श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन

Primary tabs

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं
16 Apr 2019 - 5:33 pm

फार दिवसांपुर्वी व्हॉट्सप्प वर एम मीम आलेला. असे काही डेरिव्हेटीव्ह्स, इन्टिग्रल्स, पार्शियल डिफरन्शियल एक्वेशन चे चित्र होते आणि खाली मेसेज होता की - "कॉलेज संपुन १० वर्षे होत आली पण अजुनही ह्याचा उपयोग काय ते कळलेले नाहीये ख्यॅ ख्यॅ ख्यॅ " वगैरे वगैरे. मी म्हणालेलो " तुम्हाला उपयोग करता येत नाही ह्याचा अर्थ उपयोगच नाही असा होत नाही" त्यावरुन मोठ्ठा वाद झाला ग्रुपवर . . तेव्हा एक मित्र म्हणालेला- " अरे तू इतके सीरीयसली का घेतोस? विनोद विनोद म्हणुन का घेऊ शकत नाही ? " तेव्हा त्या मित्राला म्हणालो - " कारण त्यात विनोद असा काही नाहीये, त्यात केवळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे. आणि तशाच समान अज्ञानी लोकांना त्यावर हसु येतय इतकेच ! मी गेली दहा वर्षे वापरत आहे हे सारे माझ्या कामात. "
त्यावर मित्र म्हणालेला- " ठीक आहे ना , तु वापरत आहेस आणि तुला त्याची फळं ही मिळत आहेत , जे नाहीत वापरत त्यांना नाही कळत. अरे तु लाख समजाऊन सांगायचा प्रयत्न करशील पण त्यांना कॉलेजात कळाले नाही, त्यानंतर १० वर्षात कळाले नाही , आणि आता कळवुन घ्यायची गरजही वाटत नाही त्यांना कसे कळणार ? आणि कळावे तरी का ? मग तु कशाला लोड घेतोस?"

That was the satori moment !

खरंच काय फरक पडतो कोणाला कळल्याने किंव्वा न कळल्याने ? आपल्याला कळले आहे , जेवढे काही , जे काही आपल्या उपयोगाला येत आहे हे बस्स आहे की ! कॉलेजात आपण डेरिव्हेटीव्स इन्टिग्रेशन वापरुन लोकल मॅक्झिमा लोकल मिनिमा काढली की खुष व्हायचो, आज त्याच पध्दती वापरुन आपण पोर्टफोलियो ची फ्युचर प्रोजेक्शन्स सांगतो , तेव्हा अगदी ऑर्ग्यॅझम होतो की नै , तेवढा बास आहे की !
आपल्याला चार समविचारी लोक भेटले आहेत , त्यांना कळत आहे हे आपल्याला कळत आहे आणि आपल्याला कळत आहे हे त्यांना कळत आहे. तेवढे बास आहे की !
बाकी ईतरांना, दुसर्‍याला पटवुन द्यावे हा अभिनिवेष का ? हा हट्ट , हा दुराग्रह जाऊ दे लयाला ! अगदी निशे:ष लयाला ! हे सारं एकदम स्वान्तःसुखाय आहे ! आपल्याला कोणतेच उत्तरदायिय्व नाहीये बस इतके स्मरण राहिले तरे फार आहे !

जे पिंडी तेच ब्रह्मांडी ! जे लॉजिक अल्जेब्रात तेच लॉजिक अध्यात्मात !
हे सारं एकदम स्वान्तःसुखाय आहे !

_________________________/\_________________________
|| पांडुरंग | पांडुरंग ||

दुसरा अध्याय , श्रीगुरुस्तवन ! माऊलींची लहानपणापासुन चित्रे पाहिली असल्याने , नुसतं माऊली म्हणलं की अगदी आईची करुणा चेहर्‍यावर असलेल्या माऊलींचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण निवृत्तीनाथांचे काही चित्र पाहिलेच नाही ! कसे असतील निवृत्तीनाथ ? अगदी टिपिकल नाथ संप्रदायातील साधुंसारखे ? धीरगंभीर ? कायम मौनात रहाणारे ?

आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥
कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥
सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।
आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥

हे जे अनेक जे काही साधना उपासना मार्ग आहेत , त्यांना ज्याच्या असण्याशिवाय बहर येणार नाही असा वसंत म्हणजे सद्गुरु ! सारं काही जाणुन घेण्याची गुरुकिल्ली ! जो मुळातच अमुर्त आहे पण तसे पाही तर साक्षात करुणेचा , प्रेमाचा मायेचा मुर्तीमंत पुतळाच आहे ! अध्यात्माचे हे ज्ञान देताना तो लहान मोठ्ठा असा भेदभाव करत नाही . द्रष्टा दृष्य आणि दर्शान ह्या त्रिपुटीमधील जो द्रष्ट्याचे दर्शन घडवुन देतो ! हे केवढे सामर्थ्य आहे ! आत्म्याला आत्मसुखाचा लाभ करुन देणारा आरसाच जणु ! सद्गुरु म्हणजे साक्षात शिवापेक्षाही श्रेष्ठ ! (कारण मुळ शिवपण इतके अलिप्त आहे की ते " मी आहे" ह्या आत्मसुखाच्या बाहेर पडतच नाहीये , मग द्रष्ट्याला द्रष्ट्याचे दर्शन घडवुन देऊ वगैरे भानगडी तिथे निर्माणच होत नाहीत . मागील अध्यात म्हणले तसे
"जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥"
मायेच्या , शक्तीच्या असण्यामुळे आपण शिवपणाचा आनंद भोगु शकतो, पण मुळातच शिवपणी माया नाहीच मग आनंद असे काही असणे , आणि तो कोणी तरी भोगणे हे शक्यच नाही !)

राखों जातां शिष्यातें । गुरुपणहि धाडिलें थितें ।
तही गुरुगौरव जयातें । सांडीचिना ॥ २-१२ ॥
एकपण नव्हे सुसास । म्हणोन गुरु-शिष्यांचें करोनि मिस ।
पाहणेंचि आपली वास । पाहतसे ॥ २-१३ ॥

शिष्याला असे सद्गुरु ज्ञान देत गुरुपदीच नेऊन बसवतात , गुरुशिष्य हा भेदच नाहीसा करुन टाकतात , आणि तही गुरुगौरव मात्र काही कमी होत नाही !
समर्थ म्हणाले तसं - 'परीस आपणा ऐसे करीना। सुवर्ण लोहे पालटेना। उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरुचा।' परीस लोखंडाचे सोने करेल पण नंतर ते सोने लोखंडाचे सोने नाही करु शकत , तसे सद्गुरु नाहीत ! एकदा सद्गुरु परीसाचा स्पर्श झाला शिष्यही परीसच होऊन जातो !

हे असं जे एकपण , शिवपण, आहे त्यामध्ये आपल्या आनंदाचा लाभ घेताच येत नाही , ( कारण तिथं आनंद उपभोग्य असे काय अन त्याचा उपभोक्ता असे काय , आणि उपभोग घेणे असे काय , सगळे एकच !) म्हणुन जणु काही हे सद्गुरुच हा गुरु शिष्य देखावा उभा करुन स्वतःचा आनंद घेत आहेत !!

जीवपणाचेनि त्रासें । यावया आपुलिये दशे ।
शिवही मुहूर्त पुसे । जया जोशियातें ॥ २-२४ ॥
जेथें शब्दाची लिही पुसे । तेणेंसिं चावळों बैसे ।
दुजयाचा रागीं रुसे । येकपणा जो ॥ २-२८ ॥

काय सुंदर वर्णन आहे ! मुळात जीव शिव असे द्वैतच नाही पण जे काही द्वैत भासते आहे , हा जो काही जीवपणाचा त्रास आहे तो त्यागुन आपल्या मुळपदी शिवपदी यायला सद्गुरुची मदत लागते , जणु काही शिवच सद्गुरुला मुहुर्त विचारात आहेत !
अशा सद्गुरुपदाची किर्ती वर्णावी तितकी थोडीच आहे कारण जिथे शब्दांची लिहि पुसे , शब्दात वर्णन करता येणार नाही अशी अवस्था आहे ही , तिथं द्वैत , कोणत्याही प्रकारचे दुसरे पण रहातच नाही असे हे एकपण आहे !

नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ? ।
तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? ।
तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥

सद्गुरुपद हे शिवपदाशी इतकं एकरुप आहे , की द्वैत असं काही नाहीच ! मुळातच आत्म्याला "मी आत्मा आहे" अशी जाणीवच नाही मग नेणीव असं काही असण्याचा प्रश्नच नाही , जिथं माया ( कि जिच्यापासुन निवृत्ती घ्यावी) असे काहीच नाही मग कसली आलीय निवृती ? कशाची निवृत्ती ? हे असे आपले सद्गुरु " निवृत्तीनाथ " नाव धारण करुन आहेत !

शिवशिवा सद्गुरु । तुजला गूढा काय करूं ? ।
येकाहि निर्धारा धरूं । देतासि कां ? ॥ २-३७ ॥
आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं ।
हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥
कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें ।
तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥

शिवा शिवा सद्गुरु , तुजला गुढा काय करु , एक सुध्दा उपमा तु टिकु देत नाहीस ! समर्थ म्हणाले तसं
"हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुवरुपद ॥ २९॥
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥
म्हणौनी सद्‌गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥ "

ह्या अंतरस्थितीचिया खुणा आहेत , त्या अंतर्निष्ठांनाच कळणार !
सुर्याचा उदय आणि अस्त हे आपल्यासाठी आहे, सुर्याला कसला आलाय उदय आणि अस्त ? सुर्य त्याच्या जागी आहेच आहे ! तसं काहीसं आहे . सद्गुरुला आपण वंदन करतोय हे तोवरच शक्य आहे जोवर आपल्यात थोडातरी द्वैतभाव शिल्लक आहे, जर द्वैतभाव शिल्लकच नसेल तर कोण सद्गुरु अन कोण शिष्य ? तिथं वंदन करणं शक्यच नाही ! आरसा आहे म्हणुन आपल्याला आपले समोरपण पहाता येते , पण आरसाच नाही , फक्त आपणच आपण आहोत , मग आपण आपल्याच समोर कसे उभे रहाणार ? तसं काहीसं आहे , जोवर द्वैत आहे तोवर नमस्कार चमत्कार करता येतील , एकदा ते लयाला गेलं कि बस आता काहीच वंद्यत्व असं नाही !

येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ? ।
विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥
म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥

जिथं "एक आहे " असे म्हणल्यावरच भेद निर्माण होतो , म्हणजे "तो आहे" हे बोलणे सुध्दा शक्य नाही असे शिवपण विविधरुपे घेऊन नांदत आहे असे कसे म्हणावे ? हे म्हणजे स्वयं-विरोधाभासी बोलणे झाले! म्हणुन शिष्य आणि गुरुनाथ हे दोन्ही शब्द म्हणुन भिन्न भासत असले तरी हे एकच आहेत केवळ सद्गुरु ...( की जे "एक आहे" असे म्हणताही येत नाही !)

गोंदवलेकर महाराज , तुकोबा, समर्थ , एकनाथ महाराज, माऊली , निवृत्तीनाथ , श्रीमदाद्यशंकराचार्य , वासुदेव श्रीकृष्ण, ...................... आणि आपण...........................म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु ।श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥
___/\___

नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु ।
गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥
इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे ।
जही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥
आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।
आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥
पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला ।
परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥
जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी ।
गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥

कापुर आणि कापुराचा परिमळ असे दोन भिन्न नाहीतच , कापुराचा परिमळ हा कापुरच ! गोडी आणि गुळ असे द्वैत नाहीच , गोडी म्हणजेच गुळ ! गुरु आणि शिष्य असे दोघं भिन्न दिसत असले तरी द्वैत असे नाहीच , दोन्ही एकच ! आरश्यात आपण आपले मुख पहातो , ते वेगळे दिसत असते पण ते वेगळे असते का ? ते केवळ आपल्याला आपल्या मुखाची जाणीव करुन देते , दुसरे मुख असे द्वैत निर्माण नाही करत .

जिथे कोणतेच अंजन अर्थात द्वैत असे काही चिकटतच नाही अशा निरंजन अवस्थेत जो झोपला आहे तो निर्विवाद एकलाच आहे , पण त्याला जागं केलं तरी जागा होणारा आणि जागा करणारा दोन्ही तोच आहे ! तसे आहे . आपले मुलस्वरुप शिवस्वरुपापेक्षा भिन्न नाही , फक्त थोडे विस्मरण आहे, जे की सद्गुरु दुर करताहेत , ते विस्मरण आहे तोवरच हे गुरु शिष्यत्व आहे , एकदा ते विस्मरण गेले की दोन्ही शिवस्वरुपच !

दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥

काय अफलातुन उपमा आहे !! आपल्याला डोळे आहेत , आरश्यात पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते कि आपल्याला डोळे आहेत असे आहे का? आरश्याशिवाय आपले आपणच डोळ्यानी डोळे पहाणे असा काहीसा आनंद भोगणे आहे !
आरसा नसेल तरीही " आपण पहात आहोत ह्याचा अर्थच आपल्याला डोळे आहेत" हे जे ज्ञान आहे हे म्हणजे डोळ्याने डोळे पाहिण्यासारखेच नव्हे काय !!

कीं राती हन गेलिया । दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागें ? ॥ २-७७ ॥
म्हणोनि बोध्य बोधोनि । घेपे प्रमाणें साधोनि ।
ऐसा नव्हे भरंवसेनि । गोसावी हा ॥ २-७८ ॥
ऐसें करणियावीण । स्वयंभचि जें निवृत्तिपण ।
तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥ २-७९ ॥
आतां ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरु प्रणामें येणें ।
फेडिली वाचाऋणें । चौही वाचांचीं ॥ २-८० ॥

रात्र संपुन गेली , आणि दिवस उजाडला म्हणुन काय सुर्याला सुर्यपण घेऊन उगवावे लागते असे काही आहे का ? सुर्य कायम त्याच्या जागीच आहे ! सुर्योदय सुर्यास्त ह्या केवळ आपल्या कल्पना आहेत , सुर्याला त्याच्याशी काही घेणे देणे नाही . म्हणुन बोध्य अर्थात समजुन घ्यावे असे काही तरी , कोणत्यातरी प्रमाणांच्या मदतीने समजुन घ्यावे असे सगुरुपद नाही . असल्या सगळ्या साधनांच्या उपद्व्यापासुन अलिप्त असे जे स्वयंभु स्वरुप , निवृत्तीपण , साक्षात निवृत्तीनाथ आहेत , त्यांना मी नमन करतो !

परा पश्यंती मध्यमा अन वैखरी अशा चारही वाणीचे उपकार आहेत की त्यांच्यामुळे ही अवस्था आपण जाणुन घेऊ शकलो ! अशाप्रकारे मी सद्गुरुंना नमन करुन ह्या चारही वाणींचे ऋण फेडले !
(वैखरी म्हणजे हे आपण बोलतोय जे लिहितोय वाणी ती , मध्यमा म्हणजे जे काही लिहायचे बोलायचे आहे त्याच्या आधी मनात शब्दांची जी जुळवाजुळव करत आहोत ती वाणी , पश्यंती म्हणजे आपल्याला जे अनुभवाला येत आहे जे आपण पहात आहोत जे आपण शब्दात सांगायचा प्रयत्न करत आहोत ती वाणी आणि परा म्हणजे पश्यंतीच्याही अलिकडे , मनात विचार निर्माण होण्याच्याही आधी केवळ अनुभवाची , अब्सोल्युट ब्लिस्स ची अवस्था आहे ती वाणी.
म्हणजे कसं की आपण अस्सं आमरसाची वाटी उचलुन तोंडाला लावतो तेव्व्हा जो आमरसाच्या आस्वादाचा अ‍ॅब्सोल्युट आनंद आपण अनुभवतो तो , इतका शुध्द अनुभव की तिथे आपण तो अनुभवत आहोत हा विचारही मनात उत्पन्न झालेला नसतो म्हणजे परा, मग निमिषार्धात आपल्याला लक्षात येते की काय अनुभव आहे हा अहाहा , तिथे उपभोग्य आमरस , उपभोक्ता आपण त्याच्या उपभोग घेत आहोत तो म्हणजे पश्यंती , आणि आता कोणाला तरी हे सांगावे म्हणौन आपण मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करतो ती म्हणजे मध्यमा आणि शेवटी आपण म्हणतो " आईच्या गावात ! कसला आमरस आहे राव ! एक नंबर ! घ्या अजुन एक वाटी !" ही म्हणजे वैखरी !! )
________________/\________________

ह्या सार्‍या अगदी अनुभवायच्या गोष्टी आहेत . आपण कितीही शब्दांचे खेळ केले तरी शब्दात सापडणार नाही असे अनुभव आहेत ते . गुळ गोडी असे आपण किती करु तितके वर्णन कमी आहे आणि जे काही आहे ते मुळ वर्णन नाहीच ! म्हणजे गुळ कसा लागतो तर साखरेसारखा ... चुक ... काकवी सारखा ... चुक ... उसाच्या रसा सारखा ... चुक . कितीही वर्णन करा , शब्दात पकडणे शक्यच नाही ! गुळ गुळासारखाच !
सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळावया गूळ देणें ।
ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १०॥

आपल्या दाढीवाल्याबाबाने एकदा लाऑ त्सु चे एक फार गंभीर वाक्य सांगितले होते , तेव्हा त्याचा अर्थ लागला नव्हता .... पण आता लागतो !

The moment truth is asserted, it becomes false. - Lao Tzu.

थोडक्यात आहे हे असं आहे अनुर्वाच्चसमाधान.

तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावारीं गेलें ।
अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२॥
तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता ।
ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३॥ ६.१०.४३ || श्रीराम ||

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

________________/\________________

संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) ग्रंथराज दासवोधातील सद्गुरुस्तवन हा समास : दशक पहिला समास चौथा http://satsangdhara.net/db/D01.htm
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm

___________________/\_____________________
(क्रमशः .... बहुतेक)

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

अर्धे वाचून झालेय , मित्रा ,, लै म्हणजे लैच भारी लिवलंयस .. त्याच काय आहे , उद्या हाय बुधवार , तर मी काय इचार करतोय , हे एवढं सारं वाचायचं आणि आत फिट करायचं म्हणजे लै ताकद पाहिजे .. ताकद म्हणजेच आपलं अमृत पाहिज्ये .. तर आपले अमृत पिण्याचे सिलेक्टड वार हायत .. जस बुधवार , शुक्रवार आणि रविवार .. तर उद्या हाय बुधवार ,, मग ह्ये उरलेलं वाचायचं म्हणजे , अमृत पाहिज्ये म्हणज्ये पाहिज्येच .. उद्या बघ , मी मस्त रसग्रहण करून खणखणीत अभिप्राय देतो कि नाय ते .. बाकी जबरा लिवलंयस भौ ..

अमित खोजे's picture

16 Apr 2019 - 8:55 pm | अमित खोजे

प्रथम मलाही असेच वाटायचे. परंतु अज्ञानाच्या अशा पोस्ट ना आपण उत्तर नाही तर त्याचा परिणाम पुढे जाऊन वाईट होऊ शकतो. म्हणतात ना, विनाशास जेवढे वाईट लोकं कारणीभूत आहेत तेवढेच पण त्यापेक्षा जास्त चांगल्या लोकांचे मौन जबाबदार आहे. कुठेतरी फेसबुक वर वाचले होते असेच काहीसे, कि सुरुवातीला "काय गरज आहे असे शाळेत अवघड अवघड विषय शिकायची" असे म्हणणारे पुढे जाऊन पृथ्वी सपाट आहे अशा धारणेचे वेगवेगळे समूह करून (flat earth group) पुढे आपल्याच किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या नाकी नऊ आणतात.

हा मेसेज व्हॉट्सऍपवर असाच फिरत राहिला, तर तो आपल्या मुलांनापर्यंत पोहोचायला फार वेळ नाही लागणार. त्यावर चिंतन विचार करण्याची त्यांची क्षमता असेल तर ठीक आहे नाहीतर, ते सुद्धा कशाला शिकायचे इतिहास, कविता, इन्टिग्रेशन, डेरिव्हेटीव्ह असे म्हणून नापास होण्यास मागे पुढे बघणार नाहीत.

इतिहास हा शिकायचा, याचे उत्तर फेसबुकवरील लंडन मधील संकेत कुलकर्णी याच्या पोस्ट बघितल्यानंतर कळते. देशाबाहेर राहिल्यानंतर कळते. बाहेर लोक आपल्याला भारतीय काय वागणूक देतात, आणि त्या वागणुकीचा अर्थ काय हे समजायला आपला इतिहास आपण शिकेलच पाहिजे. उगीच सन सनावळ्या पाठ करायला इतिहास शिकायचं नसतो. इतिहासामुळे तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची नांदी अगोदरच ओळखायला येऊन त्यावर उपाय करता येऊ शकतो.

तुम्ही म्हणता तसेच अज्ञानी लोकांनी दाखवलेले निर्लज्ज अज्ञान आहे ते. परंतु, ज्ञानी लोकांनी त्यास प्रतिउत्तर देऊन त्या ज्ञानाचा वापर कुठे व कसा करायचा हे जर सांगितले नाही, तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि ते पुढच्या पिढीस किंवा आपल्याच पिढीस घटक ठरू शकेन. तुम्ही केलेली डोकेफोड अगदीच वाया गेली असे मी म्हणणार नाही. केवळ विनोद म्हणून सोडून देण्याचा तर हा अजिबात मुद्दा नाही आहे.

आता तुमच्या मित्रांना काही इंटिग्रेशन शिकवायला जाऊ नका परंतु त्यांना एवढे जरी सांगितले के या ज्ञानावर मी नवनिर्मिती करू शकतो आणि त्यासाठी मला भरपूर पैसे मिळतात, तरी पुरेसे आहे. शेवटी ज्याने त्याने काय करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु केवळ विनोद म्हणून सोडून देण्यासारखा हा विषय अजिबात नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Apr 2019 - 11:43 am | ज्ञानोबाचे पैजार

The moment truth is asserted, it becomes false. - Lao Tzu. हे वाक्य देखिल या लेखातच लिहिले आहे

अशा पोस्ट ना मुळीच उत्तर देउ नये असे मला वाटते. तसेही मुंडकोपनिषदामधे अशा प्रकारच्या ज्ञानाला अपरा विद्या म्हटले आहे.

बर्‍याच वेळा लहान मुलांना प्रश्र्ण पडतो, "आई मी तुझ्या पोटात कसा आलो?" बहुतांश वेळी याचे उत्तर "देव तुला माझ्या पोटात ठेवून गेला" असेच असते. जर त्या मुलाला आपण तो नक्की पोटात कसा आला याची इत्यंभुत माहिती देत बसलो तर ती त्यावेळी त्याला कळणार नाही किंवा त्या माहितीचा कदाचित काही वेगळा परीणामही होउ शकेल.

बरं वरील न्यायाने जेव्हा ते मुल मोठे होइल आणि त्याला समजेल की तो आईच्या पोटात नक्की कसा आला होता ते? तेव्हा त्याने काय आईचा "खोटारडी" म्हणून धिक्कार करावा का?

सत्य जाणून घेण्याची वेळ ही व्यक्तीसापेक्ष वेगळी असते. आपण एखाद्याला उगाच सत्याकडे फरपटत नेउ नये.

पॄथ्वी गोल आहे हे देखिल काही त्रिकालाबाधित सत्य नाही. ती केवळ आताच्या घडीला झालेली एक जाणीव आहे. आणि ती आताच्या घडीपुरतीच सत्य आहे.

त्यातला अजुन एक मुद्दा असा की प्रत्येकाकडे जगातले सर्व ज्ञान असलेच पाहिजे हा अट्टाहासही चूकिचाच आहे. माशाकडे झाडावर चढण्याचे ज्ञान नसले तरी काही बिघडत नाही. त्या भानगडीत तो बिचारा पोहणेही विसरुन जायचा.

शेवटी स्टीफन हॉकीन्स यांचे अजुन एक वाक्य इथे लिहायचा मोह आवरत नाही "The greatest enemy of knowledge is not ignorance; it is the illusion of knowledge." अज्ञान हा ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रु नाही, तर ज्ञाना विषयीच्या भ्रामक कल्पना हाच ज्ञानग्रहणाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे.

पैजारबुवा,

अमित खोजे's picture

19 Apr 2019 - 9:54 pm | अमित खोजे

तुमचे सर्व मुद्दे अगदी मनापासून पटले.

सिक्रेटसुपरस्टार's picture

17 Apr 2019 - 2:06 am | सिक्रेटसुपरस्टार

छान. मध्ये मध्ये येणारे इंग्लिश शब्द टाळता आले तर बरे होईल. इतक्या सुंदर लिखाणात मधेच खडा लागल्यासारखे होत आहे. उदा. अ‍ॅब्सोल्युट आनंद = निखळ आनंद ?
भाषेवर प्रभुत्व आहे तुमचे. त्या वाक्यानंतर लगेच तुम्ही निमिषार्धात सारखे शब्द वापरले आहेत. थोडं मुद्रित शोधन केलंत तर आवर्जून संग्रही ठेवावं असं लिहीत आहात तुम्ही. पहा पटलं तर.
धन्यवाद. एकूण सुंदर वाचनानुभव.

रविकिरण फडके's picture

17 Apr 2019 - 7:59 am | रविकिरण फडके

'गुरु' ही संज्ञा गेली पन्नास वर्षे ऐकत आलो आहे पण त्याचा नेमका अर्थ कळलेला नाही.
मला शाळेत अतिशय उत्तम शिक्षक लाभले. देऊलकर सर (मराठी), परब व कुलकर्णी सर (इंग्लिश), परुळेकर सर (गणित), (भंडारी हाय स्कूल, मालवण) ह्यांनी जे शिकवलं ते आयुष्यभर पुरतं आहे, म्हणून त्यांचं ऋण कधी फिटणार नाही. ह्या सगळ्या शिक्षकांना गुरु म्हणायचे की नाही? गुरु म्हणजे शिक्षक नव्हे का? नसेल तर त्याच्या पलीकडे काहीतरी? की असे आहे, फक्त अध्यात्माच्या (मला spiritual म्हणायचं आहे) क्षेत्रातच ती वापरली जाते/ जावी? तसे असेल तर माझ्यापुरता प्रश्न संपला.

गुरूंबद्दल खूप मोठे लोक्स खूप काही सांगून गेलेत. मी काही सांगणं योग्यही नाही आणि मला नीटसं सांगताही येणार नाही.
पण नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. स्वामी सवितानंदांचं "गुरूर्ब्रह्म गुरूर्विष्णू" हे पुस्तक गुरूंबद्दलची संकल्पना मराठीतून अभ्यासपूर्ण पद्धतीनं संगतवार मांडतं. वाटलं तर एकदा वाचून पहावं.

रविकिरण फडके's picture

17 Apr 2019 - 10:12 pm | रविकिरण फडके

पण माझा प्रश्न (हा ब्लॉग लेखकासाठी* आहे, परंतु आपणही उत्तर देऊ शकता) अतिशय specific आहे. गुरु कोणत्याही क्षेत्रात असतो, की ही संज्ञा फक्त विशिष्ट विषयासाठी राखून ठेवली आहे? ती जर सार्वत्रिक असेल तर 'गुरू'ऐवजी 'शिक्षक' ही संज्ञा चालेल का? नसेल तर 'गुरु'त जास्तीचं काय असतं?

*प्रत्येक मिपाकर प्रत्येक विषयाचा तपशीलवार अभ्यास करू शकत नाही. तसे असते तर कुणीच काही लिहायची गरज नव्हती, आणि वाचायचीही.

हिअर आणि लिसन अशासारखं वाटतंय, शिक्षक आणि गुरू म्हणणं म्हणजे. :-)

तुमचा प्रश्न जरी अतिशय स्पेसिफिक असला तरीही, तो फार महत्त्वाचा आणि गहन विषय असल्यानं, त्याचं उत्तर अनुभव असलेल्या अधिकारी व्यक्तीनं देणं योग्य. म्हणूनच ते पुस्तक सांगितलंय. उत्तर देतांना माझ्यासारख्या व्यक्तीकडून काही चूक झाली तर समोरच्या व्यक्तीच्या धारणेला बाधक असू शकेल, जे होऊ नये याची काळजी घेतोय.

रविकिरण फडके's picture

18 Apr 2019 - 2:47 pm | रविकिरण फडके

नाही; hear आणि listen ह्या दोन शब्दांत निश्चित आणि सर्वज्ञात असा फरक आहे.

आपण निर्देशित केलेल्या पुस्तकातील काही पाने - जी नेटवर होती ती - वाचली. काही प्रकाश पडला नाही. पूर्ण पुस्तक वाचूनही पडेल असे वाटत नाही.
सबब, हा चर्चेचा विषय नाही - फक्त अनुभवण्याचा आहे - असे समजू आणि चर्चा इथेच थांबवू. ब्लॉग लेखकाला सवड मिळाली तर ते देतील उत्तर, त्यांना वाटल्यास.

(मात्र, असेच जर आहे तर कुणी ह्या विषयावर काहीही लिहावेच का हा प्रश्न उरतोच. पण कदाचित, हा विषयच असा आहे कि प्रश्न विचारायचेच नसतात, फक्त अनुभव घ्यायचा असतो, असेही उत्तर असेल जाणकार लोकांचे. ह्या attitude मुळेच अध्यात्म म्हणजे नुसती जड शब्दांची भेंडोळी असा समज दृढ होतो.)

रविकिरण फडके's picture

18 Apr 2019 - 2:47 pm | रविकिरण फडके

नाही; hear आणि listen ह्या दोन शब्दांत निश्चित आणि सर्वज्ञात असा फरक आहे.

आपण निर्देशित केलेल्या पुस्तकातील काही पाने - जी नेटवर होती ती - वाचली. काही प्रकाश पडला नाही. पूर्ण पुस्तक वाचूनही पडेल असे वाटत नाही.
सबब, हा चर्चेचा विषय नाही - फक्त अनुभवण्याचा आहे - असे समजू आणि चर्चा इथेच थांबवू. ब्लॉग लेखकाला सवड मिळाली तर ते देतील उत्तर, त्यांना वाटल्यास.

(मात्र, असेच जर आहे तर कुणी ह्या विषयावर काहीही लिहावेच का हा प्रश्न उरतोच. पण कदाचित, हा विषयच असा आहे कि प्रश्न विचारायचेच नसतात, फक्त अनुभव घ्यायचा असतो, असेही उत्तर असेल जाणकार लोकांचे. ह्या attitude मुळेच अध्यात्म म्हणजे नुसती जड शब्दांची भेंडोळी असा समज दृढ होतो.)

रविकिरण फडके's picture

18 Apr 2019 - 2:49 pm | रविकिरण फडके

caused the above response to publish twice. My apologies.

राघव's picture

18 Apr 2019 - 3:13 pm | राघव

ठीक.

स्वांतसुखाय लिखाण मस्त चाललं आहे.
काय आश्चर्य आहे बघा... मध्ययुगीन समाजातल्या जनसामान्यांसाठी म्हणुन माऊलींनी हे साहित्य निर्माण केलं. मागासलेला, गरीब, अंधश्रद्धांनी घेरलेला असा समाज. पण त्या समाजाला हे सगळं कळेल या आशेने जर हे सहित्य निर्माण झाले असेल, तर त्या समाजाची धारणा किती परिवक्व असेल.