विळखा -२

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
26 Jul 2019 - 9:03 pm

विळखा -२
मी शेजारीच असलेल्या माझ्या बायकोच्या दवाखान्यात आईला घेऊन गेलो. बायकोला आईची ती मानेची गाठ दाखवली आणि पुढे तपासणी करायची आहे असे सांगितले. पाच मिनिटे बोलून आई परत घरी गेली. तेंव्हा मी बायकोला म्हणालो कि तिला आता तरी क्षयरोग असण्याची शक्यता बोलून दाखवले आहे पण मला तर हा कर्करोगच आहे याची १०० % खात्री आहे. उद्या सिटी स्कॅन मध्ये काय निघतंय ते पाहू. एवढे बोलून मी परत दवाखान्यात आलो. आपली [पुस्तके काढून पाहीली आणि मनात एक शंका होती कि हा तिसऱ्या तर्हेचा म्हणजे MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) पण असण्याची शक्यता आहे. कारण थायरॉईड "ग्रंथीतून निर्माण" झालेला म्हणजे DLBCL DIFFUSE LARGE B CELL LYMPHOMA ( हा रसग्रंथीचा कर्करोग) असण्याची शक्यता कमीच होती.

काही वेळाने परत वर आईकडे गेलो. तेथे वडिलांना हीच गोष्ट समजावून सांगितली. नंतर घरी गेलो. रात्री मी बराच वेळ जालावर काय शक्यता ते वाचत होतो. त्यात DLBCL -- DIFFUSE LARGE B CELL LYMPHOMA असण्याची शक्यता बरीच कमी होती. रात्री एक वाजता झोपलो. साधारण माझी झोप हि उत्तम आहे त्यामुळे मी रोज सात आणि साडे सात च्या मध्ये उठतो. पण आज सकाळी सहा वाजता जाग आली. सकाळी पण विचार करत होतो कि आता ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) असेल तर काय करायचे? आणि MTC असेल तर काय करायचे? शेवटी जे आहे त्याला सामोरे तर जायचेच आहे.

दुसऱ्या दिवशी मी दवाखान्यातील रुग्ण लवकर आटपून आईला घेऊन ठाण्याला सिटी स्कॅन मध्ये गेलो. तेथे स्कॅन साठी आईची तयारी करत होते तेंव्हा मी आईला म्हणालो कि यात कर्करोग असण्याची शक्यता आहे. आई म्हणाली, तेवढाच एक रोग पाहायचा राहिला आहे तो नसावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे आज संकष्टीचा दिवस आहे. चांगलंच निदान निघेल. मी काहीच बोललो नाही
पुढच्या तीन चार मिनिटात तिला स्कॅन मध्ये घेतलं. तिला मी समजावून सांगितलं कि स्कॅन कसा करतील इ इ. आणि सांगितलं कि काचेच्यापलीकडे मी आहेच.
स्कॅन सुरु झाला आणि जशा जशा प्रतिमा संगणकाच्या पडद्यावर उमटत गेल्या तसे तसे रोग कुठवर पसरला आहे ते समजत गेले. थायरॉईड ग्रंथीत मोठा गोळा आणि मानेत बऱ्यचशा गाठी होत्या. मेंदूतून परत येणारी रक्तवाहिनी (IJV) त्या गाठींमुळे बंद झाली होती. थायरॉईड ग्रंथीतील मोठा गोळा श्वासनलिका आणि अन्ननलिका यांच्या फटीमध्ये शिरला होता परंतु त्यावर दाब पडल्याचे दिसत नव्हते कि त्यामध्ये आत शिरल्याचे दिसत नव्हते. छातीत वरच्या बाजूला श्वास नलिकेच्या पुढे आणि बाजूला अशा दोन गाठी होत्या. सुदैवाने फुप्फुसात किंवा यकृतात कुठेही शिरकाव झालेला नव्हता. संपूर्ण पोटात काहीच नव्हते.

प्रतिमा पहिल्या तेंव्हा तेथे असलेल्या डॉक्टरांबरोबर चर्चा केली तेंव्हा हा DLBCL असण्याची शक्यता फारच कमी होती. पण आता प्रश्न होता कि ATC कि MTC?
आई बाहेर आली तेंव्हा तिच्या शेजारी बसवून मी तिला शांतपणे समजावून सांगितले कि हा कर्करोगच आहे आणि याची शल्यक्रियाच करायला लागेल.

एक फार मोठी गोष्ट म्हणजे आमची आई फार धीराची बाई आहे. तिने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली जे काही नाशिबात आहे. ते स्वीकार करूया. तू जे काही करशील त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी तिला म्हणालो कि खरं तर कालच मला खात्री होती कि हा कर्करोगचं आहे परंतु तुला रात्रभर झोप लागली नसती म्हणून मी क्षयरोगाचे खोटे निदान सांगितले.

तेंव्हा ती म्हणाली एकंदर जितक्या घाईने तू हे करतो आहेस ते पाहून मला शंका आलीच होती पण मी पण बोलले नाही. याला उपाय काय?

मी तिला म्हणालो याची शल्यक्रिया करावी लागेल. त्यावर ती म्हणाली कि काय असेल ते ऑपरेशन करायची माझी तयारी आहे पण ती केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी नको. त्याचा फार त्रास होतो. ती नाही लागली तर बरं आहे. मी तिला म्हणालो कि याचा निर्णय बायोप्सीनंतरच होईल परंतु आता तरी तुला केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी लागणार नाही असं वाटतंय.

मी सिटी स्कॅन च्या डॉक्टरांना विचारले कि येथेच बायोप्सी करता येईल का? त्यावर त्या म्हणाल्या कि आज ते बायॉप्सी करणारे डॉक्टर नाहीत तुम्ही मुलुंडच्या केंद्रात जा तेथे विचारून पहा. मी ठरवले जाऊद्या. आपणच बायोप्सी करूया. मग मी कर्करोगात काम केलेल्या मुलुंड मधील पॅथॉलॉजिस्टना फोन केला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि विचारले कि तुम्हाला FNAC ( सुईने गाठीतील पाणी काढून तपासणे) चालेल कि प्रत्यक्ष कोअर बायोप्सी लागेल त्यावर त्या म्हणाल्या कि सर FNAC नंतर त्यांना बायोप्सी लागेलच मग दोन वेळेस कशाला त्रास द्यायचा. मी ते मान्य केले. आईला घेऊन घरी आलो. वडिलांना पण सन्गितले कि हा कर्करोगच आहे आणि आता बायोप्सी करावी लागेल ती मी संध्याकाळी करेन. मी आपल्या घरी परत आलो. पत्नीला सिटी स्कॅन केंद्रातूनच फोन करून अहवालाबद्दल सांगितले होतेच.आमचे वडील आणि माझी पत्नी दोघेही फार हळवे आहेत. योगायोगाने दोघांचा जन्मदिवस एकच आहे.

त्याप्रमाणे संध्याकाळी मी आईला माझ्याच दवाखान्यात परत आणले. तिला समजावून सांगितलं कि हि बायोप्सी कशी करतात. मानेवरची त्वचा बधिर करून त्यातून बायोप्सीचि गन आतमध्ये सरकवून मी पाच वेळा ती गन फायर करून पाच बारीक शेवयांसारखे एक इंचाचे तुकडे काढले. होणारा रक्तस्त्राव थांबवला ते तुकडे फॉर्मॅलिन मध्ये टाकून पॅथॉलॉजिस्ट कडे पाठवले. आणि आईला घरी सोडायला गेलो. दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट त्यांनी तयार केला आणि मला व्हॉट्स ऍप वर पाठवला. त्यात हा थायरॉईड ग्रंथीचा कर्करोगच आहे हे सिद्ध झाला होतं. तो ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) असण्याची दाट शक्यता वर्तवली होती आणि DLBCL -- DIFFUSE LARGE B CELL LYMPHOMA नाही हेही सिद्ध झाला होतं. मी त्या पॅथॉलॉजिस्टना पुढच्या अद्ययावत चाचण्या (IMMUNOHISTOCHEMISTRY) करण्यास विनवले. ज्याचा रिपोर्ट अजून तीन दिवसानि येणार होता

दुर्दैवाने मला जी शक्यता वाटत होती तीच निघाली होती. आता पुढे काय करायचे याचा विचार चालू झाला. मी माझ्या डॉक्टर मित्रांना विविध पर्याय काय असु शकतील याबद्दल विचारणा केली. यात बरीच सगळी खाजगी रुग्णालये आणि टाटा यांचा पर्याय होता. आमच्या वडिलांचा टाटा वर जास्त विश्वास आहे शिवाय रोग मानेतून छातीत पण पसरला आहे तेंव्हा जेथे याची शल्यक्रिया "रोजच" होते अशा टाटा मेमोरियलचा पर्याय आम्हाला जास्त बरोबर वाटला. म्हणून मग टाटा रुग्णालयात माझा मित्र कामाला आहे त्याच्या कडे विचारणा केली तो म्हणाला कि डॉकटर प्रथमेश पै हे त्या विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा वार सोमवार आणि बुधवार असा आहे तेंव्हा तू सोमवारी सकाळी ७ वाजता येऊन तेथे आईचे कार्ड काढ. त्यानंतर मी डॉ प्रथमेश यांच्याशी बोलेन.

या अगोदर मी मुलुंड च्या फोर्टिस मधील डॉक्टर अनिल हेरूर यांची शनिवारी संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली होती. आईला तेथे घेऊन गेलो. तेथे त्यांच्याकडे तीस पस्तीस रुग्ण येऊन बसलेले होते. मी माझे कार्ड दिले तेंव्हा त्यांनी मला लगेच आत बोलावून घेतले. आईला तपासले. पॅथॉलॉजी आणि सिटी स्कॅन चा रिपोर्ट पाहिला. आणि आईला शांतपणे सांगितले कि याची शल्यक्रिया करावी लागेल. आणि हि शल्यक्रिया बरीच मोठी असेल.

यावर आमची आई त्यानं म्हणाली डॉक्टर हे सगळं करायची काय गरज आहे? मला काहीही वाटत नाही. माझा सगळं आयुष्य समाधानाने गेलं आहे. माझी मुलं उत्तम स्थिरस्थावर आहेत नातवंडं सुद्धा शिकून नोकरीला लागली आहेत एका नातीचं( भावाच्या मुलीचं) आताच लग्न सुद्धा झालं आहे.आता जगून काहीही खास मिळ्वण्यासारखं नाही. पण मी आईला स्पष्ट शब्दात म्हणालो कि तुला जगण्या सारखं काही राहिला नाही असा वाटतंय ते ठीक आहे. पण मला आई हवी आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.

यावर डॉक्टर हसले आम्ही त्यांना धन्यवाद देऊन बाहेर पडलो. त्यांनी आपल्या अमूल्य वेळेचे आणि आपल्या सल्ल्याचे पैसे सुद्धा घेण्यास नकार दिला.

मी आईला परत म्हणालो मला आई हवी आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मी ते करणार आहे.
क्रमश:

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

26 Jul 2019 - 9:26 pm | शेखरमोघे

डॉक्टर, नेहेमीप्रमाणेच लिहिलेले तर छान आहेच पण त्यावेळच्या तुमच्या मनातली (अनिवार्य) खळबळ चालू असतानाही त्यामुळे तुमच्या लिखाणातला सुसूत्रपणा कुठेच कमी झालेला नाही. आपल्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहोत ही प्रार्थना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2019 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

प्रचेतस's picture

27 Jul 2019 - 7:04 am | प्रचेतस

अगदी हेच म्हणतो.
त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात ह्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा.

नंदन's picture

27 Jul 2019 - 12:30 pm | नंदन

_/\_
असेच म्हणतो.

डॉक्टर, तुमच्या धैर्याला सलाम!!
सर्व काही सुखरूप होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना!!

नाखु's picture

26 Jul 2019 - 11:15 pm | नाखु

आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा

गवि's picture

27 Jul 2019 - 12:59 am | गवि

"स्थितप्रज्ञ" नावाची अत्यंत दुर्लभ अवस्था प्राप्त करू शकणारे लोकच कठीण प्रसंगी आधारस्तंभ बनू शकतात हे पटलं.

__/\__

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2019 - 7:45 am | प्रकाश घाटपांडे

अगदी हेच म्हणायला आलो होतो

ट्रेड मार्क's picture

27 Jul 2019 - 2:29 am | ट्रेड मार्क

डोकं बधिर झालं आहे... काळजी घ्या.

लई भारी's picture

27 Jul 2019 - 8:37 am | लई भारी

वरच्या सगळ्या प्रतिक्रियांसारखीच भावना आहे.
आपल्या आईच्या आणि आपल्या धैर्याला सलाम!

कंजूस's picture

27 Jul 2019 - 10:01 am | कंजूस

सध्या तरुणपिढी अमली पदार्थांच्या, इतर विळख्यात सापडली आहे हे सतत बातम्यांत दाखवत असतात तर त्यावरच लेख असणार ,सावकाश वाचू ठरवले पण आता उलगडा झाला.

कर्करोगाच्या विळख्यात कोणीही सापडू शकतो. डॉक्टर हा प्रथम माणूस असतो व त्याला रुग्णाच्या नात्याने आणि शास्त्राच्या अचूक माहितीने दुहेरी विळख्यात सापडावे लागते. या रोगाच्या बाबतीत सर्व दु:ख काळजीचे सुकाणू फक्त आणि फक्त रुग्णाच्या हातीच असते. इथे आईंचा कणखरपणा आणि परिस्थितीला धैर्याने सामना करण्याच्या वृत्तीने कुटुंबाला आधार मिळत आहे. ज्याला आधार द्यायला जावे तीच व्यक्ती खरोखर आधार देणाऱ्यांनाच मानसिक,भावनिक आधार देताना दिसते. जी गोष्ट साधुसंत कित्येक वर्षांत सांगू शकत नाहीत ती एक संसारी व्यक्ती बोलण्यातून,कृतीतून जगासमोर आदर्श पाठ ठेवते आहे.

कर्करोगाच्या विळख्यात कोणीही सापडू शकतो.
१०० % सत्य.
पण यातुन बाहेर पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत.
१) आपले राहणीमान जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण कसे असेल ते पाहणे आवश्यक आहे.( हा लेखाचा विषय नाहीये)
२) आरोग्यविमा असणे आवश्यक आहे. अन्यथा कर्करोगाचे उपचार फार महाग असू शकतात आणि केवळ उपचार परवडत नाहीत म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीही मदत करता येऊ नये ह्यासारखी हतबलता दुसरी नसेल.

संजय पाटिल's picture

27 Jul 2019 - 11:08 am | संजय पाटिल

डॉक्टर साहेब, आपण आईंची कळजी घ्यालच....
त्या लवकर बर्‍या होवोत हिच प्रार्थना!!

प्रमोद देर्देकर's picture

27 Jul 2019 - 1:21 pm | प्रमोद देर्देकर

आई लवकर बऱ्या व्हाव्यात ह्यासाठी खूप खूप सदिच्छा.