चक्र पूजा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
16 Oct 2019 - 11:07 am

- डॉ. सुधीर रा. देवरे

चक्र म्हणजे युध्दाची व्युहरचना. देवीचं असुरांशी झालेलं युध्द म्हणजे चक्रपूजा. फक्त अहिराणी पट्ट्यातच म्हणजे जुन्या खानदेशी भागातच (बृहन्खा नदेशातच) चक्र पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. चक्रपूजा ही आपापल्या कुलदैवताची-देवीची पूजा असून ती नवरात्रांत केली जाते. नवरात्रींमध्ये रोज कुठेना कुठे अहिराणी भागात चक्र पूजा असते. त्यातही परंपरेने विशिष्ट माळेलाच चक्र भरण्याची वेगवेगळ्या घराण्यांची प्रथा असते. सप्तमी आणि अष्टमीला चक्र पूजेचे प्रमाण जास्त असते. प्रत्येकाची ठरा‍वीक तिथी- विशिष्ट दिवस ठरलेला असतो. त्या त्या कुळाचे, वाड्याचे पूर्वजांप्रमाणे पारंपरिक पध्दतीने चक्र भरले भरले जातात. ज्यांना नवरात्रांत चक्र भरणे शक्य होत नाही, अशांनी नरक चतुर्दशीला चक्र भरायचे असतात. पण काही कुळांत नरक चतुर्दशीलाच चक्र भरण्याची परंपरा आहे. ही चक्रपूजा आर्थिक दृष्ट्या खर्चिक असल्यामुळेही असेल कदाचित पण चक्र दरवर्षी न भरता एक वर्षाआड अथवा तीन वर्षांतून एकदा अशा पध्दतीने केली जाते.
चक्रपूजेचे साहित्य: चक्रपूजेसाठी अनेक पदार्थ तयार करावे लागतात. खाद्य पदार्थ व लागणार्या वस्तू ढोबळपणे पुढीलप्रमाणे असतात. नागवेलीची अकरा पाने, पुरणाच्या अकरा पोळ्या (मांडा, खापराची पोळी), अकरा केळी, गव्हाच्या पीठाने बनवलेली डाळींबाची फळे, सांजोरी (करंजी), सोळ्या (गव्हाच्या पीठाच्या पापड्या), भजे, कुरडई, मनोका (हरभर्याीची उस्सळ), उडदाच्या डाळीच्या पीठाची भजी, गव्हाच्या पीठापासून तयार केलेले दिवे. (दिवे व मेढ्या गरम पाण्यात उकडून घेतले जातात.) दिवे उकडल्यावर ते पाण्यातून काढून घेतल्यावर उरलेल्या त्याच गरम पाण्यात गव्हाची खीर तयार केली जाते. ओले गहू अर्धवट कांडून वरून साखर घालून ‘गव्हाची खीर’ बनवतात. सार, भात, दहा दिवे व अकरावा मेढ्या (मोठा दिवा). अशा सर्व वस्तू, साहित्य व पूजेच्या नैवेद्यांसाठी केलेल्या पदार्थांतून सायंकाळी चक्र पूजेची मांडणी केली जाते.
घरात शेणाने सारवलेल्या जागेवर (आता फरश्या बसवलेल्या घरात फरशी धुवून) चक्र पूजेची मांडणी करताना, तांदुळ (मूळ पांढर्या रंगातले) आणि गुलालाने रंगवलेले लाल तांदुळ घेऊन, एकात एक असे अकरा गोल (वर्तुळ) तयार करतात. म्हणजे लाल रंगाच्या तांदळांचा गोल तयार झाला की लगेच पांढर्या तांदळांचा गोल असे एकात एक अकरा गोल तयार केले जातात. सुरूवातीचा पहिला लहान गोल लाल रंगाच्या तांदळांचा असतो. हे सर्व गोल म्हणजेच देवीचे चक्र. सर्वात मोठ्या बाहेरच्या वर्तुळाच्या चहू बाजूंना (चारी दिशांना) चार दरवाजे ठेवले जातात. चारही दरवाज्यांसमोर चार बाहुले तयार केले जातात. एक बाहुले मठ या कडधान्याने तयार करतात. दुसरे राखेपासून, तिसरे उडदापासून आणि चौथे हरभर्याडच्या डाळीचे.
नंतर तांदळाच्या चक्रांवर नागवेलीची अकरा पाने अंथरली जातात. त्या पानांवर पाच झाडांची पत्री आणि पाच फळे ठेवली जातात. पत्रीवर स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ अकरा-अकरा संख्येने मांडतात. खाद्य पदार्थांचा नैवेद्य चक्रांवर ठेऊन झाल्यावर त्यावर दहा दिवे व मध्यभागी मेढ्या ठेवला जातो. दिवे आणि मेढ्यात फुलवाती, तूप टाकून झाल्यावर कापुरच्या ज्योतीने मेढ्या पेटवला जातो. मग मेढ्यावरून बाकीचे दिवे पेटवले जातात.
चक्राची मांडणी सुरू केली की, वर्तुळाकार बसलेल्या माणसांपैकी त्यातला एक जण अखंडपणे ‘आग्यॉव’ असं म्हणतो तर चक्रपूजेच्या चहुबाजूने बसलेले पाहुणे-नातेवाईक उत्तरादाखल ‘विसराग्यॉव’ म्हणतात. उदाहरणार्थ, एक जण, ‘आग्यॉव’. सर्वजण, ‘विसराग्यॉव’. आग्यॉव म्हणजे आज्ञा हो- असो. आणि विसराग्यॉव म्हणजे ईश्वर आज्ञा हो. हे अपभ्रंश आहेत. चक्रपूजेची मांडणी म्हणजे युध्दाच्या रणांगणाची मांडणी. देवी आणि दैत्य यांचं हे युध्द. चार वेगवेगळ्या पदार्थांचे बाहुले म्हणजे चारी दरवाज्यांवर चार विशिष्ट वर्गातले शिपाई. मधला तांदळाचा भाग म्हणजे देवीचा गड. देवी गडावरून युध्द करते. देवीला तृप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. दैत्याला मारून झाल्यावर शेवटी देवी अग्नीत विलीन होते.
ही सर्व मांडणी व पूजा पुरूष लोक करतात. स्त्रिया करत नाहीत. यावेळी पाच ते नऊ वर्षाच्या लहान कुमारीकेला देवी म्हणून पाटावर बसवतात. तिचे पाय धुवून पूजा करतात. त्या कुमारीकेला दक्षिणा अथवा कपडे दिले जातात. कुमारीकेची पूजा मात्र स्त्रिया करतात.
चक्रपूजा मांडून झाल्यावर बाजूला होम पूजा केली जाते. या पूजेला एक नारळ, पाच वेगवेगळ्या झाडांच्या काटक्या, चंदनाचे लाकूड, उद, गुगुळ इत्यादी होमात टाकून होम कापूर ज्योतीने पेटवला जातो. होम पेटताच ‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी’ ही सर्वदूर प्रसिध्द असलेली देवीची आरती म्हटली जाते. (देवी अग्नीत विलीन होते.)
सर्व नातेवाईक, भाऊबंद व घरोब्याच्या लोंकाना चक्र पूजेच्या जेवणाचं निमंत्रण दिलं जातं. चक्र पूजा झाल्यावर आधी कुमारीका जेवायला बसते. नंतर निमंत्रित जेवायला बसतात. जेवण वाढताना चक्रपूजेवरील नैवेद्यच उचलून ताटांत वाढला जातो. जेवताना उष्ट टाकायचं नसतं. जेवण झाल्यावर बाहेर कुठंही इतरत्र हात न धुता जेवणाच्या ताटातच धुवायचे असतात. ताटातलं खरकटं पाणी एकत्र साचवून त्यात उष्टंमाष्टं, खरकटं व दिव्यांतल्या वाता टाकून ते सर्व गंगेत- म्हणजे नदीत विसर्जन करतात. अथवा एखाद्या ठिकाणी खड्डा् खोदून त्यात ते बुजतात.
मेढ्या व मेढ्याखाली ठेवलेले पदार्थ चक्र भरण्याच्या जागेवरच रात्रभर झाकून ठेवतात. दुसर्याे दिवशी तो मेढ्या फक्तण घरातील पुरूष माणसांनी खायचा असतो, असा पारंपरिक रीवाज आहे.
चक्राचा तांदुळ, उडीद व हरभर्यााची डाळ यांची नंतर केव्हातरी खिचडी शिजवली जाते. गुलालाचा तांदुळ स्वच्छ धुतला जातो. गुलालाचे पाणी, राख, मिठ, दिव्यातल्या वाती यांचंही विसर्जन केलं जातं. ही पूजा सगळ्या बहुजन समाजात भक्तीाभावाने केली जाते.
(‘अहिराणी लोकपरंपरा’ व ‘ढोल’ या प्रस्तुत लेखक लिखित पुस्तक- नियतकालिकातून. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

सुचिकांत's picture

16 Oct 2019 - 1:53 pm | सुचिकांत

चांगली माहिती

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Oct 2019 - 3:24 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

माहितगार's picture

16 Oct 2019 - 2:35 pm | माहितगार

दैत्याला मारून झाल्यावर शेवटी देवी अग्नीत विलीन होते.

हे आणि याच्या नंतरचे दुसरे वाक्य वाचावे, आमची वाचण्यात गफलत होतीए का लेखकाची लिहिण्यात? तुर्तास लेखकाची लिहिण्यत गफलत आहे असा अर्थ लावणे सयुक्तीक वाटते आहे. लेखक महोदयांच्या उत्तराची प्रतिक्षा असेल.

तसेही संस्कृतीचा आदर करुन मुर्तींसाठी नुसताच पाणी विसर्जन खोटा देखावा पुरेसा असावा अशी सुधारणा व्हावी असे सुचवावेसे वाटते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Oct 2019 - 3:28 pm | डॉ. सुधीर राजार...

हो. थोडक्यात लिहिताना माझीच गफलत झालेली असते. ही पूजा झाल्यावर होमच्या अग्नीत देवी विलीन होते, लुप्त होते, अशी लोकश्रध्दा आहे.

माहितगार's picture

16 Oct 2019 - 3:47 pm | माहितगार

१) ओके म्हणजे ' अंगात देवी येण्याची प्रथा जशी असते तशी ती पुजेच्यावेळी कुमारीकेत आली आहे असे गृहित धरले जाते आणि पुजा संपल्यानंतर होम मार्गाने वापस गेली असे समजले जाते आणि कुमारीकाही सुरक्षीत पणे घरी जाते ' अशा स्वरुपाची दुरुस्ती आपल्या ग्रंथाच्या भावी आवृत्ती निघाल्यास होईल अशी विनंती आणि अपेक्षा करुन चालतो. हिंदू धर्माच्या प्रत्येक प्रथ्येचा नकारात्मक अर्थच काढायचा याच्या अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही चढाओढ होते. संस्कृती निरीक्षकांच्या लेखनाचे भविष्यात गैर अर्थ काढणे सहज शक्य नसावे असे पाहीले पाहीजे असे वाटते.

२) अनुषंगिक आवातंर

अलिकडे किझाडी तामिळनाडू येथे उत्खनन झाल्यानंतर सिंधू संस्कृती ते किझाडी हिंदू मुर्ती आढळल्या नाही म्हणजे आम्ही पुर्वी हिंदू नव्हतो असा नवा अर्थ पसरवला जात आहे पण जिवंत व्यक्तीच्या अंगात देवता येऊन जात होती, ती तांदळा आदी पद्धतीने विशीष्ट आकार नसलेल्या आकारातही देवता मानल्या जात असत कलशासच देवता समजले जात असे याचे पुरातत्वीय पुरावे कसे तयार होऊ शकतील असा साधा विचारही या मंडळींना सुचत नाही याचे नवल वाटते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Oct 2019 - 11:59 am | डॉ. सुधीर राजार...

अच्‍छा. आपल्याला नक्की काय म्हणायचे होते हे आपल्या पहिल्या प्रतिक्रियेतून मला समजले नाही. तरीही आपले म्हणणे समजून घेऊन स्पष्टीकरण केले. आपले समाधान झाले हे महत्वाचे.

दुसर्‍या प्रतिीक्रयेतूनही काही कळायला मार्ग नाही. लेख पुन्हा एकदा वाचावा.

दुसर्‍या प्रतिीक्रयेतूनही काही कळायला मार्ग नाही. लेख पुन्हा एकदा वाचावा.

चक्र पूजेचे महत्व किंवा ते केल्याने मिळणारी फळे कुणाला ठाऊक आहेत काय ? ती का करावी ? नाही केली तर काय होते आणि केली तर काय होते ? एव्हढे सर्व वर्तुळ काढून काय मिळते . लाल आणि पांढरेच का ? इतर रंग नाही चालणार का ?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Oct 2019 - 3:31 pm | डॉ. सुधीर राजार...

शंका बरोबर आहेत. पण केवळ चक्रपूजेचेच नव्हे तर आपल्या सगळ्याच प्रथांबद्दल असे म्हणता येते. अनेक प्रथा परंपरा डोळे लाऊन करण्यात येतात. त्यामागचे कार्यकारण भाव कोणालाच माहीत नसतो।.पण परंपरेने चालत आले करावे लागेल अशी ही श्रध्दा

वाघमारेरोहिनी's picture

18 Oct 2019 - 6:44 pm | वाघमारेरोहिनी

माझे मूळ गाव बागलाण तालुका आहे. चक्रपुजे विषयी मी माझ्या आजी कडून आणि सासरच्या माणसांकडून ऐकले आहे. माझ्या लग्नानंतर माझ्या सासरच्या घरी दोन वेळा चक्र पूजा झाल्या. माझ्या चुलत सासऱ्यांने आम्हाला पुन्हा पुन्हा बोलावले पण प्रत्यक्ष पाहायला मिळाले नाही. ह्या पूजेला सर्व वाघमारे आले होते. आम्ही सोडून.
बरेच अवांतर झाले.
बर पूजेचे महत्व.
सर्वांचे एक मोठे get together देवाच्या निमित्ताने होते. आमचे कुटुंब खूप मोठे असून सर्वांना ह्या निमित्ताने भेटता येते म्हणून पूजेला आवर्जून जावे असे आहे.
दुसरा मुद्दा असा की चक्र पुजे मुळे तुमच्या जीवनातील चक्रे फिरतील व अडकलेले काम लवकर होईल असे चुलत सासरे पुन्हा पुन्हा सांगत होते. ह्या मागचा उद्देश दुसरे काहीही नसून तुम्हाला ह्या पूजे मुळे घरातील सर्वांना भेटून त्यांचे आशीर्वाद प्रार्थना प्रसाद लाभेल व एक नवीन उमेद मिळेल.
ह्या पूजेत सून मुलगा नातवंडे व लग्न न झालेली मुलगी ह्यांनाच सामील होता येते व प्रसाद मिळतो.
अजून एक उष्टे खरकटे आणि हात धुतलेले पाणी सुध्धा बाहेर इतरत्र जाऊ दिले जात नाही घरच्या इथेच अंगणात खड्डा करून पुरून टाकतात. पत्रावळी पण. ही एक इकोफ्रेंडली पद्धत नाही काय.
राहिला मुद्दा कार्यकारण भावाचा. एकत्र भोजन देवाचे नामस्मरण हाच असावा. रूढी तांदळाचा रंग हाच का हे मला आजी कडून कळाले असते. पण आज ती हयात नाही.
मी लेखकाचे अभिनंदन करते.
मायबोली वर बागलाण वर तुम्ही माहिती लिहिता. खूप छान वाटते. बऱ्याच गोष्टी साऱ्यांना माहितीच असता असे नाही. हो ना.

बर्‍याचशा व्यक्ती बरेचसे समाज पुरेसे लिहिते होत नाहीत त्यामुळे बर्‍याच रुढींची व्य्वस्थीत नोंद होत नाही. अर्थात आताच्या काळात आंतरजाल प्रत्येक हाती कॅमेरा व्हिडीओ फोन आहेत. उपस्थितीतांच्या अनुमतीने छोट्या छोट्या परंपरांचे छायाचित्रिकरण करुन त्यांची आंतरजालावर माहिती उपलब्ध करणे श्रेयस्कर असते.

त्रासदायक असलेल्या अंधश्रद्धा तेवढ्या टाळून उर्वरीत परंपरांचे जतन करण्यास आनंद घेण्यास हरकत नसावी. असे वाटते.