माझं "पलायन" १०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
15 May 2019 - 4:09 pm

१०: फुल मॅरेथॉन सुदृढतेच्या (मॅरेथॉन फिटनेस) समीप

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

ऑगस्ट २०१८ मध्ये फुल मॅरेथॉनच्या तयारीसाठी २५ किलोमीटर- ३० किलोमीटर असे लाँग रन्स करत होतो. सप्टेंबरच्या अखेरीस फुल मॅरेथॉनचं बूकिंग केलं होतं. त्याच दरम्यान मुंबईच्या फुल मॅरेथॉनसाठीही बूकिंग केलं. पण त्याचं कारण वेगळं होतं. २०१८ च्या मुंबई मॅरेथॉनचे फोटो बघितले होते तेव्हा लोकांना बांद्रा- वरळी सी लिंकवर पळताना बघितलं होतं. सी लिंकवर सायकल चालवण्याची किंवा चालण्याची अनुमती नसते! पण मॅरेथॉनसाठी इथे पळू देतात! त्यामुळे ह्या मॅरेथॉनला पळावसं वाटलं. तसंच ही प्रसिद्ध मॅरेथॉन एकदा अनुभवावी, असंही वाटत होतं. जानेवारी २०१९ साठी ह्या मॅरेथॉनचं बूकिंग केलं होतं. पण त्या आधी सप्टेंबर २०१८ ची त्र्यंबकेश्वरची मॅरेथॉन होती.

५ ऑगस्टला ३० किलोमीटर पळायचं होतं, तेव्हा २५ च पळू शकलो होतो व बाकीचे ५ किमी चालत पूर्ण करावे लागले होते. त्यामुळे काही गोष्टींवर विचार केला. २८ जुलैनंतर लगेचच पुढच्या रविवारी मोठा रन केला होता. त्यामुळे पुढच्या रनच्या आधी १४ दिवस गॅप घेतली. तसंच इंटरनेटवर काही ठिकाणी वाचलं की, रनिंग करताना मध्ये मध्ये रनिंगच्या ऐवजी वॉक केला तर पाय कमी दुखतात. त्यामुळे ह्यावेळी ठरवलं की, आठ किलोमीटरनंतर दर नववं किलोमीटर चालून पूर्ण करेन.

१९ ऑगस्टला परभणीमध्ये बनसकर सरांसोबत ३६ किलोमीटर पळायचं ठरवलं. ते २१ किलोमीटर पळून मला पाणी व सपोर्ट द्यायला येतील, हे ठरलं. आत्तापर्यंत चांगला पाऊस सुरू झाल्याने हवामान आल्हाददायक आहे. उकाडा संपला आहे. पहाटेच्या अंधारात सुरुवात केली. माझ्या आवडीनुसार आणि गरजेनुसार सोबत पाणी, इलेक्ट्रॉल, एनर्जाल ह्याची सॅक घेतली. ८ किलोमीटर पळाल्यानंतर नववा किलोमीटर चाललो. आणि मग अठरावा किलोमीटरही चाललो. त्यामुळे लगेच काही फरक जाणवला नाही. २१ किलोमीटरसाठी २:२७ वेळ लागला, जो सोलो करताना व सामानासह करताना चांगलाच आहे. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर उजव्या पायामध्ये दुखायला लागलं. एक प्रकारचा क्रँप वाटला. एनर्जाल- पाणी पीत पीत पळत राहिलो. पण लवकरच पळणं खूप कठिण झालं. पायामध्ये ताण आला होता. कसेबसे २६ किलोमीटर चालत चालत पूर्ण केले. तिथे मात्र निरुपाय झाला आणि रन अर्धवट बंद करावा लागला. शेवटी ३६ ऐवजी फक्त २६ च पळू शकलो. मूव्हिंग टाईम ३.१४ आला आणि एलॅप्स्ड टाईम ३.३२ आला.

नंतर स्ट्रेचिंग केलं, आराम केला. पण पाय काही दिवस दुखला. हळु हळु कळालं की, हा क्रँप नसून स्प्रॅन (Sprain) होता. पायातल्या लिगामेंटमध्ये ताण आला आहे. इंटरनेटवर बघितल्यावर कळालं की, हा रनर्सला होणारा एक सामान्य त्रास आहे. आणि शक्यतो हे आपोआप काही आठवड्यांच्या आरामाने बरं होतं. त्यामुळे काही दिवस रनिंगमध्ये थोडी गॅप आली. पण सायकलिंग, योग, कोअर स्ट्रेंदनिंग, वॉकिंग हे सर्व सुरू होतं. अनेक महिन्यांपासून खूप नियमित वॉक करतोय (महिन्यात सुमारे ८० किलोमीटर), त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि चालण्याचा वेग फार वाढला आहे. रनिंगच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जो वेग होता, त्याहून जास्त वेगाने आता चालू शकतोय. आणि चालण्याचा हा वेग थकलेल्या स्थितीतील स्लो रनिंगहून थोडासाच कमी आहे. म्हणजे सामान्य रनिंग मी ९ किलोमीटर/ तास वेगाने करत असेन, तर २०- २५ किलोमीटर नंतर हाच वेग ८ किंवा ७.५ किलोमीटर/ तास होतो. पण वॉकिंग तर मला ६ किंवा ६.५ किलोमीटर/ तास वेगाने करता येतोय. म्हणजेच, मॅरेथॉनमध्ये जेव्हा माझी पळण्याची गती कमी होईल, तेव्हा मी सहजपणे उरलेलं अंतर चालत पार करू शकतो. अनेक रनर्सही असं करतात. असो.

काही दिवस रनिंगमध्ये ब्रेक घेतला. पायांमध्ये त्रास असा नव्हता. पुढच्या महिन्यात मॅरेथॉन पळण्याच्या आधी एकदा तरी ३६ किलोमीटर पळायला हवेत, असं वाटलं. एकदा तरी त्या लेव्हलला टच करणं आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी ३६ किलोमीटर पळायचं‌ ठरवलं. मॅरेथॉनच्या २५ दिवस आधी. त्यामुळे मॅरेथॉनपर्यंत तीन आठवड्यांचा वेळही मिळेल व त्यामुळे शरीर रिकव्हर होऊ शकेल. मोठ्या रनच्या संदर्भात शरीरातले जी पोषकतत्त्व व्यय होतात, ती परत रिचार्ज होऊ शकतील. २ सप्टेंबरच्या रनिंगच्या आदल्या रात्री शांत झोप लागली. आता २५- ३० किलोमीटर पळण्याची सवयच झाली आहे. एक प्रकारे मानसिक विरोध बराच कमी झाला आहे. विशेष असं काहीच वाटत नाही. बरचसं सायकल कधीही चालवावी, तसं सोपं झालं आहे. ह्यावेळी हे ठरवलं की, रनिंग करताना मध्ये थांबणारच नाही. पाणी, एनर्जाल असेल किंवा चिक्की असेल, ते घेताना किमान चालत राहीनच. आणि दर नवव्या किलोमीटरला वॉक करेन.

अपेक्षेप्रमाणे पहिले १५- १८ किलोमीटरपर्यंत काहीच त्रास झाला नाही. जेव्हा लांब अंतर पळायचं असतं, तेव्हा पेस सहज जमेल तसा ठेवावा लागतो. त्यामुळे जास्त जोर न लावता आरामात पळत राहिलो. पण तरी २१ किलोमीटर येईपर्यंत पायामध्ये दुखायला सुरुवात झाली. अर्थात् वेदना इतकी जास्त नव्हती की, चालताही येणार नाही. पण इतकी होती की, पळता येणार नाही. इंज्युरीचाही धोका होता. तेव्हा मग एक कठीण निर्णय घेतला आणि २१ किलोमीटरनंतरच्या १५ किलोमीटरसाठी चालायला सुरुवात केली. आणि इथे चालण्याचा सराव आणि आवड खूप उपयोगी पडली. वेग कमी होता, पण मन चालायला तयार होतं. चालताना काही त्रास नाही झाला. नंतर पाय थोडे जास्त दुखायला लागले व पुढे बूटही चावायला लागले. पण हे १५ किलोमीटर न थांबता चालत पूर्ण केले. मध्ये एक दोनदा स्ट्रेचिंग केलं होतं. शेवटी २१ किलोमीटर रन + १५ किलोमीटर वॉक असं करत ३६ किलोमीटर पूर्ण केले. वेळ असा लागला- मूव्हिंग टाईम ५:०५ आणि एलॅप्स्ड टाईम ५:१८. मूव्हिंग आणि एलॅप्स्ड टाईममध्ये फक्त १३ मिनिट अंतर होतं (कारण स्ट्रेचिंगच्या व्यतिरिक्त थांबलोच नाही). एक प्रकारे हा ३६ किलोमीटरचा लाँग रन मी ५:१८ वेळेत पूर्ण केला.

मला पाय दुखल्यामुळे १५ किलोमीटर चालावे लागले असले तरी आत्मविश्वास खूपच आला. पहिली गोष्ट म्हणजे अशा सोलो प्रकारे- सर्व सामान वाहून पळताना ३६ किलोमीटर पळणं हे मॅरेथॉन ईव्हेंटमध्ये ४२ पळण्यासारखंच आहे. कारण तिथे काहीही सामान न्यावं लागत नाही, सर्व सपोर्ट असतो. पाणी, एनर्जाल, केळं, चिक्की, जे हवं ते सगळं. तसंच त्या वातावरणाचाही बराच फरक पडतो जो मी हाफ मॅरेथॉन ईव्हेंटमध्ये अनुभवला होता. त्यामुळे असंच मानायला हवं की, मी ४२ किलोमीटर पूर्ण केले आहेत. आणि वेळ लागला ५:१८. अर्थात् मॅरेथॉनही इतक्याच वेळेत पूर्ण करू शकतो, हा विश्वास आला. अशा प्रकारे जवळजवळ मॅरेथॉन फिटनेस स्तरापर्यंत पोहचू शकलो. आत्मविश्वास खूपच वाढला. आता प्रतीक्षा पहिल्या मॅरेथॉनची आहे. पण... पण त्याआधी घडलं ते वेगळंच.

पुढील भाग- माझं "पलायन" ११ पुन: सुरुवात करताना

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानक्रीडाअनुभवआरोग्य