सध्या सीसीडीचं (कॅफे कॉफी डे) प्रकरण जोरात आहे म्हणून नाहीतर हे लिखाण तसं सीसीडी, बरिस्ता आणि तत्सम सगळ्या प्रकारांना उद्देशून आहे. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शहरात सीसीडीचं पहिलं आउटलेट सुरु झालं. तेंव्हापासून ते नंतर कितीतरी वर्ष "हे आपल्यासाठी नाही" हे डोक्यात पक्कं बसलं होतं. कॉलेजसमोरच्या मामाच्या टपरीवर दोन रुपयात कटिंग चहा अन छोटा पारले जीचा पुडा घेणाऱ्या आमच्यासारख्यांना सीसीडीत जाऊन दीडशे रुपयाची कॉफी पिणे कधीच झेपणारे नव्हते. अगदी कमवायला लागल्यावरसुद्धा सीसीडीत जाऊन उधळावं असं कधीही वाटलं नाही. चहा किंवा कॉफी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण चांगल्या हॉटेलात आजही तीस रुपयात कॉफी अन दीडशे रुपयात भरपेट थाळी मिळत असताना फक्त कॉफीसाठी दोनशे-अडीचशे रुपये लोकं कसे काय देऊ शकतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
पुण्यात नवीन असताना नोकरी लागायच्या आधी एकदा एका मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच्या कंपनीसमोर बरिस्ता कॉफी शॉप होतं. तो ही तिथे कधीच गेला नव्हता. पण त्यादिवशी त्याला काय वाटले माहिती नाही. फोनवर तो मला बरिस्तात भेटू असं म्हणाला. त्याने बरिस्ताचं नाव काढल्याबरोबर ,"तुया बाप गेला होता का रे बरिस्तात कधी?" ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
त्यावर तो म्हणाला,
"अबे माझी पण हिंमत नाही झाली अजून. पण आता तू सोबत आहे तर गेलो असतो"
"हे पाय पैशे तुलेच द्यायचे आहे. पण आतमध्ये जाऊन मी इंग्रजी बोलणार नाही भाऊ"
इंग्रजी बोलावे लागेल हे कळल्यावर त्याने लगेच नाद सोडला.
बरं फक्त इंग्रजी बोलून भागणार नव्हते. तिथले वेटर व्हायवा घेतल्यासारखे प्रश्न विचारतात. म्हणजे पंधरा हत्तींची हिंमत एकटवुन दोन कॉफ्यांसाठी पाचशेची नोट खिशातून काढायची. त्यानंतर वन हॉट अँड वन कोल्ड कॉफी प्लीज असं घोकत घोकत काउंटरवरच्या तरुणीजवळ जायचं. अन मी तुझ्यावर लाईन मारतोय असं तिला जाणवू न देता अन एकदाही न अडखळता आपली ऑर्डर द्यायची.मग तिच्या कॅपेचिनो ऑर एस्प्रेसो ह्या प्रश्नावर मुरलीधरनसमोरच्या हेमांग बदानीसारखा केविलवाणा चेहरा करायचा. नंतर कसंबसं स्वत:ला सावरत "नाही नाही..गरम कॉफी आपली साधी" असं बावळटासारखं उत्तर द्यायचं.
एकतर अगदी पहिल्यापासूनच इतक्या चकचकीत वातावरणात मला गुदमरल्यासारखं होते. त्यात ह्यांचे प्रश्न अन शिष्टाचाराचे फवारे उडायला लागले की असह्य होते. कसंय की, नेहमीच्या हॉटेलात, वाजवी दर असल्याने अन्न आणि अपमान दोन्ही मुकाट गिळले जातात. पण इकडं, अवाजवी दरात अत्यंत बेचव कॉफी अन आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन परवडत नाही. म्हणून कित्येक वर्ष ह्या प्रकारापासून मी लांबच होतो. पण नंतर काही अपरिहार्य कारणांमुळे सीसीडीची ब्याद अंगावर घ्यावीच लागली.
ते कारण म्हणजे... लग्नासाठी वधूसंशोधन..
झालं काय की, आमचे पालक गावाकडे अन आम्ही नोकरीसाठी पुण्यात. आणि 'साहेबांच्या शैक्षणिक धोरणामुळे' अनेक समवयस्क सावित्रीच्या लेकीसुद्धा पुण्या-मुंबईतच नोकरीला असायच्या. मग आमचे पालक आपापसात बोलून राजीखुशीने आम्हाला पुण्यातल्या सीसीडीत भेटायला सांगायचे. आता आपला मुलगा कपातून बशीत ओततानासुद्धा चहा सांडवतो हे त्यांना माहिती असूनही मला ह्या अग्निदिव्यात का ढकलायचे ते माहिती नाही. तर एके दिवशी अचानक सीसीडीत भेटायचं फर्मान आलं. ध्यानीमनी नसताना डायरेक्ट वर्ल्डकप खेळायला जायचे फर्मान आल्यावर मयांक अग्रवालला काय वाटले असेल हे मी एगझॅक्ट सांगू शकतो.पण मयांकच्या गाठीशी क्रिकेट खेळण्याचा अनुभव तरी होता. इथं आमच्यासमोर मेनूकार्ड कसं मागायचं इथपासून ते मेनूकार्डातलं काय मागवायचं इथपर्यंत प्रश्न होते. मग लगोलग आम्ही गुगलवरून सीसीडीचं मेनूकार्ड डाऊनलोड केलं. आणि बराच खल केल्यावर स्वतःसाठी कोल्डकॉफी आणि तिच्यासाठी तिला जे हवं ते मागवायचं अशी स्ट्रॅटेजी ठरवली. तिला इंप्रेस करण्यासाठी दोन-तीन कॉफ्यांचे नावसुद्धा पाठ करून ठेवले.
पण.... नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते..
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आम्ही सीसीडीत भेटलो. तोपर्यंत आमची खूप प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे मी आपल्या बापाचे कॉफीचे मळे असल्यागत सराईतपणे वागत होतो. मी माझ्यासाठी कोल्डकॉफी मागितली.
अन तिला विचारले..,
"तू काय घेणार? एक्स्प्रेसो ट्राय करून बघ हवं तर.."
आणि तिने बॉम्ब टाकला..
"ऍक्चुअली..माझी ना आज चतुर्थी आहे. इथं उपासाचं काही मिळते का?"
अगं रताळे आपण काय करमरकर नाश्ता सेंटरमध्ये आलोय का ... ! ही माझी मनातल्या मनात पहिली रिएक्शन होती.
आता हिच्यासाठी सीसीडीत उपासाचे पदार्थ शोधणं हा आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न होता. मी काउंटरवर जाऊन काहीतरी विचारल्यासारखं केलं आणि वापस आलो. आणि तिला घेऊन शेजारच्या गंधर्व हॉटेलात गेलो.
मला दुःख तिच्या चतुर्थीचं किंवा गंधर्वात जाण्याचं नव्हतं. तर दुःख हिच्यासाठी केला का अट्टाहास ह्याचं होतं. बरं एवढं करूनही तिने आधी नकार कळवला राव...!!
त्यानंतर सीसीडीत बऱ्याच वेळा जाणं झालं. (ह्याचं कारण सूज्ञांच्या लक्षात येईलच!) हळूहळू मी उत्तम सीसीडीपटू झालो. "सीसीडीचं स्टॅंडर्ड घसरलंय" किंवा "छया..पूर्वीचं सीसीडी राहिलं नाही" हे बोलण्याइतपत अनुभव आता गाठीशी आहे. पण गंमत म्हणजे जिच्याशी लग्न ठरलं तिच्याशी पहिली भेट सीसीडीत झाली नाही.
बहुतेक माझ्या पत्रिकेत 'सीसीडी लाभी नाही' असं कुठेतरी कोपऱ्यात लिहिलं असावं.
समाप्त
प्रतिक्रिया
2 Aug 2019 - 10:36 am | महासंग्राम
म्हणजे त्या कन्यकेस तुम्ही बालगंधर्वच्या CCD त घेऊन गेला होता हे माझ्यासारख्या चाणाक्ष वाचकांनी ओळखलं आहे
2 Aug 2019 - 10:40 am | कंजूस
अरे वा!
-----
तसा स्पा'नेही एक अनुभव लिहिलेला आठवला.
--------
आता या हाटेलांचं काय होणार?
2 Aug 2019 - 10:54 am | यशोधरा
सी सी डी असो, बरिस्ता असो, किंवा अजून काही इंद्राचा स्वर्ग असो, आम्ही ठणकावून मराठीत बोलतो. गल्ल्यावर आपली मराठी पोरं/ पोरीच असतात आणि मराठीतून बोललं की मनापासून हसतमुखाने सर्व्हिस मिळते. लेकी बाळी असल्या तर गप्पासुद्धा मारतो थोड्या थोड्या.
2 Aug 2019 - 11:03 am | संजय पाटिल
+१
2 Aug 2019 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
लेकी बाळी असल्या तर गप्पासुद्धा मारतो थोड्या थोड्या.
हे सोडून :)2 Aug 2019 - 3:43 pm | जगप्रवासी
मी मॅक-डी ते डॉमिनोज सगळीकडे मराठीतच बोललोय आणि समोर काउंटरवरून छान स्माईल येऊन मराठीतच उत्तर मिळत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामुळे सर्व्हिस पण उत्तम मिळते.
बाकी लेख मस्त खुसखुशीत झालाय
2 Aug 2019 - 10:54 pm | सुमेरिअन
कॉलेज च्या वेळेला आणि नंतर हि CCD / 5 स्टार वगैरे मधे पाय ठेवायला भीती वाटायची. किंवा जड वाटायचं. कॉन्फिडन्स एकदम डाउन व्हायचा तिकडे गेलो कि. CCD / 5 स्टार चा कर्मचारी वर्ग आणि इतर लोक आपल्याकडे तुच्छतेने बघत आहेत असं वाटायचं. त्यामुळे हे महागातलं दुखणं शक्यतो टाळायचो. पण तेव्हापासून ते आत्तापर्यंत, जेव्हा जेव्हा असल्या ठिकाणी गेलोय, नेहमी मराठी मधेच बोललोय. समोरच्याला मराठी येत नसेल तरच हिंदी किंवा इंग्लिश. मराठी बोलण्यामध्ये कधी कमीपणा तर वाटला नाहीच, पण उलट अश्या उची ठिकाणी जाऊन मराठी मधे बोलून, ऑर्डर देऊन भारी वाटायचं. कॉन्फिडन्स वाढायचा (का ते माहित नाही).
2 Aug 2019 - 11:18 am | बोलघेवडा
पुलं च "मोंजिनिस" मधील प्रसंग आठवला.
व्हॉट इज हॉट?
"फोर बिस्कुट्स अँड टीज"
ऐकलं नसेल तर एक नक्की!!
"अपूर्वाई" मध्ये आहे.
2 Aug 2019 - 11:21 am | नेत्रेश
आपण भक्कम पैसे मोजुन कॉफी ऑर्डर करताना आपल्याला पाहीजे त्या भाषेत ऑर्डर देता आली पाहीजे. ते सेवा द्यायला बसलेत, आपल्या ईंग्रजीची परीक्षा घ्यायला नव्हे.
2 Aug 2019 - 11:24 am | नेत्रेश
प्रतिसाद जनरल आहे, चिनारभाउंना उद्येशुन नाही.
लेख/ अनुभव उत्तम जमला आहे.
3 Aug 2019 - 9:44 am | सुबोध खरे
आपण भक्कम पैसे मोजुन कॉफी ऑर्डर करताना आपल्याला पाहीजे त्या भाषेत ऑर्डर देता आली पाहीजे. ते सेवा द्यायला बसलेत, आपल्या ईंग्रजीची परीक्षा घ्यायला नव्हे.
बाडीस र च्या क ने- आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून कधी मधी बड्या हॉटेलात घेऊन जाण्याचे धोरण ठेवले होते. कारण बाहेरच्या जगात गेल्यावर आपल्याला साहेबी चाली रीती समजल्या पाहिजेत आणि माहिती असाव्यात म्हणून. यामुळे कोणत्याही मोठ्या तारांकित हॉटेलात गेल्यावर बुजल्यासारखे वाटले नाही.
ऊलट आता १० रुप्याच्या गोष्टीला ५०० रुपये मोजायला नको वाटतात म्हणून खिशात पैसे असले तरी अशा हॉटेलात जावेसे वाटत नाहीत.
( उगाच फसवले गेल्याची भावना होते. मध्यमवर्गी वृत्ती)
उदा. बायकोचा ५० वा वाढदिवस साजरा करूया म्हणून घरच्या सर्वाना ताज मध्ये घेऊन जावे हा विचार केला होता. पण माणशी साडेसात हजार अधिक कर मिळून अंदाज सव्वा लाखाच्या वर जात होता. ( त्यातून आमचे पूर्ण कुटुंब शाकाहारी आहे).
याऐवजी सिगडी ग्लोबल ग्रील पवई मध्ये सर्वाना घेऊन गेलो आणि पोट फुटेस्तोवर खाल्ले तरीही १६ लोकांचे बिल १५ हजारच झाले.
2 Aug 2019 - 11:24 am | वकील साहेब
छान, मस्त, खुसखुशीत लिखाण, कुठेतरी रिलेट झाल्याने जाम आवडले.
2 Aug 2019 - 11:24 am | mrcoolguynice
पहिल्या येळस सी सी डी त गेलो, तेव्हा बाजूच्याने ब्राऊन शुगर मागितल्यावर धक्का बसलेला....
आमच्या सारख्या साठी चित्रपट पाहून , ब्राऊन शुगर ची वेगळीच संकल्पना होती....
नंतर कळलं, रंगाने सावळ्या साखरेला हे म्हणतात
2 Aug 2019 - 11:33 am | अमर विश्वास
पहिल्यांदा सीसीडी त गेल्यावर एक्सप्रेसो कॉफी मागितली होती .. ;आम्हाला आमच्या दत्तूची (दुर्गा कॅफे) एक्सप्रेसो माहिती .. स्टीम मारून फेस आणलेली ..
इथे चक्क काळी कॉफी आली .. ती प्यायल्यावर जे काय डोके गरगरालय ,,, जाऊद्या ..
आतामात्र सीसीडी - बरिस्ता या सर्वांना चांगलाच सरावलोय
2 Aug 2019 - 4:20 pm | MipaPremiYogesh
हा हा..मला पण बरोब्बर हाच अनुभव आलेला..pride हॉटेल मध्ये. आम्ही आपला साखर मागवं, दूध मागवं..शेवटी कुठून आलेत हे लोक असा चेहरा करून देत होते मागितलेला..
बाकी दत्तू ची कॉफी कमाल असते..
2 Aug 2019 - 11:50 am | हस्तर
फेर्गुसून कॉलेज ला होतो
बहुतेक पुण्यातले पहिले ब्रांच तिथली
२५ रस ला कोल्ड कॉफी देत होते
तो मग बरेच दिवस जपून ठेवला
2 Aug 2019 - 11:51 am | हस्तर
मी पण वधू संशोधन साठी ccd मध्ये भेटायचो
ती मुलगी फिदा झाली पण तिचे वडील नाही म्हणाले
तिची मैत्रीण ccd मध्ये काम करायची ,जेव्हा पण एखादे कपल दिसायचे तिला आमची आठवण यायची
2 Aug 2019 - 11:53 am | रायनची आई
मस्त लिहिले आहे :)
2 Aug 2019 - 11:53 am | रायनची आई
मस्त लिहिले आहे :)
2 Aug 2019 - 2:09 pm | सस्नेह
खुसखुशीत !
सीसीडीतल्या कॉफी किंवा इतर कोणत्या पदार्थाला नाही, लेखनाला म्हटले आहे.
बाकी सीसीडीबद्दल बाडिस !
2 Aug 2019 - 2:11 pm | हस्तर
धन्यवाद
2 Aug 2019 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
सी सी डी किंवा स्टारबक्स किंवा इतर तद्सम ठिकाणे ही आपल्या कुटूंबियां सोबत जाण्याची नाहीत. लहान लेकरांना घेउन तर तिकडे अजिबातच जाउ नये असे माझे ठाम मत झाले आहे.
त्या ठिकाणी काही लोक कॉफी पिण्यासाठी जात नाहीत तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करायला मिळतात म्हणून येत असावे, अर्थात असले लोक्स सारसबाग, संभजी पार्क, पर्वती किंवा कोणत्याही सिनेमा थेट्रातही असतातच. काही दिवसांनी रस्त्यावरुनही बहूतेक डोळे बंद करुन चालावे लागेल असे वाटते आहे.
पैजारबुवा,
2 Aug 2019 - 2:54 pm | हस्तर
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे ?
फेरगुसून रोड कोरेगां पार्क किंवा पिंपळे सौदागर ला तरी असले काही दिसले नाही
2 Aug 2019 - 4:12 pm | माकडतोंड्या
सहमत आहे.
आयटी मधील टिनपाटांचे सिसीडी आवडीचे ठिकाण आहे
2 Aug 2019 - 4:21 pm | MipaPremiYogesh
काय सुंदर लेख लिहिला आहे..मी तर अजून एकदाही गेलेलो नाहीये :)..
2 Aug 2019 - 6:11 pm | ट्रम्प
चिनार भाऊ ,
मस्त लिहलय ! दिलखुलास हसलो .
2 Aug 2019 - 6:34 pm | जव्हेरगंज
झकास!!
2 Aug 2019 - 7:39 pm | जालिम लोशन
छान लेख.
2 Aug 2019 - 8:00 pm | चांदणे संदीप
आपल्याच गावचा मनुक्ष परगावी भेटल्यावर जो आनंद होतो तोच मला झाला. मस्त, येऊंद्या अजून!
Sandy
2 Aug 2019 - 8:26 pm | जॉनविक्क
पक्के मराठमोळे असण्याचे लक्षण आहे
2 Aug 2019 - 10:34 pm | सुमेरिअन
वधू संशोधन चालू असतांना मी एका मुलीला CCD मध्ये भेटलो होतो. कर्वे पुतळ्याजवळ. मेनू कार्ड ची थोडीशी तयारी केली होती. पण वेळेवर थोडी गडबड झाली आणि मी कॅप्युसिनो ऐवजी एस्प्रेसो कॉफी बोलावली. कॉफी छोट्याश्या कप मध्ये आली. एक घोट घेतला आणि झटका लागला... कॉफी अगदी कडू डक्क!! आता त्या पोरी समोर कसं दाखवणार.. थोडी थोडी करून संपवली आणि जड मनानी त्या कडू कॉफी चे पैसे पण भरले. (नंतर मुलीचा होकार आला. त्यामुळे अगदी सगळंच गमावलं असं नाही ;) ) तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं कि मी पुढे जाऊन कॉफी फॅन होईल आणि एस्प्रेसो सुद्धा पटापट आवडीने पिऊ शकेन.
अमेरिकेला आल्यावर कॉफी ची सवय लागली. पहिले ऑफिस मध्ये घरून चहा घेऊन जायचो. नंतर कॉफी मध्ये क्रीम, साखर टाकून अर्धा(मोठावाला) कप, नंतर फुल्ल कप आणि मग ब्लॅक कॉफी फुल्ल कॉफी आणि शेवटी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी अशी सवय लागली. आता घरी पण बरेचदा चहा ऐवजी ब्लॅक कॉफी च पितो. एस्प्रेसो च विशेष राहिलं नाही.
चिनारभाऊच्या लेखामुळे आठवणी ताज्या झाल्या :)
3 Aug 2019 - 9:56 am | सुबोध खरे
खुसखुशीत !
3 Aug 2019 - 11:23 am | पद्मावति
मस्तं खुसखुशीत :)
3 Aug 2019 - 2:28 pm | मदनबाण
"ऍक्चुअली..माझी ना आज चतुर्थी आहे. इथं उपासाचं काही मिळते का?"
हे वाचुन खालचा व्हिडियो आठवला ! विशेषतः ५: १८ पासुन ६:१६
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ साकी साकी... :- Batla House
3 Aug 2019 - 8:12 pm | Rajesh188
पैसे वाल्यांचा इगो ला आवाहन करून कमी दर्जाची वस्तू किती तरी पट जास्त किमतीत विकणे ही कला आहे .
.
पंचतारांकित हॉटेल ,बरिस्ता पासून ,पिझ्झा हट पर्यंत सर्व असेच धंदा करत आहेत .
आणि ते चुकीचं नाही
3 Aug 2019 - 10:56 pm | नाखु
पण मी काय म्हणते चिनार्या,
आपल्या कपा (ळा)वर कॉफी नसली तरी चहा नक्कीच असतो.
असं आमचे हे मला पहिल्यांदा चहाला घेऊन गेले तेव्हा म्हटले होते,आणि हो त्यावेळी "ये" व "ले" चहा असं काही नव्हते तर जिथे निवांत वेळेत फक्कड चहा पाजला तोच प्रेमाचा असायचा.
पुन्हा एकदा मि सा मा
19 Mar 2020 - 1:34 am | किल्लेदार
हा हा हा !!!