क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे.
उणेपुरे १९ वे वर्षे चालू असलेल्या (जन्म ९ जानेवारी २०००) असलेली हिमा दास ही आसाममधील एका सामान्य शेतकर्याची मुलगी आहे. डाळ-भात असे सर्वसामान्य जेवण, कोणतीही न्युट्रिशन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स परवडणारी नव्हती. स्वस्तातले बूट वापरून ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करत असे. पण, प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झालेली तारांकित खेळाडू बनली आहे. प्रतिस्पर्धी कोणा आहे किंवा किती प्रसिद्ध आहे इकडे पूर्ण दुर्लक्ष करून, केवळ आपल्या धावण्यावर लक्ष केंद्रित करणे, ही तिची खासियत झाली आहे !
धावपटूंमध्ये हिमा "धिंग एक्सप्रेस आणि सुवर्णकन्या ('Dhing Express' and the 'Golden Girl')" या नावांनी ओळखली जाते.
या वर्षी जुलैमध्ये तिने जागतिक स्तरावरच्या धावण्याच्या स्पर्धांत एका पाठोपाठ एक सुवर्णपदके मिळविण्याचा सपाटा लावला आहे...
१. २ जुलै २०१९ : पोझ्नान अथ्लेटिक्स ग्रांप्री, पोलंड : २०० मी : सुवर्णपदक : २३.६५ सेकंद
२. ७ जुलै २०१९ : कुत्नो अथ्लेटिक्स मीट, पोलंड : २०० मी : सुवर्णपदक : २३.९७ सेकंद
३. १३ जुलै २०१९ : क्लान्डो अथ्लेटिक्स मीट, झेक रिपब्लिक : २०० मी : सुवर्णपदक : २३.४३ सेकंद
४. १७ जुलै २०१९ : ताबोर अथ्लेटिक्स मीट, झेक रिपब्लिक : २०० मी : सुवर्णपदक :
५. २० जुलै २०१९ : नोव्हे मेस्तो नाड मेसुजी ग्रांप्री, झेक रिपब्लिक : ४०० मी : सुवर्णपदक : ५२.०९ सेकंद
म्हणजे, केवळ १९ दिवसांत एकूण ५ आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुवर्णपदके !!!
याशिवाय, अजून एक, "भारतीय धावपटूने जागतिक स्तरावर मिळविलेले पहिले सुवर्णपदक" तिच्या नावावर आहे. गंमत म्हणजे ते सुद्धा तिने जुलै महिन्यातच पटकावलेले आहे !
६. १२ जुलै २०१८ : अंडर-२० चँपिअयनशिप, तांपेर, फिनलंड : ४०० मी : सुवर्णपदक : ५१.४६ सेकंद
सर्वात दु:खाची गोष्ट अशी की इतके जागतिक विक्रम नोंदविणार्या हिमाची फारशी दखल घ्यावी असे भारतीय माध्यमांना किंवा क्रिडारसिकांना वाटले नाही !
हिमाची या वर्षाची ४०० मीटरमधील कामगिरी खालील चलतचित्रामध्ये पाहता येईल...
आदिदासची ब्रँड अँबॅसॅडर
मात्र, अदिदास सारख्या जागतिक ख्यातीच्या आणि विशेषतः खेळ व व्यायामासाठी उत्तमोत्तम पादत्राणे बनवणार्या कंपनीने हिमाच्या या कामगिरीची दखल घेऊन तिच्याबरोबर करार केला आहे आणि तिच्या नावाची एक पादत्राणांची सिरींज बनवली आहे.
Adidas signs endorsement deal with athlete Hima Das
...
सुवर्णमनाची सुवर्णकन्या
ही सुवर्णकन्येचे मनही सोनेरी आहे. सद्या तिच्या मातृराज्य आसाममधील ३३ पैकी ३० जिल्हे महापुराने ग्रस्त आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधील आपल्या नोकरीच्या पगाराचा अर्धा भाग हिमाने 'मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधी (Chief Minister’s Relief Fund)'ला दान केला आहे. याशिवाय, इतरांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी आवाहनही केले आहे.
तळागाळातून वर येऊन, आपल्या असामान्य कामगिरीने भारताचे नाव जगात उज्ज्वल करणार्या, हिमासारख्या व्यक्तींना, त्यांचे योग्य स्थान द्यायला आपण भारतीय कधी शिकू बरे ?
***************
सर्व चित्रे जालावरून साभार
प्रतिक्रिया
21 Jul 2019 - 4:09 pm | कुमार१
हार्दिक अभिनंदन !
नुकतीच बातमी वाचली होती.
कौतुकास्पद कामगिरी.
21 Jul 2019 - 5:10 pm | यशोधरा
हिमाची कामगिरी अतिशय अभिनामास्पद आहे!
खूप कौतुक तिचे.
अगदी खरं आहे.
21 Jul 2019 - 5:10 pm | यशोधरा
अभिमानास्पद*
21 Jul 2019 - 6:13 pm | नाखु
विश्र्वचषक आणि त्याची उत्तरपूजा यातून माध्यमे अजूनही बाहेर आलेले नाहीत.आणि तसंही माध्यमं, विचारवंत आणि अभ्यासक ठरवतात लोकांनी काय, पहायचं, वाचायचं आणि समजायचं
त्यामुळे "बस टू मिनिट मॅगी नूडल्स" जमान्यात ही बातमी कुठल्याही माध्यमातून ठळकपणे दिसून आली नाही, चर्चा वगैरे वगैरे पुढील गोष्टी.
हिमा दासचे अभिनंदन.तिच्या सरावासाठी यथोचित मदत मिळावी म्हणून प्रार्थना करुया!
पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
21 Jul 2019 - 8:53 pm | Rajesh188
अभिनंदन
21 Jul 2019 - 10:09 pm | जॉनविक्क
कृतज्ञहि. _/\_
22 Jul 2019 - 12:15 am | मुक्त विहारि
धन्यवाद....
इच्छा शक्तीचे उत्तम उदाहरण...
22 Jul 2019 - 10:51 am | मार्गी
तिचे त्रिवार अभिनंदन!!! खूप मोठी उपलब्धी आहे.
22 Jul 2019 - 1:45 pm | चंद्र.शेखर
खरं आहे. हिमा दासचे त्रिवार अभिनंदन.
22 Jul 2019 - 4:34 pm | नि३सोलपुरकर
अभिनंदन आणि कामगिरी अतिशय अभिनामास्पद आहे.
कधी कधी वाटते कि ,ह्या वेळी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही हे एका दृष्टीने बरेच झाले .
23 Jul 2019 - 10:33 am | सुधीर कांदळकर
डॉक्टर साहेबबांना माहितीबद्दल धन्यवाद.
23 Jul 2019 - 10:49 am | लोकेश तमगीरे
हिमाची ही संघर्षपूर्ण कामगिरी अतिशय अभिनामास्पद आहे!