तुलना ( अष्टाक्षरी)

कपिल काळे's picture
कपिल काळे in जे न देखे रवी...
11 Nov 2008 - 3:59 am

कवी म्हणू नका मला
अशी करु नका घाई
रास प्रासांची ओतिली
धोंडोपंती सर नाही

चार ओळी जुळवल्या
कवी होईन का त्याने
मूळ प्रेरणा ही दिली
त्या हो अस्सल पंताने

इंदराचा त्या हो भार
जाणे एक एरावत
वेद रेड्याने बोलावा
नाही त्याची ती ऎपत

वसंताच्या मोसमात
काक: काक: पिक :पिक:
नीर क्षीर विवेकेषु
हंस: हंस: बक: बक:

जाणे गुणी हो गुणाला
निरगुण हा का जाणे
जाणे बली महाबली
निरबल ते का जाणे

शेवटची तीन कडवी “जाने गुनी गुन को”, ह्या अडाणा रागातील ध्रुपदाचा भावानुवाद आहेत. ते मूळ ध्रुपद असे आहे.

जाने गुनी गुन को
निरगुन का जाने
जाने बली बल को
निरबल का जाने

पिक बसंत के गुन
बायस का जाने ( बायस म्हणजे कावळा)
हरिबल गज जाने
मूषक का जाने

( ह्या कडव्यातील दुसरया आणि तिसरया ओळीतील कमी असलेली मात्रा आलापीतून, चुकलो, नोम तोम मधून येते)
मूषका सोबत माझ्या गणपती बाप्पाप्रति भावना जडलेल्या असल्याने मी इथे त्याच्याऎवजी रेडयाची प्रतिमा वापरली आहे

ही मूळ ध्रुपद रचना मी उदय भवाळकरांकडून ऎकली होती.

काक कॄष्ण: पिक कॄष्ण:
को भेद काक पिकयेषु
वसंत समये प्राप्ते
काक: काक: पिक: पिक:

तसेच

हंस श्वेत: बक श्वेत:
को भेद हंस बकेयषु,
नीर क्षीर विवेकेषु
हंस: हंस: बक: बक:

ह्या मूळ संस्कृत सुभाषितांवरुन प्रेरित अशी ही ध्रुपद रचना आहे. ही ध्रुपद रचना देखील मूळ सुभाषितांप्रमाणेच अष्टाक्षरी आहे.
त्यामुळे त्याच्यावर आधारित त्याचा मराठी भावानुवाद सुद्धा मी पंतांनी विवेचित केलेल्या अष्टाक्षरी छंदातच ठेवला आहे.

धॄपद गायकीचे तसेच अडाणा रागाचे सौंदर्य उलगडून दाखवायला मी अगदीच अडाणी आहे. त्याबद्दल अधिक माहिती तात्या देतील.( जाने गुनी गुन को!!)

कवितासंदर्भ

प्रतिक्रिया

अष्टाक्षरी चांगली आहे. ऐरावताचा चरण सफाईदार झाला आहे.
दोनेक सूचना सकृतदर्शनी कराव्याशा वाटतात, पटल्यास पहा. या सूचना केवळ ओळींच्या पद्यगुणवर्धनासाठी करीत आहे; तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी नाही.
'कवी म्हणू नका मला' काहीसे सपाट वाटते. त्या ऐवजी 'म्हणू नका कवी मला' केल्यास अधिक चांगले वाटेल. तसेच 'चार ओळी जुळवल्या' ऐवजी 'जुळवल्या ओळी चार', 'कवी होईन का त्याने' ऐवजी 'होईन का कवी त्याने' अधिक बरे वाटेल, असे आपले मला वाटते. अर्थात हे बदल केल्यास यमक साधण्यासाठी बाकीच्या ओळींमध्ये पर्यायी शब्दयोजना किंवा शब्दक्रमात बदल करावा लागेल, हा भाग अलाहिदा.
(सूचक)बेसनलाडू

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 10:22 am | कपिल काळे

'कवी म्हणू नका मला' मध्ये काय म्हणू नका ते स्पष्ट झाले आहे. तुलना करु नका ह्या सूत्राला धरुन.
'चार ओळी जुळवल्या' ऐवजी 'जुळवल्या ओळी चार' ह्या दोन्हीपेक्षा ओळी चार जुळवल्या हे अजूनच बरे वाटते.

'कवी होईन का त्याने' ऐवजी 'होईन का कवी त्याने' ठीक आहे.

कवितेवर आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

http://kalekapil.blogspot.com/

माझा ह्या आधीचा अभिप्राय कोणी उडवला?

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 1:10 pm | विसोबा खेचर

अष्टक्षरी लै भारी रे कपिल..!:)

आपला,
(नवकवी) तात्या.

विसोबा खेचर's picture

14 Nov 2008 - 5:56 am | विसोबा खेचर

धॄपद गायकीचे तसेच अडाणा रागाचे सौंदर्य उलगडून दाखवायला मी अगदीच अडाणी आहे. त्याबद्दल अधिक माहिती तात्या देतील.( जाने गुनी गुन को!!)

धृपद गायकीबद्दल मी फरसं काही लिहू शकेन असं नाही. मला ती गायकी खूप आवडते परंतु माझा ख्यालगायकीचा जितका अभ्यास आहे तितका धृपदाचा नाही..

अडाणा रागाबद्दल नक्की लिहीन केव्हातरी..

आपला,
(अडाणी) तात्या. :)