आमच्या वेळेस असं होतं??

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
11 Jul 2019 - 6:25 pm

पूर्वीच्या पालकांचं बरं होतं. मुलं जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तरीही पालक दरडावून चूप बसवत. कारण बरेचदा पालकांनाही उत्तरं माहिती नसायची, इंटरनेट नव्हते त्यावेळेस, लायब्ररीत जाऊन पुस्तकांत बरेचदा उत्तरं शोधावी लागायची. अर्थात जीवनातील ज्या प्रश्नांची उत्तर गुगल देऊ शकत नाही मी त्याबद्दल बोलत नाही आहे! त्यावेळची बहुतेक लहान मुलं सुद्धा एखाद दुसऱ्या दरडावण्याने चूप बसत, त्यांचे मनातले कुतूहल या पालकांच्या धाकापायी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाबरून पायात मान खाली घालून जाऊन बसायचं आणि आणखी कधी मान वर करून प्रश्न विचारायची संधी मिळते का ते शोधत बसायचं. एखाद्या पालकाने उत्तर माहिती नसलं तरीही कसलं तरी थातूर मातूर उत्तर दिलं तरी वेळ निभावून नेली जायची. मूल तेच उत्तर खरं मनायचं जोपर्यंत खऱ्या उत्तराशी त्यांची भेट होत नव्हती तोपर्यंत!!

पण अंदाजे 1990 किंवा 2000 सालानंतर म्हणजे इंटरनेट युग आल्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या पालकांना संगोपन हे खूप आव्हानात्मक झाले आहे. कारण आज कोणतीही माहिती मोबाईलमधील एका अंगठ्याच्या टॅपवर किंवा माऊसच्या क्लिकवर समोर हजर होते. स्मार्ट फोन्स आले म्हणून ही मुलं सुद्धा ओव्हरस्मार्ट झाली आहेत. काही तर पालकांना उत्तरं माहिती आहेत की नाही हे सुद्धा चेक करत असतात.

पूर्वी चे पालक "तू लहान होता तेव्हा हे नव्हतं, ते ही नव्हतं!" असं सांगून पालक मोकळे व्हायचे. पण आता?

उदाहरण घ्यायचे झाले तर समजा मुलांनी विचारले, "माझे लहानपणीचे फोटो व्हिडीओ का नाहीत आपल्याकडे?" आणि समजा आपण थाप मारली की, "तू लहान असताना मोबाईल मध्ये कॅमेरे नसायचे किंवा कॅमेरेच नव्हते!" असं सांगितलं तर मूल लगेच विकिपीडिया आणि गुगल वर जातं आणि हुडकून काढतं की कोणत्या सालात कोणती गोष्ट कोणत्या देशात अस्तित्वात होती नव्हती वगैरे. अँड्रॉइड मोबाईलचा किंवा कोणत्या गोष्टीचा शोध लागला होता नव्हता वगैरे.

त्यापेक्षा प्रामाणिक राहून "तेव्हा मोबाईल मध्ये कॅमेरे होते किंवा नुसते कॅमेरे होते पण आपल्याला 'परवडत' नव्हतं म्हणून आपल्याकडे नव्हता!' असं सांगितलेलं 'परवडतं'.

इंटरनेटच्या महाजालात माहितीच्या महाविस्फोटात कदाचित थोडा प्रामाणिकपणा मात्र वाढत जातो हे खरे. एखादे उत्तर माहिती नसले तर सरळ पालकांनी "मला माहिती नाही आपण सोबत मिळून गुगल वर शोधू" असे सांगितलेले सगळ्यात चांगले म्हणजे त्यांच्या सोबत आपल्यालाही नॉलेजचा लाभ होईल. आणि आपण आयुष्यभर शिकतच असतो नाही का? शिकलेले ज्ञान कधीही वाया जात नाही.

मी येथे मुलांनी विचारलेल्या तात्विक प्रश्र्नांबद्दल बोलत नाहीये. म्हणजे "काय पाप काय पुण्य, काय योग्य काय अयोग्य, जीवनात कसे वागावे?"

मी फॅक्च्युअल प्रश्न आणि उत्तरे याबद्दल बोलतोय म्हणजे, "रेडिओचा शोध कधी लागला? भारतात पाहिला टिव्ही कधी आला अशा प्रकारच्या प्रश्र्नांबद्दल सांगतोय. तसे पाहिले तर आजकाल तात्विक प्रश्नांची उत्तरं सुद्धा आजकाल इंटरनेटवर मिळतात. इतकंच नाही तर गुन्हा कसा करावा हेही इंटरनेट शिकवतं. हे मोठे जगापुढे आव्हान आहे.

एखादे मूल विचारू शकते, "मुल आईच्या पोटात कसे जाते किंवा कसे काय बाहेर येते?" आणि तत्सम लैंगिक प्रश्न. (अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे).

पण आजकाल या संदर्भातील काही उत्तरं नववी दहावीच्या शालेय पाठ्यपुस्तकात मिळतात. किंवा उरलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी विकिपीडिया आहेच. गुगल आहेच.

मग तुम्ही म्हणाल की मुलांच्या मनातील बहुतेक प्रश्नांनी उत्तरे जर इंटरनेट देत असेल तर मुले पालकांना प्रश्न विचारतीलच कशाला? पण नाही. तसं नाहीये.

माहितीचे हे निर्जीव महाजाल जसं आपल्याला गाईड करतं तसं मिसगाईड ही करू शकतं कारण इंटरनेट वरील सगळीच माहिती फॅक्च्युअली खरी असेलच असे नाही. हे ज्या स्मार्ट मुलांना समजतं ते नक्की पालकांना प्रश्न विचारातच. पालकांनी त्यांच्या वागणूकीतून मुलांच्या मनात विश्वास निर्माण केला असेल तर मुलांना नक्की मित्रांपेक्षा पालक जवळचे वाटतील!

आणि मुलांना समजून घेणारी आणि त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणारे पालक असले तर मूल इंटरनेटपेक्षा प्रथम पालकांवर नक्की अवलंबून राहील आणि म्हणून पालकांनी स्वतः इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी सेव्ही बनणे अरी आवश्यक झाले आहे. म्हणजे इंटरनेटवरचे काय खरे काय खोटे हे आपल्याला प्रथम माहिती असेल आणि मग आपण मुलांना समजावून सांगू शकू. इंटरनेटवरील एखादी माहिती जेन्युईंन (अस्सल) असेल तर आपणच स्वतः पाल्यांना वाचायला देऊ शकू.

"टेक केअर गुड नाईट" हा सचिन खेडेकर, पर्ण पेठे, इरावती हर्षे यांचा मराठी चित्रपट आपल्याला हेच सांगतो. या चित्रपटाबद्दल नंतर पुन्हा कधीतरी वेगळा लेख लिहिन पण चित्रपट नक्की बघा.

आणि "आमच्या वेळेस असं होतं आणि तुही तसंच कर" असली वाक्ये आपण आपल्या पालकांकडून सतत ऐकून घेतली पण आपल्या पाल्यांना आपण ऐकवू शकत नाही कारण आज सतत आणि झपाट्याने बदलत जाणाऱ्या इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यात पाच वर्षांपूर्वीच्या गोष्टी आज कालबाह्य होतात त्यामुळे पूर्वीची कोणतीच गोष्ट आजही तेवढीच लागू होईलच असे नाही त्यापेक्षा पाल्यांच्या पिढीत आपण रंगून जावे हेच बरे!

आज नैतिकतेच्या संकल्पना बदलत आहेत आणि त्या अनुषंगाने कोर्ट कायदे सुद्धा बदलवत आहे आणि आपण सामान्य माणसे जुने घेऊन बसू शकत नाही. आणि "खरंच आपल्या वेळेस असं होतं की आपण थाप मारतोय" हे आपली बालके गुगलवर शोधून काढतीलच आणि तुमच्यावेळेस असं नव्हतं तुम्ही खोटं बोलताय असं आपल्याला ऐकावं लागून तोंडघशी पडण्यापेक्षा आपणही पाल्यांइतके स्मार्ट झालेले बरे, नाही का? आणि जसे कुणीही परफेक्ट नसतं, चुका सगळ्यांकडून होतात तसे काही बाबतीत आपल्या पाल्यांना सरळ आपण सांगू शकतो की, "बाबा रे आम्ही परफेक्ट नाहीत आणि देव तर मुळीच नाही आहोत.

इतर माणसासारखी चुका करणारी आम्हीही माणसंच! आम्ही सुद्धा जीवनाच्या प्रवासात अजूनही शिकतोय, तेव्हा आजवर आम्हाला आलेल्या अनुभवातून आम्ही हे सांगतोय खरं पण हे तुम्हाला जसेच्या तसे लागू होईलच असे नाही!"

कोणत्याच आदर्शवादी तात्विक संकल्पना मुलांवर लादू नये. कारण आपल्याला माहिती असतं की जगात कुणीही आदर्श व्यक्ती नसतोच. चांगल्या सवयी आणि शिस्त लावणे यासाठी प्रयत्न करणं योग्य पण तात्विक आदर्शवादी सुविचार लादणे चूक. काळाची कधी नव्हे एवढी झपाट्याने चालणाऱ्या पावलांच्या मागोमाग जाण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही, आपल्याला जेवढे जमेल तेवढे काळा सोबत चालावे, एके ठिकाणी थांबले तर ती पावले आपल्या डोक्यावर पाय देऊन आपल्याला जमिनीत एके ठिकाणी खड्ड्यात अर्धवट घुसवतील आणि पुढे निघून जातील.

दरडावून गप्प बसवणे, मारणे, शिक्षा करणे, धाक दाखवणे हे जुन्या काळातले पाल्यांना हँडल करण्याचे फॉर्म्युले आता लागू होत नाहीत आणि आजच्या काळातही एका घरातला मुलांना हँडल करण्याचा फॉर्म्युला दुसऱ्या घरात लागू होईल असेही नाही. आपल्यालाच आपला फॉर्म्युला शोधून काढून आपल्यासाठी वापरावा लागतो. मी हे लिहितोय म्हणजे मी परफेक्ट पालक आहे असे मुळीच नाही, मी फक्त एक विचार मांडतो आहे. बस्स!

पण हे नक्की आहे की, आजचे पालकत्व आजपर्यंत कधीही नव्हते एवढे आव्हानात्मक झाले आहे!! आणि आजच्या पालकांसमोरच्या समस्या सुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या आहेत (उदा. मोबाईल गेम्स आणि एकूणच सोशल मीडियाचे मुलांचे व्यसन, यावर तर जगभरातील डॉक्टर अजून वेगवेगळी संशोधन करताहेत) आणि हो, आजकालची मुले सुद्धा कधी नव्हे एवढ्या जीवघेण्या स्पर्धेला आणि ताण तणावाला तोंड देत आहेत, हे विसरून चालणार नाही!!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

"टेक केअर गुड नाईट" हा सचिन खेडेकर, पर्ण पेठे, इरावती हर्षे यांचा मराठी चित्रपट आपल्याला हेच सांगतो. या चित्रपटाबद्दल नंतर पुन्हा कधीतरी वेगळा लेख लिहिन.

कधी एकदा वाचून काढीन असे होतंय

आजचे पालकत्व आजपर्यंत कधीही नव्हते एवढे आव्हानात्मक झाले आहे! >+११
एकदम सहमत