मागील दोन भागात आपण पहिले तर असे दिसते कि प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार जितके समाजासाठी उपयोगी पडायला हवे तितके ते पडत नाहीत. असे खरंतर इतरत्रही म्हणजे इतर देशांमध्येही होत असते. समाजकारण काही प्रत्येक जण करीत नाही आणि त्याची गरजही असतेच असे नाही. भारतात मात्र आपले आयुष्य इतके सत्ताकेंद्रांमुळे प्रभावित असते कि प्रस्थापितांनी जमेल तेव्हडी मदत (जातपात, पूर्वग्रह, राजकीय मतं यापलीकडे जाणारी) करणे आवश्यक असते. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. या उलट प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार सामाजिक दुही, निसर्ग ओरबाडणे या आणि अशा इतर गोष्टींमध्ये मश्गुल असतो. या त्यांच्या उपद्रवमूल्यांचा आपण आढावा घेऊ या.
पण त्याही अगोदर आपण बघूया ते धर्ममार्तंड आणि विद्याननिष्ठुर यांच्यातील विळ्याभोपळ्याच्या नात्याकडे. धर्ममार्तंडांची सगळीकडे वाहवा होत असताना, जीवन म्हणजे कसा गुलाब पाकळ्यांवरून होणारा प्रवास आहे असे वाटत असताना ठेच लागावी असे झाले ते केवळ आणि केवळ विज्ञाननिष्ठुरांनी त्यांना दिलेल्या आव्हानामुळे.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ एकूणच भारताच्या दृष्टीने स्वप्नवत वाटावा आणि आज तर हेवा वाटावा इतका सुंदर होता (त्यातला पारतंत्र्य ओढवून घेणारा भाग सोडला तर.) राजकीय आणि सामाजिक स्तरावर इतक्या गोष्टी वेगाने घडल्या कि आज जेंव्हा एखाद्या प्रेषितांची आपण वाट बघतो तेंव्हा न मागताही किती प्रेषित तेंव्हा जन्माला आले याचे आश्चर्य वाटल्या शिवाय राहवत नाही. बघाना: सामाजिक स्तरावर स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्य निवारण, रोग निवारण ( ज्यामध्ये कुष्ठरोग निवारणाचा समावेश आहे), वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार या आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. हे सर्व होत असताना धर्ममार्तंड कुठेतरी वळचणीला पडले होते असे नाही. पण जे काही होत आहे ते चांगलेच होत आहे हा मतप्रवाह देखील नुसताच जोरकस नव्हता तर धरमार्तंडांच्या विरोधाला पुरून उरणार होता. आजची प्रस्थापितांची पिढी हि त्या जुन्या पिढीच्या पुंण्याईवर पुढे आलेली आहे.
इतके सगळे चांगले असताना खरेतर भारताचे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात दबदबा वाटण्याजोगे स्थान असायला हवे होते. आपल्याकडे एकूणच मुलं सहजच पदवीपर्यंत शिकतात. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात गणित, विज्ञान याचा समावेश असतो. एक विज्ञानाधिष्टीत आणि पुरोगामी दृष्टिकोन आपण ठेवला असता तर भारत सहजच मूलभूत संशोधन, अभियांत्रिकी, औषध निर्मिती अशा क्षेत्रात मूल्य उतरंडीच्या वरच्या भागात राहिला असता जसे आज स्वित्झर्लंडचे त्या दृष्टीने स्थान आहे. परंतु मूल्य उतरंडीमध्ये आपला जो हिस्सा आहे तो सेवाक्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रातील गुंतवणूकदार नेहमी कमी मोबदल्याच्या बदल्यात काम करणारे प्रदेश धुंडाळत असतो. आज ज्या नोकऱ्या भारतात आहेत त्या कालांतराने भारतातून जाणार आहेत.
मग कळीचा प्रश्न येतो कि याला प्रस्थापित कसे काय जबाबदार? तर आजच्या प्रस्थापितांनी वळचणीला पडलेल्या धर्ममार्तंडांना परत एकदा समाजधुरिणांचा दर्जा दिला आहे. आज बेरोजगारी, सामाजिक दुही हे आपल्या समोरील प्रश्न नाहीतच. तर जगात अजून किती ठिकाणी पाकिस्तानची छीथू होते त्यात आपल्याला समाधान आहे. हि अशी उपाशी पोटीची राष्ट्रभक्ती अजून किती दिवस जिवंत ठेऊ शकतो त्यावरच पुढील सुदिन किती लवकर उगवेल ते अवलंबून आहे.
प्रतिक्रिया
4 Sep 2019 - 5:27 pm | जॉनविक्क