मन आणि पृथ्वी

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
5 Oct 2019 - 11:53 am

म्हणे एकदा पृथ्वी मनास,
"चल, खेळ एक खेळू, आजमावू आपापली शक्ती खास."
ऐसे म्हणुनी पृथ्वी क्षणात खेचे सर्व चेतन,अचेतनास,
म्हणे हसुनी," रे मना! तुझ्यासकट ही शरीरांची रास,
तुला आकर्षण्या न उरले काही आता, शांत का झालास?"

हात जोडोनी सस्मित मन बोले, " माते, तुला हरवण्याची कधीच नव्हती आस,
तुझ्या कृपेच्या ओझ्याने दबलेला मी क्षुल्लक अणूमय दास.
पण ही गोळा केलेली शरीरे नव्हेत, हा तर फक्त त्यांच्या जीवनाचा भास.
त्यांचे विचार, आठवणी, सुखदुःखाचे अदृश्य चैतन्य त्यांत न नैवेद्यास.
ते माझ्यात एकरूप आहे.
कर प्रयत्न एकदा, बघ खेचून एखादी तान्ह्या गालावर कोरडा झालेल्या अश्रूंची आठवण,
नवप्रेमात डोळ्याला डोळे मिळाल्यावर हृदयात आणीबाणी अनुभवलेल्या क्षणांची लड,
नवजीवना उराशी बिलगवून पाझरलेले मातृत्वाचे स्वयंभू अतृप्त पान्हे पाजवताना होणारा नभ संकोचेल असा आनंद ,
इच्छेविरुद्ध सगळे पाश तोडून जाताना होणारी जीवघेणी तडफड,
शेवटचे म्हणून अनंत वेळा अनिमिष नेत्रांनी घेतलेलं कोणाकोणाचं दर्शन आणि प्रत्येक कटाक्षाला अमर्यादपणे वाढवून घेतलेलं ते चिमूटभर अपुरं आयुष्य संपवणारे थकलेले श्वास अजूनही इथेच, माझ्यात गुदमरत आहेत.
बघ, त्यांना माझ्याबाहेर काढ, लाव तुझ्या गुरुत्वाकर्षणाचा फास."

सर्व शक्ती वापरूनही पृथ्वी, हलवू न शके एकही आठवण, काढू शकेना मनाबाहेर.
हताशपणे बोले वसुंधरा "बास रे बास, काय म्हणावे या मोहास? तूच जिंकलास. कसा खेळलास या खेळास?"

मन सांगे, "तुझी शक्ती शरीरापर्यंत, त्यांच्या शेवटापर्यंतच, मी राहतो शिल्लक विश्वाच्या अंतापर्यंत,सगळे अमरजन्म संपेपर्यंत, होऊन ऊर्जामय. तुझ्या अंगावर नटलेल्या, भरलेल्या,मोडलेल्या मायेचा हिसाब मुरलाय माझ्यात.
त्यांत उद्याच्या तुझ्याच नव्या रुपाचे बीज तयार होतं. तुला पुन्हा वठवायची तुझीच भूमिका. सगळी उत्सुक शरीरं, पुन्हा एकदा उगवतील तुझ्या कुशीतून.तुझ्या गुरुत्वाकर्षणाला जागृत करतील, मला परत त्यांच्यात जाऊन तोच मांड परत मांडायचाय, कधीही आधी न मांडल्यासारखा. साक्षी होऊन, निमित्त बनून, मोहवून तुलाही, तुझ्याच आकर्षणास ।"

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

मुक्तकविचार