एका रम्य पहाटे

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
23 Sep 2019 - 9:40 pm

एका रम्य पहाटे
फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त पुण्याला जाणे झाले. चिपळूण पुणे अंतर २०० किमी आहे. एकदा दिवसात पुण्यात जाऊन परत यायचं असा प्लॅन ठरला. त्यामुळे पहाटे ४ला चिपळूणहुन निघालो. माझे दोन भाऊ विवेक दादा आणि सुमंता, मी आणि श्रीनिवास असे चौघे जण प्रवासात एकत्र होतो. (त्यावेळी कुंभार्ली घाटाची अवस्था बरी होती) पण पाटण ते उंब्रज रस्ता मात्र वाईट याच अवस्थेत होता. त्यामुळे सुमंता आणि विवेकदादाने एका नवीन रस्त्याने जाऊया म्हणून सुचवले. 'आम्हाला काय ? ड्रायविंग दादा करणार, हवं तिथून ने' असं म्हणून त्याला पूर्ण मोकळीक दिली.
कुंभार्ली घाट चढताना मिट्ट काळोख होता. फक्त एक सुंदरशी चंद्रकोर आणि त्याच्याजवळ एक छानशी चांदणी चमकत होती. हवेत थोडासा गारवा होता. एकदम मस्त वातावरण होते. कोयनेच्या इथे चहा प्यायला थांबून निघालो. मजल दरमजल करीत पाटण गाठले. इथून लगेच दादाने गाडी डावीकडे वळवली. हा छोटासा रस्ता पूर्णपणे गावातून आणि माझ्यासाठी अनोळखी प्रदेशातून जात होता. डावीकडे वळल्यावर लगेचच एक मोठा डेअरी प्लांट लागला. (बहुदा सकसचा होता. नक्की आठवत नाही .) हा आतला रस्ता पाटणवरून म्हावशी, सडवाघापूर मार्गे जाऊन पुणे - बंगलोर हायवेला नागठाणे इथे बाहेर पडतो. पाटण-उंब्रज मार्गे अंतर तेव्हढाच असलं तरी रस्ता खूप छान आणि सिनिक आहे. डेअरी प्लांट मागे टाकून आम्ही पुढे निघालो. अगदी अलगद उजाडायला लागले होते. मुख्य रस्ता सोडल्याने आता निरव शांतात होती.
काळोख कमी होऊन हळूहळू उजाडायची सुरवात होत होती. रस्ता चांगलाच नागमोडी होता. इथे चढ सुरु झाला. अनेक वळणे वळणे घेत गाडी डोंगर चढत होती. पाटण ते मल्हारपेठ रस्त्यावरून जाताना डावीकडच्या डोंगरावर पवनचक्क्या दिसतात. त्या पवनचक्क्या ज्या गावात आहेत ,हा रस्ता तिथूनच जातो. आधीच्या अंधारामुळे आम्हाला काहीच अंदाज येत नव्हता. पण हळूहळू प्रकाशाची धूसर रेषा आता क्षितिजावर दिसू लागल्या होत्या. चंद्र आणि चांदणी अजूनही सुंदरतेने चमकत होते. त्या हलक्या प्रकाशात एक एक करत पवनचक्की दिसायला लागली. लांबून दिसणाऱ्या पवनचक्क्यांची पाती किती मोठ्ठी आहेत याचा अंदाज येत होता. सुंदर पहाट, त्यात डोंगररांगा त्यामुळे सुखद असा वारा सुटला होता. त्यात त्या पवनचक्क्यांच्या पाती मंद गतीने फिरत होत्या. जसा जसा प्रकाश वाढत होता आणि आम्ही डोंगर चढत होतो, तस तस मग खाली पसरलेले धुकं नजरेस दिसत होत. डोंगर पूर्ण चढून गेल्यावर आम्ही एक ठिकाणी थांबलो. इथून आम्हाला जवळपास सगळ्या पवनचक्क्या दिसत होत्या. तसाच प्रकाश वाढून केव्हाही सूर्योदय होईल अशी वेळ आली होती.
आमच्यात सुमंता फोटोग्राफर. अशी संधी सोडणं तो शक्यच नाही. गाडी थांबवून आम्ही सगळेच खाली उतरलो. गाडी वर चढत असताना जमेल तेव्हढे फोटो त्याचे काढून झालेच होते. आता तर पिक पॉईंट म्हणावा असा शॉट त्याला मिळणार होता. दुर्दैवाने आधी काही न ठरल्याने त्याने त्याचा कॅमेरा घेतला नव्हता. पण म्हणून त्याच्यातला फोटोग्राफर थोडीच स्वस्थ बसणार? त्याने मोबाईलच्या कॅमेरावर काम भागवून घेतलन. आम्ही चौघंही आपल्याला मिळेल तो पॉईंट पकडून सूर्योदयाची वाट बघत होतो.

डोंगराच्या एक बाजूला खाली उतरत असलेली वस्ती तर दुसऱ्या बाजूला एक मोठा जलाशय दिसत होता. सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. आणि अक्षरशः दोनच मिनिटात सूर्योदय झाला. ऐन फेब्रुवारी असल्याने उगवणारा सूर्य लाल नसून पिवळा धमक सोनेरी रंगाचा होता. अप्रतिम असं दृश्य होत ते. कॅमेरात हि दृश्य टिपण्याच काम सुमंत करत असलयाने आम्ही पूर्णपणे तो क्षण अनुभवून घेतला. डोळ्यात , मनात साठवून घेतला. अगदी कुठल्याही गाडीचा, स्पीकरचा, माणसांच्या बोलण्याचा कसलाही आवाज नाही. असालच तर पक्षांचा मंजुळ किलबिलाट आणि बाहेर पडलेल्या गुरांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज . उलट त्या आवाजांनी वातावरणात आणखी हवीशी वाटणारी भरच घातली. आकाशात एकाच वेळी पूर्वेकडे सूर्य उगवला होता तर पश्चिमीकडे चंद्र अस्ताला जाण्याची तयारी करत होता. सूर्याच्या प्रकाशापुढे त्या चंद्र चांदणीच्या प्रकाश अपुरा पडू लागला. आणखी थोड्याच वेळात चंद्र चांदणी मावळली. एक अपूर्व अशी रात्र संपून नवीन दिवस उजाडला होता.
आम्हीही आयता मिळालेला फोटोग्राफर का सोडा म्हणून लगेच आपले आपले फोटो काढून घेतले. निसर्गाचा छान,सुखद असा अनुभव घेतल्यावर, तसेच मन भरेपर्यंत फोटो काढून झाल्यावर शेवटी आम्ही त्या ठिकाणाचा निरोप घेऊन निघालो. मगाशी डोंगर चढून आलो,आता सगळा उतार होता. शिवाय छान उजाडलं होत त्यामुळे काहीच त्रास नव्हता. मुलांना हे ठिकाण दाखवायला नक्की न्यायचं आणि तेहि असंच भल्या पहाटे असं मनाशी ठरवूनच गाडी वेगाने हाकत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Sep 2019 - 10:26 pm | प्रचेतस

व्वा..छान

मस्त

परंतु सूर्योदयाचा फोटो टाकला असता तर चार चांदण्या लागल्या असत्या.

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 8:41 am | जॉनविक्क

फोटो टास्कायला तेव्हडे विसरू नका