विसरून जाण्याजोग्या आठवणी

deepak.patel's picture
deepak.patel in जनातलं, मनातलं
25 Jul 2019 - 2:47 am

आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्‍याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्‍याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती. कोणी अगदी गडगंज श्रीमंत नव्हतं पण अगदी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागतो आहे अश्या अवस्थेतलीही नव्हती. असो.

प्राथमिक शाळेतली वर्ष बरी होती. हजेरी पुस्तकातल्या क्रमांकानुसार जी मुलं आसपास होती (कारण बसायची व्यवस्थाही तशीच असायची) त्यांच्याशी अगदी घट्ट गाढ मैत्रीही झाली. अर्थात ती सगळी जणं घराजवळ रहाणारी नव्हती. घराच्या आसपास दोन तीन ओळखीची कुटूंब होती. त्यातली मुलं माझ्याच शाळेत होती पण एकाच तुकडीत नव्हती. तरीही त्यांच्याबरोबर एकत्र शाळेत जाणं (कधी सायकलवरून, कधी बसने, कधी रिक्षाने) येणं चालायचं. कधी संध्याकाळी बाहेर खेळणं वगैरेही व्हायचं. आमच्या बिल्डींगमध्येही एकाच वयाची बरीच पोरं पोरी होती.

पाचवीच्या आसपास कुठेतरी काहीतरी बिनसायला लागलं. बरोबरच्या (शाळेतल्या तसचं शाळेत जाता येता बरोबर असणार्‍या) मुलांना मी बायकी वाटायला लागलो. त्यांच्यामते मला मित्रांपेक्शा मैत्रिणीच जास्त होत्या आणि शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही. म्हणजे मुलींशी बोलणं व्हायचं पण फत्क मैत्रिणीच होत्या किंवा फक्त मुलींमध्येच खेळणं व्हायचं असं नक्की नव्हतं. आजुबाजूला रहाणार्‍या किंवा वर्गातल्या मुली ह्या शिशुवर्गापासून ओळखीच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी मी काही आत्ता मैत्री केली होती असं नव्हतं. माझे काही मॅनरीझम्स / हावभाव / बोलण्याची पद्धत वगैरे बायकी होतं का? असेलही कदाचित पण मी करत असलेली कुठली अ‍ॅक्शन (शारिरीक हालचाल), कुठल्या पद्धतीचं बोलणं (म्हणजे कंटेट नाही तर लकब, बोलायचा हेल / टोन वगैरे) बायकी होतं हे मला अजूनही कळलं नाही किंवा कोणी सांगितलं नाही. घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचे. त्या शब्दांचा / वाक्यांचा अर्थ तेव्हा नीट समजला नाही पण पुढे जरा मोठं झाल्यावर अगदी नीट समजला आणि कोणी स्वतःच्या मुलाबद्दल असं कसं बोलू शकतं अस वाटलं. पण त्यांनी कधी बसून समजावलं वगैरे नाही. आई समजावून सांगायचा प्रयत्न करायची. आता ती म्हणते की तू त्यांच्या तेव्हाच्या ओरडण्याने सुधारलास पण मला त्यांची ती काही वाक्य कायमची विसरून जायचं आहे पण प्रयत्न करूनही विसरता येत नाही. (मी माझ्या मुलांना रागवतो पण रागवताना काय बोलतो आहे / कोणते शब्द वापरतो आहे ह्याकडे आता कटाक्षाने लक्ष्य ठेवतो)

शाळेमध्ये पुढे पुढे हे चिडवणं वाढायला लागलं. जो कोणी चिडवे, त्याच्यापासून मी लांब रहायला सुरूवात केली. तश्यातच माध्यमिक शाळेत दरवर्षी तुकडी बदलणं सुरू झालं. एकाअर्थी ते पथ्यावर पडलं कारण मग वर्गातली मुलं बदलायची पण अश्या चिडवाचिडवीमध्ये ज्ञानाची देवाण घेवाण ने चुकता केली जातेच आणि ती व्हायची. नव्याचे नऊ दिवस संपले की पुन्हा चिडवाचिडवी व्हायची. अर्थात त्या काळातही काही चांगले मित्र मिळाले. प्राथमिक शाळेतले ते घट्ट मित्र कधी चिडवायचे नाहीत पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा. ह्या सगळ्यात मी अगदी गरीब गाय होू असं काही नाही. जेव्हा मी रिसिविंग एंडला नसायचो, तेव्हा मी पण बुलिंग्मध्ये भाग घेतलाच. मुळात व्हायचं काय की शाळेत प्रत्येकाची एक सुपर पॉवर असते. त्या सुपरपॉवरच्या अधारे मुलं त्या त्या क्षेत्रात शाईन होतात म्हणजे कोणी गातं, कोणी चित्र काढतं, कोणी पहिला नंबर मिळवतं, कोणी खेळतं, कोणी अंगापिंडानं मजबूत असल्याने मॉनिटर वगैरे होतं. मी ह्यात कुठेच बसत नव्हतो. म्हणजे अभ्यासात बरा होतो पण पहिला वगैरे नव्हतो. खेळणं, गाणं, चित्र काढणं वगैरे जमायचं नाही. त्यामुळे चरायला स्वतःचं कुरण नव्हतं आणि सत्ता गाजवता यायची नाही. आमच्या इथे वर्गाचा मॉनिटर होण्यासाठी निवडणूक असायची! त्यात वर्गातले सगळे जणं इच्छुकांपैकी एका मुलाला आणि एका मुलीला मत द्यायचे. गंमत म्हणून बरेच जण उभे रहायचे. एकावर्षी मुलांपैकी मी आणि दोन तीन जणच उभे राहीले. बाकीचे मुलगे शाळेत नवीन असल्याने कोणाला ओळखत नव्हते, त्यामुळे बर्‍याच मुलींची मतं मला मिळाली आणि मी निवडून आलो ! हे म्हणजे राम नाईकांच्या विरूद्ध गोविंदा निवडून आल्यासारखं झालं आणि विशेषतः माझ्यासाठी आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असं काहीतरी झालं. तेव्हातर चर्चा इतक्या झाल्या की मला मुलींचा प्रतिनीधी नेमून मुलांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी अशी तक्रार करायाअ बेतही घाटत होता! शेवटी मीच जाऊन मला मॉनिटर व्हायचं नाही असं सांगितल पण शिक्षकांनी बरचं समजावलं. त्यानंतर मात्र मी चिडवाचिडवीचा बदला घेण्यासाठी मुद्दाम फळ्यावर डीफॉल्टर्सची, बोलणार्‍यांची नावं लिहिणं वगैरे प्रकार करायचो. त्यामुलांना नंतर शिक्षा व्हायची. ह्या सगळ्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडायची.

नंतर एकावर्षी आमच्या वर्गात बरोब्बर तीस मुलं आणि तीस मुली होत्या. तेव्हा कोणाच्यातरी डोक्यातून "आपल्या वर्गातली ३१वी मुलगी!" अशी एक कल्पना आली आणि मी कुठेही दिसलो (शाळा, क्लास, ग्राऊंड वगैरे) की मला ह्या नावाने हाक मारणं सुरू झालं. ह्यावेळी मात्र जरा जास्त झालं आणि मी पोट दुखतय, डोकं दुखतय वगैरे कारणं काढून शाळा, क्लासला जाणं टाळायला लागलो. आता मात्र आईला संशय आला आणि तीने माझ्या अपरोक्ष माहिती काढून काही जणांच्या आयांना फोन वगैरे करून तो प्रकार बंद केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या वर्गातली दोन अतिशय हुषार, समंजस, सुसंस्कृत वगैरे मुलं (ह्यातला एक सध्या मुंबईला सिए आहे, तर दुसरा बंगलोरला प्रशितयश डॉक्टर आहे!) ह्या प्रकारात आघाडीवर होती. त्यांनी मला आधी किंवा नंतर कधी त्रास दिला नाही. अजूनही कधीतरी ह्यांच्याशी बोलणं होतं पण तेव्हा ते इतक्या थराला जाऊन का वागले हे समजत नाही.

दरम्यान आम्ही घर बदलून दुसर्‍या परीसरात रहायला गेलो. नंतर शाळेतल्या मित्रांशी संबंध संपला आणि नंतर फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप येईपर्यंत कधी आलाही नाही. एका अर्थाने पाटी कोरी झाली. दरम्यान मी बराच "सुधारलो" होतो म्हणे. त्यामुळे कॉलेजमध्ये चिडवण्याचे काही प्रसंग आले नाहीत. अनेक अतिशय चांगले, जवळचे मित्र मैत्रिणी भेटले. मला शाळेत असताना जेव्हड्या मैत्रिणी होत्या तेव्हड्याच आजही आहेत पण आता घरच्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे बायकोलाही त्याचं काही वाटत नाही. तिला कधीच काही वाटलं नव्हतं.

पण टीनेजमध्ये झालेल्या ह्या प्रकारांचा मला इतका धसका बसला होता की पुढे गोष्टी समजायला लागल्यावर मी खरोखरच गे आहे की काय अश्या शंका यायच्या. "गर्ल्डफ्रेंड" म्हणवता येईल अश्या एका मैत्रिणीबरोबर लग्न ठरेल असं वाटत असताना काही कारणांनी ते फिसकटलं, मात्र नंतर अ‍ॅरेंज मॅरेजसाठी ठरवत असताना मला प्रचंड भिती आणि अपराधी वाटायचं की खरच आपल्यात काही प्रॉब्लेम असेल तर एका मुलीचं नुकसान होईल आणि शिवाय नाचक्की होईल ती वेगळीच असे काही विचार मनात यायचे.
पुढे लग्न होऊन सगळं नीट मार्गी लागल्यावर आणि पहिला मुलगा झाल्यावर अतिशय आनंद तर झालाच पण अगदी खरं सांगायचं तर "एका मोठा दडपणातून सुटलो" ही भावनाही मनात आली. त्यावेळी मी आवेगात "३१वी मुलगी" एपिसोडमधल्या मुलांना फेसबूकवर शोधून काढून इक इमेलही टाईप केली होती. पण मुलगा झाल्याच्या चांगल्या प्रसंगी अश्या कटू आठवणी नको म्हणून ती डिलीट करून टाकली होती.

आज हे लिहायचं कारण काय ? आजोबांच्या आजारपणात ते खूप जुनं काहीतरी सांगत बसायचे. त्यातल्या काही गोष्टी कोणालाही माहित नसायच्या. संदर्भ कळायचे नाहीत, ते काय सांगायचा प्रयत्न करत आहेत ते ही कळायचं नाही. शिवाय हेकेखोरपणा करायचे, ऐकायचे नाहीत. डॉक्टरांचं म्हणणं पडलं की आयुष्यभर त्यांनी काही गोष्टींबद्द्ल कधी मन मोकळं केलं नाही, गोष्टी स्वतःपाशी ठेवल्या आणि त्यामुळे आता त्या बाहेर येत आहेत. आम्ही बरेचदा येणार्‍या वृद्धापकाळाबद्दल बोलतो. काय होणार हे आपल्या हातात नसतच पण आत्ता करण्याजोगं काही आपण करू शकतो का (जसं की व्यायाम, डाएट, हेल्थ चेकअप इत्यादी) ह्याचा विचार करताना जाणवलं की काही गोष्टी कुठेतरी बोलून टाकाव्या जेणेकरून ते मनात साठून रहाणार नाही. हे सगळं इथे लिहिल्यावर लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील, काही जणं सिरीयसलीही घेतील. बरं वाटेल. मी सुरूवातीला लिहिलं तसं हे सगळं खरतर पूर्णपणे विसरून जाता आलं तर ते सगळ्यात चांगलं होईल !!

शिक्षणविचार

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

25 Jul 2019 - 3:57 am | वकील साहेब

मिपावर स्वागत.
पहिलाच लेख अत्यंत परखड, आणि प्रांजळपणे लिहिला आहे.
असेच लिहीत रहा.
पुलेशु

ट्रोलींग, टाईमपास तर होणार नाही चांगल्या लेखनावर. चांगलं लिहिलं आहे तुम्ही. अशा आठवणी आहेत हे स्वीकारून, त्यांच्याबद्दल अधिक वा सतत विचार ना करता पुढे जायचं. इथवर जसं मार्गी लागलं, त्याप्रमाणे पुढेही चांगलं होईल.

शुभेच्छा.

जालिम लोशन's picture

25 Jul 2019 - 9:24 am | जालिम लोशन

छान लेख.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2019 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2019 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार

खरं तर हा अनुभव नक्कीच विसरण्यासारखा नाही कारण तुम्ही जे काही घडलात ते यातुनच घडत गेलात.

शाळेत असताना मला देखील अशाच प्रकारच्या (म्हणजे मॉब ट्रोलिंगच्या) अनुभवातून जावे लागले होते, चिडवण्याचा विषय वेगळा होता इतकेच.

फक्त फरक इतकाच झाला की प्रत्येक गोष्ट मी माझ्या घरी आणि शिक्षकांना जाउन सांगायचो. शिक्षकांचा चमचा वगेरे पदव्या देखिल मला त्या काळी बहाल झाल्या होत्या. त्यातनं मग रोज शाळेत भांडणे मारामार्‍या एकमेकांची पुस्तके वह्या फाडणे इत्यादी प्रकार सुरु झाले. इतके की मधल्या सुट्टी मधे डबा खाताना मी पण माझे दप्तर जवळ घेउन बसायचो (अर्थात एकटाच)

अशातच एक मोठे गंभीर प्रकरण शाळेत घडले ज्या मधे माझे आई बाबा माझ्या पाठी ठाम पणे उभे राहिले आणि शिक्षकांनी देखील मी हा प्रकार त्यांच्या कानावर घालून त्यांना सावध केले होते हे मुख्याध्यपकांना सांगितले. बर्‍याच जणांवर शाळेने कारवाई केली. त्यातल्या काही जणांना शाळा देखिल सोडावी लागली.

या प्रकरणा नंतर मात्र मॉब ट्रोलींग अजिबात बंद झाले आणि उरलेली शालेय वर्षे सुरळीत पार पडली.

पैजारबुवा,

आंबट चिंच's picture

25 Jul 2019 - 9:46 am | आंबट चिंच

Tumachya dhaadasaala salaam.

सुबोध खरे's picture

25 Jul 2019 - 9:51 am | सुबोध खरे

लिहिलंत हे उत्तम केलंत.

मानसिक कचऱ्याचा निचरा होणं हि निरोगी मनाची पहिली पायरी आहे.

आता याच गोष्टींकडे त्रयस्थ दृष्टीने पहायाला सुरुवात करा काही दिवसांनी तुम्हाला पण त्याबद्दल काहीच वाटेनासे होईल.

बाकी आपल्याला बायकी म्हणून चिडवले गेले तसे जास्त उंच मुलाला लांबू जिराफ किंवा बुटक्या मुलाला टिंगू, दीड फूट असेही चिडवले जाते.

अत्यंत गोऱ्या मुलीला पांढरी पाल, सपाट छातीच्या मुलीला कॅरम बोर्ड, चपाती, लठ्ठ मुलीला ड्रम बरणी अशी विशेषणे सुद्धा लावली जात असतात

जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते.

जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात.

त्यामुळे हि गोष्ट अशा लोकांच्या वागण्यातील एक विसंगती म्हणून सोडून दयायचे असते म्हणजे आपले मन निर्मल आणि स्वच्छ राहते.

लोकांवरचा राग आपल्या मनात धरून ठेवला असता त्याचा त्रास आपल्यालाच होतो.

हे म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे. तिला ते समजतही नाही.

नंदन's picture

25 Jul 2019 - 1:48 pm | नंदन

जो कोणी समाजाच्या सरासरीच्या बाहेर( beyond standard deviation) असतो त्याला असेच वेगळे केले जाते.
जाणून बुजून किंवा अनवधानाने त्यात चांगली मुलं किंवा माणसं पण त्यात सहभागी होतात.

अगदी, अगदी. आमच्या वर्गात, उपनेत्र असणारी मुलं फारशी नव्हतीच. एखादा होता त्याला 'डबल बॅटरी, सिंगल पॉवर' किंवा ढापण्या म्हणूनच हाक मारली जाई. अलीकडे, लहान वयातच चश्मेबद्दूरप्रमाण लक्षणीय असल्यामुळे कुणी यावरनं कुणाला चिडवत असेलसं वाटत नाही.

प्रदीप's picture

25 Jul 2019 - 10:47 am | प्रदीप

आवडले. हे लिखाण नुसते प्रांजळच आहे असे नव्हे, तर अतिशय निर्वीषही आहे, हे विशेष.

हे लिहून आता मनाचा निचरा झाला असेल; तेव्हा आता पुढचे पहा. ह्या कटू आठवणी विसरून जा.

प्रचेतस's picture

25 Jul 2019 - 5:08 pm | प्रचेतस

+१

चिगो's picture

26 Jul 2019 - 3:41 pm | चिगो

+१..

हे लिहायला स्वतःत धाडस तर असावं लागतंच, पण वाचणार्‍यांवर विश्वास देखील असावा लागतो. तुम्ही प्रतिक्रीयांच्या बाबतीत साशंक आहात, हे साहजिकच आहे. पण मिपाकर ह्या लेखाचे किंवा तुमचे ट्रोलिंग करणार नाही, असं मला वाटतं.

श्वेता२४'s picture

25 Jul 2019 - 10:59 am | श्वेता२४

मिपावर अशा लिखाणाची कोणीही टर उडवणार नाही, हे नक्की. बहुतांशी शालेय जीवनात आपण एखाद्याला चिडवणे, एकटे पाडणे यातून समोरच्या व्यक्तीला किती त्रास व भावनिक कोंडमारा सहन करायला लावतोय याची पोच नसते. तुम्हाला शालेय जीवनात तुम्हाला चिडवणारे तुम्हाला आता भेटले तर कदाचित तुमची माफीही मागतील. त्यामुळे हे सर्व विसरुन जा. या सगळ्या भावनिक कोंडमाऱ्यातून तुम्ही सावरलात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर एखादा आयुष्यातून उठला असता. त्यामुळए तुम्ही आयुष्यातील एका मोठ्या कसोटीला खरे उतरलात यालिषयी अभिमानच बाळगा. आणि कटू आठवणी विसरुनच जा. असो. हा लेख लिहून तुमच्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीत ते चांगलंच झालं.

बाडिस.
लिहित रहा..

नाखु's picture

25 Jul 2019 - 11:39 am | नाखु

प्रांजळ आणि मनमोकळेपणाने अनुभवकथन.
मुलं घरी अगदी लहान सहान वाटणार्या गोष्टी सांगू शकतात म्हणजेच तूमचा मुलांवर आणि मुलांचा तुमच्यावर विश्वास ( हेच फार महत्त्वाचे) आहे

तुम्ही त्या पौगंडावस्थेतील हळुवार गोष्टींकडे तटस्थपणे बघू शकताय हेच फार मोठं काम आहे.

मला व्यक्तिशः शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने सातवी ते महाविद्यालयीन दुसर्या वर्षांपर्यंत घरापासून, आईपासून दूर रहावे लागले होते.
म्हणूनच मी मुलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात हळवा असावा असे कधी कधी वाटते.
मुलीच्या अगदी लहान सहान शंका माझ्या मगदूरानुसार उत्तर देतो
माहित नसेल तर चक्क माहिती नाही असे सुद्धा सांगतो.

पालकायनी नाखु

याला चांगलं का म्हणू ? तरी पण खूप आवडले हे नक्की.

संजय पाटिल's picture

25 Jul 2019 - 12:22 pm | संजय पाटिल

+१

चला, तुमच्या मनातला कटू आठवणींचा बोळा निघाला...पाणी वाहते झाले.
अशा आठवणी लिहिण्याचे धाडस केलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमच्या आयुष्यात आता जसं सगळं चांगलं चालू आहे, तसच यापुढेही होवो अशी शुभेच्छा!

पद्मावति's picture

25 Jul 2019 - 12:14 pm | पद्मावति

मनमोकळे लिखाण आवडले. लिहित रहा.

पाटीलबाबा's picture

25 Jul 2019 - 12:27 pm | पाटीलबाबा

प्रांजळ लेखन.आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2019 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर स्वागत आणि या सुंदर लेखासाठी अभिनंदन !

परखड, मनमोकळे लिखाण. जितक्या मनमोकळेप्णे लिहिले आहात तितक्याच मनमोकळेपणे जीवन जगत रहा. आपण जेवढी सूट देतो तेवढेच लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात. चेष्टेसंबंधात बर्‍याचदा दुर्लक्ष हा फार उपयोगी उपाय असतो. चेष्टेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही हे पाहिल्यावर ती करणार्‍याच्या उत्साहातील हवा निघून जाते आणि आपोआप चेष्टा बंद/कमी होते. मुख्य म्हणजे मनातील जळमटे काढून टाकल्यावर आताही तुम्हाला नक्कीच मन मोकळे झाल्यासारखे वाटले असेल.

आपला आनंद मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असतो... १०% आपल्या स्वतःचे विचार/कृती (जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो) आणि ९०% दुसर्‍यांच्या कृतींवर (जिच्यावर आपला ताबा असू शकत नाही) आपली प्रतिक्रिया (म्हंअजेच्ज, स्वतःचे विचार/कृती, जिच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो). ज्यांच्यावर आपला पूर्ण ताबा असू शकतो त्या स्वतःचे विचार/कृती यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास, ते आपल्याला सुखकारक असावे असे ठेवणे शक्य होऊ शकेल. आपले विचार इतक्या मनमोकळेपणे सार्वजनिक मुक्त संस्थळावर लिहणे ज्या व्यक्तीला जमले, तिला हे नक्कीच शक्य आहे.

इथले प्रतिसाद पाहून तुमच्या ध्यानात आले असेलच की, जितके लोक कुचेष्टा करतात, त्यापेक्षा जास्त लोक तुम्ही मन मोकळे केल्यावर तुमच्या बाजून उभे असतात... फक्त, असे लोक, कोणाच्या खाजगी जीवनावर आक्रमण होईल की काय विचाराने, बहुदा गप्प असतात, इतकेच.

समीरसूर's picture

25 Jul 2019 - 1:54 pm | समीरसूर

अतिशय हृदयस्पर्शी लेखन. प्रांजळ आणि मुद्देसूद.

लहानपणी किंवा नंतरदेखील चिडवणारे लोक्स असतातच. तुम्ही काहीही केले तरी लोक्स चिडवतात. असल्या लोकांना इतकं इग्नोअर मारायचं की ते बावचळले पाहिजेत. एकदा ते बावचळले की त्रास संपलाच म्हणून समजा.

तुमच्या लेखनकौशल्याचे कौतुक! लिहित रहा.

लहानपणी टोकाच्या चिडवण्याच्या वाईट अनुभवातून मीही गेलेलो आहे. साधारण ६-७ वी पासून सुरू झालेला हा प्रकार ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षापर्यंत चालू होता. त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि माणूस नकळत आपल्या स्वतःच्या कोषात जातो. यातून दोन टोकाच्या भूमिकाही संभवतात. एक म्हणजे आत्मविश्वास हरवून स्वतःच्या मेंदूच्याच कैदेत जाण्यासारखा प्रकार होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे समोर येणार्‍या परिस्थितीवर आणिक मुजोरपणे पाय रोवून त्यावर लाथ मारून पुढे जाण्याचा प्रकार. केवळ नशीब बलवत्तर म्हणून दुसरा मार्ग आपोआप निवडल्या गेला आणि वाचलो. कारण असं सर्व होऊ शकतं हेही खूप नंतर समजलं.
पण यातून कुणावर अवास्तव टिका करणं, कुणाला चिडत्र, त्रास देणं या वृत्ती मनातून निघून गेल्यात.. कदाचित त्याचे वाईट परिणाम कळाल्यामुळे असेल. शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. त्यामुळे जे झालं ते चांगलंच झालं असं माझ्या बाबतीत तरी म्हणायला मला काही हरकत नाही! :-)

पण अशा अनुभवांबद्दल स्वतःहून बोलून खूप मोकळेपणाचा अनुभव येतो हे मात्र अगदी खरं!

बाकी एवढ्या लहान वयात मुलं इतकी टोकाची का आणि कशी वागू शकतात यावर प्रकाश टाकू शकणारं एक पुस्तक आहे. जमल्यास वाचून बघावे, अनुभवातून गेल्यामुळे रिलेट चांगल्यानं करता येईल. Lord of the Flies by William Golding.

जॉनविक्क's picture

25 Jul 2019 - 5:25 pm | जॉनविक्क

Lord of the Flies

हॉरिबल आणि अफलातून.

अगदी बरोबर.. हॉरिबल आणि अफलातून!

जॉनविक्क's picture

25 Jul 2019 - 2:15 pm | जॉनविक्क

सर्वप्रथम मला टायटल खूपच आवडले, सुटसुटीत आणि नेमकं.
पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा.
:) जग असेच आहे, जो आपल्या बाजूने उभा राहून शष्प फरक पडत नाही असे वाटते त्याच्याबाजूने उभं रहायला कोणीच तयार नसते. अथवा ज्याच्या विरोधी सगळेच आहेत त्यालाही जवळ करणारे कमी असतात. लहानपणी आणि आभासी जगात हे जास्त प्रकर्षाने होते. यावर उपाय म्हणजे मुखवटा पांघरून जगणे, जे आपण नाही तसे वागणे, अथवा स्वतःच्या टॅलेंटच्या आउटपुटवर खात्री असेल तर बिनधास्त नडणे पण स्वतःच्या चांगुलपणावर सर्व परिस्थिती आपोआप बदलेल या भ्रमातून सर्वप्रथम बाहेर पडणे फार आवश्यक.

शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही.
यामध्ये नेहमी हा शब्द सोडला तर ते नक्कीच तथ्य सांगत होते. आणि तुम्ही मुलींच्या घोळक्यात असणे यात नेहमी असणे हे त्यांचे घुसडलेले तथ्य होते, बहुतेक त्यांना तुम्ही मुलींसोबतही तितकीच मैत्री ठेवता हे रुचले नसावे.

घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचे
हे महत्वाचे आहे, वडीलसुद्धा असे म्हणत असतील तर त्यात 100% तथ्य आहेच. भलेही त्यांची पध्दत चुकली असेल. तसेच बरेचदा लहान वयात लिंगभिन्नता प्रकर्षाने वेगळे ठरवणारी जाणीव असू शकते याचेही भान नसते त्यामुळे असे वागले जाणे तुमच्या आकलनातून अनैसर्गिक ठरुच शकत नाही पण ते घडत असावे, ज्याचे प्रतिबिंब इतरांच्या वागण्यातून आपणास अनुभवाला आले. मी हे मुद्दाम म्हणून लिहणे टाळत नाहीए जेणेकरून आपण दोन्ही बाजू समजून घ्याल आणि मनात उरलेली अनावश्यक कटुता विरघळण्यास मदत होईल.

इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.

जॉनविक्क's picture

25 Jul 2019 - 5:13 pm | जॉनविक्क

इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.
वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत.

आपण मोठे होत असताना आपले जे काही वागणे नैसर्गिकपणे झाले त्यामधे कोणताही दोष नाही त्यामुळे कोणाचा दोष हा मुद्दाही उपस्थित होत नाही आणि त्याबाबत फार विचारही करू नये(च)

योगी९००'s picture

25 Jul 2019 - 5:01 pm | योगी९००

एकदम परखड आणि प्रांजळपणे लिहीले आहे. लिखाण आवडले.

लहानवयात चिडवणार्‍या मुलांनाही तितकी समज नसते त्यामुळे आपल्या चिडवण्याने दुसर्‍याचे नुकसान होईल ही जाणीवही नसते. मी थोडाफार यातून गेलो आहे. मला लहानपणी जाड भिंगाचा चष्मा होता त्यामुळे बॅटरी, ढापण्या,सोडावॉटर अशी वाट्टेल ती नावे ऐकलीत. चष्मा काढला तर मला काहीच दिसायचे नाही त्यामुळे दर काही दिवसांनी कोणीतरी मला बेसावध असताना धरायचे आणि दुसरे कोणी चष्मा काढुन घ्यायचे. मग सगळे इकडे तिकडे पळतात आणि मी आंधळ्यासारखा त्यांच्या मागे..असा सिन असायचा. काही वेळा शिक्षकांकडे तक्रार केल्यावर पोरांचा मार पण खाल्ला होता आणि आणखी हा छळ सहन केला होता. एकदा तर रस्त्यात गाठून पोरांनी मारले होते (कोल्हापूरला हा प्रकार कॉमन आहे). एकदा एका कोणाच्या हातून चष्मा फुटला आणि माझ्या घरी कळले. माझ्या पालकांनी शाळेत येऊन मुलांना आणि शिक्षकांना योग्य शब्दात"समजवले" तेव्हा हा प्रकार बंद झाला. पण चेष्टा तर होतच राहीली.

आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही.

जव्हेरगंज's picture

25 Jul 2019 - 6:35 pm | जव्हेरगंज

लिखाण आवडले.

लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील

मुळीच नाही. इथले ट्रोलींग चे नियम मला समजलेत त्या प्रमाणे किंचीत वेगळे आहेत. ते तुमच्या वरील लिखाणाला मुळीच लागू होणार नाहीत. अर्थात इतक्या सगळ्या प्रतिसादानंतर ते तुमच्या लक्षात आले असेलच. उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा.

असो ! आताच्या युगात गे आणि लेस्बीयन देखील तितक्याच आत्मविश्वासाने वागत आहेत. तुम्हाला तर केवळ नसलेल्या गोष्टीचा गंड होता. तो काही कारणाने नाहिसा झाला ते चांगले झाले. पण तरीही अतिशय खाजगी गोष्टी अतिआत्म विश्वासाने जालावर लिहू नयेत ही भिती सार्थ आहे. कोण कसा गैरफायदा घेईल ते सांगता येत नाही.

पुढील वाटचालीस शुभेच्छा !

झेन's picture

25 Jul 2019 - 8:58 pm | झेन

ओघवत्या मराठीत सुरेख लिहिले आहे. प्रांजळपणे तुम्ही सर्व गोष्टी लिहील्या आहेत. याला धाडस पाहिजे.
फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका.

deepak.patel's picture

25 Jul 2019 - 9:33 pm | deepak.patel

प्रतिसाद लिहिणार्‍या सगळ्यांचे आभार. आधी कधी इथे लिहीलं नव्हतं. लिहून आता प्रतिसाद वाचून बरं वाटतं आहे.

<< फक्त एकच सुचवेन वडिलांबद्दल मनात ग्रज ठेवू नका, त्यांच्या वरही सामाजिक दबाव असेल आणि सामान्य माणूस अशा गोष्टी हाताळण्यासाठी प्रशिक्षीत नसतो. त्यातून तुमच्या आई म्हणतात तसा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल झाला असेल तर , मनातून काढून टाका. >> ह्याचाअ प्रयत्न करतो आहे. अगदी ग्रज नाहीये पण ते विसरून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मला खात्री आहे की त्यांना स्वतःला आता हे लक्षातही नसेल कारण ते त्या ओरडण्याच्या ओघात बोलत होत. :)

<< उलट तुम्ही आयडी वरुन गुजराती वाटता तरीही इतके उत्कृष्ट मराठी लिहिले आहे की मराठी माणसाने त्यावरुन बोध घ्यावा. >> जन्मापासून मुंबईत राहल्याने गुजरातीपणा नावापुरताच आहे.

<< वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. >> तुमचा मुद्दा समजला. गैरसमज झालेला नाही. तुमचे दोन्ही प्रतिसाद आवडले आणि पटले.

<< आता माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याला खूप चिडवतात मुलं...कसे समजावे त्याला हेच कळत नाही. >> माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या चिडवाचिडवीचा अनुभव आला तर मी एइकून न घेता तिथल्या तिहे उत्तर द्यायचं ट्रेनिंग देत असतो. ते प्रत्येकवेळीच शक्य नसतं पण जमेल तेव्हा प्रयत्न केलाच पाहीजे असं सांगतो.

<< शक्यतो कुणाचं मन न दुखवता वागण्याचा प्रयत्न आपोआप होत जातो. >> हे मी आता करतो आणि मुलांनाही सांगतो. पण मी लेखात लिहिलं तसं तेव्हा मी सुद्धा त्यात कदीकधी सामिल झालो होतो कारणही लिहिलं होतं. ह्याची आता खंत वाटते.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!!!

आनन्दा's picture

26 Jul 2019 - 7:54 am | आनन्दा

खंत कसली?

ओघवती भाषा, प्रांजळ लेखन आणि सुरेख शैली ़़़़़़़़़़़़़़़़़़ पुलेशु!!!

ओघवती भाषा, प्रांजळ लेखन आणि सुरेख शैली ़़़़़़़़़़़़़़़़़़ पुलेशु!!!

विजुभाऊ's picture

26 Jul 2019 - 7:15 am | विजुभाऊ

सरल लिखाण
छान आहे.

प्रांजळ लेख आणि प्रतिसाद चांगले आहेत.
सगळ्यांनी असेच आपले अनुभव मनमोकळेपणाने व्यक्त केले तर 'रम्य ते बालपण' वगैरे भ्रामक समजूती कमी होतील.

फारएन्ड's picture

26 Jul 2019 - 8:02 am | फारएन्ड

प्रांजळ लेखन आहे. मिपावर स्वागत.

सस्नेह's picture

26 Jul 2019 - 2:21 pm | सस्नेह

प्रांजळ आणि परखड लेखन.
मिपावर स्वागत आणि पुलेशु