होते. नऊ वाजपर्यंत प्रयत्न करु नंतर सोडून देऊ असे ठरविले.
मी माझ्या विचारात गढलेला असतानाच घाटाला सुरवात झाली. एका बाजूला उंच डोंगर दुसऱ्या बाजूला खोल दरी मधे वळणा वळणाचा डांबरी रस्ता, सकाळची वेळ असल्याने रहदारी तुरळक होती. युरोपातल्या रस्त्यावर सायकलींग करीत आहे असे वाटत होते. मारेडमल्लीला केली ती चूक करायची नाही, उगाच वेगात पेडल मारायचे नाही असे ठरविले. वेगात पेडल मारले कि लवकर दम लागतो. गियरतर सर्वात हलकेच असतात. मी आरामात पेडल मारीत चाललो होतो त्याचा फायदा होत होता. माझे जिपिस चे यंत्र आदल्या दिवशी बिघडले होते त्यामुळे वेग, अंतर वगैरे काही कळायला मार्ग नव्हता. स्ट्राव्हा सुरु होत नव्हते तेंव्हा रस्ता बघायला GPXViewer शिवाय पर्याय नव्हता. त्याची फार गरज नव्हती एकच रस्ता होता. सुरवातीला अंदाजे तीन ते साडेतीन किमीचा चढ न थांबता चढून गेलो पण मग दम लागला. सराव नाही. थोडे अंतर पायी चाललो परत सायकलनी चढायला सुरवात केली. रिमझिम पाऊसही सुरु झाला होता. हळूहळू चढ चढणे कठीण झाले होते. लवकर दम लागत होता. एक किमी अंतर सायकलेने आणि मग शंभर दोनशे मीटर पायी असा चाललो होतो. एकामागोमाग एक असे हेअर पिन बेंड होते. सारे पुढे निघून गेले होते. ट्रक कुठेतरी मागे आहे याची खात्री होती. तरी त्यादिवशी फार जास्त पायी चालायची इच्छा होत नव्हती सायकलेने जावे वाटत होते. वळणावर मी लांबून वळण घेत होतो त्यामुळे चढ कमी जाणवत होता.
क्रिश उभा होतो. त्याच्यकडे केळी होती. केळ खाल्ले, पाणी भऱुन घेतले. मी सर्वात मागे आहे याची पूर्ण कल्पना होती. मी क्रिशला म्हणालो
“अजून किती किमी आहे?”
“आठ ते साडे आठ किमी” क्रिशचे आठ म्हणजे नऊ असतात याची कल्पना होती.
“मी नऊ वाजेपर्यंत प्रयत्न करतो नंतर सोडतो म्हणजे इतरांना वाट बघावी लागणार नाही.”
“तुला घाट चढायचा आहे ना तू चढ, बाकी विचार करु नको. परत इतक्या लांब येणार नाही.”
त्याने एक अतिशय महत्वाचा सल्ला दिला.
“श्वासांवर नियंत्रण ठेव. लांब खोल श्वास घे, भराभर श्वास घेउ नको.”
मी त्याने सांगितले तसे लांब आणि खोल श्वास घ्यायला लागलो. हळूहळू सायकलच्या पेडलीगं आणि श्वास याचा ताळमेळ जमला. प्रचंड फरक जाणवायला लागला. चढ चढण्यातला त्रास संपला असे वाटायला लागले. आता मला सायकलवरुन अजिबात खाली उतरावेसे वाटत नव्हते. रस्त्यात धबधबा ०.८ किमी असा बोर्ड दिसला मला आदल्या दिवशीचा धबधबा आठवला. मी ढगाच्या आत असलो तरी अंगातून घामाच्या धारा येत होत्या. तहान लागली होती. माझा वेग अंदाजे सात ते आठ असावा. इतक्या कमी वेगात एका हाताने सायकल थांबवून पाणी पिणे मला शक्य नव्हते म्हणून मी थांबलो. पाणी प्यालो आणि लगेच निघालो. आता आत्मविश्वास इतका वाढला होता कि मी हूड सोडून हॅडलबार पकडून आरामात सायकलींग करीत होतो. Cloud view point जागा आली तेंव्हा मात्र मला थांबल्याशिवाय राहवले नाही. उभे राहून समोरचे दृष्य फक्त बघावसे वाटत होते. कंपलशन म्हणून मी काही फोटो घेतले असे दृष्य कॅमेरात नाही तर डोळ्यात साठवायचे असतात.
पुढे काही अंतर जाताच एक रायडर पायी जाताना दिसला. मी त्याच्या पुढे निघून गेलो. एक खातरी पटली मी मागे असलो तरी खूप मागे नव्हतो. एक वळण घेत नाही तर सर्व रायडर वाट बघताना दिसले. मग जोश आला, सॅडलवरुन उठून जोरात पेडल मारीत मी पटापट वर गेलो. टाळ्याच्या गजरात लामणसिंगिच्या टप्प्यावर स्वागत झाले. काही मंडळी तासाभरापूर्वीच आली होती आणि ते आता पुढचा प्रवास सुरु करनार होते. कोणाला KOM (kings of mountain) मिळणार याची चर्चा चालली होती. तिघांनी एका तासाच्या आत घाट चढला होता. त्यातला एक सिंगल स्पीड बाइक घेउन हा घाट चढला होता. या मंडळींनी या आधी दोन तीनदा उटीजवळील कालाहातीचा चढ चढला होता. हे काहीच नव्हते. आतापर्यंत आपण पराक्रम गाजवला आहे अशा भ्रमात असनाऱ्या मला काही क्षण आपण काहीच नाही असे वाटले. काही क्षणच, अरे छोड, तुझे आहे तुजपाशी माझे माझ्यापाशी. मी लामणसिगी घाट चढलो हि माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि राहिल. फक्त दुर्भाग्य हे कि मी स्ट्राव्हामधे रेकॉर्ड करु शकलो नव्हतो. साधारण दोन तास लागले होते. शेवटले आठ ते नऊ किमीला ४५ मिनिटे लागली होती आणि तो भाग चढायला खूप मजा आली होती. मी पोहचताच इतर मंडळी निघाली. आता रस्ता बदलायचे ठरले जेणेकरुन वीस किमी अंतर कमी होणार होते. मला आता लवकर लवकर नाष्टा करुन पुढे निघायचे होते पण पुरी संपली होती. इडली बनायला वेळ होता. माझ्या नंतर आलेल्या रायडरने नाष्टा न करताच पुढे जायचे ठरविले. खपू थंडी वाजत होती म्हणून मी चुलीजवळ बसलो. दहा पंधार मिनिटात इडल्या तयार झाल्या. इतरांना गाठत पर्यंत वेळ वाचवण्यासाठी मला पुढचा प्रवास कारमधेच करायचा होता.
नवीन बनवलेला रस्ता, यामुळे वीस किमी वाचनार म्हणून सारी मंडळी ज्या रस्त्याने निघाली होती ती मंडळी पाच सहा किमी झाले तरी रस्ता नावालाही सापडत नाही म्हणून बोंबा मारीत होती. लामणसिंगी चढले कि दौऱ्यातले चढ संपले आता पुढे फक्त चढउताराचा रस्ता आहे साऱ्यांची अशीच मानसिक तयारी होती. इथे प्रकार उलटा झाला होता, खराब रस्ते आणि छोटे (साधारण अर्धा किमी) पण १५ ते १८ टक्के ग्रेडियंटचे चढ, सारे कंटाळले होते. उतारावरुन काही साहाय्य मिळवावे तर जिथे उतार संपतो तिथे पाच ते सहा इंच खोल असे पाण्याने भरलेले खड्डे होते. ज्यांनी ज्यांनी हे वीसबावीस किमीचे अंतर सायकलवरुन कापले त्यांनी त्यांनी सायकलींगवर पुस्तक लिहिता येईल इतका अनुभव गाठीशी जमा केला. अर्थात मी त्यात नव्हतो. मी या रस्त्यावर फक्त दोन ते तीन किमी सायकल चालविली आणि काही मंडळींसोबत मी कारमधे बसलो. आता गुगल सुद्धा लामणसिंगी पाडेरु साठी हा रस्ता दाखविते पण मोठ्या वाहनांनी सुद्धा या रस्त्याने जाऊ नये. सिमेंटचा रस्ता पूर्णपणे फुटलेला होता. स्थानिक मंडळी आम्हाला आम्ही इकडन का आलो ते विचारत होते. कुणाच्या क्लिट फसल्या, कुणाची चेन तुटली.
जितका हा रस्ता खराब होता तितका रस्त्याच्या आजूबाजूचा निसर्ग सुंदर होता. दोन्ही बाजूला डोंगरांच्या रांगा, त्यातून वर येणारे ढग, सतत पडनारा पाऊस, सर्वत्र पसरलेली हिरवळ, मधेच येणारे पाण्याचे छोटे तलाव, अशा निसर्गाचे वर्णन करायला कविचेचे शब्द हवेत. आम्हाला पाडेरु या गावाला पोहचायचे होते. बरीच मंडळी कारमधे आल्याने कारला दोन चकरा कराव्या लागल्या. या साऱ्या गडबडीत ट्रक पुढे निघून गेला, माझी सायकल ट्रकमधे होती आणि मी कारमधे होतो. आता पाडेरुपर्यंत मला कारमधेच जावे लागनार होते. अजून तिघे कारमधे होते तर इतर मंडळी मुख्य रस्ता आल्यावर परत सायकलवर आले होते. पाडेरुला जेवण करायचे ठरले होते. गणेश चतुर्थीमुळे इथेही हॉटेल बंद होती. एका ठिकाणी जेवण मिळाले पण अर्थातच ते यथातथाच होते. जेवताना आता पुढे किती मंडळी सायकलींग करु शकतील अशी शंका होती. ही शंका रास्त होती आमच्यातल्या काहींनी पुढे कारमधे जायचे ठरविले. मी आता फ्रेश होतो त्यामुळे मी माझी सायकलवर जायचे ठरविले.
पाडेरु ते अराकु हे पन्नास ते बावन किमी चे अंतर चढउताराचे होते. तसे बघायला गेले तर शहराच्या तुलनेत हे चढ बऱ्यापैकी कठीण होते पण दिवसभर ज्या प्रकारच्या चढ उतारावरुन प्रवास झाला होता त्या तुलनेत हे काहीच नव्हते. पाऊस मस्त बरसत होता पण त्याच्याशी केव्हाच मैत्री झाली होती. दूर उंच डोंगरांचा प्रदेश दिसत होता. कदाचित त्या डोंगरांमधे पूर्वेच्या घाटातली सर्वात उंच शिखरे जिंदागड, अर्माकोडा असावीत. मी नंतर वाचले ट्रेकिंगला जाणारी मंडळी हुकुमपेट वरुन जातात. अराकु जसजसे जवळ येत गेले तसतसे धबधबे, व्ह्यू पॉइंटसच्या पाट्या दिसायला लागल्या. काही मंडळींच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कुणी लहान असताना तर कुणी कॉलेजला असातना अराकुला आले होते. आमच्यातला एक या आधी विशाखापट्टणम वरुन सायकलनी अराकुला आला होता. मला सारेच नवीन होते. अराकु अशा पाटी दिसली, तिथून ह़ॉटेल सात किमी दूर होते. पावसात मॅप वापरायला त्रास होत होता आणि फोन लागत नव्हते. दोघे सोडले तर बाकीची मंडळी पुढे गेली होती. विचारत विचारत आम्ही हॉटेलला पोहचलो.
मी जवळ जवळ ८५ किमी सायकलींग केले होते. सलग तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण करु शकलो नव्हतो पण त्याचे शल्य नव्हते. मोजा आ गया, चॉय पियेंगे, पोकोडी खायेंगे करीत रेस्टॉरंटकडे धाव घेतली. कांदा भजी, बटाटा भजी, मग कॉफी, मग चहा मग परत भजी असे करीत गप्पा चालल्या होत्या. आज प्रत्येकाकडे सांगायची आपली एक गोष्ट होती मग ती नारसीपटणमची चटणी असेल किंवा लामणसिंगीच्या चढावरची शर्यत असेल किंवा लामणसिंगी ते पाडेरु असा प्रवास असेल. प्रत्येकाकडे आपली अशी गोष्ट होती, अशी गोष्ट जी आयुष्यभर लक्षात राहिल. दौऱ्यातला कठीण भाग आता संपला होता, जिथे पोहचायचे तिथे आम्ही पोहचलो होतो. दिवसातले सारे चढ संपले होते, निदान आम्हाला तरी तेच वाटत होते. नाही अजून एक चढ चढायचा बाकी होता. आमच्या रुम तिसऱ्या मजल्यावर होत्या, लिफ्ट नव्हती जवळ जवळ पासष्ट पायऱ्या चढून जायचे होते. आधी बॅग न्यायच्या होत्या, मग सायकल उचलून वर न्यायची होती. भगवाण देता है तो छप्पर फाडके देता है, कोइ कसर नही छोडता. जितका कठिण तितकाच सुंदर आणि संस्मरणीय दिवस संपला होता. आयुष्यभरासाठीच्या आठवणी आज जमा झाल्या होत्या.
मुक्कामाचे ठिकाण
नारसीपटणम : हॉटेल श्रीकृष्ण पॅलेस (मालकाने आस्थेने चौकशी केली होती काही त्रास आहे का म्हणून)
अराकु : हॉटेल हरिता (मयूरी)
यातली काही फोटो TheBikeAffair नी काढलेली आहेत. खरे म्हणजे या दिवसाची इतके सारे इतके सुंदर फोटो आहेत कि ते इथे देणे शक्य नाही.
प्रतिक्रिया
26 Sep 2019 - 9:01 am | यशोधरा
लिंक द्या.
लामणसिंगीबद्दल प्रथमच समजले.
27 Sep 2019 - 7:15 pm | मित्रहो
लामणसिगी जागा खूप सुंदर आहे.
28 Sep 2019 - 9:17 am | सुधीर कांदळकर
वर्णन, प्रचि, दोन्ही सुंदर. लामणसिंगी, तिथला निसर्ग त्याहून सुंदर असणारच. आवडले. धन्यवाद.
28 Sep 2019 - 12:09 pm | मार्गी
सुंदर वर्णन आणि जीवंत अनुभव कथन!! मस्तच.
28 Sep 2019 - 8:15 pm | Nitin Palkar
खरोखरच चित्रदर्शी वर्णन. वाचताना माझ्याच पेटके आल्या सारखे वाटले... पुलेशु
28 Sep 2019 - 8:26 pm | राजे १०७
खूपच सुंदर झालाय लेख. मी सुद्धा घाट चढलो वाचताना. आवडेश.
28 Sep 2019 - 10:10 pm | मित्रहो
धन्यवाद सुधीर कांदळकर, मार्गी, Nitin Palkar, राजे १०७
मार्गी सर तुम्ही ज्या प्रकारे ज्या भागात सायकलींग करता त्यापुढे हे काहीच नाही. मी तो विचार सुद्धा करु शकत नाही.
लामणसिंगीचा घाट चढण्याचा अनुभव खरच वेगळा होता. आयुष्यभर विसरु शकनार नाही असा.
19 Oct 2019 - 11:34 am | जेम्स वांड
इतकी मेहनत करून असले घाट अन अस्तित्वात नसल्या बरोबरच्या रस्त्यात जाऊनही तुम्ही जिंकलात बघा पाहुणे!.
19 Oct 2019 - 1:35 pm | मित्रहो
कसा बसा पोहचलो. मजा मात्र खूप आली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद