इंद्रधनुष्य

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
23 Aug 2019 - 2:08 pm

इंद्रधनुष्य

लहान मुलांचं जग काही वेगळच असत. आपल्याला सुचणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी या मुलाना सहज सुचतात आणि आपल्याला नवल वाटत राहत. गणपतिला आम्ही आमच्या गावाला वेळणेश्वरला गेलो होतो. ईशानला माझ्या मुलाला इथे एक नवीन अन्वी नावाची मैत्रीण मिळाली. आम्ही बाहेर फिरायला जाताना ईशान बरोबरच अन्वीला देखील घेतली. अतिशय बडबड करणारी हि गोड मुलगी ४ वर्षाची आहे. येताना हलकीशी पावसाची सर पडली आणि लगेचच लख्ख ऊनदेखील पडल. सहजच वळून बघितलं तर पूर्ण इंद्रधनुष्य पडलं होतं. अगदी पूर्ण १८० अंशात. खूपच सुंदर देखावा होता तो. मुद्दाम गाडी थांबवून मुलांना दाखवलं ते सुंदर दृश्य. मुलं देखील खूप खुश होती. अन्वीने तर सांगितलं कि ती पाहिल्यान्दाच इंद्रधनुष्य पाहत होती. त्यामुले तिला अगदीच अपूर्वाईची गोष्ट वाटत होती. पुस्तकात दिसणारी किंवा कार्टून मध्ये दिसणारी गोष्ट प्रत्यक्षात खरंच असते आणि इतकी छान दिसते. मी तिला म्हटलं कि,'केव्हढ मोठ्ठ आहे ना इंद्रधनुष्य!' लगेच ती दोन्ही हात जमतील तेवढे लांब पसरून म्हणाली," हो ना! या हातापासून त्या हातापर्यंत!"

मला तिची ती कल्पनाच खूप आवडली. इंद्रधनुष्य किती मोठं आहे हे सांगण्यासाठी तीला कुठल्याही परिमाणाची गरज पडली नाही. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत किंवा १८० अंश कोनात, अर्धवर्तुळाकार अशा कोणत्याही मापाची तिला गरज पडली नाही. तिच्यासाठी ते खूप मोठं इंद्रधनुष्य होतं. आणि किती मोठ्ठ तर या हातापासून त्या हातापर्यंत. मला खूपच मजा वाटली. मला कधी असं सुचलं नाही. लहान मुलांना मोठ्ठी गोष्ट सांगताना आपण देखील असेच हात पसरतो पण त्याचं असं वर्णन मात्र मला खरंच सुखावून गेलं आणि मुलांच्या कल्पना विश्वाचं सुंदर दर्शन झालं. लहान मुलं आपल्या आणि त्यांच्याही नकळत आपलं किती अनुकरण करत असतात ते जाणवलं.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

25 Aug 2019 - 7:02 pm | जॉनविक्क

तिने तिचं विश्व व्यक्त केलय... आपण आपल्या जगातून ते बघतोय. उद्या जेंव्हा तिला आपल्या जगातून तिचे आत्ताचे जग व्यक्त होताना बघायची संधी मिळेल तेंव्हा ती ही अशीच खुश झाली असेल...