'तंबोरा' एक जीवलग

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
28 Aug 2019 - 8:24 pm

गाणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जवळचा सखा. एक भारदस्त आणि गाण्याचं अविभाज्य अंग असलेला मैफिलीचा घटक. हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीताच्या अर्थातच सुरांच्या सृजनाचा अवयव. स्वरांची बीजं ज्याच्यातून उत्सर्जित होऊन गाणाऱ्याच्या मनात प्रस्थापीत होतात तिथं गाणाऱ्याची प्रतिभा आणि हे स्वरबीज यांचं मिलन होतं. कंठावाटे प्रसवतात ते निरागस सुर. तो निर्मीतीक्षम अवयव अर्थातच तंबोरा!

तंबोरा एक जीवलग

सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा. त्यातून षडज्-पंचमाचे निरागस शुध्द फवारे कानावर पडत असावेत. त्यांची वलये खर्जाच्या भारदस्त नादावर आपटून अनाहूत स्वयंभू गंधाराची निर्मिती होत असावी तशात एका भारलेल्या क्षणी कंठातून सहज सच्चा षड्ज स्बत:च्याही नकळत बाहेर
पडावा आणि तंबोऱ्यांच्या त्या मुळ गुंजनात मिसळून जावा. अहाहा! देहाची जाणिव पुसट होत जावी उरावे फक्त स्वरमयी अस्तित्व. अपार्थिव. निरागस.

लहानपणी आजूबाजूला अविरत गाणेच असे माझ्या. गाण्यातल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी मनात अजूनही स्वरांसारख्या गुंजतात कधी कधी. एकटी असताना आठवते ते सारे ऐकलेले. तरळते डोळ्यासमोर पाहिलेले. आज दृष्टी अधू झालेली असली तरी हे लहानपणचे ऐकले पाहिलेले आताच्या भोवतालापेक्षा स्पष्ट दिसते चक्षूंना. लहानपणापासून मला तंबोरा खूप आवडायचा. आई गायला बसली की मी तिच्या हातातल्या तंबोऱ्य़ाकडे पहात बसायची एकटक. त्याचा तो भारदस्त आकार, गोल गरगरीत भोपळी, उंच दांडा, त्या वरची कशिद्यासारखी हस्तिदंती नक्षी, त्यावरचे ते मोर, वेल लखलखणाऱ्या तारा, फार आवडायच्या मला. बैठकीत ठेवलेल्या तंबोऱ्याच्या जोडीला मला हात लावायचा असायचा.

आई म्हणायची "तानु (माझं लाडकं नांव) तंबोऱ्याला मुलींनी हात लाऊ नये. चांगलं नसतं"
"मग तू कशी ग लावतेस?" मी म्हणायची.
आई हसायची. म्हणायची "तू लहान आहेस अजून. अग तंबोरा म्हणजे शिवाची पिंडी असते. शिवू नये तिला.
बाईनं एकदा हातात घेतला तंबोरा, की ठेवता येत नाही खाली. तू मोठी झालीस ना म्हणजे लाव हात."

मला काही कळायचं नाही. वाटायचं हा काय! आता ठेवलाच आहे की आईनं खाली. ती कुठं तो कायमचा घेऊन बसते? एकंदरीत तंबोऱ्याची, त्याच्या नादाची, त्याच्या डौलाची मला लहानपणापासून भुरळ. पुढे कळत्या वयाच्या थोडं आधीच हातात तंबोरा आला. गाण्याचं रीतसर शिक्षण सुरू झालं. आणि त्याच्या डौलावरोबर स्वरांची भुरळ पडली ती आयुष्यभर.

गंडा बांधला तेंव्हा खां साहेबांची आणि तंबोऱ्याची पुजा केली. त्यांनीच सुरात लावून ठेवलेल्या तंबोऱ्याच्या तारा छेडून षडज लावला त्या क्षणापासून तंबोरा माझा सखा झाला. सुख असो दु:ख असो, 'आपल्या' अशा अनेक माणसांनी आयुष्यात साथ सोडली. पण यानं नाही. त्या चार तारा झणाणायला लागल्या की साऱ्याचा विसर पाडून हा माझा सखा, एका क्षणात वेगळ्याच दुनियेत घटकाभर का होईला मला घेऊन जायचा.

याचं एक रूप तिकडे अरबस्थानात तंबुर म्हणून होतं म्हणे. उत्तरेत हा तानपुरा म्हणून ओळखला गेला दक्षिणेकडे याची लहान बहिण तंबोरी. तर आम्ही महाराष्ट्रात तंबोरा म्हणतो. घरगुती भाषेत आम्ही जोडी म्हणायचो कारण दोन तंबोऱ्यांची ती जोडी किंवा जोड. आईकडे अत्यंत सुंदर जव्हारीदार अशा दोन जोड्या होत्या. त्यातली एक परंपरेनं माझ्याकडे आली. दुसरी माझ्या बहिणीकडे अक्काकडे गेली. ती गात नसे. आता तिच्या नातीकडे आहे ती सुंदर जोड.

तंबोऱ्याचा जो ऊंच दांड्या सारखा भाग असतो त्याला 'दांडी' म्हणतात. दांडी म्हणजे लाकडाचा पोकळ जाड नळीसारखा भाग. दांडी हलक्या पण मजबूत लाकडाची असते. साग, साल किंवा क्वचित शिसवी असते. अखंड लाकडाची, आतून पोखरलेली दांडी चांगली. पण आजकाल दुर्मिळ. एका बाजूकडून सपाट लाकडाचाचे झाकण लावून हल्ली बनवतात पण ती चांगली नव्हे.

दांडी

या दांडीच्या खाली मोठ्या माठासारखा भोपळा जोडलेला असतो त्याला म्हणतात तुंबा. तुंबा हा खरोखर आपल्या भाजीचा तांबडा भोपळाच असतो. वेलीवर असल्या पासून त्याला तंबोऱ्यासाठी म्हणूनच वाढवतात. मोठा होत असताना त्याच्या गोल आकाराकडे लक्ष ठेवलं जातं. एखादी बाजू चपटी, दबलेली निपजत आहे असं लक्षात आलं तर योग्य बाजूकडे टेकू देऊन किंवा गिरदी लावून त्याचा आकार राखला जातो. कधी कधी इतकं करूनसुद्धा आकार आटोक्यात येत नाही. असं झालं तर सरळ तोडून टाकतात वेलीवरून. एका वेलीला तंबोऱ्यासाठीचे म्हणून तीन किंवा चारच भोपळे राखतात बाकीचे लहान असतानाच तोडले जातात. हेतू हा की
निवडक भोपळ्यांचे चांगले पोषण व्हावे. या भोपळ्यांची पूर्ण वाढ होऊन देतात. वेलीचं आयुष्य संपत आलं. ती वाळायला लागली की मग हे भोपळे वेलीवरून
काढले जातात. पंढरपूरकडे हे भोपळे होतात.

तुंबा

भोपळा वेलीवरून काढल्यावर एका बाजूकडील चकती कातून टाकून आतला गर बिया काढून टाकतात. भोपळा पूर्ण सुकवतात. तासून त्याचे नैसर्गिक कंगोरे नाहिसे करतात. पुन्हा खडखडीत सुकवतात. आणि मग दांडीला जोडतात. भोपळ्याच्या काढलेल्या गोल चकतीच्या जागी कठीण लाकडाची तबली लावतात. ही तबली म्हणजेच तंबोऱ्याचा जीव म्हणता येईल. तिच्या कंपनानेच स्वरांची निर्मिती होते. तुंबा आणि दांडी यांचा जो सांधा असतो त्याला गुलू किंवा गळा म्हणतात.
तुंबा, दांडी आणि तबली जोडून तयार झाली की तंबोऱ्याला पॉलिश करतात. त्यावर नक्षीकाम करतात आणि मग पुढच्या कामाला सुरवात होते.

दांडी, तुंबा, तबली हे तंबोऱ्याचे ढोबळ भाग याशिवाय लहान पण महत्वाचे असे भाग असतात ते म्हणजे लंगोट, खालची जव्हारी, वरची जव्हारी, मणी,
तारघन खुंट्या आणि तारा.

तारा खालच्या बाजूला विशिष्ठ प्रकारची गाठ घालून भोकं असलेल्या ज्या एका भागापसून निघतात त्याला लंगोट म्हणतात. तिथून तारा सुरू होऊन त्या खुंट्यांकडे संपतात
तारांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा असतो तो म्हणजे 'मणी'. हस्तीदंती किंवा शिंगांपासून बनवलेला एक एक मणी एकेका तारेत लंगोटाच्या वर ओवलेला असतो. या मण्यांच्या
खाली प्रत्येक मण्यासाठी स्वतंत्र पायवाट असते. यांचा उपयोग तंबोरा सुरात लागल्यावर तो आणखी सुक्ष्म स्वराबरहुकूम लावण्यासाठी होतो. मणी पायवाटेवर खालीबर करून
हा अचूक सूर साधला जातो.

नंतर तारा जातात खालच्या जव्हारीवरून. याला साकवसुद्धा म्हणतात. ईंग्रजीत ब्रिज म्हणतात. बहुतेक तंतुवाद्याला हा असतोच. तारा या जव्हारीवरून नुसत्या जातात
त्या जव्हारीत ओवलेल्या नसतात. जव्हारीच्या फुगीर भागावरून त्या फक्त ताणलेल्या असतात तार छेडल्यावर जी कंपने जव्हारीकडे जातात ती पुढे जव्हारीकडून तबलीकडे
तबलीकडून तुंब्याकडे आणि तुंब्याकडून गळ्यातून वर दांडीकडे सुपूर्त होतात. या कंपनांच्या प्रवासात ती एकमेकात मिसळून स्वर निर्माण होतो. जव्हारी हा तंबोऱ्याचा अत्यंत महत्वाचा
भाग. याची लांबी रुंदी, कठीणपणा, ती बनवण्यासाठी वापरलेला जिन्नस या वरून स्वराचा गोडवा ठरतो. स्वर नेमकेपणाने उमटण्यासाठी जव्हारी चांगली हवी. 'जव्हारीदार'
तंबोरा म्हणजे नेमक्या गोड, गोल स्वरांचे वाद्य!

खालच्या जव्हारीतून तारा निघतात त्या थेट दांडीच्या वरच्या भागाकडे म्हणजे वरच्या जव्हारीकडे. खालच्या जव्हारीपेक्षा ही आकाराने लहान असते. खालच्या जव्हारीने
निर्माण केलेली स्वरांची वलयं, वरची जव्हारी काही क्षणांच्या अंतराने पुन्हा तंतोतंत घोकत असते. ती हुबेहुब आधीप्रमाणे स्वरवलये निर्माण करते अशा प्रकारे वरची जव्हारी खालच्या जव्हारीला पूरक असावी लागते
यांचे एकमेकापासूनचे अंतरही ठरलेले असते.

वरच्या जव्हारीवरून निघालेल्या तारा पुढे जवळच्या तारघन किंवा पाट्य़ातून ओवलेल्या असतात. जव्हारीसारखाच हा एक पातळ तुकडा असतो प्रत्येक तारेसाठी एक एक भोक असते. एवढ्या लांबून प्रवास करून आलेल्या तारा तंबोऱ्याच्या अंगापासून दूर जाऊ नयेत म्हणून हा पाटा असतो. या शिवाय तो आणखी एका छोट्या जव्हारीचेसुद्धा काम करतो. वरच्या जव्हारीने निर्माण केलेली स्वरांची वलयं पाटासुद्धा क्षणाच्या काही अंतराने तंतोतंत घोकतो. आणि आणखी स्वरवलये निर्माण होतात

तारघनातून निघालेली प्रत्येक तार पुढे आपापल्या खुंटीच्या दिशेने जाते. खुंटीला ती गुंडाळलेली असते. खुंट्या मऊ लाकडाच्या आणि फिरवता येणाऱ्या असतात,
खुंटी पिळून किंवा सैल सोडून प्रत्येक तार अचूक स्वरात लावली जाते. सर्वसाधारण तंबोऱ्याला चार तारा असतात क्वचित सहा किंवा आठ तारांचेही तंबोरे असतात.
पहिल्या तारेवर गायिल्या जाणाऱ्या रागाप्रमाणे पंचम (प) किंवा मध्यम (म) लावतात. क्वचित रिषभही (रे) लावतात. त्या पुढच्या दोन तारा षडजाच्या (सा)
आणि शेवटची खर्जाची. (खालच्या सप्तकातला सा) पहिल्या तीन तारा लोखंडाच्या तर शेवटची खर्जाची पितळेची असते. (हल्ली लोखंडी पण असते खर्जाची तार. विचित्रपणा!!)

तंबोरा सुरात लावणे हे कसब आहे. कान तयार आणि मनाची एकाग्रता चटकन साधावी लागते. आधी खुंट्या पिळून तारा स्वरात आणतात मग मणी
खालीवर करून अचूक स्वर लावला जातो आणि शेवटी खालच्या जव्हारीवर दोन नंबरच्या सोलापुरी सुताचे तुकडे तारेत अडकवलेले असतात ते तुकडे
खालीवर करून अंतीम स्वर लावला जातो.

खुंट्या

पुरूषांच्या स्वराचे तंबोरे आकाराने मोठे आणि मोठा तुंबा असलेले असतात तर स्त्रीयांच्या स्वराचे तुलनेने लहान. तंबोऱ्याच्या प्रत्येक भागाचे मोजमाप ईंचात ठरलेले असते. हल्ली प्रवासात नेण्या आणाण्याला सोपे म्हणून लहान आकाराचे तंबोरे निघाले आहेत. यांना तुंबा जवळजवळ नसतोच. त्या जागी ओंगळ चपटा भाग असतो. ते पाहिले की स्तन कापलेल्या बाईसारखे दिसते. तसेच ऊंचीही कमी असते. पण ते मला आजिबात आवडत नाही. ओंगळवाणा दिसतो तो प्रकार. स्वरही बेतानेच निघतात. या सर्वांना चाट देणारा ईलेक्ट्रॉनिक तंबोराही मिळतो. माझ्याकडेही आहे. पण याच्या आवाजात ती बात नाही. तो भारदस्तपणा तर आजिबात नाही हातात घ्यायचा नसल्याने बैठक कशीही घ्या. काय फरक पडतो असे हे प्रकरण आहे.

तंबोऱ्याशी गायकाचे भावनीक नाते असते. मलासुद्धा अनेक गुढ अनुभव मैफिलीच्या निमित्ताने तंबोऱ्यासंदर्भात आलेले आहेत. ते कधीतरी सावकाशीने सांगेन तो पर्यंत लेखनसीमा. लेख फारच मोठा नाहीना झाला?

गौरीबाई गोवेकर.

(दिलेले फोटो माझ्याकडचे नाहीत. ईंटरनेट वरचे दिलेत)

संगीतलेख

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

28 Aug 2019 - 8:52 pm | जालिम लोशन

हॅरी पाॅटरच्या छडीसारखी.

आणि ते दिसतही नाहीत...

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

29 Aug 2019 - 5:48 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

कंजूष यांच्या प्रतिसादात पहा. दिसत आहेत. फोटोच तंत्र मला जमणारं नाही. पण फोटो असले तर बरे म्हणून दिले.

कंजूस's picture

28 Aug 2019 - 9:59 pm | कंजूस

फोटो
१)
तंबोरा! तंबोरा एक जीवलग,
सुरात लावलेला.

२) दांडी

३)
तुंबा

४) खुंट्या

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

29 Aug 2019 - 5:49 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

फोटोच्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

29 Aug 2019 - 10:56 pm | जव्हेरगंज

फोटो धाग्यात पण अपडेट केले!

प्रमोद देर्देकर's picture

29 Aug 2019 - 7:44 am | प्रमोद देर्देकर

खूप छान आणि संगीत शिकणाऱ्या प्रत्येकास उपयोगी पडेल अशी माहिती.
एकदा तुम्ही मैफिलित कुठे गाणार असाल तर इथे आधी माहिती सांगा. आम्ही मिपाकर हजर राहण्याचा प्रयत्न करूं.

जगप्रवासी's picture

29 Aug 2019 - 3:00 pm | जगप्रवासी

+१

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

29 Aug 2019 - 5:52 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मैफिली करायच्या सोडून बरीच वर्ष झाली आता. गाणं देखील सुटल्यासारखंच आहे. निवृत्त जीवन जगत आहे. माहिती मात्र देऊ शकते. आठवणी ताज्या आहेत अजून. त्या सांगू शकते. इतकच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Aug 2019 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

तंबोरा नेहमी मला एखाद्या ॠशी सारखा वाटतो. मैफिलीत स्वर आणि तालाचे कितीही चढ उतार होत असले तरी याच्या लयीत फरक पडत नाही. एखाद्या स्थितप्रज्ञासारखा तो मैफिलीत वावरत असतो. तबला किंवा पेटी सारखा तो स्वरांच्या मागे धावत नाही. याचे काम या सगळ्यांना शिस्तित ठेवण्याचे असते.

तुम्ही सांगितलेल्या बरीच माहिती माझ्या साठी नवी होती.

अत्यंत मना पासून लिहिलेले मना पर्यंत पोचले. धन्यवाद.

पैजारबुवा,

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

29 Aug 2019 - 5:54 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मना पर्यंत पोचले यात सर्व काही आले. पुनःश्च धन्यवाद.

जॉनविक्क's picture

29 Aug 2019 - 3:04 pm | जॉनविक्क

गूढ अनुभवही अवश्य लिहा

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

29 Aug 2019 - 5:57 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

गुढ अनुभव नक्कीच लिहीन. सगळा जीवनप्रवासच सांगायचा आहे पण कसे जमेल आता असेही वाटते एकेकदा.

नेहमी वाटते ना शेर करावे ते अनुभव ? आम्हालाही खरोखर आंनदच आहे ते वाचण्यात. तेंव्हा मनावर घ्याच.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 6:51 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

खूप काही सांगाव असं वाटतं पण आता एवढं लिहायला जमेल का? उगाच दुसर्‍याला का त्रास असंही वाटतं

इरामयी's picture

31 Aug 2019 - 10:54 am | इरामयी

खूपच छान लिहिलं आहेत.

संगीताच्या बाबतीत संपूर्ण अज्ञानी असलेल्या मला हे सगळं नवीन होतं आणि वाचल्यावर भिती थोडाशी कमी झाली.

आणि अहो, खूप काही जरूर सांगा. वाचायला खूप खूप आवडेल.

उगा काहितरीच's picture

29 Aug 2019 - 9:15 pm | उगा काहितरीच

मेजवानी ! लेख खरंच खूप जास्त आवडला.

अनिंद्य's picture

30 Aug 2019 - 10:51 am | अनिंद्य

@ गौरीबाई गोवेकर नवीन,

उत्तम लिहिले आहे, मनातल्या मनात 'जुळवलेला' तंबोरा झंकारला.

..... आठवणी ताज्या आहेत अजून. त्या सांगू शकते. इतकच...... हे जरूर करा. वाचायला आवडेल.

धन्यवाद. आठवणी सांगायचं ठरवलं आहे म्हणूनच तर पुन्हा आले इथं. कितपत जमतं आता ते पहायचं. तंबोरा सुरात असेल तर तो झंकारतोच.

इरामयी's picture

31 Aug 2019 - 10:56 am | इरामयी

तंबोरा सुरात असेल तर तो झंकारतोच.

व्वा! झकासच!!

प्रणिपात तुमच्या प्रतिभेला.
_/\_

श्वेता२४'s picture

30 Aug 2019 - 12:06 pm | श्वेता२४

सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा. त्यातून षडज्-पंचमाचे निरागस शुध्द फवारे कानावर पडत असावेत. त्यांची वलये खर्जाच्या भारदस्त नादावर आपटून अनाहूत स्वयंभू गंधाराची निर्मिती होत असावी तशात एका भारलेल्या क्षणी कंठातून सहज सच्चा षड्ज स्बत:च्याही नकळत बाहेर
पडावा आणि तंबोऱ्यांच्या त्या मुळ गुंजनात मिसळून जावा. अहाहा! देहाची जाणिव पुसट होत जावी उरावे फक्त स्वरमयी अस्तित्व.

अहाहा हा षड्ज दुसऱअयाचा लागलेला ऐकतानाही परमानंद होतो आणि स्वत:चा लागला तर कधी कधी स्वतचे अस्तीत्वही विसरुन जायला होते. तुमचे लिखाण खूप भावले. यातली बरीचशी माहिती अत्यंत नवीन आहे. धन्यवाद.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Aug 2019 - 6:58 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

"षड्ज दुसऱअयाचा लागलेला ऐकतानाही परमानंद होतो आणि स्वत:चा लागला तर कधी कधी स्वतचे अस्तीत्वही विसरुन जायला होते. " अगदी खरे.


सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा. त्यातून षडज्-पंचमाचे निरागस शुध्द फवारे कानावर पडत असावेत. त्यांची वलये खर्जाच्या भारदस्त नादावर आपटून अनाहूत स्वयंभू गंधाराची निर्मिती होत असावी तशात एका भारलेल्या क्षणी कंठातून सहज सच्चा षड्ज स्बत:च्याही नकळत बाहेर
पडावा आणि तंबोऱ्यांच्या त्या मुळ गुंजनात मिसळून जावा

हे तर फारच सुंदर लिहीलयं तुम्ही हा अनुभव आहे. हे वाचुन

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

या ओळी आठवल्या

सुधीर कांदळकर's picture

31 Aug 2019 - 1:02 pm | सुधीर कांदळकर

नीटनेटक्या लेखनाला चित्रांनी आता रंगत आणली आहे. शास्त्रीय संगीताच्या या पायाबद्दल थोडीच माहिती होती. अमूल्य माहिती आणि तपशिलांबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

31 Aug 2019 - 1:02 pm | सुधीर कांदळकर

आहे.

तमराज किल्विष's picture

31 Aug 2019 - 1:28 pm | तमराज किल्विष

किती छान वाटले वाचून! खूप धन्यवाद!!