कळावे, लोभ असावा...

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 Sep 2019 - 9:09 pm

सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई. जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे. अशीच पत्रे लिहीता लिहीता मला त्या लेखनाची गोडी लागली. हे लेखन मी आवडीने आणि अगदी भान हरपून करीत असे. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझी पत्रे प्राप्तकर्त्या व्यक्तींना आवडत असत. त्यांपैकी काही तसे पत्रोत्तरातून कळवत तर काही समक्ष भेटल्यावर सांगत. अशा प्रोत्साहनातून माझी ती आवड वाढतच गेली आणि तो आयुष्यातील एक छंद झाला.

ok

सुरवातीचे पत्रलेखन हे आप्तस्वकीयांपुरते मर्यादित होते. पुढे वृत्तपत्रांतून पत्रलेखन चालू केले. तरीसुद्धा या लेखनाची भूक अजून भागत नसे ! मग त्याची व्याप्ती वाढवू लागलो. त्या काळी छापील पुस्तकांचे वाचन बऱ्यापैकी असे. त्यात अभ्यासाची पुस्तके आणि साहित्य या दोन्हींचा समावेश होता. अभ्यासाच्या पुस्तकात काही वेळेस मुद्रणदोष तर कधी ढोबळ चुका सापडत. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. ते पाहून मी बेचैन होई. मग नुसते स्वस्थ न बसता संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवू लागलो. परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत.

साहित्यवाचन करता करता काही विशिष्ट लेखक जास्त आवडू लागले. मग त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यांना पत्राने अभिप्राय कळवू लागलो. सुरवातीस फक्त ‘पुस्तक खूप आवडले’ असे कळवत असे. पण हळूहळू त्यातल्या काही नावडल्या गोष्टींबद्दलही लिहू लागलो. माझ्या पत्रांना काहींची उत्तरे येत तर काहींची नाही. नमुन्यादाखल काही लेखकांचा उल्लेख करतो. रणजित देसाईना ‘राधेय’ आवडल्याचे कळवले होते. त्यांनी सामान्य वाचकांना उत्तरांसाठी स्वतःचे नावपत्ता छापलेली पोस्टकार्डे तयार ठेवलेली होती. त्यावरील त्यांच्या हस्ताक्षरातील चार ओळीदेखील बहुधा ठराविक असाव्यात. पण तरीही, “आपल्यासारख्या जाणकार वाचकांची पत्रे लेखकाला नेहमीच समाधान देतात”, हा मजकूर त्या वयात मला नक्कीच सुखावून गेला.

सुनीता देशपांडेंचे पत्रोत्तर चक्क मजेशीर होते. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. ते पत्र पाहा :

ok

हमो मराठेंच्या काही कादंबऱ्यात पात्रांच्या संवादांत इंग्रजी वाक्यांचा अतिरेक झालेला होता. शेवटी मी वैतागून त्यांना लिहीले की मराठी पुस्तकात हे जरा अतिच होतंय. याची दखल घेणारे त्यांचे उत्तर आले. त्यांनी स्पष्टीकरण असे दिले होते. आपण सगळे उच्चशिक्षित सध्या ‘हिंग्लिश/ मिंग्लिश/ इंग्राठी/ मिंदी’ अशा प्रकारची भेसळ भाषाच बोलत आहोत. त्यामुळे कादंबरीतील पात्रेही तशीच बोलणार !

माझ्या या साहित्यिक पत्रव्यवहारात वपु काळेंचा अनुभव अनोखा आहे. त्यांच्या लेखन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आता आठवत नाही. त्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या होत्या. त्या पाहून मी खूप अस्वस्थ झालो. एखाद्या नामवंत लेखकाच्या पुस्तकातील अशा चुकांमुळे लेखकाची प्रतिमा डागाळली जाते. त्या चुका नक्कीच लेखकाच्या नसून मुद्रितशोधनातील दुर्लक्षामुळे झाल्या असणार याची मला खात्री होती. आता वपुंना लिहू का नको या संभ्रमात होतो. पण त्या आधी त्यांचे ‘प्लेझर बॉक्स’ पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी सुमारे पन्नास हजार वाचकांच्या पत्रांना स्वहस्ताक्षरात उत्तरे लिहिल्याचे नमूद केले होते. मग अजून काय पाहिजे ? म्हटलं, आपणही लिहायचे बिनधास्त. बघू काय होतंय ते. मग एक अंतर्देशीय पत्र त्यांना लिहीले. “अशा गोष्टी प्रकाशकांना लिहून फारसा उपयोग होत नाही. मात्र लेखक अधिक संवेदनशील असल्याने तुम्हाला हे कळवत आहे”, असे मी लिहीले. त्यावर सुमारे ३-४ महिने गेले. काही उत्तर नव्हते. म्हटलं ठीक आहे. वयोपरत्वे ते आता थकले असतील. मला पत्रोत्तर आले नाही पण पुढे एक सुखद प्रसंग घडणार होता. एव्हाना मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो होतो. अशात एका रविवारी सकाळी बायकोशी निवांत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात घराची बेल वाजली. दार उघडून पाहतो तर समोर एक अनोळखी गृहस्थ. त्यांना आत बोलावले. त्यांनी लगेच खुलासा केला. त्यांच्या पिशवीतून एक पुस्तक काढून ते म्हणाले, “ मी मुंबईहून आलोय, मला वपुंनी पाठवलंय. तुमच्यासाठी हे पुस्तक भेट दिले आहे त्यांनी”. ते पुस्तक होते ‘चिअर्स’. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख ! तेव्हा मला झालेला आनंद काय सांगू? हे त्यांचे एक जुने पुस्तक होते. त्याचा माझ्या पत्रातील पुस्तकाशी काही संबंध नव्हता. मग ते गृहस्थ मला म्हणाले, “ तुमची तक्रार वपुंनी प्रकाशकाला कळवली आहे. तुमच्या पत्रात जर तुमचा फोन क्रमांक असता तर वपुंना तुमच्याशी बोलायची इच्छा होती”. असा हा आगळावेगळा आणि सुखद अनुभव.

काही लेखकांनी पत्रोत्तर देण्यासाठी लेखनिक ठेवलेले होते. हे मी कसे ओळखले ते सांगतो. त्यांच्या पत्रातील मजकूर अगदी सुवाच्य आणि नीटनेटका दिसे आणि त्याखाली असलेली लेखकाची सही अगदी वेगळ्या धाटणीत आणि स्पष्टपणे वेगळ्या शाईत केलेली दिसे. अरुण साधूंचे असे एक पत्र माझ्याकडे आहे.
अशा छान अनुभवांतून पत्रलेखनाची नशा वाढतच जाई. मग या यादीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, संपादक, उद्योगपती, काही सत्कारमूर्ती यांचीही भर पडली. त्या सर्वांचीच उत्तरे येत नसत पण त्यांना लिहीण्याचा आनंद काही औरच असे. उद्योगपतींत राहुल बजाज आणि फिरोदिया यांचे अनुभव सुखद आहेत. त्या काळी मी बजाज-चेतक ही स्कूटर वापरत होतो. ती वापरणाऱ्या लोकांना साधारण जे मायलेज मिळे त्याच्यापेक्षा तब्बल २० किमी मला जास्त मिळत होते. ‘टू- स्ट्रोक’च्या जमान्यात हे एक भलतेच नवल होते. खूप मित्रांना त्याचे आश्चर्य वाटे. एकाने तर माझ्याशी त्यावर चक्क पैज लावली होती आणि प्रात्यक्षिक झाल्यावर तो ती हरला होता ! मग काय, माझे हात शिवशिवू लागले आणि लिहीले पत्र बजाज यांना. पत्ता जरी कंपनीचा घातला होता तरी ते त्यांना नावाने लिहीले होते. पत्रात अर्थातच त्यांचे कौतुक आणि मी या अतिरिक्त मायलेजवर जाम खूष असल्याचा मजकूर. तसेच एखादीच स्कूटर असा अत्युत्तम अनुभव कसा देऊ शकते, याचे स्पष्टीकरणही मी विचारले होते. पंधरवड्यातच त्यांचे सुरेख उत्तर आले. इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवर टाईप केलेलं. त्याकाळी सरकारी आणि सामन्य टंकलेखन साध्या टाईपरायटरवर होत असे. मोठ्या खाजगी उद्योगांची पत्रे नुकतीच इलेक्ट्रोनिक यंत्रावर येऊ लागली होती आणि ते टंकलेखन पाहणे हेही डोळ्यांना सुखद वाटे ! बजाज यांच्या त्या उत्तरापाठोपाठ त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापकाचेही मायलेजचे स्पष्टीकरण देणारे वेगळे पत्र आले – ते मात्र साध्या टाईपरायटरवर लिहिलेले होते.

फिरोदियांचा अनुभव जरा वेगळ्या प्रकारचा आहे. त्या काळी ‘कायनेटिक’ची एक दुचाकी खूपच गंडली होती. ती गाडी खरेदीच्या पहिल्याच वर्षात सतत दुरुस्त्या काढी. मुख्य म्हणजे सुरु होतानाच रुसायची ! त्यांच्या सेंटरला खेटे मारून जाम वैताग आला होता. तिथल्या ‘अधल्यामधल्यांना’ भेटून काही उपयोग झाला नाही. मग सरळ कंपनी मालकांनाच सविस्तर पत्र लिहून आता ‘दुसरी नवी गाडीच बदलून द्या’ असे लिहीले. त्यावर उत्तर नाही आले पण तीनच दिवसात कंपनीचा एक अभियंता आमच्या दारात हजर ! मग त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या कारखान्यात नेली व दुरुस्त करून शून्य बिलासह यथावकाश घरपोच केली. अर्थात नंतर ते मॉडेलच कंपनीने बंद केले.

मराठीतून दीर्घ पत्रलेखन करतानाचा एक विशेष अनुभव नोंदवतो. त्या काळी लेखनासाठी बॉलपेन आणि फौंटनपेन असे दोन्ही पर्याय प्रचलित होते. जातिवंत लेखक फौंटनपेन वापरत. आपण जर का बराच मोठा मराठी मजकूर बॉलपेनने लिहिला तर बोटे दुखून येत. इंग्रजी मजकूर लिहिताना मात्र ती तेवढी दुखत नसत. याचे कारण म्हणजे देवनागरी अक्षरांना बऱ्यापैकी गोलाई असते. याचा अनुभव घेतल्यावर मराठी लेखन कटाक्षाने फौंटनपेनने करू लागलो. पत्रलेखनातील अजून एक मुद्दा सांगतो. मी जेव्हा पत्र लिही तेव्हा त्यावर वरच्या कोपऱ्यात दिनांक घालायचे हमखास विसरत असे. एकदा मी एका वृत्तपत्राच्या संपादकांना एक तक्रारपत्र लिहीले होते. त्याचे उत्तर देताना त्यांनी “तुमचे (दिनांक नसलेले) पत्र मिळाले..” अशी सुरवात केली होती. त्यानंतर दिनांक हटकून लिहायची मला सवय लागली.

असेच पत्रलेखन जोशात चालू होते. मग एकदा असे वाचनात आले की देशातला कोणीही नागरिक थेट पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि त्याची दखल घेण्याची यंत्रणा असते. म्हटलं, चला आता ही पण हौस पुरी करू. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. मग त्यांना लिहीले एक कौतुकाचे पत्र. मनाशी विचार असा केला. जर आपण तक्रारीचे पत्र लिहीले तर त्यांचे सचिव स्वतःच्या पातळीवरच त्याला केराची टोपली दाखवतील ! त्यापेक्षा कौतुकाचेच लिहा ना, म्हणजे बहुतेक ते सचिवांच्या चाळणीतून पुढे सरकेल आणि योग्य त्या टेबलावर पोहोचेल. बस्स, माझ्याकडून मी ते टपालपेटीत टाकले खरे. पुढे ते पोचले की नाही, पोचले असल्यास चाळणीतून पुढे सरकले का टोपलीत गेले हे कळण्यास काही मार्ग नाही.

सन २००० उलटले आणि हळूहळू आपल्याकडे संगणकाचा वापर वाढू लागला. त्याचबरोबर हाताने पत्र लिहिण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आणि आजची परिस्थिती तर आपण जाणतोच. संगणकाच्या सुरवातीच्या दिवसात ‘इ-मेल’ चे कौतुक आणि अप्रूप होते. त्यामुळे त्या माध्यमातून पत्रलेखन करीत राहिलो. विशेषतः परदेशी पत्रव्यवहारासाठी ते फारच स्वस्त आणि मस्त माध्यम होते. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची मला आलेली एक इ-मेल संस्मरणीय आहे.

गेल्या ५ वर्षांत मात्र या छंदाला ओहोटी लागली आहे. ऐन तारुण्यात आपण जोशपूर्ण असतो. समजा आपण पाठवविलेल्या पत्रांपैकी निम्म्यांना जरी उत्तरे आली तरी मी खूष असे. इ-माध्यमांचा प्रसार वाढल्यावर वास्तविक पत्रोत्तर देणे हे सोपे झाले होते. पण व्यक्तिगत अनुभव मला तरी उलटाच येऊ लागला. उत्तराचे प्रमाण जुन्या जमान्यापेक्षा काहीसे कमीच होऊ लागले. तक्रार किंवा शंका विचारली असताही पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. तेव्हा आता हौसेच्या पत्रलेखनाला मुरड घालावी हे बरे. उत्तर न आल्याने होणारा विरस आता अधिक जाणवतो. तेव्हा उगाचच आपणहून (कुठलेही व्यावहारिक काम नसताना) लिहिणे टाळलेले बरे, ही भावना बळावली आहे. एखादे वेळीस जर पत्र लिहिण्याची उर्मी आली तर “जाऊदे, मरूदे, बास झाल्या लष्कराच्या भाकऱ्या”, असे म्हणणारे दुसरे मन वरचढ होत आहे. कालानुरूप आपण बदलत राहावे हे बरेच. लिखित जमान्यात आलेली पत्रोत्तरे मात्र व्यवस्थित जपून ठेवली आहेत. ती जाडजूड फाईल अधूनमधून चाळणे हे सुरेख स्मरणरंजन असते खरे ! ती चाळतानाच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
.......

हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही असे काही अनुभव असल्यास जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************************************************

समाजविचार

प्रतिक्रिया

मारवा's picture

29 Sep 2019 - 9:59 pm | मारवा

तुमचे पत्रलेखनाचे अनुभव रोचक आहेत.

मायमराठी's picture

29 Sep 2019 - 11:55 pm | मायमराठी

गो नी दा गेल्यानंतर सौ.वीणा देव यांना पत्र लिहिले होते. गो नी दांनी माझ्या आयुष्यात त्यांच्या लेखनाने केलेली मुक्त व अतिशय हवीहवीशी केलेली ढवळाढवळ हा विषय होता. चांगले 4 फुलस्केप भरून मोठ्ठ्या लखोट्यातून पाठवले होते. वीणाताईंचे उत्तर आले. दादर ला त्यांचा पडघवली या कादंबरीच्या अभिवाचनाचा कार्यक्रम होता तेव्हा भेटायला बोलावले . गेलो भेटलो नमस्कार चमत्कार झाले मग त्यांनी विचारले," पत्र कोणी लिहिलं होतं?" मीच लिहिल्याचं सांगितलं जे त्यांना पूर्णतः पटलं नाही. तोवर त्यांचे पती विजय देव तेथे आले. वीणाताई म्हणाल्या,,"ते मोठे पत्रवाले ..." वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्यांनी विचारलं," ते पत्र लिहिणारे तुमचे कोण? " विशीतील माझ्याकडे बघून त्यांना आश्चर्य लपवता येत नव्हतं. उत्तरलो," लिहिणारा माझा मीच." वीणाताईंनी त्यांच्या दोन्ही मुलींना मृणाल व मधुरा यांना बोलावून माझ्या लखोट्याच्या आकारावरून माझी ओळख करून दिली. स्पष्टपणे व प्रेमळपणे बोलल्या,," रागावू नका पण तुमच्या वयाची मुलं अप्पा वाचतात आणि तुम्ही लिहिता तसं लिहीत नाहीत, असं वाटलं." खूप गप्पा झाल्या, अप्पांच्या ओळखीने उजाळा मिळाला. जाताजाता " अप्पा असताना का नाही हो लिहिलंत, त्यांना किती आनंद झाला असता माहितेय का? तुम्हाला भेटता आलं असतं." असं म्हणाल्या. बस्स ह्यात सगळं भरून पावलो.
हस्तलिखित पत्रांची जादू टंकनात नाही. पत्र लिहिण्याची व वाचण्याची भूक असावी लागते. विचार जणू धान्यांचे दाणे जे पक्षीरुपी शब्द उचलून पल्याड नेतात कोणाचीतरी भूक भागवायला...

वरील चौघांचेही आभार !

मारवा,

उद्घाटन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मायमराठी,
असेच सुंदर लेखन चालू ठेवा !

हस्तलिखित पत्रांची जादू टंकनात नाही.

>>>> + १लाख ! हस्ताक्षरातून संबंधित व्यक्ती आपल्याशी ‘बोलत’ असते.

कुमार सर,

तुमचे स्मरणरंजन छान आहे.
त्याकाळी तुम्हाला पत्र मित्र (पेन फ्रेंड्स) होते का?
असतील तर त्यावर देखील लिहा, हि विनंती.

सोत्रि's picture

3 Nov 2019 - 3:51 pm | सोत्रि

तेतोतंत हेच म्हणतो!

- (हस्तलिखीत पत्र लिहून ‘य’ काळ झालेला) सोकाजी

अरे वा ,छान अनुभव आहेत. हा छंद आवडला. पत्रामुळे लेखकांना प्रोत्साहन मिळते हे नक्कीच. ते उत्तर देवोत अथवा नाही. पत्र हाताने लिहिली जात असत आणि त्यातली गम्मत न्यारीच असते.
आतापर्यंत मी फक्त प्र के घाणेकरांनाच पत्र लिहिले आहे. त्यांचे चार दिवसांंत स्वहस्ताक्षरी उत्तरही आले. ते जपून ठेवले आहे. तर सांगायचा मुद्दा असा की अशी प्रसिद्ध व्यक्तिंनी लिहिलेली पत्रे एक ठेवा असतो. इमेलमुळे तो हरवला.

वर्तमानपत्रांतील लेखांना इमेल करून पाहिलेत वीसेक. लोकसत्ताच्या लेखांना लेखकांचे वैयक्तिक इमेल पत्ते असतात. त्याचे उत्तर त्याच दिवशी आणि कधीकधी एकदोन तासांतही आले आहे. मटा'च्या लेखांना अमुक @मटासंवाद असा पत्ता असतो ते इमेल मटा पेप्राकडेच जात असावेत. कारण त्यास कधी उत्तर आले नाही. किंवा इमेलच्या सोयीमुळे भरमसाठ मेल येत असतील त्यास उत्तरच नव्हे तर ते सर्व वाचणेही अशक्य होत असेल.
पोस्टकार्ड म्हटले की दोन गोष्टी लगेच लक्षात येतात त्या म्हणजे 'उघड' आणि 'थोडक्यात' यामुळे लगेच लक्ष दिले जात असेल. तिसरी गोष्ट म्हणजे पुरावा. टिवी चानेल्सचे सूत्रधार प्रत्यक्ष आलेल्या पत्रांचा ढीग दाखवून त्यातली पाच दहा वाचून दाखवताना पाहतो.
----
हा लेख दिवाळी अंकासाठी दाबून न ठेवता आताच दिलात हे आवडले. अंकाच्या अपेक्षा उंचावल्यात.

कुमार१'s picture

30 Sep 2019 - 8:13 am | कुमार१

चामुंडराय,
धन्यवाद.

त्याकाळी तुम्हाला पत्र मित्र (पेन फ्रेंड्स) होते का?

>>>> सुरवातीस ३-४ होते. पण, दीर्घकाळ (सुमारे २० वर्षे) मैत्री फक्त एकांशीस टिकली. आम्ही दोघेही वृत्तपत्रलेखक असल्याने असेल. पुढे इ-माध्यम आल्यावर काही काळ इ-मेल्स झाल्या. त्यानंतर त्यांना ‘कायप्पा ग्रुप’ मध्ये रस असल्याने आणि मला अजिबात नसल्याने सध्या तरी ती लिखित मैत्री थांबली आहे.

कंजूस,
धन्यवाद.

पत्र हाताने लिहिली जात असत आणि त्यातली गम्मत न्यारीच असते.

>>>> +११११

हा लेख दिवाळी अंकासाठी दाबून न ठेवता आताच दिलात हे आवडले.

>>>>>> दिवाळी अंकासाठीचा लेख या आधीच पाठवून दिल्याने आता नियमित लेखनाला रान मोकळे आहे !

यशोधरा's picture

30 Sep 2019 - 10:02 am | यशोधरा

चांगलं लिहिलंय.

जॉनविक्क's picture

30 Sep 2019 - 10:32 am | जॉनविक्क

पूर्वी पत्र म्हणजे खरेच जिव्हाळ्याचा विषय असे, पण आपल्या प्रमाणे साहित्यिकांसोबत पत्रव्यवहार करायची आपली हिम्मतच नाय.

जालिम लोशन's picture

30 Sep 2019 - 10:45 am | जालिम लोशन

सुरेख

अनिंद्य's picture

30 Sep 2019 - 10:49 am | अनिंद्य

स्मरणलेखन छान.

हाती लिहिलेले पत्र आता दुर्मिळ हे खरेच. पण आयुष्याचा सगळा सोहळाच आता 'स्क्रीन'वर स्थानांतरित झालाय. अँड दॅट्स ओके टू :-)

सुधीर कांदळकर's picture

30 Sep 2019 - 10:53 am | सुधीर कांदळकर

मिपावर तारीख आपोआप पडते. आपला २९ तारखेचा लेख आवडला. मन ताजेतवाने करणारा टवटवीत लेख. धन्यवाद.

आमच्या चि.चा जन्म कारवारला झाला. तेव्हा तीन महिने आमचा पत्रव्यवहारच होत असे. फक्त पुत्रजन्माची तार आली होती. एसटीडीच्या त्या काळात घरी फोन नव्हता आणि कार्यालयात मी फोनजवळ नसे.

मी कार्यालयात कुणालाही लेखी सूचना देतांना कागदावर तारीख टाकत असे. पण तारीख मला कधीच आठवत नसे आणि मी सूचना चिठी ज्याला द्यायची त्यालाच विचारत असे. एवढेच काय त्याच माणसाला दुसरी सूचना लिहितांना पुन्हा तारीख विचारत असे. यादव नावाचे एक गृहस्थ पुन्हा तारीख विचारली की आता पुन्हा तारीख विचारली तर दंड द्यावा लागेल म्हणून सांगत असत.

एकदा मी एक दोनअडीच पानी पत्र लिहिले आणि पत्ता न टाकता पाकीट पोस्टात टाकले होते. आणि पत्र टकल्यावर ते ध्यानात आले होते. तर एकदा पत्र हातात ठेवून रिकामे पाकीट पत्ता लिहून पोस्टात टाकले होते.

कुमार१'s picture

30 Sep 2019 - 11:28 am | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

आयुष्याचा सगळा सोहळाच आता 'स्क्रीन'वर स्थानांतरित झालाय

>>>> + १११.

मिपावर तारीख आपोआप पडते >

>>

इ-युगात अशा बऱ्याच गोष्टींची आपोआप काळजी घेतली जाते. त्याने आपणही काहीसे बेफिकीर होतो.

पण तारीख मला कधीच आठवत नसे

>>>>
तुम्हीच काय, हे विस्मरण ५०% लोकांना लागू आहे !

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2019 - 11:29 am | प्रकाश घाटपांडे

सध्याच्या काळात ईमेल्सचा कचरा वाढत असल्याने समोरच्याने नक्की वाचावे असे वाटत असल्यास लिखित पत्र पोस्टाने पाठवावे.

prahappy's picture

30 Sep 2019 - 2:47 pm | prahappy

खूप आठवणी ताज्या केल्या बद्दल मनापासून धन्यवाद . काही इकडे लिहितो.

१. आम्हाला शाळेत पत्रलेखनाचा एक छान उपक्रम होता , 'एकाच' वर्गात असणाऱ्या मित्राला रोज विचारायचो अरे आला का पत्र ? पोस्टमन चा त्याच्या आधी संबंध एवढा जवळचा कधीच वाटला नव्हता तो मात्र तेव्हापासूनच झाला ( आता फक्त दिवाळी ला भेट होते )

२. आई वडिलांनी लहानपणी हाणला होता आणि आमच्या कडे काही ठिकाणी होते तशी नंतर " ऐकत जा रे म्हणजे असं आम्ही तरी का वागू " असा लडिवारपणा कधीच होत नसे , त्याच परिस्थिती मध्ये मी फुगून बसलेला असताना मी माझ्या आत्याला ( मुंबईला ) पत्र लिहिला होता की आई वडील कसे चुकीचे वगेरे वेगेरे
त्याला उत्तर अर्थात खूप दिवसांनी आलं , तो पर्यंत सगळं आलबेल झाला होतं पण तरी पण आत्याचं उत्तर वाचून खूप भारी वाटलं होतं आणि आजही त्या बद्दल आठवलं कि भावुक व्हायला होतं.

कुमार१'s picture

30 Sep 2019 - 3:17 pm | कुमार१

प्रकाश, चांगली सूचना !

Prahappy,

आजही त्या बद्दल आठवलं कि भावुक व्हायला होतं.

>>>> +11

पद्मावति's picture

30 Sep 2019 - 4:16 pm | पद्मावति

खूप छान लिहलंय.

कुमार१'s picture

1 Oct 2019 - 9:02 pm | कुमार१

पद्मावती , आभार !

पत्रलेखनाचा एक अनोखा उपक्रम माझ्या माहितीतील एक गृहस्थ गेली २५ वर्षे राबवत आहेत. रोज सकाळी आकाशवाणीवर ‘चिंतन’ कार्यक्रम असतो. ते तो न चुकता ऐकतात. त्यांचा मुलगा परगावी असतो. त्याच्या व्यग्र जीवनशैलीत तो काही हा कार्यक्रम ऐकत नाही. हे गृहस्थ रोज त्या कार्यक्रमाचा सारांश एका पोस्टकार्डावर लिहितात आणि ते पत्र मुलाला रोज पाठवतात. तो सवडीने वाचतो.

त्यांची ही दीर्घ चिकाटी पाहून त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदवले गेले आहे !

जी ए कुलकर्णी व सुनीता देशपांडे यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित अभिवाचन कार्यक्रम पुण्यात जुलै ते डिसेंबर २०१९ दरम्यान होत आहे.
इच्छुकांसाठी बातमी इथे:

https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=4

कुमार१'s picture

2 Nov 2019 - 7:07 pm | कुमार१

पोस्टमनच्या आयुष्यावर आधारित ‘पोस्टकार्ड’ हा मराठी चित्रपट पाहिला. गिरीश कुलकर्णी पोस्टमनच्या भूमिकेत. अन्य कलाकारही सर्व उत्तम आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.

मस्तच ! जरूर पाहण्यासारखा. प्राईमवर आहे.

चित्रगुप्त's picture

2 Nov 2019 - 10:32 pm | चित्रगुप्त

लेख खूपच आवडला.
माझे काही अनुभवः ईमेलपूर्व काळात लहानपणीच्या मित्रांना मी नेहमी मोठमोठी पत्रे पाठवायचो. एवढेच काय 'संपादकांना पत्र' लिहीणार्‍यांनाही त्यांचा पत्ता त्यात असेल तर पत्रे पाठवायचो. त्याकाळी (१९८७-९७) ऑफिसात मला बराच मोकळा वेळ मिळायचा, त्यात मी हे पत्रलेखन, डायरी लेखन आणि ओशोंची मोठमोठी पुस्तके वाचणे हे उद्योग केले.
फाऊंटनपेनाने काळ्या शाईत 'घडसुन सुंदर' केलेल्या अक्षरात लिहीणे हाच फार मोठा आनंद वाटायचा (ही शाई पण मी मुद्दाम अमेरिकेतून मागवलेली होती, ती एक पौंडाची बाटली अजून माझ्याकडे आहे. शाईला एक विशिष्ट प्रकारचा, ओळखीचा वाटणारा वास यायचा, पण मला तो नेमका कधीच ओळखता आला नाही. पुढे अनेक वर्षांनंतर एकदा बेलफळाचे सरबत प्यायलो, तेंव्हा तो वास बेलफळाचा होता हे जाणवले)
कधीकधी दासबोधाच्या शैलीत एकामागोमाग ओव्या सुचत जात, ती ओविबद्ध पत्रे पण बरीच लिहीली. पुढे पुढे मी माझी पत्रे एका रजिस्टरात लिहून त्याची फोटोकॉपी पोस्टाने पाठवायचो. ती सर्व रजिस्टरे माझ्याकडे आहेत, मात्र आता सगळे आवरते घेण्याची वेळ आलेली असल्याने त्यांचे काय करावे हा प्रश्नच आहे. (आमच्या USIS ऑफिसात अतिशय उत्तम दर्जाच्या कागदाची हिरवे बाईंडिंग केलेली रजिस्टरे मिळत त्यावर मी ही पत्रे आणि डायरी लिहायचो, तर मुंबईच्या USIS मधे मंगेश पाडगावकर त्यांच्या कविता तसल्याच रजिस्टरात अतिशय सुंदर अक्षरात लिहायचे. मी कामनिमित्त तिथे गेलो की ते फार प्रेमाने मला नवीन कविता ऐकवायचे)
या सर्व आठवणी आज हा लेख वाचताना जागृत झाल्या. अनेक आभार.

ओविबद्ध पत्रे पण बरीच लिहीली. पुढे पुढे मी माझी पत्रे एका रजिस्टरात लिहून त्याची फोटोकॉपी पोस्टाने पाठवायचो. ती सर्व रजिस्टरे माझ्याकडे आहेत,

काही पर्सनल उल्लेख असले तर ते टाळून एखादे ओवीपत्र टाका की इथे. तुमचे अक्षरही दाखवा.

कुमार१'s picture

3 Nov 2019 - 9:44 am | कुमार१

चित्रगुप्त, धन्यवाद.

तुमचेही अनुभव आवडले. काळ्या शाईचा किस्सा रोचक. त्याकाळी एखाद्याने विशेष कामगिरी केली असल्यास त्याला ‘पार्कर’चे फौंटनपेन भेट देत असत. तो बहुमान समजला जाई.

डीप डाईव्हर's picture

16 Sep 2020 - 1:19 pm | डीप डाईव्हर

सुरस कथे मुळे तुमचा सुरेख लेख वाचायला मिळाला 👍

कुमार१'s picture

16 Sep 2020 - 1:25 pm | कुमार१

डी डा
धन्यवाद आणि मिपावर स्वागत
शुभेच्छा !

खरच पत्र पाठवणे ,लिहिणे आणि उत्तरांची वाट पाहणे.सुंदर अनुभव असायचा.सुंदर व्यक्त केलाय अनुभव !
माझा भाऊ सैनिकी होस्टेलला होता.शिस्त कडक तेव्हा त्याला करमायच नाही त्याला.मी खुप पत्र लिहून धीर द्यायचे त्याला.आणि तोही आम्हाला पत्राने उत्तर द्यायचा.पत्रांची ही आठवण मनात फार कोरली गेलीय.आता forwarded मेसेज त्या भावना बोथट केल्यात.यावर एकदा लिहणार आहे,पण ती पत्रे सापडत नाहीत पण आठवतात.
सुरेख!!

कुमार१'s picture

16 Sep 2020 - 6:47 pm | कुमार१

धन्यवाद.

यावर एकदा लिहणार आहे,पण ती पत्रे सापडत नाहीत पण आठवतात.

जरुर लिहा.

कुमार१'s picture

21 Jul 2021 - 5:42 pm | कुमार१

1973 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेआरडी टाटा यांना लिहिलेले एक पत्र सध्या माध्यमांमधून झळकते आहे.
ते इथे पाहता येईल :
https://www.livemint.com/news/india/indira-gandhi-s-letter-to-jrd-tata-g...

त्या पत्राचा सरकारी कागद, साध्या टाईपरायटरने केलेले टंकलेखन, इत्यादी गोष्टी आता बघायला रोचक वाटतात.

प्रदीप's picture

21 Jul 2021 - 9:52 pm | प्रदीप

तुमच्या लेखांत सुनिताबाईंच्या तुम्हाला आलेल्या पत्राचे चित्र टाकले होतेत. आता,बहुधा ती होस्टींग साईट नाहीशी झाल्यामुळे, दुवा निखळला आहे, व चित्र दिसत नाही. कृपया, शक्य झाल्यास, प्रतिसादांतून ते पुन्हा द्यावे. धन्यवाद.

कुमार१'s picture

22 Jul 2021 - 7:44 am | कुमार१

हे पाहा :

ok

प्रदीप's picture

22 Jul 2021 - 12:51 pm | प्रदीप

धन्यवाद.

कुमार१'s picture

22 Jul 2021 - 2:04 pm | कुमार१

एक गंमत झाली.
वरच्या प्रतिसादात नव्याने चित्र चढवल्यानंतर लेखातील नाहीसे झालेले मूळ चित्र देखील पुनरुज्जीवित झाले ! :))

कुमार१'s picture

15 Feb 2022 - 8:36 am | कुमार१

लेखात मी राहुल बजाज यांनी लिहिलेल्या सुरेख पत्रोत्तराचा उल्लेख केला आहे.

सुरेख पत्रोत्तर लिहिणे ही बजाज यांची खासियत होती याचा एक अनुभव इथे आहे:
https://www.aksharnama.com/client/article_detail/5829

"नोकरी न देऊनसुद्धा मी राहुलकुमार बजाज यांचा जन्माचा ऋणी आहे!"
- मुकुंद टाकसाळे

या लेखात टाकसाळे व बजाज यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख आहे तो किस्सा भलताच रोचक आहे जरूर वाचा.

कुमार१'s picture

16 Aug 2022 - 7:32 am | कुमार१

‘पिन कोड’ची पन्नाशी ; तंत्रज्ञान युगातही सहा अंकांना महत्त्व

संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्तर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या ‘पिन कोड’ पद्धतीचा शोध लावला.

सतिश गावडे's picture

16 Aug 2022 - 9:00 am | सतिश गावडे

१९७२ म्हणजे अगदी अलीकडील काळ आहे आणि ही पद्धती तोपावेतो इतर प्रगत देशात आधीपासून वापरात असावी. उदा. अमेरिकेत पिन कोडच्या धर्तीची झीप कोड ही व्यवस्था July 1, 1963 पासून वापरात आहे

कुमार१'s picture

16 Aug 2022 - 9:52 am | कुमार१

'भारतात सुरु केली' असे बातमीत असायला हवे होते.

जेम्स वांड's picture

16 Aug 2022 - 9:56 am | जेम्स वांड

Zip कोडचा लाँग फॉर्म पण आहे

झोनल-इंप्रुवमेंट-प्लॅन

(एकदम लॉर्ड फोकलंड फिलिंग)

१. अनमोल प्रकाशन पुणे, अप्पा बळवंत चौक, पुणेला लिहिलेले पत्र ११ वर्षांचा असताना, ग्रंथसुची मिळवण्यासाठी (एका पत्रावर ती चोपडी वजा पुस्तिका घरी आल्यावर लई भारी feel आला होता)

२. १३ वर्षांचा असताना डॉ. जयंत नारळीकरांना पत्र लिहून आकाशगंगा इत्यादींचे बाळबोध प्रश्न विचारले होते, आकाशाशी जडले नाते हे जड पुस्तक आवडल्याचे कळवले होते, उत्तर त्यांचे हस्तलिखित किंवा छापील आले नाही, तर आयुका बद्दल माहिती देणारी छोटी पुस्तिका आणि सही करून पाठवलेले त्याकाळी नवीन सुरू झालेल्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नावाच्या शिष्यवृत्ती योजनेचे एक विस्तृत पत्रक, सोबत मराठीत शुभेच्छा असे लिहून आलेले होते, कैक वर्षे पलंगाखाली दाबून ठेवलेली ही संपत्ती नंतर बुरशी लागून खराब झाली अन् नष्ट झाली (अर्थात त्या दिशेने करियर इत्यादी केले नाही कधीच) ह्यांचे मात्र वैषम्य कायम असेल.

कुमार१'s picture

16 Aug 2022 - 10:18 am | कुमार१

आयुका बद्दल माहिती देणारी छोटी पुस्तिका आणि सही करून पाठवलेले त्याकाळी नवीन सुरू झालेल्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नावाच्या

>>>
बरोबर ! एखाद्या कार्यक्रमात त्यांच्याभोवती जर सही द्या म्हणून घोळका झाला तर ते देत नसत असे ऐकले आहे.
ते सांगायचे, की तुम्ही मला एखादा प्रश्न विचारलेले पोस्टकार्ड पाठवा. मग त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवीन.

कुमार१'s picture

25 Oct 2022 - 11:46 am | कुमार१

नुकतेच पत्रलेखन या विषयावरील एक पुस्तक अचानक भेट मिळाले. त्याचा अल्पपरिचय :

पत्रास कारण की…
अरविंद जगताप
ग्रंथाली प्रकाशन.
१२ वी आवृत्ती, २०१९.

पूर्वी झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मध्ये वाचन झालेल्या पत्रांचा हा संग्रह आहे. पुस्तकाची प्रस्तावना खूप आवडली. हस्ताक्षरातील पत्रलेखनापासून ते अलीकडे इ माध्यमांमधील संपर्कापर्यंत जो बदल झाला, त्याचा आढावा घेतला आहे. मागच्या पिढीतील ज्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रलेखनाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे सुरेख स्मरणरंजन आहे. पूर्वीच्या आणि आताच्या लेखनमाध्यम व पद्धतीबाबत समतोल विचार मांडलेले आहेत.

त्यातले काही मुद्दे:
१. जुनं ते सर्वच सोनं नव्हतं.
२. तंत्रज्ञान हा शाप नाही. त्याच्यामुळे मानवी कष्ट कमी होतात. कष्ट हे किमान पातळीवर जरूर यावेत परंतु संस्कृतीसह ते नष्ट व्हायला नकोत.

३. आपण आता गुगलवर नको इतके अवलंबून आहोत का ? त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीवर विपरीत परिणाम होतो आहे का?
४. प्रिय व्यक्तीचे हस्ताक्षरातील पत्र हे वाचणाऱ्याला गदगदून हलवू शकत होते. तोच अनुभव इ -संपर्काबाबत येत नाही.

पुस्तकात एकूण ५० पत्रे आहेत. प्रत्येक पत्र समाजातील एखाद्या व्यक्तीला उद्देशून लिहिलेले आहे. त्यामध्ये सामान्यजन, लेखक, खेळाडू, समाजसेवक, राजकारणी, अभिनेते, इ. चा समावेश आहे. पत्रविषयांत प्रामुख्याने बदलते सामाजिक प्रवाह, ग्रामीण व शहरी जीवन( भारत वि. इंडिया), मराठी भाषा यांचा समावेश आहे.
“प्रिय आजी-आजोबा’ या नावाचे पत्र कल्पनेत सन २०६० मध्ये लिहीले आहे. त्याचा विषय तेव्हाची तीव्र पाणीटंचाई हा आहे. त्यात गेल्या १५० वर्षांत आपण पाण्याची कशी नासाडी केली याचे किस्से आहेत.

काही पत्रांचे विषय तात्कालिक असल्याने कालांतराने त्यांचे महत्व राहत नाही.
प्रस्तावना व निवडक पत्रे वाचनीय.