(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)
भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
दिल्लीत अशी वाढती बेबंदशाही पसरत असतांना सैनिकांचा सगळ्यात मोठा जथा बरेलीहून दिल्लीत पोहोचला. आता नसिराबाद (सध्याचा उत्तर प्रदेश), टोंक (सध्याचा राजस्थान), नीमच (सध्याचा मध्य प्रदेश) आणि अशाच इतर अनेक ठिकाणच्या पलटणींमधले सैनिकही मेरठच्या सैनिकांच्या मागोमाग आपापल्या ठिकाणांहून दिल्लीत पोचले होते. बरेलीच्या सैनिकांचा नेता सुभेदार मेजर बख्त खान - इंग्रजांच्या वतीने लढतांना अफगाण आणि इतर युद्धात पराक्रम केल्याने कंपनी सरकारकडूनदेखील सन्मानित, सर्व सुभेदार मेजर मधला सगळ्यात जास्त अनुभवी - याचा सगळ्याच हिंदुस्थानी सैनिकांत इतका दबदबा होता आणि बादशाहाला देखील त्याच्याकडून इतक्या अपेक्षा होत्या की काही दिवसांत दिल्लीतल्या सगळ्या हिंदुस्थानी सैन्याचे (सुमारे ५०,०००-६०,०००) नेतृत्व त्याच्या हाती सोपविण्याचे ठरले.
बख्त खानाच्या अनुभवामुळे त्याच्या लक्षात आले की टेकाडांवर ठाण मांडलेल्या इंग्रजांच्या पिछाडीवर कधीच हल्ला झालेला नव्हता. तसेच आधीच्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी हिंदुस्थानी सैन्याने दिवसाभरात जितकी कांही जीवहानी सहन करत इंग्रज मोर्चाच्या आणखी जवळ पोचण्याचे शौर्य (आणि त्यामुळे पुढच्या हल्ल्यात ते सगळे पुन्हा करायला न लागण्याचे चातुर्य) दाखवले असे, त्या सगळ्यावर पाणी सोडून देत, जिथवर जीत मिळवली तेथेच पाय रोवून न थांबता दररोज रात्री हिंदुस्थानी सैनिक आश्रयाला शहराच्या कोटाच्या आत परतत. त्याशिवाय एका पलटणीचे लोक एका दिवशी अयशस्वी झाले तर दुसऱ्या दिवशी त्यांची निंदा करत दुसरेच लोक चढाईच्या मागे लागत. त्यामुळे आदल्या दिवशीच्या अनुभवांचा फारसा फायदा न मिळता प्रत्येक दिवशी "पुनश्च हरि ओम" करत दिवस मावळेपर्यंत आणखी सैनिक मारले जाण्यापलीकडे हिंदुस्थानी सैनिकांच्या हातात काही लागत नसे आणि थोडक्या हानीमध्ये इंग्रजाना आपले वर्चस्व कायम राखता येई .
असे रोज रोज होणे टाळण्याकरता बख्त खानानें जे बदल करण्याचा विचार सुरु केला त्याला अर्थातच बरेलीखेरीज इतर ठिकाणच्या पलटणींच्या मुख्यांचा अंतस्थ विरोध होता कारण त्यामुळे जर यश मिळाले असते तर फक्त बख्त खानाचे नांव झाले असते. ज्या लोकांना इंग्रजांकडून वेळोवेळी काहीतरी मिळत राहिले होते किंवा मिळवायचे होते अशा इंग्रजधार्जिण्या दिल्लीकरांनी (इंग्रंजांचे मिळवलेले वर्चस्व टिकून राहावे या साठी, कदाचित इंग्रजांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार) बख्त खान इंग्रजांना आंतून सामील असून तो काहीही करून इंग्रजांची मोठी फौज दिल्लीत पोहोचेपर्यंत इंग्रजांच्या फायद्याची परिस्थिती तयार करून ठेवणार आहे अशा अफवा पसरवायला सुरवात केली. बख्त खानाच्या कडव्या मुस्लिम बोलण्याने आणि रांगड्या वागण्याने त्याने नकळत आणखीही कांही शत्रू तयार केले असावेत. एवंच जे चालू होते त्यांत बदल करण्याचे त्याचे प्रयत्न म्हणावे तसे यशस्वी न झाल्याने त्याला देखील या प्रचंड सैन्यदलाचा आणि त्यांच्या शक्तीचा इंग्रजांविरुद्ध फारसा उपयोग करून घेता आला नाही.
मे १८५७ मध्ये जेव्हा मेरठमध्ये आणि त्यानंतर इतरत्र हिंदुस्थानी सैनिकांच्या असंतोषाचा विस्फोट झाला तेव्हा बरेच इंग्रज वरिष्ठ अधिकारी आणि सेनानी सिमला येथे "उन्हाळी राजधानींत" किंवा इतर थंड हवेच्या ठिकाणी "उन्हाळ्याची सुट्टी" म्हणून पांगले होते. पंजाब, वायव्य प्रदेश अशा ठिकाणी असलेल्या पलटणींनी इंग्रजांची बाजू सोडली नव्हती. यांतील किती सैन्य दिल्लीवर चालून जाण्याकरता (किंवा इतर जिथे कुमक हवी होती अशा ठिकाणी) वापरता येईल याचा अंदाज घेणे चालू झाले. इंग्रज सरसेनापतीने कॅप्टन विल्यम हॉडसन या हरहुन्नरी अधिकाऱ्याला (केम्ब्रिजमध्ये शिकलेला, अफगाण आणि शीख युद्धांत लढलेला, फारसी आणि उर्दू उत्तम बोलणारा) किमान २,००० शीख आणि पठाण सैनिकांची फौज दिल्लीवर चालून जाण्याकरता झटपट उभी करायला सांगितले.या आणि इतर सगळ्या फौजेकरता लागणाऱ्या तोफा, बंदुका, दारूगोळा, बैलगाड्या (सामान वाहण्याकरता), हत्ती (तोफा ओढण्याकरता), तंबू, शिधा आणि अशाच इतर सगळ्याची जमवाजमव सुरू झाली.
इंग्रजांच्या या सगळ्या तयारीची कुणकुण जेव्हा दिल्ली शहरात पोचली तेव्हा बरेच हिंदुस्तानी सैनिक गर्दी, निराशा, उपासमार, रोगराई अशा सगळ्यात दिल्लीतच रहावे की हातात मिळालेली लूट घेऊन जमेल तोपर्यंत दिल्ली सोडून निघून जावे असा विचार करू लागले. अशा अस्थिर परिस्थितीत बेगम झीनत महलने आपल्याला इंग्रजांशी बोलतांना जास्तीचे बळ मिळावे या करता "आमच्या मागण्या मान्य केल्यास आमचे लोक तुम्हाला शहरांत येण्यास मदत करू शकतील " असेही कळवल्याचे म्हटले जाते. बेगम झीनत महलने इंग्रजांशी चालू असलेल्या आपल्या बोलण्यांत मात्र "कुठल्याही परिस्थितीत बादशहाच्या जीवाला धक्का लागू नये" ही एक मागणी वाढवली.
आणि मग जेव्हा सप्टेंबर १८५७ च्या सुरवातीला सुसज्ज इंग्रज फौज (सुमारे १०,००० सैनिक आणि अधिकारी) त्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या आणि पल्ल्याच्या तोफांसकट दिल्लीच्या जवळ येत असल्याच्या बातम्या दिल्लीत येऊ लागल्या तेव्हा शहराच्या तटाचे सर्व दरवाजे बंद झाले आणि तटाच्या आतल्या वेगवेगळ्या उंच ठिकाणी आणि तटावरच्या वेगवेगळ्या बुरुजांवर हिंदुस्थानी सैनिकांबरोबर आलेल्या तोफा डागण्यास आणि टेहेळे, बंदूकधारी तयार होईपर्यंत तटाच्या आजूबाजूला मोक्याच्या जागी इंग्रजांचे मोर्चे लागण्यासही सुरवात झाली. इंग्रजांचे तटाबाहेरचे मोर्चे लागता असतांनाही तटावरच्या शिपायांनी इंग्रजांकडच्या अनेकांना टिपले.
दोन्ही बाजूकडच्या तोफा ११ सप्टेंबरपासून एकमेकांविरुद्ध कडाडू लागल्या .
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Apr 2019 - 9:23 am | कुमार१
वाचतोय, पु भा प्र
11 Apr 2019 - 7:41 pm | शेखरमोघे
आभारी आहे.
11 Apr 2019 - 7:42 pm | शेखरमोघे
आभारी आहे.
11 Apr 2019 - 9:26 am | यशोधरा
वाचते आहे. तीनही भाग आवडले.
छान लिखाण.
11 Apr 2019 - 7:43 pm | शेखरमोघे
आभारी आहे.
11 Apr 2019 - 1:31 pm | पद्मावति
सुंदर लेखमाला. वाचतेय.
11 Apr 2019 - 7:44 pm | शेखरमोघे
आभारी आहे.
11 Apr 2019 - 2:35 pm | चित्रगुप्त
लेखमाला खूपच वाचनीय आणि माहितीपूर्ण चालली आहे.
11 Apr 2019 - 7:41 pm | शेखरमोघे
आभारी आहे.
11 Apr 2019 - 3:11 pm | अनिंद्य
@ मोघे साहेब,
जफरच्याच भाषेत लिहायचे तर लेखन 'हर्फ-ए- खूबॉं हैं'.
पु भा प्र,
अनिंद्य
11 Apr 2019 - 7:40 pm | शेखरमोघे
..... बहुत शुक्रिया, बडी मेहेर्बानी..... (आधी आणि नन्तरच्या तानान्सकट).....
13 Apr 2019 - 8:48 am | तुषार काळभोर
छान लेखमाला!!
14 Apr 2019 - 10:11 pm | शेखरमोघे
धन्यवाद!!