टेक्नो सॅव्ही..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
7 Oct 2019 - 9:58 am

"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे.
जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला. 'कोणत्या कंपनीचा आहे?' मी म्हटले मला ठाऊक नाही. फोनवर लिहिलेले शब्द हे कंपनीचं नाव असतं की मॉडेलचं याबद्दल मला खात्री नव्हती. उगीच "स्वच्छ भारत" कंपनीची बस पाहिली असं म्हटल्याप्रमाणे काहीतरी होईल. अगदी पहिला फोन होता तेव्हा मी बीपीएलचा फोन आहे असं म्हटलं होतं.

पुढचा प्रश्न आला, 'स्टोरेज मेमरी किती आहे?'मी म्हटलं "मला ठाऊक नाही."

हे सांगताना मला शरमल्यासारखं होत होतं. गेली बरीच वर्षे मी मोबाइल वापरतेय. वर्षा दोन वर्षात मोबाइल बिघडतो आणि मुलगा मला नवीन घेऊन देतो.

इतके मोबाइल आले आजपर्यंत. पण मी कधीच कंपनीचं नाव विचारलं नाही की ते लक्षात ठेवलं नाही की कुणाला संगितलं नाही. मला असा कुणी प्रश्नच विचारला नव्हता. मला माझ्याच मोबाइलची माहिती करून घ्यावी लागली. त्याची स्टोरेज मेमरी अमुक जिबी आहे. म्हणजे गिगा बाईट. RAM म्हणजे रँडम अॅक्सेस मेमरी. हे मला कळलं. चुकायला नको म्हणून ते पाठ करून टाकलं. याच पद्धतीने काही कंपन्यांची आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सची नावं पाठ केली. मेलं वयपरत्वे पाठही होत नाही लवकर. व्हाट्सऍपवरचे मेसेज सांगतात की "डॉक्टर असं म्हणतात म्हणे, की म्हातारपणी अल्झायमर टाळायचा असेल तर कोडी सोडवा, सुडोकू सोडवा, काहीतरी पाठ करा, मेमराईज करा."

शिवाय अमुक कोडं सोडवता आलं नाही तर अल्झायमरची सुरुवात, अमुक इतकी उत्तरं ओळखता आली नाहीत तर अल्झायमरची अमुक स्टेज, आणि पूर्ण सोडवता आलं तर अल्झायमर नाही.. असंही काहीबाही वाचायला मिळतं.

अल्झायमरच्या भीतीने मी गीतेचा एक आख्खा अध्याय पाठ केला. तर मी काय सांगत होते? हं ! कंपन्यांची नावे आणि प्रॉडक्ट्स. बघा! मी न विसरता आले की नाही मूळ मुद्द्यावर!म्हणजे अल्झायमर नसावा.

तर मला आज lenovo, acer ,एचपी, oppo ,विवो ,जिओनी, लावा , sansui, बोस अशा काही कंपन्यांची नावं माहीत झाली आहेत. त्यात कोण मोबाइल,लॅपटॉप, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, accesaries, हेडफोन ,माऊस, की बोर्ड, speakers , कॅमेरा, फ्रीज,वॉशिंग मशीन ,टीव्ही तयार करते हेही आठवून पहिले तर आठवते.

जी कथा मोबाइलची तीच कॉम्प्युटरची. पूर्वी मी नोकरीत असताना शेवटी शेवटी क्लासबीसला जाऊन दोनदा कॉम्प्युटर शिकायचा प्रयत्न केला. पण तिथे क्लेरीकल जॉबसाठी आवश्यक ज्ञान शिकवीत होते. एक्सेल, मेलमर्ज, कॅलक्युलेशन, सॅलरी शीट वगैरे. ते शिकून मी काय करू?

मला शिकायचं होतं ते रेकॉर्डिंग आणि डबिंग. पण ते त्या नेहमीच्या क्लास मध्ये कुठून येणार? मग ऑफिसतर्फे आम्हा जुन्या लोकांना दिल्लीला ट्रेनिंगला पाठवले . पण तिथे पाच /सहाजणांत एकाच कॉम्प्युटर होता. ज्यांना थोडंफार आधीच येत होते, ते कॉम्प्युटरवर ताबा मिळवायचे आणि रेकॉर्डिंग करत बसायचे. फारसं काही न शिकताच मी परत आले.

कॉम्प्युटरमध्ये सुद्धा किती बदल होताहेत. किती advanced कॉम्प्युटर येताहेत. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. नुसत्या नोट्स लिहून घेऊन किंवा पुस्तक वाचून किती शिकणार व्यवहारातला कॉम्प्युटर?

कॉम्प्युटरवर हात असा बसलाच नाही. अमुक बटन दाबावं का? काही चुकणार तर नाही? अशी भीती वाटते. काहीही संदेश दिसला की एररच वाटते. अनेकदा काय झालंय तेच न कळल्याने ओके दाबावं की कॅन्सल ते कळत नाही.

एकदा वाटतं, ही सगळी माहिती मिळवून ,कॉम्प्युटर शिकून मी आता काय असा तीर मारणार आहे? माझ्या मर्यादित अनुभवविश्वात त्याचा काय उपयोग आहे? मी technosavvy बनून असा काय फरक पडणार आहे ? मला कॉम्प्युटर येत नाही, फोटोशॉप येत नाही, videos बनवता येत नाहीत, माझ्या मोबाइलचा इंटरनेटचा स्पीड मला माहीत नाही, मला खूप काही माहीत नाही. प्रचंड वेगाने पुढे जाणार्‍या जगाबरोबर धावताना माझी दमछाक होतेय. माझ्या अचानक लक्षात आलं, निरक्षरांना साक्षर होताना किती त्रास होत असेल?किती कंटाळा येत असेल? बाय द वे, "निराक्षरांनो साक्षर व्हा" असं एका भिंतीवर लिहिलेलं बघितल्याचं आठवलं.

तर ऋ,क्ष ,ज्ञ ,ळ हे अक्षरे आणि ए ,ऐ ,ओ ,औ हे स्वर शिकताना ते किती हताश होत असतील?शिवाय इतके मोठे होऊनही आपल्याला हे येत नाही ह्याचा न्यूनगंड. त्यांचं दैनंदिन जगणं यावर मुळीच अवलंबून नसतं. जे काही शिकायचे ते लहानपणी, तरुणपणी शिकावं. म्हातारपणी ते अवघड जातं. तरीही जे शिकतात त्यांना हार्दिक सलाम.

तरी मी पूर्ण निराश नाही. कधीतरी मला कॉम्प्युटर येईल अशी मला आशा वाटते. मी लॅपटॉप उघडते. शिकायचा प्रयत्न करते. आता मला लॅपटॉप सुरू करता येतो. फाइल ओपन करता येते. नवीन फाइल तयार करता येते. नोटपॅड मध्ये जाता येते. माझं लिखाण टाइप करता येतं. नंतर तपासून दुरुस्त करता येतं. ईमेल करता येते.

गुड स्टार्ट ! चांगली सुरुवात म्हणजे अर्धं यश असे कुणीसं म्हटलंय. सतत केलं की येतं. प्रॅक्टीस मेक्स मेन {विमेन ऑल्सो } पर्फेक्ट..

जीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

7 Oct 2019 - 10:50 am | आनन्दा

छान!

लेखन वाचून तुम्हाला मी ओळखतो असे वाटायला लागले आहे !
लेख प्रातिनिधिक वाटला, अनेक जेष्ठवयीन मंडळींना असेच वाटत असणार.

ऋ,क्ष ,ज्ञ ,ळ ही अक्षरे टाइपतांना माझीही दमछाक होते, वय वाढलंय म्हणायचं काय ? :-)

कंजूस's picture

7 Oct 2019 - 11:30 am | कंजूस

खरं आहे. जग पुढे जातं तसं आपल्याला शिकावं लागतं.
मीही यातून २००० साली गेलो आहे. माझ्या शिकण्यात हातभार लावण्यात digit, ic chip या दोन मासिकांचा वाटा आहे तसेच एक दोन कांम्प्युटर वापरणाऱ्यांचा सल्ला मोलाचा ठरला.
"तुला रोज एक दोन तास कांम्प्युटर वापरायची गरज पडेल तरच विकत घे, तोपर्यंत सायबरकाफेच उत्तम." त्याप्रमाणे घेतलाच नाही.

मोबाईल कोणता घ्यावा हे कळत नव्हते तेव्हा दुकानातल्या मुलाने इंटरनेटसाठी Nokia 27०० classic दिला. सर्व प्रश्न सुटले. त्यातून लेखही लिहिले. इमेल अट्याचमेंट करता येणे हे त्यात होतं.
योग्य सल्लागार भेटल्यास वेळ आणि पयशेही वाचतात.

मराठी_माणूस's picture

7 Oct 2019 - 1:06 pm | मराठी_माणूस

मेलमर्ज: खुप वर्षांनी हा शब्द परत समोर आला.

दुर्गविहारी's picture

7 Oct 2019 - 2:10 pm | दुर्गविहारी

नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहे. इथे लिहीत रहा. बरीच माहिती मिळेल.

कंजूस's picture

7 Oct 2019 - 2:31 pm | कंजूस

CamScanner app फार भारी आहे. उपयुक्त. डॉक्युमेंट वगैरे
फोटोची PDF करण्यासाठी.

सतिश गावडे's picture

7 Oct 2019 - 9:24 pm | सतिश गावडे

CamScanner app गुगलने प्ले स्टोअरवरून उडवला होता काही दिवस, कारण त्यात त्या कंपनीने एक advertising ask module टाकले होते जे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकाडायखोटे.

आता परत उपलब्ध झाले आहे.

कंजूस's picture

7 Oct 2019 - 11:06 pm | कंजूस

होय.

धर्मराजमुटके's picture

7 Oct 2019 - 3:14 pm | धर्मराजमुटके

आजी तुम्ही शरद पवार किंवा गेला बाजार माईसाहेब कुरसुंदीकर यांच्या "ह्यांचा" क्लास लावा. तुम्हाला टेक्नोसॅव्ही लोकांची तोंडे बंद करण्याचे उपाय त्यांच्याकडून नक्की मिळतील.
कोणी मोबाईलची रॅम किती विचारले की तुम्ही खालील प्रश्न विचारायचे
भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या वर येतात की खाली ?
सोयाबिनच्या बिया उगवतात की रेवडीसारखे दिसणारे दाणे ?
तुम्ही रोज दुध पिता के गाईचे असते की म्हशीचे ?
असे प्रश्न युवा पिढीला विचारायचे म्हणजे ते तुम्हाला बाकी चौकशा करण्यापुर्वी १० वेळा विचार करतील :)

अबाउट विमेन दे आर ऑलरेडी पर्फेक्ट ;)

अल्झायमरच्या भीतीने मी गीतेचा एक आख्खा अध्याय पाठ केला. तर मी काय सांगत होते? हं ! कंपन्यांची नावे आणि प्रॉडक्ट्स. बघा! मी न विसरता आले की नाही मूळ मुद्द्यावर!म्हणजे अल्झायमर नसावा.
आजी, उरलेले १७ अध्याय पाठ केलेस तर तु सुपर कॉप्युटरला देखील फेफरे आणशील याची मला खात्री पटली आहे ! ;) बाकी गीतेत १८ अध्याय आहेत हे अजुन माझ्या लक्ष्यात राहिले आहे म्हणजे मला देखील अल्झायमर नसावा ! ;) पण हल्ली गोष्टी विसरत चाललोय याची अनामिक भिती वाटते बघ !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coca-Cola's plastic secrets | DW Documentary

सस्नेह's picture

8 Oct 2019 - 6:06 pm | सस्नेह

आजी लेख आवडला.
तुम्ही मागील पिढीतील असाल असं लेखनावरुन वाटत नाही. अभिनंदन !

जव्हेरगंज's picture

8 Oct 2019 - 11:12 pm | जव्हेरगंज
जालिम लोशन's picture

8 Oct 2019 - 11:51 pm | जालिम लोशन

मिपाकर हुशार आहेत,आणीआम्हाला माहिती आहे तुम्ही टेक्निकली आमच्यापेक्षा स्ट्राॅंग आहात.

जॉनविक्क's picture

12 Oct 2019 - 8:01 pm | जॉनविक्क

अजून पुरेशी खात्री झालेली नाही पण बघूया...

आजी's picture

12 Oct 2019 - 6:44 pm | आजी

आनन्दा-थँक्यू

अनिंद्य-मिसळपावच्या माध्यमातून आपण सगळेच आता एकमेकांना थोडेसे ओळखतो.

कंजूस-मलाही घरच्यांनी आणि मैत्रीणीनं मदत केली.

मराठी माणूस-हं! मलाही एकदम, अचानक आठवला.

दुर्गविहारी-थँक्यू

सतीश गावडे-माहितीबद्दल धन्यवाद.

धर्मराज मुटके- हाहाहा. छान सल्ला.

जॉनविक्क-थँक्यू.

मदनबाण-अंहं विसरायचं नाही.

स्नेहांकिता-मी मागच्या पिढीतलीच आहे.

स्नेहांकिता-मी मागच्या पिढीतलीच आहे.

जव्हेरगंज-व्हिडिओ आवडला.थँक्यू.

जालीम लोशन-छे हो.

धर्मराजमुटके's picture

13 Oct 2019 - 10:18 pm | धर्मराजमुटके

स्वतःला टेक्नोसॅव्ही समजणार्‍या मिपाकरांनो, आजींचा हा प्रतिसाद पहा आणि त्यातून काही शिका. आपण लेख लिहितो आणि त्याखालील प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देतो. त्यामुळे धाग्यावर फारच प्रतिक्रिया आल्यात आणि धागा सुपरहिट आहे समजून वाचक धागा उघडतात आणि पाहतात तर १०० पैकी ५० प्रतिसाद तर लेखकाचेच आहेत.
असे ८-१० प्रतिसाद आले की लेखकाने एकाच प्रतिसादात त्यांना उत्तरे द्यावी ही चांगली पद्धत वाटते.