शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
5 Sep 2019 - 10:37 pm

शं नो वरुण: ।

प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा,

तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास?
पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण. तुझ्या प्रत्येक सरीत माझा अंश जाणवतो किंबहुना तुझ्यातल्या अणूमय अंशालाच भेटायला तू इथे येतोस ना? तू तुझ्या बेरंगी, अनंगी रूपांत असलास तरी तुझे रंग आणि तुझं अंग दिसतं. मी मला आरश्यात पाहतो इतकं स्पष्ट.
अलम दुनियेत धर्म, जात, वंश, वर्ण, भाषा आणि टिम्ब टिम्ब प्रकारच्या गोपाळकाल्यांत फार निवडक गोष्टी सामाईक आहेत. त्यांत तू प्रमुख. आहे का कोणी तुला पहिल्यांदा अंगावर घेऊन फिरताना हात न पसरुन तुला आत रोवून न घेणारा? तू पसरवलेल्या हिरवी माया पाहून समाधीत न जाणारा? कोणी प्रेमी त्याच्या प्रेमिकेच्या घनघोर भिजलेल्या गालावर उमटलेल्या केशराच्या पावसाला पाहून त्यांत न वाहून जाणारा?
"अनाघ्रात ती प्रीत , जणू लाजाळूची रीत,
उमटले केशरगीत, तू त्या गालांचा रे मित।"
कोणती पाखरं तुझ्या स्वागताला टीचभर हवा शरीरात भरून नुकताच गोल केलेल्या फुटबॉलपटूसारखी, रानंवनं पिंजून काढत नाहीत? तुझ्या थेंबांथेंबाला आठवणींचं बन मनांत रुजत नाही आहे या चराचरांत कोणी? कोणी तडीतापसी नदीवरून आंघोळ करून येताना कमंडलूत मैयाचं पाणी भरून येताना अवचित वाटेत थबकून तुझ्याकडे फक्त तुझ्याकडे पाहून, सृष्टीकर्त्याचे कोण्या स्तवनाने आभार मानत नाहीत, असं झालंय का ?
" तो टपटप टपटप ठेका, मन चिंबवण्याचा हेका,
मनमोराची ती केका, मग ऐकू येते वेगा ।"
अर्थात प्रत्येकाचे मोर वेगवेगळ्या आवाजात असतात, हे काय मी तुला सांगावे? कोणी हात कपाळावर टेकवत तुझ्याकरता मनोमन पायघड्या शोधत असतो आणि कोणी कपाळावर आठ्या चढवत असतो. हा भेदंच तुझ्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे. कारण तुझ्या आगमनाचे आनंद शेतातले राबते हात आमच्या ताटापर्यंत पोचवत राहतातच. विरोध, रोष, किल्मिष सगळं वाहून नेणं आणि चित्तांत नवप्रतिभेचे कोंभ उगवत राहणं, कधी समजावत तर कधी दमदाटी करत, हेच तुझं काम. आम्ही आमच्या कर्मांच्या फाटक्या झोळीतून तुला गमावतोही आणि साठवतोही.
लहानपणी पर्जन्यचक्र वगैरे खरंच वाटायचं . आता कळतं की काहीच नाही कळलंय. पाऊस कळायला पाऊस व्हावं लागतं.
"तू नदीच्या अंगी, भिनतोस असा अनंगी,
ती समुद्राच्या रंगी, उधाण बनूनी दंगी ।"
नदी होऊन ओक्साबोक्शी वहायला लागतं, विचार एकदम समुद्रात गेल्यावरंच, अधेमधे नाही. तोवरसगळं कमावलेलं अचानक विरून बेघर झाल्यासारखं वाऱ्यावर मेघ म्हणून उडत रहायचं आणि जरा स्थिरता आली की परत धोधो बरसायचं.
आमचं मर्त्य जग पण असेच. वाहण्याची आसक्ती आणि वाफ होण्याची सक्ती, मधे तू उभा. बर्फ होऊन ध्यानस्थ झालेल्या तुला पाहणं हीच आमची तात्पुरती मुक्ती. थकत नाहीस का आम्हाला असं तीन अवस्थेत फिरताना किंवा फरफटताना बघून?
आम्हाला प्रेम शिकवायला तू स्वतः कृष्णाचा मदतनीस बनतोस आणि आम्हाला गोपी बनवतोस. अवघं जग स्त्रीलिंगी करून टाकतोस. हेच मीरा म्हणायची ना ? शेवटी "पाण्याने पाण्याला काय सांगायचे, देखीयेलें पाणी।" हीच अवस्था रे गड्या..
"तुझी द्वैताची रे सत्ता, ब्रह्माचा कुठला पत्ता?
आत्म्यांत रुजण्या आता, दे वर्षाव तू जरासा।
काही पत्र पाठवायची नसतात. उरांत रुजवून भेटीअंती देहबोलीतून फुलवायची असतात. पाऊस होईन तेव्हा थेंबांतून सांगेन तुला. लोभ चांगला नसतो. स्नेह असो.

तुझाच एक उनाड थेंब

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

5 Sep 2019 - 11:14 pm | रमेश आठवले

शं नो वरुण:-- हे बोध वाक्य भारतीय नौ सेनेचे आहे आणि ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुचवले होते. त्याचा अर्थ वरुण ( जल देवता) आमचे रक्षण करो असा आहे.

मायमराठी's picture

5 Sep 2019 - 11:53 pm | मायमराठी

ऋग्वेदात वरुण व मित्र या देवतांचा उल्लेख आहे. मुख्यत्वेकरून पाण्याची देवता म्हणून पूजा व मंत्र वैदिक काळात या देवतेशी निगडित होते. ढगांवर बसलेली, तसेच पाण्यात मकर हे आसन असलेली अशी देवता मानली जाते. पाऊस हा त्याचाच एक भाग /अंश या संबंधाने हे वाक्य वापरले.
वरुण गायत्री अशी स्तवली जाते.
" ॐ जल बिम्बाय विद्महे नील पुरु शाय धीमहि तन्नो वरुण: प्रचोदयात् ।"

प्रचेतस's picture

6 Sep 2019 - 8:19 am | प्रचेतस

ह्या घ्या तुमच्यासाठी वरुणाच्या प्रतिमा

a

a

अनिंद्य's picture

6 Sep 2019 - 1:40 pm | अनिंद्य

रेडी रेफेरन्स खजिना आहे तुमच्याकडे !

प्रचेतस's picture

6 Sep 2019 - 2:09 pm | प्रचेतस

अजूनही आहेत :)

यशोधरा's picture

6 Sep 2019 - 8:25 am | यशोधरा

वा! मस्तच लिहिलंय!

अनिंद्य's picture

6 Sep 2019 - 12:22 pm | अनिंद्य

शब्दकळा सुंदर !

वरुणाला 'जनमुदितेश्वर' हे संबोधन फारच आवडले, सध्या जरी तो तीव्रकोपेश्वर झालाय तरी :-)

जेम्स वांड's picture

6 Sep 2019 - 3:05 pm | जेम्स वांड

कसलं भार्री लिहिलंय, दर्याला पाहून असलंच काहीतरी सुचत असे पण कसं शब्दबद्ध करावं ते कळत नसे. तुम्ही नेमकी भावना मांडलीत, खूप मस्त लेखन.

Huge Thumbs Up

मायमराठी's picture

6 Sep 2019 - 4:34 pm | मायमराठी

ही कशी आणलीत इथं? ती पण भारीच आहे. सांगा आम्हाला पण कसं काय ते.