लग्नसराई ...

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
29 Apr 2019 - 2:37 pm

आज लग्नाचा मुहूर्त आहे बहुतेक..

रस्त्यात एक वरात पाहिली. जादूगारासारखा जाडाभरडा वेष घातलेला आणि घामाने लथपथलेला नवरा मुलगा..
वरती सूर्य आज फिफ्टी मारण्याच्या तयारीत आहेच..

बकरा हलाल करण्याआधी भाजून काढण्याची ही कुठली अमानुष पद्धत..!!

तिकडे नवरीची परिस्थिती फार काही वेगळी नसते..
चेहऱ्यावर अर्ध्या इंचीचा मेकअप अन चमकी थापलेली..स्वत:च्या वजनाच्या दुप्पट असलेला पेहराव..
तो पायात येऊन पडू नये म्हणून आसपास सतत दोन-चार बहिणींचा जागता पहारा..

आता लोकं ह्यांच्या डोक्यावर अक्षता फेकून मारणार. मग हे दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार.

नंतर सुलग्न लावण्याच्या नावाखाली लोकं ह्यांची डोकी एकमेकांवर आपटवणार..फेट्यातूनही कवटीला मार बसेल असा इंपॅक्ट असतो त्याचा..अश्या पाहुण्यांसाठी लग्नात बाउंसर्स का ठेवत नाही कोण जाणे?

त्यात तो फोटोग्राफर नावाचा शनी ह्यांची प्रत्येक हालचाल वक्रदृष्टीने टिपत असतो. त्यामुळे चेहरा हसरा ठेवायचा. आजकाल तर कॅन्डीड फोटोसाठी प्रत्येक हालचाल तीन-तीनवेळा करायला लावतात म्हणे! दोन-चार महत्त्वाचे फोटो काढल्यावर ह्याच्या मुसक्या बांधून खोलीत बंद का करत नाहीत कोण जाणे?

वरती सूर्याची फिफ्टी झालेली आहे. सेटिंग स्टॅन्डबाय मोडवर ठेऊन तो लंचला गेलाय... आता ही दोघं बसणार होम-हवनासाठी...अगागागा..

सकाळपासुन पोटात पाण्याशिवाय काहीच नाही, असह्य गरमी आणि समोर बफेत लोकं आईस्क्रीमचे गोळे भातात कालवून खातायेत.

अश्या परिस्थितीत गुरुजी ह्या दोघांना साताजन्माचे वचनं घ्यायला सांगतात. कंटाळून "नाही" किंवा चिडून "हो" म्हणण्याशिवाय कोणताच पर्याय समोर नसतो. म्हणजे मी तर गुरुजींना सुटकेच्या बदल्यात इस्टेट लिहून दिली असती.

मग मंगळसूत्र वगैरे घालून झाल्यावर सप्तपदी सुरु होते. परत त्या फोटोग्राफरला चेव येतो. सप्तपदीच्या प्रत्येक पावलाचे तीन आवर्तनं होऊन त्याची एकवीसपदी होते.

एव्हाना पाहुणेमंडळी बफेतलं जेवण पचवून एक झोपसुद्धा झालेली असते. आता विहिणीच्या पंगतीची वाट बघत बसतात बिचारे. कार्यालयात एकंदरीतच मरगळ आलेली बघून "अरे काही घाईच नाही या लोकांना..चाललंय सगळं आरामात" अशी एखादी टिपणी येते.

शेवटी विहिणीची पंगत सुरु होते. दोघं बिचारे पहिला घास घेणार तेवढ्यात उखाणा घेण्याची मागणी येते. शहाण्या माणसाने इथं थोडं सांभाळून वागावं. कारण एकतर उखाण्याइतका पांचट साहित्यप्रकार दुसरा कुठलाच नाहीये. त्यामुळे त्यासाठी आग्रह करणं म्हणजे शास्त्रीय संगीताची सुंदर मैफील ऐकून तृप्त झाल्यावर झिंगाटची फर्माईश करण्यासारखं आहे. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नवदाम्पत्याला घास घेताना अडवल्यावर अख्ख्या लग्नाचं फ्रष्ट्रेशन तुमच्यावर निघू शकते. त्यामुळे ह्या भानगडीत पडूच नये.

पण आपलं कोणी ऐकते का?? चालू द्या...

शेवटी लग्न म्हणजे तरी काय असतं...?

हौस असते एकेकाची... !!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

29 Apr 2019 - 4:29 pm | महासंग्राम

त्यात तो फोटोग्राफर नावाचा शनी ह्यांची प्रत्येक हालचाल वक्रदृष्टीने टिपत असतो.

चिनार शेठ एकाबाजूने विचार झाला हा, यात फोटोग्राफरची काहीच चूक नाहीये त्या वेळेला दृष्टी वक्र केली नाही तर नंतर अल्बम मध्ये एखादी आत्या किंवा मामा यांचा फोटो नसला तर ती रुसून बसते आणि फोटोग्राफरच पेमेंट कट होते.
राहिला कॅन्डीडचा प्रश्न तर आपल्याकडे क्लायन्ट तुनळीवर/फेसबुकवर भारीतले लग्नातले फोटो पाहतो आणि तसेच आपलेपण फोटो येण्याची इच्छा मनी धरतो. अशी कल्पना करणं काहीच चुकीचं नाहीये, हे करतांना फोटोग्राफरला दिलेलं बजेट, त्याला फोटो साठी दिलेला वेळ मुख्य म्हणजे नवरा-नवरी मधलं बॉण्डिंग, आजूबाजूचं वातावरण याचा कोणीच विचार करत नाही. आता विदर्भात फेब्रुवारी पासून सूर्यदेव मी मी म्हणत आग ओकतो. आता ४५ डिग्री मध्ये नवरदेवाच्या ०३ किलोच्या आणि नवरीने जवळपास तेवढ्याच वजनाच्या नेसलेल्या शालू घालून घामाजोकळ झालेल्यांचे कसे कॅन्डीड काढायचे. कॅन्डीड क्षण टिपायला दोघांचं त्या क्षणाला बॉण्डिंग होणं महत्वाचं असतं.हे क्लायंटला किती जरी समजावलं तरी समजत नाही मग २-३ घेऊन फोटो काढावेच लागतात, कारण पापी पेट का सवाल है.

एकच म्हणेन आओ कभी ऑर्डर पे

भाऊ एवढं मनावर घेऊ नका हो..
फोटोग्राफी किती किचकट आहे ह्याची कल्पना आहे. आणि फोटोग्राफर्सच्या कलेला आणि पेशन्सला आपला सलाम आहे.
पण एकंदरीतच सगळ्या समारंभात फोटोग्राफीचे अवडंबर खूप जास्त वाढले आहे असे मनापासून वाटते.
समारंभ, विधी राहिला बाजूला आणि फोटो जास्त महत्त्वाचा अशी परिस्थिती आहे. अर्थात त्याला फोटोग्राफरचं जबाबदार आहे असे काही नाही..
मी मागे एकदा लिहिलं होतं ते परत लिहितो..
"कधीकाळी फोटो म्हणजे त्या प्रसंगाच्या आठवणी असायच्या..
आजकाल आठवणी म्हणजे त्या प्रसंगी काढलेले फोटो असतात.."

बाकी लेखातला विनोद तेव्हढा घ्यावा ही विनंती..

फुटूवाला's picture

2 May 2019 - 3:22 am | फुटूवाला

आओ कभी आॅर्डर पे

सुबोध खरे's picture

30 Apr 2019 - 12:46 pm | सुबोध खरे

लेख उत्तम आहे.

बहुसंख्य लोक गतानुगतिक असतात आणि "असंच करायचं असतं" म्हणून किंवा "चार लोक काय म्हणतील" म्हणून अनेक भंपक आणि न पटणाऱ्या गोष्टी लग्नात चालवून घेतात.

फोटोग्राफर वेगवेगळ्या प्रकृतीचे असतात काही शांत असतात तर काही महा आगाऊ असतात.
माझ्या पुतणीच्या लग्नात असलेले फोटोग्राफर अत्यंत शांत आणि हसतमुख असे होते. त्यांचे फोटोग्राफीचे कौशल्य वादातीत आहेच. (हे नंतर फोटो पाहिल्यावर लक्षात येतेच). परंतु एकंदर पोज देताना कोणताही शहाणपणा न करता शांतपणे समजावून सांगत असता कि असा फोटो काढला तर जास्त चांगला येईल.समारंभात कधीही कोणत्याही विधीमध्ये त्यांनी थांबायला सांगितले नाही इतकंच नव्हे तर एखादा आगाऊ माणूस मध्ये आला तरी अतिशय सबाह्य आणि शांत शब्दात त्याला थोडंसं बाजूला होता का अशी विनंती करत असत.

त्यांनी काढलेले सर्व फोटो एका पेनड्राइव्ह वर टाकून आमच्याकडे दिले आणि त्यातील हवे ते फोटो प्रिंट करून अतिशय कल्पकतेने सुंदर अल्बम बनवून दिला निवडक १२ फोटोंची सुंदर कॅलेंडर्स बनवून घरच्या/ कार्यलयात टेबलावर ठेवायला दिली.

याच उलट तिच्याच साखरपुड्याला असलेले फोटोग्राफर अत्यंत आगाऊ होते. उगाच आपल्यालाच सर्व कळतंय असा चेहरा घेऊन फिरत होते. असा फोटो येणारच नाही असे सांगत तुम्हाला काहीच अक्कल नाही असा चेहऱ्यावर भाव. नको तेथे विधी मधेच थांबवून उगाच नवरा बायकोला गळ्यात गळे घालून फोटो काढायला लावले.
नंतर बहुसंख्य फोटो मात्र भिकार( अंडर एक्सपोज्ड आणि धूसर) आले तेंव्हा सबबी सांगत होते.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.

काही लोकांना वास्तवापेक्षा अवाजवी दिखाऊपणा करायचा असतो, म्हणून आभासी कल्पनांमुळे वास्तवात त्रास सहन करावा लागतो.