सरफरोश...

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
2 May 2019 - 5:45 pm

सरफरोश सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाल्याचे वाचनात आले. साहजिकच वीस वर्षांपूर्वी आपण काय करत होतो हा विचार डोक्यात आला. पण त्यात काही विशेष सांगण्यासारखं नाही. आणि आणखी वीस वर्षांनी हा प्रश्न पडल्यावरही उत्तर हेच असणार ह्यात शंका नाही. असो.

तर ९९ साली सरफरोश रिलीज झाला त्यावेळी मी आठव्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या.टीव्हीवर सरफरोशचं ट्रेलर बघितल्याचं मला पक्कं आठवतं. ट्रेलरमध्ये आमिरचे वडील त्याच्या कपाळावर टिळा लावतात तो प्रसंग आवर्जून दाखवयाचे. आता त्यादरम्यान (आणि त्यानंतरही!) देशभक्तीपर सिनेमाचं बॅटन सनी देओलच्या हातात होतं. आणि सनीच्या सिनेमात ह्या असल्या प्रसंगांची काही कमी नव्हती. त्यामुळे सरफरोशच्या ट्रेलरमध्ये विशेष असं काही वाटलं नाही.शिवाय त्यावेळी सिनेमाचं फारसं आकर्षण नव्हतं. आणि आलेला प्रत्येक सिनेमा पाहण्याची मुभासुद्धा नव्हती. ह्या आणि इतर असल्याचं कारणांमुळे मी त्यावेळी सरफरोश थियेटरमध्ये जाऊन पाहिला नाही.सरफरोशसारखे बरेच सिनेमे या ना त्या कारणाने थिएटरमध्ये बघायचे राहून गेलेत. त्यात प्रामुख्याने बॉर्डर, सत्या, दिल सें, मिशन काश्मीर आणि रेहना है तेरे दिल में चा मी आवर्जून उल्लेख करेल. आता हे सोडून काही सिनेमे मी थिएटरमध्ये का पाहिलेत ह्याचीही लांबलचक यादी आहे.

नंतर काही महिन्यांनी सरफरोश व्हिडीयो सिडी भाड्याने आणून पाहिला. आणि खरं सांगतो समजलाच नाही. कोण बाला ठाकूर, कोण वीरन, कोण सुलतान..आणि त्याचा नसिरुद्दीन शहाच्या गुलफाम हसनशी काय संबंध? अरे किती किचकट आहे हे सगळं. तेंव्हापर्यंत आम्ही पाहिलेल्या सिनेमात काय असायचं.तर एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर, त्याची हिरोईन आणि खलनायक म्हणून गावातला एक गुंडा किंवा भ्रष्ट राजकारणी. मग तो खलनायक सिनेमाभर हिरोवर अत्याचार करणार. आणि शेवटी हिरो त्याला धोपटणार. इतकी साधी सरळ मांडणी. अगदी आदल्या वर्षी आलेल्या आमीरच्याच गुलामची कथासुद्धा अशीच होती. (गुलामचं वेगेळेपण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे). पण सरफरोश वेगळाच होता. आणि तो समजून घेण्याची उमज तेंव्हा नव्हती. यथावकाश सरफरोश वारंवार बघण्यात आला. हळूहळू समजला आणि नंतर अंगात भिनला. गेल्या वीस वर्षात सरफरोश किती वेळा बघितलाय ह्याची गणतीच नाही. आजही तो टीव्हीवर दिसला की चॅनेल बदलल्या जात नाही. पण आजकाल ते यू टीव्हीवाले सरफरोश असा हायलाईट्स दाखवल्यासारखा का दाखवतात कळत नाही.
असो.

सिनेनिर्मितीच्या वेगवेगळ्या पातळींवर सरफरोश हा एक उत्कृष्ट सिनेमा होता. सगळ्यात आधी येते ती सरफरोशची कथा आणि पटकथा. सरफरोशची कथा वरकरणी एका पोलीस तपासाची कर्मकहाणी इतकी साधी वाटत असली तरी प्रचंड गुंतागुंतीची आहे. इतक्या घटना आणि व्यक्तिरेखा पटकथेत बांधणं म्हणजे खायचं काम नव्हे. माझ्यासारख्या नवख्या लेखकासाठी सरफरोशची पटकथा म्हणजे एक कार्यशाळा आहे. कुठल्याही व्यक्तिरेखेवर अन्याय न होऊ देता आणि त्याच वेळी ती व्यक्तिरेखा डोईजड होणार नाही ह्याची पुरेपूर खात्री ह्या पटकथेत घेतली आहे. उदाहरणादाखल आमिरची एसीपी राठोड म्हणून एन्ट्री होते तो प्रसंग बघा..इथे एक रिमांडमध्ये घेतलेला नगरसेवक आमिरची वाट बघत बसला असतो. तो हवालदारावर ओरडून म्हणतो,
"अबे बूला तेरे एसीपी राठोड को . मैं यहा पुरे दिन बैठने नही आया हू"
ह्या माणसाचं कथेत पुढे काहीच काम नाही. पण या छोट्या प्रसंगातून एकदंरीत सगळ्याच छोट्यामोठ्या नेत्यांची गुर्मी आणि आमीर त्याला ज्या सहजतेने धडा शिकवतो त्यावरून एसीपी राठोड काय चीज आहे ही बाब उत्तम पद्धतीने समोर येते. दुसरं उदाहरण मकरंद देशपांडेच्या शिवा ह्या व्यक्तिरेखेचं. हा शिवा पोलिसांच्या तपासात सतत व्यत्यय आणत असतो. त्यात कस्टडीत घेतलेल्या एखाद्या गुन्हेगाराला मारणं, एखाद्याला गायब करणं वगैरे गोष्टी येतात. शिवा ऐनवेळी कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणालाच कळत नाही. शिवाला फारसे संवादही नाही. पण एका प्रसंगात तो सुलतानला म्हणतो, "अपन को भाई जितना अक्कल नही है. पर कभी कभी लगता है अपना पेहलेवाला धंदा ही अच्छा था. ड्रग्स का.." गुन्हेगारीच्या अथांग समुद्रात शिवा ही एक छोटीशी मासोळी असते. आणि वाटत नसलं, तरी ह्याची त्यालाही पूर्ण कल्पना असते. सरफरोशच्या पटकथेत अश्या कितीतरी गोष्टी सहज मांडल्या आहेत. मतलबी मिरची सेठ, सगळ्या प्रकारात बळीचा बकरा बनलेला सुलतान ह्या सगळयांना पटकथेत स्वतंत्र अस्तित्व आहे.

इन्स्पेक्टर सलीम ही सरफरोश मधली सगळ्यात लक्षवेधी भूमिका आहे. आणि त्यासाठी मुकेश ऋषीहुन योग्य अभिनेता मिळालाच नसता. नोकरीच्या ठिकाणी धर्मामुळे सतत डावलल्या गेलेला आणि सगळ्यांच्या डोळ्यातला तिरस्कार पचवून इमानेइतबारे नोकरी करणारा इन्स्पेक्टर सलीम मुकेश ऋषींनी मनापासून साकारला आहे. एखाद्या सामान्य पटकथेत, एसीपी राठोडचा असिस्टंट म्हणून कोणीतरी हवा म्हणून एखादी दुय्यम दर्जाची भूमिका सहज लिहिता आली असती. आणि सरफरोश मुख्य कथेत त्याने काही फ़ारसा फरक पडला नसता. पण सलीमची भूमिका विचारपूर्वक लिहिण्यात आली आहे. आणि त्यानेच ही पटकथा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. एका विशिष्ट धर्मातील लोकांकडे सतत त्या विशिष्ट नजरेनेच बघण्याच्या प्रवुत्तीला सलीम छेद देतो. एका प्रसंगात एसीपी राठोडने सलीमला चिडून म्हणतो,
"सलीम ये मेरे मुल्क का मामला है."
"तो क्या मेरे मुल्क का नही है?"
"शायद नही है", एसीपी राठोड उत्तरतो.
या वाक्यानंतर सलीमच्या डोळ्यातले भाव पाहावे. जबरदस्त ! अपमानाचे दु:ख आणि चीड ह्याचं सुरेख मिश्रण. नंतरच्या एका प्रसंगात सलीम एका कट्टरतावाद्याला मुसलमान शब्दाचा अर्थ सांगतो. हा प्रसंग म्हणजे "दोन्हीकडच्या" कट्टरतावाद्यांना सणसणीत चपराक आहे.

आता वळूया सरफरोशच्या प्रमुख खलनायकाकडे. वरकरणी सरफरोशचा प्रमुख खलनायक म्हणजे पाकिस्तान सरकार आणि त्यांचा मुख्य मोहरा गझल गायक गुलफाम हसन आहे. पण दोघांच्याही खलनायकीचे मूळ वेगवेगळे आहे. पाकिस्तान सरकार भारतात दहशतवाद पसरवण्याच्या बेतात आहे. पण गुलफाम हसन त्याचा वैयक्तिक बदला घेतोय. पाकिस्तान सरकारच्या मदतीने त्याला भारतीयांचा बदला घ्यायचाय. पण त्याच वेळी एक कलाकार म्हणून स्वतःची गरिमा, मानसन्मान त्याला तितकाच प्रिय आहे. जगासमोर मनस्वी कलाकार म्हणून वावरणारा गुलफाम हसनचा दुसरा चेहरा अत्यंत क्रूर आहे. आणि त्याच्या क्रूरपणाची ओळख पडद्यवर तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवली आहे. त्याच्या रियाजात व्यत्यय आणणाऱ्या बकरीच्या पिल्लाचा कान तो ज्या निर्दयतेने उपटतो ते एखाद्या मानवी हत्याकांडाच्या प्रसंगापेक्षाही भयंकर आहे. फाळणीच्या वेळी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराला त्याने समस्त भारतीयांना परस्पर गुन्हेगार ठरवले आहे. शेवटी जेंव्हा गुलफाम त्याच्या दहशतवादी भूमिकेचं समर्थन देताना फाळणीचा संदर्भ देतो त्या प्रसंगाचं टेकिंग अफलातून आहे. त्याच्या लंगड्या समर्थनाला एसीपी राठोड तडक उत्तर देतो.
"गुलफाम हसन.. बटवारा हमारे लिये भी कोई खुशी का दिन नही था."
गुलफाम निरुत्तर होतो पण तरीही स्वतः ची भूमिका सोडत नाही.
तो म्हणतो," हमारे घाव बहोत गेहरे है..वो इतनी आसानी सें नही भरेंगे."
हा प्रसंग अखेरचा असला तरी कितीतरी प्रश्नांची मालिका सुरु करून जातो. ही अशी मानसिकता असल्यास दहशतवाद कधीतरी थांबेल का? दहशतवादाचं मूळ परिस्थितीत आहे की मानसिकतेत? परिस्थितीत असेल तर गुलफामवर जे अत्याचार लहानपणी झालेत त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आणि मानसन्मान त्याला परतफेडीच्या स्वरूपात मिळालंय. तर या परिस्थितीत गुलफाम हसन दहशतवादाकडे का झुकावा? बरं ज्या पाकिस्तानी सरकारसाठी गुलफाम काम करतोय त्यांच्या दृष्टीने तो केवळ एक मुहाजिर म्हणजे बाहेरचा व्यक्ती आहे. आणि ह्याचीही गुलफामला पूर्ण कल्पना आहे. तरीही तो त्यांच्याशी प्रामाणिक का आहे?

सरफरोश वेगळा आहे तो ह्यासाठीच. कारण केवळ एक पोलीस केस न राहता सरफरोश समाजातल्या कितीतरी गोष्टींवर भाष्य करतो. अभिनयाच्या बाबतीतीही सरफरोश समकालीन चित्रपटांपेक्षा सरस आहे हे वेगळे सांगायला नकोच. मध्यंतरी सरफरोशचा सिक्वेल येणार असं वाचण्यात आलं. असं काहीही घडू नये अशी मनोमन इच्छा आहे. काही कलाकृतींना परत छेडू नये. कारण त्यांचे धागे प्रेक्षकांच्या मनाशी जुळलेले असतात.

सरफरोशचा सिक्वेल बनवण्यापेक्षा सरफरोश परत थेटरात लावा रे. एसीपी राठोडचा तो डायलॉग थेटरमध्ये ऐकायची फार इच्छा आहे.

"क्या ठाकूर..तेरेको कितनी बार बुलाया तू आता नही है!!!"

समाप्त

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 May 2019 - 6:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

सरफरोश एकदम मनाच्या जवळचा सिनेमा आहे...

यातले इन्स्पेक्टर सलीमचे नेटवर्क दाखवताना जी पात्रे दाखवली आहेत ती पण लक्षात रहातात. उदा. फटका आणि त्याचे ते "आसमानसे टॅणण्याव" गाणे

किंवा आमिरखान जेव्हा सोनाली बेंद्रेला त्याच्या एनकाउंटरची गोष्ट सांगत असतो तेव्हा त्याला मिळालेला क्लू

किंवा मिर्चिसेठ आणि गुलफाम हसन मधला वाड्यातला भेटीचा प्रसंग एकदम अंगावर येतो.

असे किती तरी... तुमचा लेख वाचताना अक्खा सिनेमा डोळ्यापुढे नाचून गेला.

पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

9 May 2019 - 10:55 pm | ज्योति अळवणी

सगळीच मतं मान्य

शुभां म.'s picture

2 May 2019 - 6:10 pm | शुभां म.

सरफरोश बॉलीवूड मधला मला प्रचंड आवडलेला चित्रपट. अजूनही कितीही वेळा पाहू शकते .
कथा,पटकथा ,अभिनयाच्या क्षेत्रातील ऐक अप्रतिम कलाकृती म्हणता येईल .
धन्यवाद .................... अशा अजून चांगल्या चित्रपटाचे लेख वाचायला नक्की आवडतील.

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 6:11 pm | चौथा कोनाडा

क्या बात हैं ! एक नम्बर लेख !

चिनार _/\_

माझा पण भन्न्नाट आवडता सिनेमा.
खुप सुंदर पटकथा आणि टप्प्याटप्प्यने गुलफाम हसन पर्यंत पोहोचणे याची अप्रतिम वीण असलेला क्लासिक सिनेमा.
यावर लिहायचं झालंच तर वेळ काढून बसायला पाहिजे !

तेजस आठवले's picture

2 May 2019 - 6:52 pm | तेजस आठवले

मलापण हा चित्रपट आवडतो.
व्यक्तिरेखांचे प्रभावी चित्रण हा या चित्रपटाचा गाभा आहे. दणकट पोलिसी व्यक्तिमत्व नसतानाही आ.खा.ने आपल्या अभिनयाने बाजी मारून नेली आहे.
मकरंद देशपांडेने क्रूर,निर्दय आणि थंडपणे अपराध करणारा शिवा चांगला साकारला आहे.
राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होत असताना मुसलमान ह्या शब्दाच्या वेळेला बीप दाखवत होते.
पाकिस्तानातून आलेला दहशतवादी ह्या केसवर काम करणाऱ्या मुख्य भारतीय पोलीस अधिकाऱ्याला हटवतो, सुनील शेंडे आ.खा.चे वरिष्ठ अधिकारी असतात आणि भ्रष्ट नसतात त्यामुळे ते त्याला ह्या केसवरून दूर करण्याची ऑर्डर राखून ठेवतात.
ही बाब डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती.देश किती पोखरला गेला आहे ह्याचे ते दर्शन होते. त्यानंतर आज वीस वर्षांनी काय परिस्थिती आहे आपण बघतोच आहोत.

"साला जिस थाली में खाता है उसीमे छेद करता है."
"ये तो शनी कि दृष्टी वक्र हो गयी"
"कुत्ता आया है, सुंगने के लिये"

साहेब..'s picture

2 May 2019 - 7:03 pm | साहेब..

सरफरोश एकदम मनाच्या जवळचा सिनेमा आहे.
क्या बात हैं ! एक नम्बर लेख !

खिलजि's picture

2 May 2019 - 7:43 pm | खिलजि

सुंदर लिहिलं आहे ,, चिनारशेट ... तसाही आपला खास ठेवणीतला शनिमा व्हता .. सालं टोपी घालून मिरवायचं स्वप्न स्वप्नच रहायल

शेंडेनक्षत्र's picture

2 May 2019 - 8:22 pm | शेंडेनक्षत्र

सिनेमा जबरदस्त आहे. पण त्यातील मुस्लिम, इस्लाम वगैरे गोष्टी नेहमीप्रमाणे दाखवलेल्या आहेत. इस्लाम कसा थोर आहे आणि काही लोकांनी त्याला बदनाम कसे केले आहे. हिंदू आणि मुस्लिम सारखेच वाईट कसे असू शकतात वगैरे ट्या ण ट्या ण ट्या ण इथेही आहे. ते खोटे आहे. मुसलमान म्हणजे इमान असणारा वगैरे ऋषी वाणी खोटी आहे. तसेही इमान ह्या शब्दाचा इस्लामला अभिप्रेत अर्थ वेगळा आणि कमालीचा धार्मिक आहे.
इस्लामचे एक मुख्य तत्व म्हणजे कुराण हा देवाचा अखेरचा शब्द आहे. महम्मद चे वागणे हे पूर्ण आदर्श आहे. एका कालबाह्य ग्रंथाला परिपूर्ण दाखवण्याची केविलवाणी कसरत मुस्लिम करत असतात. मूळ ग्रंथ इतका विसंगत आहे की कुणी कसाही अर्थ लावू शकतो. आणि हे खरे समस्येचे मूळ आहे.

मराठी कथालेखक's picture

6 May 2019 - 1:48 pm | मराठी कथालेखक

विषयांतर झाले आहेच तर मी ही माझे मत थोडक्यात मांडू इच्छितो..

मूळ ग्रंथ इतका विसंगत आहे की कुणी कसाही अर्थ लावू शकतो. आणि हे खरे समस्येचे मूळ आहे.

माझा कुराणचा अभ्यास नाही पण 'शककर्ते शिवराय' या शिवचरित्रावरुन कुराणाचा परिचय झाला.
तुम्ही म्हणता आहात ते खरेही असेल..
पण काही वेळा काही समस्या मुळातून सोडवणे खूप कठीण असते.. आणि ते होईपर्यंत त्यावर व्याहवारिक तोडगा काढणेच गरजेचे असते.
मूळ ग्रंथात त्रुटी आहेत, विसंगती आहेत हे मान्य केले तरी त्यात आता बदल करणे खूप कठीण आहे .. तो ग्रंथ 'अपरिवर्तनीय' मानलेला आहे. त्यात त्रुटी आहेत हे व्यक्त करणेही कठीण असताना त्यात बदल कसा करणार ? अशा वेळी सामान्य , शांतताप्रिय लोकांनी काय करायचे ? धर्मांतर वगैरेही सोप्या गोष्टी नाहीतच ना ? धर्मात राहून ग्रंथही नाकारता येत नाही.. मग त्यापेक्षा त्या ग्रंथाचा आपल्याला योग्य तो अर्थ लावत तो अर्थ जनमानसात रुजवावा आणि जे कुणी चुकीच्या/हिंसक मार्गाने चालले आहेत त्यांनी चुकीचा अर्थ लावला आहे असाच प्रसार करणे जास्त व्याहवारिक ठरते.
देवत्व लाभलेल्या गोष्टीतल्या उणीवा काढून त्या सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या झाकून त्यांना दाबणे जास्त ईष्ट ठरते.
असो.. हा स्वतंत्र विषय आहे.. माझा विशेष काही अभ्यास नाही त्यामुळे मी धागा काढू शकत नाही पण कुणी अभ्यासपुर्ण धागा काढला तर व्यक्त होता येईल.

शेंडेनक्षत्र's picture

2 May 2019 - 8:28 pm | शेंडेनक्षत्र

दिग्दर्शक असे परखड सत्य दाखवू शकत नाही.

चित्रगुप्त's picture

2 May 2019 - 8:34 pm | चित्रगुप्त

एका उत्तम चित्रपटाचे कसदार परिक्षण.

चित्रगुप्त's picture

2 May 2019 - 8:34 pm | चित्रगुप्त
उगा काहितरीच's picture

3 May 2019 - 8:40 am | उगा काहितरीच

चित्रपट एवढा नाही आवडत , पण तुमचा लेख आवडला.

नमकिन's picture

3 May 2019 - 8:56 am | नमकिन

सोनाली बेंद्रे सारखी खेटून असणारी प्रेयसी असावी असे सतत वाटायचं.....

एकदाच पाहिलाय आणि झेपला नाही. पुन्हा निवांत पहायला हवा. होशवालोंको खबर क्या तेव्हा फार फार आवडलं होत.

विजुभाऊ's picture

3 May 2019 - 10:18 am | विजुभाऊ

या चित्रपटातले " इस दिवाने लडके को , कोई ये समझाये " हे गाणे खूप सुंदर चित्रीत केलंय. गाण्यातील रंगसंगती , दोघाम्च्याही चेहेर्‍यावरचा टवटवीतपणा खूपच छान टिपलाय. त्यातला तो एन सी सी परेड चा प्रसंग झकासच

चौथा कोनाडा's picture

10 May 2019 - 5:52 pm | चौथा कोनाडा

+१

हेच बोलणार होतो !

एनसीसी परेड होश वालोंको खबर क्या ह्या गाण्यात आहे. त्यात जवळ जवळ सगळीच फ्लॅशबॅक लव्हस्टोरी आहे.

श्वेता२४'s picture

3 May 2019 - 10:51 am | श्वेता२४

आणि संवाद खूप आवडतात. मला हा सिनेमा आवडतो पण तुमचे लेखन त्यापेक्षा जास्त आवडले.

नाखु's picture

3 May 2019 - 11:46 am | नाखु

मस्त लिहिले आहेस रे.
बाला ठाकूरच्या घरी झाडाझडती आणि स्थानिक पोलिसाची लाचखोरी हा प्रसंग लक्षवेधक आहेत.
एकूणच संपूर्ण सिनेमा सरधोपट काळा,पांढरा रंगात न सजवता मधल्या करड्या (कडवट) रंगाची छटा बेमालूमपणे दाखवून दिल्या आहेत असे आमच्या"ह्यांचे" मत....

पुन्हा एकदा मिसामा
उन्हाळ्यात प्रकृतीची काळजी घेणे

नया है वह's picture

3 May 2019 - 12:28 pm | नया है वह

क्या ठाकूर..तेरेको कितनी बार बुलाया तू आता नही है!

सही!!

आमीर खान त्या काळातही ब्राण्ड कॉन्शस होता, त्याच्या कॉलेजलाईफमधली मोपेडही हीरो पुक दाखवली आहे. त्याने त्या मोपेडच्या जाहिरातीमध्ये आधी काम केलेले होते.
बाकि डीटेलिंग आणि कास्टिंग भारी होते पिक्चरमध्ये. जवळपास सारेच कॅरेक्टरचा अभ्यास करुन कास्टिंग केलेले स्पष्ट कळत होते. मुकेश ऋषी, यादव, अखिलेंद्र मिश्रा, नसिरुद्दीन शहा, सोनाली बेन्द्रे, स्मिता जयकर, गोविन्द नामदेव, सुकन्या, आकाश शर्मा स्पेशली आता गाजणारा नवाझुद्दीन वगैरे सारेच कास्टिंग दाद देण्यासाऱखे. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मथान खरे तर अ‍ॅटेनबरो, निहलानी सोबत असिस्ट केलेला माणूस. शिवाय जाहिरातींचा चांगला अनुभव असल्याने सात वर्षाच्या प्री प्रॉड्क्शन प्रोसेस मध्ये तयार झालेला सरफरोश ही एकच चांगली कलाकृती त्याच्या खात्यात लागली. बाकी शिखर आणि अजुन एका फ्लॉपनंतर मथान दिसलाच नाही.

जव्हेरगंज's picture

3 May 2019 - 10:12 pm | जव्हेरगंज

जिंदगी मौत ना बन जाएsss

खूप वेळा बघितलाय हा सिनेमा आणि हे गाणंही!!

लौह धातू से खतरा हैं तेरेको, तू लगातार मृत्युंजय मंत्र का जाप कर, अगर बला टल गयी तो सौ साल जियेगा.

अन्या बुद्धे's picture

4 May 2019 - 1:24 pm | अन्या बुद्धे

झकास लिहिलंय.. कधीही अगदी अर्ध्यातून देखील पाहतो मी हा.. जेंव्हा जमेल तेंव्हा..

टीपीके's picture

4 May 2019 - 4:15 pm | टीपीके

छान लिहिले आहे. चित्रपटही छान आहे. जॉन मॅथ्यू मॅथन कडून खूप अपेक्षा होत्या, पण नंतर गायबच झाला तो.
माझा आवडता संवाद म्हणजे,
एक बार आदमिके हातोमे बंदूक पकडादो या चिलीम, गोलिया तो उसे लगनीही है

आनन्दा's picture

5 May 2019 - 8:21 am | आनन्दा

खरे तर इतक्या चांगल्या परीक्षणाला गालबोट लावायची इच्छा नाही.
परंतु ते इस्लामचे संवाद म्हणजे खरेच उगाचच ओढुन ताणुन टाकलेले वाटतात.
बाकी चित्रपट छान आहे.. त्या काळात तो जास्त आवडायचा. आतादेखील टीव्हीवर लागला कधी तर बघतो, पण आता बघण्याचे आणि विशेषतः जाणीवांचे संदर्भ बदललेत, त्यामुळे तो इतका मनाला भिडत नाही इतकेच.

अभ्या..'s picture

6 May 2019 - 1:02 pm | अभ्या..

अ‍ॅक्चुअली,
इस्लामचे संवाद फक्त मुकेश ऋषीच्या कॅरेक्टरसाठीच ओढून ताणून इस्लाम उदात्तीकरणासाठी वाटतात, अर्थात मुख्य शत्रु पाकिस्तान आणि नंतर त्याचे पंटर भारतातले म्हणल्यावर हे मस्टच असणार.
गंमत म्हणजे सलीम सुरुवातीला टेरिफिक हुशार आणि डॅशिंग एक फाईट सुलतानसोबत आणि खबरी नेटवर्क जबरदस्त असणारा दाखवलाय. एकदा आमीर सोबत काम करायला लागल्यावर तो सतत सोबतच दाखवला आहे पण इतकी तब्येत, दिमाग आणि नेटवर्क असताना प्रत्येक गोष्टीत अर्धवट कामगिरी. दोन वेळा आमीरवर हल्ला होताना तो सगळं झाल्यावर येतो, ठाकूरच्या खेडा नाका फाईटला ठाकूरचे लोक एकतर मरतात किंवा पळून जातात. आमीरने सांगितल्याप्रमाणे कोणी जिवंत सापडत नाही, एक खबर मिळूनही व्हिक्टोरियावरच्या रेडवरही शिवा व हाजी पळून जातो, बाहीदला तो महाभारतातला नारदमुनी, मनोज जोशी आणि हवालदार गाजवतात. लास्ट फाईटलाही एक शफीला लोकांच्या साहाय्याने पकडणे आणि रिव्होल्व्हर आमीरखानला देणे इतकीच कामगिरी त्याची दाखवली आहे. बाकी डॉयलॉग मात्र जोरात हाणतो.

दुर्गविहारी's picture

5 May 2019 - 11:05 am | दुर्गविहारी

खुपच छान परिक्षण लिहिले आहे. मायबोलीवर सातत्याने चित्रपट परिक्षण येत असतात. मात्र ईथे मि.पा.वर अशी परिक्षण फारशी येत नाहीत. निदान तुम्ही लिहा.

बाकी सरफरोश खुप आवडतो. कित्येक वेळा पाहिला आहे. गाणीही तितकीच कर्णमधुर आहेत. ऐरवी सोनाली बेंद्रेचे फारसे चित्रपट पाहिले नाहीत, यात मात्र ती कातिल दिसतो. "जो हाल दिल का ईधर हो रहा है" हे गाणे पन्हाळ्यावर शुट झाल्याने जास्त जवळचे. बाकी तिची बडबड असह्य असली तर चेहर्याकडे बघून दुर्लक्ष करतो. ;-)
बाकी प्रत्येक पात्र सक्षक्त अशा खुप कमी पटकथा असतात. सरफरोश नक्कीच त्यातील एक.

मात्र आमिरखान कधीही वर्दीत दिसत नाही हि खटकलेली गोष्ट. पु. ले.शु.

मराठी कथालेखक's picture

6 May 2019 - 12:29 pm | मराठी कथालेखक

सरफरोश मी पुर्ण असा एकदाच पाहिला आणि तुमच्याप्रमाणेच मी पण तो सीडी भाड्याने आणून पाहिला होता, तुमच्या प्रमाणेच मलाही अनेक पात्र वगैरे यांमुळे काहीसा किचकट वाटला पण तरीही आवडला. यातली खास गोष्ट म्हणजे या गुन्हेगार की दहशतवाद्यांनी नायकाच्या जवळच्या नातेवाईंकाला मारलेले असते (आता नक्की आठवत नाही..भाऊ मारला जातो आणि वडील अपंग होतात असं काहीसं आहे ना ?) त्यानंतर नायक पोलिसदलात भरती होतो. पण वैयक्तिक सूड वगैरे तो घेत नाही तर गुन्हेगारी कमी होण्याकरिता लढतो. वैयक्तिक सूड टाळल्यामुळे थोडा अधिक वास्तव वाटला.
बाकी गाणी मस्तच आहेत .. मल 'ये जवानी हद कर दे' हे कविता कृष्णमुर्तीचं गाणं विशेष आवडतं. एकेकाळी ही माझी सर्वात आवडती गायिका होती..

महासंग्राम's picture

7 May 2019 - 9:21 am | महासंग्राम

सोनू साठी अजूनही कितीतरी वेळा पाहू शकतो सरफरोश :P <३

बाकी भौ लै झ्याक लिवलंय बरं का !

No offense meant पण हा लेख आधी कुठे प्रकाशित झाला आहे का? वाचल्या सारखा वाटतोय.
1