११: पुन: सुरुवात करताना
डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.
माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!
माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत
माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना
माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन
माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना
माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!
माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट
माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल
माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री
माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप
सप्टेंबर २०१८ मध्ये माझी पहिली फुल मॅरेथॉन होती. २ सप्टेंबर ला ३६ किलोमीटर पळाल्यामुळे चांगला आत्मविश्वास आला. ३० सप्टेंबरच्या मॅरेथॉनच्या आधी आता फक्त छोटे रन्स करायचे आहेत. पायांना सौम्य सराव देत राहायचं आहे. ह्याच सुमारास माझी कोंकणात सायकलीवर जायची योजनाही आहे. सायकलिंग हा रनिंगच्या तुलनेत सौम्य व्यायाम असल्यामुळे जास्त विचार करायची गरज वाटली नाही. सप्टेंबरमध्ये आठ दिवस कोंकणात सायकलवर गेलो, अतिशय रोमँटीक प्रवास झाला हा! एक स्वप्न साकार झालं. परत येताना सायकल ठेवून यावं लागलं आणि नंतर तिला आणायला जावं लागलं. सायकल प्रवासामुळे नाही, पण नंतर झालेल्या प्रवासामुळे कुठे तरी इन्फेक्शन झालं आणि मॅरेथॉनच्या एक आठवडा आधी व्हायरल ताप आला आणि मग अशक्तपणाही आला. त्यामुळे नाइलाजाने त्र्यंबकेश्वरमधली मॅरेथॉन रद्द करावी लागली. पहिली संधी हातातून गेली. पण इतकं वाईट वाटलं नाही. कारण माझ्या दृष्टीने इव्हेंटस हे फक्त निकालाचे दिवस असतात. आणि निकालापेक्षा वर्षभराचा सराव मोठा असतो. मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या पातळीपर्यंत माझा स्टॅमिना वाढला होता. जर ही मॅरेथॉन बूक केली नसती तर ते झालं नसतं. मॅच जरी हुकली असली तरी मी मॅच फिटनेसच्या जवळ होतो. असो.
नंतर काही दिवस आराम करावा लागला. हळु हळु वॉकिंग आणि सायकलिंग सुरू केलं. छोटे रन सुरू केले. मॅरेथॉनच्या तयारीचं आता इतकं टेंशन नाही. कारण जेव्हामी २५, ३० व ३६ किमी असे रन केले, तेव्हा रनिंग मानसिक दृष्टीने खूप सोपं झालंय. त्याच्या प्रक्रियेतले टप्पेही कळाले आहेत. त्याशिवाय बरीच सायकल चालवतो, वॉक करतो, योग आणि स्ट्रेंदनिंग आहेच. त्यामुळे तसं तर मी रनिंग करतोच आहे, असं वाटतं. आणि मोठे रन करताना त्या दिवसांमध्ये एक अडचण आली होती व त्या अडचणीतून एक पर्यायही समोर आला होता. पावसाळ्यामध्ये पावसामुळे व रस्त्यावरच्या चिखलामुळे रनिंग कठीण वाटायचं (खरं तर ह्या फक्त एक्स्क्युजेसच आहेत). किंवा कधी लवकर उठणं जमायचं नाही. मग अशा दिवशी काय करावं? तेव्हा एकदम वाटलं की, इनडोअर रनिंग केलं तर? ते करून पाहिलं. घरात सलग जागा केली आणि धावून बघितलं. पण रनर्स आणि सायकलिस्टससाठी खास असलेल्या strava app वर ते रेकॉर्ड करता येत नव्हतं. कारण घरात जीपीएस नीट काम करत नाही. त्यामुळे रन मॅप झाला नाही. थोडं वाईट वाटलं, पण मग manual entry चा पर्याय होताच. त्यामुळे रेकॉर्ड करण्याचीही अडचण दूर झाली. मोबाईलमध्ये म्युझिक प्लेअरमध्ये गाणी लावून ४४ मिनिट टायमर सेट केलं आणि पळायला लागलो. ४४ मिनिटांनी थांबलो. अंदाजे ६ किलोमीटर झाले असावेत, कारण सतत वळावं लागत असल्यामुळे वेग कमी होतो. त्याबरोबरच बेअरफूट रनिंगचाही छान अनुभव मिळाला. असा रनिंगचा आणखी एक पर्याय मिळाला! आता अशा एक्स्क्युजेस स्वत:ला देऊ शकणार नाही कि सकाळी लवकर उठलो नाही, बाहेर चिखल आहे इ. आता तर रोज पळणं शक्य आहे! पण अर्थात् असं जमलं नाही आणि रोज रनिंगची आवश्यकताही वाटली नाही. आठवड्यात तीन दिवस रनिंग करणं ठीक वाटलं. कारण मी त्यासोबत बाकीचे व्यायामही करतो. नंतर हेही जाणवलं की, इनडोअर रनिंग एक पर्याय म्हणूनच ठीक आहे. बाहेर ऊन्हात, पावसात किंवा वा-यात जे रनिंग होतं त्याची 'जागा' हे घेऊ शकत नाही! पण कधी कधी उपयोगी पडतं. गमतीने मी इनडोअर रनिंगला इंदौरला जाऊन केलेलं रनिंग म्हणतो! आणि आता माझ्या रनर मित्रांच्या भाषेत 'मी आज इंदौरला सहा पळालो आणि नंतर पाच किलोमीटर वाकलो' असे अपडेटस येतात!
आता माझी पहिली आणि शेवटची मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन, जानेवारी २०१९ असेल! शेवटची कारण मला ईव्हेंटच्या ऐवजी प्रक्रिया जास्त आवडते. जेव्हा मी स्वत: एकटा ३०- ३६ किलोमीटर पळू शकतो, तेव्हा मला ईव्हेंटची नंतर गरज वाटत नाही. अर्थात् अजून अनेक गोष्टी नीट करायच्या आहेत. जसे चांगले शूज शोधायचे आहेत. आत्ता असलेले नायकेचे शूज चांगले आहेत, पण २५ किलोमीटरसारख्या लाँग रननंतर चावतात. जुनेही झाले आहेत (रनिंगमध्ये एक- दिड वर्षात शूज बदलावे लागतात). शिवाय २५ किलोमीटरनंतर मला रनिंग कठीण जातंय, त्यानंतर चालावं लागतंय. जर ४२ किलोमीटर पळायचे असतील, तर हेही ठीक करावं लागेल. स्टॅमिना वाढवावा लागेल. त्यामुळे अनुभवी रनर्सचं मार्गदर्शन घेत राहिलो. ऑक्टोबरमध्ये रिकव्हरीमुळे जास्त रन्स केले नाहीत आणि नोव्हेंबरमध्ये परत १४ दिवस सायकल प्रवास केला. त्यामुळे रनिंगमध्ये थोडी गॅप आली. आता नोव्हेंबरनंतर मोठे रन करेन आणि जानेवारीच्या आधी एकदा ३६ किलोमीटर पळेन.
पुढील भाग- माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
28 Jun 2019 - 6:19 pm | जालिम लोशन
येवुंद्या .
29 Jun 2019 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रतेय्क वेळी लिहीतो तेच...... तुमच्या निष्ठेला आणि चिकाटीला सलाम.
मला ईव्हेंटच्या ऐवजी प्रक्रिया जास्त आवडते.
हे स्वतःपुरते खरे असले तरी इव्हेंट मुळे इतरांनाही प्रेरणा मिळते, नवे साथिदार मिळतात, विचारांची देवाणघेवाण होते, त्या साठी कधी कधी असेही करायला हरकत नाही. त्यातच अडकले नाही की झाले. तेवढा सावधपणा जरुर बाळगावा.
पैजारबुवा,
1 Jul 2019 - 10:10 am | मार्गी
धन्यवाद जालिम लोशन जी आणि पैजारबुवा!
@ पैजारबुवा, खरं आहे. ईव्हेंटमध्ये अनेक गोष्टी शिकायल मिळतातच.