क्लीक - ४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Sep 2019 - 7:40 am

तुम्ही कशाला जाताय, मीच आणते ना. यांनाही बरोबर नेते म्हणजे बोलणंही होईल" मी बाबाच्या बहाण्याचा धागा पकडते. मलाही तसं घरात अवघडल्यासारखं झालंय. बाहेर पळावसं वाततंय. पण या शिर्‍यालाही सोडायचं नाहिय्ये. " चालेल ना हो तुम्हाला" माझ्या त्या प्रश्नावर परिक्षेत एकवीस अपेक्षीत मधला घोकून घोकून पाठ करुन ठेवलेला प्रश्नच पेपरात आल्यावर व्हावा तसा आनंद शिर्‍याच्या चेहेर्‍यावर गणपतीत लाईटच्या माळा चमकाव्यात तसा चमचमला.
त्यालाही तेच हवे असावे.

मागील दुवा : http://misalpav.com/node/45333
बाबा हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मी आणि शिर्‍या आम्ही दोघेही उठून उभे राहिलो. मी स्कूटीची किल्ली घेते. हेल्मेट घेते. इतकी छान वेणी गजरा घातल्यावर त्यावर हेल्मेट! शी बाई.... मला कसंसच होतंय.. हे सगळे परीवहन मन्त्री पुरूष असतात ना म्हणून हे असले नियम करतात. त्यांना काय कल्पना असणार गजरा वेणीसह हेल्मेट घातल्यावर काय होतेय याची. स्त्रीयांनी सक्रीय राजकारणात यायला हवे. मी ठरवते. नेक्स्ट टाईम असे हेल्मेट आणू ना त्यात गजरा आणि वेणीसाठी मुद्दाम होल पाडून घ्यायचं. शिर्‍याच्या ते लक्षात येतं. तो त्याच्या गाडीची किल्ली नाचवतो. " कशाला आहे ना गाडी"
"तुझ्या गाडीमुळे माझ्यावर काही इम्प्रेशन पडणार नाही." मी मनात म्हणते. तरी पण जरा बरं वाटतं. निदान सोसायटीतून स्कूटीवरची वरात तरी वाचली.
मी गाडीत बसते. पार्किंग मधून गाडी बाहेर काढत शिर्‍या विचारतो" कुठे जायचंय. एनी चॉईस?"
" रविराज चालेल?" माझी प्रश्नवजा सूचना.
" डन या वेळेस तिथे फारशी गर्दी नसेल." शिर्‍या गियर बदलतो. एक उजवे एक डावे आणि पुन्हा एक उजवे वळण घेऊन कमला नेहरु पार्क मागे टाकत गाडी रविराजच्या दारात थाम्बते. अपेक्षेप्रमाणे फारशी गर्दी नाही. ओपन स्पेस मधले बर्‍यापैकी बाजूचे टेबल पाहुन मी बसते. शिर्‍या बाहेर गाडी पर्क करून येतो. तो टेबलापाशी उभा आहे. मी "बसा ना " म्हंटल्यावर तो खुर्चीत बसतो. एकदम ताठ खुर्चीच्या पुढच्या अर्ध्या भागावर बसलाय. नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या कँडीडेटसारखा. तो क्लू घेत माझ्यातली प्रोजेक्ट लीड जागी होते.
" कोणी सुरवात करायची" मी विचारते.
"ऑफकोर्स ळेडीज फर्स्ट"
" बट नॉट इन धिस केस" मी त्याला बोलतं करायला बघतेय.
"काय सांगू? माझं शिक्षण व्यवसाय घरची पार्श्वभूमी सगळं माहीत असेल तुम्हाला."
" एनी थिंग. कॉलेज फ्रेंड्स हॉबीज बिझनेस फक्त कमोडिटी मार्केट सोडून"
" हा हा हा" शिर्‍या हसतो. त्याचं ते धीरगंभीर खर्जातल्या आवाजातलं हसणं डग्ग्यावर धिन धिन धिन वाजल्यासारखं वाटलं. " का हो कमोडिटी मार्केट का नको म्हणताय. माझा व्यवसाय आहे तो.पोटापाण्याचा उद्योग"
" मला त्यातलं काहीच समजणार नाही. तुम्ही जे काही सांगाल ते खरं मानावं लागले"
" काय फरक पडतो.! मी सांगितलं म्हणून तुम्ही काही लगेच मार्केट मधे प्रवेश करणार नाही".
" पण तरी नकोच" आम्ही दोघेही दुसरा किती डोमिनेटिंग आहे याचा अंदाज घेतोय. गुड आता खेळ सुरू झालाय." तुम्ही निवडलाय हा जरा वेगळाच व्यवसाय आहे ना!" माझा गुगली प्रश्न. कँडीडेटच्या मुलाखाती घेताना असे प्रश्न समोरच्या उमेदवाराला त्यांच्याबद्दल बोलायला भाग पाडतात. समोरचा उमेदवार त्याच्याबद्दल बरीच माहिती देवून जातो.
" हो" शिर्‍याचे एका अक्षरातले उत्तर" हा समोरच्याला जोखण्यात तयार दिसतोय. प्रश्नात सहजासहजी अडकत नाहिय्ये. मला " गेम्स पीपल प्ले" पुस्तक आठवते.
एखाद्याने मुद्दम इंतरव्ह्यू टेक्नीक्स शिकून यावे तसा आला. काय बोलायच्म काय नाही हे ठरवून आला असावा. अशा लोकाम्चे इंटरव्ह्यू घेताना जरा विचार करून घ्यावा लागतो. समोरचा उमेदवार काय सांगतोय या पेक्षाही काय लपवतोय हे समजलं की मजा येते बोलायला. पण गडी तयार दिसतोय.
" पण मग बाकीचे लोक का नाही निवडत हे क्षेत्र?" माझा आणखी एक गुगली.
" त्याना नसेल मिळत माहिती" शिर्‍याचे पुन्हा त्रोटक उत्तर.
मला आता राग यायला लागलाय. हा माणूस जेवढ्यास तेवढंच अगदी विचारल्म्य तेवढंच उत्तर देतोय. ही असली विचारळं तेवढंच बोलणारी माणसं अवघड असतात. आतल्या गाठीची असतात.
याला बोलतं कसं करावं? मला प्रश्न पडलाय.
"अहो तुम्ही आमच्याकडे मुलगी पहायला आलाय लग्नासाठी "माझ् या वाक्यावर जर याने नुसतं" हो" अस एका शब्दाच्म उत्तर दिलं ना तर दातच पाडेन आता याचे.
" हो ना आपण मुलगी पहाणे वगैरे जाऊद्या . तुमची ओळख करुन घ्यायला आलोय असं म्हणा" नशीब चांगलं दिसतंय याचं. बोलला बाबा एक तरी मोठं वाक्य.
" हो ना" मी पण त्याच्या इतकंच त्रोटक उत्तर देते.
माझ्या त्या त्रोटक उत्तरावर शिर्‍याच्या चेहेर्‍यावर एक बारीक स्मिताची रेषा झळकली. हे बरं झालं . त्यालाही जाणवलंय की हम भी एक मंझे हुवे खिलाडी है"
याच्या बद्दल मत पॉझीटीव्ह बनवावे की निगेटीव्ह ते ठरवता येत नाहिय्ये. खेळात बेनीफिट ऑफ डाऊट देतो पण लग्नात कसा देणार? अर्थात हा प्रश्न यानं आपल्यालाअ होकार कळवला तर ! या नंतरचा आहे. पण आपण कशाला त्याच्या होकार नकाराची वाट पहायची. जे काय असेल ते आपणंच अगोदर सांगून टाकायचं. नाहीतरी आपल्या कुठे लग्नाची इतकी घाई झालीये.
" तुमच्या आवडी निवडी काय आहेत? वाचायला आवडते? काय वाचता?" आता याला बोलतं करायलाच हवा.
" हो वाचायची आवड आहे. मराठी इंग्रजी दोन्ही.वाचतो. मराठीत व पू काळे, पु लं चिं वि जोशी हे ऑल टाईम फेवरीट. इंग्रजीत नॉन फिक्षन नेपोलीयन हिल, ईलन पीज , स्पेन्सर जोन्सन, स्टीफन कोव्हेचं सेवन हॅबीट्स हे खास. माणसाच्या स्वभावाच्या जडणघडणीत त्याच्या सवयीं कशा काम करतात खूप छान सांगीतलंय. रिस्पॉन्स आणि रीअ‍ॅक्षन या बद्दल तर तो खूप छान बोलतो.
वा हे बरं झालं स्टीफन कोवेच्या पुस्तकाच्म नाव निघालं आणि हा बोलायला लागला. नुसता बोलायला नाही तर भरभरून बोलायला लागला. त्याच्या त्या घनगंभीर आवाजातलं बोलणं ऐकताना पोटात गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं. एका लयीतलं ते बोलण ऐकताना गुंगी येतेय असं वाटायला लागलं . लग्न झाल्यावर हा या अशा गुंगी आणणार्‍या स्टाईलनं भांडायक्ला लागला तर काय मजा येईल ना? भांडणाचं विसरूनच जाईन मी. त्याला ऐकताना
मनातल्या विचारांनी मी चमकते. याला आपण पहिल्यांदाच भेटतोय अजून क्लीक झाला नाही म्हणतोय आणि त्याच्या बद्दल लग्नच नव्हे तर पुढच्या भांडणाचाही विचार करतोय आपण. कशात काही नाही नुसते शेख चिल्ली विचार. मला माझ्या विचारांचे हसू येते.
" का हसलात?" काही चुकीचे बोललो का?" शिर्‍याचा प्रश्न.
माझं मनातल्या मनातलं हसणं बहुधा याला चेहेर्‍यावर दिसलं असावं.
" नाही नाही तुम्ही छान सांगताय पुस्तकांबद्दल." मी कसं बसं सावरून घेते. का कोण जाणे मला आता थोडासा राग यायला लागलाय. कदाचित त्यानं माझं मनातल्या मनात हसणं पकडलं म्हणून. की मग आपली इच्छा नसतानाही आपल्या त्याचा आवाज आवडायला लागलाय म्हणून?
"केवळ एक वेणीचा शेपटा आवडला म्हणून आख्ख्या बाईशी लग्नं करावं लागतं" परवाच वाचलेल्या कथेतळ्म वाक्य डोळ्यासमोर नियॉन साईन सारखं नाचायला लागलंय. शिर्‍याच्या घनगंभीर आअवाजाची गुंगी माझ्यावरुन उतरते. मला त्याच्याबद्दल वाटणारी भावना पुन्हा एकदा तिरस्कार मार्क कडे झुकायला लागली आहे.
हा कमोडिटी मर्केटमधे जाणार दिवसभर त्यातच असनार. घरी आल्यावर घुम्यासारखं बसुन रहाणार. त्याचे आपले विषय कॉमन नाहीत. विचारलंतेवढंच बोलणार. प्रेमल संवाद वगैरे नाहीच बहुतेक . तरी बरं निदान पुस्तकं तरी वाचतो. पण नकोच. आपल्याला नको हा असा अबोल भावला. तसा नुसता बोलका भावला पण नको. दिवसभर ऐकत कोण बसणार.
अबोल नको, बोलका नको. माठ्या नको, एकदम इंटेलेक्च्यूअल नको. ढोल्या नको पण अगदी सुकड्याही नको. काळा ढूस्स डांबर नको गोरा पांढरा ढगही नको. मग आपल्याला नवरा हवाय तरी कसला?
काय नको ते माहीत आहे. पण काय हवं आहे ते माहीत नाही. कशी गम्मत असते ना. आपल्याला जे हव्म असत्म त्या पेक्षा जे नको असतं त्याचीच जास्त माहिती असते. आपलं सगळं लक्षं जे नको आहे त्यावरंच जातं.
द्रौपदीला पाच पती होते. पाच वेगवेगळ्या स्वभांचे. धर्मासारखा गंभीर, भीमासारखा एक घाव दोन तुकडे वाला, अर्जुनासारखा रसीक, नकुलासारखा मिश्कील आणि सहदेवासारखा चंचल. कोणाशी कधी बोलायचं ते ती ठरवत असेल तीच्या इच्छेने. किती मज्जा येत असेल तीला. हे लक्षात ठेवायचं सोडून आपण तीच्या मानहानीचा प्रसंगच जास्त लक्षात ठेवतो.
" तुमची हरकत नसेल तर ... सिगारेट ओढली तर चालेल ना" मला विचारात गढून गेलेलं पाहून शिर्‍यानं मुक्तीचा मार्ग शोधला.
मी त्याच्या ओठांकडे पहाते. सिगरेट ओढणारांचे असतात तसे काळे तर दिसत नाहीत. येताना गाडीतही तसा काही वास आला नाही. सिगारेटचा वास गाडीच्या कुशनला चिकटतो. धुवून कडक उन्हात वाळवलं तरीही तो येत येत रहातो.
माझ्या उत्तराची वाट न पहाता शिर्‍या पँटच्या खिशातून सिगारेटचे पाकीट काढतो. " वुडान गरम" पाकीट अजून फोडलेले पण नहिय्ये. वरचे प्लास्टीकचे आवरण तस्सेच आहे. हा नक्कीच स्मोकर नाही. सिगरेटओढणारांकडे असले पॅकबंद पाकीत कधीच नसते. पाकीत घेताना पानपट्टीवालाच ते फोडून हातात देतो. प्रोजेक्ट मधली शोभा ताहिलानी रेग्यूलर सिगारेट ओढते. तीच्या सवयी पाठ आहेत मला.
हा शंभर टक्के सिगारेट न ओढणारा आहे. मग आत्ताच का ओढतोय हा इथे, ते ही ज्या मुलीला पहायला आलोय तीच्या समोर? लोक आपण सोज्वळ निर्व्यसनी आहोत , सिगारेट ओढत नाही असे खोटे सांगतात. तोंडाचा वास लपवण्यासाठी पानमसाला, माऊथ वॉश, स्प्रे काय काय वापरतात. मग हा असं का करतोय? अशानं पॉझीटीव्ह जाऊ देत निगेटीव्ह इंप्रेशन पडतं .
मी चमकते. याला तेच हवं असावं. आपल्यावर निगेटीव्ह इंप्रेशन पाडायचंय. आपल्याकडून नकार घ्यायचाय? माझ्या डोक्यातलं चक्र जोरात फिरायला लागलय.
" गेम्स पीपल प्ले: पुस्तकाची पुन्हा एकद उजळणी होते. येस्स्स. एक्झॅक्टली. आपण करतोय तेच हा ही करतोय.आपण डॉमिनेटिंग आहोत अस्म दाखवतोय. हा प्रत्युत्तर म्हणीन " मी पर्वा करत नाही" असं दाखवतोय.
मी त्याच्या बुद्धीला दाद देते.
मी त्याच्या कडे पहातेय. शिर्‍या सिगरेटच्या पाकिटाचं आवरण फाडतो. पाकीटातून एक सिगरेट काढून ओठांच्या कोपर्‍यात धरतो. खुणेने वेटरकडे काडीपेटी मागतो. सिगरेटचे पाकिते बिफीकीरीने टेबलावर फेकतो.
आता मात्र माला सुचत नाहिय्ये. काय करावं हा सिगरेटचा धूर काढत आपली प्रतिक्रीया पहात रहाणार. आपण शिष्ठाचार म्हणून ते नाराजी दाखवत सहन करणार. आपले पेशन्स सम्पवणार. आणि शेवटी आपल्याकडुन अपेक्षीत असा " नकार" घेणार. त्याच्या तालावर नाचणारं माकड बनवणार. त्यापेक्षा आपणच त्याला धक्का देऊया
त्याच्या डावपेचात सापडणारी मी नाही. मी ठरवेते. टेबलावरच्या पाकीटीतून एक सिगरेट काढते.
"तुमची हरकत नसेल तर...…." दोन बोटात सिगरेट पकडत मी शिर्‍याला विचारते.
त्याच्या तोंडावरचे बदलत जाणारे भाव पहाते. कपाळावर दोन भुवयांच्यामधे एक बारीकशी प्रश्नार्थक दुमड, मग विस्फारत जाणारे आश्चर्य सांडणारे डोळे.
नक्की त्याला धक्का बसलाय. त्याचे ओठ विलग झालेत. ओठातली सिगरेट हातात पडलीये. आ वासून पहायचंच बाकी राहिलय.
तो माझ्याकडे पहातोय आमची क्षणभर नजरानजर झालीये. त्याचे डोळे खोटे बोलू शकत नाहीत.
" तुम्ही सिगरेट ओढणारे दिसत नाही: मी त्याला थेट विचारते.
खाऊची चोरी पकडली गेल्यावर लहान मुलाने आईकडे पहावे त्या नजरेनें तो पहातोय.
' हो तुम्ही कस्म ओळखलंत?" त्याच्म प्रांजळ उत्तर.
" ते मी नंतर सांगेन." आपले पत्ते आत्ताच नाही ओपन करायचे.
" आणि तुम्हीही या पूर्वी सिगरेट कधीच ओढलेली नाहिय्ये"
"कशावरून?" मला त्याचं ओब्जर्वेशन जाणून घ्यायचंय.
" अहो तुम्ही सिगरेट हातात उलट्या टोकाकडून पकडली आहे" शिर्‍या आता मनमोकळा हसला.
मी पण हसले. भेटल्यापासून इतक्या वेळत आम्ही दोघे प्रथमच मोकळेपणे अहसलो.
"" मग हे नाटक कशासाठी" मघाच्या माझ्या रागाची जागा आता कुतूहलाने घेतली आहे.
" खरं सांगू मला मुलगी पहाण दाखवणं पसंत करणं हा पोरकटपणा वाटतो. अजिबात आवडत नाही. पण आईला वाईट वाटेल म्हणून नाही म्हणू शकलो नाही. लग्न हा आयुष्याचा भाग आहे. जीच्या बरोबर आयुष्य काढायचं तीची नीटओळख तरी असायला नको?
" बरोबर आहे दाखवण्या पहाण्याच्या कार्यक्रमाचा मलाही तिटकारा आहे. वोंडो शॉपिंग केल्यासारखं मुलीला पहायचं आणि तीच्या अर्ध्या तासातल्या दिसण्या वागण्यावरून होकार किंवा नकार द्यायचा. घरात कार्यक्र्म असेल तर मुलाच्या न बोलता बाहेर जान्यावरून किंवा मुलीच्या लाजण्यावरून घरातल्यांनी ओळखायचं."
मी आईला हेच म्हणत होतो. तुमचा फोटो नाव आई वडीलांचं नाव शिक्षण जॉब ही महिती तर काय फेसबुक वर पण मिळते. पण त्यातून तुमची ओळख होत नाही. पटतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते" शिर्‍या अगदी मनापासून बोलतोय." त्या मुळे मुलगी पहायचा कार्यक्रम आहे म्हंटल्यावर मी ठरवळं होतं की आईचं मन राखायला म्हणून मुलगी पहायला जायचं पण नकार घेवून यायचं.
" मी पण तेच ठरवलं होतं. आपल्याला काही क्लीक झालं तर ठीक आहे. नाही तर आपणच नकार द्यायचा मुलाला"
" चला या बाबतीत एकमत झालं म्हणायचं माझं आणि तुमचं" टाळी देण्यासाठी शिर्‍यानं हात पुढे केला. माझा हात अभवितपणे पुढे आला.
" लेट अस बी व्हेरी प्रॅक्टीकल अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅह्री. सहमती नाही याबाबत सहमत आहोत" मला शिर्‍याचं मत एकदम पटलं.
" एक सांगू ! मला तुम्ही अहोजाहो म्हणू नका ते उगाचच क्लायंटशी बोलल्यासारखं वाटतं"
" तो क्या बोलू साब"..... एक वेगळाच आवाज आला म्हणून आम्ही चमकून वर पाहिलं . वेटर ऑर्डर विचारायला आलाय.
" इथे कोल्ड कॉफी चांगली मिळते.... दो कॉल्ड कॉफी " त्याला कोल्ड कॉफी आवडते की नाही याची पर्वा न करता मी ऑर्डर देवून टाकते.
" अहो जाहो म्हंटलं की मलाही ते क्लायंटशी बोलल्यासारखं वाटतं. घरचे मला श्री म्हणतात."
" शिर्‍या म्हंटलं तर चालेल?" माझ्या त्या उत्तरावर तो चमकलाच.
आम्ही दोघेही खळखळून हसत सुटलोय काहीतरी क्लीक झाल्यासारखे.
..... समाप्त

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Sep 2019 - 8:27 am | यशोधरा

मस्त शेवट!

सुधीर कांदळकर's picture

21 Sep 2019 - 8:28 am | सुधीर कांदळकर

गवतावर फेरफटका मारल्यावर ताजंतवानं वाटतं तसं वाटलं .

पुलेशु. धन्यवाद.

छान. या समाप्तीच्या भागासह सगळे भाग आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2019 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

शिगरेटीची आयडिया आवडली.
पैजारबुवा,

एकदम हलकीफुलकी कथा. विजुभाऊ बेस्ट.

जॉनविक्क's picture

21 Sep 2019 - 10:23 am | जॉनविक्क

शेवटचा भाग अगदी मासिकातल्या कथेप्रमाणे झाला आहे.

सुबोध खरे's picture

21 Sep 2019 - 10:30 am | सुबोध खरे

चार ही भाग एकामागे एक उत्सुकतेने वाचून काढले. पण एकदम "समाप्त" पाहून थोडा विरस झाला. अतिशय रंगात आलेले गाणे रात्रीचे बारा वाजले म्हणून रंगमंदिरात आवरते घेतात तसे वाटले.

एकंदर हा विषय गंभीर आणि गमतीदार दोन्ही आहे त्यामुळे वाचताना मजा आली.

माझ्या लग्नाची कहाणी मी पूर्वी लिहिली आहे त्यात अशीच अवघडलेपणाची(awkward) स्थिती मी वर्णन केली आहे.

http://www.misalpav.com/node/30588

श्वेता२४'s picture

21 Sep 2019 - 11:05 am | श्वेता२४

खूपच आवडली.

नाखु's picture

21 Sep 2019 - 12:38 pm | नाखु

आठवले,
अकृत्रिम मांडणी आणि आजुबाजूच्या लोकांच्या मनातील भावना व्यक्त करणारी कथा नायिका,नायक.

रुढार्थाने ही नायिकेची आणि नायकाची कथा नाही तर सोपस्कार पार करुन लग्नासारखे आयुष्य बदलणारे संबध कसे बेगडी आहेत तेच नेमकेपणाने हसत खेळत सांगत आहे.

परस्परांच्या स्वभाव आवडी निवडी एकच असल्या नाहीत तरी हरकत नाही पण त्या परस्पर पूरक आणि पोषक (उपद्रवशून्य) असाव्यात आणि हे एकाच भेटीत समजणे कठीण आहे

मध्यमवर्गीय मिपाकर नाखु पांढरपेशा

अगदी आपल्याला आवडणारी व्यक्तिसुद्धा... फक्त एकमेकांच्या डोक्याला कटकट निर्माण होणार नाही ना एवढे समजले की पुरेसे आहे.:)

पद्मावति's picture

21 Sep 2019 - 1:39 pm | पद्मावति

खुप सुंदर कथा.
पण इतक्यातच समाप्त :(

रातराणी's picture

23 Sep 2019 - 2:54 am | रातराणी

गोड कथा . :)

विजुभाऊ's picture

23 Sep 2019 - 10:12 am | विजुभाऊ

_/\_

सर्व भाग सलग वाचायचे म्हणून वाट पाहत होतो.

वाचून लवकरच प्रतिसाद देतो..

ज्योति अळवणी's picture

23 Sep 2019 - 5:36 pm | ज्योति अळवणी

खूपच सुंदर कथा

शुभां म.'s picture

23 Sep 2019 - 6:17 pm | शुभां म.

एकदम भारी ......
खरंच बघायच्या कार्यक्रमाचा एकूण पॅटर्न बदलता नाही का येणार ?
आमच्याकडे नेहमी कोणी येणार असेल तर साफ सफाई, आईची बोलणी ,चिडचिड ,आरडाओरड ,बाबांचा टेन्शन ,मग ते तसाच अवघडलेलं प्रश्न उत्तरांचा भाग आणि नंतर येणारा नकार.......
खूप मनस्ताप होतो मुलीच्या घरच्यांना या गोष्टीचा, मुलाकडील मंडळींना हे समजायला हवा.

बाकी कमोडिटी मार्केट बद्दल नक्कीच आवडेल अशा वेळेस, कारण एका ग्राहकाला जो भावी जीवनसाथी असू शकतो अशा व्यक्तीला हे लोक (कमोडिटी मार्केट वाले) कशी माहिती देतात हे कळेल.

टर्मीनेटर's picture

23 Sep 2019 - 8:04 pm | टर्मीनेटर

विजुभाऊ रॉक्स...
तुमची लेखनशैली खूप आवडते त्यामुळे मजा येते तुमचे लेखन वाचायला.
पुढील लेखनास शुबेच्छा!

विजुभाऊ's picture

26 Sep 2019 - 1:09 pm | विजुभाऊ

धन्यवाद. टर्मिनेटर , नाखु , पद्मावती , डॉ खरे , ज्योती ताई , रातराणी , ज्ञानोबा , प्रचेतस
तुमच्या अशा शाबासकीने नवे लिहायला उत्साह मिळतो

मस्त सदाबहार शैली, खास विजुभाऊ स्टाईल.

परकायाप्रवेश केल्याप्रमाणे लिहिलं आहेत. लैच भारी.

बाकी जरा मुद्रितशोधन केल्यास भारी होईल काम.

विजुभाऊ's picture

27 Sep 2019 - 8:54 am | विजुभाऊ

नक्की काळजी घेईन

विटेकर's picture

26 Sep 2019 - 4:49 pm | विटेकर

चार ही भाग छान क्लिक झालेत ! आवडले .. खूप दिवसानी इथे आलो आणि थेट विजाभाऊ भेटले ,.. बरे वाटले

विटेकर's picture

26 Sep 2019 - 5:04 pm | विटेकर

चार ही भाग छान क्लिक झालेत ! आवडले .. खूप दिवसानी इथे आलो आणि थेट विजाभाऊ भेटले ,.. बरे वाटले

आजी's picture

26 Sep 2019 - 5:09 pm | आजी

गमतीदार कथा..

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2019 - 10:33 am | प्राची अश्विनी

मजा आली वाचताना.