माझ्या नातवाच्या मते मी सेकंड, थर्ड वगैरे जनरेशनची नव्हे तर अगदीच फर्स्ट जनरेशनची आहे. म्हणजे १-G म्हणे. तो काय बोलतो त्याचं बरेचदा मला ज्ञान नसतं. तो माझ्या खोलीत येतो ते बिजनेस {मराठीत व्यापार डाव } खेळण्यासाठी. त्यात तो सरळ सरळ मला गंडवतो. त्याला कंटाळा येवून त्याने डाव सोडायचं ठरवलं की तो मला विचारतो "कोण जिंकलं ?"
मी तत्परतेने म्हणते,"तू जिंकलास."
मग तो विजयी मुद्रेने हसतो आणि खेळातल्या नोटा आणि कार्डे आवरून ठेवायची मला "विनंती" करतो. मी पण खेळण्याच्या कटकटीतून सुटका झाली या आनंदात नोटा आणि कार्ड गोळा करते.
चुकून मी जिंकले तर तो बिनदिक्कत म्हणतो,"आजी तू चीटिंग केलंस." तो हरायला लागला की पलीकडचा खेळाडू ,मग ते त्याचे आई बाबा असोत की आमच्या स्वैपाकीण बाई. सगळे "चीटिंग"च करतात.
तो इंग्रजी माध्यमात शिकतो. माझे इंग्रजी पूर्वीच्या मॅट्रिक लेव्हलचं. त्याकाळीही स्पेलिंग पाठ करायचा कंटाळा केलेला.
त्यामुळे मला त्याच्याबद्दल आदरच वाटतो. आम्ही कारमधून कुठे कधी जातो तेव्हा रस्त्यात धावणाऱ्या प्रत्येक कारचे मॉडेल तो ओळखतो. त्यातली कित्येक नावं मी ऐकलेलीही नसतात. मला आमच्या गाडीचंही मॉडेल माहीत नाही. गाडीचा नंबरही पाठ नाही. {हे चुकीचं आहे हे मला कळतं. पण लक्षात राहत नाही.}
तो गाडीतल्या सोयीसुविधांचं वर्णन करतो. गाडीला पुढे एक स्क्रीन कसा आहे. त्यावरून फोन कसा लावता येतो. गाणीही लागतात. व्हिडीओ लागतो, पण कार थांबलेली असतानाच. कारने वेग घेतला की आपोआप व्हिडीओ बंद होतो. हे फीचर ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून असतं. पण त्यावरही युट्यूबवरचं कोणतंसं "चीट" करुन ते फीचर टाळता येऊ शकतं. ... दगड, धोंडे नि माती..
ऐकताना माझा चेहरा बथ्थड दिसतो. त्याला मोबाइलमधलं नि कम्प्युटरमधलं सर्व कळतं. मोबाइलच्या कितीतरी कंपन्यांची नावं त्याला माहीत आहेत. त्या त्या मोबाइलची खास वैशिष्ट्यं माहीत आहेत. त्याला घरात किंवा शाळेत मोबाईल फोन अलाउड नसतानाही. तो मला सर्व समजावून सांगत असतो. माझ्या चेहर्यावर तोच आदरयुक्त बथ्थडपणा. माझा मोबाइल आणि लॅपटॉप तोच वापरतो. मोबाइल रीचार्ज करणं. माझा डीपी बदलणं. त्याकरिता माझे फोटो काढणं. विडिओ शूटिंग करणं, अशी कामे तोच करतो.
माझ्याजवळ लॅपटॉप कसा असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर त्याचं उत्तर असं, मी अगदीच फर्स्ट जनरेशनची नसून निदान सेकंड जनरेशनची आहे. किंवा तसं मानायला मला आवडतं. मी थोडी techo savvy आहे असं दाखवण्यासाठी मी तो घेतला. त्यात नोटपॅड मध्ये मी माझ्या कथा, इतर ललितलेखन एका बोटाने कीज दाबत टाईप करत असते. मुलाकडून गुगलचं काहीतरी उतरवून घेतलं आहे, ज्यामुळे थेट मराठीत शब्द उमटतात. ते नंतर पुन्हा एकदा नीट वाचून दुरुस्त करावे लागतात, पण तो माझा प्रॉब्लेम. तरीपण हा लॅपटॉपही बहुदा तोच वापरतो. त्याआधी "मी घेऊ न?" असे तो अदबीने विचारतो. तोपर्यंत स्टार्ट बटण दाबून झालेलं असतं. मीही उदारपणे त्याला "घे" म्हणते. मग तो त्यावर अभ्यास करतो, म्हणजे शाळेत शिकवतात त्यापैकी पॉवर पॉईंट वगैरे. किंवा खेळत बसतो. त्याबद्दल तो मला माहितीही देतो. मी हूं हूं करते. तो माझ्यापेक्षा नक्कीच ज्ञानी आहे. पण एक दोन बाबतीत मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. तो इंग्रजी
मीडियमला आहे आणि त्याने थर्ड लँग्वेज मराठी आणि नव्व्याण्णवावी लँग्वेज संस्कृत घेतलीय. ह्या दोन भाषांचा त्याचा अभ्यास मी घेते. त्यात संस्कृतमध्ये त्याला बऱ्याचदा पैकीच्यापैकी आणि मराठीमध्ये "फॉरटी आउट ऑफ फिफ्टी"च्या पुढे मार्क्स पडतात. ह्यासाठी तो माझ्याशी गहिरी दोस्ती टिकवून आहे. आणखी एका गोष्टीसाठी
तो माझ्याकडे हमखास येतो. त्याच्या कपड्यांच्या दुरुस्तीसाठी.
कुठे बटन तुटलंय, टी शर्ट उसवलाय. अशा वेळी ते दुरुस्त करायला तो माझ्याकडे येतो.
ते मी शिवून देते. ते शिवणकाम तो निरखून पाहतो. त्याच्या चेहर्यावर प्रसन्न कृतज्ञता पसरते. तो माझ्याकडे पाहतो. त्याच्या त्या नजरेसाठी मी त्याच्या कितीही शर्टपॅंटी दुरूस्त करेन.
त्याच्या मालकीच्या निम्म्या वस्तू आणि कागद माझ्याच खोलीत असतात. माझं रायटींग टेबल, कपाट, ड्रावर त्याच्याच
वस्तूंनी भरलेले असतात. माझे पेपरवेट, पेन, पंचिंग मशीन, स्टेप्लर, त्याच्याच मालकीचे असल्याप्रमाणे तो वापरतो. त्याच्या काही गुप्त गोष्टी तो माझ्याबरोबर शेअर करतो. त्या मी कुठेही बोलायच्या नसतात. त्याची अनेक गुप्त कृत्ये, उदा: बाबांसाठी ग्रीटिंग बनवणे, त्यांचे सर्प्राइज गिफ्ट पॅक करणे
-- तो माझ्या खोलीत येऊन करतो. झालेला कचरा उचलायचा कंटाळा करतो म्हणून माझी बोलणी खातो. आमची मैत्री आहे. जनरेशन गॅप आड न येता झालेली. तो माझा खूप लाडका आहे.
दुनियामे सबसे प्यारा.
प्रतिक्रिया
30 Sep 2019 - 1:44 pm | यशोधरा
कित्ती गोड लिहिलं आहे हे!
30 Sep 2019 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लिहिलं आहे. नातवाला कृतक्कोपाने नावं ठेवता ठेवता आज्जीचं नातवाबद्दलचं प्रेम किती भरभरून वाहत आहे, हे लपून राहत नाही... लेखात जागोगागी त्याची उदाहरणे विखुरलेली आहेत !
त्याच्या त्या नजरेसाठी मी त्याच्या कितीही शर्टपॅंटी दुरूस्त करेन.
हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. :)चुकून मी जिंकले तर तो बिनदिक्कत म्हणतो,"आजी तू चीटिंग केलंस." तो हरायला लागला की पलीकडचा खेळाडू ,मग ते त्याचे आई बाबा असोत की आमच्या स्वैपाकीण बाई. सगळे "चीटिंग"च करतात.
यावरून, सद्य राजकारणात त्याला भरपूर वाव आहे. ;) :)30 Sep 2019 - 1:59 pm | रायनची आई
खुपच सुंदर लिहीले आहे :)
30 Sep 2019 - 2:02 pm | बोलघेवडा
फार सुंदर आणि निरागस वर्णन. शेवट थोडा घाईत केल्यासारखा वाटला.
30 Sep 2019 - 2:19 pm | पद्मावति
फार गोड लिहिलंय. मस्तंच.
30 Sep 2019 - 4:49 pm | जालिम लोशन
पैकिच्या पैकी मार्क. आत्ता खर आज्जी शोभता.
30 Sep 2019 - 5:17 pm | श्वेता२४
तुमच्या नातवावर तुमचे खुप प्रेम आहे यात श॑का नाही. अगदी आयडीही आजी या नावाने घेतलाय
30 Sep 2019 - 5:35 pm | उपेक्षित
@ आज्जी खूपच मस्त लिहिले आहे, माझ्या मुलांची पण माझ्या आईशी अशीच दोस्ती आहे (ती पण आहे थोडी techno :)
एखाद्या कट्ट्याच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.
30 Sep 2019 - 6:20 pm | अनिंद्य
क्यूटनेस ओव्हरलोड !
आजी-नातवाचे गुळपीठ आवडले.
1 Oct 2019 - 12:57 pm | विजुभाऊ
क्यूट कथा.
तुमचे आणि नातवाचे घट्ट नाते जाणवते लेखनातुन
1 Oct 2019 - 2:51 pm | चिगो
गोड आहे लेख.. आजीचं नातवंडांशी असलेलं नातं एकदम खास असतं. सुंदर लेख..
मस्त टपली मारलीय.
2 Oct 2019 - 11:59 am | गोंधळी
छान अनुभव.
2 Oct 2019 - 2:46 pm | झेन
१-(आ) जी
2 Oct 2019 - 3:46 pm | दादा कोंडके
भावबंध छान शब्दबद्ध केले आहेत पण (कितीही दुर्लक्ष करावे म्हणलं तरी) आजीचा लॅपटॉप आणि वेगळी खोली, स्क्रीन असलेली कार असे रेफरेन्सेस आले की माझ्या मध्यमवर्गीय मनाला अपील होत नाही.
जीव वाचवत खड्ड्यातून पावसात दुचाकीवरून ऑफिसातून घरी आल्यावर एका मित्राशी बोलणं झाल्यावर काहीतरी कॉमन असलेल्या विषयावर गुजगोष्टी व्हाव्यात आणि घर ते ऑफीस प्रवासाचा विषय निघाल्यावर त्याने गाण्यातली चांगली जागा आल्यावर नॅव्हीगेशनची बाई मध्येच बोलते अशी तक्रार करावी. मी लगेच आखडून घेतो स्वतःला. :(
2 Oct 2019 - 11:03 pm | सस्नेह
ओढाळ, वेल्हाळ मस्त लेखन. आवडले.
माझे आणि माझ्या मुलाचे असेच काहीसे नाते आहे.
3 Oct 2019 - 7:25 am | मृणमय
हे अगदी आमच्या च घरातले ३ वर्ष पूर्वीचे वर्णन वाटत आहे
3 Oct 2019 - 8:38 am | नंदन
घासून गुळगुळीत झालेले दवणीय शब्द न वापरता, स्वतःच्या खास अशा नर्मविनोदी शैलीतलं प्रकटन आवडलं.
4 Oct 2019 - 12:28 pm | आजी
यशोधरा-गोडगोड धन्यवाद.
डॉ.सुहास म्हात्रे-बघूया,राजकारणात जातोय का!
रायनची आई-थँक्यू
बोलघेवडा-शेवट घाईत झाला का?यापुढे काळजी घेईन.
पद्मावति-थँक्यू
जालिम लोशन-शोभते किनै आजी!
श्वेता-होय.सगळीच नातवंडं आजीची लाडकी असतात.
उपेक्षित-बघू कसं जमेल.
अनिंद्य-धन्यवाद.
विजूभाऊ-थँक्यू
चिगो-आवडलं हे वाचून बरं वाटलं.
गोंधळी-थँक्यू
झेन-कोटी आवडली.
दादा कोंडके-मी जशी आहे तशी दाखवलीय. फ्रीली वाचा.
स्नेहांकिता-बरे वाटले.
म्रुण्मय-हो का?
नंदन- थँक्यू नंदन.
4 Oct 2019 - 9:32 pm | दुर्गविहारी
खूपच छान लिहिलं आहे, अगदी आमच्याच घरातील चित्र
24 Dec 2019 - 8:34 am | दीपा माने
मी सुध्दा माझ्या आईपेक्शा (तिच्या आईशी) म्हणजे माझ्या आजीशीच जास्त क्लोज होते त्यामुळे इथे अमेरिकेत सर्व सुविधा असतानाही मला माझी आजीच जवळ हवी होती म्हणुन ती माझ्या दोन्ही प्रेग्नंसीत इथे आली होती. आमचे आजी नातीचे प्रेम सर्व आजी नातींच्या प्रेमाप्रमाणेच घट्ट होते. तुमचे लेख आज प्रथमच वाचते आहे म्हणुन आजच प्रतिसाद देत आहे. लेख खुपच वाचनीय आणि इथे ते सर्वांनाच आपले म्हणुन भावले आहेत तरी सतत लिहीत रहा. धन्यवाद.
21 Jan 2020 - 12:30 pm | आजी
दीपा माने - प्रत्युत्तराला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. तुमचा प्रतिसाद आवडला. आईपेक्षा आजीची माया अनेकदा जास्त असते. प्रतिसादाबद्दल आभार.
21 Jan 2020 - 12:30 pm | आजी
दुर्गविहारी - धन्यवाद