धिरडं
मिसळपावचे पाहुणे संपादक ऋषिकेश यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही बालकथा लिहित आहे.
ही बालकथा माझी आजी मला लहानपणी सांगत असे.
कोण्या एका काळी एका गावात एक भटजीबुवा राहत होते. घरोघरी पूजा सांगून ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत. एकदा त्यांना शेजारच्या गावात पूजा सांगण्यासाठी बोलावणे आले. शेजारचे गाव थोडे दूर होते. भटजीबुवा गरीब असल्याने चालत जाण्याशिवाय त्यांच्या कडे काही पर्यायच नव्हता.
दुसर्या दिवशी सक्काळी लवकर उठून भटजीबुवा पूजा सांगायला गेले. पूजा होई पर्यंत दुपार झाली होती. भटजीबुवा घाईने घरी जायला निघाले. पण यजमानीणबाई त्यांना म्हणाल्या,'अहो भटजीबुवा थांबा. काहितरी खाऊन मगच घरी जायला निघा !' त्यावर हो-नको करित भटजीबुवा थांबले.
मग यजमानीणबाईंनी चुलीवर तवा ठेवला आणि तवा गरम झाल्यावर त्यावर त्यांनी काहितरी घातले. त्याचा छानपैकी चुरर्र असा आवाज आला.
भटजीबुवांना कळेना की या कोणता पदार्थ करत आहेत? ते कुतुहलाने वाट पाहत राहिले. मग यजमानीणबाईंनी त्यांना तो पदार्थ आणून दिला. तो पदार्थ भटजीबुवांना खूपच आवडला. त्यांनी यजमानीणबाईंना विचारले, ''या पदार्थाचे नाव काय आहे?'' त्यावर त्यांनी सांगितले,''या पदार्थाचे नाव आहे धिरडं !''
भटजीबुवांनी लगेच मनाशी ठरवले की आता घरी जाऊन बायकोला धिरडं करायला सांगायचे. त्यांनी धिरडं हे नाव अगदी पक्के पाठ केले. आणि ते आपल्या घरी येण्यासाठी निघाले. येताना वाटेत विसरु नये म्हणून ते मोठ्यानेच धिरडं धिरडं असं म्हणत चालत होते. त्यामुळे त्यांच इकडे तिकडे लक्षच नव्हते. त्या नादात ते एका दगडाला अडखळून पडले. त्यांच्या धोतराला, सदर्याला सगळी माती लागली. मग त्यांनी उठून माती झटकली, धोतर नीट केलं, पाणी प्यायलं आणि परत चालू लागले. आणि एकदम त्यांच्या लक्षात आले की त्या गडबडीत मात्र आपण पदार्थाचे नावच नेमके विसरलोय.
आता आली का पंचाईत !
त्यांनी खूप आठवायचा प्रयत्न केला.
''काय बरं नाव होतं? बाकडं ? नाही नाही... सरडं.. अरे नाही नाही.. काय बरं नाव होतं? उम्ह्ह ! काही केल्या आठवेना !"
असं करत करत ते घरी पोहोचले.
बायकोने त्यांना गूळ पाणी आणून दिले आणि विचारले, "थकला असाल तुम्ही. आणि भूक पण लागली असेल, काय करु तुमच्या साठी खायला?"
भटजीबुवा : "'ते' कर!"
बायको : "हा कुठला नविनच पदार्थ?"
भटजीबुवा : "ते गं ! ते तव्यावर करतात ना ते!"
बायको : "हां म्हणजे पोळी का?"
भटजीबुवा : "नाही गं ! ते नाही का.. चुरचुरीत... कुरकुरीत ...!"
बायको : "अहो पण काहितरी नाव असेल ना !"
भटजीबुवा : "मला काही नाव आठवत नाही..पण ते खूप छान लागतं.. एकदम .. चुरचुरीत... कुरकुरीत ...!"
बायको : "मला नाही बाई माहिती..."
भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??"
असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले.
बायको ओय..ओय .. अशी ओरडू लागली..म्हणाली "अहो असे काय करता... मारुन मारुन अगदी माझ्या पाठीचे धिरडं करुन टाकलेत!"
भटजीबुवा एकदम टुणकन उडी मारुन म्हणाले "हा.. तेच हवंय मला.. धिरडं".
बायकोने कपाळाला हात लावला.. म्हणाली "हात् तिच्या..धिरडं होय !!"
मग बायकोने त्यांना गरम गरम चुरचुरीत कुरकुरीत धिरडं करुन दिलं :)
धिरड्यांची चित्रे मी स्वतः
भटजीबुवांचे चित्र जालावरुन साभार.
--शाल्मली
प्रतिक्रिया
10 Nov 2008 - 4:49 am | सूर्य
धिरड्याचं चित्र झकास टाकलत. माझा आवडता पदार्थ आहे. :) . बालकथा सुद्धा छान.
10 Nov 2008 - 5:34 am | चतुरंग
धिरड्याची चित्रेही मस्तच! :)
(खुद के साथ बातां : रंगा, धिरडं हवं असलं की लिखाळ कसे बरं सांगत असतील बायकोला? :? :W )
चतुरंग
10 Nov 2008 - 9:01 pm | लिखाळ
रंगा के साथ बातां :
सहजराव आमच्याबद्दल लिहितात
नावाचा लिखाळ
स्वभाव मवाळ
थोडासा खट्याळ
लिहीतसे
त्यामुळे आम्ही भटजीबुवांसारखे नसणार हे नक्कीच. :)
अवांतर : जो फोटो काढतो तोच धिरडं करतो असे असते का? :)
-- लिखाळ.
10 Nov 2008 - 5:35 am | शितल
आणि कथा आवडली. :)
10 Nov 2008 - 7:28 am | विसोबा खेचर
आम्ही पण ल्हानपणी ही ष्टोरी ऐकली होती, मस्तच आहे... :)
भटजीबुवाचा आणि धिरड्याचा फोटू क्लासच! :)
या वरून सहजच पुण्याच्या कट्ट्यावर मी अजून एका भटजीची ष्टोरी सांगितली होती आणि ती सगळ्यांना अगदी मनमुराद आवडली होती ते आठवले. अर्थात, ती ष्टोरी बालसाहित्यात मोडत नाही हा भाग वेगळा! :)
आपला,
तात्याभटजी :)
10 Nov 2008 - 6:34 pm | आनंदयात्री
=))
10 Nov 2008 - 7:12 pm | झकासराव
सहजच पुण्याच्या कट्ट्यावर मी अजून एका भटजीची ष्टोरी सांगितली होती >>>>>>> =)) =)) =))
ती गोष्ट आठवुन आतासुधा जोरजोरात हसुन घेतल.
बाकी धिरड्याची गोष्ट आधी ऐकली होती. फोटु मस्त आहे. :)
घावन आणि धिरड एकच ना?
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 Nov 2008 - 8:06 am | रेवती
माझ्या मुलाला वाचून दाखवली. त्याला आवडली.
बालसाहित्य आलं मिपावर आता धिरड्याचं साहित्यपण येऊ देत. ;)
स्वातीताईनं एकदा घावनाची कृती दिली होती. त्यात आणि वर फोटूमधे असलेल्या धिरड्यात फरक काय?
रेवती
10 Nov 2008 - 5:42 pm | शाल्मली
<<स्वातीताईनं एकदा घावनाची कृती दिली होती. त्यात आणि वर फोटूमधे असलेल्या धिरड्यात फरक काय?<<
स्वातीताईनी टाकलेले घावन मी वाचलेले नाही. पण घावन हे तांदूळाच्या पीठाचे असते. आणि वरच्या फोटोत दाखवलेलं धिरडं डाळीचे पीठ+थोडे तांदूळाचे पीठ असे आहे.
--शाल्मली.
10 Nov 2008 - 9:03 am | ऋषिकेश
मनापासून आभार ! :) बालसप्ताहाची सुरवात तर लै भारी :)
गोष्ट एकदम मस्त! एकदम चुरचुरीत.. चमचमीत.. आणि टार्गेट ऑडीयन्सला साजेसे लेखन
आणि आता न्याहारीच्या वेळी वाचल्याने पोटात कावळे ओरडु लागले आहेत.. अरेरे आमच्या कँटीनमधे धिरडं मिळत देखील नाहि :(
-ऋषिकेश
10 Nov 2008 - 2:55 pm | आपला अभिजित
अगदी जमलंय हो धिरडं!
बाकी, धिरडं म्हणजे, बायकांना पोळ्या लाटायचा अन भाकर्या थापायचा कंटाळा आल्यावर करण्याजोगा अगदी सोपा, सहज प्रकार. नाव मात्र द्यायचं - `आज तुमच्या आवडीचा वेगळा स्वयंपाक केलाय हो!' असो.
आम्ही भाजलेल्या लष्कराच्या भाकर्या इथे वाचा :
http://abhipendharkar.blogspot.com/
10 Nov 2008 - 3:13 pm | शाल्मली
<<बाकी, धिरडं म्हणजे, बायकांना पोळ्या लाटायचा अन भाकर्या थापायचा कंटाळा आल्यावर करण्याजोगा अगदी सोपा, सहज प्रकार. नाव मात्र द्यायचं - `आज तुमच्या आवडीचा वेगळा स्वयंपाक केलाय हो!'<<
हे एकदम पटलं..(पण मनातल्या मनात) ;)
पण धिरडं हा पदार्थ मधल्या वेळचं खाणं म्हणूनही छान वाटतो हं :)
--('ह्यांच्या' आवडीचा वेगळा स्वयंपाक करणारी) शाल्मली.
11 Nov 2008 - 7:10 am | चित्रा
पण धिरडं हा पदार्थ मधल्या वेळचं खाणं म्हणूनही छान वाटतो हं
+१
लहानपणीची आठवण आली, गोष्ट छान आणि धिरडीदेखील.
10 Nov 2008 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आवडली मला!
(सकाळीच स्वतः बनवून धिरडी चापणारी बालिका) अदिती
13 Nov 2008 - 7:39 pm | टारझन
टाइमस्टँप चुकलाय का ? ही खरड ( सोम, 11/10/1888 - 17:29) . मधली असावी !!
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
10 Nov 2008 - 5:36 pm | स्वाती दिनेश
खूप दिवसांनी ह्या गोष्टीची आठवण करून दिलीस,छान वाटले.
धिरड्याचे फोटो मस्त!
स्वाती
10 Nov 2008 - 5:43 pm | वारकरि रशियात
मुक्तसंगः अनहंवादि
गोष्टी ऐकण्यात रंगून जाणारा
(व धिरडी आवडणरा बाल) वारकरि
10 Nov 2008 - 6:35 pm | आनंदयात्री
काय मस्त गोष्ट सांगितलीत !!
अजुन येउद्या अश्या गोष्टी !!
10 Nov 2008 - 9:37 pm | प्राजु
माझ्या आजीनेही ही गोष्ट मला सांगितली होती लहानपणी. आज बरं वाटलं वाचून पुन्हा एकदा.
सह्ही. फोटोही मस्त.
मी या धिरड्यामध्ये बर्याचदा कधी पालक, कधी मेथी, कधी किसलेला दूधी भोपळा घालते. माझा लेक डोसा म्हणून आवडीने खातो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Nov 2008 - 10:15 pm | सुनील
कथा आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Nov 2008 - 10:32 pm | भाग्यश्री
आवडली गोष्ट! मी नव्हती ऐकली आधी..
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Nov 2008 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
लहानपणी ही गोष्ट नेहमी सांगायचे आई-बाबा. आठवणी जाग्या झाल्या. :)
धिरड्याचे फोटो पण मस्त. त्यामुळे पण बर्याच आठवणी आल्या.
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 2:04 pm | शाल्मली
सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
:)
--(आभारी) शाल्मली.
11 Nov 2008 - 2:09 pm | अभिज्ञ
शाल्मली ताई कथा चांगली आहे,परंतु हिला बाल कथा म्हणायचे का?
भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??"
असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले.
लहान मुलांना ,नव-याने बायकोला मारणे हे दाखवलेच पाहिजे का?
मला वाटते लहान मुलांना असल्या गोष्टींची सवय आपणच लावतो.
बाकि चालु द्या.
अभिज्ञ.
11 Nov 2008 - 3:36 pm | शाल्मली
अभिज्ञ,
तुमचा मुद्दा बरोबर आहे. परंतु वर प्रतिसाद दिलेल्या अनेक लोकांनी ही कथा लहानपणी ऐकली असून त्यांना आवडल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मनावर ह्या गोष्टीचा काहीच विपरित परिणाम झाल्याचे दिसत नाही.
मला वाटते लहान मुलांना असल्या गोष्टींची सवय आपणच लावतो.
तसेच आपले आई-वडिल किती गंभीरपणे अथवा चेष्टेच्या सुरात गोष्ट सांगत आहेत तेही लहान मुले अजाणतेपणी लक्षात घेतच असतात. जेव्हा पालक विनोदी सुरात
भटजीबुवा रागावले आणि म्हणाले "येवढं कसं तुला येत नाही??"
असं म्हणून रागाने ते बायकोला पाठीत रट्टे मारायला लागले.
असे सांगतात, तेव्हा मुलांच्या चेहेर्यावर हसूच उमटते.. असे मी सुद्धा पाहिले आहे.
तेव्हा पालकांनीच गंभीर कथा गंभीर अंगाने आणि विनोदी कथा विनोदी अंगाने सांगावी असे मला वाटते. .
तरीही तुमचा मुद्दा पुढील वेळेस मी जरूर विचारात घेईन. :)
--शाल्मली.
12 Nov 2008 - 2:23 am | चतुरंग
तुम्ही गोष्ट सांगताना,
भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??"
असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली.
....
असा बदल केलात तरी चालेल..
शेवटी मुलांना धिरड्याची गोष्ट समजल्याशी कारण! ;)
चतुरंग
12 Nov 2008 - 6:56 pm | लिखाळ
>>भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??"
असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली.<<
हा हा हा.. हे मस्त !
-- (घरातले लाटणे लपवून ठेवणारा) लिखाळ.
12 Nov 2008 - 10:32 pm | शाल्मली
(घरातले लाटणे लपवून ठेवणारा) लिखाळ
तरीच लाटणं सापडत नाहीये.. ;)
त्यामुळे पोळ्या करता येत नाहीत हल्ली.. आणि मग धिरडी करावी लागतात.. ;)
--लाटणं शोधणारी (शाल्मली)
13 Nov 2008 - 3:52 pm | अभिज्ञ
भटजीबुवांची बायको रागावली आणी म्हणाली "येवढं कसं तुम्हाला आठवत नाही??"
असं म्हणून रागाने ती भटजींना पाठीत रट्टे मारायला लागली.
त्या ऐवजी,
भटजी रागावून बायकोच्या पाठित रट्टे घालायला लागतो.
ते पाहून बायकोहि भटजीच्या पाठित रट्टे घालत सुटते.
दोघांचीहि रट्टारट्टि पाहून त्यांचा लहान मुलगाच ओरडतो
कि तुम्ही दोघे एकमेकाच्या पाठिचे "धिरड" का करताय?
शेवटी भटजीला/लहान मुलांना धिरड्याची गोष्ट समजल्याशी कारण!
;)
अभिज्ञ.
13 Nov 2008 - 5:43 pm | चतुरंग
दर पिढी गणिक मारणारे लोक आलटून पालटून बदलत रहातील! ;)
चतुरंग
11 Nov 2008 - 5:35 pm | राम दादा
बायकोने बिचारीने ..मार खाउन सुद्धा सांगितले..आणि हा भडजी..????
आणि काय काय आठवायसाठी ..त्या बायकोला किती मारत असेल . कोणास ठाऊक...
असो..कथा आवडली....
राम दादा...
13 Nov 2008 - 7:34 pm | आपला अभिजित
पोरांना कसं समजावायचं हा एक गहन प्रश्नच असतो.
माझ्या मुलीची एखादी अनाठायी मागणी पूर्ण केली नाही आणि तिला समजावायल गेलं, तर `हेच तुमचं उलट बोलणं मला आवडत नाही' म्हणून माझ्यावरच आगपाखड करते.
यापुढे काय बोलायचं? कप्पाळ?
(अवांतर : `आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा.' ही ग्राफिटी स्वानुभवावरच आधारित होती. असो.)
- मुलीचे शब्दबाण झेलणारा
अभिजित.
13 Nov 2008 - 8:29 pm | यशोधरा
शाल्मली, मस्तच गं गोष्ट :)