मंतरलेले दिवस – १

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 8:41 am

दुसर्‍या महायुद्धातली गोष्ट. लंडनवर जवळजवळ रोज बॉंबवर्षाव. अशा काळात शहरात ‘ब्लॅक आऊट’ पाळतात तसा लंडनमध्येही तेव्हा होता. रस्त्यावरचे दिवे बंद. प्रत्येक घराच्या प्रत्येक खिडकीला जाड पडदे. प्रकाशाचा कवडसा देखील बाहेर येता नये. रात्री शहर कुठे आहे हे बॉंबफेक्या विमानांतून नुसत्या डोळ्यांनी दिसू नये म्हणून घेतलेली दक्षता. नाईट व्हीजन गॉगल्स अजून आले नव्हते. असेच कडक ब्लॅक आऊटचे दिवस. एके सायंकाळी एका घरातून प्रकाशाची तिरीप बाहेर येत होती.

गस्त घालणारा एक पोलीस त्या घराचा दरवाजा अधीरतेने ठोठावतो. दार उघडणार्‍या व्यक्तीला पोलिसी खाक्याने दरडावत काळजी घेण्यास सांगतो. आतला दाढीवाला गृहस्थ त्याला शांतपणे धीरगंभीर आवाजात सांगतो की पडदा मी नीट करतोच, चुकीबद्दल माफ कर आणि पुढे विचारतो की आपला देश कशासाठी लढा देतो आहे?

पोलीस अधिकारी गंभीर विचारात पडतो पण हुशारीने उत्तर देतो.

आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी.

मग हे तरूण अधिकार्‍या, मीच तुझी संस्कृती आहे. जरा विनयाने बोल की माझ्याशी! माझं नाव आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. आणि तू पण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही अशा, जगावर राज्य करणार्‍या साम्राज्याचा रक्षक आहेस. त्या साम्राज्याचा मान उंचावणारी रुबाबदार भाषा बोल की. भाषेत रुबाबदार हुकूम असावा पण उद्धटपणा नसावा. लंडनमधला प्रत्येक माणूस जगावर राज्य करणार्‍या ब्रिटीश साम्राज्याचा सन्माननीय नागरिक आहे हे विसरू नकोस. उगाच मवाल्यासारखा खेकसू नकोस.

ही गोष्ट खरी की खोटी ठाऊक नाही पण आपला समाज, आपली संस्कृतीच आपल्याला घडवते आणि हीच आपली ओळख असते. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपलीकडे मानवाला भावनिक आणि वैचारिक भूक असते. मॅस्लोच्या पिरॅमिडचा विचार करा वा करू नका. जिव्हाळ्याचे बंध, कला, साहित्य, खेळ, करमणूक यातले ऐन उमेदीतले विविध अनुभव आपले आणि एकूण समाजाचेच भावजीवन समृद्ध करीत असतात. संगीत, नृत्य, खेळ वगैरे नसते आणि आपल्यासोबत हा आनंद लुटणारे आपले मित्रमैत्रिणी, आप्तसखे आणि सगेसोयरे नसते तर आयुष्य कसे नीरस झाले असते याची कल्पनाच करता येत नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणार्‍या या अनुभवांची समृद्धी हीच आपली संस्कृती आहे असे म्हणायला हरकत नाही.

या उन्हाळ्यात मी डोंगरमाथ्यावरच्या शेतावरील घरात जाऊन बसत होतो. डोंगरमाथा ओलांडून जाणारे समुद्री वारे उन्हाळा बराच सुसह्य करून गेले. कडक ऊन पडले की व्हरांड्यातून शेतघरात बसत होतो. तिथे एक आरामखुर्ची नेऊन ठेवली आहे. मुंबईची एक चांगली सवय म्हणजे दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन जाणे. तसा मी इथे पण डबा घेऊन जात होतो आणि सोबत चहापुरते दूध पण नेत होतो. दुपारी तीनचार तास आरामखुर्चीत बसून मस्त वाचन. मध्ये अखादी डुलकी. माझ्याकडे एक सोनीचा वॉकमन आहे. अजूनही नव्यासारखा आणि सुस्थितीत. कानाला शीर्षध्वनी अर्थात हेडफोन लावला की होम थिएटरमध्ये बसल्याचा स्पर्श होतो. अनेक आठवणी ताज्या होतात.

आठवणींच्या मोत्यांचा सर मोठा विलक्षण असतो. मोत्यांना रांगेत ठेवणारा काळाचा बंधच नसतो. मोती एकदा ओघळला की ओघळला. पकडू जावे तो मोत्यांची फुलपाखरे होतात. विविध रंग ल्यालेली. स्मृतीगंध लपेटून मनांत भावनांची उधळण करीत अपार आनंद देऊन जातात. बघता बघता मन तरल दवबिंदू होते, फुलपाखरांच्या मनोहर पंखांवर स्वार होते आणि गतस्मृतीत भिरभिरू लागते. इथे नेपथ्य असते कल्प-नेत्रांचे. अल्लाउद्दिनाचा राक्षस पण लाजावा अशा शीघ्रतेने हवे तसे हे नेपथ्य बदलत जाते.

तर असाच एकदा रेडिओ ऐकतांना. विविध भारती लागले होते. आता एफ एमवर विविध भारती पण लागते. संध्याकाळी ४ वाजता पिटारा नामक एक कार्यक्रम असतो. हा पिटारा म्हणजे जादुगाराची पोतडी आहे. पूर्वी होऊन गेलेल्या संस्मरणीय कार्यक्रमांची मंजुषा. त्या कार्यक्रमात कांही संस्मरणीय मुलाखती ऐकल्या. पण दोन मुलाखती माझा रथ हवेत नेणर्‍या होत्या. एक होती अमोल पालेकरची तर दुसरी नाना पाटेकरची. या दोन्ही मुलाखतींनी माझ्या आयुष्यातल्या मंतरलेल्या दिवसांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

मुंबईतल्या दादरमध्ये माझे बालपण गेले. (तसे ते साठी उलटली तरी अजूनही सरले नाही म्हणा!) दादरच्या सांस्कृतिक जीवनात काही अमूल्य गोष्टी लाभल्या. शिवाजी मंदीर मधली व्यावसायिक नाटके, छबिलदासमधली प्रायोगिक रंगभूमी, अमर हिंद मंडळातली वसंत व्याख्यानमाला आणि सार्वजनिक गणेशोत्सवातले अनेक आनंददायी कार्यक्रम आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिली.

तेव्हा ठरीव साच्यातल्या ‘लाल्या’चा प्रेक्षकांच्या ‘टाळ्यां’साठी केलेला भडक अभिनय मला काही फारसा आवडला नव्हता आणि मी नाटके पाहायचे सोडूनच दिले होते आणि ’अवध्य’ नावाचे एक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. मला वाटते खळबळजनक, वादग्रस्त ठरलेल्या सुरुवातीच्या काही नाटकांपैकी एक. गिधाडे, अवध्य, सखाराम बाईंडर, इ. नाटके तशी गाजली. पण ‘अवध्य’ चे नंतर फारसे प्रयोग झाले नसावेत. ‘अवध्य’ नाटक आले आणि ते पाहून काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांचे पित्त खवळले. त्यांनी एक परिसंवाद आयोजित केला. माझ्या आठवणीप्रमाणे शिवाजी पार्कातल्या स्काऊट ऍंड गाईड्स पॅव्हेलिअयनच्या सभागृहात. अवध्यचा नायक होता अमोल पालेकर आणि लेखक होते चि. त्र्यं. खानोलकर. फारशा अपेक्षा न ठेवता कंटाळा आला तर पलायनाच्या तयारीनेच मी या परिसंवादाला गेलो होतो.

संस्कृतीरक्षकांचे अर्ध्वयू होते ज्ञानेश्वर नाडकर्णी. आपल्या भाषणात त्यांनी नाटकाच्या संहिता, अभिनय इ. अनेक अंगांवर विध्वंसक हल्ला चढवला. व्यासपीठावरच्या अमोल पालेकरचा चेहरा पडला. असे काही घडेल अशी त्याला कल्पना नसावी. इतके दुष्ट, विध्वंसक भाषण मी आजपर्यंत ऐकलेले नाही. नाटकाचा नायक मध्यंतरानंतर दारू पितो. त्याला सुरुवातीपासून दारू प्यायला काय हरकत होती असा आचरट पण दुष्ट सवाल नाडकर्णींनी विचारला होता ते आता आठवते आहे. गंमत म्हणजे याच नाडकर्णींनी नंतर संस्कृतीरक्षकाची टोपी फिरवून तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरला पाठिंबा दर्शवला होता. असो.

माधव मनोहर हे दादर-शिवाजी पार्कमधले एक आदरणीय, वजनदार पण लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. आपल्या मध्यलयीतल्या धीरगंभीर आणि श्रोत्यांवर छाप पाडणार्‍या भाषणात त्यांनी नाडकर्ण्यांच्या एकेका मुद्द्याचा तार्किक समाचार घेत नाटकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि नाटक सर्व अंगांनी चांगलेच आहे, फक्त ते काही लोकांच्या पचनी पडले नाही असा अभिप्राय अतिशय संयत आणि सभ्य भाषेत दिला. त्यांनी अवध्य नाटकाचा ‘वयात आलेले मराठीतले पहिले नाटक’ असा गौरव देखील केला. काही संस्कृतीरक्षक प्रेक्षकातून पूर्वनियोजित घोषणा देऊ लागले. आणि माधव मनोहर, अमोल पालेकरच्या इ.च्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा दिसला. प्रेक्षकांत तरुणाई बहुसंख्येने होती. बहुसंख्य तरुणाईने नाटकाच्या बाजूने उत्स्फूर्त घोषणाबाजी सुरू केली आणि नाटकाविरोधाचे एक कुटील कटकारस्थान उधळले गेले. त्यानंतर काळात पालेकरांचे ‘आपलं बुवा असं आहे’ हे हलकेफुलके व्यावसायिक नाटक फारच लोकप्रिय झाले.

दरम्यान ‘मुंबईचे कावळे’ नावाचे नाटक छबिलदासमध्ये आले. बहुधा शफाअत खानचे. त्यापाठोपाठ विहंग नायक-नाना पाटेकरांचे ‘पाहिजे जातीचे’, लागूंचे ‘स्वामी’ अशी एकापेक्षा एक सरस आणि सकस, दर्जेदार नाटके छबिलदासमध्ये आली. काळ १९८०-८१चा. या नाटकांना नेपथ्य, प्रकाशयोजना, कधी असे, कधी नसे – बहुधा नसेच. प्रवेश शुल्क असे रु.५/- धूम्रपान वर्ज्य नसे. प्रेक्षकसंख्या कधी ५०, कधी १००-२००. नाटकाचा खर्च निघणे अशक्यच होते. पण पदरमोड करून दर्जेदार नाटके सादर करणार्‍या कलावंतांचा उत्साह अमाप असे. त्यांनी मराठी रंगभूमीला नवा विचार दिला, नवे मनमोहक रंग दिले. नाटक बरोबर ‘मुंबई टाईम’ वेळेवर सुरू होई. कोणाही थोरामोठ्यांना आमंत्रण नसे वा फुकटचे पासही दिलेले नसत. अमोल-चित्रा पालेकर, कमलाकर कुलकर्णी, इ. अनेक नामवंत तिकीट काढून नाटक पाहायला येत. बरेचदा हिंदी/गुजराती/बंगाली नाट्य/सिनेसृष्टीतले अनेक नामवंत तिकीट काढून येत. स्वामी नाटकात लालभडक प्रकाशाचा, स्पॉटलाईटचा उपयोग केलेला अंधुकसा आठवतो आहे. त्यातली लागूंची रुद्राक्षमंडित वेषभूषा पण वैशिष्ट्यपूर्ण होती. मला आठवते की तेव्हा डॉ. लागू नाटकाच्या ध्यासामुळे आपला व्यवस्थित चालू असलेला आफ्रिकेतला वैद्यकीय व्यवसाय सोडून नाटकात अभिनय करण्यासाठी भारतात आले.

मला आठवते की ‘पाहिजे जातीचे’ नाटकाचे मी तीन प्रयोग पाहिले होते. एकदा मित्रांबरोबर, एकदा आईला घेऊन बहिणीबरोबर आणि एकदा सौ. बरोबर. बहुधा तिन्ही वेळा प्रेक्षकात अमोल-चित्रा पालेकर होते. अमोल पालेकर आणि काही इतर धूम्रप्रेमी रसिक नाटक सुरू असतांना सिगरेट पेटवीत आणि धूम्रवलये सोडीत. (हे कौतुकाने नाही, केवळ एक आठवण म्हणून दिले आहे.) ‘आपलं बुवा असं आहे’ ने प्रचंड यश मिळवले होते आणि तरी त्याच्या डोक्यात ते कधी गेले नाही. हे अगोदर आले की नंतर हे आता आठवत नाही. क्रम चुकू शकतो. नंतर मानवतच्या सत्यघटनेवरचा ‘आक्रीत’ आला. तर ‘बनगरवाडी’ने अमोल पालेकरला यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर नेले.

‘पाहिजे जातीचे’ नाटकाचा नायक होता तरुणाईतला विहंग नायक. नाटकभर या डफ वाजवणार्‍या शाहीराचीच प्रभा पसरलेली असे. बोकड दाढीवाल्या उंच्यापुर्‍या, सडपातळ ‘नाना’चा बबन्या काही खास वाटला नाही तरी फिकाही वाटला नाही. या सुरवंटाचे फुलपाखरू कधी झाले आणि त्याने इतिहास कधी घडवला हे कळलेच नाही. नानाला रंगमंचावर मी फारसे पाहिले नाही. पण त्याला रुपेरी पडद्यावर पाहणे हा एक सोहळाच. वैशिष्ट्यपूर्ण, परिणामकारक धारदार आवाज आणि संवादाची फेक ही नानाची बलस्थाने मानली जात. पण ‘खामोषी’ने नाना त्याहीपलीकडचा नाना दाखवला.

‘जुलूस’वरच्या एका परिसंवादात कमलाकर कुलकर्णींचे छान भाषण झाले होते.

मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीत प्रथम आठवली ती नवोदित कलावंतांनी सादर केलेल्या आणि रसिकांना नवा विचार आणि अपार आनंद देणार्‍या सर्जनशील अशा नाटकांना तेव्हा अस्तित्त्वात नसलेले व्यासपीठ देणार्‍या छबिलदास रंगभूमी. आता मात्र विविध एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा, एनसीपीए, इ. पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

सखाराम बाईंडर हे नव्या, वेगळ्या प्रकृतीचे नाटक व्यवसायिक रंगमंचावर आणायला कमलाकर सारंगांसारख्या नवोदित दिग्दर्शकाला देण्याचे तेंडुलकरांनी आणि कमलाकर सारंगांनी ते व्यावसायिक रंगमंचावर आणण्याचे अपूर्व धाडस केले. समकालीन प्रथितयश नाट्यव्यावसायिक, प्रथितयश साहित्यिक, नाटककार, संपादक आणि पत्रकार, राजकीय नेते, विविध संस्कृतीरक्षक, बिलंदर नोकरशाही इ. विविध स्तरातून या नाटकाला गाडण्याचे, संपवण्याचे प्रयत्न झाले. मराठी रंगभूमीच्या सभागृहांनी आकसाने नकारघंटा वाजवल्यावर गुजराती रंगभूमीने सारंगांना मंचाधार दिला. आश्चर्य म्हणजे प्रथितयश वकिलांनी सारंगांना असामान्य वकिली सल्ले अणि सेवा विनामूल्य दिली आणि न्यायालयाने न्याय देखील त्वरित आणि तत्परतेने दिला. माधव मनोहरांनी ‘मराठीतले पहिले प्रौढ नाटक’ म्हणून गौरवलेल्या या नाटकाच्या लढ्यासाठी डॉ. लागू, (आमच्या रुपारेलचे)प्रा. राम कापसे, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक प्रभृतींनी सारंगांना योग्य वेळी मोलाचा आधार दिला. मराठी रंगभूमीवरील आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मोकळ्या वातावरणाचे बरेचसे श्रेय सारंगांनी दिलेल्या सर्व आघाड्यांवरील, मुख्यत्वेकरून कायदेशीर आणि मुत्सद्देगिरीच्या आघाडीवरील थरारक आणि तेजस्वी लढ्याला जाते. या खटल्यामुळे प्रतिगामी ढुढ्ढाचार्यांचे नतद्रष्ट सेन्सॉर बोर्ड रद्द झाले आणि मराठी रंगभूमी मोठ्या जाचातून मुक्त झाली. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या सेन्सॉर बोर्डात काही सदस्य प्रामाणिक, प्रागतिक आणि आकस न ठेवणारे होते पण ते नेहमीच अल्पमतात जात.

असे म्हटले गेले की घाशीराम कोतवाल या नाटकामुळे समाजातील बराच मोठा भाग तेंडुलकरांच्या विरोधात गेला आणि तेंडुलकर विरोधाची मोठी झळ सखारामला लागली. परंतु आपल्याला न आवडलेल्या वादग्रस्त कलाकृतीकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे आणि कलाकृतीच्या आस्वादात कसे रमावे याचा वस्तुपाठच माधव मनोहर, डॉ. लागू, बाळासाहेब ठाकरे प्रभृतींनी समाजाला दिला हे खरेच. चलाख सारंगांनी बाळासाहेब हे एक थोर कलावंत – व्यंगचित्रकार आहेत हे जाणून एका आपल्या जीव ओतून गेलेल्या एका चांगल्या कलाकृतीचा बळी घेतला जातांना एखाद्या कलावंताला पाहावे लागले तर तर कसे वाटेल याची कल्पना करून पाहा असे त्यांना सांगून मदतीचे आवाहन केले. खटल्यातील न्यायाधीशांना निर्णय देण्यापूर्वी नाटक विना काटछाट पाहायचे होते. सारंगानी यासाठी आयोजित केलेल्या खाजगी प्रयोगाला बाळासाहेब इ. नेत्यांना आणि काही समाजधुरीणांना देखील आमंत्रित करण्याची चतुराई दाखवली. या नाटकाविरुद्धच्या निदर्शनांत मीनाताई ठाकरे सहभागी होत्या असा अहवाल पोलीसात होता. तरीही बाळासाहेबांमधील कलावंताने राजकारणी बाळासाहेबांवर मात केली हे चांगलेच झाले. न्यायाधीशांसाठी तथाकथित आक्षेपार्ह भाग न कापता झालेले नाटक पाहून झाल्यावर ‘यात दाखवू नये असे आहे तरी काय?’ असा सवाल त्यांनी केला. भावनेवर विचाराने विजय मिळवला तर न आवडलेल्या कलाकृतीच्या अनुभवातूनही मोठा आनंद मिळतो हे समाजाला कळले. मी नोकरी करीत असलेल्या कंपनीतील एक संचालक मला ‘डोन्ट अलाव यॉर हार्ट रूऽऽल यॉर हेड’ असे बरेचदा सांगत. हे किती खरे आहे; नाही?

नंतर काही वर्षांनी कळले की हे नाटक डॉ. लागूंना हवे होते. परंतु तेंडुलकरांनी सारंगांना शब्द दिल्यानंतर ते लागूंनी मागितले आणि तेंडुलकरांनी आपला शब्द फिरवला नाही. तुम्ही त्यात काम केले तर सारंगाना बहुधा आवडेल असे तेंडुलकरांनी सांगितले. परंतु प्रथितयश लागूंना नवख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचे नसावे किंवा त्यांना ते स्वतःच दिग्दर्शित करायचे असावे.

सत्यदेव दुबे, विजया मेहता इ. ची नावे घेतल्याविना रंगभूमीचा उल्लेखच होऊ शकत नाही. गिधाडे, चिरेबंदी वाडा अशी मोजकी पण दर्जे दार नाटके यांनी दिली. विजयाताईंना चित्रवाणीवर बोलतांना पाहिले की वाटते त्या अतिशय नेमके बोलतात आणि जेवढे शब्द वापरतात त्यापेक्षा अनेक पटीने व्यक्त करतात. क्रिकेट समालोचक ऍलन विल्कीन्सच्या भाषेत सांगायच झाले तर एक्स्प्रेशन्स परसॉनिफाईड असे विजयाबाईंचे वर्णन करता येईल.

रेडिओवरच्या दोन्ही मुलाखतीत यातले काही नव्हते. पण त्यांनी मला स्मृतींच्या कालयानातून स्वनातीत वेगाने मस्त सफर घडवली. असो. वसंत व्याख्यानमालेच्या आठवणी देखील रम्य आहेत. मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीतले आणखी खोल ठसे आहेत ते वसंत व्याख्यानमालेचे, सार्वजनिक गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचे आणि इतर विविध कार्यक्रमांचे. त्यासंबंधी काही पुढील लेखांकात.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

16 Jul 2019 - 10:31 am | जयंत कुलकर्णी

मस्तच !

यशोधरा's picture

16 Jul 2019 - 10:32 am | यशोधरा

सुरेख!

फार सुंदर प्रवास, आठवणींच्या गल्ल्यांतून.. डाऊन द मेमरीलेन.

पुभाप्र.

कंजूस's picture

16 Jul 2019 - 11:25 am | कंजूस

छान।

मुक्त विहारि's picture

16 Jul 2019 - 12:31 pm | मुक्त विहारि

छान लिहिलंय

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2019 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

आठवणींचा प्रवास सुंदर शैलीत शब्दबद्ध केला आहे ! वाचता वाचता तुमच्याबरोबर आम्हीही भूतकाळात छोटीशी भरारी मारून आलो !

लिहीत रहा. वाचायला आवडेल. पुलेप्र.

गौतमी's picture

16 Jul 2019 - 1:24 pm | गौतमी

सुंदर.

प्रमोद देर्देकर's picture

16 Jul 2019 - 1:35 pm | प्रमोद देर्देकर

सुंदर आठवणी !
येवू द्या अजून.

तत्कालीन कालखंडाचा सुरेख वेध तुमच्या आठवणींमुळे घेतला गेला आहे.
लिहित राहा.

सर टोबी's picture

16 Jul 2019 - 2:25 pm | सर टोबी

कमलाकर सारंग यांचे 'बाइंडरचे दिवस' या शीर्षकाचे बहुदा आत्मचरित्र आहे. त्यात न्यायाधीशांकडून नाटकाचे कसे परीक्षण झाले याचे वर्णन आहे. सारंग यांनी रंगमंचाच्या एका बाजूला एक दिवा लावला होता. सेन्सार बोर्डाने आक्षेप घेतलेला प्रसंग सुरु झाला कि तो दिवा लावला जात असे आणि तो प्रसंग संपल्यावर दिवा विझवला जात असे. काही वेळाने न्यायाधीश महोदयांनी त्या दिव्याची उघडझाप करून लक्ष विचलित करू नका असे सारंग यांना सांगितले.

मी एका लहान शहरातून पुण्यात १९८३ मध्ये राहायला आलो. त्या अगोदर पुलं, गदिमा यांच्या ज्या आठवणी असायच्या - रात्रभर गप्पांचे फड, गाण्याच्या मैफिली - तसे काही शिल्लक राहिले नव्हते. वसंतरावांनी कट्यारचे प्रयोग थांबविले होते, पुलं, कुसुमाग्रज फक्त संमेलनासारख्या ठिकाणी दिसायचे. साधारण मार्च एप्रिलच्या दरम्यान होणाऱ्या मॅजेस्टिक गप्पा चालू होत्या परंतु परीक्षेच्या काळात विद्यापीठातून गावात येणं शक्य झाले नाही. नाही म्हणायला सई परांजपे यांची दोन नाटकं आणि श्रीकांत मोघे यांचे 'अशी पाखरे येति' एवढीच त्या काळाची छोटीशी शिदोरी हाती लागली. मुंबईत मात्र १९९० ला शिवाजी मंदिरला मच्छिन्द्र कांबळी यांचे वस्त्रहरण पाहण्याचा योग आला.

आताच्या काळात कलाकार, नाटककार यांना इतक्या प्रकारची ब्रिगेडी संस्कृतीची बंधने आहेत कि त्या दिवसांना नुसते मंतरलेले नाही तर स्वप्नवत दिवस म्हणावे लागेल.

आताच्या काळात कलाकार, नाटककार यांना इतक्या प्रकारची ब्रिगेडी संस्कृतीची बंधने आहेत कि त्या दिवसांना नुसते मंतरलेले नाही तर स्वप्नवत दिवस म्हणावे लागेल.

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 11:14 am | डॉ सुहास म्हात्रे

आताच्या काळात कलाकार, नाटककार यांना इतक्या प्रकारची ब्रिगेडी संस्कृतीची बंधने आहेत कि त्या दिवसांना नुसते मंतरलेले नाही तर स्वप्नवत दिवस म्हणावे लागेल.

हे असे विरोध दर कालखंडात झाले आहेत आणि होत राहतील... कारण मनुष्य स्वभाव.

सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, इत्यादी नाटकांचा इतिहास पाहिला तर रंगमंचाइतकेच (किंबहुना किंचीत जास्तच) नाटक थिएटरच्या बाहेर झालेले दिसेल. :)

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 3:00 pm | जालिम लोशन

सुदंर

कुमार१'s picture

16 Jul 2019 - 3:19 pm | कुमार१

आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणार्‍या या अनुभवांची समृद्धी हीच आपली संस्कृती आहे असे म्हणायला हरकत नाही.

हे खूप छान !
तुमच्याबरोबर आम्हालाही मंतरुन टाका !
पु भा प्र

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 3:26 pm | जॉनविक्क

आनंदाने.

हे दोघेही पंढरपूरचे आणि बहुदा शाळा सोबती होते. साधारण १९९१ च्या शेवटी किंवा १९९२ च्या सुरुवातीला कधीतरी हुसेन यांचे प्रदर्शन जहांगीरमध्ये लागणार होते. नाडकर्णींनी अगदी भावुक होऊन त्या प्रदर्शनाची आपल्याला खूप उत्सुकता आहे अशी हवा तयार केली. टाइम्स, मिड डे, आफ्टरनून वगैरेंनींदेखील अशीच हवा तयार केली. आणि शेवटी एकदाचे ते प्रदर्शन सुरु झाले. 'श्वेतांबरा: ऍबुंडन्स ऑफ व्हाईट' अशा काहीतरी नावाचे ते प्रदर्शन होते. पहिल्या दिवशी दणकून उड्या पडल्या. पण नंतर कानोकानी बातमी पसरायला लागली 'हुसेनने नुसतीच वर्मनपत्रांची रद्दी दालनात पसरवून ठेवली आहे.' तरी देखील काहीजण अविश्वासाने तो प्रकार पाहायला गेले. शेवटी पुष्कळ टीका झाल्यानंतर गॅलरीच्या प्रशासनाने ते प्रदर्शन आटोपते घेतले.

असाच प्रकार टाइम्सच्या १५० वर्षपूर्तीच्या सोहळ्याचा झाला. सहा अंकांची 'कल्लेक्टर'स इशूस' अशी मालिका आणि व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनवर नामवंत कलाकारांच्या भव्य पेंटिंग्सचे प्रदर्शन असा एकूण मामला होता. कलेक्टर'स इशूस आणि पेंटिंग्स इतके निरस होते कि ती मालिका त्यांना अर्धवट गुंडाळावी लागली.

वरती सरांनी विजया बाईंबद्दल म्हटले आहे कि त्या नेमके बोलतात. परंतु त्या परखडपण बोलतात. नटसम्राट बद्दल बोलताना त्या म्हणाल्या कि असे लंबे चवडे संवाद कोणी आयुष्यात प्रत्यक्ष बोलतो का?

कलेच्या क्षेत्रात थोर माणसांकडून नेहमी चांगले तेच निर्माण होते असे नाही हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद.

झेन's picture

16 Jul 2019 - 7:11 pm | झेन

काय सुरेख आणि ओघवत्या शैलीत लिहिलं आहे. तुमचं बोट धरून मस्त फिरून आलो.

सुधीर कांदळकर's picture

16 Jul 2019 - 8:47 pm | सुधीर कांदळकर

जयंतराव, यशोताई, गवि, कंजूस, मुवि, डॉ. म्हात्रे, गौतमी, प्रमोदजी, प्रचेतस: अनेक अनेक धन्यवाद.

@सर टोबी: बाइंडरचे दिवस काही महिन्यापूर्वीच वाचल्यामुळे बरेच संदर्भ मिळाले. त्यात त्या दिव्याचा आपण उल्लेख केलेली माहिती आहे. सुदैवाने आमच्या दादरच्या घरापासून जवळच शिवाजी मंदीर आहे. त्यामुळे कधीतरी नाटकांचे जाहिरातींचे फलक पाहणे होत असे.

घराशेजारीच कुकडे हाऊस होते. गोपीनाथ कुकडे इथे राहायचा. त्याच्या मोठ्या भगिनी नाटकात काम करीत. त्यांच्या घरी नाटकाच्या तालमी चालत आणि रमेश देव, सीमा, इ साली. अनेक लहानथोर अभिनेते तिथे तालमीसाठी येत. पाटीलवाडीत आम्ही पूर्वी अंडरहॅन्ड क्रिकेट खेळत असू. नंतर ८० -८५ साली तिथे पत्र्याची शेड बांधली गेली. या शेडमध्ये एकनाथ पेन्टर यांचा सिनेमाची, जाहिरातींची पोस्टर्स बनवायचा कारखाना आला. शाळकरी गोपी कुकडे ते तासन तास पाहात असे. असाधारण कलावंत असलेला गोपीनाथ नंतर हौस म्हणून पेन्टींग पण करी. अर्थात फुकटच. त्याचे काम एकनाथपेक्षा सरस आहे असे माझ्या एका मित्राचे बाळ्या नाईकचे मत होते. हाच तो नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड ही शिंगवाल्या राक्षसाची ओनिडाची जाहिरात बनवणारा गोपीनाथ कुकडे.

‘बापाचा बाप’ म्हणून एक विनोदी मालवणी नाटकाची कॅसेट पण आली होती. ‘माझो शब्द म्हनजे बानातून सुटलेलां धनुश्य.’अजूनही त्यातला हा डायलोग आम्ही वापरतो.

@सर टोबी आणि यशोताई:

आताच्या काळात कलाकार, नाटककार यांना इतक्या प्रकारची ब्रिगेडी संस्कृतीची बंधने आहेत कि त्या दिवसांना नुसते मंतरलेले नाही तर स्वप्नवत दिवस म्हणावे लागेल.

बापरे माहितीच नव्हते. मला वाटले होते सारे आलबेल अहे.

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 9:41 pm | जॉनविक्क

ग. दि. माडगूळकर यांच्या 'मंतरलेले दिवस' मधील एक प्रकरण आम्हाला शालेय पाठयपुस्तकात होते... सुरुवातीला त्याची आठवण झाली.

सुधीर कांदळकर's picture

17 Jul 2019 - 6:22 am | सुधीर कांदळकर

झेन आणि जॉनविक्क अनेक, अनेक धन्यवाद.

जहांगीर आर्ट गॅलरी आणि म्यूझियम इथे गेले की पायच निघत नाही.ब्पेडर रोडजवळ अणखी एक आर्ट गॅलरी आहे. तिथेही प्रदर्शने भरतात. तिथला जमिनीचा इटालियन मार्बल इतका दुधाळ, सुरेख आहे की पाय न ठेवता चालावे असे वाटते. प्रदर्शने पण छान असतात.

गदिमांचे मंतरलेले दिवस नावाचे पुस्तक आहे हे ठाऊकच नव्हते. नाहीतर मी वेगळे नाव दिले असते.

गदिमांचे मंतरलेले दिवस नावाचे पुस्तक आहे हे ठाऊकच नव्हते. नाहीतर मी वेगळे नाव दिले असते.

नक्कीच याची गरज नाही. गदिमांनी प्रत्येकाच्याच नॉस्टॅल्जीआला इतका सुरेख शब्दप्रयोग बहाल केला आहे की तो वापरला न जाणे अथवा असे दिवस प्रत्यक्ष जगताना त्यातील प्रत्येक अक्षराची अनुभूती न येणे अशक्य आणि अतर्क्य गोष्ट ठरते :)

अनिंद्य's picture

17 Jul 2019 - 11:14 am | अनिंद्य

पेडर रोड?

चॅप्लिन भवन म्हणताय का ? की नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाची आधीची गॅलरी ?

.......तिथला जमिनीचा इटालियन मार्बल इतका दुधाळ, सुरेख आहे की पाय न ठेवता चालावे असे वाटते....

असे NGMA च्या पायऱ्यांवर पण होते !

छान छान आठवणींना उजाळा देणारी ओघवती लेखनशैली आवडली.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!

अनिंद्य's picture

17 Jul 2019 - 11:06 am | अनिंद्य

@ सुधीर कांदळकर,

लेख वाचून अगदी 'अहाहा' झाले.

तुम्ही पाहिले - अनुभवले, तुम्हाला सर्व जसेच्या तसे आठवते आणि असे सुंदर शब्दबद्धही करता येते ह्या तीनही पायऱ्या तुम्ही भाग्यवान असल्याचे लक्षण आहे :-)

पुढील भागांची वाट पाहीन,

अनिंद्य

स्मिता दत्ता's picture

17 Jul 2019 - 11:30 am | स्मिता दत्ता

मराठी रंगभूमीचा मोठ्ठा पट मांडला आहे. खूपच सुन्दर ..... !!!

सुधीर कांदळकर's picture

17 Jul 2019 - 2:25 pm | सुधीर कांदळकर

अनिंद्य, टर्मिनेटर आणि स्मिताजी अनेक, अनेक धन्यवाद.

@अनिंद्यजी: आता नीट आठवत नाही पण ही एक खाजगी आर्ट गॅलरी आहे. दोनतीनदाच गेलो होतो. चित्रकार आपल्या चित्रांची विक्रीसाठी प्रदर्शने भरवतात. पण तिथे गेल्यावर बरोबर शोधून काढीन.

चौकटराजा's picture

20 Jul 2019 - 9:17 am | चौकटराजा

माझया वाचनातील हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे .आजही मला मिळाले तर ते मी जरूर वाचेन मी. माझा स्वभाव लढाऊ असल्याने मला ते अधिक भावले. बाकी १९६२ चे युद्ध ,१९६५ चे युद्ध , १९७१ चे युद्ध , माणसाचा चंद्रावर वावर, १९७७ ची लोकसभेची निवडणूक , १९७५ ची आणीबाणी , रेशन चे दिवस, रॉकेल साठी रांगा ,मामाला तांदूळाचे स्मगलींग (?) केले म्हणून १ दिवसाचा तुरूंगवास, ६५ पैशात मसाला डोसा , कोयनेचा भूकंप, भारतीय संघाचा सर्वबाद ४२ चा डाव, १९७१ चे अजित वाडेकराचे मुंबईतील अभूतपूर्वे स्वागत , दुसर्याच्या घरी पाहिलेले छायागीत , १९८३ चा अंतिम सामना . अशा अनेक आठवणी आहेत.

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 10:56 am | कुमार१

** भारतीय संघाचा सर्वबाद ४२ चा डाव >>

आठवेल तसे लिहितो. चू भू दे घे .

स्थळ : लॉर्ड्स, लंडन.

सामना: भारत- इंग्लंड कसोटी क्रिकेट

बहुधा आपल्याला फॉलोऑन आणि दुसऱ्या डावात आपला हा पराक्रम !

आपले रणकंदन करणारे गोलंदाज : ख्रिस ओल्ड व अरनॉल्ड

त्या ४२ मध्ये एकनाथ सोलकर यांच्या १८ किंवा २१ धावा - त्यात १ षटकार , १ चौकार.

पेपरात ही बातमी पेपरच्या नावाच्या वर ठळक छापलेली. शालेय वयात त्याचे अप्रूप वाटल्याने तो अंक जपून ठेवला !

सुधीर कांदळकर's picture

20 Jul 2019 - 3:34 pm | सुधीर कांदळकर

सोलकर 18, डेव्हीड लोईड 200.
या मालिकेनंतर वाडेकर निव्रुत्त

नाखु's picture

20 Jul 2019 - 4:15 pm | नाखु

नानांचे पुरुष नाटक पाहायला मिळाले त्यानंतर त्यांनी खलनायकी संवादाना टाळ्या,शिट्टया येतात म्हणून बंद केले.
चिंचवडमध्ये वीसेक वर्षांपूर्वी दर्शन हॉल मध्ये नाटके, संगीत कार्यक्रम होत असायचे,तेंव्हा तो मी नव्हेच,कुणी तरी आहे तिथे,झपाटा आॅर्केस्ट्रा पाहिला आहे.

सन १९९५ पूर्वीच्या कंपनीत सहकार्यांना गाण्याचे कार्यक्रम पाहण्याची सवय लावली,त्यातच अरुण दाते, शुक्रतारा,भावसरगम, चंद्रशेखर गाडगीळ आदिंचे कार्यक्रम आवर्जून पुण्यात जाऊन पाहिले आहेत.
तेंव्हा पुण्यातून चिंचवड येथे येण्यासाठी शेवटची बस पुणे स्टेशन वरुन एकमेव रात्री १ वाजता असे,ती मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा.

तुमच्या धाग्याने या आठवणी जाग्या झाल्या.
पंचमदा यांचे स्मृती निमित्ताने आजच ट्रेडसेटर्स या कार्यक्रमाला आज जाणार आहे.

फक्त श्रोता असलेला कानरसिक वाचकांची पत्रेवाला नाखु

सुधीर कांदळकर's picture

21 Jul 2019 - 8:31 am | सुधीर कांदळकर

@चौरा: आमच्या गावातल्या ग्रंथालयातूनच ते मी आणले होते. प्रकाशक इ. माहिती १/२ दिवसात देतो.
@नाखु: राम मराठे पण शेवटची कल्याण गाडी आटापिटा करून पकडत.

सुधीर कांदळकर's picture

23 Jul 2019 - 10:27 am | सुधीर कांदळकर

बाईंडरचे दिवस
पुनर्मुद्रण २५ सप्टेंबर १९९९
प्रकाशक:
ग्रंथाली,
ईंडियन एज्युकेशन सोसायटी म. फुले कन्याशाळा,
बाबरकर मार्ग, गोखले रोड उत्तर,
दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.

मूल्य १६० रु.

चौकटराजा's picture

23 Jul 2019 - 3:05 pm | चौकटराजा

धन्यवाद !

फारएन्ड's picture

24 Jul 2019 - 3:21 am | फारएन्ड

छान लिहीले आहे!

सुधीर कांदळकर's picture

24 Jul 2019 - 6:49 am | सुधीर कांदळकर

@फारएन्ड अनेक, अनेक धन्यवाद

Namokar's picture

24 Jul 2019 - 11:50 am | Namokar

छान लिहिलंय

सुधीर कांदळकर's picture

25 Jul 2019 - 6:59 am | सुधीर कांदळकर

धन्यवाद नमोकरजी.