पावसाळ्यातील एक प्रवास!

Primary tabs

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
6 Aug 2019 - 4:35 pm

गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं!
तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या.

मुंबई मध्ये पाऊस वाढू लागला आणि शनिवारी दुपारी मी पुण्यासाठी बसने निघालो. प्रचंड पाऊस अपेक्षित असल्यामुळे रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी होती, पण एकंदरीत पावसामुळे वेळ लागलाच. एका बोगद्यात आम्ही पोचायच्या आधी एक कार पलटी झालेली बघितली आणि धस्स झालं! घाटामधून दिसणारे धबधबे बघत ४ तासात पोचलो. बाकी प्रवास काही विशेष नाही.
ध्यानीमनी नसताना रविवारी सकाळी लगेच निपाणीला जायला लागले. पाऊस सुरु होताच. एकटाच निघालो. नवले ब्रिजवर एका वाहतूक पोलिसाने हात केला. मी म्हटलं इथं पण चेकिंग करताहेत वाटत म्हणून घेतली साईडला; तर लक्षात आलं त्यांना लिफ्ट पाहिजे होती.
तिघेजण होते, कराडला जायचं होत. मी म्हटलं इकडे कस काय, तर म्हणाले त्यांना 'एक्सप्रेस-वे' ची ड्युटी आहे. मला आश्चर्य वाटलं. एवढ्या लांब कस काय म्हणून. त्यांनी सांगितलं अगदी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा यावं लागत. त्यांना १२ तास सलग ड्युटी आणि २४ तास सुट्टी असं १५ दिवस करावं लागत. त्या २४ तासात तिथे राहण्याची सोय बहुधा नाही आहे. कारण दररोज लागणारे रेनकोट वगैरे गोष्टी ते दररोज घेऊन जातात.
भर पावसात रात्रभर ड्युटी करून वाट लागली आहे म्हणाले. त्यांच्या गप्पामध्ये आपल्या नेहमीच्या रुटीन पेक्षा बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या :-)
कराडला त्यांना सोडल्यावर तिथेच एक तरुण आला. तो होता राज्य राखीव दलाचा जवान, कोल्हापूरला घरी निघालेला. आदल्या दिवशी महालक्ष्मी एक्सप्रेस मनमाडमार्गे मिरजपर्यंतच जाणार म्हणून कल्याण वरून ठाणे-पनवेल करत दुपारी १२:३०ला कराड पर्यंत पोचला होता. त्याचे पण रोचक अनुभव ऐकले. गडचिरोली पासून पंजाब पर्यंत सगळीकडे ड्युटी निभावली होती त्यांनी आणि आता राजभवन!

गावाकडे पाऊस चालूच होता. जातानाच शिरोली फाट्यावर आलेलं पाणी बघितलं होत, त्यामुळे धाकधूक होती.
माझं सोमवारी परत यायचं हो-नाही चाललं होत. पाणी वाढतंय म्हणून सोमवारी सकाळपासून एसटी कंट्रोल रूम मधून अंदाज घेत होतो. शेवटी ६ वाजता गावातून निघता येईल असं ठरलं. सगळेजण म्हणत होते भर पावसात रात्री का प्रवास करतोयस, सकाळी जा. मला शक्य तितक्या लवकर पोचायचं होत त्यामुळे आता वाहतूक चालू आहे तर निघावं, सकाळी अडकलो तर लवकर नाही जाता येणार असं वाटलं. म्हणून म्हटलं करू धाडस आणि जाऊ दमाने!

गावच्या ओढ्याला प्रचंड पाणी, शेजारच्या गावच्या हमरस्त्याला लागण्या आधी छोट्या पुलावर नाल्याच्या पाण्याचा मोठा लोंढा हे सगळं बघून "चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना!" अशी सारखी पाल चुकचुकत होती. तरीपण शांतपणे निघालो. हायवेला लागेपर्यंत रस्त्यावर खूप ठिकाणी पाणी होत.

निपाणीच्या पुढे हायवेला वेदगंगेच पाणी पात्राच्या बरच बाहेर दिसत होत. रस्त्यावर येईल असं वाटत होत.
मुख्य टेन्शन पुढे होत; पंचगंगेच्या पुढे शिरोली फाट्याला हायवेवर पाणी आल्याची बातमी होती. निघेपर्यंत तरी वाहतूक चालू होती. ७:१५ च्या दरम्यान कोल्हापूरच्या बाहेर हायवेला "पाणीच पाणी चोहीकडे" दिसू लागलं. पंचगंगेच्या आधी आणि नंतर १ किमी हायवे सोडल्यास सगळीकडे नुसते पाणी दिसत होते(व्हिडिओ). पुढे तर हायवेची एक लेन बंद झाली होती पाण्यामुळे आणि त्या पाण्यात उभारून वाहतूक पोलीस एका लेन मधून वाहनांना जाऊ देत होते. सर्व्हिस रोड, बाजूची फर्निचर दुकाने हे सगळे पाण्याखाली!
पुढे वारणा नदीच्या पुलावरील सातारा कडे जाणारा पूल बंदच होता. एका पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरु होती. (रात्री उशिरा पाणी रस्त्यावर वाढल्यामुळे या तिन्ही ठिकाणी हायवे बंद झालाच आणि बऱ्याच वर्षांनी हायवे ठप्प झाला. बातमी )
तिथून निघाल्यावर सुटकेचा निश्वास टाकला. कराड नंतरच्या तासवडे टोल नाक्यावर एवढं पाणी साठलं होत की उजवीकडच्या २-३ लेन फक्त चालू होत्या. एवढा टोल घेऊन अशी स्थिती!

इथे एक निरीक्षण सांगतो. गावापासून कोल्हापूर पर्यंत सगळीकडे पाणी बघायला एवढे लोक रस्त्यावर होते की विचारू नका! कोल्हापूर मध्ये तर हायवेवर जत्रा फुलली होती :-) लहान-मोठे, पुरुष-स्त्रिया सगळेच उत्साहाने पाणी बघायला येत होते, अगदी सर्व्हिस रोडवरच्या गुडघाभर पाण्यातून चालत आणि एकाच वेळी २ मुलांना खांद्यावर/कडेवर घेऊन!

पुढे पाऊस चालूच होता. सकाळपासून व्हाट्सअप वर सातारा-पुणे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे टायर फुटत असल्याचे व्हिडिओ येत होते त्यामुळे अंधार पडेल तस पोटात गोळा यायला लागला. सातारा पर्यंत तुलनेने खूपच कमी खड्डे लागले. आणि जिथून सातारा-पुणे ६ पदरी रस्ता सुरु झाला तिथेच खड्ड्यांची सुरुवात झाली. इथून पुढे खरी कसरत सुरु झाली. ओला रस्ता आणि पाऊस असल्यामुळे रस्ता दिसण मुश्किल होत आणि त्याचमुळे आपसूक गाडी खड्ड्यात जाण क्रमप्राप्त होत! कितीही प्रयत्न केले तरी सगळे खड्डे चुकणार नव्हतेच, त्यामुळे २-३ गोष्टी केल्या.
शक्यतो आपल्या वेगाने एखादे वाहन समोर असेल तर पुरेसे अंतर ठेवून त्याच्या मागे जाणे, जेणेकरून "पुढच्यास 'ठेच' मागचा शहाणा" असं होत. एकदा असा 'पायलट' मिळाल्यावर त्याला कोणी मुद्दाम ओव्हरटेक करत नव्हतं :-)
अगदी अल्टो पासून इनोव्हा पर्यंत सगळेच इज्जतीत चालले होते. एक '१२' ची फॉर्च्युनर शेवटी शेवटी प्रचंड वेगात गेलीच म्हणा! ;-)
दुसरं म्हणजे आलेल्या व्हिडिओ मधून लक्षात आलं होत की उजवीकडच्या लेनमध्ये जास्त खड्डे आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी वळणावर सखल भागात उजव्या लेन मध्ये खूप पाणी साठत, अशा पाण्यात गाडी खूप ओढली पण जाते(हा आधीचा पण अनुभव) त्यामुळे शक्यतो डावीकडच्या किंवा मधल्या लेनने जाणे.
ट्रक/बस सारखे वाहन पाण्यातून जात असताना त्याच्या बाजूने जाणे म्हणजे हमखास कपाळमोक्ष; कारण जो काही पाण्याचा फवारा काचेवर येतो त्यामुळे काही सेकंद पुढचं काहीच दिसत नाही. त्यामुळे ओव्हरटेक करताना तो अंदाज घेणे.
मुळात खड्डेवाल्या रस्त्याचा अंदाज तसा लगेच येऊ शकतो. म्हणजे २ वेगळ्या पॅचला जोडणारा भाग किंवा थोडे अंतर आधी रस्त्यावर बरीच वाळू/खडी येणे, ओव्हरब्रिजची वरची सपाट बाजू इ.
मी तासवडे/आणेवाडी टोल नाक्यावर शिव्या घातल्या तर ते प्रांजळपणे म्हणाले; हो आहेत खड्डे, शिस्तीत जा! :-)

आता मुळात हे सगळं करता आलं कारण वेग मर्यादित ठेवला होता आणि वाहने खूपच कमी होती.
वाहनांची संख्या नेहमीच्या अगदी २५-३०% होती, म्हणजे काही काही ठिकाणी अगदी सुनसान वाटत होत. त्याचा फायदा एकंदरीत वेळ वाचण्यात झाला. टोल, डायव्हर्जन इथे नेहमी जाणारा वेळ वाचला. त्यामुळे रस्ता चांगला असल्यावर खूपच निवांत वाटत होत पण खड्डे सुरु झाले की प्रचंड ताण! बऱ्याच ठिकाणी ओल्या रिकाम्या रस्त्यावर साइन बोर्ड वरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामुळे झालेला हिरवा रस्ता किंवा पिवळ्या पट्ट्यांचा पडलेला प्रकाश हे दृश्य अगदी विलोभनीय होत!

मी पहिल्यांदा या मार्गावर ६०-७० च्या वेगाने एवढा वेळ गाडी चालवली. चांगल्या भागात १०० ला पोचलो, पण त्या पलीकडे नाही. (इतर वेळी इकडे मी शक्यतो १००+ असतो). काही ठिकाणी तर अगदी ५० पर्यंत वेग खाली आला आणि कळलं पण नाही की वेग कमी झालाय, एवढा स्ट्रेसफुल ड्राईव्ह होता!
मी नेहमीपेक्षा २ ब्रेक जास्त घेतले. नुसतंच गाडीतून उतरून डोळे मिटून बसलो होतो किंवा चक्कर मारली.

पण बऱ्याच लोकांनी काळजी घेतली नाही किंवा नशिबाची साथ मिळाली नाही म्हणा पण अगदी दर १०-२० किमीला एखाद्या गाडीचे टायर बदलणे चालू दिसत होते. यामध्ये पण लहान-मोठ्या सगळ्या गाड्या होत्या. त्यामुळे 'ट्युबलेस टायर' ला काही होत नाही वगैरे गैरसमज आपण काढून टाकलेले बरे.
चांदणी चौकाच्या पुढे एका मालवाहू बोलेरोने खड्डा चुकवायला अशी काही वळवली की कॅब ने वेळीच अजून डावीकडे वळवली नसती तर मोठा अपघात झाला असता.

मी अमेरिकेत नवखा ड्रायव्हर असताना भर पावसात रात्री बऱ्याच वेळा ते पण अनोळखी रस्त्यांवर बिनधास्त गाडी चालवली आणि आपल्याकडचे पण अनुभव घेतले(२०१६ ला पण असाच रात्री ९:३० ते २ प्रवास केला होता प्रचंड पावसात) त्यातून ऐक गोष्ट अधोरेखित झाली. आपल्याकडचा पावसातील प्रवास हा फक्त आणि फक्त रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे धोकादायक आहे. व्यवस्थित गाडी चालवणारा असेल तर पुरेशी काळजी घेऊन नीट जाऊ शकतो, पण आपल्या रस्त्यांमुळे वाट लागते.

शेवटी ११:३० च्या दरम्यान पोचलो मी अगदी व्यवस्थित! नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ नाही लागला. एकंदरीत सुखद नाही पण वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव होता.
हा तसा वेडेपणा होता, पण सुरुवातीला लिहिलं त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी निपाणी आणि कोल्हापूर इथला हायवे बंद झालाच. त्यामुळे तसा योग्य निर्णय घेतला आणि नशिबाने साथ दिली असं म्हणूया :-)

(हा लेख 'भटकंती' मध्ये टाकणार होतो, पण म्हटलं हे अनुभव कथन आहे, त्यामुळे इथे टाकला.)

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Aug 2019 - 4:46 pm | कुमार१

आपल्याकडचा पावसातील प्रवास हा फक्त आणि फक्त रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे धोकादायक आहे. व्यवस्थित गाडी चालवणारा असेल तर पुरेशी काळजी घेऊन नीट जाऊ शकतो, पण आपल्या रस्त्यांमुळे वाट लागते.

+१११

अनुभव लिहून लोकांना सांगणे हे चांगलंच.
लहान चाकांच्या वाहनांना फार त्रास होतो खड्ड्यांचा.

दुर्गविहारी's picture

6 Aug 2019 - 6:28 pm | दुर्गविहारी

भारी लिवलयं. :-)
व्हिडीओ टाकणार्‍याचे नाव नाही लिहीले. बा़की त्या पोलिसांचे अनुभव वाचायला आवडतील.

लई भारी's picture

6 Aug 2019 - 7:13 pm | लई भारी

धन्यवाद मालक. तुम्हीच टाकला होता व्हिडिओ व्हाट्सअप वर, लिहायचं राहील! :-)
मला वाटतंय त्यामुळेच माझी मानसिक तयारी झाली होती.

टोल घेणारांचे नक्के काम काय असते हो.

जॉनविक्क's picture

6 Aug 2019 - 6:39 pm | जॉनविक्क

जालिम लोशन's picture

6 Aug 2019 - 6:43 pm | जालिम लोशन

सुरेख.

लई भारी's picture

6 Aug 2019 - 7:14 pm | लई भारी

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.