लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ७

Primary tabs

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
29 Apr 2019 - 7:07 am

(भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाण मुख्यतः "दिल्ली, बहादूरशहा आणि १८५७" या बद्दलचे होते. या मालिकेतील पुढील भाग जरी विषयाशी संबंधित असतील तरी "अवांतर " म्हणायला हरकत नाही.)

भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
भाग ३: http://www.misalpav.com/node/44375
भाग ४: http://www.misalpav.com/node/44381
भाग ५: http://www.misalpav.com/node/44386
भाग ६ : http://www.misalpav.com/node/44424

१८५७ नंतर एक "जमात"च संपुष्टांत येऊ लागली कारण त्यानंतरच्या काळांत या जमातींत नवीन कुणी "पैदा" होण्याचेच थांबले. या "जमाती"चे वर्णन वेगवेगळ्या तऱ्हेने केले जात असे आणि त्यावरूनच या "जमाती"चे स्वरूप आपल्या लक्षांत येईल. या जमातीतले लोक "तालेवार" गोरे असूनसुद्धा गोऱ्या लोकांच्या पद्धतीने राहता राहता हिंदुस्थानी किंवा मुघल पद्धतींच्या प्रेमात पडून आपली राहणी पूर्णपणे हिंदुस्थानी किंवा मुघल पद्धतीची करून टाकत. हा बदल फक्त चिरूट किंवा पाईपऐवजी हुक्का ओढणे अथवा खुर्च्यांवर बसण्याऐवजी लोड, तक्के वापरून उंची गालिचावर (भारतीय बैठक) बसणे अशा सारख्या बाह्यस्वरूपाच्या गोष्टींपुरताच मर्यादित न रहाता अनेक हिंदुस्थानी स्त्रियांशी लग्न करणे (किंवा संबंध ठेवणे) आणि त्यातून होणाऱ्या मुलांना सरसकट औरस मुलांसारखे वाढवणे हे देखील या जमातींत होत असे. या जमातीला white Mughals, English Nabobs किंवा Orientalists अशी वेगवेगळी नांवे होती. हिंदुस्थानी किंवा मुघल पद्धतीप्रमाणे त्यांना करमणुकीकरता 'Nautch" (नाच) हवा असे आणि त्यांना उर्दू, फारसी किंवा कधी कधी संस्कृत अशा हिंदुस्थानी भाषांमध्ये देखील रस आणि गती असे. म्हणजेच या गोऱ्या (फक्त इंग्रजच नव्हे तर इतर गोरे European सुद्धा) लोकांना त्यांच्या आधीच्या जीवनपद्धतीपेक्षा हिंदुस्थानी जीवनपद्धत जास्त आवडू लागल्याने (आणि जास्त जवळची वाटल्याने) त्यांनी स्वतःला आमूलाग्र हिंदुस्थानी करून टाकले होते. ते जन्मतः गोरे असल्यानें त्यांतून मिळणारे privileges त्यांना अर्थातच मिळत होतेच. थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास या "जमाती"तल्या लोकांना हिंदुस्थानी किंवा गोऱ्या दोन्हीही जगातली सगळी सुखे,वैभव आणि राहणीमान उपलब्ध असले तरी त्यांचा कल हिंदुस्थानी जीवन पद्धतीकडे होता.

दिल्लीचे एकेकाळचे British Resident (नांवापुरते इंग्रजांचे दिल्लीतील प्रतिनिधी पण प्रत्यक्षांत इंग्रजांच्यावतीने दिल्लीतील सगळा कारभार पहाणारे कुलमुखत्यार) मेजर जनरल सर डेव्हिड ऑक्टरलोनी हे या जमातीतल्या लोकांचे एक उत्तम उदाहरण होते. अमेरिकेत जन्मलेला आणि शिकलेला हा स्कॉटिश मनुष्य १७७७ साली वयाच्या १८व्या वर्षी हिंदुस्थानातल्या इंग्रज फौजेत शिपाई म्हणून भरती झाला. त्यानंतर अनेक लढायांमधल्या त्याच्या पराक्रमामुळे याची मेजर जनरलच्या हुद्द्यापर्यंत प्रगती होत वेगवेगळ्या राज्यांमध्ये British Resident म्हणून नियुक्तीही झाली. त्यापैकी १८०३ ते १८०६ आणि १८१८ ते १८२० अशा दोन काळांमध्ये दिल्लीचे British Resident पद हेही होते. त्यांचे हिंदुस्थानी लोकांमधले, लोकांना समजेल असे स्थानिक नांव होते "अख्तर लूनी" पण त्यांना त्यांच्या बादशहाने दिलेल्या "नासिर-उद -दौला" (Defender of the State) या किताबाने संबोधिलेले जास्त आवडे. त्यांच्या एकूण १३ "राण्या" होत्या आणि रोज संध्याकाळी "नासिर उद्दौला" आणि त्यांच्या १३ राण्या प्रत्येकी एका सजवलेल्या हत्तीवरून काश्मिरी दरवाजातून दिल्लीबाहेर पडून मिरवणुकीने एक फेरफटका मारून येत. यांची लाडकी "राणी" मुबारक बेगम हिने स्वतःचे इंग्रजी नांव "Lady Ochterlony" वापरून इंग्रजी समाजाचा रोष ओढवीन घेतला होता तर उर्दू नांव "कुडसिया बेगम" घेऊन दिल्लीतल्या मुस्लिमांचा राग ओढवून घेतला होता (कारण ते बादशहाच्या आईचे नांव). मुघल बादशहा शहा आलमच्या कृपेनें यांना दिल्लीत खूप मोठी जमीन मिळालेली होती आणि तेथे त्यांनी आपल्याकरता उत्तम बाग-बगीचा तयार करवून घेतला होता. त्यांच्याकरता म्हणून दिल्लीत बांधून ठेवलेली, मुघल शैलीतली छत्री (ज्या इमारतीमध्ये मृत्यूनंतर थडगे/समाधी बांधले/बांधली जाते), त्यांचा मृत्यू मेरठला झाल्याने काही काळ बिनवापरता रिकामी राहिली आणि नंतर १८५७च्या गदारोळांत उध्वस्त झाली.

जेम्स कर्कपॅट्रिक हे देखील असेच एक चांगले उदाहरण ठरेल. मद्रासमध्ये (आता चेन्नई) जन्मलेला आणि इंग्लंडमध्ये शिकलेला हा इंग्रज बऱ्याच काळापासून हिंदुस्थानी वातावरणांत वावरत होता. १७३८ साली त्याचे वडील केंट, इंग्लंडहून व्यापाराकरता मद्रासला आले. १७६२ साली त्यांनी मद्रासलाच तिथल्या अँड्र्यू मनरो या इंग्रज डॉक्टरांच्या कॅथरीन या मुलीशी लग्न केले. त्यांच्या मुलांपैकी विल्यम आणि जेम्स या दोघांनाही ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत नोकरी मिळाली. दोघांनाही फारसी, उर्दू आणि एकूणच हिंदुस्थानी कला आणि भाषा यांत रस आणि गती होती. अठराव्या शतकाच्या शेवटी विल्यम कर्कपॅट्रिक हैदराबाद (निजाम) दरबारांत British Resident म्हणून नियुक्त झाल्यावर त्याने आपल्या धाकट्या भावाला आपला मदतनीस म्हणून बोलावून घेतले. कांही काळाने विल्यम कर्कपॅट्रिकच्या जागी जेम्स कर्कपॅट्रिक British Resident म्हणून नियुक्त झाल्यावर, त्याचा आपल्या अवतीभोवतीच्या "हिंदुस्थानी" वातावरणाशी संबंध आणखीनच दृढ झाला. नवाब महमूद अलीखान (अकील उद्दौला हा कदाचित यांचा किताब असावा) या हैदराबादच्या पंतप्रधानांच्या घराण्याचा पैगंबर महंमद यांच्या घराण्याशी संबंध असल्याने हे हैदराबादचे एक अतिप्रतिष्ठित घराणे होते. खैरुन्निसा या त्यांच्या १४ वर्षांच्या नातीला जेम्स अतिशय आवडल्यामुळे तिने त्याच्याशी आपले लग्न जुळवून आणले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला हिंदुस्थानातील इंग्रजांमध्ये या "प्रकरणा"नें इतकी खळबळ उडाली की कांही उच्चपदस्थ इंग्रजांना तर जेम्स कर्कपॅट्रिकच्या "double agent" बनण्याची भीति वाटू लागली होती. निजामाच्या मर्जीतल्या या इंग्रजाला निजामाकडून मुतामिन-उल-मुल्क (Safeguard of the kingdom), हश्मत-जंग (Valiant in battle), नवाब-फक्र-उद्दौला बहादूर (Governor, pride of the state, and hero)अशी अनेक बिरुदे मिळाली होती.

आंत्वान-लुई-हेनरी पोलीए (Antoine-Louis-Henri Polier) हा आणखी असाच एक हिंदुस्थानी झालेला गोरा होता. हा स्वित्झर्लंडमधला फ्रेंच मनुष्य रॉबर्ट क्लाईव्हच्या वेळेपासून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यांत मुख्यतः तंत्रज्ञ म्हणून काम करतांनाच इतर अनेक "उद्योग" करत असे. त्यांत ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांनुसार स्वतःकरता व्यापार करणे, ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक उच्च अधिकारी वर्गाची येन केन प्रकारेण मर्जी सांभाळत अवधसारख्या मोठ्या राज्यांशी (स्वतःच्या व्यापाराकरता) संबंध राखणे आणि या नबाब, राजे, इ.इ. विलासी लोकांना युरोपांतून आणलेल्या उंची वस्तू विकणे तसेच या सगळ्या ठिकाणांहून अनेक मौल्यवान "जुन्या" वस्तू (मुख्यतः संस्कृत, फारसी आणि अरबी हस्तलिखितें) जमवणे अशा "उद्योगांचा" समावेश होता. या सगळ्या उलाढालींकरता त्याचा बऱ्याच ठिकाणी विखुरलेला नोकरवर्ग होता आणि तो पूर्ण उत्तर हिंदुस्थानांत फिरत असतांना त्याने या सगळ्या व्यवहारांबद्दल आणि व्यक्तींबद्दल फारसीतून केलेला पत्रव्यवहार (२००० पेक्षा जास्त पत्रें) आता उपलब्ध असून त्यातून त्या काळातल्या उत्तर हिंदुस्थानांतल्या परिस्थितीबद्दलची विस्तृत माहिती मिळू शकते. यांना मुघल किताब होता - "अर्सलान जंग" (युद्धातील सिंह)". या पत्रांत त्यांच्या दोन हिंदुस्थानी "बीबी"ना लिहिलेली पत्रेंदेखील आहेत. या साहेबांच्या "कृपेने" त्यांचे इतर अनेक मित्रही असेच व्यवहार उत्तर हिंदुस्थानांतील स्थानिक विलासी लोकांशी करतांना कमी अधिक प्रमाणांत "हिंदुस्थानी" झाली होती. या मित्रांत क्लॉड मार्टिन, चार्ल्स मार्साक, रिचर्ड जॉन्सन अशी कांही मंडळी अनेकवेळा भागीदारीत व्यवहार करीत. या सगळ्याच लोकांनी आपल्याकरता ओझीयस हंफ्री (Ozias Humphry), जोहान जोसेफ झोफ्फानी (Johan Joseph Zoffany) या नांवाजलेल्या युरोपिअन चित्रकारांकडून तसेच मिहर चंद, मीर कलान खान, नेवासी लाल अशा हिंदुस्थानी चित्रकारांकडून स्वतःच्या "मोठेपणाबद्दलची" (त्यांचा नाच-गाण्याचा कार्यक्रम, त्यांचे "दरबार" इ.इ.) चित्रे बनवून घेतली आणि ती आता जगभरच्या संग्रहालयांत पाहायला मिळतात. अशा तऱ्हेच्या कामांतून युरोपिअन शैलीचा ठसा भारतीय चित्रकारीत उमटू लागला. अवधच्या राजघराण्यांतील लोकांनी अशीच आपल्याकरता बनवून घेतलेली चित्रें १८५७ नंतरच्या लुटालुटीत नष्ट झाली किंवा पळवली गेली पण नंतर त्यांचा कुठे थांगपत्ता लागला नाही.

या जमातीला नांव काहीही दिले जावो -white Mughals, English Nabobs किंवा Orientalists - पण या गोऱ्या (फक्त इंग्रजच नव्हे तर इतर गोरे European सुद्धा) लोकांनी त्यांच्या जीवनपद्धतीत इतका बदल केला की त्यांना हिंदुस्थानीच म्हणता येईल. वर फक्त नमुन्यादाखल वर्णिलेल्या लोकांखेरीज अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच्या सुमारे ८०-१०० वर्षांत पूर्ण हिंदुस्थानांत अशा तऱ्हेची जीवनपद्धती असलेले अनेक गोरे लोक होते.

हिंदुस्थानांतील अनेक जुन्या मौल्यवान वस्तू उदा. हस्तलिखिते, कलाकुसरीच्या वस्तू, रंगचित्रे इ. इ. अनेकांनी मिळेल तेव्हढ्या जमेल तेथून ओरबाडल्या आणि हिंदुस्थान सोडून मायदेशी परततांना आपले वैभव दाखवण्याच्या उद्देशाने आपल्याबरोबर इंग्लंड किंवा युरोपांत इतरत्र नेल्या. पण वर नमुन्यादाखल दिलेल्यांसारख्या अनेक गोऱ्या orientalist लोकांनी अशा वस्तू सुजाणपणे, त्यातील ज्ञान मिळवण्याकरता किंवा त्यांचा आनंद मिळवण्याकरता जमवल्या किंवा तयार करवल्या आणि त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने त्या इंग्लंड किंवा युरोपांतल्या संग्रहालयांत पाठवल्या.

"नक्कल करणे हे सगळ्यांत खरीखुरी प्रशंसा आहे " (Imitation is the sincerest [form] of flattery) हे चार्ल्स कॅलेब कोल्टन या एका इंग्रज लेखकाचे एक वचन बऱ्याच इतर लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वापरले आहे. White Mughals, English Nabobs किंवा Orientalists अशा कुठल्याही नांवानी ओळखल्या गेलेल्या या गोऱ्या (फक्त इंग्रजच नव्हे तर इतर गोरे European सुद्धा) लोकांनी त्यांना आवडलेल्या हिंदुस्थानी जीवनपद्धतीची नक्कल करत कळत नकळतत्या काळच्या हिंदुस्थानी जीवनपद्धतीला त्यांच्या आधीच्या पाश्चिमात्य जीवनपद्धतीपेक्षा श्रेष्ठ मानले. १८५७ नंतर मात्र गोऱ्या लोकांचे विचार बदलले. एकीकडे त्यांना दिसेल त्या हिंदुस्थानी माणसाला आपल्याविरुद्ध उठाव करण्याचे धार्ष्ट्य केल्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे असे वाटू लागले तर दुसरीकडे आता आपला प्रत्येक हुकूम पाळणारे हिंदुस्थानी कुठल्याही बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असूच कसे शकतील असेही वाटू लागले. एवंच १८५७ नंतरच्या काळांत White Mughals, English Nabobs किंवा Orientalists या जमातींत नवीन कुणी "पैदा" होण्याचेच थांबले आणि ही जमातच हळूहळू नामशेष झाली.

ज्यांना ज्यास्तीची माहिती हवी आहे त्यांनी पाहावे:

https://www.ourmigrationstory.org.uk/oms/migrating-home-the-return-of-th...
http://costumesociety.org.uk/blog/post/the-british-nabobs-in-india
https://archive.org/details/nabobathomeorre00monkgoog/page/n6 (published १८४२)
https://archive.org/details/anauthenticcopy01compgoog/page/n5
https://en.wikipedia.org/wiki/David_Ochterlony
https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/9715921/Before-Bri...
https://www.thehindu.com/features/metroplus/ochterlony-and-his-bibis/art...
https://www.thefridaytimes.com/where-else-could-i-live-like-a-king/
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ghalib/texts/txt_percival...
https://www.exodus2013.co.uk/traders-and-nabobs-migration-and-trade-with...
https://www.thehindu.com/opinion/columns/begum-samru-and-her-church-in-s...
https://en.wikipedia.org/wiki/Walter_Reinhardt_Sombre
https://books.google.com/books?id=AmY92eTAaloC&pg=PA162&lpg=PA162&dq=Eng...
https://en.wikipedia.org/wiki/James_Achilles_Kirkpatrick
https://www.telegraph.co.uk/culture/books/3588058/A-memsahib-chutnified....
https://en.wikipedia.org/wiki/Fanny_Parkes
http://rupkatha.com/V7/n2/06_Women_Travellers_India.pdf
https://www.theguardian.com/uk/2002/dec/09/britishidentity.india
http://www.strangehistory.net/2013/01/07/britains-indian-prime-minister/
https://en.wikipedia.org/wiki/Antoine_Polier
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00routesdata/1700_1799/poli...
https://books.google.com/books?id=VZc3AQAAMAAJ&pg=PA465&lpg=PA465&dq=Col...
https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.135833/2015.135833.British-...
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.529078/page/n153?q=James+A...
https://www.theguardian.com/uk/2002/dec/09/britishidentity.india
https://reviews.history.ac.uk/review/255
http://www.prahladbubbar.com/research/european-patrons-indian-artists-ei...
https://archive.org/details/lifeofclaudmarti00hill/page/38

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Apr 2019 - 7:15 am | कुमार१

नक्कल करणे हे सगळ्यांत खरीखुरी प्रशंसा आहे " >>>>
आवडले !

शेखरमोघे's picture

29 Apr 2019 - 8:22 pm | शेखरमोघे

धन्यवाद!

प्रमोद देर्देकर's picture

29 Apr 2019 - 9:47 am | प्रमोद देर्देकर

रोचक माहिती

शेखरमोघे's picture

29 Apr 2019 - 8:23 pm | शेखरमोघे

धन्यवाद!

भरपूर माहिती असूनही लेखन सुरस आहे, कंटाळवाणे नाही झाले याचे श्रेय तुमच्या लेखनाला आहे. डेलरिम्पलचे लिखाण वाचलेय त्यामुळे जास्त 'रिलेट' करता आले.

कॉकटेल इज हेडियर दॅन प्लेन स्पिरिट्स म्हणतात ते उगाच नाही :-)

शेखरमोघे's picture

29 Apr 2019 - 8:45 pm | शेखरमोघे

धन्यवाद! डालरिम्पलच्या लिखाणात गालिबबद्दल किन्वा एकूणच दिल्लीतल्या त्या काळच्या व्यक्तीन्च्याबद्दल - फार विस्तृत लिहिले असल्यामुळे -असलेली माहिती वाचून नक्की काहीही मत बनवणे कठीण आहे. एकाच वेळी सैनिकान्चा mob सारखा स्वभाव आणि इन्ग्रजानी ठामपणे आणि क्रूरतेने दिल्लीचा घेतलेला ताबा हेच मनावर बिम्बते.