युगांतर- आरंभ अंताचा भाग २४

Primary tabs

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
8 Aug 2019 - 1:31 pm

"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे."
"अनुमती आहे."
"महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी."
'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली.
भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही! गांधारी, जर तू मला पुत्र देऊ शकत नसशील तर मी अन्य मार्गाने तो मिळवेन.'
त्याने राज्यसभेतून काढता पाय घेतला. त्याच्या अहंकारावर, स्वाभिमानावर एक खोल घाव लागला होता. वार करणारे हात गांधारीचे आहेत असे त्याला वाटतं होते. डोळ्यांवर पट्टी तिने आपला अपमान करायलाच बांधली होती असे त्याला वाटू लागले. 'या कृत्रिम अंध नारीला धडा शिकवायलाच हवा.' दासाला हाक मारत त्याने सोमरस मागवला. रागाच्या आणि नशेच्या भरात त्याने गांधारीच्या परिचारिकेला कक्षात येण्याची आज्ञा केली!

------
सुर्यदेवांचा अस्त झाला आणि वाऱ्याने वादळाचे रुप घेतले. कोल्हे बेसूर कोल्हेकुई करू लागले. कुत्रांचे अवेळी भुंकणे रडणे सुरु झाले. भली मोठ्ठी झाडे वाऱ्याच्या उद्वेगाने कोसळत होती. नगरवासी घाबरले होते.
"महामहीम, काहीतरी अशुभ घडण्याचे संकेत दिसताहेत."
"विदुर, काय म्हणायचे आहे तुला?'
"महामहीम, अभद्र शक्तीच्या आगमनाच्या वेळी निसर्ग विलाप करतो. एखादा दुरात्मा हस्तिनापुरात अवतरणार आहे, असे दिसते." तितक्यात धृतराष्ट्र दालनात आला.
भीष्मांना काहीतरी आठवले....
"महाराज, विदुर आपल्याला वेदव्यास ऋषींच्या आश्रमात जायला हवे."
"महामहीम? शुभ वार्ता आली आहे?" उत्कंठेने धृतराष्ट्राने विचारले.
"अजून नाही महाराज!"
चेहऱ्यावर निराशा घेऊन धृतराष्ट्र म्हणाला, "महामहीम, अशी वार्ता येईल असेही वाटत नाही आता. आणि आली तरी ती शुभ नसेल माझ्याकरता."
"असे का म्हणता महाराज? वेदव्यासऋषींवर विश्वास नाही तुमचा?"
"आहे विदुर. पण कैक पटीने जास्त अविश्वास गांधारीवर आहे. तिला जर मला पुत्र द्यायचे असते तर ते तिने केव्हाच दिले असते."
"महाराज.... महाराणींचा काय दोष यात?"
"का नाही विदुर? का नाही? माझा राज्याभिषेक न होण्याचे कारण जर माझे अंधत्व असू शकते तर माझ्या पुत्रांना राजगादी न मिळण्याचे कारण गांधारी का असू शकत नाही?" विदुर शांत राहिला.
"सर्वात आधी गर्भधारणा झाली होती ना महाराणींना विदुर? मग त्या मानाने का होईना माझ्या पुत्रांना मला न लाभलेले राज्याभिषेकाचे भाग्य लाभेल? आणि जर नाही, तर हा दोष गांधारीचा का नाही?"
"महाराज, फक्त राजगादी मिळणे हेच ध्येय असते का जिवनाचे?" भीष्माचार्य म्हणाले.
"महामहीम, राजेपद सोडण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतलात. स्वतंत्रपणे. पण स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या निर्णयाचे भार वेगवेगळे असतात महामहीम. माझे पुत्र जन्माला आले तरी कपाळी दासत्व घेऊन येतील. राजगादीवर बसलेल्या व्यक्तीच्या निर्णयाचे ओझे वाहत जगण्यात काय ध्येय असणार माझ्या पुत्रांच्या जिवनाचे?"
या अश्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हेच दोघांना कळेना. धृतराष्ट्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. " शिवशंकरांनी वरदानरुपी शापच दिला गांधारीला. आणि गांधारी सुद्धा एक शापच आहे या अंध धृतराष्ट्राला मिळालेला." अगतिक झाल्यासारखा तो बोलत राहिला.

मोठमोठ्या घड्यांनी भरलेल्या त्या आंधारलेल्या गुफेत गांधारी बसून राहिली होती. हिंस्र प्राण्यांच्या आवाजाने ती थोडी बिचकली होती. हवेतल्या गारव्याने अंगावर शहारे आले होते.
'एकशे एक घडे! आपल्या गर्भाला विभागून भरलेला एक-एक घडा.... वेदव्यासऋषींनी वनऔषधी उगाळून, रस काढून, पिसून त्या घड्यांत अभिमंत्रित केले. म्हणाले, " गांधारी, या घड्यांमध्ये मी गर्भपोषक वातावरण तयार केलं आहे. शंभर पुत्र आणि एक कन्या या घड्यांतून जन्म घेतील." आज ऋषीमुनी नसते तर....? महामहीम भीष्माचार्यांनी हा मार्ग सुचवला नसता तर....? देवांनी दिलेल्या वरदानाचे काय झाले असते? माझ्या पुत्रांचे काय झाले असते? नाही... नाही, गांधारी, असे विचार देखील मनात आणू नकोस. कोणत्याही क्षणी आपले पुत्र जन्म घेतील.... आपले पुत्र.... !'
तितक्यात एक आवाज वनांतून येणाऱ्या भयाण आवाजांमध्ये मिसळला. "खाड...." गांधारीने घाबरून तिथल्या सेविकांना हाका दिल्या.
सेविका धावत आल्या आणि पाहिलं तर एक घडा फुटून त्यातून लहान पाऊल बाहेर आलं होत.

©मधुरा

धर्मलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

8 Aug 2019 - 1:41 pm | पद्मावति

मस्तंच.

मृणालिनी's picture

8 Aug 2019 - 2:55 pm | मृणालिनी

धन्यवाद पद्मावतीजी :)