अनामिक ( Unknown)

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 7:38 pm

तुझा नंबर unknown म्हणून सेव्ह केलाय.
तू स्त्री की पुरुष काहीच माहीत नाही मला. वय माहित नाही, कुठे मुक्काम माहित नाही. काम काय करतोस/ करतेस ते माहीत नाही. तू म्हणावं की तुम्ही? माहीत नाही. आणि एकदम extreme बोलायचं झालं तर तू जिवंत आहेस नाहीस, हेही माहीत नाही.
गेल्या आठ वर्षांत किती मोबाईल बदलले, किती नंबर डिलिट केले. किती माणसांना आयुष्यातून वजा केलं. पण तुझा नंबर अजूनही आहे. कधी हिंमत केली नाही मेसेज किंवा फोन करायची. आणि केला फोन तर काय सांगणार? आपण कधीच भेटलो नाही, एकमेकांना ओळखत नाही असं?
पहिल्या वाक्याला फोन कट होईल. कारण मी कोण आणि तुझा नंबर माझ्याकडे कसा हे इतकं वेडेपणाचं आहे. की कुणी विश्र्वास नाही ठेवणार. सीडीएम चे कनेक्शन जीएसेम करताना लागणा-या मधल्या काळासाठी एक तात्पुरता सेकंड हॅंड फोन घेतला. कार्ड टाकले आणि चेक केले तर sent messages च्या फोल्डरमध्ये काही मेसेजेस . एकाच नंबरवर पाठवलेले . तुझ्या..
आधी डिलीट करायचंच ठरवलेलं. असं दुस-या चे मेसेज वाचणे बरोबर नाही वगैरे... पण मग धीर करून पहिला मेसेज उघडला...
"घर आवरायला घेतलं. आणि लक्षात आलं तिने किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं"
पुन्हा वाचला ...
कुणी लिहिलाय हा मेसेज? वडिलांनी मुलीला किंवा मुलाला? नव-याने मित्र किंवा मैत्रिणीला? आई गेल्यानंतर मुलीने पाठवलाय हा मेसेज??
किती possibilities आहेत. कोण कुणाला म्हणाले हा शाळेतला प्रश्न आठवला. बाळबोध. कोण कुणाला म्हणाले हा प्रश्न कधी नसतोच. "का" म्हणाले हाच खरा प्रश्न. आणि "कसे" म्हणाले यावरून त्याचं उत्तर शोधावं. ज्याला हे between the lines वाचता ऐकता येते तो शहाणा.
वेड्यासारखी त्या मेसेज मध्ये गुंतले मी.
कोण ती? बायको? आई? मुलगी? प्रेयसी?
बायको असण्याची शक्यता जास्त..
आणि आवरायला का घेतलं घर? मुद्दाम मेसेज करून कळवल़य म्हणजे हे नेहमीचं आवरणं नाही.. काय घडलंय? "ती" कुठे गेलीय?? कायमची?? म्हणजे घर सोडून निघून गेली की काही अघटीत??
...
आणि इतके दिवस किंवा वर्षे हा व्यवस्थितपणा लक्षात आला नव्हता???? का???आपण माणसाला इतकं गृहीत धरतो? त्याचं असणं, त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी? की ते जाणवण्यासाठी त्या व्यक्तीचं जाणं कारण ठरावं??
खूप पूर्वी टीव्हीवर एक सिरीयल पाहिली होती, दरार. एक दोनच भाग पाहिले खरंतर ... Title song जगजीतच्या आवाजात होतं... रिश्तों मे दरार आयी. लहान होते , जगजीतशी , गझलंशी, त्यातल्या दर्दशी काहीच ओळख नव्हती अजून. पण ते शब्द , त्यातला भाव, त्या न कळत्या वयातही आत कुठेतरी हलवून गेले.
एक प्रसिद्ध गायक, स्वत:च्या विश्वात मग्न, त्याची असंतुष्ट पत्नी. तिचं त्याच्या तबलजीवर प्रेम आहे, आणि ती त्याच्याबरोबर घर सोडून निघून जाणार आहे. पण अजून पहिलं नातं पूर्णपणे तुटलं नाहीय. सोडून जावं की नाही हा निर्णय सुद्धा अजून १०० टक्के होतं नाहीय. काही तरी मागे खेचतंय.. जायच्या आदल्या रात्री ती, नव-याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला घेतलेली साडी नेसते. फुलं माळते, छान तयार होते. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करते आणि त्याची वाट पाहत बसते. तो येतो. जेवायला बसतो. जेवण सुरु करतो.. ती अधीरपणे त्याच्याकडे बघतेय ,तो काही बोलेल याची वाट बघतेय.
... शेवटी न राहवून ती विचारते, "कसा झालाय स्वयंपाक?" " छान!"
" मी कशी दिसतेय? " तो वरती न बघता उत्तर देतो..." छान"
आणि त्याक्षणी तिचा निर्णय होतो..
मनात जे काही येतं ते तेव्हाच का नाही व्यक्त करत आपण? समोरच्यानं समजून घ्यावं ही अपेक्षा का? की कालांतराने समजणे, सांगणे अशक्य अशी दरी निर्माण होते?
संवादाने तरी नात्यातील ही दरी बुजते का? की दोघांमधली ही दरी म्हणजेच नातं? हवं तेव्हा एकमेकांकडे जाता येण्यासारखी सोपी वाट जपावी बस! त्या वाटेवर काटेकुटे, संशयाची झुडपं उगवू देऊ नये.. आणि वाट जर पायाखालची असली, सतत ये जा असली की तण माजंतही नाही. स्वच्छ झाडलेल्या वाटेसारखंच स्वच्छ आवरलेलं नातं!!
ही आवरण्याची जबाबदारी दोघांपैकी कुणीतरी न बोलता घेतं. अणि ती व्यक्ती निघून गेल्यावर हे अनावर आठवतं. " किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं."

"Started badminton today."
हा दुसरा मेसेज. सुमारे महिन्याभरानंतरचा.
मध्ये काय बोलणं झालं? फोनवर की फक्त मेसेज मध्ये? ते सगळे मेसेज डिलिट झाले?
पूर्वी खेळायचे का ते? आपण मोठं होतो तसतसं खेळणं का थांबवतो?
कधी "तिच्या"बरोबर खेळले होते ते?
तू सुचवलेलंस का पुन्हा खेळायला? तेवढंच मन रमेल एक रुटीन चालू राहील म्हणून? आणि म्हणून त्यांनी तत्परतेनं कळवलं तुला.
रुटीन. विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला खूप उपयोगी असतं हे. एकदा का रुटीन बसलं की वरवर तरी सगळं normal वाटायला लागतं. आणि काळ उलटला ना की आतसुद्धा सगळं निवळतं. सगळा कचरा खाली बसतो. पाणी मन नितळ बनतं.
तसंच झालं का?

आणि नंतर तिसरा आणि शेवटचा मेसेज.
"Kids are here. They are adjusting pretty well."
हं.
मुलं? की नातवंड? मधला महिना दीड महिना कुठं राहिली असतील? की सुट्टीला आलीयेत नेहमीप्रमाणे?
आणि मुलं रुळावतात. निदान वरवर तरी. मोठं झाल्यावर कधीकधी आई-वडिलांना माफसुद्धा करतात.
पण जड गेले का ते दिवस?? कसं निभावून नेलं?

इतके साधे सहज हळवे मेसेज ... मनमोकळं sharing. बस! पण त्यातूनच बळ मिळालं का जगण्याचं? तुम्हा दोघांनाही?
किती सुंदर नातं असेल तुम्हा दोघांचं!! कुठलं हे विचारायचा दरिद्रीपणा नाही करणार.
यानंतर मेसेज नाहीत.
मग फोन बदलला का? कारण तेवढ्यातच स्मार्टफोन आले होते. आधीचा exchange करून नवा घेतला का? याहून दुस-या possibilities चा विचार करवत नाही.
Did his life come back to normalcy?

नवीन फोन आला आणि तो मेसेज वाला फोन मी दुकानात परत दिला. तुझा नंबर मात्र ठेवला save करून. आणि हे तीन मेसेज ते तर मनात घर करून राहिले.

वर्षं उलटली ह्याला. मुलगी आताच परदेशी गेली. तिचं दूर जाणं अजून अंगवळणी पडलं नाहीय. बावीस वर्षांची सवय. अशी मोडेल थोडीच!ती एकेक सुचवत असते. आई आता free आहेस तर हे कर ते कर.
आज badminton खेळले.
आणि ..

तुला आठवतात हे मेसेज?
Are you two still in touch?

कथाअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

14 Sep 2019 - 10:36 pm | आनन्दा

_/\_

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 9:02 am | प्राची अश्विनी

आनन्दा, धन्यवाद!__/\__

जव्हेरगंज's picture

15 Sep 2019 - 12:29 pm | जव्हेरगंज

अद्भुत!!

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:53 am | प्राची अश्विनी

हे लय भारी! :)

रातराणी's picture

15 Sep 2019 - 3:02 am | रातराणी

_/\_ !!

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:55 am | प्राची अश्विनी

रारा , तुझ्या लिखाणाची वाट पहातेय.

विषय रेशीमलडीसारखा सहजपणे आणि सुंदरपणे उलगडत गेला आहे. अलगद बांधलेल्या गाठीसारखा हळुवार शेवटपण आवडला. _/\_

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:54 am | प्राची अश्विनी

प्रतिसाद आवडला. :)

पर्णिका's picture

15 Sep 2019 - 10:02 am | पर्णिका

व्वा ! काय सुरेख, तरल लिहिलयं... आवडलेच. :)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 9:01 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!;)

जॉनविक्क's picture

15 Sep 2019 - 10:06 am | जॉनविक्क

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:59 am | प्राची अश्विनी

धन्यवाद आवर्जून सांगितल्याबद्दल. Landing जमलंय का याची खात्री नव्हती.

पद्मावति's picture

15 Sep 2019 - 1:04 pm | पद्मावति

काय सुरेख लिहिलंय...खास प्राची अश्विनी शैली __/\__

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:54 am | प्राची अश्विनी

:) धन्स!!

नावातकायआहे's picture

15 Sep 2019 - 2:36 pm | नावातकायआहे

__/\__

मस्त!

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 9:01 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!;)

पैलवान's picture

15 Sep 2019 - 5:32 pm | पैलवान

अतिशय तरल,
अतिशय मृदू
अनंत छटा असलेलं

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 9:00 am | प्राची अश्विनी

धन्यवाद प्रतिसादाबद्दल..

आवडाबाई's picture

15 Sep 2019 - 11:08 pm | आवडाबाई

दुसरा शब्दच नाही !
सुंदर कल्पना !

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:56 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

जालिम लोशन's picture

15 Sep 2019 - 11:30 pm | जालिम लोशन

सुरेख

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 9:03 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!;)

अलवार, नितळ असा अनुभव आणि लेखन, दोन्हीही!

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:57 am | प्राची अश्विनी

राघवाss
धन्यवाद!:)

नाखु's picture

16 Sep 2019 - 8:45 am | नाखु

आणि निव्वळ अलगद रेशीमगाठी बांधतात तसेच आडाखे बांधले आहेत.
सुटले तरी त्रास न सुटले तरी घालमेल.

अर्ध्यात साथ हरवलेला नाखु

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2019 - 8:57 am | प्राची अश्विनी

वाह! प्रतिसाद आवडला.

माहितगार's picture

16 Sep 2019 - 12:19 pm | माहितगार

रोचक

अक्की's picture

17 Sep 2019 - 5:42 pm | अक्की

माबोवरपण पोस्ट करा तिथे इथल्यापेक्षा चांगले वाचक आहेत.

एक काम करा तिथल्या सगळ्यांना इथे आणा व ते किती चांगले आहेत त्याचा इथे आधी डेमो होऊद्या मग आम्ही मानू**

अत्यंत हीन, नीच आणि सडक्या मनोवृत्तीचे प्रदर्शन घडवणारी वाक्यरचना.
निषेध करण्याच्या सुध्दा लायकीचा नाही हा प्रतिसाद.
पैजारबुवा,

माबोवरपण पोस्ट करा तिथे इथल्यापेक्षा चांगले वाचक आहेत.

या कवियत्री लेखिकेच्या लेखनात 'अनामिकांना' त्यांची अनामिकता जपता येण्याचे स्थान आहे. मायबोलीच्या अधिकृत धोरणात 'अनामिकंना अनामिकता जपण्याचे स्थान नाही' असे स्मरते. ( त्याच मुळे मीही अद्याप माबो वर पाऊल ठेवलेले नाही.)

बाकी लेखन कुठे कुठे पुर्नप्रकाशित करावे हि कवियत्री लेखिकेची मर्जी पण किमान 'अनामिकांचे स्थान न जपणार्‍या मुल्याशी अनामिकाचे स्थान जपणार्‍या मुल्यांशी तुलना होऊ शकत नाही ह्याची नोंद घेतलेले बरे किंवा कसे.

नाखु's picture

18 Sep 2019 - 10:54 pm | नाखु

विचारवंत मग आपण इथे काय करताय!
आपली ठेका घेतला ती माठबोली सोडून!!!!

रसिकांच्या क्षमतेत भेदभाव करण्याची काडीमात्र अक्कल दिवाळखोरी नसलेला अरसिक मिपाकर नाखु बिनसुपारीवाला

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2019 - 10:32 am | प्राची अश्विनी

त्याचं काय आहे, once a मिपाकर, always a मिपाकर.:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Sep 2019 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

मजा आली वाचतना...
हे असे हृदयस्पर्षी तुम्हीच लिहू शकता...
लिहित रहा
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

18 Sep 2019 - 11:30 am | टर्मीनेटर

मस्त लिहिलंय! आवडलं.

सुबोध खरे's picture

18 Sep 2019 - 7:51 pm | सुबोध खरे

सुंदर तरल आणि मुलायम लेखन, मोरपिसासारखं

श्वेता२४'s picture

21 Sep 2019 - 5:46 pm | श्वेता२४

मनात जे काही येतं ते तेव्हाच का नाही व्यक्त करत आपण? समोरच्यानं समजून घ्यावं ही अपेक्षा का? की कालांतराने समजणे, सांगणे अशक्य अशी दरी निर्माण होते?
संवादाने तरी नात्यातील ही दरी बुजते का? की दोघांमधली ही दरी म्हणजेच नातं? हवं तेव्हा एकमेकांकडे जाता येण्यासारखी सोपी वाट जपावी बस! त्या वाटेवर काटेकुटे, संशयाची झुडपं उगवू देऊ नये.. आणि वाट जर पायाखालची असली, सतत ये जा असली की तण माजंतही नाही. स्वच्छ झाडलेल्या वाटेसारखंच स्वच्छ आवरलेलं नातं!!
ही आवरण्याची जबाबदारी दोघांपैकी कुणीतरी न बोलता घेतं. अणि ती व्यक्ती निघून गेल्यावर हे अनावर आठवतं. " किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं."

यासाठी तुम्हाला __/\__

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2019 - 10:31 am | प्राची अश्विनी

सगळ्यांना धन्यवाद!!