रक्षाबंधन - भाग १

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
5 Aug 2019 - 8:22 pm

' रक्षाबंधन '
भाग १

भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार.
'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू.
आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा? तर लवकरच येऊ घातलेला एक सण दोन नावांनी देशभर उत्साहात वगैरे संपन्न होत असतो आणि विशेष म्हणजे एकाच सुट्टीवर आपण समाधानी असतो (नाईलाजास्तव?). दूरदर्शनवर कॅडबरीच्या जाहिराती येऊ लागल्या, शॉपिंग करता विविध संकेतस्थळे भंडावून सोडू लागली, या सणाला तुमच्या घरात 'हे' यायलाच हवं, हे 'त्या' वस्तू ना वापरणारे निक्षून सांगू लागले, बाजार फुलला आणि खूप काही...पोस्ट आणि कुरिअर ह्यांचीही लगबग म्हणजे राखी /नारळी पौर्णिमा येऊ घातली आहे. गाड्याघोडे घेऊन विविध पर्यावरणपूरक वाहनांनी समाज एकडू न तिकडे हलू लागतो, कॅलेंडर फडफडतात, सुट्ट्या टाकणे, मंजूर करून घेणे, कुठे जमायचे इत्यादी काथ्याकूट करत काहीतरी वेगळे आणि परंपरेला साजेसे असे कार्यक्रम आखले जाऊ लागतात. सामाजिक भान, सैनिकांचा मान असेही सगळे सांभाळत चर्चा, परिसंवाद झडतात.
घरी सामानसुमान झाडलोट (पाठी गणपती येणार आहेतच) जिन्नस, भेटवस्तुंच्या याद्या असे काहीतरी आणि जीवावरची गोष्ट म्हणजे साफसफाई ( मोलकरीण असो व नसो ) जेवण घरी का बाहेर, आणायचे का जाऊन जेवायचे? जोडून सुट्ट्या आल्या तर वैश्विक प्लॅंनिंग होते. कोणत्या वारी सण येतो त्यानुसार हळहळणे. आता आपण निवडलेला सण श्रावणातच येत असल्याने सामूहिक हळहळण्यात नारळी भात खाताना वेगळे काही आवाज काढूनही ऐकायलाही येत नाही म्हणे. हळूहळू मुद्दा कळतोय ना?प्राणी खुष आणि ते विकणारे नाराज ह्या द्वंद्वात सापडलेला श्रावण आणि ते आनंदाने पाळणारे (??) मनुष्य असा दोलायमान समाज ह्या पौर्णिमेच्या तारेवर हातात नारळ घेऊन अर्ध्यावर येऊन पोचलेला असतो.
हे फार वैयक्तिक आणि घराघरातले विषय झाले, सामाजिक पातळीवर बघा किती समस्या येतात. काही मुले टेन्शनमध्ये की हो, नवतरुणी, नाजूकबाला हाती राखी घेऊन आली तर काय करता? आटपलं की सगळं. हे राहू द्या, मुली/ स्त्रियांना छेडणाऱ्यांचे काय? बिचाऱ्यांना मान खाली घालूनच दिवस काढावा लागतो, फार फार दया येते त्यांची. भाऊ/ भाई वगैरे मंडळी आसपासच असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो त्या रोमिओंना. त्यामुळे हे दु:शासनाचे भाईबंद आपला मनसुबा पोस्टपोन करतात. सगळेच नाही, कारण आपल्याला बातम्यांमध्ये " राखी बांधायला जात असलेल्या बहिणीची छेड काढली."असे कसे ऐकायला येईल? " समाजात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर" ह्या चर्चेला ह्याहून पोषक दिवस तो कोणता? ती ऐरण एकदा बघेन म्हणतो. (ऍमेझॉनवर आहे म्हणे)'भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान', 'जिच्या हाती दोरी..',' आधुनिक स्त्री आणि समाज','भ्रूणहत्या- एक शाप', 'आजची स्त्री सुरक्षित आहे का?'असे आणि अनेक करोडो विषय चावून चोथ्या पलीकडे गेलेले विषय घेऊन बक्षिस मिळवणारी मुले हा अवनीवरती स्वतंत्र भारतात बागडताना आढळतात. किंवा असे विषय स्पर्धांना मिळत राहावे म्हणूनच की काय काही समाज स्त्रियांना अजूनही नागवे करतोय असं तर नाही?
किंवा गणपतीत देखावा करायला विषय मिळावा, मेणबत्त्या आणि फुले, काळे कपडे विकले जावे म्हणून का आपण निर्भयावर बलात्कार करतो? ज्यांनी केला त्यांना बहिणी नाहीत का, असल्या तर त्यांनी ह्यांना राख्या बांधल्या होत्या का? असतील तर मग हे कसे घडते?
नजरेने होतो, इशाऱ्यांनी जमतो, शब्दांनी तर लाज आणता येते, लगट करून परमानंद होतो अशी जिवंत माणसं अंदाधुंद फिरत असताना हा बहिण भावांचा अपूर्व, अनोखा आणि बरंच काही फक्त आपल्याच देशात, या बद्दल किती समाधान बाळगू तेवढे कमीच.
त्या दिवशी सगळ्या चॅनेल्सवर बहिणींचे , राख्यांचेच चित्रपट दाखवावे लागतात. बहिणीवर बलात्कार करताना भाऊ वरून खालून येतो आणि गुंडांची पिटाई करतो, हे तर नैवेद्यच म्हणून बघतो आपण. ह्या सणाची मुळे कृष्णापर्यंत जातील, आणि कोण्या देवतेवर जाऊन थांबतील त्याला हिशेंब नाही. तत्कालीन परिस्थिती होती तसे झाले, होत राहिले, पण आज जे होत आहे ते डोळे झाकून बघत निर्लज्जपणे गोड भात हादडून झोप काढायची?
कोणत्याही वयाची म्हणजे चालतां येणारी नसली तरी चालेल, राखी बांधता येवो अथवा नाही, अत्याचाराला चालते. तिला कापता चिरता, जाळता , पुरता येते. चालत्या गाडीतून असो, हॉटेलमध्ये बसलेली, ट्रेनमध्ये बाहेर उभी असलेली वा नुसतीच उभी असलेलीही. शक्य त्या प्रकारे तिला स्पर्श करून आपण आपापल्या राख्यांची लाज राखतोच. कुठे रक्षण होतंय, कोण करतंय, मुख्य म्हणजे जन्माआधीच गळा घोटलेल्या कन्येचे काय? तिने राखी बांधलीच नाही, म्हणून की काय? का बांधायला दिली नाही म्हणून?

- अभिजीत जोगळेकर

समाजप्रकटन