लोकहो,
मिपावरील आमच्या छंदशास्त्रीय लेखनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मिपावरील काव्यप्रेमींना धन्यवाद. भारावून टाकणारा हा प्रतिसाद आहे.
असा प्रतिसाद कोणत्याही मराठी संकेतस्थळावर आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. मिपाला उथळ वगैरे म्हणणार्यांनी हे सदर पहावे.
या प्रतिसादावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अनेक जण उत्कृष्ट काव्यलेखनाची क्षमता बाळगून आहेत. फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि वाव मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने "मिसळपाव काव्यकट्टा" आजपासून सुरू होत आहे.
मिसळपाव काव्यकट्टा हे मिसळपाववरील कवींसाठी काव्यसंमेलन आहे. दर महिन्याला हा काव्यकट्टा एक काव्यस्पर्धा घेईल. त्यात एक विषय दिला जाईल. कवींनी त्या विषयावरील त्यांची रचना कट्टयावर पेश करावी. प्रत्येकाला फक्त एकच कविता/गझल्/रुबाई ( जो काही त्या संमेलनासाठी निवडलेला काव्यप्रकार असेल तो) सादर करता येईल.
हा काव्यकट्टा नवीन प्रतिभावान कवींचे काव्यगुण समृद्ध करण्यासाठी आहे. तथाकथित नावाजलेल्या व मान्यवर(?) धेंडांच्या रचनांचे पोवाडे गाण्यासाठी नव्हे. त्यामुळे येथे फक्त मिपासदस्यांचेच लेखन सादर करता येईल.
या कट्ट्याच्या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या छंदात रचना सादर करायची तो छंद , वृत्त, जाती आधी जाहीर केली जाईल. त्याच छंदात रचना सादर करायची आहे. वृत्तांवर पकड यावी म्हणून ही अट आहे.
काव्यकट्ट्याच्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेतः-
१) ही स्पर्धा फक्त मिसळपावच्या सभासदांसाठी आहे. ( हे सांगणे न लगे.)
२) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मिसळपावचे सभासदत्व किमान एक महिन्यापूर्वीचे असणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ आपले "गुण" दाखवण्यासाठी लोक आयडी घेऊन येथे लिहितील. तसे होऊ नये म्हणून एक महिन्याची अट आहे.
३) दिलेल्या विषयाचा उल्लेख किमान एकदातरी रचनेत असणे अपरिहार्य आहे.
४) रचना दिलेल्या वृत्तातच असणे आवश्यक आहे.
५) दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही स्पर्धा संपेल आणि १ तारखेपासून नवीन स्पर्घा सुरू होईल. त्यावेळेस नवीन विषय आणि वृत्त देण्यात येईल. जसजशी नवीन वृत्ते मिपावर देण्यात येतील तसतसे वृत्तांचे पर्याय वाढविण्यात येतील. काही महिन्यांनी किमान ४ ते ५ वृत्तांचे पर्याय असतील. स्पर्घकांना त्यांच्या आवडीप्रमाणे ते निवडण्यात येतील.
६) स्पर्धेचा निकाल पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.
७) तीन सर्वोत्तम रचना निवडल्या जातील आणि विजेत्यांची नावे जाहीर होतील. ( अभिनंदनाखेरीज इतर स्वरूपात बक्षीस नाही याची नोंद घ्यावी. तुमचा वाढलेला आत्मविश्वास आणि काव्यक्षमता हे सर्वात मोठे बक्षीस असेल.)
८) स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. धोंडोपंत आपटे आणि श्री. चक्रपाणी चिटणीस(बेसनलाडू) काम पाहतील. परीक्षकांना स्वतःची रचना सादर करता येईल पण स्पर्धक म्हणून भाग घेता येणार नाही. पारदर्शकतेसाठी हा नियम अपरिहार्य आहे.
चला तर मग नोव्हेंबर २००८ ची स्पर्धा सुरू करूया.
स्पर्धेचा विषय आहे - गारवा
स्पर्धेचे वृत्त आहे - देवद्वार छंद
१) वरील नियमांचे पालन करून तुमची रचना इथे सादर करा.
२) अंतिम तारीख आहे ३० नोव्हेंबर २००८
३) "गारवा" हा शब्द कवितेत एकदा तरी यायला हवा आणि कविता देवद्वार छंदात हवी.
४) तुमचे सभासदत्व किमान एक महिना जुने हवे.
५) कुठल्याही कवितेवर कुणीही अभिप्राय या सदरात देऊ नये. त्यासाठी मिपा काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय असे दुसरे सदर असेल तिथे अभिप्राय द्यावेत. इथे फक्त कविता असतील.
६) विपर्यस्त अभिप्राय तात्काळ उडवले जातील.
७) एकच रचना सादर करायची आहे. नीट विचार करून लिहा. घाईघाई करू नका.
सर्व मिपाकवींना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.
आपला,
(काव्यप्रेमी) धोंडोपंत
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 5:11 pm | विसोबा खेचर
ही घ्या आमची एन्ट्री... :)
हवेत गारवा
जोंबाळला फार
मादक ती नार
उष्ण फार..!
नारीच्या नादात
भलतेच दिव्य
तात्या करि काव्य!
मिपावरि!
तात्या.
10 Nov 2008 - 11:21 am | चेतन
माझा एक प्रयत्न
हवासा गारवा
घेतोय पारवा
वेध न चुकावा
निद्रेतही
अश्रुंचा कारवा
डोळ्यात साठवा
नाही ओघाळावा
निद्रेतही
किती हा फसवा
देहाचा लकवा
मान न वाकवा
निद्रेतही
भाषेचा गोडवा
कधी न सोडावा
हळुच डोकवा
अंतरात
13 Nov 2008 - 1:36 pm | अमोल केळकर
हिवाळ्याचा ऋतू
मोगर्याचा सडा
सह्याद्रिच्या कडा
खुणावती !!
धुक्यातली वाट !
गारवा हवेत !
घेऊनी कवेत !
प्रेयसिला !!
कोकिळेची साद
गुंजते वनात
पाखरे नभात
झेपावती !
निसर्गाचे देणे
पहावे प्रभाती
अशीही विनंती
सर्वानाही !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Nov 2008 - 10:51 pm | मनीषा
हळवी हळवी
ही सांज सावली
सुखे विसावली
अंगणात |
सावल्या धावती
अंधाराच्या पारी
ज्योत एक दारी
उजळली |
झुलवितो झूला
अचपळ वारा
दारीचा मोगरा
मोहरतो |
दूर अंबरात
चमकतो तारा
सुखाचा शहारा
सृष्टीवर |
हलके हलके
हा सांजगारवा
आळवी मारवा
चांदण्यात |
14 Nov 2008 - 1:05 pm | चन्द्रशेखर गोखले
गारवा (देवद्वार छंद)
दृश्य संपादन
प्रेषक चन्द्रशेखर गोखले ( शुक्र, 11/14/2008 - 12:47) . कविता प्रतिसाद
प्रथम धोंडोपंतांचे हर्दिक अभिनंदन! आपण छंदात्मक काव्यप्रकाराची अतिशय सहज शैलीत माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला.
खर तर व्याकरण निमवालीच्या बाबतित आम्ही खुपच कच्चे. व्याकरणाच्या नियमात बसवून एखाद काव्य करण्यास सांगितल कि माझा पोपट होतो. परंतु ज्या तर्हेने आपण समजावून सांगितलत त्या मुळे आमच्या सरख्या नवोदितांची हिम्मत वाढली आहे.
मी माझी एक कविता स्पर्धे साठी देत आहे. ती नियमात बसते कि नाही (विषयाच्या द्रुष्टीने) त्या बद्दल मी जरा साशंक आहे. तरीही देत आहे . क्रुपया स्विकारावी.
गारवा
कोठून येइल
गारवा मनात
आग अंतरात
पेटीयली
पडे न पाउस
जीव कासाविस
नयनात आस
थेंब थेंब
पाउस रुसला
मध्येच थांबला
हतबल झाला
शेतकरी
नका म्हणू मला
शेतकरी राजा
त्यापरीस पाजा
विषांगुळी
हात असे माझा
पसरण्या साठी
दुसरा हो पोटी
ठेवियेला
पाठ पोट माझे
एकरूप झाले
जैसे प्रकटले
दैन्य ब्रम्ह
कर्ज डोक्यावरी
वाढियले भारी
आता फक्त वारी
यमलोकी
आवळला गळा
फासाचा हा दोर
नाही हुर हुर
जगण्याची
मरण सोडवे
मरण यातना
त्याचीच याचना
जिवे भावे
अखेरीस आला
गारवा देहात
मिटे झंजावात
क्षणमात्रे
लटकला झाडा
देहाचा सांगाडा
सखी हांबरडा
फोडतसे........!!!!!!!
15 Nov 2008 - 7:38 am | मीनल
काळेभोर मेघ,
दाटले परिघ.
चंदेरी ती रेघ,
कडकडे.
होई का बावरा?
पसरे पिसारा,
नाचे मोर न्यारा,
थुईथुई.
करी मन धुंद,
मातीचा सुगंध,
वाजे थेंब मंद,
टपटप.
अश्या पावसात,
गारवा हवेत,
उठे ही अंगात,
शिरशिरी.
पक्षी फिरे घरी,
निजे झाडावरी,
बंद झाली सारी,
किलबिल.
प्रणयाची वेळ,
आकाशाशी मेळ,
सृष्टीचा हा खेळ,
लुटूपुटू.
जादू अशी करे,
शब्द उरी भरे,
गीत मनी स्फुरे,
झरझर.
मीनल.
15 Nov 2008 - 12:55 pm | ऋषिकेश
स्पर्शानेच तुझ्या
गारवा मनात
उतरे तनांत
थंडगार!
सुचक नजरा
गारवा ओठांत
उष्ण या श्वासात
एकरूप!
उष्ण शरीरात
गारवा कवेत
गुलाबी रातीत
सामावला!
आकाशी चंद्रमा
गारवा नभात
शुभ्र चांदण्यात
मधुचंद्र!
प्रेमाचा आलाप
सुरात गारवा
देहांत मारवा
झंकारितो!
- ऋषिकेश
16 Nov 2008 - 1:40 pm | घाटावरचे भट
शिशिर गारवा
दाटला हवेत
धुक्याच्या कवेत
गाव माझा
गावाच्या पाठीशी
दुर्ग तालेवार
गावाचा कैवार
शिवराया
जवळ पहाट
रात्र सरू लागे
होती सर्व जागे
पक्षीगण
दिसे पेटलेली
आगटी शिवारी
पीक शेतकरी
राखी कोणी
उठतो राऊळी
काकड्याचा नाद
कोणी घाली साद
मायबापा
गाव तो साजिरा
मनी वसतसे
अजून येतसे
स्वप्नी कधी
16 Nov 2008 - 9:54 pm | धोंडोपंत
उत्तम कविता स्पर्धेत आल्या आहेत. सर्व स्पर्घकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
येथे कुणीही अभिप्राय देऊ नयेत.
पुढील कविता आल्यावर आमचा हा अभिप्रायही उडविण्यात येणार आहे.
धन्यवाद
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
17 Nov 2008 - 1:37 am | आजानुकर्ण
सुधारणा, स्पर्धेचा विषय गारवा असल्याचे आत्ताच वाचले. त्यानुसार कवितेत(!) गारव्याची पाचर मारत आहोत.
आपला,
(वैषयिक) आजानुकर्ण
स्पर्धेमध्ये आमचीबी येंट्री
आम्ही:
पहिल्या रातीचा
झोंबतो गारवा
नटली नार वा!
रती जशी
तो:
दार ते लावून
कडीही घातली
रात्र ही मातली
बघ सखे
निवेदक:
सुगंधी फुलांनी
शेज ती सजली
जराशी लाजली
नवरीही
ती:
मेजावरी होता
दुधाचा गिलास
पूर्ण तो पिलास
घटाघटा
तोः
तुझा तो घागरा
आज उतरला ।
श्वास हा भेटला ।
श्वासाला गं ॥
आम्हीः
दोघेही जाहले
प्रणयात दंग
उधळीत रंग
भसाभसा
दोघेः
रात्र ना सरावी
देह ना दुरावा
गोंधळ करावा
दररोज
आम्हीः
धुंद त्या क्षणांनी
लावली ती वाट
(मोडली ती खाट
लोखंंडाची)
आपला
(स्पर्धक) आजानुकर्ण
18 Nov 2008 - 5:19 pm | राघव
माझाही प्रयत्न -
खालील कविता येथेही आहे - http://www.misalpav.com/node/4684
ज्ञानाचीया डोहा
जाऊ मी कशास,
चरणांची आस
मजलागी |
माऊलीचे प्रेम,
झरा करुणेचा,
गारवा कृपेचा,
पुरेसाहे |
नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |
तुम्हा माझी आण,
पुरवा तहान,
दर्शनास प्राण
व्याकूळले |
आपला,
मुमुक्षु
18 Nov 2008 - 9:32 pm | अविनाश ओगले
कसे आले दिस
दुर्जनांसी मान
नित्य अपमान
सज्जनांचा
कणाच्या कर्तॄत्वा
ढणाढणा ढोल
फोलासही मोल
प्रसिद्धीने
असूरांचा नाच
कोठे सच्चा सूर
सवंगाचा पूर
गळा भेटे
कोरडे ऊमाळे
काढावे बेबंद
म्हणावे त्या छंद
कवितेचा
कशा वाळवंटी
शोधावा गारवा?
आणिक पारवा
कावळ्यात.
-अविनाश ओगले
19 Nov 2008 - 11:53 am | चिंचाबोरे
निळे केशर
गालावर ओला
हळवा तो तीळ
वाजतसे शीळ,
मनामध्ये|
राजस रूपडं
रूपाचा कहर
येई तो प्रहर ,
प्रभातीचा|
मंद सुटे वारा
शीणही निमाला
दीपही विझला,
अत्तराचा|
मग देई साद
पहाट गारवा
सुटे हा चकवा,
अंतरीचा|
बासरीचा सूर
घुमे मनी शीळ
रूप घननीळ,
दाटे उरी |
जर्द जांभळ्यात
उतरे केशर
बदले प्रहर,
दिवसाचा |
-चिंचाबोरे
19 Nov 2008 - 3:21 pm | मृगनयनी
रम्य एक संध्या
कोमल गंधार,
कुसुंबी किनार
क्षितिजाला...
तेजस्वी रवीची
किरणे सोनेरी,
लाली गालावरी
संध्येच्या का !?!
मुग्ध प्रियतमा
संध्या ती आरक्त,
का 'रवी' आसक्त
'निशे'वरी !
दुखावली 'संध्या'
हळवा गंधार,
का क्षितिजापार
गेला सखा.....
हवेत गारवा
नभी चंद्र तारे,
मादक इशारे
निशेचेही...
आसुसला 'रवी'
निशेच्या छायेला,
कौमुदी कायेला
चंद्र साक्ष...
मिठीत 'रवी'च्या
'निशा'ही उन्मुक्त,
प्रकाश अव्यक्त
अंधारला...
मेघाचा मल्हार,
कित्येक प्रहर,
प्रणय कहर,
आसमंत.....
पहाट भैरवी
तिमिर छेदून,
गगन भेदून,
झंकारली.
उषेचे मांगल्य,
रक्तिम अवनी
श्यामल रजनी,
निस्तेजली...
देखण्या रवीचे,
चढू लागे तेज
परमोच्च ओज,
माध्यान्हीचे.
हळूहळू 'रवी'
झुके पश्चिमेला,
'संध्ये'ला भुलला,
सखा तिचा...
'रवी' अव्याहत,
तीच 'संध्या', 'निशा'...
हे कालपुरुषा...
तूचि धन्य!!!
-> रवि(वार) वर प्रेम करणारी
"मृगनयनी"
:)
19 Nov 2008 - 4:26 pm | स्वाती फडणीस
गारवा
===================
भिजली भिजली
डोळ्यातली वाट
पापण्यांचा काठ
ओलावला
हळवी हळवी
हासूंची गं गाठ
वेदनेला काट
आपोआप
हसरी साजरी
गारव्याची लाट
सुखावले दाट
अंतरंग
===================
स्वाती फडणीस..... १९-११-२००८
छंदात लिहीण्याचा मी केलेला पहिलाच प्रयत्न
29 Nov 2008 - 4:30 pm | पद्मश्री चित्रे
वेदनेचा पक्षी
येई अंगणात
आभाळ पाठीशी
घेवुनीया
नाजुकसे पंख
पाय इवलाले
थकुनीया गेले
आता पार
हळ्व्या फांदीशी
थोडा घे गारवा
किंचित विसावा
झुलुनीया
तुझे दु:ख देई
थोडेसे रे मला
कशास फिरसी
दारोदार
अबोल डोळ्यात
आयुष्याचे दु:ख
जाणवे अंतरी
खरोखर
शापित तू यक्ष
राही माझ्यापाशी
जपेन तुला मी
माझ्यापरि
14 Dec 2008 - 10:31 pm | ऋषिकेश
या स्पर्धेचा निकाल कधी लागणार?
-(गोंधळलेला) ऋषिकेश
15 Dec 2008 - 2:03 pm | राघव
विचारायचे होते :)
मुमुक्षु
23 Dec 2008 - 11:09 am | पद्मश्री चित्रे
विचारायचे होते
27 Dec 2011 - 2:38 pm | मृगनयनी
या स्पर्धेचा निकाल लागला का? लागला नसल्यास तो कधी लागेल याबद्दल कुणी काही सान्गू शकते काय?
आणि लागला असल्यास त्याबद्दलही माहिती हवी होती. :)