मंतरलेले दिवस २

Primary tabs

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
28 Sep 2019 - 7:33 pm


शारदोत्सव

नवरात्र सुरू झाले की माझ्या बालपणच्या नवरात्रातल्या महालक्ष्मीच्या जत्रेच्या स्मृती मनात रुंजी घालू लागतात. आमच्या घरी सखूआज्जी - आईची एक सख्खी मावशी कायमची राहायला आलेली होती. वयात अंतर असले तरी तशा दोघी मैत्रिणीच होत्या. दोघीही धार्मिक आणि सश्रद्ध. देवी ही स्त्रीशक्ती असल्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांना महालक्ष्मी देवीचे फार अप्रूप. गणपती विसर्जन झाले की दोघींना महालक्ष्मीच्या जत्रेचे वेध लागत. माझ्या एकदोन मावसबहिणी पण पितृपक्षात कधीतरी आमच्याकडे येऊन जात. जत्रेला जायचा दिवस ठरवायला. नऊ दिवसातला एखादा मंगळवार किंवा शुक्रवार धरून सगळ्याजणी जत्रेला जायचा दिवस ठरवीत. जत्रेला जायच्या दिवशी दोघीतिघी मावसबहिणी येत. आम्हा सगळ्यांना नवे कपडे घालून आई कपड्यांना अत्तराचे बोट लावी. साबणाची वडी उभी ठेवली तर कशी दिसेल त्या आकाराची थोड्याफार भौमितिक नक्षीची ‘अत्तर लव्ह’ ची बाटली होती. त्या काळात घरातल्या प्रत्येकाचा वेगळा पर्फ्यूम, डीओ वगैरे चैन नसे. घरातल्या सर्वांना मिळून एकच अत्तराची बाटली. अत्तरही फक्त सणावारी, सठीसामासी वापरायचे. एरवी नाही. या बाटलीत काळसर निळसर रंगाचे मस्त सुवासिक अत्तर असे. अत्तर लावले की मन, शरीर, एवढेच काय सारा आसमंतच अत्तर अत्तर होऊन जाई.

मुंबईच्या बीईएसटीचे तेव्हा रूट नंबर – मार्ग क्रमांक नव्हते. ए, ए३, एफ, ओ असे इंग्रजी अंकाक्षरी - आल्फान्यूमरिक मार्ग होते. सेना भवन तेव्हा नव्हते. प्रकाश उपाहारगृहही नव्हते. तिथून महालक्ष्मीच्या जत्रेला जाणारी बस मिळे. आता आठवत नाही पण बहुधा ओ३ मार्ग असावा. आई माझ्या तीन वर्षे वयाच्या बहिणीला एका मावसबहिणीच्या ताब्यात देत असे. माझा मोठा भाऊ बिनधास्त कोणाचाही हात न पकडता न घाबरता चालत असे. माझ्यामागच्या पाचसाडेपाच वर्षे वयाच्या भावाला - दीपकला पोलिओ झाला होता. त्यामुळे त्याला चालता येईनासे झाले होते. आई आणि सखूआज्जी झेपत नसले तरी आळीपाळीने त्याला थोडेथोडे अंतर उचलून नेत. त्याला आईने घेतले की सखूआज्जी माझा हात धरी आणि सखूआज्जीने घेतले की आई माझा हात धरी. पाऊस फारच मोठा आला तर मग दोन छोट्या टॅक्स्या करून जावे लागे. तेव्हा मुंबईत छोटी टॅक्सी आणि मोठी टॅक्सी असे दोन प्रकार होते.

बसमधून उतरून थोडेसे चालले की जत्रेचे प्रवेशद्वार दिसे. आतल्या बाजूला पताकांनी सजवलेला किंचितसा वर जाणारा रस्ता, दुतर्फा दुकानेच दुकाने. प्रवेशद्वाराजवळ फुगेवाले, खेळणीवाले, फिरते कागदी चक्रवाले उभे. रस्त्याकडेला बहुतेक दुकाने खेळण्यांची. मंदिरातून परत येण्याचा रस्ता वेगळा होता. खेळण्यांची दुकाने पाहून आम्ही भावंडे हरखून जात असू. वर्षातून एकदाच खेळणे मिळे. एरवी हट्ट वगैरे केला तर ‘अगोदर चांगला अभ्यास कर, मग मिळेल.’ अशी वटारलेल्या डोळ्यांकडून समज देखील मिळे. घरचा अभ्यास पूर्ण केला तरी परवचा, लिहिणेवाचणे, अभ्यास वगैरे होईच. तरीही हट्ट केलाच तर चौदावे रत्न होतेच. पत्र्याच्या डब्यापासून केलेले सिगरेटच्या पाकिटाएवढे त्याच्या बोटभर काठीभोवती गोल फिरवल्यावर टर्र र्र र्र आवाज करणारे खेळणे, मातीच्या मोठ्ट्या पणतीवर कागद ताणून बसवलेला पत्र्याच्या डब्याच्या झाकणाची गोल चाके लावलेला चालवल्यावर काड्यांच्या आघाताने आपोआप वाजणारा ताशा, काठीला लावलेले कागदाचे चक्र, इ. खेळणी आणि वेगवेगळ्या रंगांचे हवेत तरंगत आपणच वर जाणारे गॅसचे फुगे मला फार आवडत. पण आवाज ऐकून दिवसभर कान किटतील म्हणून आई यापैकी काही देत नसे. कोणाला काय द्यायचे हे मोठीच माणसे ठरवीत. छोट्यांना कोणीच विचारत नसे. (या दडपशाहीचाऽऽ निषेऽऽध असोऽऽऽऽ!) मग आम्हाला तीन भावांना आपापल्या आवडत्या अशा वेगवेगळ्या रंगाची चावीची मोटार, उतरणीवरून ऐटीत लेफ़्ट-राईट चालणारा प्लॅस्टीकचा सोल्जर, जमिनीवर ठेवून दाबल्यावर प्लॅस्टीकचे पंख पसरून प्लॅस्टीकचे अंडे घालणारी प्लॅस्टीकची कोंबडी असे काहीतरी मिळे. बहिणीला बाहुली, भातुकली मिळे.

जसजसे देऊळ येई तसतशी खेळण्यांची दुकाने कमी होत आणि हारांफुलांची, प्रसादाच्या खाऊची दुकाने वाढत. दुकानात खाऊच्या ऍल्यूमिनिअमच्या पांढर्‍या परातींवर ओंजळीत मावणार नाहीत एवढे मोठ्ठे विजेचे झगझगीत काचेचे दिवे उंच टांगलेले. पाहावे तिथे सगळ्या मुलांच्या हातात खेळणी आणि खाऊ. हारांच्या दुकानातून हार घेऊन सर्वांच्या चपला तिथे सुरक्षित ठेवून आई आम्हांला देवळात नेई. हारांत पिवळी शेवंती, सुवासिक लिली आणि दोन्ही टोकांना आणि मध्य्भागी मोठ्ठे झेंडू, ऍस्टर वा डेलिया. संपूर्ण हार कलाबतूच्या सजावटीने चमचमत असे. हारफुलांच्या सुवासाचा छान दरवळ. प्रसाद म्हणून साखरफुटाणे आणि भाजलेले मोठ्ठे चणे आई घेई. दर्शनासाठी स्त्रियांसाठी वेगळी रांग. स्त्रियांबरोबरची मुले स्त्रियांच्या रांगेत. दर्शन, प्रदक्षिणा झाल्यावर खाली उतरून बाहेर जाणारा वेगळा रस्ता समुद्रकाठावरून जाई. इथे वाटेत डावीकडे खाण्याच्या पदार्थांच्या टपर्या अणि त्यापलीकडे समुद्र असा डोंगर उताराचा. खेळणी मिळाली असल्यामुळे आमचे खाण्याकडे लक्षही जात नसे. तसेही बाहेरचे खाणे घरच्या कडक शिस्तीत पूर्णपणे वर्ज्यच होते. समोसा, मिसळ या पदार्थांची नावेही आम्हाला ठाऊक नव्हती. शेवटी डावीकडे समुद्र सोडून रस्ता खाली उजवीकडे वळे. थोडे अंतर चालले की समोर बसचा रस्ता तर डावीउजवीकडे चक्रे, पाळणे वगैरे असत. दीपक आणि बहीण जमिनीत रोवलेल्या आसाभोवती घड्याळाच्या दिशेने फिरणार्‍या चक्रावर बसत. माझ्याएवढी मोठी मुले या चक्रावर बसत नसत. मोठा भाऊ मात्र खालून उंच उंच वर जाणार्‍या पाळण्यात बसे. मला त्यात बसायला प्रचंड भीती वाटत असे म्हणून मी भावंडांची खेळणी सांभाळत सत्राशेसाठ प्रश्न विचारत आईबरोबर उभा राहात असे. मोठे आश्चर्य म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसेल तर आई न चिडता ‘मोठा झालास की कळेल’ असे उत्तर देऊन वेळ मारून नेत असे.

बसथांब्यावर जातांना माझी बहीण पाय दुखतात म्हणून तक्रार करी. बालपणीची गंमत आहे ही. जत्रेकडे येतांना केव्हा एकदा खेळण्यांच्या दुकानात जातो याची घाई असे. त्यामुळे कोणाचेच पाय दुखत नसत आणि कोणीच सावकाश चालत नसे. आता आई पाय दुखायच्या तक्रारीकडे अजिबात लक्ष देत नसे. लक्ष दिलेच तर दम देण्यापुरते. दीपक आईच्या खांद्यावर गेला की मग सखूआज्जी तिला बरे वाटावे म्हणून थोडा वेळ उचलून घेई. पण आई मात्र तिला दम देई. तशी तीही छोटीच असल्यामुळे ती खूप हळू चालायची. त्याबद्दलही बिचारीला ऐकून घ्यावे लागे. तिच्या डोळ्यात पाणी येई. वंचित घटक तर समाजात काय, घरातही असतात बरें! पावसाची सर आली तर मला आईच्या किंवा सखूआजीच्या छत्रीत जावे लागे. मग मोठा भाऊ दीपकला घेतलेल्या आईच्या वा सखूआजीच्या डोक्यावरची छत्री धरे आणि बहीण तिचा हात धरलेल्या मावसबहिणीच्या छत्रीत जाई. तेवढ्यात बस थांबा येई आणि आम्ही रस्त्यावरच्या मोटारी बघण्यात गर्क होत असू. एखादी छान रंगीत मोटार दिसल्यावर बसस्टॉपवर लोखंडी खांबाला धरून बसवलेला दीपक तोंडाने भुर्र भुर्र आवाज काढीत असे.

केव्हा एकदा घरी पोहोचतो आणि केव्हा नव्या खेळण्यांनी खेळतो असे आम्हाला होई. आता आरआर किंवा बीएमडब्लू मिळाली तर कसे वाटेल तसे मला चावीची मोटार मिळाल्यावर वाटत असे. थोडा थोडा वेळ स्वतःच्या खेळण्यांनी खेळल्यावर आम्ही एकमेकांची खेळणी घेऊन खेळत असू. नंतरच्या काळात आमच्या आणखी एका बहिणीचा जन्म झाला. त्या महाहट्टी धाकट्या बहिणीला लाल रंग फार आवडे आणि नवा फ्रॉक घेतांना दर वेळेस अकांडतांडव करून लालच रंगाचा फ्रॉक घेई. जत्रेतून घरी पोहोचल्यावर ती नवे कपडे बदलायला पण देत नसे. त्या दिवशी रात्री झोपतांना नवाच लाल फ्रॉक तिच्या अंगावर असे. आम्हांला खेळण्यांपुढे जेवणाखाण्याची शुद्ध नसे जेवायला सगळ्यांना हाका माराव्या लागत बाहीतर पकडून आणावे लागे आणि रात्री झोपतांना आम्ही आपापल्या नव्या खेळण्याला बिलगून गोंजारतच झोपत असू. खेळणे गोंजारत झोपणे हे माझ्या मनातले रम्य बालपणीच्या आठवणींचे मधुर प्रतीक बनले आहे.

आमचा चि. वर्षासवा वर्षांचा झाल्यावर सौ.ने त्याला नवरात्राच्या गर्दीत महालक्ष्मीच्या पायावर घातले. पुजार्‍यांचे साहाय्यक आपले मूल आणि प्रसादाचा पुडा उचलून अक्षरशः देवीच्या काही क्षण पायाशी ठेवीत, बाळाला आणि आईबापांना गंधाक्षता लावून प्रसादाचा पुडा आणि प्रसादाची फुले पण देत. मुख्य म्हणजे निदान तेव्हा तरी मुंबईतल्या महालक्ष्मीचे कार्यकर्ते आणि पुजारी आताच्या काही सुप्रसिद्ध ठिकाणच्या मंदिरांतल्यांसारखे उद्धटराव नव्हते आणि लेकुरवाळ्या महिलांना आदराने वागवीत हे आनंदाने नमूद करावेसे वाटते.

आपला समाज, आपली संस्कृतीच आपल्याला घडवते आणि हीच आपली ओळख असते. मुंबईतले मूळ भूमीपुत्र म्हणजे सूर्यवंशी क्षत्रिय पाठारे प्रभू समाज तसेच कोळी, आगरी आणि भंडारी हे दर्यावर्दी समाज हे सगळे मिळून होणारा समाज. शिवाजी महाराजांच्या सरखेल कान्होजी आंग्रे प्रणित अजिंक्य आरमारातले बहुतेक सागरी वीर हे कोळी, आगरी आणि भंडारी होते. या सर्व भूमीपुत्रांच्या देवीची रूपे मुंबादेवी, महालक्ष्मी, प्रभादेवी, गावदेवी वगैरे. देवदेवता म्हटले की जत्रा वा यात्रा आलीच. मुंबादेवीची जत्रा, महालक्ष्मीची जत्रा या मुंबईतल्या सर्वात अगोदरच्या जत्रा आहेत. नंतर इराणहून विस्थापित झालेले काही पारशी मुंबईत आले. त्यानंतर पोर्तुगीज आणि त्यांमागून इंग्रज. पोर्तुगीजांनी नाताळ आणला. काही हिंदू पोर्तुगीजांच्या, इंग्रजांच्या काळात – काही स्वेच्छेने तर काही दडपशाहीने ख्रिस्ती झाले. बहुतेक ख्रिस्ती लोक मदर मेरीला मानणारे. डोंगरावरची मेरी ती माउंट मेरी. माउंटमेरीची यात्रा ओघाने आलीच. नंतर व्यापारानिमित्त इथे गुजराती भाषिक आले. येतांना ते आपल्याबरोबर खमणढोकळा, खांडवी, पातरा आणि उंधियूंबरोबर नवरात्रातला गरबा आणि दांडिया रास घेऊन आले. जसे व्यापारानिमित्ताने गुजराती आले तसे इंग्रजी भाषेच्या आश्रयाने नोकरीधंद्यानिमित्ताने दाक्षिणात्य देखील बरोबर इडलीडोसे, अप्पम, इडीअप्पम, सांबार, रसम घेऊन आले. पारशांचा पटेटी, तमिळींचा पोंगल आणि केरळींचा ओणम मात्र मुंबईत त्या त्या समाजापुरते खाजगीरीत्याच साजरे होतात. मुंबई जसजशी वाढत गेली तसतसे भारताच्या इतर प्रांतातले लोक देखील या महानगरीत आपापली संकृती, आपापले उत्सव घेऊन आले. उत्तर प्रदेशीयांनी रामलीला तर बिहारींनी छटपूजा आणली. बंगालची दुर्गापूजा पण आली. अशी ही मुंबईची संस्कृती बहुभाषिक, बहुरंगी, बहुढंगी बनली.

अश्विन प्रतिपदेपासून नऊ दिवस हा नवरात्रोत्सव, शारदोत्सव म्हणूनही ओळखला जातो. महिषासुर वध, रामरावण युद्ध, अशा अनेक पुराणकथा या उत्सवाशी निगडित आहेत. स्थलपरत्वे प्रथा देखील बदलत जातात. परंतु चांगल्याने वाईटाशी नऊ दिवस देलेला लढा आणि दसर्यादिवशी मिळविलेला विजय हा संकेत मात्र वेगवेगळ्या प्रतीकांमधून तसेच दंतकथांमधून सर्वत्र कायम दिसतो. शारदा ही विद्येची, कलेची देवता आहे असे आपण मानतो. सांप्रती काही घरी देवी बसवतात तर काही ठिकाणी सार्वजनिक रीत्या देवीची मूर्ती आणून नऊ दिवस आपापल्या प्रथेनुसार शारदोत्सव साजरा करतात आणि दसर्‍यादिवशी रावण म्हणजे दुष्ट शक्तीचे दहन करतात. बंगालात दुर्गापूजा हा सर्वात मोठा उत्सव आहे हे आपण जाणतोच. या उत्सवाचे पुलंनी ‘वंगचित्रे’ मध्ये फारच सुंदर, काव्यमय, नादमय असे चित्रवत दर्शन घडवले आहे.

कोणत्याही संस्कृतीत उत्सव हे फारच महत्त्वाचे ठरतात. उत्सव साजरे करण्याचे रीतीरिवाज, जत्रायात्रा, प्रथा आणि परंपरा आपल्या जडणघडणीत आणि एकूण संस्कृतीतच फार मोलाची भर घालतात. मुंबई म्हटले की आज महालक्ष्मी आणि माउंट मेरी या दोन जत्रा महत्त्वाच्या. गणेश विसर्जन झाले की मुंबईला महालक्ष्मीच्या जत्रेचे, शारदोत्सवाचे वेध लागतात. पोर्तुगीजांच्या काळाच्या आधीपासून इथे मुंबादेवी, महालक्ष्मी अशा जत्रा भरायच्या. ख्रिस्ती झाले तरी श्रद्धाळूंच्या मनातली मुंबादेवी, महालक्ष्मी ही जागृत स्त्रीशक्ती देवीदैवते काही मनातून पुसली गेली नसावीत. पोर्तुगीजांनी आणलेल्या या ख्रिस्ती धर्मातून मग वांद्र्याच्या माउंट मेरीचा उत्सव सुरू झाला.

वांद्र्याची माउंट मेरी ही नावाप्रमाणेच डोंगरावरची मेरी. मोथमाउली हे माउंट मेरीचे स्थानिक भाषेतले नाव. मुंबईतल्या स्थानिक ख्रिस्ती लोकांना ईस्ट इंडियन असे नाव पडले. धर्मांतर होऊन ख्रिस्ती झाले तरी हे लोक आपली मूळ संस्कृती, मूळ श्रद्धा काही विसरले नाहीत. मूर्तीपूजा, नवस वगैरे कसे विसरतील? फक्त देवीचे नाव बदलून मेरी झाले. अडीचतीन वर्षांच्या दीपकला पोलीओ झाला हे कळले त्यानंतर काही दिवसांनी मोथमाउलीची जत्रा भरली होती. म्हणजे हिशेबाने हे १९५८ वा ५९ साल असावे. वरील महालक्ष्मीच्या आठवणींच्या अगोदरची आठवण आहे ही. मामाचे बरेच ख्रिस्ती मित्र होते. त्यातल्या एकाने माझ्या सख्ख्या आज्जीला मोथमाउलीची ‘महती’ सांगितली होती. आजोबांकडे तेव्हा भलीमोठ्ठी डॉज गाडी होती. माझ्या सख्ख्या आज्जीने मग मामाला वेठीला धरून आम्हा सर्वांना मोथमाउलीला नेले होते. महालक्ष्मीसारखीच भव्य जत्रा. दुतर्फा खेळण्यांची आणि इतर दुकाने, चक्रे, झोपाळे आणि पाळणे. फक्त इथे काही वेगळ्या वस्तूंची दुकाने होती. मेणबत्त्यांची खूप दुकाने होती. काही दुकानात मेणाचे बनवलेले माणसाचे हात, पाय, नाक, कान, डोळे वगैरे अवयव ठेवलेले असत. आज्जीने एक अख्खा डावा पाय विकत घेतला आणि मोथमाउलीला अर्पण केला. दीपकचा पाय लौकर बरा व्हावा म्हणून. अजूनही असे अवयव विकण्याची दुकाने या जत्रेत उभी राहतात आणि पीडितांचे श्रद्धाळू नातेवाईक मोथमाउलीला अवयव अर्पण करतात. धर्म जरी बदलले तरी माणसेही तीच अणि श्रद्धाही तीच. फक्त पुजायचा देव वेगळा. श्रद्धा आणि संस्कृतीचे हे असे ‘XXXX का जोड’ सारखे घट्ट नाते असावे. जिथे आशेचे सारे दोर कापलेले असतात तिथे या नवस वगैरे श्रद्धा आशेचा किरण आणि श्रद्धाळूंना जगण्याची उमेद देतात आणि त्याच्या/तिच्या सुहृदांचे दुःख थोडेफार तरी हलके करतात हे खरे असावे.

दीपकचा पाय तेव्हा पूर्ण बरा झाला नाहीच. परंतु तात्काळ आधुनिक औषधयोजना आणि तज्ञांकडून दोनतीन वर्षे सातत्यपूर्ण मालीश यामुळे तो ‘सळया आधारित बुटा’शिवाय चालायला लागला. ही देखील महालक्ष्मी वा मोथमाउलीचीच कृपा बरें! त्याने रुईयामधून अर्थशास्त्रातली पदवी घेतली आणि सरकारी नोकरी मिळवली. नंतर लग्नही झाले आणि भविष्य निर्वाह निधी खात्यातून गेल्याच वर्षी लेखा अधिकारी म्हणून निवृत्त झाला.

नवरात्रात आमच्या दादरच्या विठ्ठलवाडीत गरब्याचा मंडप उभारला जाई. रात्री १०-११ पर्यंत गरबा चाले. आळीपाळीने बायकामुली गरब्याची गाणी म्हणत. काहींचे आवाज इतके भसाडे होते की त्या गायला लागल्या की कोणालाही हसू यावे. गाणारी खुर्चीवर बसे आणि तिच्या भोवती इतर बायका फेर धरून टाळ्या देत नाचत. बहुतेक गाणी गुजराथीतली पारंपारिक गाणी असत. गाणारी विचारे आणि भोवती नाचणार्‍य़ा बायका कोरसमधून एकदोन शब्दात यमकात उत्तर देत. गुजरातीतून होणार्‍या घोषणा आणि गाणी आमच्या घरी स्पष्ट ऐकू येत त्यांच्या एका लोकप्रिय पारंपारिक गुजराती गाण्याचा मुखडा आठवतो आहे.

पानसुपारीऽ पानना मसाला,
एलची साथेऽ राईना दाणाऽऽ,
माऽऽरवाऽऽडा

अधूनमधून कोणीतरी बुलबुल तरंग तर कधी बाजापेटीवर गाणी वाजवी. नंतर कधीतरी त्यांना ध्वनीवर्धकाची आणि त्यानंतर बॅन्जोची साथ मिळाली. घराचे दार उघडले तर मात्र कर्ण्याच्या त्या आवाजाचा उपद्रवच होई.

कालांतराने ‘गरब्या’ला ‘दांडिया रास’ ची आणि भरतकाम, आरसे आणि मनमोहक रंगातल्या सजावटीच्या ‘चणिया चोली’च्या पारंपारिक स्त्रीवेषाची रंगदार जोड मिळाली आणि दांडिया लोकप्रिय होत गेला. मुलांच्या अंगात सदरा/झब्बा आणि धोतर तर माथ्यावर तुर्रेदार फेटा. नंतर मुरली बंदरकर नावाचा एक मुलगा आमच्या विठ्ठलवाडीतल्या दांडियाला नादमय ढोलकीची ढंगदार साथ करी. जय जगदीस हरे या आरतीने सोहळ्याला सुरुवात होई. नंतर अर्धाएकतास वगैरे गरबा. तेव्हा आलेला सरस्वतीचंद्र हा चित्रपट गाजला होता. त्यातलेही एखादे गाणे होई. बहुतेक करून ‘मैं तो भूल चली बाबुल का देऽऽस, पिऽऽया का घर प्याऽऽरा लगे.’ गाणे बदलले तरी सुरावट आणि ठेका तोच. बहुतेक सार्‍या मध्यमवयीन आणि वृद्ध बायका. वृद्ध बायका तन्मयतेने भसाड्या आवाजात गाणी गात आणि हौसेने फेर धरून नाचत. दमल्या की मधूनच बाहेरही पडत. पण दोनतीन मिनिटे तरी फेर धरून नाचत. गाण्याने करमणूक होते हे खरेच. पण भसाड्या आवाजात गाण्याने जास्त करमणूक होते हेही खरे. अख्ख्या विठ्ठलवाडीची हहपुवा होत असे. नंतर एखादे मध्यांतर. आता वादक येत. वाद्ये जुळवली जात. स्त्रीपुरुष वेष बदलून येत. तरुणाई पण मंडपात अवतीर्ण होई. ध्वनीवर्धकाचा आवाज वाढवला जाई. आणि मग दांडियाला सुरुवात होई. दांडियाची दोनचार वर्तुळे असत. एक छोट्यांचे. एक नवख्यांचे आणि एक नृत्यनिपुणांचे अशी तीन वर्तुळे तर असतच. नृत्यनिपुणांच्या वर्तुळात प्रवेश मिळवणे कठीण असे.

व्यापार्‍यांनी सढळ हस्ते केलेल्या आर्थिक गुंतवणुकीमुळे दांडिया चमकदार, चकचकीत होत जात कधी ‘फाईव्ह स्टार’ झाला कळलेही नाही. पुरुषांच्या डोक्यावर रंगदार, जरीकाठी, रेशमी फेटे दिसू लागले. ‘ड्राईव्ह इन’ सभागृहात फाल्गुनी पाठकच्या गीतांभोवती दांडिया-रासचा भव्य सोहळा सुरू झाला. काही केळवणी मंडळांच्या दांडियात मंडप भपकेदार आणि देखणे झाले. भडक पण आकर्षक रंगांचे वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर गणवेष, छातीवर रेशमी पदके दिसू लागली. आता प्रवेशासाठी अशा सोहळ्यात घसघशीत ‘प्रवेश शुल्क’ द्यावे लागू लागले. मग इतरत्र असे ‘प्रवेश शुल्कांकित’ सार्वजनिक सोहळे होऊ लागले. इतर अ-गुजराती समाजातले धनदांडगे देखील आता शुल्क मोजून (पोरी पटवायला) चंचुप्रवेश करू लागले. मग ‘केळवणी मंडळाचे सदस्यत्व’ आवश्यक केले गेले.

स्वयंघोषित संस्कृतीरक्षक आयोजक ज्या जनतेच्या संस्कृतीचे जतन करीत होते त्या संस्कृतीरक्षकांविरुद्ध तीच जनता ध्वनिवर्धकांच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजामुळे न्यायालयात गेली, मग वेळेची आणि डेसिबेल्सची बंधने आली. याचा पहिला फटका पुण्याच्या चालणार्‍या सवाई गंधर्व महोत्सवाला बसला. दहाला बंद म्हणजे बंद. पुढच्या वर्षी दांडिया रासच्या वकिलांचा दावा न्यायालयाला काही अंशी पटला आणि त्यामुळे सवाई गंधर्ववर दहा वाजताचा निर्बंध घालणार्‍या या न्यायालयांनी मध्यरात्री बारापर्यंत कानठळ्या सुरू ठेवायला दांडियांना परवानगी दिली. न्यायदेवता फक्त आंधळी नाही, महागडा वकील केला की बहिरी देखील होते असे लोक तेव्हा बोलू लागले. (मी मात्र तसे बोललो नाही बरे कां.) संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली धनदांडग्यांचे सांस्कृतिक आक्रमण हे असे होते. दांडिया रासच्या कानठळ्या बसवणार्‍या ध्वनीयोजनेची आवश्यकता निदान मला तरी समजत नाही. अगदी ध्वनीवर्धकाशिवायही हा सोहळा जेमतेम वीस वर्षांपूर्वी देखील मस्त चालत होता.

माझ्या एका नोकरीतील कार्यालयात श्रीकृष्णाची तसबीर होती. नवरात्रात स्त्रियामुली नऊ दिवस आळीपाळीने तसबिरीला हार घालीत. हार घालायला आणि हातावर प्रसाद ठेवायला ख्रिस्ती मुली पण पुढे असत. धार्मिक ऐक्य पाहून मला छान वाटे. हिंदू देवाला हार घातल्यामुळे तुला लौकरच श्रीमंत आणि हॅण्डसम नवरा नक्की मिळणार असे आश्वासन मी प्रसाद देणार्‍या अविवाहित ख्रिस्ती मुलींना समस्त ३३ कोटी हिंदू देवांच्या वतीने देत असे.

माझ्या सेवानिवृत्तीपूर्वीचा एक शारदोत्सव अजूनही आठवतो. नवरात्राच्या आदल्या दिवशी संध्याकाळी घरी जाता जाता अचानक महिलावर्ग दार उघडून आत घुसला आणि ‘उद्या निळ्या रंगाचा शर्ट घालून या बरं का’ असे मला दटावले. (आज दहाबारा वर्षांनंतर आठवणीतला रंग चुकू शकतो) मी एकीच्या टॉपचा लालभडक रंग दाखवून हा रंग ना ना म्हणून तत्परतेने विचारल्यावर एकदम चारआठ डोळ्यातून ठिणग्या बरसल्या. दुसरे दिवशी बहुधा मराठी वर्तमानपत्रात आजचा रंग निळा असे आले असावे. मग मालाडच्या खाजगी बसमध्ये, रेलवे स्थानकांच्या फलाटावर स्त्रियांच्या डब्यासमोर, बीईएसटीच्या बस थांब्यावर, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली निळ्या रंगांच्या विविध छटांमधल्या साड्या, पंजाबी वेष, जीन्सवरही आकाशी टॉप, कपाळावर गंधटिकलीखाली हळदीचे बोट, केसात वेण्यावळेसर, गजरेफुले. साडीधारी महिला संख्येने नेहमींपेक्षा जास्त. आमच्या कार्यालयातला ख्रिस्ती महिलावर्ग देखील. आमच्या कार्यालयातल्या जेनिफर डिसोझाला जेमतेम पोटरीपर्यंत पोहोचणारा स्कर्ट घालायची सवय होती. साडीपरकाराच्या बोंग्यात तिला वातानुकूलनातही उकडे. मग ती दोन्ही हातांच्या दोन चिमटीत साडी वर धरून चाले. वाटे की आत्ता ही लंगडी घालून जमिनीवरच्या चौकोनात उड्या मारीत ठिक्कर खेळेल. ते दृश्य फारच विनोदी दिसे.

दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे मी वेळेआधी कार्यालयात येऊन स्थानापन्न झालो. काही मिनिटातच (बहुधा माझ्या शर्टचा रंग पाहायला) योगिता विचारे दरवाजातून आत डोकावली. तेव्हाचे तिचे वय सुमारे २५-३०, दोन छोटी मुले होती हिला. शर्टाचा रंग पाहून संतोषली आणि ‘सर देवी आऽल्याऽऽ’ असे आनंदाने म्हणाली. पण हाय रे दुर्दैवा! हे मोदवर्तमान सांगायला तिने फारच चुकीचा माणूस निवडला होता. मी फक्त ‘कोणाला?’ म्हणून गालातल्या गालात हसत पृच्छा केली. हातातल्या बांगड्या मागे सारत दोनदोन ‘कलाल बांगड्या’ माझ्यावर रोखून तिने हात पण उगारला. माझ्या डोक्यात हे इतके जलद कसे काय आले कोण जाणे. पण मग तिलाही हसू आवरले नाही. ‘असं वेड्यासारखं बोलू नका हो, हसायला येतं मग. आता पाप लागेल मला’ म्हणत बोटांनी स्वतःच्या गालांवर हळुवारपणे स्पर्श केला. तिच्या निरागस श्रद्धेचे नवल वाटते. ‘तुमच्या नऽऽ मेंऽदूतच काहीतरी बिघाड आहे.’ असे हातवारे करीत म्हणाली. एकेक कर्मचारी येत गेला तसतसे तिने जो येईल त्याला हे सांगितले. मला दरवाजाच्या काचेतून बाहेरचे दिसत होते. मेलवीन, विलास, लोबो आणि सचीन खूश झाले. मेलवीन सचीनला उकळ्या फुटू लागल्या. लोबो त्याच्या शैलीत फिस्सकन हसला. विलासने तर विकट हास्य करून दाखवले. इतर प्रत्येकाने, खासकरून महिलांनी, अगदी ख्रिस्ती महिलांनी पण दरवाजातून डोके आत घालून काहींनी डोळे वटारून तर काहींनी शाब्दिक रीतीने माझी घोर निर्भर्त्सना केली. शोभाने तर मारकुट्या मास्तरणीसारखी पट्टीच उगारून दाखवली. पण हसू कोणालाच आवरता आले नाही. कोणताही अपशब्द न उच्चारता आपल्या बाष्कळ विनोदाने इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात त्या अशा. मोथमाउलीला मेणाचा मेंदू वगैरे कधी अर्पण केलेला दिसलाच तर तो माझ्यासाठीच समजावा.

आपले स्वतःचे बलपण जसे रम्य असते तसे आपल्या मुलांचेही बालपण आपल्याला रम्य वाटते. एके शारदोत्सवातल्या दिवशी शनिवार होता. मी अर्धा दिवस सुटी घेतली होती. दुपारी घरी जाऊन जेवून कपडे बदलून प्राथमिक शाळेत शिकणार्‍या चि. ला बरोबर घेतले आणि आम्ही दोघेच क्रॉफर्ड मार्केटसमोर फटाक्यांच्या बाजारात गेलो. इथे नवरात्राच्या दिवसात घाऊक दराने फटाके मिळतात. मुख्य म्हणजे नवीन तर्‍हेचे फटाके मिळतात. दसर्‍यानंतर घाऊक दराने मिळत नाहीत आणि नव्या तर्‍हेचे फटाके संपून जातात. ओळीने एकाच प्रकारच्या मालाची दुकाने असली तरी मुंबईच्या घाऊक बाजार विभागातली भरपूर झुंबड प्रत्येक दुकानात. एका दुकानात घुसून पुढची गर्दी कमी व्हायची वाट पाहात उभे राहिलो. दुकानातल्या प्रत्येक विक्रेत्यासमोर खरेदीदारांची गर्दी. सर्वात आत एक पांढरी नीटनेटकी दाढी राखलेले पांढरा विपुल केशसंभार असलेले बोहरी चेहर्‍याचे गृहस्थ आम्हाला अगत्याने मान डोलावीत हाताने आत बोलावतांना दिसले. बहुधा ते मालक होते आणि त्यांचे धाकटे बंधू वा चिरंजीव दरवाजापाशी रोखपाल म्हणून.

मला ‘वेलकम सर’ असे अभिवादन करून चि.शी ‘येस माय लिटल फ्रेन्ड’ म्हणत त्यांनी इंग्रजीतूनच छान संवाद साधला. ‘दुकानदार घाऊक ग्राहकां’ना इतर विक्रेते हाताळत तर घरगुती किरकोळ ग्राहकांना – खासकरून चिंटूपिंटूना हे गृहस्थ माल देत होते. फटाके कोण उडवणार असे विचारून त्याचे वय ध्यानात घेऊन योग्य प्रकारचे फटाके देत. छोट्यांनी भलतेच मागितले तर ‘बेटा दॅट्स फ़ॉऽऽ ग्रोन अप्स ऍन्ड बिगर बॉऽयज डीअर, यू टेक धिस्स्स’ म्हणून योग्य प्रकार देत होते. आईबापांकडे भलता हट्ट करणारी द्वाड कार्टी पण त्यांचे निमूटपणे ऐकत असणार. त्या गर्दीतही आमच्याशी ते जवळजवळ अर्धा तास छान बोलत होते. बोलतांबोलतां त्यांचे संपूर्ण दुकानावर लक्ष होते आणि अधूनमधून विक्रेत्यांना उद्बोधक सूचनाही करीत होते.

मनाप्रमाणे फटाके खरेदी झाल्यावर ‘बादशाही’ मधल्या ‘रॉयल फालुदा’चा आस्वाद घेतला आणि चालत चालत ‘मरीन लाईन्स’ जरी जास्त जवळ असले तरी गाडी जिथून सुटते त्या ‘चर्चगेट’ला निघालो. सूर्यदेव एव्हाना मुंबईत उकडते म्हणून समुद्रात डुंबायला गेले होते. गहिर्‍या संधिप्रकाशात रस्त्यावरून मोटारींचे दिवे शिस्तीत संथगतीने वाहतांना दिसत होते. क्रॉस मैदानातून चर्चगेटकडे जाता जाता भव्य मंडपात रंगमंच उभारलेला दिसला. शनिवार असल्यामुळे भरपूर प्रेक्षक होते. रामलीला सुरू होती. सहज मंचावर नजर टाकली. अचानक रंगमंचावर शैलीदार हिंदीतले संवाद खड्या आवाजात फेकीत हनुमंताने टेचात प्रवेश केला. जोडीला झगझगीत प्रकाशयोजना, झगमगीत कपडे आणि भल्यामोठ्या खुल्या सभागृहाला साजेसा भडक अभिनय ही रामलीलेची वैशिष्ट्ये होतीच. ठिकठिकाणच्या खांबावरचे कर्णे रंगमंचावरचे संवाद मैदानाच्या कानाकोपर्‍यात नेत होते. हनुमंताच्या भाषेचा उत्तरप्रदेशी ढंगातला ठसकेदार लहेजा मस्त होता. चि.ला खांद्यावर बसवले. तो त्यात रमला म्हणून जवळ जाऊन थांबलो. शक्तीशाली, महापराक्रमी हनुमंताचे बालमनावरचे गारुड अजूनही होते. हिंदी त्याला त्या वयातही माझ्यापेक्षा बरे येई. हनुमंत सीतेला अशोकवनात भेटायला जातो तो प्रसंग होता. शेपूट उभारलेला हनुमंत बालप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगमंचभर वेड्यावाकड्या उड्या मारीत ठसकेबाज संवाद फेकीत अशोकवनात विध्वंस करीत जवळजवळ अर्धाएक तास फिरत होता. हनुमंताने आम्हाला खिळवूनच टाकले. प्रेक्षकांतून त्याला शिट्यापिपाण्यांची साथ. पावसाने हात दिला आणि बर्‍यापैकी वारा असल्यामुळे मुंबईच्या उष्ण हवेचा वा गर्दीचा त्रास जाणवला नाही. क्रॉस मैदानावरची रामलीला पाहणे हा एरवी पण एक अनुपम नेत्रसोहळा असतो. अनपेक्षितपणे लाभलेले ते हनुमंतप्रवेशाचे अद्भुत क्षण आम्ही दोघेही कधी विसरू शकणार नाही.

हनुमंताचा प्रवेश संपल्यावर चि. घरी जाऊया म्हणाला. शनिवारी संध्याकाळी चर्चगेटवरून सुटणार्‍या रेलवे गाड्यांना कमी गर्दी असते. पाऊसपाण्यापासून जपायला प्लॅस्टीकच्या पिशवीत बांधलेले फटाके ब्रीफकेसमध्ये दडवून रेलवे सुरक्षेचे कायदे धाब्यावर बसवून बहुतेक प्रवासी नेतात तसे आम्ही पण नेले.

नंतर काही वर्षांनी चि. ९वीत असतांना म्हणजे १९९७ साली आम्ही फटाक्याच्या त्याच दुकानात गेलो. त्या गृहस्थांचा ‘बेटा इतनाऽऽ बडा हो गया?’ असा प्रश्न आला. सगळी मुले किमान वर्षभराने त्या दुकानात जाणार. तेव्हा मुले मोठी होणारच. हे त्यांचे ठेवणीतले वाक्य असावे. मला त्या गृहस्थांच्या व्यावसायिक चतुराईचे कौतुक वाटले. दुकानाला गिर्‍हाइके कशी जोडावीत याचा उत्कृष्ट वस्तुपाठच हा. कसे फटाके हवेत? आवाज करणारे की रंगीत? ‘रंगीत’ या उत्तराला हवेत उडणारे की जमिनीवरचे असे प्रश्न विचारून ते प्रथम ग्राहकाचा कल जाणून घेऊन मग फटाके दाखवीत. ‘कलरफूल ऍन्ड शूटिंग-अप इन्टू द स्काय’ असे उत्तर मिळाल्यावर त्यांनी दोन प्रकारच्या फटाक्यांचे खोकी दिली. फटाक्यांचे वेष्टन आणि वेष्टनावरचे चित्र आकर्षक असतेच. पण या वेष्टनावरच्या चित्रात फटाका उडवणार्‍या अर्धवस्त्रा फटाकाऐवजी – चुकलो सुंदरीऐवजी फटाका कसा उडेल याचे रंगीत चित्र होते. चित्र तसे यथार्थ होते पण स्थिरचित्र आणि प्रत्यक्ष यात जमीन अस्मानाचा फरक आहे. फटाके उडवल्यावर अफलातूनच दृश्य दिसले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या वर्षी भरपूर फटाके मनसोक्त उडवल्यामुळे चिरंजीवांची फटाके उडवायची हौस फिटली. दूरचित्रवाणीवर फटाक्यांच्या प्रदूषणाविरोधातले उपदेशामृत मिळत होतेच. आवाजी फटाके तो उडवत नव्हताच. आणि त्याने आता यापुढे कुठलेच फटाके उडवायचे नाहीत असे जाहीर केले.

शिवाजी पार्कमध्ये बेन्गॉल क्लब आहे. नवरात्रात बेन्गॉल क्लब इमारतीलगत भव्य मंडप उभारून दुर्गापूजाउत्सव साजरा करतात. लांब जीभ बाहेर काढलेली दुर्गामातेची बहुभुजा मूर्ती आणि ती मूर्ती घनदाट धूम्रवलयांत दिसेनाशी झाल्यावर केलेली मोठ्ठ्या झांजांच्या खणखणाटातली आरती ही तिथली वैशिष्ट्ये म्हणता येतील. मंडपात बंगाली खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हारीने लागलेले. दूध फाडून केलेल्या मिठाया आवडणारे माझ्यासारखे गोडखाऊ न चुकता इथे भेट देऊन जातात. मत्स्यप्रेमींसाठी पदार्थ असतात की नाही आठवत नही. कारण मी शाकाहारी. पण बंगालमध्ये देवदेवतांना सामिष आहाराचे वावडे नाही असे पुलंनी नोंदवलेले आहे.

एक अनुभव मुंबईबाहेरचा लिहितो. नवरात्राचा पहिला दिवस हा ओसरत्या पावसाळ्यातला मुहूर्त आम्ही दीडदोन आठवड्यांच्या दक्षिण भारत पर्यटन दौर्‍यासाठी निवडत असू. असे तीनचार दौरे आम्ही केले. एकदा अलेप्पीला हॉटेल गौरी नावाच्या एका हॅरिटेज घरातल्या हॉटेलात राहिलो होतो. त्या घराच्या आसपास रस्त्यावरून जेवणानंतरची शतपावली घालतांना एक अविस्मरणीय दृश्य दिसले. त्या हॉटेलपासून जवळच कांही अंतरावर एक दुर्गा मंदीर आहे. रात्री नीट दिसले नाही पण प्राचीन असावे. तो अष्टमीचा दिवस होता. रात्री साडेनऊदहाची वेळ होती. अष्टमीनिमित्त मंदिरात खास धार्मिक सोहळे होते. त्यानिमित्त त्यांनी मंदिराच्या आवारातले आणि मंदिरातले सारे वीजदिवे बंद करून फक्त तेलाचे दिवे पणत्या इ.पारंपारिक दिव्यांची आरास केली होती. पेट्रोमॅक्सही नव्हते. समोर एक आणि भोवताली आयताकृती आवारात आणखी पाचसहा दीपमाळा प्रज्वलित केल्या होत्या. फाटकाच्या आत मंदिरासमोरची फक्त आठदहा दिव्यांची एक दीपमाळ तर वैशिष्ट्यपूर्ण होती. तीवरच्या दिव्यांच्या ज्योती तर चाकासारखे उभे ठेवलेले तेजोवलये. सहज शतपावली घालायची म्हणून बाहेर पडलो होतो म्हणून कॅमेरा न नेल्यामुळे प्रचि पण काढता आली नाही. ते दृश्य अनुपम होते. अष्टमीला कोणी रसिक तिथे गेलेच तर हे दृश्य पाहायला विसरू नका.

असा हा शारदोत्सव. मुंबईकरांना कदाचित यात विशेष काही वाटणार नाही कारण यातले काही त्यांना नवे नाही. परंतु मुंबईबाहेरील वाचकांना मात्र हे सारे नवे असावे. तसेच शारदोत्सवाच्या माझ्या आठवणी मात्र मला माझ्या आणि चिरंजीवाच्याही बालपणात घेऊन जाणार्‍या म्हणूनच मला प्रिय आहेत. इति शारदोत्सव-स्मृती पुराणम.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

सुंदर! शारदोत्सव सुरू झाला!

कुमार१'s picture

28 Sep 2019 - 8:07 pm | कुमार१

छान स्मरणरंजन !

विजुभाऊ's picture

28 Sep 2019 - 8:14 pm | विजुभाऊ

:)

जालिम लोशन's picture

28 Sep 2019 - 9:49 pm | जालिम लोशन

छान

कोमल's picture

30 Sep 2019 - 12:02 am | कोमल

फार छान !
पुलेशु

अनिंद्य's picture

30 Sep 2019 - 10:39 am | अनिंद्य

साध्या घरगुती गप्पांपासून सुरु झालेला लेख त्याकाळच्या शारदोत्सवाचा पूर्ण पट उभा करतोय.
लिखाण आवडले.

जॉनविक्क's picture

1 Oct 2019 - 1:32 pm | जॉनविक्क

मी भूतकाळात (अती) रमणे टाळायचाच प्रयत्न करतो तरीही असे काही समोर आले की देहभान विसरून वाचायला होतेच.

सुरेख.

सुधीर कांदळकर's picture

30 Sep 2019 - 11:11 am | सुधीर कांदळकर

यशोधरा, डॉसाहेब, विजूभाऊ, कोमलताई, जालीम लोशन आणि अनिंद्य सर्वांना अनेक अनेक धन्यवाद.

अनिंद्य's picture

30 Sep 2019 - 11:15 am | अनिंद्य

आणि हो, 'आनंदाच्या बातमी' साठी 'मोदवर्तमान' हा शब्द फार आवडला मला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Oct 2019 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार

मुंबईत भोंडले होत नाहित का?
लहान पणी आम्ही नवरात्रीची वाट पहायचो कारण भोंडले. भोंडल्याला गेलो तरी सगळी नजर खिरापतीवर असायची, त्यातही जो खिरापत ओळखेल त्याला डबल खिरापत मिळायची. मग ज्यांच्या कडे भोंडला असेल त्यांच्या स्वयंपाक घराच्या आजूबाजूला सकाळ पासून घिरट्या मारत, स्वयंपाकघरातून येणार्‍या वासांवरुन संध्याकाळी काय खिरापत असेल? असा अंदाज बांधण्यात यायचा.

पैजरबुवा,

सुधीर कांदळकर's picture

1 Oct 2019 - 12:07 pm | सुधीर कांदळकर

कुठेतरी कोणाच्या तरी घरी जमून खेळतात. आमची आई कधी गेली नाही. त्यामुळे ठाऊक नाही. मराठी माणसे कमीच आहेत कमीचआणि उत्साहाने पारंपारिक खेळ खेळणार्‍या स्त्रिया त्यातूनही कमी. नव्या मराठी मुलींना दांडीयातच रस. नोकरी करणारी असेल तर शनिवार साधून टाईम पास म्हणून थोडा वेळ दांडिया खेळणार. त्यातून कॉन्व्हेन्टमध्ये शिकल्या तर मराठी धड बोलता येत नाही. भोंडला दूरच.

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2019 - 1:24 pm | चौथा कोनाडा

वाह, खुपच सुंदर लेख ! जुन्या मुंबैत रमून गेलो. माझ्या लहानपणी माझ्या गावात गावाभाहेरच्या देवीला जायचं म्हटलं की अशीच तयारी, लगबग सुरु व्हायची !
खुप रम्य आठवणी आहेत त्या !

आता सगळंच बदललंय. कमर्शियल झालंय. सगळे सण मार्केटिंग कम्पन्यांनी ताब्यात घेतलेत. उत्सवाला वस्तूरूप प्राप्त झालंय !
आनंद, फोटोंमध्ये मोजला जातोय. कालाय तस्मै नमः !

सुधीर कांदळकरजी, हा लेख छान अनुभवला मी ! _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Oct 2019 - 2:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त सफर घडवुन आणलीत वाचकांना.
आठवणीतील नवरात्र म्हणजे एकीकडे देवीच्या देवळातील मळवट भरलेल्या आणि घागरी फुंकणार्‍या बायका तर दुसरीकडे गांधी चौकातील आणि विष्णू मंदीरातील गरबा. तिकडे दुर्गाडी किल्ल्यावरील आणि आसपासची जत्रा.
दररोज आसपासच्या कुणाकडेतरी भोंडला आणि खिरापत असायची. वरती पैजारबुवा म्हणाले तसे खाउ ओळखायला फार मजा यायची पण एका वयानंतर मुलींच्या या कार्यक्रमात भाग घ्यायची लाज वाटे म्हणुन ते बंद झाले. दुसरीकडे कौलारु घरे आणि वाडे पाडले जाऊन ईमारती उभ्या राहु लागल्या आणि शेजारी राहणारे लोक दारे बंद करुन बसु लागले. एक एक चाळीतल्या आणि वाड्यातल्या पद्धती बंद पडु लागल्या पतंग उडवणे वगैरे सुरु झाल्याने तसेही मुला मुलींचे खेळ बदलले होते. त्यामुळे नवरात्राचे महत्व फक्त "आता दिवाळी लवकरच येणार" ईतकेच राहिले. असो.

सुधीर कांदळकर's picture

1 Oct 2019 - 6:52 pm | सुधीर कांदळकर

जॉनविक्क, चौथा कोनाडा, रामे, अनेक अनेक धन्यवाद. भूतकाळात रुतून न बसतां कधीतरी स्मरणरंजन केले की मस्त ताजेतवाने वाटते. हातातले काम करायला नवी ऊर्जा मिळते. कोणीतरी वाचते म्हणून लिहावेसे वाटते.

मुंबईत दारे बंद झाली खरी. पण फायदाच झाला. नको ते मैत्रीसंबंध संपले आणि निदान फोन करून का होईना पण जातीभेद, श्रीमंती विसरून भेटणे होते. माझ्या एका मित्राच्या मते हे मुंबईत घडते कारण अजूनही खूप लोक कितीही श्रीमंत असले तरी सार्वजनिक वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे बाजूबाजूला रस्ता अडवून जाणार्‍या दुचाक्या दिसत नाहीत. लोक बाल्कनीत गॅलरीत आरामखुर्ची टाकून वाचन करतात, संगीत ऐकतात, फोनवर बोलतात, चहा, न्याहारी घेतात. इतर शहरात बाल्कन्या, गॅलर्‍या ओस दिसतात.

मराठी_माणूस's picture

4 Oct 2019 - 4:39 pm | मराठी_माणूस

इतर शहरात बाल्कन्या, गॅलर्‍या ओस दिसतात

इतर शहरात वेगवेगळ्या ठीकाणी जाणे (तेही स्वतःच्या वाहनाने) तुलनेने सोपे असल्याने लोकांचा वावर गॅलर्‍याशी सिमीत नसतो.

खिरापतीतले पदार्थ ओळखण्याबद्दल वाचले होते पण भोंडला वगैरे कधीच पाहिला नाही.

>> सूर्यदेव एव्हाना मुंबईत उकडते म्हणून समुद्रात डुंबायला गेले होते.

आवडेश :)

पद्मावति's picture

2 Oct 2019 - 3:32 pm | पद्मावति

अतिशय सुरेख.

हे सगळे अनुभवले आहे आणि ते पुन्हा वाचताना आठवलं सारं.
आताच तेरा सप्टेंबरला कित्येक वर्षांनी महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो. लहानपणी भाविकपणासाठी नसून ती एक करमणूक होती टिवि नसलेल्या काळात. कारण एकमेव खडकाळ समुद्र किनारा. मजा यायची. बाजूच्या हॉटेलात मिळणारी मूगभजी हा आवडता पदार्थ खायचा. एकदा बटाटे वडे घेऊन खडकावर खात होतो. वरती घारी फिरत होत्या वडे,भजींसाठी. एकीने झडप घातली आणि आईचे वडे सांडवले.
पण आता मजा गेली. हॉटेल बंद. समुद्राकडे जाण्याचा मार्ग बंद. फोटो काढायला गेलो तर सिक्युरटीवखला खेकसला "पाटी दिसत नाही का?" आता त्या पायऱ्यांवरून समुद्राचा काढलेला फोटो मी काय पाकला पाठवणार होतो? आणि ते अगदी या फोटोची वाट पाहात होते? देवळातले ठीक. मी नाही काढत.

सुधीर कांदळकर's picture

3 Oct 2019 - 7:32 am | सुधीर कांदळकर

अमीबा, पद्मावति आणि कंजूससाहेब: अनेक अनेक धन्यवाद.

@कंजूससहेबः मलबार हिलवरच्या कफे नाझ या रेस्तोराँमध्ये दरीकिनारी बसून पारशी पदार्थ - धनसाक वगैरे खाल्ले का कधी? पंधरावीस वर्षांपूर्वी ते कोणातरी शेट्टीने घेतले आणि नंतर बंद झाले. तिथे बसले की बाबुलनाथकडून वर आलेला लाल मातीचा रस्ता दिसे आणि वाटे की आपण माथेरानलाच आहोत. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा हे गाणे पण ओठांवर येई. झाडोरा मात्र अजून तसाच आहे. आणि हो: आता गेलात तर त्या झाडांखाली उडता न येणारी जमिनीवरून फिरत कल्ला करीत बागडणारी लाल चोचीची कंठावर रेषा न उमटलेली पोपटाची असंख्य पिल्ले दिसतील. ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच दिसतात ती.

सुरक्षाबंधने हा काळाचा महिमा दिसतो आहे. पूर्वी आम्ही मलबार हिलवरून हँगिंगगार्डनमधून राजभवनात जात असू. आता प्रयत्न केला तर तुरुंगात रवानगी होईल. तो काळ वेगळा होता. आपल्या पिढीचे वैशिष्ट्य हे की आपण त्याच काळात रुतून न बसता आयुष्य उपभोगतो. धन्यवाद.

बाबुलनाथकडे एकदोनदा गेल्याचं आठवतं. चौपाटी टाळायचो. कमला नेहरु पार्कातला तो म्हातारीचा बूट आणि राक्षस. नकोच कारण आतमध्ये मुलं xxxx xxxx. वास यायचा.
राजभवनात मोर आहेत आणि त्याखालचे ते तळघर काही पाहायला मिळणार नाही.

जुन्या मुंबईतील फोटो नेहरु सेंटरमध्ये प्रदर्शनात(सोमवार बंद) मांडले आहेत पण ती काळोखी दालनं मोठ्यांनाही कंटाळवाणी वाटतात तर लहान मुलांचे काय!

प्रिन्सेस स्ट्रीटची इलेक्ट्रिक बस आवडली होती. कारण आवाज नाही. (वरची तार लागतेच.)
ट्राममध्ये बसलो आहे. खडखडाट फार होता पण हवेशीर.

अनिंद्य's picture

3 Oct 2019 - 3:47 pm | अनिंद्य

........ राजभवनात तळघर काही पाहायला मिळणार नाही........

राजभवनातल्या तळघराचे आता संग्रहालय झाले आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन झाले. १५ ऑक्टोबरनंतर सामान्य जनतेसाठी ते खुले होणार आहे.