एका प्रेतयात्रेचा सोहळा आणि आमच्या वारशाची जपणूक

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
6 Nov 2008 - 4:14 pm

एका संपन्न आणि आधुनिक विचारांच्या देशातील सुसंस्कृत समजला जाणारा समाज, हा आपल्याच धर्मातील पण वेगळ्या पंथातील लोकांना कितपत हिणवू शकतो? त्यांची कितपत निर्भत्सना करू शकतो?

५ नोव्हेंबर हा दिवस उभ्या इंग्लंडमध्ये गाय फॉक्स डे (Guy Fawkes day) म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होते. परंतु, दक्षिण इंग्लंडमधील लूइस (Lewes) ह्या छोट्याश्या गावात मात्र हा दिवस एका आगळ्यावेगळ्या पद्ध्तीने साजरा होतो. केवळ गाय फॉक्सच नव्हे तर, कॅथलीक संप्रदायाचे प्रमुख पोप महाशय यांनाही जितके अवमानित करता येईल तितके केले जाते आणि तेही अत्यंत जल्लोषात!

सोळावे शतक हे इंग्लंडमध्ये धार्मिकदृष्ट्या बरेच उलथापालथीचे होते. राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले. त्याने पोपच्या धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लुडबूड, वर्चस्व मानण्यास नकार दिला. जेव्हा तत्कालीन पोप तिसरे पॉल यांनी त्यास धर्मबहिष्कृत केले तेव्हा त्याने प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना करून रोमची धार्मिक सत्ता झुगारून दिली.

राजापाठोपाठ प्रजादेखिल हळू हळू प्रोटेस्टंट पंथ स्वीकारू लागली होती पण काही कट्टर कॅथलीक अजूनही समाजात होतेच. गाय फॉक्स हा त्यांपैकीच एक.

सन १६०५. गाय फॉक्स आणि त्याच्या अकरा सहकार्‍यांनी एक धाडसी योजना आखली. तत्कालीन राजा पहिला जेम्स हा पार्लमेंटच्या अधिवेशनाचे उद्घाटन करणार होता. त्याचवेळेस स्फोट घडवून जेम्स आणि अन्य उमराव यांना मारण्याचा "गनपावडर प्लॉट" ह्या नावाने ओळखला जाणारा कट मोठ्या साहसीपणाने रचण्यात आला. परंतु, स्फोट घडवण्यापूर्वीच गाय फॉक्स आणि त्याच्या सर्व सहकार्‍यांना पकडण्यात आले. तो दिवस होता ५ नोव्हेंबर १६०५. पुढे त्यांना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आले.

आज चारशे वर्षे उलटून गेली तरी इंग्लंडची (विशेषतः लूइसची) जनता हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करते.

२००० साली, जेव्हा पहिल्याने येथे आलो तेव्हा लूइसला जाण्याचा बेत केला होता. माझ्या सहकार्‍यांनी फार गर्दी असते हे कारण देत तो मोडून काढला. पुन्हा योग आला होता २००३ साली पण तेव्हा काही वैयक्तिक कारणांमुळे जाऊ शकलो नव्हतो. त्यानंतर मौका आला तो ह्या वर्षी. इजा, बीजा नंतर तीजा मी सोडणार नव्हतो!

ऑफीसातून जरा लवकरच निघालो. येऊ घातलेली एक मीटींग शिताफीने दुसर्‍या दिवसावर ढकलली. लूइसला पोचलो. छोटेसेच गाव. माणसांनी फुलून गेले होते. वैविध्यपूर्ण पोशाख केलेले स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी हातात जळत्या मशाली घेऊन मिरवणूकीने जात येत होते, बॅन्ड पथके वाजत गाजत होती, गाय फॉक्स आणि पोप ह्यांच्या भल्यामोठ्या प्रतिकृती मिरवणूकीने नेल्या जात होत्या. फटाके फुटत होते आणि हातात बियरचे (नेहेमीपेक्षा दुपटीने महाग) नाहीतर कॉफीचे प्याले घेऊन हजारो लोक फूटपाथवर उभे राहून हा सोहळा पाहत होते.

सुमारे चार तास हा मिरवणूकीचा कार्यक्रम चालतो. नंतर त्या प्रतिकृतींना एका मैदानात नेऊन जाळले जाते. ते बघण्यासाठी तिकिट लागते, ते नसल्यामुळे जाळण्याचा कार्यक्रम काही बघता आला नाही.

आज ब्रिटीश हा दिवस साजरा करतात त्यात कॅथलीकांना हिणवण्यापेक्षाही परंपरा जपण्याचा भाग मला जास्त वाटतो. आणि ही परंपरा जपली जाण्याबरोबरच एका ऐतिहासिक वारशाचीही जपणूक होते, ही गोष्ट मला जास्त मोलाची वाटते.

भारतात काय धर्मसत्ता आणि राजसत्ता यांतील संघर्ष घडला नाही? नक्कीच घडला. किमान दोनदा तरी. एकदा जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा आणि त्यानंतर जेव्हा बौद्ध धर्म (भारतातून) लयाला जाऊन पुनः वैदिक धर्माची स्थापना झाली तेव्हा. पण यातील एकाही प्रसंगाची आपल्या इतिहासात धडपणे नोंद नाही. त्यावेळी झालेल्या सामाजिक-राजकीय उलथापालथी यांचे चित्रण करणारे खात्रीशीर लिखाण उपलब्ध नाही.

"कसा झाला कालचा प्रोग्राम?", ऑफिसात आल्या आल्या कुणीसे विचारले.

"अमेझिंग", मी उत्तरलो.

"वाटलच. प्रचंड गर्दी आणि फटाके..."

"नाही. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त गर्दी आणि कानठळ्या बसवणारे फटाके मी भारतात अनुभवले आहेत."

"मग अमेझिंग काय?"

"थंडीत आणि क्वचित पावसात फूटपाथवर उभे राहून बीयर पिण्याचे थ्रिल!"

एक हास्याची लकेर उमटली. मी मुकाट्याने माझ्या टेबलपाशी आलो. काय सांगणार त्यांना मला काय अमेझिंग वाटले ते!

धर्म-राज सत्तेतील संघर्ष हे झाले केवळ एक उदाहरण. कुठल्या ऐतिहासिक साधनाची आपण काळजीपूर्वक जोपासना केलीय?
धार्मिक अभिनिवेशाच्या दृष्टीने नव्हे तर, ऐतिहासिक वारशाच्या जपणूकीविषयीच्या ह्या निरीच्छीने थोडी निराशा येते. तसा इंग्लंडमधीलो मुक्काम नेहेमीच मन विषण्ण करतो तो याच मुळे.

आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

मनीषा's picture

6 Nov 2008 - 4:28 pm | मनीषा

छान आहे ... असे काही बघताना नकळत तुलना केली जातेच
आणि आपल्या इतिहासा बद्दल आपण किती बेपर्वा आहोत याची खंत वाटते ...
म्हणूनच कोहिनूर हिरा, आणि भवानी तलवार अजूनही ब्रिटीश म्युझियम मधे आहेत ..

छोटा डॉन's picture

6 Nov 2008 - 4:31 pm | छोटा डॉन

लेख आवडला, एकदम खुसखुशीत व नेटकाच जमला आहे ...
बर्‍यापैकी चिंतन करायला लावणारा लेख, छान वाटले वाचुन व थोडे विचारात पडलो ...

>> आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.
+१, सहमत आहे ...

(आस्वादक व विचारशील ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2008 - 4:35 pm | स्वाती दिनेश

आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.
अगदी..
लेख आवडला.
स्वाती

यशोधरा's picture

6 Nov 2008 - 4:46 pm | यशोधरा

अतिशय आवडला लेख. परदेशांतून फिरताना, आपली आपल्या ऐतिहासिक स्थळांविषयींची अनावस्था विषण्ण करते हे खरच.

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 4:47 pm | विसोबा खेचर

आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.

मुद्दा अगदी योग्यच आहे..

पण आता काय करणार? आहोत खरे आपण भारतीय दोषी!

चालायचंच..!

आपला,
(भारतीय) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2008 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते

छान सोहळा आहे रे...

इतिहासाबद्दल लिहिलंयस ते बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण इतिहासाबद्दल अभिमान तर नाहीच बाळगत पण 'दुराभिमान' मात्र जरूर बाळगतो. इतिहासाबद्दल अभिमान असेल तर आपण त्या वारश्याची जपणूक करू, त्यापासून योग्य बोध घेऊ. पण दुराभिमान आहे म्हणून आपण फक्त पुतळे आणि मारामार्‍या एवढ्यापुरताच त्याचा उपयोग करतो. आपलाच करंटेपणा, दुसर्‍यांना बोलून काय उपयोग.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2008 - 7:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपीनभौंशी सहमत.

युकेमधे पुराणा असेल तर मडक्याचा तुकडाही एवढा जपून ठेवतात आणि पैसे घेऊन दाखवतात आणि आपण ... शिवाजीचे गुरू कोण यावरून भांडतो पण त्याच शिवाजीच्या किल्ल्यांची काय दुरवस्था झालेली आहे ते सह्याद्रीत पाहिलं की फार वाईट वाटतं.

विकास's picture

6 Nov 2008 - 6:05 pm | विकास

लेख आणि त्यातील माहीती आवडली...

आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो.
आणि तो न जपता जे विसरतात ते त्यातील चुकांची पुनरावृत्ती करतात.

अवलिया's picture

6 Nov 2008 - 6:59 pm | अवलिया

अतिशय उत्तम लेख.
आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो. ह्या मताशी पुर्ण पणे सहमत पण याच्या आड येणारी गोष्ट ही भारतीयांचा आळस किंवा दुर्लक्ष नसुन ब्रिटीशांच्या तालमीत तयार झालेले भारतीय पुरातत्व खाते हेच होय असे माझे प्रत्यक्ष अनुभवाअंती झालेले मत आहे.

भारतीय पुरातत्व खाते
http://asi.nic.in/index.asp

त्यांचे त्रासदायक कायदे
http://asi.nic.in/asi_legislations.asp

नाना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2008 - 7:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतिहासाबद्दल चिंतन करायला लावणारा एक माहितीवजा उत्तम लेख !!!

बाकी, आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो. हेच खरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलंत्री's picture

6 Nov 2008 - 7:48 pm | कलंत्री

पेशव्यांनी टिपुच्या राज्यातील शंकराचार्यांचा मठ उध्वस्त केला होता. तसेच गझनीच्या महमुदाने लोहोरजवळील मशिद लुटली होती. बाकी संदर्भ आठवत नाही.

कपिल काळे's picture

6 Nov 2008 - 8:04 pm | कपिल काळे

सुनील,

चांगली माहिती दिलीत. पण मला एक गोष्ट समजली नाही.

<<राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले. त्याने पोपच्या धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लुडबूड, वर्चस्व मानण्यास नकार दिला. जेव्हा तत्कालीन पोप तिसरे पॉल यांनी त्यास धर्मबहिष्कृत केले तेव्हा त्याने प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना करून रोमची धार्मिक सत्ता झुगारून दिली.

राजापाठोपाठ प्रजादेखिल हळू हळू प्रोटेस्टंट पंथ स्वीकारू लागली होती पण काही कट्टर कॅथलीक अजूनही समाजात होतेच. गाय फॉक्स हा त्यांपैकीच एक.

सन १६०५. गाय फॉक्स आणि त्याच्या अकरा सहकार्‍यांनी एक धाडसी योजना आखली. तत्कालीन राजा पहिला जेम्स हा पार्लमेंटच्या अधिवेशनाचे उद्घाटन करणार होता. त्याचवेळेस स्फोट घडवून जेम्स आणि अन्य उमराव यांना मारण्याचा "गनपावडर प्लॉट" ह्या नावाने ओळखला जाणारा कट मोठ्या साहसीपणाने रचण्यात आला.>>

म्हणजे.. आठवा हेन्री याने कॅथलीक पोपाविरुद्ध जाउन प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना केली. मग राजा जेम्स हा कॅथलीक राहिला होता का? त्याची हत्या करण्याचा कट का रचला?

हा वारसा ( म्हणजे गाय फॉक्स डे ) जर धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्याच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे , तर जेम्सला मारणारे कोण होते?

कॅथलीक पोपाला अपमानित का केले जाते?

मला समजल्याप्रमाणे जेम्स कॅथलीक असावा आणि तो कॅथलीक पोपा च्या सांगण्याप्रमाणे कारभार करत असावा.

कॄपया अधिक खुलासा करावा..

हलकेच घ्या.. हेतू शुद्ध चर्चेचा आहे.

आणि माझ्या भाष्यामुळे तुमच्या लेखनाचे आणि त्यात व्यक्त झालेल्या भावनेचे महत्व कमी होत नाही.

माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/

सुनील's picture

6 Nov 2008 - 10:29 pm | सुनील

माझ्या लेखातील खालील परिच्छेद पहा -

राजापाठोपाठ प्रजादेखिल हळू हळू प्रोटेस्टंट पंथ स्वीकारू लागली होती पण काही कट्टर कॅथलीक अजूनही समाजात होतेच. गाय फॉक्स हा त्यांपैकीच एक.

गाय फॉक्स कॅथलीक होता तर जेम्स प्रॉटेस्टंट. तुमचा गोंधळ का व्हावा हे समजले नाही. असो.

अवांतर - आठव्या हेन्रीने प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारल्यानंतर एकही कॅथलीक व्यक्ती राजा/राणी पदावर बसली नाही. तशी व्यवस्थाच आहे.

अति अवांतर - अमेरिकेत तशी व्यवस्था नाही. तरीही जॉन केनेडींचा अपवाद वगळता एकही कॅथलीक व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसलेली नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे's picture

6 Nov 2008 - 10:46 pm | कपिल काळे

हो, ती ओळ वाचायची राहून कशी काय गेली ?

अब सब कुछ साफ नजर आ रहा है.

http://kalekapil.blogspot.com/

baba's picture

6 Nov 2008 - 8:05 pm | baba

"आपला इतिहास हा आपणच जपायचा असतो."

१००% सहमत..

..बाबा

कपिल काळे's picture

6 Nov 2008 - 8:17 pm | कपिल काळे

आणि हो एक विचारायचं राहूनच गेलं. बियर कोणती प्यालात? लागर की सेडार?

गेल्यावर्षी म्यान्चेस्टरला. मे महिन्यात मनसोक्त लागर ढोसली होती. त्याची तुम्ही आठवण करुन दिली.

;)

धनंजय's picture

6 Nov 2008 - 11:08 pm | धनंजय

आणि विचार. वेगवेगळ्या देशांतले अनुभव अनुभवून आपल्या देशाबद्दल विचार मनात येतात. हा देशाटनाचा एक सदुपयोग.

शितल's picture

7 Nov 2008 - 3:49 am | शितल

लेख आवडला. :)

सहज's picture

7 Nov 2008 - 8:21 am | सहज

लेख चांगला आहे.

हेनरी आठवा हा महालफडेबाज राजा. हा शेखर कपूरच्या राणी एलिझाबेथ पहिलीचा बाप. हेनरीच्या पहिल्या बायकोपासून, राणी कॅथरीनपासून, पोप क्लेमेंट त्याला वेगळे होण्याची परवानगी देत नव्हता. ही कॅथरीन म्हणजे ब्लडी मेरीची (मेरी क्वीन ऑफ स्कॉटलंड. हिचे केस लाल होते) आई. त्याला एलिझाबेथच्या आईशी, अ‍ॅनशी, लग्न करायचे होते. कारण मुलगा हवा होता. नंतर कुठलाही सबळ पुरावा नसताना राजद्रोह, विवाहबाह्यसंबंध ठेवणे (अ‍ॅडल्टरी) हे गुन्हे सिद्ध करण्यात येऊन अ‍ॅनचाही शिरच्छेद करण्यात आला. अ‍ॅननंतरही त्याने अनेक लग्ने केली.

कसला आलाय धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांतला संघर्ष! हेनरीच्या स्वतःच्या खाजेपायी, गरजेपायी प्रॉटस्टंट पंथ स्थापन झाला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील's picture

7 Nov 2008 - 5:19 pm | सुनील

मी राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले ह्या एका वाक्यात उरकलेल्या प्रसंगाचा तुम्ही चांगलाच विस्तार केलात!!

पोप क्लेमेंट त्याला वेगळे होण्याची परवानगी देत नव्हता
यातच सर्व काही आले नाही का? आता सांगा, इंग्लंडच्या राजाला आपल्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी दूर वॅटिकनमध्ये बसलेल्या पोपच्या परवानगीची गरजच काय? ही धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लूडबूड नव्हे काय? मग कारण काहीही असो.

असो, माझ्या लेखाचा मूळ उद्देश वेगळाच होता!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धम्मकलाडू's picture

10 Nov 2008 - 2:15 pm | धम्मकलाडू

राजा आठवा हेन्री आणि पोप यांचे बिनसले.

इथपर्यंत ठीक होते.

त्याने पोपच्या धार्मिक सत्तेची राजसत्तेतील लुडबूड, वर्चस्व मानण्यास नकार दिला. जेव्हा तत्कालीन पोप तिसरे पॉल यांनी त्यास धर्मबहिष्कृत केले तेव्हा त्याने प्रोटेस्टंट चर्च ऑफ इंग्लंड्ची स्थापना करून रोमची धार्मिक सत्ता झुगारून दिली.

हे फारच अर्धवट वाटले आणि अनावश्यक उदात्तीकरणही. चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना करणारा राजा हेनरी मार्टिन लूथर किंग नव्हता. (हा सिविल राइट्सवाला अमेरिकन संत मार्टिन लूथर किंग नाही बरे)

इंग्लंडच्या राजाला आपल्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी दूर वॅटिकनमध्ये बसलेल्या पोपच्या परवानगीची गरजच काय?

धार्मिक गरज. अ‍ॅनची इच्छा. अ‍ॅन कॅथरीनसोबतचा विवाह रद्द झाल्याशिवाय हेनरीशी लग्न करायला तयार नव्हती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2008 - 7:09 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो रोमन कॅथलिक पोपशी जाहिर पणे फारकत घेणार्‍यात पुढे असणारा मार्टिन ल्यूथर..... मार्टिन ल्यूथर किंग नाही हो... मार्टिन ल्यूथर किंग एकमेवच आहे.

बिपिन कार्यकर्ते

धम्मकलाडू's picture

11 Nov 2008 - 9:16 pm | धम्मकलाडू

धन्यवाद. मार्टिन लूथर हवे होते. पण माझा मुद्दा तुम्हाला कळला असण्याची शक्यता आहे काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"