आयकार्ड

Primary tabs

मिलिंद जोशी's picture
मिलिंद जोशी in जनातलं, मनातलं
5 Sep 2019 - 1:59 pm

काल टीव्हीवर कुठलासा चित्रपट पहात होतो. चालू असलेल्या सीन मध्ये साध्या वेशात असलेला नायक दोन हवलदार घेऊन नायिकेच्या घरी जातो आणि आपण पोलीस असल्याचे सांगतो. तो साध्या वेशात असल्यामुळे अर्थातच नायिकेचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती त्याला त्याचे आयकार्ड मागते. त्याच्या चेहऱ्यावर आधी ‘आपल्याला आयकार्ड विचारणारी ही कोण?’ असे काहीसे भाव उमटतात, पण काही क्षणातच त्याचा चेहरा हसरा बनतो. तो आपल्या खिशातून आयकार्ड काढतो आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये नायिकेसमोर धरतो. प्रसंग अगदी साधा. पण तो नायक ज्या पद्धतीने आपले आयकार्ड दाखवतो हे पाहून मला माझे पहिले आयकार्ड आठवले.

त्या वेळेस मी इयत्ता १० मध्ये शिकत होतो. दहावीचे वर्ष म्हणून घरच्यांनी समर व्हेकेशन क्लासला मला टाकले होते. “टाकले” असे म्हणायचे कारण म्हणजे माझी सुट्टीत अभ्यास करण्याची बिलकुल इच्छा नसतानाही मला तिथे जावे लागणार होते. काही मित्रही बरोबर असल्याने मीही जास्त नाटक केले नाही इतकेच. त्याच क्लासचे आयकार्ड माझ्या जीवनातील पहिले आयकार्ड. आयकार्डशिवाय आम्हाला क्लासमध्ये प्रवेश नव्हता. अर्थात हा क्लास फक्त शाळा चालू होईस्तोवरच होता. शाळा सुरु झाली आणि क्लास संपला. आयकार्ड मात्र आमच्याकडेच राहिले.

शाळा चालू झाली तशी ते आयकार्डही मी शाळेत घेऊन जाऊ लागलो. आपण कुणीतरी विशेष आहोत असे वाटायचे त्यावेळेस. डार्क चॉकलेटी रंगावर सोनेरी रंगात छापलेला क्लासचा लोगो आणि नाव खूप मस्त दिसायचे. आतमध्ये डाव्या बाजूला माझा फोटो. त्यावर क्लासचा शिक्का आणि सरांची सही. उजव्या बाजूला रोल नंबर, नाव, पत्ता, इयत्ता, रक्तगट अशी माहिती. अगदी अभिमानाने मी ते कार्ड मुलांना दाखवायचो. ४५/४६ विद्यार्थी संख्या असलेल्या आमच्या वर्गात असे आयकार्ड मात्र मोजून ५/६ जणांकडे होते त्यामुळे हे आयकार्ड आमच्यासाठी एक कुतूहलाचा विषय बनले होते.

एका रविवारी टीव्हीवर चित्रपट पाहताना एका चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर आपले आयकार्ड कुणालातरी दाखवतो असा सीन पाहण्यात आला आणि मला आयडिया सुचली. जसा चित्रपटाचा इन्टर्व्हल झाला, मी उठलो. दप्तरातून क्लासचे आयकार्ड काढले आणि माझ्या फोटोच्या वरील बाजूस पेनाने लिहिले ‘पोलीस इन्स्पेक्टर’. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर अगदी कौतुकाने सगळ्यांना माझे आयकार्ड दाखवले. जे माझे मित्र माझ्याबरोबर क्लासला होते, त्यांनीही माझे अनुकरण करत त्यांच्या आयकार्डवर त्यांना आवडणारी पोस्ट लिहिली. आम्हा सगळ्यांसाठी तो एक खेळच बनला.

पहिला तास संपला. पुढचा तास होता खान सरांचा. इंग्लिशचा. खान सर तसे शांत व्यक्ती. खूप क्वचित त्यांनी आम्हाला शिक्षा केली असेल. बऱ्याच गोष्टी आमच्या कलाकलाने घेणारे. पण त्या दिवशी त्यांचे काय बिनसले होते माहिती नाही.

“काय गोंगाट लावलाय? वर्ग आहे की बाजार?” वर्गात आल्या बरोबर डस्टर टेबलावर आपटून ते ओरडले. सगळा वर्ग चिडीचूप झाला. तेवढ्यात मागील बेंचवर कुजबुज ऐकू आली. खान सरांचेही तिकडे लक्ष गेले. चौथ्या बेंचवर प्रदीप आणि मतीन कुजबुजत होते. मी हळूच मागे वळून पाहिले त्यावेळेस प्रदीप मतीनच्या हातातून काहीतरी ओढत होता. खान सरांचा चेहरा आता जरा जास्तच चिडलेला जाणवला.

“कायरे मूर्खांनो..! तुम्हाला काय वेगळे सांगायला हवे का? आणि काय, चाललंय काय तुमचं? ए...! तू..., काय नांव तुझं?” प्रदीपकडे पहात त्यांनी विचारले.

“अं... प्रदीप...! सर...!!” काहीसे उभे रहात प्रदीपने सांगितले.

“काय चालू आहे तुमच्या दोघांचे?”

“काही नाही सर...!” घाबरत घाबरत प्रदीप म्हणाला, पण तेवढ्यात सरांनी मोर्चा मतीनकडे वळवला.

“काही नाही काय? ए...! तू..., उभा रहा...!! हा काय ओढत होता तुझ्या हातातून?”

“नाही सर...! काही नाही...!!” मतीनही घाबरत म्हणाला.

“आता बऱ्या बोलाने सांगतोस की मी तिकडे येऊ?” काहीसे उठत सर म्हणाले आणि मतीनने त्याचे आयकार्ड सरांना दाखवले.

“हे ओढत होता सर हा...!”

“आण इकडे...! पाहू काय आहे ते...!”

मतीनने त्याचे आयकार्ड सरांच्या हातात नेऊन दिले. त्यांनी जसे ते कार्ड उघडले, मतीनच्या फोटोच्या वरील बाजूस लिहिले होते, ‘CID’. ते वाचून काय बोलावे हेच सरांना समजेना.

“अरे मुर्खा...! ‘CID’ म्हणजे काय हे तरी माहिती आहे का?” सर जास्तच भडकले.

“सर...! यानेच सांगितले होते मला. त्याच्या कार्डवर सुद्धा असेच लिहिलेले आहे” प्रदीपकडे बोट दाखवत मतीन म्हणाला आणि सरांनी प्रदीपचे आयकार्डही ताब्यात घेतले. त्यावर देखील ‘CID’ असे लिहिलेले दिसले.

“तुला कोणी सांगितले लिहायला?” सरांनी दरडावून विचारले आणि प्रदीपने सत्तारचे नांव सांगितले. सत्तार पहिल्याच बेंचवर बसला होता. सरांनी काही म्हणायच्या आतच तो स्वतःहून उभा राहिला. खिशातून त्याने आपले आयकार्ड काढले आणि सरांच्या हातात दिले. सरांनी ते उघडले तर त्याच्या फोटोच्या वर लिहिलेले होते. ‘CBI’.

“अरे ए मुर्खा...! ‘CBI’ चा फुलफॉर्म तरी माहिती आहे का?” सर आपल्या जागेवरून उठून सत्तार जवळ आले. सगळा वर्ग त्यांची गंमत पहात होता. मी मात्र मनातून जाम घाबरलो होतो.

“सर..! या मिल्याने सुद्धा असेच लिहिले आहे.” सत्तारने माझे नांव घेतले आणि सरांनी त्याच्या डोक्यावर टप्पल मारली.

“त्याच्या घरच्यांनी त्यांचे नांव चांगले ठेवले आहे ना? मग हे काय मिल्या? नीट नाही बोलता येत?” नंतर एकवार सगळ्या वर्गावर नजर टाकली.

“कोण रे तो?” त्यांनी म्हटले आणि मी घाबरत उभा राहिलो. गपचूप शर्टाच्या खिशात हात घातला, माझे आयकार्ड बाहेर काढले आणि त्यांच्या हातात दिले. त्यांनी ते उघडले मात्र आणि त्यांचा चेहरा अजूनच लाल झाला.

“गाढवा...! काय लिहिले आहेस तू?” त्यांनी विचारले, पण मी गप्पं.

“मुर्खा...! इन्स्पेक्टर शब्द असा लिहितात? एक तर इंग्रजी शब्द चक्क मराठीत लिहितोस आणि तो ही असा? इनसपेक्टर? आणि कायरे ए गाढवा...! आरसा पाहिला आहेस का तू? चार फुटाचा आणि २५ किलो वजनाचा पोलीस इन्स्पेक्टर तुझ्या पिताजींनी तरी पाहिला होता कारे?” सर हे बोलले मात्र आणि वर्गात हशा पिकला.

“चला सगळ्यांनी पुढे या... एका ओळीत उभे रहा...” सरांनी आज्ञा केली आणि माझे धाबे दणाणले. आज काही मार चुकत नाही असे मनात म्हटले आणि तशीच मनाची तयारी करून पुढे जाऊन उभा राहिलो. इतर तिघे देखील माझ्याच रांगेत उभे राहिले. सरांनी एकदा आमच्या चौघांकडे पाहिले आणि काय झाले माहिती नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. रागाने फणफणलेला चेहरा शांत दिसू लागला. आम्ही चौघे मात्र भेदरलेल्या चेहऱ्यांनी समोर उभे.

“तुम्ही तिघे...! एकेक करून पुढे या...” टेबलावर ठेवलेली लाकडी छडी हातात घेऊन सर मी सोडून इतर तिघांना म्हणाले. सगळ्यात आधी मतीन सरांसमोर गेला.

“CID चा फुलफॉर्म सांग.” तो समोर येताच सरांनी त्याला प्रश्न केला. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. नकळत त्याचा हात डोक्याकडे गेला आणि तो डोके खाजवू लागला.

“चल हात पुढे कर..!” सरांनी पुढचा हुकुम सोडला आणि त्याने गुपचूप हात पुढे केला. त्याच्या हातावर दोन छड्या देऊन सरांनी त्याला जागेवर जाऊन उभे राहायला सांगितले. नंतर इतर दोघांनाही हाच प्रश्न विचारून त्यांनाही छड्या दिल्या आणि त्यांच्या जागेवर उभे केले. मी मात्र तसाच समोर उभा. पुतळ्यासारखा.

“तुम्हाला मी दोन छड्या का दिल्या माहिती आहे?” सरांनी तिघांना विचारले. तिघांनीही नकारार्थी मान हलवली.

“पहिली छडी यासाठी दिली कारण तुम्ही माहिती नसताना स्वतःच्या आयकार्डवर लिहिले. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याची माहिती करून घ्या आणि नंतरच ती गोष्ट करा. माहिती नसताना केलेली गोष्ट बऱ्याच वेळेस आपल्याला घातकच ठरते. दुसरी छडी यासाठी दिली कारण तुम्ही मेंढरासारखे फक्त अंधानुकरण केले. त्याने केले म्हणून तुम्ही केले. असे जर जीवनात करत राहिलात तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही... बसा खाली.”

नंतर सरांचा मोर्चा माझ्याकडे वळला.

“ये...! असा समोर ये...!” त्यांनी फर्मावले आणि मी गुपचूप समोर जाऊन स्वतःहूनच हात पुढे केला.

“ही आयडिया कशी आली?” त्यांनी काहीसे स्मित करत विचारले. पण मी गप्प.

“बोल, बोललास तर कमी छड्या मिळतील.” आता मात्र मी खरे सांगून टाकले. हात तर पुढे केलाच होता. एक सणसणीत छडी तळहातावर बसली. लालच झाला हात. तोंडातून स्स्स असा आवाज निघाला. डोळ्यातही पाणी आले पण हात तसाच पुढे ठेवला. दुसरी छडी सुद्धा घ्यायची होती पण त्यांनी लगेचच मला जागेवर जायला सांगितले. इतरांना दोन छड्या, मला मात्र फक्त एक छडी... पण ती इतरांच्या मानाने जरा जास्तच जोरात. मी जागेवर जाऊन बसतो न बसतो तोच सरांनी सुरुवात केली.

“तुम्हाला वाटेल मी इतरांना का दोन छड्या दिल्या आणि याला एकच का? याचे कारण त्यांनी केलेली गोष्ट फक्त अनुकरण होते, पण याने केलेली गोष्ट ही सकारण होती. भले ते कारण अगदी फालतू असले तरी. याने केलेली गोष्ट ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. जर तुम्हाला काही बनायचे असेल तर आधी त्याबद्दल आवड निर्माण करा. ती आवड तुमच्या कृतीतून दिसते. आता ती छडी जोरात यासाठी मारली कारण याला जन्मभर त्याची आठवण राहिली पाहिजे.” नंतर त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.

“आणि तू...! एक लक्षात ठेव! ओळखपत्र तर कुणालाही मिळते, पण ओळख निर्माण करावी लागते. त्यासाठी स्वतःला कष्ट करावे लागतात. स्वतःची अशी ओळख निर्माण कर, ज्याने तुला कुठल्याही ओळखपत्राची गरज पडू नये.” इतके सांगून सरांनी शिकवायला सुरुवात केली.

त्यावेळेस त्यांचे शब्द मला फारसे समजले नाहीत पण ते मात्र कायम लक्षात राहिले. आज त्या वाक्याचा खरा अर्थ समजतो आहे. जेव्हा कधी माझी अशी ओळख तयार होईल, मी नक्कीच आमच्या सरांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी जाईल. तीच माझी खरी ओळख असेल.

मिलिंद जोशी, नाशिक...

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

शिक्षक दिनानिमित्त समयोचित आठवण! छान!!

जॉनविक्क's picture

5 Sep 2019 - 11:30 pm | जॉनविक्क

मिलिंद जोशी's picture

6 Sep 2019 - 12:22 am | मिलिंद जोशी

खूप खूप धन्यवाद....सगळे जण

सुधीर कांदळकर's picture

6 Sep 2019 - 9:45 am | सुधीर कांदळकर

शिवाय समयोचित. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुतूहल कायम राहते. सरांचे मार्मिक भाष्य आवडले. धन्यवाद.

सोन्या बागलाणकर's picture

12 Sep 2019 - 3:34 am | सोन्या बागलाणकर

सरांनी त्यांची ओळख तुमच्या हातावर चांगलीच उमटवली म्हणायची. :)

असे चांगल्यासाठी शिक्षा करणारे शिक्षक कमीच.

अतिशय सुंदर. अश्या कायमच्या लक्षात राहणाऱ्या काही छड्या विशिष्ट सरांकडून लहानपणी खाल्ल्या आहेत. आज नीट कळतं तेव्हा ते त्यांचे लाईफटाईम दिलेले आशीर्वाद वाटतात.