बालकथा- दुर्बिण

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Jun 2019 - 9:52 am

बालकथा- दुर्बिण
-----------------------------------------------------------------------------------
ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ).
मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त .
मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . ..
आणि तुमच्या सुद्धा .

------------------------------------------------------

बाबांनी काहीतरी खेळणं आणलं होतं.
“ काय आहे बाबा ? “ मी विचारलं.
“ दुर्बिण ! यामधून लांबवरचं दिसतं. वस्तू मोठ्या मोठ्या दिसतात. “
मला गंमतच वाटली. नेहा माझी मैत्रीण आहे . वयाने माझ्या एवढीच - पण मोठी आहे ! म्हणजे समजलं ना ? तर - दुर्बिणीतून तिच्याकडे पाहिलं तर ती कित्ती मोठी दिसेल ? असं माझ्या मनात आलं आणि गंमतच वाटली .
ती काळी दुर्बिण मी डोळ्यांना लावली. नेहा समोर राहते. तिच्या खिडकीत बसलेलं कबुतर दिसत होतं.वर एक कावळा काव काव करत होता. मध्येच एक साळुंकी ओरडत गेली. सारं अगदी नीट दिसलं . डोळ्यांसमोर असल्यासारखं. त्यांची पिसं न् पिसं अगदी स्पष्ट दिसत होती. राखाडी , काळ्या - पिवळ्या रंगाची .
तेवढ्यात नेहा खिडकीमध्ये आली . तिचा गोलमटोल चेहरा आणखीच वाटोळा दिसला मला .चंद्रासारखा! ती खूप गोरी आणि गोड पोरगी आहे ! माझ्यासारखीच ! …
“ छान आहे. यामधून पक्षी अगदी नीट दिसले,” मी म्हणाले , “ आणि नेहासुद्धा “,
आणि बाबा पुढे म्हणालेच की , “यामधून चंद्र देखील दिसतो बरं. अगदी मोठा . खूप मोठी दुर्बिण असेल तर लांब लांबचे ग्रह – तारेही दिसतात. आकाशाचा अभ्यास करता येतो. ही तशी साधी दुर्बिण आहे. यामधून आसपासचं दिसेल. हिचा उपयोग पक्षी बघण्यासाठी करता येईल , ” बाबा म्हणाले .
मी दुर्बिण घेऊन नेहाकडे गेले. तिला माझी गंमत दाखवली . तिने दुर्बिणीतून पाहिलं व म्हणाली, “ भारी आहे गं ! “ .
मग तिने दुर्बीण माझ्याकडे वळवली . अन म्हणते कशी , “ अगं, यामधून तू ना मोठ्या टेडी बेअर सारखी दिसतियेस ! “
तीच डोकं ना असं माझ्या सारखंच चालतं . म्हणून तर आमचं जमतं .
“ हं ! पण ते जाऊ दे. ही साधी आहे. यामधून आकाशाचा अभ्यास नाही करता येणार. पण पक्षी बघता येतील.” मी म्हणाले.
तिने आकाशाकडे दुर्बीण वळवली . पण त्यावेळी आकाशात एकही पक्षी नव्हता. संध्याकाळची वेळ होती . मस्त हवा सुटली होती.
तिने अथर्वच्या घराकडे दुर्बिण वळवली . त्याच्या घरी पिंजऱ्यात छोटे पक्षी आहेत. उडू न शकणारे. रंगीबेरंगी . सतत चिवचिवणारे . आमच्यापेक्षा जास्त चिवचिवणारे ! पक्ष्यांना असं कोंडून ठेवण्यात काय मजा ? ते कोंडलेले पक्षी पाहून तिला लगेच कंटाळा आला. पण तेवढ्यात तिला अथर्व दिसला . तो काहीतरी खात होता. ती लगेच म्हणाली , “ए, तो अथर्व बघ नुसता खादाड पोरगा आहे ! “
नेहाला ना - नुसतं खायचंच सुचतं . नेमकं तेच दिसतं !
त्यावर मी दुर्बीण घेतली . पण मला तो काही दिसला नाही. तो आत गेला होता . तो काय खातोय हे मलाही पाहायचं होतं . पण कळलंच नाही .
मग मी दुर्बिण माझ्या घराकडे वळवली . आई स्वैपाक घरात काहीतरी करत होती. माझ्या आणि ओट्याच्या मधेमध्येच येत होती ती . छे बाई ! त्यामुळे दुर्बीण असूनही दिसत नव्हतं . पण मला बेसन लाडूचा वास आला. अगदी नीट !
दुर्बिणींपेक्षा माझं नाकच भारी आहे ! ते पाहून माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. हवेमुळे वास पसरलाय, हे माझ्या लक्षात आलं . पण नंतर .
“ अय्या लाडू ? “ मी पटकन म्हणाले , “ नेहा, मी जाते घरी आणि लाडू खायचा असेल तर तूही चल “ .
आणि मी पळतच सुटले . माझ्या घराकडे.
ती कसली भारी ! निघाली की लगेच . माझ्या मागे .
मी दुर्बीण डोळयांना लावूनच पळत होते . त्यामुळे रॉनी दचकला. तो एक सोनेरी केसांचा दांडगा कुत्रा आहे .स्वातीकाकूंचा, लाडावलेला . दुर्बिणीमुळे मी त्याला वेगळीच वाटले अन मला तो . डब्बलच वाटला . तो माझ्या वर भुंकायला लागला . दुर्बीण बाजूला केल्यावर बसला शांत .
मी घरी आले . अहा ! घरात काय खमंग वास सुटला होता.
पिवळ्याधम्मक लाडवाला मनुके लावलेले होते .दुर्बिणीतून ते पाहून खाताना मज्जा आली . आम्हा दोघींना .
आम्हाला मजा वाटत असल्यामुळे लाडू आणखीच गोड लागले .
-----------------------------------------------------------------------------------------

बिपीन सांगळे

बालकथालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

14 Jun 2019 - 4:27 pm | ज्योति अळवणी

आहे खरी बालकथा.

धम्म मस्त गंमत

वकील साहेब's picture

16 Jun 2019 - 9:35 am | वकील साहेब

छान आहे कथा

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Jun 2019 - 12:36 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचा आभारी आहे मी खूप.